Saturday, November 17, 2018

अंतर्मुख करणारा व्हर्च्युअल हॅपिनेस - पिंपळ!

       अंतर्मुख करणारा व्हर्च्युअल हॅपिनेस - पिंपळ! 

       आजकाल कुठलाही चांगला मराठी सिनेमा बघितला कि त्याचं कौतुक करताना 'बऱ्याच दिवसांनी चांगला चित्रपट बघायला मिळाला' , 'बऱ्याच दिवसांनी एवढा भारी पिक्चर आलाय नक्की बघा'  ही अशी काही वाक्य आपल्याला ऐकू येतात. बऱ्याच दिवसांनी??? म्हणजे नक्की काय .... खरं तर ह्या 'बऱ्याच दिवसांमध्ये' अनेक  छोट्या मोठ्या सुंदर कलाकृती आलेल्या असतात, खूप गुणवान लोकांनी केलेल्या सुंदर कलाकृती.... पण समहाऊ प्रेक्षकांपर्यंत त्या पोचलेल्याच नसतात...आज नेटफ्लिक्समुळे अशीच एक सुंदर कलाकृती बघायला मिळाली... अनेक वर्ष वहीमध्ये ठेवून वाळलेल्या पिंपळाच्या पानाइतकीच देखणी, नाजूक , बघितल्या बघितल्या मनाला भिडणारी कलाकृती... 'पिंपळ'!
       

        गोष्ट तशी एकदम साधी सरळ सिम्पल... बायकोच्या निधनानंतर तिच्या विरहात असलेला नवरा, परदेशी गेलेल्या मुलांचा बाप, नातवंडांबरोबर विडिओ चॅट करण्यात आपलं आयुष्य मानणारा आजोबा, बायकोच्या आठवणीत बुडालेला तरुण मुलगा, आईची इच्छा पूर्ण न करू शकल्याने पश्चताप होणार एक दुखी मुलगा.... ह्या सगळ्यांची विणलेली ही गोष्ट म्हणजे 'पिंपळ'. गम्मत म्हणजे ह्या सगळ्या वेगळ्या व्यक्तिरेखा नसून तर अरविंद नावाच्या साधारण ऐंशी वयाच्या आजोबांच्या आयुष्यात आलेले विविध टप्प्यांची ही गोष्ट. फारसे काही ट्विस्ट नाहीत, त्यामुळे हा सिनेमा संथ वाटू शकतो... वाटू दे... काही काही गोष्टी हळुवार अलगदपणेच आपल्यासमोर आल्या कि त्यांचा इफेक्ट एकदम खोलवर होतो. पिंपळचं पण सेम तसंच होतं.  अमेरिकेत असलेल्या मुलं ,सुना आणि नातवंडांबरोबर विडिओ चॅटच्या माध्मयातून वाढदिवस साजरा करणारे अरविंद आजोबा त्यांच्या बालपणीच्या आठवणीत रमतात आणि त्यांचं संपूर्ण आयुष्य आपल्यासमोर येत राहतं. हिरो-हिरोईन,व्हिलन अशा चाकोरीबद्ध सिनेमांच्या पठडीतला हा सिनेमा नाही. अर्थात ह्या कथेमध्ये व्हिलन नक्की काय आहे हा ज्याचा त्याचा प्रश्न!
      'स्थलांतर' ह्या विषयावर हा सिनेमा  बोलतो. लेखक गजेंद्र अहिरे आणि चिंतामणी अहिरे ह्यांना नक्की काय प्रश्न मांडायचे आहेत, कशाची मेसेज द्यायचा आहे, कुठल्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांवर सोपवायची आहेत हे एकदम परफेक्ट माहित असल्यामुळे ती क्लॅरिटी कथेमध्ये उतरली आहे. बेसिकली, स्थलांतर आपल्या  (नैसर्गिक) जीवनचक्राचा एक भाग बनलेलं आहे. आपलं राहतं घर, जन्म झालेलं गाव सोडून दुसरीकडे स्थलांतरित होण्याचा निर्णय कधीच सोप्पा नसतो, कोणाची गरज असते तर कोणाची ध्येय असतात .. त्या निर्णयामागे प्रत्येकाची वेगवेगळी कारणं असतात.. शिवाय हा प्रश्न फक्त भारतातून-परदेशात शिफ्ट होणाऱ्या लोकांपुरता मर्यादित नाही. कोणी गावाकडून शहराकडे जातं , कोणी एकाच देशात पण दुसऱ्या शहरात मूव्ह होतात.. आयुष्याचा एका विशिष्ट टप्प्यावर असे (तेव्हा बरोबर वाटणारे) निर्णय घेतले जातात. अशा वेळेस प्रॅक्टिकल होऊन जगताना भावना मनाच्या कोपऱ्यात धक्क्ल्या जातात.... पण उतार वयात मन कमकुवत झाल्यावर 'आपलं घर', 'आपली जागा' नक्की कोणती?? हा अनपेक्षित प्रश्न पडतो... तो खुपतो...वेदना देऊन जातो.  आईपासून लांब जाऊन घरटं बांधलेले आपण आणि आपल्या घरट्यातून  दूर उंच उडालेले आपली पिल्लं ह्यात नक्की कोण बरोबर, कोण चूक का दोघेही सारखेच... हे असे अनेक प्रश्न गजेंद्र अहिरे आपल्यासमोर अलगदपणे ठेवतात. अतिशय नाजूक विषय समोर मांडताना कसलीही घाई करत नाहीत. छोट्या छोट्या प्रसंगातून ते आपल्याला अरविंदच्या भूतकाळात घेऊन जातात. आपणसुद्धा त्या प्रसंगात, त्या संवादात एवढे सहज बुडून जातो कि अरविंदच दुःख, त्याच्या आठवणी, त्याच्या भावना ह्या सर्व आपल्याला आपल्याच वाटू लागतात हेच ह्या सिनेमाचं मोठं यश आहे.
    अरविंद झालेले दिलीप प्रभावळकर... दिग्गज माणूस.. आपण काय बोलायचं त्यांच्याबद्दल....अशक्य भारी आहेत ते.. प्रत्येक सीन, प्रत्येक डायलॉग, प्रत्येक इमोशन ....सगळं म्हणजे सगळं परफेक्ट! आज हा पिक्चर बघून त्यांना तडीक त्यांना भेटून वाकून अगदी साष्टांग नमस्कार करायची इच्छा झाली. त्यांच्या बरोबर आहेत अरविंद आजोबांना फुलासारखे जपणारे तुक्या आणि डॉक्टर मेघना म्हणजेच किशोर कदम आणि प्रिया बापट.  किशोर कदम अगदीच ३-४ सीन्स मध्ये आहेत पण त्यांनी केलेला तो तुक्या आपल्याला मिश्कीलपणे चिमटे काढतो आणि सिनेमाच्या शेवटी हळूच रडवून जातो. आणि प्रिया बापट, आपली लाडकी... आपल्याला हिचं नेहमीच कौतुक वाटतं... 'लिडिंग एक्टरेस' असून ती कधी नायिकेपुरतं मर्यादित ठेवत नाही.. त्याच टिपिकल रोल्स च्या बाहेर जाऊन वेगळं शोधत असते. हीच मुलगी काकस्पर्श करते , हीच वजनदार करते आणि हीच पिंपळसुद्धा करते. भूमिकेची लांबी, भाव खाणारी भूमिका वगैरे गोष्टी तिला महत्वाच्या नसतात. पिंपळमध्ये सुद्धा दिलीप काका म्हणजेच अरविंदची डॉक्टर असणारी मेघना ती साकारते. अरविंदला बॉयफ्रेंड म्हणणारी, त्यांना पूर्णपणे ओळखणारी, त्यांची काळजी घेणारी डॉक्टर मेघना. भूमिकेची लांबी तशी छोटी पण त्यातसुद्धा ती इम्प्रेस करते. पत्र वाचायचा सीन असो वा अरविंदला घरी पीक-अप करायला आलेली असतानाच सीन असो , प्रिया का भारी आहे ऍक्टर आहे हे आपल्याला दिसून येतं.. चेहऱ्यावर काहीही फिल्मी भाव न आणता आश्चर्य, धक्के आणि अश्रू ती सहजपणे दाखवते. तिचा फ्रेश वावर सिनेमामधली गम्मत वाढवतो. वृंदा गजेंद्र, अलोक राजवाडे, सखी गोखले हे देखील सरप्राईज विझिट देऊन जातात. सखी तर एवढी गोड दिसते, शुभांगी ताईंचीच आठवण होते तिला बघून. 
       ह्या  सगळ्या भारी कलाकारांबरोबर सिनेमा परिणामकारक बनतो तो सिनेमॅटोग्राफी, संवाद आणि डिरेक्शनमुळे.  बघून अंगावर काटा येतो. अरविंदच्या आयुष्यातला सर्वात पहिला फ्लॅशबॅक म्हणजेच त्यांची आई त्यांना वाढदिवसाला उटणं लावून अंघोळ करायला सांगते तो सीन किंवा सिलिंग वरून अँगल दाखवून, गुडघे जवळ घेऊन झोपलेले अरविंद आजोबा बघून आपल्या अंगावर अक्षरशः काटा येतो. "सगळा व्हर्च्युअल हॅपिनेस! गंध नाही, चव नाही, स्पर्श नाही , सहवास नाही तरी जाणीव आहे" असे संवाद.सिनेमाचा हेतू आपल्यापर्यंत यशस्वीपणे पोचवतात.
     आज हा पिंपळ पाहत असताना .... अरविंद आजोबानी मनावर अक्षरशः गारुड केलं होतं... काही वर्षांपूर्वी, गावी असणारे आमचे आजोबा , आमच्याशी फोनवर बोलणारी आमची आजी..... किंवा आत्ता आमच्या मुलांशी विडिओ चॅट करणारे त्यांचे आजी-आजोबा ह्या सगळ्यात मला दिलीपकाकांचा अरविंद दिसायला लागला. इतकंच काय तर काही वर्षांनी 'अमेरिका आपली कि पुणं आपलं' असा प्रश्न पडलेल्या माझ्या पिढीमध्ये मला अरविंद आजोबा दिसायला लागला. आज जगात अनेक अरविंद आजोबा आहेत, ही संख्या दिवसेंदिवस वाढतच जाणार..... त्या प्रत्येक अरविंदला त्यांच्या आयुष्यात तुक्या आणि डॉ मेघना मिळो हीच इच्छा!

जाता जाता - टीपीकल कौतुक करायचं झाल्यास, आज खरंच बऱ्याच दिवसांनी अंतर्मुख करणारा मराठी सिनेमा पाहिला... थँक यु गजेंद्र अहिरे... थँक यु नेटफ्लिक्स!

-- स्वागत पाटणकर       

2 comments:

  1. वा. उत्कंठा वाढवणारा रिव्ह्रू लिहिला आहेस.
    ह्या वेळचा सकाळचा दिवाळी अंक प्राणी पक्षी आणि माणसं ह्यांच्या स्थलांतरावरच आहे

    ReplyDelete