Thursday, November 23, 2017

कन्फेशन

कन्फेशन आपल्याला सगळं कळतं किंबहुना आपल्यालाच सगळं कळतं ... आयुष्याच्या ह्या फेजमध्ये अर्थातच कॉलेजमध्ये असतानाची गोष्ट असेल. मी नुकताच पुरुषोत्तम करंदकमध्ये भाग घ्यायला लागलो होतो; त्यामुळेच अभिनयातलं आपल्याला जरा कळायला लागलंय ह्या भावनेत पूर्णपणे बुडून गेलो होतो. त्यातच सुदर्शनला जाऊन प्रायोगिक नाटकं बघायची सवय लागली (किंवा लावून घेतली... किंवा सवय लागलीये असं इम्प्रेशन तयार केलं) आणि त्यामुळेच अभिनय, नाटक, सिनेमा, अभिनेता, अभिनेत्री वगैरे वर आपण काहीही बोलू शकतो हा (फाजील) आत्मविश्वास तयार झाला. एकतर मी जन्माचा पुणेकर त्यामुळे कुठल्याही गोष्टीवर मत ठोकून द्यायचं ही आमची जन्मापासूनची सवय.... पण ह्या फाजील आत्मविश्वासाने ठोकलेली मतं ही अचूक आहेत असा एक गोड गैरसमज मी करून घेतला होता... अर्थातच तो 'गैर'समज आहे हे समजायला ८एक वर्ष गेली...

सन २०१०.. जानेवारी महिना.. त्या महिन्यात नटरंग, शिक्षणाच्या आईचा घो, हरिश्चंद्राची फॅक्टरी वगैरे एक से एक मराठी सिनेमा रिलीज झाले होते. बाप महिना होता तो आपल्या इंडस्ट्रीसाठी.... नटरंग फर्स्ट डे फर्स्ट शो टाकला होता... सिनेमा सुरु झाल्या झाल्या पहिल्या अर्ध्यातासात लोकांनी शिट्या , आवाज, दंगा करत थिएटर डोक्यावर घेतलं होतं... वाजले कि बारा गाणं सुरु होतं.. सिनेमा संपला... आम्ही सिनेमा ग्रुप सिनेमानंतर नेहमीप्रमाणे चर्चा (रिव्यू) करायला बसलो...  लोकं सिनेमा , रवीजाधव, अतुल ह्याबरोबर एक नाव सारखा सारखं घेत होते... अमृता खानवेलकर! खूप कौतुक चाललं होतं तिचं... काय झालं मला काही कळलं नाही पण मी मेजर विरोध दर्शवला... "फक्त १ आयटम सॉंग तर करून गेलीये.. डान्स बरा करते पण अभिनयाचं काय... साधं मराठी पण नीट बोलता येत नाही तिला... इंग्लिश मीडियममधली असेल .. " मी रपारप - एका मागोमाग कमेंट्स करत होतो.. खरं तर 'का' असं बोलतोय हे माहित नव्हतं.. समोरच्याशी मतभेद करायचा हे एकमेव कारण असावं... पण मी सगळं बोलून गेलं होतो... लोकांना ते पटलं नव्हतं पण माझ्या बोलण्याला जास्त कोणी विरोधही केला नव्हता... अमृतानी डेब्यू करून २-३ वर्ष झाली असतील पण अवॉर्ड्स प्रोग्रॅममध्ये वगैरे  तिच्या मराठी उच्चारांबद्दल विनोद करत असत समहाऊ त्यामुळे तिची इमेज तशी झाली होती आणि म्हणूनच लोकांनी मला फारसं विरोध केला नाही... ती रिव्यू चर्चा जिंकल्याचा मला आनंद होत होता पण तो वरवरचा होता.... उगाचच एखाद्याबद्दल टीकात्मक बोलून गेलोय हे आतून टोचत होतं... 

आणि मग नकळत मी अमृताचे करियर फॉलो करायला लागलो होतो....  फॅनवगैरे नाही अजिबातच नव्हतो... कारण माहित नाही पण ती कुठलं प्रोजेक्ट करतीये, कसं करतीये ह्यावर लक्ष ठेवून बसणं ही एक सवयच होऊन गेली होती! गैर,फुंक, अर्जुन, सतरंगी रे   वगैरेंमधून ती वर्षातून २-३ सिनेमा ह्या हिशोबानी आपल्यासमोर येतच होती... हिंदीमध्येही दिसत होती ... पण माझ्यातल्या तिच्या टीकाकार मनाला ती भावून गेली शाळामधल्या छोट्याश्या भूमिकेत... अतिशय छोटा होता तो रोल पण तो तिचा स्क्रीन प्रेझेन्स मला सपकन आवडून गेला होता... का कोणास ठाऊक पण ही मुलगी एक ऑल राउंडर आहे असं वाटलं... मग आलेल्या बाजीमुळे ही मुलगी अभिनयाचं पूर्ण पॅकेज आहे हे पटून गेलं... पण  आपल्याच पूर्वीच्या मताचा विरोधाभास कशाला म्हणून कधी ४-चोघात तिचं कौतुक केलं नाही.

आणि माझ्या मनातलं कन्फ्युजन खोडून टाकलं ते २०१५नी....  नच बलिये ७ तर जिंकलंच तिने पण कट्यारमध्ल्या झरीनाने माझं मन जिंकून टाकलं... अभिनय होताच सुंदर ... पण तिच्या अस्खलित अशा हिंदी आणि मराठी शब्द उच्चारांनी माझ्यातल्या टीकाकाराला खणखणीत वाजवली होती... उचारांमागची तिची मेहनत दिसत होतीच.... तिचे कष्ट, तिच्या मेहनतीला महत्वपूर्ण जोड होती तिच्या चिकाटीची.... अशी चिकाटी - अशी जिद्द जी  २००४ साली इंडियाज बेस्ट सिनेस्टार कि खोज मध्ये पार्टिसिपेट केल्यानंतर तब्बल ११ वर्षांनीसुद्धा त्याच जिद्दीने ती नच बलियेमध्ये उतरली! अंडर-डॉग्स म्हणून तिच्याकडे बघितलं जात होतं ....आणि ती डायरेकट विजेती होऊनच बाहेर आली.. तिचे कष्ट तिची गुणवत्ता तिची मेहनत पूर्णपणे रिझल्ट दाखवत होती... मराठी अभिनेत्री देशभर आवडती झाली होती... आणि अर्थातच माझीसुद्धा! इंडस्ट्री ला मिळालेला हा ग्लॅमरस चेहरा!! यशाची पायरी चढताना शिडी लागल्यासारखी ती आता अजून उंच उंच पोचायला लागलीये... २ मॅड सारख्या कार्यक्रमात ती जज म्हणूनसमोर आली आणि ती भूमिका सुद्धा तिनी परफेक्ट निभावली.. अनिल कपूरच्या २४ मध्ये दिसली... आपली पुण्याची मराठी मुलगी खूप पुढे जातीये हे बघताना लै कौतुक वाटत होतं... त्यातच करण जोहरचा सिनेमा ती करतीये ही बातमी मिळाली... क्युट,हॉट, कडक डान्स आणि अप्रतिम अभिनय हे सगळं पॅकेज असणारी ही मेहनती गुणी मुलगी ...तिच्या नशिबात तिनी हे सगळं मिळवलं.. स्व-कष्टानी मिळवलं! तिचं हे यश असंच वाढत राहो ही इच्छा!

कट्यार,नच बलिये, २४ वगैरे मधूनअमृता सारखी भेटत होतीच... पण कदाचित ते कमी पडत होतं....तुमच्या मनात किती ही इगो असला तरी दुसऱ्याच्या आयुष्यात डुंकून बघायला लै आवडतं.. आणि म्हणूनच तिला सोशल मीडियावर फॉलो करायला लागलो होतो...
गेल्या २-३ वर्षात तिच्या पोस्टची आवर्जून वाट बघता बघता मला तिच्यातल्या वेगळ्याच बाजूची ओळख झाली... ती एक उत्तम , मेहनती कलाकार आहेच पण त्याबरोबरच एक गोड मैत्रीण, गुणी मुलगी आणि  निर्मळ मनाची माणूस आहे! सोशल मीडियाच्या जमान्यात ..प्रत्यक्ष भेट न होता माणसाची एक ओळख होऊन जाते... लहान मुलांबरोबर वाढदिवस साजरा करणारी मॅच्युअर्ड अमृता किंवा ऑस्ट्रेलियामधल्या व्हिडिओत बागडणारी तिच्यातली लहान अमृता ... नवरात्रीमध्ये घरातल्या देवीला मिस करणारी अशी ही इमोशनल भावून मनाची अमृता ....अशा अनेक गोष्टींमधून ती आपलीच एक मैत्रीण बनून गेली.... आपल्याला अभिमान वाटावा अशी एक आपली गोड मैत्रीण!! अमृताच्या गुणवत्तेला ओळखायला मला उशीरच झाला.... पण ही गुणी मराठी मुलगी अभिनय क्षेत्रात पुढची अनेक वर्ष असंच राज्य करेल हे मला तिच्या वाढदिवसानिमित्त जगाला ओरडून सांगावंसं वाटलं .... तिला ओळखायला मी चुकलो हे कन्फेस करावंसं वाटलं.... म्हणून हा सगळा खटाटोप! 

अमृता .... हॅपी बर्थडे .......यू रॉक!!!!! 

-स्वागत पाटणकर 

फसवं ऊनफसवं ऊन

बाहेर साधारण मायनस ४ वगैरे टेम्परेचर असतं... थंडी हवेत एकदम मिसळून गेलेली असते... दुपारी ४ वाजताच अंधार पडायला पडतो त्यामुळे अंधारासारखाच गारवासुद्धा एकदम गडद होऊन जातो... आपण कुडकुडत घरात बसतो.. हीटर लावतो...हातात वाईन असते तर दुसऱ्या हातात एखादं पुस्तक... खिडकीजवळच्या आराम खुर्चीत बसतो ... ती गार खिडकी आपल्याला काही स्वस्थ बसवून देत देत नाही.. मग एक ब्लॅन्केट अंगावर ओढून पुन्हा वाईन आणि पुस्तकाकडे मोर्चा वळवतो.... ब्लॅन्केटमुळे बाहेरून आणि वाईनमुळे आतपर्यंत पोचलेली ती आर्टिफिशियल ऊब डोळ्यांना झोपायला सांगते....सोबतीला असतात त्या गार भिंती.... गार गाद्या... गार आपण... गुलाबी टू बोचरी हा थंडीचा प्रवास सुरु होतो ... कुडकुडत आपण झोपी जातो...  
सकाळ सकाळ पडद्याच्या गॅपमधून भिंतीवर पडलेली एक ऑरेंज लाईन दिसते... किलकिल्या डोळ्यांना समजतच नाही.... अंगावरून ब्लॅन्केट आणि डोळ्यांवरून झोप काढल्यावर साक्षात्कार होतो.... अर्रे सूर्यदेवता आज  चक्क भेटायला आल्या आहेत...मन प्रसन्न होतं ... मनातल्यामनात बागडायला लागतं... आपण उठून जोरात पडदे बाजूला करतो....सकाळच्या त्या फ्रेश किरणांचे घरात स्वागत करतो... हातात कॉफी घेऊन पुन्हा त्याच खिडकीजवळच्या त्याच आराम खुर्चीत बसतो... कालच्या रात्रीची खिन्नता त्या सन बाथ मध्ये एकदम धुतल्यासारखी होते.. समोरच्या झाडावरचे पक्षीसुद्धा खुश दिसतात..त्यांचा किलबिलाट सुरु असतो... सूर्यदेवताची तो विझिट सगळ्यांनाच आवडलेली असते... आज तो अतिशय लांबचा डोंगरसुद्धा स्पष्टपणे दिसत असतो ....सनी डे अँड क्लीयर स्काय ....
बॉइल्ड एग्ज खाऊन तावातावानी जॅकेट कानटोप्या शूज वगैरे घालून बाहेर जायला तयार होतो... दार उघडून बाहेर गेल्यावर पहिले २ सेकंद खूप छान वाटतं .... त्या नंतर मात्र लगेच अतिउत्साह संचारलेल्या शरीरातली हवा एका शॉट मध्ये फुस्स होऊन जाते.... सकाळच्या १०च्या उन्हात उभं राहून सुद्धा आपल्याला हवेतल्या गारव्यानी पूर्णपणे वेढलेलं असतं.... आपल्या नजरेला दिसणाऱ्या त्या उन्हानं आपल्याला फसवलेलं असतं... दिसतं तसं नसतं ह्या प्रिन्सिपलला फॉलो करणारं ते 'फसवं ऊन'...कानटोप्या , जॅकेट वगैरे सगळी शस्त्र असून सुद्धा आपण त्या अनपेक्षित थंड हल्ल्यासमोर पराभूत होऊन जातो.. सपशेल पराभूत....एवढं ऊन असून थंडी मात्र जिवघेणी बोचरी .... मनाला पटतच नाही...पराभव पचवण्याचा प्रयत्न करत घरी परतण्याचा निर्णय घेतो... घरात घुसल्या घुसल्या उबदार वाटतं... पण मन दुखावलेलं असतं ते पराभवामुळे नाही .... तर समोर दिसणाऱ्या त्या पिवळ्या धमक 'फसव्या उन्हामुळे'.... कोणाकडून तरी फसवलं गेलंय ही भावना टोचत असते.... पुन्हा त्याच खिडकीत बसतो... हातात कॉफी आणि लांबचा डोंगर बघत बघत.... इकडचा हा सूर्य मग परका होतो... नजरेसमोर येत असते आपल्या घरच्या उन्हाची मजा.. शिवाजी पार्क वरच्या दवबिंदूंनी ओलसर झालेल्या क्रिकेटच्या पीचला मायेची ऊब देऊन पांघरून घालणारं दादरचं ते कोवळं ऊन हवंहवंसं वाटतं.... हे काहीच नाही.. पुण्याच्या कर्वे रोड वर दुपारी १२ वाजता ट्राफिक जॅम असताना अंगावर चटके देऊन हल्ले करणाऱ्या कडक उन्हाची सुद्धा खूप आठवण येते....समोरचा तो डोंगर बघत ... दुःखाचा डोंगर कोसळल्याचा आवेशात आपण त्याच खिडकीत बसून राहतो.... आपल्या उन्हाची आठवण काढत काढत.... आणि नकळत समोरचा डोंगर पुन्हा नाहीसा व्हायला लागतो.. अस्पष्ट दिसायला लागतो... वाटतं डोळ्यातल्या पाण्यामुळे असं होतंय पण ते तसं नसतं... पुन्हा ४ वाजलेले असतात... सूर्य देवता ऑफिस लवकर संपवून निघून जाते... अंधार पडतो... डोंगर काय.... समोरचं ते झाड पण दिसेनासं होतं.. पक्ष्यांची किलबिल बंद होते.... खिडक्या गार पडायला लागतात .. हातात वाईनचा ग्लास येतो.... पुन्हा निपचित पडलेल्या त्या अंधाराकडे बघत बघत  पहिला घोट घेतो... आणि थोडा जास्त विचार केल्यावर ते फसवं का असेना पण मन प्रसन्न करायला आलेल्या त्या उन्हाचा प्रेझेन्स एन्जॉय न करता त्या 'ऍबसेन्ट' असलेल्या कडक उन्हाच्या दुःखात दिवस वाया घालवतो...   आपलीच चूक आपल्याला उमगते ....जे मिळालंय त्याचा आनंद न घेता जे नाहीये त्या गोष्टीचं दुःख .- तक्रार करण्याची प्रवूत्ती दिसून येते .... आणि हे बदलायची गरज सूचित करते.... फसव्या उन्हाचा असा एक दिवस येतो आणि कोवळ्या मनावर कडक शिकवून देऊन जातो!
-- स्वागत पाटणकर 


Thursday, November 9, 2017

गाजर का हलवा ,आलू के पराठे - मराठीतले

गाजर का हलवा ,आलू के पराठे - मराठीतले          

       आई लोकांच्या घरची कामंवगैरे करून अतिशय कष्ट घेत पोराचं पोट भरतीये पण पोरगं बाहेर चोऱ्या करत बसलंय किंवा मुलगा खूप दिवसांनी घरी येतोय आणि घराबाहेर हेलिकॉप्टरमधून उतरल्या उतरल्या असा आईच्या डोळ्यात अचानक गंगेला पूर आल्यासारखं पाणी वाहायला लागलंय.... हे असं काही फिल्मीवगैरे न करता एकदम सहज सॊप्या पद्धतीनी मनावर उतरणारी आई-मुलाचं निर्मळ, प्रेमळ, सुंदर असं नातं पडद्यावर सहजतेने  दाखवणारी 'आई-मुलाची' एक जोडी २०१७नी आपल्या मराठी इंडस्ट्रीला दिली.. कुठलाही अतिरंजितपणा न करता आई-मुलाचं ते ओलं नातं दाखवणारी एक जोडी... अमेय वाघ आणि चिन्मयी सुमीत!

काही महिन्यांपूर्वी आलेल्या मुरांबामध्ये, चिन्मयी आणि अमेय हे आई-मुलाच्या भूमिकेत दिसले. दोघेही एकदम कसलेले कलाकार, अभिनय अंगात भिनलेला त्यामुळे 'मुरांबामधला आलोक आणि त्याच्या आई'च्या नात्यामध्ये कुठलाही कुत्रिम फॅक्टर नव्हता. नैसर्गिक... एकदम जिवंत अभिनय..खरं सांगायचं तर कुठेही ते 'अभिनय' करतायेत असं जाणवलंच नाही... आलोकची चिडचिड आणि आईची काळजी हे एकदम आपल्या घरातलाच सीन आपण पडद्यावर बघतोय कि काय इतकं खरं! चिन्मयीनी केलेली आई आणि अमेयनी साकारलेला मुलगा ही ऑनस्क्रिम केमिस्ट्री लैच आवडून गेली.... आणि कदाचित त्यामुळेच सध्या धुमाकूळ घालणाऱ्या फास्टर फेणे मध्ये ही जोडी छोटंसं का होईना पण पुन्हा गोड दर्शन देऊन गेली आणि मराठी इंडस्ट्रीला नवीन हिरो व नवीन हिरोला तेवढीच तगडी आई मिळालीये असं वाटून गेलं!

   अमेय वाघ म्हणजे सळसळत्या उत्साहाचा एक उत्तम नमूना...तो आपल्या पुण्याचा आणि त्यातच माझ्याच कॉलेजचा. त्यामुळे त्याचा कॉलेज अभिनेता ते फेणे हा त्याचा प्रवास एकदम जवळून बघायला मिळाला... आणि त्यामुळेच त्याच्याबद्दल बोलताना कधीही कोकणस्थीपणा आडवा येत नाही.. भरभरून कौतुक केलं जातं  आणि अर्थातच तो तेवढा कौतुकास्पद आहेच. त्याच्या करियरमधल्या दोन मोठ्या शिड्या त्यानी आलोक आणि बनेश फेणेच्या रूपात पार केल्या आहेत.  मध्यमवर्गीय संस्कार असलेला, एवढं यश एकदम मिळूनसुद्धा  जमिनीवरच पाय असणारा असा हा अमेय.....

आणि.....

अमेयसारख्या अतिशय गुणी अशा कलाकाराला मोठं होताना बघून जितका आनंद आम्हा बीएमसीसीकराना होतो , जेवढं प्रेम आम्ही त्याला देतोय तेवढंच प्रेम - आशीर्वाद हे अमेयसारख्या नवीन कलाकारांना देणारी, दुसऱ्यांना नेहमीच प्रोत्साहन देणारी अभिनेत्री म्हणजे चिन्मयी सुमीत! हिचं एका शब्दात वर्णन करायला सांगितलं तर लगेच उत्तर येईल 'मायाळू'!  सोशल मीडियामुळे विचारांची देवाण घेवाण फार सोप्पी झालीये आणि त्यामुळेच प्रत्यक्ष न भेटलेली चिन्मयी ही ओळखीची झाली... आणि कुठल्याही गोष्टीवर नेहमी पॉझिटिव्हपणे व्यक्त होणारी चिन्मयी ही कळायला लागली!स्वार्थी हा शब्दच आपल्या शब्दकोशातून काढून टाकणारी, सह-कलाकारांना आपली फॅमिलीच बनवणारी , भयंकर जीव लावणारी अशी ही चिन्मयी सुमीत...

माणसाचं मन चांगलं असलं ना कि आपोआप त्याच्या हातून चांगली कामं होत जातात.. चिन्मयी आणि अमेय हे दोघेही त्याच कॅटेगरीमधले! हाच चांगुलपणा त्यांच्या अभिनयात उतरला असावा आणि त्यांनी साकारलेल्या भूमिकांमध्ये एक जिवंतपणा येत असावा. कदाचित ह्यामुळेच बनेश फेणेसारख्या व्रात्य असलेल्या मुलांच्या आईला ह्या 'टोण्याची काळजी करू का कौतुक' हे चिन्मयीनी बोललेले शब्द स्वतःचेच वाटतात  ... किंवा मुरांबामध्ये आलोक जेव्हा आईला वेडा-वाकडा... वाट्टेल तसं बोलतो तेव्हा प्रेक्षागृहातील आईच्या मनात आधी राग आणि दुसऱ्या सेकंदाला डोळ्यात पाणी आलेलं असतं ... आणि नेमके तेच भाव पडद्यावर चिन्मयीच्या डोळ्यात असतात! अभिनय जिवंत वाटायला अशा ड्रॅमॅटिक सीन्सची गरजच नसते... साध्या नॉर्मल सीनमधलं पण साधेपण टिकवणं फार महत्वाचं असतं.. आणि तेच बरोबर जमतं ह्या दोघांना....  उदाहरण म्हणजे मुरांबामध्ये... एका सीनमध्ये आई म्हणजेच चिन्मयी डोसे हवेत का असं अमेयला विचारते तेव्हा पटकन असं वाटतं कि आपणही त्यांच्या किचनमध्ये जावं आणि आईच्या हातचे डोसे खाऊन यावं! इतका तो सहज अभिनय आपल्यासमोर सादर केला जातो...रीमाताईंच्या नंतर एक तगडी आई मिळालीये चिन्मयीच्या रूपात...


ह्या दोघांना एकत्र स्क्रीनवर आणणाऱ्याला खूप मोठं धन्यवाद!


आपल्या हिंदी इंडस्ट्रीमधल्या आई एक्सपर्ट असते ती २ गोष्टींमध्ये- गाजर का हलवा - आलू के पराठे....
मुलगा घराबाहेर कुठेही निघाला की ती हे एवढंच मुलाला प्रेमानी देत असते. मला तर चिन्मयी - अमेयची जोडी  ही 'गाजर का हलवा - आलू के पराठे' सारखीच वाटते... म्हणजे ... अभिनय क्षेत्रात किसून किसून ...सॉरी कसून-कसून मोठी झालेली, गाजरहलवा सारखीच लाल गालांची ...  गोडवा मुरलेली  ...अशी चिन्मयी आणि आलू के पराठ्यासारखा सगळ्यांना आवडणारा अमेय .... बटरचा तुकडा विरघळून जावा तसंच मुलींचं मन विरघळवून जातं असा  हॉट फेणे उर्फ अमेय!

लक्ष्या - अशोक सराफ, स्वप्नील-मुक्ता अशा अनेक हिट मराठी जोड्या .... तसंच  बॉलिवूडचा टायगर आणि रीमा ह्यांच्या एवढीच आपला 'वाघोबा आणि चिन्मयीची' माय - लेकाची ही जोडी सुपरडुपर हिट होवो आणि आम्हाला सारखी सारखी भेटत राहो हीच प्राथर्ना!!

- स्वागत पाटणकर