एक लव्ह स्टोरी.... दहा वर्षाची!
प्लेटमधून येणाऱ्या वाफेआडून ऑफव्हाईट रंगाच्या सॉसची आणि माझी नजरानजर झाली. उजव्या हातात असलेला काटा चमचा पेने पास्त्यावर विसावला, स्पर्श झाल्या झाल्या पास्त्यामध्ये अलगदपणे घुसला. पास्ता परफेक्टली कुक्ड झाल्याच्या टेस्टमध्ये 'ल प्लसीर' पास झालं होतं. हो, आमच्या प्रभात रोडवर हे नुकतंच उघडलं होतं प्लासिर आणि नव्याचं रॅगिंग करायला आम्ही तिथे हजर. पण साला या महाडिक च्या प्लासिर ने प्रेमात पाडलं राव.Wednesday, November 2, 2022
एक लव्ह स्टोरी.... दहा वर्षाची!
Thursday, December 31, 2020
काळजी करू नका, घ्या!
"तुमचं कसं होतंय सांगू का? आपले डायलॉग झाले की काम संपलं! हे असं नसतं...सीनमधले बाकीचे काय बोलत आहेत ते ऐकत राहणं आणि रिअक्शन देणं तेव्हढंच महत्वाचं आहे..."
आफळे काका आमच्या नाटकाची रंगीत तालीम बघायला आले होते. तेव्हा त्यांनी मला हक्काने हे सांगितलं. हे असं न विचारता कुणी काही सजेशन्स दिल्या की नुसतं ओके म्हणून वेळ मारून नेतो मी. आफळे काकांची गोष्ट वेगळी. त्यांनी काही सांगितलं आणि आपण मी सिरियसली ऐकलं नाही असं होऊच शकत नाही.
खरंतर ओळख जेमतेम दोन वर्षांची. डेन्वरमधल्या मैत्रिणीचे ते वडील. तिच्याकडे दोन वर्षांपूर्वी आले राहायला तेव्हा पहिल्यांदा भेटले. सहा फूटच्या आसपास उंची, पांढऱ्या केसांचा टापटीप भांग पाडलेला, टीशर्ट, जॅकेट आणि ट्रॅक पॅन्ट, अतिशय बोलका चेहरा. त्यांच्या पहिल्या इम्प्रेशनवरून हा इसम नक्कीच बँक मॅनेजर किंवा प्राध्यापकवगैरे असावा वाटलं. होतेच ते बँक मॅनेजर!
"प्रवास कसा झाला हे आपल्या हातात असतं .. खायचं प्यायचं आणि झोपायचं... विमान बदलायचं, पुन्हा खायचं प्यायचं आणि झोपायचं... हिच्यासाठी व्हील चेअर सांगितली, मी मात्र चालत गेलो. चाललो नाही तर पुढच्या विमानात झोप कशी लागणार" पहिल्याच भेटीत मी विचारलेल्या एका टिपिकल प्रश्नाला त्यांनी हे उत्तर दिलं , स्वतःच जोरात हसले आणि तिसऱ्याला वाक्याला विनोद करायचा हे पुलंनी सांगितलेलं त्यांनी काटेकोर पाळलं. हा माणूस टिपिकल मॅनेजर आहेच पण त्यापेक्षा पुणेकर आहे हे माझ्यातल्या चाणाक्ष पुणेकरानी चटकन ओळखलं.
जनरली भारतातून अमेरिकेत आलेले हे सगळे 'पालक लोकं' दोन प्रकारची असतात. एकतर अति उत्साह असतो, अमेरिका बघायची, फिरायची , इकडच्या प्रत्येक गोष्टीचं कौतुक करायची खूप हौस असते किंवा काही जणं एकदमच बुजल्यासारखे वागतात. ते होमसिक झालेले असतात. "अमेरिकेत सगळं आहे पण माणसं नाहीत!" असं म्हणत महिन्याभरात प्रचंड वैतागलेले असतात. पण आफळे काका म्हणजे या दोन्ही गोष्टींचा कमालीचा संगम. एकदम बॅलन्सड. अमेरीकासाठी उत्साहपण आणि पुण्यातल्या गोष्टींमध्ये, ग्रुप्समध्ये इन्व्हॉल्वमेंटपण. कॉस्टको सारख्या दुकानापासून पासून ऑलिव्ह गार्डन सारखं रेस्टोरंट एन्जॉय करून ते सहा महिने थांबून पुण्याला गेले.
पण लांब गेले तरी कॉन्टॅक्ट कधीच तोडला नाही. आणि कॉन्टॅक्टमधे राहणं म्हणजे रोज उठून गुड मॉर्निंग मेसेज पाठवणं नसतं. आयपीएलमध्ये मॅच भारी झाली, राजकारणात काही तरी इंटरेस्टिंग घडलं किंवा पुण्यात नवीन नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग झाला हे अशा गोष्टीनवरून ते व्हाट्सअँपचर्चा करणार! माझ्याकडून मेसेज उशिरा गेला तरी ते थांबायचे नाहीत. मुळात माणसं जोडणं आणि जोडलेली माणसं टिकवणं ह्यात ते एक्स्पर्ट. त्यामुळे एखाद्याने रिप्लाय केला नाही म्हणून यांचा इगो नात्यामधे यायचा नाही. त्यांची ही नवीन ओळख मला ते पुण्याला गेल्यावर झाली.
पण त्यांची खरी ओळख ते वर्षभराने पुन्हा डेन्वरला आले तेव्हा झाली.
ते पुन्हा डेन्वरला यायचं कारण आणि वेळ ह्यात काहीच पॉझिटिव्ह नव्हतं. प्रेमानी पाहिलेली क्युट स्वप्न तुटली होती, सगळं उदास होतं , मनात निराशा होती आणि इकडची डिप्रेसिंग थंडी सुरु झाली होती. त्यात ते इकडे आले. त्यांच्याबद्दल काळजीच वाटत होती. पण वकार युनूसच्या योर्करवर जडेजाने सिक्स मारावी तशी काकांनी सिच्युएशन हॅण्डल केली. जेटलॅग, वेदरमधला कमालीचा बदल ह्या सगळ्याला सामोरं जाताना त्यांनी दाखवलेली ऍडजस्टमेन्ट एखाद्या एमच्यारख्या यंग लोकांना लाजवेल अशी होती. आणि हे सगळं करताना, लेकीची काळजी घेताना चेहऱ्यावर कधीच दुःख दिसलं नाही. दिसलं ते फक्त एक निर्मळ हास्य. समोरच्याला उत्साही करणारं.
थंडी, घरची सिच्युएशन या सगळ्यात ते सेट होतायेत तेवढ्यात हे करोना प्रकरण सुरु झालं.पुण्याला जायच्या निघणार आणि लोकडाऊनमुळे त्यांचं विमान कॅन्सल झालं. सगळीच अनसर्टन्टी वाढली. त्यांच्या बॅगज पॅक होत्या. पण सगळं प्लॅन फिस्कटला. त्यांचा पुण्याला गेलेला जावई पुण्यात अडकला होता आणि हे अमेरिकेत. लोकडाऊनमुळे डिप्रेशन वाढलं होतं. आमच्यासारखे सुद्धा कधी हे सगळं संपेल अशी वाट बघत होतो. नुसती काळजी करत होतो. आणि त्याउलट हा आफळेकाकांचा हा ६५ वर्षाचा तरुण आम्हाला धीर देत होता. ६ महिन्यांचा त्यांचा स्टे दहा एक महिने वाढला तरी डगमगले नाहीत. चॅलेंजेसला हसऱ्या चेहऱ्याने सामोरे जात होते. इकडे बसून तिकडच्या गोष्टींची काळजी करायची नाही. इन फॅक्ट "काळजी करू नका, घ्या " हे ते आम्हाला सतत सांगत होते. त्या लोकडाऊनच्या काळात म्हणजे मार्च पासून जून पर्यंत अमेरिका आणि भारत दोन्हीकडची सिच्युएशन गंडली होती. आम्हाला आमच्या घरच्यांची काळजी वाटत होती. सगळं निगेटिव्ह वातावरण झालं होतं. अशा वेळेस माणसं प्रत्यक्ष भेटणं हे एक सुखकारक गोष्ट झाली होती. आणि त्यात आफळेकाकांसारखा माणूस भेटून तो पॉझिटिव्ह एनर्जी देणारा एकमेव सोर्स बनला होता. अजिबात अतिशयोक्ती नाही पण केवळ ते इकडे होते म्हणून आम्ही आमच्या आईबाबांना कमी मिस केलं. आमच्या छोट्या कान्हाला आबांशी खेळायचं म्हणजे काय असतं हे समजलं. कान्हाशी खेळताना ते लहान व्हायचे!
माझ्याशी बोलताना फडणवीस, कोहली पासून ते प्रशांत दामले पर्यंत सगळे विषय काढायचे. प्रवीण तरडे त्यांचा विशेष लाडका. प्रवीणने तेव्हा असं नाटक बसवलं, तो तेव्हा असं बोलला, मुळशी पॅटर्न करताना अमुक तमुक झालं. ते भरभरून बोलायचे. नाटकाचा कुठलाही किस्सा सांगताना त्यांचा आल्रेडी हसरा असणारा चेहरा अजून फुलून जायचा. आणि हे सगळं त्यांच्या तोंडून ऐकताना कोविड,लोकडाऊन, विमान कॅन्सल हे सगळे पॅनिक आणणारे विषय कुठच्या कुठं पळून जायचे. एकांकिका बसवताना आफळेकाकांना आलेले अनुभव ऐकताना मला भरत नाट्य च्या बाहेर बसून मित्रांबरोबर चहा पितोय असंच वाटायचं.
फायनली ते पुण्याला गेले. तिकडे गेल्यावर सुद्धा मास्कवगैरे सगळं लावून सहकारनगरमधून अप्पा बळवंत चौकात जाऊन माझं पुस्तक आणलं. त्यांचा हा उत्साह वाखाणण्यासारखा होता. पुस्तक वाचून नुसतंच कौतुक नाही केलं पण चार चांगल्या गोष्टी सजेस्ट केल्या. पुढच्या वेळेस हे लक्षात ठेव असं हक्कानी सांगितलं. शिवाय ज्यांना ज्यांना माझं पुस्तक आवडेल अशा लोकांना ते गिफ्ट दिलं. ते माझे मित्र झाले होते. पण त्यांच्याबद्दल असलेला आदर दुप्पट तिप्पट झाला होता. आता त्याचा मेसेज यायची मी वाट बघायचो नाही. कधी कधी मीसुद्धा स्वतःहून मेसेज करायचो. माणसं जोडली पाहिजेत आणि जोडलेली नाती टिकवली पाहिजेत हे त्यांनी उदाहरण देऊन शिकवलं होतं.
सगळं छान सुरु होतं, त्यांचं अमेरिकेतलं 'क्युट पिंक' स्वप्न पूर्ण व्हायला आलं होतं...पण...अचानक...
ते गेले.
हे किती वाईट, निर्दयी घडलं याबद्दल खूप रडून, वाईट वाटून राग येऊन बोलता येईल, लिहिता येईल. पण आफळेकाकांनाच ते आवडणार नाही. हॉस्पिटल बेडवर बसूनसुद्धा जो माणूस "कालची मॅच किती भारी झाली, बघितलास का" असा मेसेज करतो त्या माणसाला दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी कधीच आवडणार नाही.
खरंतर, काका नाहीत ह्यावर अजूनही विश्वास बसत नाही. आजही त्यांच्या मुलीच्या घरी गेल्यावर वाटतं ते त्या जिन्यात कान्हाशी खेळत आहेत. पायरीवरून पडलेल्या कान्हाला ६५ वर्षाचा तरुण कॅच करत आहेत.
त्यांच्या उत्साहाच्या दहा टक्के उत्साह आपल्यात असावा हे असं आता मला वाटतंय. २०२० नी बरंच काही शिकवलं. पण २०२०मध्ये आफळे काकांच्या सहवासात खरं शिकायला मिळालं. ते फॉलो करू शकलो तर तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
"काहीही घडलं तरी चेहऱ्यावर हास्य आणि मनात पॉझिटिव्हिटी ठेवा. आणि काळजी करू नका...घ्या!"
Thursday, June 6, 2019
फॅशन आणि मुलं???
"अजिबात जमलेलं नाहीये हे डिझाईन.. अजिबातच...कुर्ता असा असतो का???" मी पूर्णपणे जोशात येऊन म्हणालो.
"काही हरकत नाही, ज्यांनी तो कुर्ता घातलाय त्यांना तो आवडलाय... शिवाय प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला आवडतेच असं अजिबात नाही..... आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मिळणाऱ्या चांगल्या-वाईट रिऍक्शनचा आम्ही आमच्या कामावर परिणाम होऊ देत नाही ...मनापासून काम करत राहतो" तिनी एक संयमी आणि सर्वबाजूनी सडेतोड उत्तर मला दिलं.
ती म्हणजे तेजस्विनी पंडित! तेजाज्ञा नी म्हणजेच तेजस्विनी पंडित आणि अभिज्ञा भावे ह्यानी डिझाईन केलेला कुर्ता इंस्टा वर पहिला आणि सरळ आपलं मत ठोकून दिलं. कसं असत ना, ह्या सोशल मीडियावर आपल्याला काय वाटतंय, आपल्याला काय कळतंय, समोरच्यानं किती कष्ट घेतलेत वगैरे कुठल्याही गोष्टींचा विचार न करता सरळ आपलं अज्ञानातलं मत ठोकून देणं म्हणजे धैर्य असं अनेकांना वाटत असतं. आपलं पण परवा तसंच झालं. कुणी मला विचारलं नव्हतं खरंतर पण आपल्याला सगळ्यातलं सगळं कळतं हा भ्रम होता. तेजस्विनीच्या त्या एका उत्तरानी सणकून जमिनीवर आणलं.
तिच्या त्या एका उत्तरात, मला समहाऊ त्या दोघींचे फॅशन डिझाईन नावाच्या गोष्टीमागचे स्पष्ट विचार आणि कष्ट दिसले. कुठेतरी त्यांचा क्लीअर फोकस जाणवला. खरंतर दोघी प्रसिद्ध अभिनेत्री पण त्यांचा हा छंद - ही पॅशन त्यांनी सुरु ठेवली ह्याचं कौतुक वाटलंच आणि त्याच बरोबर आता त्या मुलांच्या डिझाईनमध्ये काहीतरी इनोव्हेटिव्ह करू पाहतायेत ह्याबद्दल लै भारी वाटलं.
परवाच तेजाज्ञानी लॉन्च केलेले डिझाइन्स ..मेन्स कलेक्शन्स... उमेश कामत -अभिजीत खांडकेकर सारखे लोकप्रिय अभिनेत्याना घेऊन केलेलं फोटोशूट बघितलं...आणि 'बदलत्या जगाचा' अचूक अंदाज एकदम वेळेत लक्षात घेऊन तेजाज्ञानी आल्रेडी त्यावर काम सुरु केल्याची जाणीव झाली. नवीन काहीतरी ट्राय करणं, ट्रेंड फॉलो करणं किंवा ट्रेंड सेट करणं हे सगळंच आता मुलांनासुद्धा हवं असतं आणि त्यामुळेच तेजाज्ञाची इनोव्हेटिव्ह स्टेप आपल्या मराठी फॅशनमध्ये फार महत्वाची ठरणारे ह्याबद्दल आपल्याला एकदम खात्री पटलेली आहे.
शाहरुखनी चेकस शर्ट घातले की आपण ते घालणार किंवा मोहब्बतेमध्ये स्वेटर खांद्यावर टाकला तसा आपणपण टाकणार ... ह्यापलीकडे आपल्याला फॅशनमधलं काही फारसं कळत नाही. त्यामुळे तेजाज्ञा विषयी जास्त टेक्निकली आपल्याला बोलता येणार नाही पण पैठणी हा प्रकार फक्त बायकांसाठी आहे ह्या विचारापलीकडे जाऊन त्यांनी मुलांसाठी काही अतिशय कडक कुर्ते डिझाइन केलेले आहेत ...ज्यात बॉर्डर आणि खिसा हे दोन्ही पैठणीचं आहे. त्यांच्या ह्या अशा वेगळ्या प्रयत्नांमुळेच आपल्याला त्यांचं लै कौतुक वाटलं. शिवाय अजून एक बेश्ट गोष्ट म्हणजे 'वेल-बिल्ड' लोकांसाठी त्यांचे डिझाइन्स आहेतच पण त्याच बरोबर आमच्यासारखी 'पोटाची गर्भश्रीमंती' लाभलेल्या लोकांसाठीसुद्धा तेजाज्ञा वेगळं डिझाइन्स घेऊन येतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळे वेगवेगळे ट्राय करताना हे सगळं सिम्पल कसेल दिसेल ह्याची काळजी त्या घेतात. फक्त रॅम्पवर चालतानाच घालता येतील असे ते कपडे नव्हेत.
तुम्ही हे फोटोच बघा ना मग कळेलच तुम्हाला.... आय एम शुअर हे बघून तुम्ही पण एखादी ऑर्डर द्याल त्यांना!
रोज एक तीच मळकी जीन्स आणि टीशर्ट, इंटरव्ह्यूला फॉर्मल शर्ट पॅन्ट आणि लग्नात अनेक महागाचा शेरवानी (जो नंतर आयुष्यभर पडून राहतो) साधारण ह्या पलीकडे मुलांची फॅशनबाबतीतली नजर जात नसे .. 'आमच्या काळी'वगैरे लिहिणार होतो, पण जरा उगाचच म्हातारं झाल्याचा फील आला असता. तेंव्हासारखी "फॅशन आणि मुलं??" असं विचारणारी आत्ताची जनरेशन नाही. फक्त मुलगी 'हो' म्हणेपर्यंतच छान दिसायचं असं आजच्या पिढीचं नाही..... आणि मुलांच्या अशा पिढीला जे हवं ते देणारी अशी ही तेजाज्ञाची दृष्टी अजून अजून ब्रॉड होत जावो... ह्याच त्यांना शुभेच्छा!
जाता जाता----
क्रिकेट, सिनेमा आणि खाणं ह्या पलीकडे जाऊन लिहायचा विचारदेखील करू न शकणाऱ्या आमच्यासारख्या दगड माणसाला देखील फॅशन बद्दल लिहायला भाग पाडलं... इथंच तेजाज्ञा टीम जिंकलेली आहे 😊
- स्वागत पाटणकर
Wednesday, January 30, 2019
अंकुश चौधरी - आपला ट्रेस लेचेस!
3-4 महिन्यांपूर्वी मेक्सिकन रेस्टोरंटमध्ये बसून ट्रेस लेचेस नावाचा केक खात होतो... तीन प्रकारच्या दुधातून बनवलेला ,एकदम साधी रेसिपी असलेला पण तरी एकदम रीच आणि चविष्ट असा हा केक... आमची ढेरी आणि मन तृप्त झालं होतं... तेवढ्यात फोन वाजला... पलीकडून आमचे मित्र अमित फाळके बोलत होते...सोनी मराठीसाठी एक लेख लिहिलेला त्यांना खूप आवडला म्हणून फोन आला होता..
बोलणं झाल्यावर त्यांनी "स्वागत, एका मित्राला बोलायचंय तुझ्याशी...." अस म्हणून फोन कोणाला तरी दिला....30 एक सेकंद शांतता होती...मी फोन कट करणार तेवढ्यात "स्वागत, तुम्ही खूप छान लिहिलं आहे... आवडलं" हे कौतुक करणारं वाक्य अतिशय सॉफ्ट आवाजात माझ्या कानांवर पडलं...कौतुक होतंय म्हणून नाही... पण तो आवाज ऐकून आपण मेजर खुश झालो... तो आवाज फार पूर्वीपासून मनात घर करून बसला होता खूप ओळखीचा होता, लाडका होता....अतिशय एकसाईट झालो होतो... पलीकडून अंकुश चौधरी बोलत होता! तो सॉफ्ट आवाज खूप आठवणी जाग्या करून गेला.
20-25 वर्षापूर्वी, आमच्या मोठ्या बंधूंबरोबर ऑल द बेस्ट बघायला गेलो होतो... गंधर्वसमोर एका हॉटेलबाहेर मी त्याची वाट बघत होतो.. शेजारीच एका कट्ट्यावर 3-4 पोरं लै कल्ला करत बसलेले... खूप गप्पा आणि जोरजोरात हसणं सुरू होतं त्यांचं... दुसऱ्याच्या गप्पा ऐकायची आम्हाला नेहमीच सवय... मी पण त्यांच्याजवळ जाऊन ते ऐकायला लागलो.. गप्पांमधला कंटेंट कळत नव्हता पण पोरांच्या बोलण्याची हसण्याचीवगैरे स्टाईल ऐकून लै हसू येत होत.. तेवढ्यात भाऊ आला ...अतिशय घाईत घाईत म्हणाला चल लवकर ... नाटकाची वेळ झालीये... मी त्या गप्पा अर्धवट सोडून निघालो... तेवढ्यात त्या ग्रुपमधला एक उंच, गोरा हँडसम मुलानी त्याच्या अतिशय सॉफ्ट आवाजात आम्हाला किती वाजलेत विचारलं....त्याला वेळ सांगून आम्ही निघालो....का कोणास ठाऊक, पण पुढे गेल्यावर मी पुन्हा वळून त्या कट्ट्यावर बघीतलं... ती पोरं सुद्धा गायब झाली होती... माझ्या आयुष्यातली ती 10 मिनिट मला खूप हसवल्याबद्दल त्यांचे मनातल्या मनात आभार मानून नाटकाला बसलो... पडदा वर गेला...आंधळ्यानी एन्ट्री घेतली.... 2 एक मिनिटं विश्वासच बसला नाही... तो बाहेर कट्ट्यावर बसून टाईमपास करणारा, वेळ विचारणारा मला स्टेजवर दिसत होता... हळू हळू ते तिघेही स्टेजवर दिसले... आपण संजय नार्वेकर, भरत जाधव आणि अंकुश बरोबर अतिशय फुकटात 10 मिनिट हँग आऊट केलाय हे मला समजलं...त्या 10 मिनिटात त्यांनी जेवढं मला हसवलं होतं त्याच्या कैकपटीने मी आणि सगळे प्रेक्षक पुढचे 2 तास हसत होतो खिदळत होतो... हे तिघे फुल्ल आवडून गेले होते... विशेषतः अंकुश...कारण तो आपल्याशी बोलला होता!
त्यानंतर आपण अंकुशवर नेहमीच लक्ष ठेवून असायचो..या माणसाचा करिश्मा गेल्या 20-25 वर्षापासून वाढतच चाललाय.. फार पूर्वीपासूनच मराठी पोरी याच्या प्रेमात आहेत...आमच्या अनेक मैत्रिणी त्याच्या वेड्यासारख्या फॅन होत्या...आम्ही अगदीच हे लाईव्ह बघितल होतं.
पुण्याच्या कमिन्स कॉलेजमधल्या बेधुंद मनाची लहरचं शूटिंग बघायच्या निमित्तानं वर्षभर कॉलेज बंक करणाऱ्या पोरी कॉलेजमध्ये दिसू लागल्या त्या केवळ अंकुशमुळे...इतकंच काय तर अंकुशचा एक अतिशय वेगळा रोल आणि लूक असलेल्या गोपाळा रे गोपाळा नाटकात तो त्याच्या ओरिजिनल हिरो लूकमध्ये अक्षरशः 30 सेकंदासाठी येतो, पण त्या 30 सेकंदात त्याच्यातल्या हिरोनी टिळक स्मरकमधल्या अनेक काकवा, मावश्या, मुली, तरुणी या सगळ्यांना घायाळ करून गेला...
आम्हीसुद्धा त्याच्या अभिनयाचे फॅन होत चाललेलो....त्याच्याबद्दल लिहून आलेलं वाचायचो..त्यातूनच केदार, भरत आणि अंकुशच्या मैत्रीबद्दल वाचलं होतं.. इंडस्ट्रीमध्ये असंही काही असत हे ऐकून कडक वाटलं होत... तू तू मी मी सारख नाटक असेल किंवा हसा च क ट फु , बेधुंद मनाची लहर सारखी टीव्ही सिरीयल... अंकुश सगळीकडे दिसत होता.. थोडे दिवसांनी सावरखेड वगैरे सारख्या सिनेमातसुद्धा तो दिसायला लागला होता...पण सोलो हिट म्हणतात ते तसं काही अंकुशच्या नावावर नव्हतं.. एकीकडे भरत सही रे सही मधून आणि संजय नार्वेकर अग बाई अरेच्चा मधून आता सुपरस्टार झाले होते... दोन्हीं केदार शिंदेच्याच कलाकृती... ते त्यांची मैत्री वगैरे सगळं झूठ आहे, केदारला अंकुशची काही पडली नाहीये असं आमच्या अनमच्युअर्ड मनाला वाटायचं...(सही रे सही च्या अनाऊंसमेंट मध्ये विशेष आभार - अंकुश चौधरी हे ऐकून मात्र खूप भारी वाटलं होतं, हां आहे आहे त्यांच्यात अजूनही मैत्री आहे अशी खात्री आमच्या लहान मनानी करून घेतली)
पण काहीही असो, अंकुशचं नाव कधी एकट्याने घेतलं जायचं नाही... नेहमीच भरत , संजय, केदार किंवा श्रेयस तळपदे त्याच्या जोडीला असायचेस... नाही हो, आपल्याला काही ह्या लोकांशी दुष्मनी नाही.. ते सगळे आवडतातच आपल्याला पण अंकुश थोडा जास्त आवडतो इतकाच काय तो फरक...कधी एकदा तो एकट्याच्या नावावर नाटक सिनेमा हिट करतो असं आम्हाला वाटत होतं ....मधे बरीच वर्ष गेली पण आमच्या मनासारखं घडतच नव्हतं आणि कदाचित त्याच्या मनासारखं देखील! अनेक दिवस गेले, वर्षे गेली आणि मग दुनियादारी आला.... अंकुश नेहमीसारखा कलाकारांच्या गर्दीत होता पण या वेळेस एकदम स्पेशल होता...दुनियादारी वाचताना समोर उभा राहिलेला दिग्या एकदम परफेक्ट स्क्रीन वर आला होता तो अंकुशच्या रुपात... नंतर पुन्हा एकदा मल्टीस्टारर क्लासमेट्स गाजवला... वेगळी इनिंग सुरू झाली होती अंकुशची आणि त्याचबरोबर आमच्यासारख्या फॅन्सची... 20 एक वर्ष साहेबांना फॉलो केल्यावर मनापासून आनंद आणि अभिमान वाटला तो मात्र 'दगडी चाळ', 'ती सध्या काय करते' आणि 'डबल सीट' च्या सक्सेस नंतर... चित्रपट गाजले आणि यावेळेस फक्त त्याचं नाव होतं... आमच्या अँकी चे सोलो हिट...आम्हाला हवे हवेसे असे!
या सगळ्या आठवणीत तो केक आता संपला होता. यावेळेस चा ट्रेस लेचेस केक खूप वेगळा आणि जास्त गोड लागला होता..... " लिहीत राहा, स्वागत" असं म्हणून अंकुशनी फोन ठेवला...एवढा मोठा माणूस एवढा डाऊन टू अर्थ! आयुष्यातला एक बाप विकेंड होता तो माझ्यासाठी... अमितला लै वेळा धन्यवाद त्याबद्दल...
हा अंकुश सुद्धा मला नाटक, सिनेमा आणि सिरियल्समध्ये मुरलेल्या ट्रेस लेचेस केक सारखाच वाटतो... सिम्पल, लाडका आणि अतिशय गोड! वाढत्या वयाबरोबर तरुण होणाऱ्या अंकुशला लै वेळा हॅपी बर्थ डे...
येत्या वर्षात आता प्लिज एक नाटक कर रे दादा.... बाकी काही नाही पण '.... आणि अंकुश चौधरी' हे ऐकायची आमची हौस लवकर पूर्ण व्हाव्ही हाच एक स्वार्थ आहे :)
हॅपी बर्थडे, अंकुश!
- स्वागत पाटणकर
Tuesday, January 8, 2019
आनंदी गोपाळ!
तीन चार महिन्यांपूर्वी एका मोठ्या नेत्यानी पुणेरी पगडी घालायला नकार दिला त्यावरून वाद सुरु झाला होता... अक्षरशः वाद 'निर्माण' करण्यात आला होता.. त्यांचे समर्थक असो वा विरोधक ...सगळेच एक युध्य असल्यासारखं बोलायला लागले होते... खरं तर एक सामान्य नागरिक म्हणून या सगळ्याची लाज वाटू लागली होती... शिवाजी महाराज,गांधी,सावरकर,फुले या सगळ्या थोर लोकांना आपल्या राजकारण्यांनी 'वाटून' घेतलं आहेच पण आता त्यांनी पुढची पायरी गाठली होती... या थोर लोकांच्या 'टोप्या' सुद्धा आता विभागायला निघाले होते. पुणेरी पगडी या जातीची ... अमुक एका पक्षाची , फुल्यांची अमुक जातीची तर गांधी टोपी अमुक एका पक्षाची ..दुसऱ्या कोणाचा त्यावर अधिकार नाही हे असं काहीतरी बिंबवायला सुरुवात झाली होती... सोशल मीडियावर सगळे पेटले होते.... टोप्यांवरून पोष्टी पडायला सुरुवात झाली होती. राजकारण हा आपला विषय नाही पण हे सगळं दूषित वातावरण बघून मन खिन्न झालं होतं ...
गेल्या काही दिवसात खेळाडू, रंगकर्मी किंवा साहित्यिक ह्यावरचे बायोपिक येऊन गेले, प्रेक्षकांनी देखील सर्व सिनेमे डोक्यावर घेतले ... एकदम ट्यूब पेटली... असाच एखादा सिनेमा डॉ आनंदी बाईंवर निघाला तर??? पण कोण काढणार... मराठी सिनेमात अशी रिस्क घेणार तरी कोण? ..असं वाटलं.. इंडस्ट्रीमधल्या काही मित्रांसमोर हा विषय काढला ... तेव्हा मला " समीर विद्वांस " एवढंच उत्तर मिळालं... तेव्हा काही समजलं नाही. पण परवा समीरनी त्याच्या नवीन सिनेमाची अनाउन्समेंट केली.... "आनंदी गोपाळ".... लै भारी वाटलं बघून लै...मनापासून आनंद झाला. डबल सीट असो वा नवा गडी नवा राज्य ..त्याची नायिका नेहमीच वेगळी असते, काहीतरी मेसेज देणारी असते...सक्षम असते... त्यामुळे 'आनंदी गोपाळ'बद्दल जास्तच उत्सुकता लागलीये. पूर्वी हिंदी सिरीयल येऊन गेलीये या विषयावर , पण आता मराठी सिनेमा काढण्याचं धाडस केल्याबद्दल झी आणि मंगेश कुलकर्णीचे लै धन्यवाद.
त्यामुळेच अनुजासारखं आदर्श उदाहरण सर्वांच्या ठेवून समीर आणि झी ला 'आनंदी-गोपाळ'साठी शुभेच्छा देण्यासाठी हा सगळा खटाटोप. टोप्या घालणाऱ्या राजकारण्यांपासून ते पाहिलीत शिकणारा चिंटूला देखील हा सिनेमा काहीतरी शिकवून जाईल हे नक्की.
१५ फेब्रुवारी म्हणजेच परीक्षेच्या १-२ महिने आधी 'आनंदी-गोपाळ' रिलीज होतोय... मुलांना नक्क्की दाखवा...
काय सांगा, 'शिक्षण-परीक्षा' ह्या सगळ्याकडे बघायचा त्यांचा दृष्टिकोन बदललेला असेल!
Wednesday, December 19, 2018
डेट विथ ' डेट विथ सई'
नार्कोज बघून झालं, मिर्झापूर जस्ट संपवलं होतं... विकेंड आला होता , ऍज युज्वल "काय करायचा वीकेंडला" प्रश्न पडला होता. एफ बी - इंस्टवर टाईमपास सुरु होता. सई ताम्हणकरच्या लाखो फालोअर्समध्ये आम्ही देखील त्यातले एक.... "वेब सिरीज - डेट विथ सई इज नाऊ अव्हेलेबल" असं काहीतरी लिहिलेल्या तिच्या इन्स्टा स्टोऱ्या सारख्या समोर येत होत्या. आधी वाटलं टॉक शो वगैरे आहे... आजकाल वेब सिरीज ते फॅड झालंय ना कि सेलिब्रिटीजना इंटरव्ह्यूला बोलवायचं, त्यांची मजा घ्यायची आणि मग लोकांचे व्युज मिळवायचे. 'डेट विथ सई' असंच काहीतरी असं वाटलं .. थोडी माहिती काढल्यावर त्यात सई बरोबर अजून दोन इंटरेस्टींग नावं वाचली ... ज्ञानेश झोटिंग आणि विनोद लवेकर... झोटिंगच्या राक्षसबद्दल लै लै ऐकलं होतं आणि प्रोड्युसर विनोद लवेकर म्हणजे आपले फेव्हरेट... ज्या काही मराठी डेली सोप्स आवडीने बघितल्या आहेत त्या सगळ्यातला कॉमन फॅक्टर म्हणजे विनोद लवेकर...
ठरलं तर मग ... शनिवार रात्र होती... हातात वाईनचा ग्लास घेतला ... सई , विनोद आणि ज्ञानेश ह्या तीन नावांवर विश्वास ठेवून लावला कि "डेट विथ सई" वेब सिरींजचा पहिला एपिसोड. पहिल्याच सीनमध्ये मॅडम एकदम वेगळ्याच अवतारात एंट्री घेऊन आपल्यासमोर हजर होत्या.. सुपरवूमन इश्टाईल.. आपण प्रेक्षक एखादी गोष्ट लगेच जज करायला जातो. माझंसुद्धा तो सीन बघून तसंच झालं... श्या हे ग्राफिक्स कसले खोटे आहेत, फसली आहे सिरीयल वगैरे कमेंट्स पास झाल्या.. पण दोनच मिनिटात तो एकच्युली "शूटिंगचा शॉट" आहे हे कळलं. ह्या इंट्रोडक्टरी सीन नंतर मात्र अजिबात वेळ न दडवता दिग्दर्शक मालिकेच्या कथेत घुसला हे आपल्याला अतिशय आवडलं. एखाद्याकडे जेवायला जावं , त्याच्या घरात घुसल्या घुसल्या चिकन रस्स्याचा वास यावा आणि आपण किचनकडे ओढले जावं असं काही आपलं "डेट विथ सई" बघताना होतं. पहिल्या एपिसोडच्या १०व्य मिनिटात आपल्यालापुढे नक्की काय प्रकारचं वाढून ठेवलंय याचा अंदाज येतो. आपलंसुद्धा एक्सझॅक्ट तसंच झालं. एका मागून एक असे सगळेच्या सगळे एपिसोड एका फाईटीत संपवले आणि लास्ट एपिसोडनंतर 'च्यायला ,संपली सुद्धा..श्या" अशी रिअक्शन बाहेर पडली. 'डेट विथ सई'च हेच मोठं यश आहे असं आपल्याला वाटतं.
अतिशय फास्ट अशी मांडणी , परफेक्ट ठिकाणी आलेले ट्विस्ट्स , शून्य ताणलेली आणि अतिशय महत्वाचं म्हणजे पूर्णपणे नवीन गोष्ट घेऊन ज्ञानेश आपल्यासमोर येतो. ही गोष्ट खरंच इतकी वेगळी आहे कि आपण फक्त "हे असं घडू शकतं ??" आणि "हे असंही घडू शकतं " हे एवढंच आपण पूर्ण सिरीयल भर बोलत राहतो. ज्ञानेश आणि असिस्टण्ट डिरेक्टर आशिष बेंडेची कमाल आहे. त्या आशिषला अनेक म्हणजे अनेक वर्षांपूर्वी एक होता अल्लादिन एकांकिकामध्ये बघितलं होतं...इतक्या भारी भारी सिनेमा-सिरियल्स मध्ये असिस्टंट डिरेक्टरचा अनुभव घेऊन आता आशिष साहेबांचा अल्लादिन नक्कीच दिवा उघडणार आणि त्याची स्वतःची एखादी कलाकृती नक्की घेऊन येणार.... फुल्ल गॅरंटी आहे आपल्याला.
ही सिरीयल फास्ट आहे आणि तोच वेग ती कायम राहतो याचं कारण म्हणजे कथेतील पात्र... मेन कॅरेक्टर्स फक्त दोन. त्यातली एक म्हणजे अर्थातच सई ताम्हणकर .... ही मुलगी सगळं करत असते सगळं.. सिनेमा करते, वर्क आउट करते, बारीक होते, टीव्हीवर जज म्हणून जाते आणि आता वेब सिरीज... ती सुद्धा अशा वेगळ्या विषयावरची. . स्क्रीनवरची सई आणि प्रत्यक्षातली सई दोघीही धाडसी , चॅलेंजेस ऍक्सेप्ट करणारी.. बऱ्याच सीन्समध्ये फक्त रिअक्शन देऊन व्यक्त होते... डायलॉग्सची तिला गरजच नसते. आपल्याला असं नक्की वाटतंय कि सई नी हा डिफरंट रोल नक्कीच एन्जॉय केला असणार...सईच अजून कौतुक वाटायचं कारण म्हणजे बऱ्याच सीन्समध्ये समोरच्या काहीशा नवख्या कलाकाराला तिच्यापेक्षा जास्त भाव खायला जागा आहे पण तरी सुद्धा ती तिच्या 'सेलेब्रिटी' इगो तिच्या कामापासून दूर ठेवते...
आता जरा बोलूया त्या नवख्या कलाकाराबद्दल..रोहित कोकाटे.... अरररे मित्रा कोण आहेस तू? कुठं होतास इतके दिवस...? खरंतर केवढा अवघड रोल होता ..थोडं इकडे तिकडे झालं तर एकदम फिल्मी किंवा एकदम बालिश देखील वाटू शकला असता... मार्जिन ऑफ एरर अगदीच कमी पाहिजे अशी ही भूमिका ...आणि ती तेवढ्याच ताकदीने रोहित आपल्यासमोर उभी करतो... त्याच्यामुळे डेट मधली गम्मत,रोमांच आणि सस्पेन्स वाढतच रहातो .. लड़का लै आगे जायेगा... त्याला बघितल्यावर शाहरुखचा लाडका झीशान अयुब ची आठवण येते आणि त्याचं गावरान मराठी बोलण्याची स्टाईल एकदम नागराज सारखी वाटली राव... लै झकास...
हे सर्व कमी का तर त्यात आपले लाडके अमेय, गिरीजा ओक, पूजा ठोंबरे गेस्ट म्हणून येतात ... त्यांना असं बघायला भारी वाटतं .. पूजा त्या ५-१० मिनिटाच्या सीनमध्येसुद्धा अतिशय क्युट दिसते राव 😍! ज्ञानेश, आशिष बेंडे, रोहित सारख्या नवीन लोकांना अशी संधी दिल्या बद्दल विनोद लवेकर, त्यांची प्रोडक्शन टीम आणि सर्वात महत्वाचे 'झी५' चे लै लै धन्यवाद ... हे सगळं टीम वर्क इतकं परफेक्ट जमून आलंय कि आम्ही आमची वाईन बाजूलाच ठेवून डेट विथ सई मध्ये गुंतून गेलो.... जणू काही आमचीच एक डेट सुरु झाली .
तसं बघायला गेलं तर थ्रिलर नावाची गोष्ट आपल्या मराठीत फारच कमी , त्यात वेब वर अगदीच पहिला प्रयोग. नाही म्हणायला ह्यात सुद्धा त्रुटी आहेत... कलायमॅक्सला एका सीनमध्ये पाऊस असतो आणि दुसऱ्या सीनमध्ये गायब होतो, सईच्या पकडलेल्या नोकराला इतक्या दिवसांनी बरोबर शेवटीच खिशातला लायटर सापडतो ...ह्या अशा काही गोष्टी टाळता आल्या असत्या. बट नेव्हर माईंड ... आता एक काम करा प्रवीण प्रभाकरच खरा रघु असतो, किंवा रघु मेलेलाच नसतो हे असं काहीही करा पण सेकंड सीझन लवकर आणा... . .
.
.
कारण आम्ही वाट बघतोय...
- स्वागत पाटणकर.
Tuesday, December 11, 2018
हॅपी बर्थडे, बंटी
फॅन मुव्हीमधला छोटा शाहरुख म्हणतो "ये कनेक्शन भी ना कमाल की चीज है .... बस हो गया तो हो गया!"..... जरा शांतपणे विचार केला तर समजतं हे किती खरं वाक्य आहे. अगदी आपल्या रोजच्या आयुष्यात आपण अनुभवलेलं असं वाक्य. शाळेतला एखादा मित्र ..खूप जवळचा असा ...अनेक वर्षांनी भेटतो पण तरीसुद्धा असं वाटतच नाही कि हा इतक्या दिवसांनी भेटतोय. जुनं कनेक्शन असतं ते ... एकदम खोलवर रुजलेलं असं. तर कधीही न भेटलेली व्यक्ती ऑनलाईन चॅटमुळे ओळखीची होते आणि ते नातं जन्मोजन्मीचं असल्यासारखं वाटायला लागतं. एवढं लांब कशाला जायचं आपलं रोजचंच उदाहरण घ्या .. अजिबात रन्स करत नसलेल्या अजिंक्य रहाणेच अपयश सलत असतं आणि तेवढ्यात तो एखादी मॅच विनिंग इनिंग खेळून जातो आणि जणू काही आपल्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम संपलेत अशा आवेशात आपण पोचतो... एकदम रिलॅक्स होतो.... कनेक्शनच असतं ते... एकदम विलक्षण!
मराठी रंगभूमी आणि मराठी रसिक प्रेक्षक ह्यांचं कनेक्शन असंच काहीसं ..घट्ट एकदम! परवा आपल्या प्रिया बापटनी "गुड न्यूज"चा फोटो टाकला. रसिक प्रेक्षक खुश झाले... बाकीच्यांबद्दल कशाला बोला.... आम्ही आमच्या घरात बसून, समोर फेसबुकवर ती पोस्ट बघून एकदम एकसाईट झालो... आपल्याच घरी बाळ यावं अशा आनंदात ओरडलो ... काय सांगू, ह्या प्रिया-उमेश बद्दल वाटणारं प्रेमचं एवढं जास्त आहे कि अशी नॅचरल रिऍक्शन येणारच. खरं तर पडद्यावरच्या अशा आमच्या मैत्रिणींची लग्न झाली कि त्यांच्या पतिदेवांबद्दल आम्ही जन्मभर राग ठेवतो मनात. एकदम अबोला ठेवतो त्यांच्याशी. अगदी माधुरीच्या श्रीराम नेन्यांना सुद्धा आम्ही सोडलं नाहीये ह्यातून. पण जेव्हा प्रियाचं लग्न उमेशबरोबर ठरल्याची बातमी आमच्या कानावर आली , काय चमत्कार झाला नाही माहित पण पहिली रिअक्शन होती "आयला एकदम परफेक्ट जोडी आहे ही... प्रिया-उमेश... वाह" ....हे असं कधी घडलं नव्हतं.
थोडा ऍनालिसिस केल्यावर लक्षात आलं आमच्यावर जेवढी जादू प्रियाची होती तेवढाच उमेशसुद्धा आमच्या गुडबुक्स मध्ये होता. मला आठवतंय १४-१५ वर्षांपूर्वी , जेव्हा घरात आम्ही शहाण्या मुलासारखे वागायचो.... रात्रीचं जेवण घरच्यांबरोबर एकत्र बसून असायचं... मजा असायची...जेवण मस्त असायचं फक्त जेवता जेवता आईच्या डेली सोप्स बघायला लागायच्या. भावनांचा मारा व्हायचा. अशातच एक मुलगा लक्ष वेधून घेत होता. आभाळमाया आईची फेव्हरेट सिरीयल.... ती कंपलसरी बघता बघता आणि त्यातला बंटी आपला फेव्हरेट बनला. एकदम बिनधास्त असा बंटी आणि तेवढाच बिनधास्त उमेश. विनय आपटे सारख्या दिग्गज कलाकारांसमोर एकदम कॉन्फिडन्ट वावर असायचा उमेशचा. पुण्यात राहून फक्त पुरुषोत्तममध्ये दिसलेले लोकंच भारी अभिनेते बनतात अशी आमची अंधश्रद्धा होती ...त्यावर ह्या बंटीनी पूर्णपणे फुली मारली होती. बंटी आपल्याला पटून गेला होता ...आवडून गेला होता. पुढेमागे तो वादळवाट, गोजिरवाण्या घरात मध्ये दिसला.. असंभवमुळे अजून मोठा झाला. एका लग्नाची दुसरी-तिसरी गोष्ट त्याच्यामुळे लोकं बघायला लागली . प्रत्येक मराठी फॅमिलीमध्ये तो लाडका झाला. नवा गडी नवं राज्यामध्ये राज्यभर धुमाकूळ घातला. सिरीयल , नाटकाबरोबर तो सिनेमासुद्धा करत होता.
पण काही केल्या आमच्या मनातून बंटी उतरत नव्हता. सारखं सारखं वाटायचं..... किंवा अजूनही वाटतं ह्या मुलामध्ये प्रचंड कॅलिबर आहे पण त्या ताकदीची भूमिका त्याला अजून मिळालीच नाहीये. छोट्या छोट्या सीन्समध्ये सुद्धा त्याची क्षमता आपल्या दिसते. उदाहरणच द्यायचं म्हणलं तर नवा गडीमध्ये पार्टीहून आल्यावर त्याचा तो सीन... अभिनयाचा उच्चांक तो गाठतो. ह्यावर्षी त्याला 'ये रे ये रे पैसा' साठी विनोदी अभिनेताच अवॉर्डसुद्धा मिळालं.. पण तरी सुद्धा मला असं वाटत राहतं 'बंटी जे करू शकतो ते उमेशला अजून करायला मिळालंच नाहीये". चुकीचं असेल कदाचित, फॅन म्हणून स्वार्थ देखील असेल... .
पण उमेशला अजून अजून भारी चॅलेंजिंग भूमिका करायला मिळाव्यात असंच सारखं वाटत राहतं. शेवटी हे कनेक्शनच असं आहे कि त्याच यश आपल्याला सुखावणारं असतं.
आभाळमायामधला बंटी असाच आठवत असतानाच प्रिया पुन्हा फेसबुकवर पोस्ट टाकते... ती गुड न्यूज म्हणजे त्यांचं येणारं नवीन नाटकं आहे ... त्यांनीच प्रोड्युस केलेलं नवीन नाटक "दादा,एक गुड न्यूज आहे". टू बी फ्रॅंक आमच्यातला "प्रिया-उमेश फॅन" निराश होतो... "काय यार गंडवला आम्हाला" अशी एक फर्स्ट रिअक्शन बाहेर येते... पण त्याचबरोबर आमच्यात लपलेला रसिक प्रेक्षक खुश होतो... तिकडे कसे अमीर -शारुख प्रोड्युसर बनून नवीन सिनेमे बनवत असतात.. इंडस्ट्रीला फायदाच होतो घ्या गोष्टीचा. अगदी तसंच प्रिया-उमेश सारखे लीड ऍक्टर्स जर नाटकाची निर्मिती करणार असतील तर ती मराठी रंगभूमीसाठी खूपच चांगली गोष्ट आहे.
निर्माते प्रिया - उमेशला लै लै शुभेच्छा ....रंगभूमीवर नवनवीन प्रयोग तुम्ही सादर करालच पण आमचा बर्थडे बॉय - बंटीला अजून अजून चॅलेंजिंग भूमिका करायला मिळो ह्याच उमेशला वाढदिवसाच्या शुभेच्छा .... असो जास्त लोड नको आता .... मनसोक्त सुरमई फ्राय खाऊन एन्जॉय बर्थडे!
-स्वागत पाटणकर
बाय द वे दादा, एक गुड न्यूज द्यायचीये :) काही वर्षांपूर्वी तुझे फोटो बघून अनेक मराठी पोरं फिटनेससाठी मोटिव्हेट झाली होती... त्यात आम्हीसुद्धा एक होतो. अगदीच सिक्स पॅकवगैरे बनवू नाही शकलो ... पण फॅमिली पॅक नक्कीच कमी झाला आहे :)
Sunday, November 25, 2018
पहिला ताप
पहिला ताप
बाळ घरी येतं... घरातलं सगळं वातावरण बदलून टाकतं... बाळाची आई तिच्या नवीन रोलमध्ये पूर्णपणे शिरलेली असते.. तिची तयारीच ९ महिने आधीपासून सुरु झालेली असते...तिच्या प्रत्येक कृतीतून मातृत्व बाहेर येत असतं... बाळाचं रडणं, उठणं,झोपणं, दूध पिणं हे सगळं आई आणि बाळाच्या आगळ्या वेगळ्या कम्युनिकेशनमध्ये सुरु असतं... बाबा हे सगळं लांबून बघत असतो.. बाळाला कडेवर घेऊन खेळणं हे (आणि एवढंच) त्याचं काम झालेलं असतं.. खेळता खेळता बाळ रडायला लागलं कि तो बायकोकडे म्हणजेच आईकडे बाळाला देऊन मोकळा होत असतो... बाळाला नक्की काय हवंय हे आईलाच जास्त समजत असतं... अर्थात बाप हे सगळं जाणून असतो...पण तरी सुद्धा मनाच्या कोपऱ्यात तू कुठेतरी सारखा विचार करत असतो ... 'चिमुकल्याशी बॉण्डिंग होईल ना आपलं.....आईंसारखं!' त्याच्याकडे उत्तर नसतं... विचार झटकण्यासाठी तो पुन्हा बाळाशी खेळायला लागतो...
आणि एक दिवस खूप पाऊस पडतो... गारवा वाढतो.. अचानक झालेल्या बदलामुळे बाळ कुरकुर करायला लागतं... रडरड सुरु होते...डोळे कोमेजून गेलेले असतात.... गुबगुबीत दिसणारे गाल आत खोल गेल्यासारखे वाटतात... 'मला थंडी वाजतीये, पोट दुखतंय , कणकण वाटतीये' बाळाला खूप काही आपल्याला सांगायचं असतं... पण ते चिमुकलं फक्त रडण्याचीच भाषा बोलत असतं... आपल्याला काहीच सुधरत नसतं.... थर्मामीटर १०१ ताप दाखवतं ... आपल्याच पोटात गोळा येतो.. बाळाला जवळ घेऊन त्याच्या कानात 'औषध दिलाय राजा आता होशील बरा' एवढंच आपण सांगू शकतो... त्याला ते कितपत कळलंय हे समजत नाही... रडत रडत दमून अखेरीस तो झोपून जातो... बाळाला त्याच्या पाळण्यात ठेवलं जातं .... पण नाही....बाळाला झोपायचं असतं ते बाबाच्या कडेवरच... !रडत रडत ते पुन्हा बाबाच्या कडेवर येतं ... बाबाला आता बाकी कुठली गोष्ट दिसत नसते... मोबाईल-व्हाट्सएप्प सगळं दूर फेकून दिलेलं असतं.. शेजारच्यांनी दिलेला चिकन रस्सा तो खात नाही.... टीव्हीवर सुरु असलेली भारत-पाकिस्तान मॅच तो बघत नाही ... कशात लक्षच लागत नसतं ..तो थर्मामीटर घेऊन दर १० मिनिटाला बाळाचा ताप चेक करत बसतो... कुठल्याही छोट्याश्या आवाजानीसुद्धा बाळाची ती शांत झोप मोडू नये म्हणून खोलीत स्वतःला बंद करून टाकतो...बाळाची शांत झोप हेच त्याच नवीन आणि एकमेव टार्गेट असतं...त्या शांत खोलीत आता फक्त बाळाच्या श्वासाचा आवाज येत असतो... बापाला त्यातसुद्धा एक रिदम दिसतो.. काळजी आणि प्रेमानी तो बाळाच्या डोक्यावर हात कुरवाळत बसतो.... पाय चेपत बसतो... आणि अचानक लक्षात येत बाळानी झोपेतसुद्धा बापाचं एक बोट आपल्या मुठीत घट्ट पकडून ठेवलंय... बापाचे डोळे ओले होतात ...डोळ्यातलं पाणी बाळावर पडू नये म्हणून तो थोडी हालचाल करतो... बाळाची झोप डिस्टरब होते ... इवलेसे डोळे उघडतात... उघडल्या उघडल्या त्याला बाबाचा चेहरा दिसतो...ते बघून बाळ खुद्कन हसतं ... आय एम इन सेफ हॅन्ड्स अशा टाईप रिअक्शन देऊन ते पुन्हा निश्चिन्त झोपून जातं... बाळाची भाषा बाबाला समजते ... खुशीने वेडापिसा होतो ... काही वेळानी बाळाचा ताप उतरतो ... बाळ पुन्हा खिदळायला लागतं .. आता बाळाला भातसुद्धा बाबाच्या हातूनच खायचा असतो...'हुं,हुं,आक ,आइन्क' हे त्याच्या शब्दकोशातले शब्द वापरून तो बाबाशी बोलत असतो...
ते शब्द, ती एक रिअक्शन, ते एक घट्ट पकडलेलं बोट आज त्या बापाला 'बाबा' ह्या लेबल पलीकडे घेऊन जातं... खरं तर बाळाच्या जन्माबरोबर तो 'ऑन पेपर' बाप झालेला असतो... पण बाळाला आलेला पहिला ताप मात्र त्या बापामधल्या 'काळजी,भीती आणि माया' भावनांना वाट मोकळी करून देतो....बाळाच्या पहिला तापात मायाळू बाबाचा खराखुरा जन्म होतो!
Friday, November 23, 2018
तो आणि ते दोघे
Saturday, November 17, 2018
अंतर्मुख करणारा व्हर्च्युअल हॅपिनेस - पिंपळ!
'स्थलांतर' ह्या विषयावर हा सिनेमा बोलतो. लेखक गजेंद्र अहिरे आणि चिंतामणी अहिरे ह्यांना नक्की काय प्रश्न मांडायचे आहेत, कशाची मेसेज द्यायचा आहे, कुठल्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांवर सोपवायची आहेत हे एकदम परफेक्ट माहित असल्यामुळे ती क्लॅरिटी कथेमध्ये उतरली आहे. बेसिकली, स्थलांतर आपल्या (नैसर्गिक) जीवनचक्राचा एक भाग बनलेलं आहे. आपलं राहतं घर, जन्म झालेलं गाव सोडून दुसरीकडे स्थलांतरित होण्याचा निर्णय कधीच सोप्पा नसतो, कोणाची गरज असते तर कोणाची ध्येय असतात .. त्या निर्णयामागे प्रत्येकाची वेगवेगळी कारणं असतात.. शिवाय हा प्रश्न फक्त भारतातून-परदेशात शिफ्ट होणाऱ्या लोकांपुरता मर्यादित नाही. कोणी गावाकडून शहराकडे जातं , कोणी एकाच देशात पण दुसऱ्या शहरात मूव्ह होतात.. आयुष्याचा एका विशिष्ट टप्प्यावर असे (तेव्हा बरोबर वाटणारे) निर्णय घेतले जातात. अशा वेळेस प्रॅक्टिकल होऊन जगताना भावना मनाच्या कोपऱ्यात धक्क्ल्या जातात.... पण उतार वयात मन कमकुवत झाल्यावर 'आपलं घर', 'आपली जागा' नक्की कोणती?? हा अनपेक्षित प्रश्न पडतो... तो खुपतो...वेदना देऊन जातो. आईपासून लांब जाऊन घरटं बांधलेले आपण आणि आपल्या घरट्यातून दूर उंच उडालेले आपली पिल्लं ह्यात नक्की कोण बरोबर, कोण चूक का दोघेही सारखेच... हे असे अनेक प्रश्न गजेंद्र अहिरे आपल्यासमोर अलगदपणे ठेवतात. अतिशय नाजूक विषय समोर मांडताना कसलीही घाई करत नाहीत. छोट्या छोट्या प्रसंगातून ते आपल्याला अरविंदच्या भूतकाळात घेऊन जातात. आपणसुद्धा त्या प्रसंगात, त्या संवादात एवढे सहज बुडून जातो कि अरविंदच दुःख, त्याच्या आठवणी, त्याच्या भावना ह्या सर्व आपल्याला आपल्याच वाटू लागतात हेच ह्या सिनेमाचं मोठं यश आहे.
अरविंद झालेले दिलीप प्रभावळकर... दिग्गज माणूस.. आपण काय बोलायचं त्यांच्याबद्दल....अशक्य भारी आहेत ते.. प्रत्येक सीन, प्रत्येक डायलॉग, प्रत्येक इमोशन ....सगळं म्हणजे सगळं परफेक्ट! आज हा पिक्चर बघून त्यांना तडीक त्यांना भेटून वाकून अगदी साष्टांग नमस्कार करायची इच्छा झाली. त्यांच्या बरोबर आहेत अरविंद आजोबांना फुलासारखे जपणारे तुक्या आणि डॉक्टर मेघना म्हणजेच किशोर कदम आणि प्रिया बापट. किशोर कदम अगदीच ३-४ सीन्स मध्ये आहेत पण त्यांनी केलेला तो तुक्या आपल्याला मिश्कीलपणे चिमटे काढतो आणि सिनेमाच्या शेवटी हळूच रडवून जातो. आणि प्रिया बापट, आपली लाडकी... आपल्याला हिचं नेहमीच कौतुक वाटतं... 'लिडिंग एक्टरेस' असून ती कधी नायिकेपुरतं मर्यादित ठेवत नाही.. त्याच टिपिकल रोल्स च्या बाहेर जाऊन वेगळं शोधत असते. हीच मुलगी काकस्पर्श करते , हीच वजनदार करते आणि हीच पिंपळसुद्धा करते. भूमिकेची लांबी, भाव खाणारी भूमिका वगैरे गोष्टी तिला महत्वाच्या नसतात. पिंपळमध्ये सुद्धा दिलीप काका म्हणजेच अरविंदची डॉक्टर असणारी मेघना ती साकारते. अरविंदला बॉयफ्रेंड म्हणणारी, त्यांना पूर्णपणे ओळखणारी, त्यांची काळजी घेणारी डॉक्टर मेघना. भूमिकेची लांबी तशी छोटी पण त्यातसुद्धा ती इम्प्रेस करते. पत्र वाचायचा सीन असो वा अरविंदला घरी पीक-अप करायला आलेली असतानाच सीन असो , प्रिया का भारी आहे ऍक्टर आहे हे आपल्याला दिसून येतं.. चेहऱ्यावर काहीही फिल्मी भाव न आणता आश्चर्य, धक्के आणि अश्रू ती सहजपणे दाखवते. तिचा फ्रेश वावर सिनेमामधली गम्मत वाढवतो. वृंदा गजेंद्र, अलोक राजवाडे, सखी गोखले हे देखील सरप्राईज विझिट देऊन जातात. सखी तर एवढी गोड दिसते, शुभांगी ताईंचीच आठवण होते तिला बघून.
ह्या सगळ्या भारी कलाकारांबरोबर सिनेमा परिणामकारक बनतो तो सिनेमॅटोग्राफी, संवाद आणि डिरेक्शनमुळे. बघून अंगावर काटा येतो. अरविंदच्या आयुष्यातला सर्वात पहिला फ्लॅशबॅक म्हणजेच त्यांची आई त्यांना वाढदिवसाला उटणं लावून अंघोळ करायला सांगते तो सीन किंवा सिलिंग वरून अँगल दाखवून, गुडघे जवळ घेऊन झोपलेले अरविंद आजोबा बघून आपल्या अंगावर अक्षरशः काटा येतो. "सगळा व्हर्च्युअल हॅपिनेस! गंध नाही, चव नाही, स्पर्श नाही , सहवास नाही तरी जाणीव आहे" असे संवाद.सिनेमाचा हेतू आपल्यापर्यंत यशस्वीपणे पोचवतात.
आज हा पिंपळ पाहत असताना .... अरविंद आजोबानी मनावर अक्षरशः गारुड केलं होतं... काही वर्षांपूर्वी, गावी असणारे आमचे आजोबा , आमच्याशी फोनवर बोलणारी आमची आजी..... किंवा आत्ता आमच्या मुलांशी विडिओ चॅट करणारे त्यांचे आजी-आजोबा ह्या सगळ्यात मला दिलीपकाकांचा अरविंद दिसायला लागला. इतकंच काय तर काही वर्षांनी 'अमेरिका आपली कि पुणं आपलं' असा प्रश्न पडलेल्या माझ्या पिढीमध्ये मला अरविंद आजोबा दिसायला लागला. आज जगात अनेक अरविंद आजोबा आहेत, ही संख्या दिवसेंदिवस वाढतच जाणार..... त्या प्रत्येक अरविंदला त्यांच्या आयुष्यात तुक्या आणि डॉ मेघना मिळो हीच इच्छा!
जाता जाता - टीपीकल कौतुक करायचं झाल्यास, आज खरंच बऱ्याच दिवसांनी अंतर्मुख करणारा मराठी सिनेमा पाहिला... थँक यु गजेंद्र अहिरे... थँक यु नेटफ्लिक्स!
-- स्वागत पाटणकर
Monday, November 12, 2018
माऊली, काटेकर अँड रितेश -दे आर बॅक!
"काटेकर नंतर काय?" , "काटेकर नंतर काय"? असा प्रश्न आमच्या जोशीसाहेबांना विचारायचं हे गेल्या काही महिन्यांमधील रुटीन झालं होतं. प्रेमळ हवालदार, हळवा नवरा, वेब सिरीज वर प्रमुख भूमिका, डायलॉग डिलिव्हरी आणि स्क्रीनवरचा त्याचा वावर ह्या सगळ्यामुळे काटेकरनी सर्वाना आपलंसं करून घेतलं. पण म्हणतात ना एकदा एखादी भूमिका अभिनेत्याला चिटकली की तो त्याच त्याच प्रकारच्या भूमिका करायला बघतो. जितू जोशी बद्दल तीच भीती वाटतं होती आणि असं प्लिज नको व्हायला असं वाटत होतं. आमच्या धाडसी जोशींनी ते ऐकलं....पोलिसांच्या भूमिकेच्या अनेक ऑफर्स येऊनसुद्धा साहेबानी नेहमीप्रमाणे वेगळा रस्ता निवडलाय... आपला हळवा पोलीस आता येतोय पूर्णपणे वेगळ्या रुपात....डायरेक्ट निगेटिव्ह रोल मध्ये.... रितेश देशमुख च्या 'माऊली' चा लोंढे बनून... सिनेमात भक्ती ऐवजी भीती पसरवणारा हा धर्मराज मात्र आम्ही जोशींच्या भक्तीखातर बघणार.... अगदी पहिल्याच दिवशी पहिल्याच शो ला....
आज आमचे मित्र क्षितिज पटवर्धननी शेअर केलेलं, त्यांनी लिहिलेल्या नवीन पिक्चरचं ट्रेलर पाहिलं. आदित्य सरपोतदार दिग्दर्शित 'माउली '!! पट्या आणि सरपोतदार... आपल्याला ही जोडी लै आवडते. लेखकाला काय सांगायचंय हे समजलेला दिग्दर्शक आणि प्रेक्षकांना काय हवंय हे समजणारा लेखक. एकदम हुशार क्लासमेट्सची जोडी. अगदी फर्स्ट बेंचर्सपासून लास्ट बेंचर्सपर्यंत सगळ्यांची आवड कळलेली आणि त्यामुळे सगळ्यांची लाडकी अशी ही जोडी... . प्रेक्षकांबरोबरच कलाकारांनासुद्धा हवीहवीशी... अगदी रितेश देशमुखदेखील ह्यात मागे नाही. पटवर्धन-सरपोतदार ह्यांच्या फास्टर फेणेच्या वेळेस रितेश देशमुखला ह्या जोडीबरोबर फेणे करायला आवडला असतं असं वाटत होतं ..पण फेणेचं वय आडवं आलं असावं! .तरीसुद्धा फेणेच्या शेवटी एक गाणं ऍड करून त्यानी त्याची हौस पूर्ण केली होतीच.
माऊलीच्या वेळेस मात्र रितेशने ही संधी सोडायची नाही असं ठरवलेलं दिसतंय. माऊलीच्या लीड रोलमध्ये दिसतोय रितेश देशमुख, त्याच लै भारी आवेशात! स्टायलिस्ट एंट्री आणि शिट्ट्या पडतील असे डायलॉगज्... अमलेंदू चौधरींच्या नजरेतून दिसणारी वारी - पंढरपूरचं सौन्दर्य , शहरी असो वा ग्रामीण... मराठी जनतेला भुरळ पडणारा असा माउली-माउलीचा जयघोष ... जादुई अजय-अतुलचं जादुई संगीत अशा ह्या सिनेमॅटिक गोष्टींनी सजलेलं असं हे माऊलीचं दमदार टीझर... खरंतर दोनच मिनिटांचं ट्रेलर पण कीबोर्ड घेऊन लिहायला भाग पाडलं ते रितेश देशमुखनी!
गेल्यावर्षी एका अवॉर्ड सोहळ्यात, फास्टर फेणेला बेस्ट फिल्मचा पुरस्कार मिळाल्यावर रितेशने आवर्जून क्षितिज पटवर्धनला स्टेजवर बोलावलं होतं.फार रेअर दृश्य होतं ते. राइटर्सना विसरण्याऱ्या ह्या जमान्यात लेखकाचा असा सन्मान होताना बघून खूप भारी वाटलं होतं... रितेशबद्दल खूप कौतुक वाटलं होतं तेव्हा ... एकदम आवडूनच गेला रितेश!
खरं तर ह्या मोठ्या सेलिब्रेटी लोकांच्या मुलांचं वाटतं तेवढं सोप्प आयुष्य नसतं... वाटतं त्यापेक्षा जरा जास्तच अवघड असतं. आयुष्यात काही चांगलं केलं तर ते 'लोकांना' अपेक्षितच असतं आणि त्यामुळे त्यात काही कौतूकास्पद वाटत नाही... आणि जर काही चुकीचं केलं तर त्या सेलिब्रिटींच्या पोराला चहुबाजीनी टार्गेट केलं जातं... तेच 'लोकं' अगदी जोशात येऊन टीका करत असतात.... आणि जर तो मुलगा जर मुख्यमंत्र्यांचा असेल तर मग काय विचारायलाच नको....
आपला रितेश देशमुख... त्याचं तसंच! साधारण २००३ साली रितेशनी डेब्यू केला होता पण टू बी व्हेरी फ्रॅंक तो एकाच गोष्टीसाठी लक्षात राहिला होता... ती म्हणजे विलासरावांचा मुलगा! मग नंतर मस्ती असो व आयफा अवॉर्ड्सच अँकरिंग असो ..रितेश हसवायचा आणि तेवढ्या पुरता इम्प्रेस करून जायचा. क्या कूल है हम, हाऊसफुल्ल वगैरे टाईप्स सिनेमा मध्ये दिसायचा, डबल-मिनिंग जोक्सचा तुफान मारा करायचा ...हा मुलगा एवढंच करणार कि काय अशी भीती वाटतानाच 'रण' , 'एक विल्हन' सारख्या सिनेमातून वेगळ्याच रूपात प्रेक्षकांसमोर यायचा ... डिस्नीलँडमध्येसुद्धा नसेल अशी ही वेगळीच (आणि माझ्यासाठी निराशावादी, त्रास देणारी अशी) रोलर कोस्टर राईड होती ती ...! गमतीदार गोष्ट म्हणजे त्याच्या करियरच्या पहिल्या दहा वर्षात रितेश सर्वात जास्त आवडला तो एका वेगळ्याच गोष्टीसाठी... सिनेमा नव्हे तर क्रिकेट! काही वर्षांपूर्वी पुण्यात सेलिब्रिटी क्रिकेटची मॅच बघायला गेलो होतो... वीर मराठा टीमची ओपनिंग करायला रितेश उतरला होता. माझ्याच डोळ्यांवर माझा विश्वास बसेनासा झाला होता. तंत्रशुद्ध म्हणतात ते काय एकदम तशीच बॅटिंग देखमुख करत होता... लै कल्ला आला होता त्याची बॅटिंग बघून.. "रितेश शुल्ड रिप्लेस शिखर धवन' हे असं काही तरी गमती-गमतीत आपण बोलून गेलो होतो ..थोडक्यात काय तर एवढा तो आपल्याला अतिशय आवडून गेला होता... खरं सांगायचं तर बॅटिंग स्किल्स पेक्षा तो ज्या सिरियसनेस नी खेळत होता, गेममधली इन्व्हॉल्वमेंट ,त्याचा तो ऍटिट्यूड आपल्याला भावला होता.
समहाऊ रितेशची तीच क्लॅरिटी, तोच फोकस आणि इन्व्हॉल्वमेंट मला दिसतीये गेल्या ४-५ वर्षपासून ... मुंबई सिनेमा कंपनीची स्थापना झाल्यावर! बालक -पालक आणि यलो सारखे सिनेमे प्रोड्युस केल्यावर असं वाटलं रितेशला त्याचा रस्ता सापडलाय. तो जे काही करतोय, प्रेक्षकांसमोर आणतोय त्यात त्याच्या मनातली क्लॅरिटी पूर्णपणे उतरलीये. त्यानंतर 'विनोदी किंवा सामाजिक प्रबोधन' देणाऱ्या विषयात मराठी सिनेमा अडकून राहिला असताना रितेशने 'लै भारी'सारखा मसाला फॅमिली इंटरटेनर सिनेमा यशस्वी करून दाखवला. आणि मग आणला आपला सगळ्यांचा फेव्हरेट फेणे. एकदम सुपरहिट. आता त्याच लेखक-दिग्दर्शक जोडीबरोबर साहेब येतायेत माउली बनून. रितेशचं व्हिजन, त्याचे कष्ट त्याच्या प्रत्येक कलाकृतींमधून दिसतंय. अधूनमधून तो हिंदी हाऊसफुल्ल वगैरे करत असतोच... करू दे... आपल्याला लोड वाटत नाही आता त्या गोष्टीचा. मराठी सिनेमासाठी त्याचं काँट्रीब्युशन असंच सुरु ठेवलं म्हणजे झालं!
आज माऊलीचं ट्रेलर पाहिलं... रितेशला 'नक्की काय करायचंय, काय दाखवायचं हे त्याला समजल्याचं स्पष्ट दिसतंय. सिनेमा हे सर्वात प्रथम मनोरंजनाचं साधन आहे आणि रितेशला तेच करायचंय... प्रेक्षकांचं मनोरंजन! आशयघन सिनेमे येतच राहतील पण डिसेंबरच्या सुट्टीच्या वातावरणात, सामोसे वगैरे खात, मुल्टिप्लेक्सच्या एसी मध्ये बसून पट्याचे फिल्मी डायलॉग, आदित्यच व्हिजन आणि जितू-रितू ची ऑन स्क्रीन टशन बघून मनोरंजन करून घ्यायला काय हरकत आहे!
मुंबई फिल्म कंपनीच्या लै भारीमधला 'माउली' हिट झाला होता... आता १४ डिसेंबरला येणारा हा 'माउली vs नाना लोंढे काटेकर' सामनासुद्धा एकदम लै भारी असेल हीच अपेक्षा आणि ह्याच शुभेच्छा!
स्वागत
- स्वागत पाटणकर
Sunday, September 16, 2018
गोड माणसांचा होम स्वीट होम
आपल्यासारख्या सर्वसामान्य प्रेक्षकांसाठी (आपल्यासारख्या म्हणजे माझ्यासारख्या, दुसरं कोणी आदर देत नाही म्हणून आपण नेहमी आपल्याला आदर देत असतो...असो)...तर आपल्यासारख्या सर्वसामान्य प्रेक्षकांसाठी एखादा सिनेमा म्हणलं कि त्यातले कलाकार , म्युझिक डिरेक्टर किंवा फार फार तर दिग्दर्शक अशा काही स्पेफिसिफ 'रोल्स' पलीकडे आपण बघत नाही. पिक्चर रिलीज होताना त्यामागे प्रोड्युसर, एक्सएक्युटीव्ह प्रोड्युसर, प्रेझेंटर, डिस्ट्रिब्युटर अशी वेगवेगळी लोकं असतात.... आज आमचे जुने मित्र विनोद सातव प्रेझेंटरच्या रूपात प्रदार्पण करत आहेत...तमाम मराठी रसिक प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत नवीन मराठी सिनेमा 'होम स्वीट होम' ! पूर्वी फक्त 'भरत शाह प्रेझेंट्स' असं वगैरे वाचायची सवय होती, आज विनोद सातवचं नाव त्याच कॅटेगरीमध्ये वाचलं...... खरं सांगायचं तर अतिशय कडक वाटलं बघा....
साधारण १५ एक वर्षांपूर्वीची गोष्ट असेल , आपण तेव्हा बी कॉमच्या नावाखाली बीएमसीसीमध्ये अतिशय शिट्ट्या मारण्याचा जोरदार उपक्रम हाती घेतला होता... स्वागत@दिवसभरउनाडक्या.कॉम! आमच्या बहिणाबाई मीनाताईनी ते बघितलं ...आणि खरं सांगायचं तर तिला ते माझा असा वेळ वाया घालवणं बघवलं नाही... मला विनोद सातवचा कॉन्टॅक्ट दिला... नारायण पेठेत त्याच ऑफिस आहे भेट जरा जाऊन..एवढंच सांगितलं. आम्हा कोथरूडकरांना तिरंगा / एसपीज बिर्याणी खायची असेल तरच नदीपलीकडे जायची सवय... त्यामुळे असं कामासाठी अनोळखी माणसाकडे जायचं जीवावरच आलं होतं. पण गेलो, म्हणलं बघुतरी कोण आहेत हे सातव.
झेड ब्रिज च्या नारायण पेठेकडच्या तोंडापाशी एक छोटंसं ऑफिस, आत गेलो... बाहेरून जेवढं छोटं वाटत होतं आतमध्ये सुद्धा तसंच छोटं पण एकदम क्युट असं ऑफिस. भिंतीवर कॉर्पोरेट गिफ्ट्स ठेवून ते ऑफिस एकदम सजलं होतं... पुणेरी जुन्या घरातला तो प्रसन्न करणारा गारवा ऑफिसभर पसरला होता.... तिकडचं वातावरण आपल्याला एकदम इम्प्रेस करून गेलं. विनोदनी आत बोलावलं... एक प्लेन व्हाईट शर्ट आणि ब्लु जीन्स, हेअरस्टाईल साधी, क्लीन शेविंग .... म्हणजे थोडक्यात माणूस कसा एकदम सरळ साधा वाटावा असा ह्यांचा पहिला लूक माझ्या नजरेत पडला. "तू सध्या काय करतो, तुला काय काय येतं" असे प्रश्न त्यांनी माझ्यावर टाकले. कॉलेजमध्ये मध्ये असताना आपण सगळ्यात भारी अशा आवेशातच आपण असतो , मी सुद्धा तशाच जोशात त्यांना उडवाउडवीची उत्तरं द्यायला सुरवात केली. साधारण माझा ऍटिटयूड बघून सातव मधेच बोलले "मी पण बीएमसीसीलाच होतो, आम्ही पण तेच केलंय जे तू आत्ता करतोय ... त्यामुळे बापाला ........शिकवू नकोस " बस मला त्यांनी कमीत कमी शब्दात जास्तीस्त जास्त 'मेसेज' पोहोचवला.. मनापासून काम करायचं असेल तर कर आणि त्यात तुझाच फायदा आहे हे एकदम करारी भाषेत मला समजावलं. त्या साध्या वेशामागे हा असा सुद्धा माणूस आहे हे मला एक १० मिनिटात कळलं.
मला काम काय करायचंय हे समजावलं.... " मी २ दिवसात कळवतो" असं मी म्हणल्यावर , "तुम्ही पोरं काही जबाबदारीने ऍक्शन घ्याल वाटत नाही..मीच तुला २ दिवसांनी कॉल करतो तेव्हा मला सांग" हे सातवांचं ऐकून , आपली त्यांच्या समोर काय इमेज तयार झालीये ह्याचा अंदाज मला आला. देन देअर आफ्टर आय जस्ट वॉन्टेड टू वर्क टू प्रुव्ह हिम रॉंग! कदाचित त्यांना हेच हवं होतं आणि माझ्यातून माझं 'बेस्ट' बाहेर काढण्यासाठी त्यांनी बरोबर शब्द वापरले. ओळखीतून आलोय म्हणून फालतू लाड न करता रिऍलिटी मध्ये जगायला शिकवलं.
ते नेहमीच विविध गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व असायचे, मल्टी टास्किंग का काय म्हणतात ते तसं .. मला दिलेलं काम काय तर मोबाईल कंपनीजना टॉवर बांधण्यासाठी पुण्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये फिरायचं, बिल्डिंग आयडेंटिफाय करायच्या आणि त्यांच्या सेक्रेटरीजची मीटिंग शेड्युल करायची. पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन सुरु व्हायच्या आधी मी विनोद सातवकडे ६ एक महिने काम केलं... पण टू बी व्हेरी फ्रॅंक त्या सहा महिन्यात सातवांकडून मला आयुष्यभरासाठी अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे 'जगात कसे वेगवेगळ्या टाईप्सचे लोक्स असतात आणि त्यांना फेस कसं करायचं'... अगदी जेव्हा पोस्ट ग्रॅज्युएशनला कॉलेजमध्ये भारताच्या विविध भागातले हुशार किंवा ओव्हरस्मार्ट पोरं माझ्या बरोबर होते त्यांच्याशी स्पर्धा करताना मला सातवांनी मला कळत नकळत शिकवलेल्या अनेक गोष्टी कामाला आल्या! पुढे पुढे आमच्या भेटी कमी झाल्या पण कॉन्टॅक्ट कधीच कमी झाला नाही.... कॉर्पोरेट ट्रेनिंग असो वा त्यांनी सुरु केलेली लीड मीडिया असो, वेगवेगळ्या संधी निर्माण करून त्यात ते नेहमीच बेस्ट देत राहिले.
मराठी माणूस ९-५ जॉबमधेच खुश असतो, बिझिनेस - धंदा वगैरे मराठी माणूस सुरु करायची रिस्क घेत नाही असं कोणी माझ्यासमोर म्हणलं कि मी त्याला विनोद सातवच उदाहरण देतो. विषय कट! "आपण आपलं काम मनापासून करायचं , त्यात आपला फायदा असतो ...कामं काय आपोआप मिळत राहतात" इतका सोपा फंडा असणारा असा हा विनोद सातव आता होम स्वीट होमचा 'प्रस्तुतकर्ता' म्हणून आपल्यासमोर येतोय...अनेक अनेक शुभेच्छा!
आज विनोदनी शेअर केलेलं 'होम स्वीट होम' च ट्रेलर पाहिलं.... कसंय ना.... तुम्हाला ९८ची ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीम आठवतीये का ? हेडन , गिलख्रिस्ट, मार्क वा , स्टीव्ह वा, पॉन्टिंग आणि मग तिकडून मॅकग्रा, शेन वॉर्न वगैरे असे एक से एक भारी आणि सगळे क्लास प्लेयर्स.... म्हणजे स्टेडियममधल्या प्रत्येकानी ऑस्ट्रेलियायाला सपोर्ट करायचं आणि अतिशय खुश होऊन आनंदात घरी जायचं.... 'होम स्वीट होम'च पण एक्साक्टली तसंच आहे. आमची गोड स्पृहा जोशी , प्रसाद ओक (बीएमसीसी म्हणून अजून लाडका) , सुमीत सर , मृणाल देव , विभावरी.... वगैरे वगैरे अनेक बाप लोकं .... आणि ती सुद्धा अतिशय गॉड,एका वेगळ्याच क्लासची म्हणजे थोडक्यात काय तर प्रेक्षकांनी थेटर मध्ये जायचं आणि फक्त आणि फक्त मंत्रमुग्ध होऊन बाहेर पडायचं. ऑस्ट्रेलियन टीमसारखंच एकदम डिट्टो.तसं बघायला गेलं तर पिक्चरमध्ये ब्रॅडमनरुपी रीमाताई आणि मोहन जोशी सुद्धा आहेतच कि... एकूणच कल्ला असणार आहे स्क्रीनवर हे मात्र नक्की!
आत्ता ब्लॉग लिहितानाच नरेंद्र भिडयांनी म्युझिक दिलेलं अजय गोगावलेनी त्याची स्पेसिफिक स्टाईल सोडून गायलेलं गोड शब्दांचं गोड गाणं रिलीज झालं.म्हणजे ह्या फ्रंट वर सुद्धा हा सिनेमा निराश करणार नाही असं दिसतंय.
ही सगळी क्लास लोकं एकत्र आली आहेतच आणि त्या व्यतिरिक्त आजकाल लेखनाची आवड निर्माण झालेल्या माझ्यासारख्याला एक गोष्ट ह्या सिनेमाकडे आकर्षित करते ती म्हणजे ह्या सिनेमाचे लेखक..... वैभव जोशी , मुग्धा गोडबोले आणि ह्रिषीकेश जोशी... हे एक फार वेगळं आणि इंटरेस्टिंग कॉम्बिनेशन आहे हे ..
फार पूर्वी आमच्या समोरच्या बिल्डिंगमध्ये कुलकर्णी आजी आजोबा राहायचे. घराची किंमत वाढल्यावर ते फ्लॅट विकून निघून गेले. त्यांनी घर का विकलं , मग ते नंतर कुठं गेले हे असे प्रश्न आम्हाला सारखे पडायचे . जोशी आणि गोडबोले ह्यांच्या लेखनाची गम्मत अशी कि ट्रेलर पहिल्या पहिल्या असं वाटलं ते कुलकर्णी आजी-आजोबा आता आपल्याला इतक्या वर्षांनी परत भेटणारेत... डायरेक्ट डोळ्यात पाणी.... !
माझ्या अंदाजानुसार वैभव सरांचा लेखक म्हणून हा पहिलाच सिनेमा असावा. त्यांच्या 'हाय काय... ' कवितेचा बनलेला हा सिनेमा ... अशाच गोड आणि मनाला भिडणाऱ्या कविता असूदेत ह्या सिनेमातसुद्धा ही एक (अजून एक) अपेक्षा....
आणि ह्या सगळ्या दिग्गजांना एकत्र आणणारा म्हणजे ह्रिषीकेश जोशी..लेखक, ऍक्टर आणि दिग्दर्शक .... साधारण ५ वर्षांपासून म्हणजे जेव्हा पोश्टर बॉईज रिलीज झाला तेव्हापासून मी जगाला ओरडून सांगतोय ह्रिषीकेश जोशी म्हणजे ह्या पिढीचे अशोक सराफ आहेत...आणि त्यांच्या प्रत्येक कलाकृतींमधून ते तसंच\प्रूव्ह करतायेत. ह्या अशा अनेक गोड गोड विटांमधून उभारलेलं घर कधी एकदा बघतोय असं झालंय...
ट्रेलर बघण्यासाठी इथे क्लीक करा-
ट्रेलर लिंक
२८ला रिलीज झाल्या झाल्या तडीक पिक्चर बघणार... ह्या अशा सगळ्या गोड लोकांना एकत्र आणल्याबद्दल धन्यवाद. विनोद सर लै शुभेच्छा तुम्हाला.
जाता जाता ....... स्क्रीनवर रीमाताईंचा चेहरा बघून डोळे सुखावले पण त्यांचा आवाज ऐकण्यासाठी कान मात्र व्याकुळ झाले!!
स्वागत पाटणकर
Friday, August 31, 2018
ते दोघे, आपण आणि आपली पुढची पिढी!
"साधू संत येति घरा तोचि दिवाळी दसरा" हे असं काहीतरी आपल्याकडे म्हणतात.... ह्या वर्षी अमेरिकेत गणपतीबरोबर दसरा-दिवाळीसुद्धा साजरी होणार. 'चाय-सामोसा सिनेमा' ही संस्था अमेरिकेत घेऊन येतंय सुपरहिट आणि एक महत्वाचं नाटक 'आम्ही आणि आमचे बाप' ..... सप्टेंबर महिन्यात गणपती बाप्पा घेऊन येणार आपल्या लाडक्या आचार्य अत्रे आणि पु ल देशपांडे ह्यांना घेऊन. अतिशय मोठा सण असणार आहे हा... तिकीट काढा... ढोलवगैरे वाजतीलच ...तुम्ही मात्र तुफान हसायला तयार व्हा.
![]() |
| आम्ही आणि आमचे बाप यू एस टूर |
काही वर्षांनी मी स्वतः अमेरिकेत आल्यावर 'तिकडून इकडे' आलेल्या बऱ्याचशा मराठी घरात सेम सीन आहे हा दुसरा शॉक मला बसला.तेंडुलकर शून्यावर क्लीन बोल्ड झाल्यावर जसं पोटात धस्स होतं तसंच तेबघून मला झालं. मराठी कुटुंबातली इकडे वाढणारी पुढची पिढी आणि हे दोन दिग्गज ह्यांची एकमेकांशी ओळख नाही! पुलं आणि अत्रे म्हणजे खरं तर शिवाजी महाराजांनंतर जर कुठली दोन मोठी मराठी नावं येतील तर हीच... पण 'स्थलांतरित मराठी घरात' मात्र अत्रे-पुलं ना फारसं स्थान नाही. युट्युबवर आजीआजोबा कधीतरी बघत असल्यामुळे घरात 'निवडक' का होईना पण पुलं माहित असतात पण आचार्य अत्रे? त्यांच्याबद्दल तर माहित असणारे इथे बोटावर मोजण्या इतपत लोक्स असतील. शॉट लागला ना डोक्याला ?? पण भयानक अशी वस्तुस्थिती आहे ही.















