Saturday, September 30, 2017

कासव बघा. कासव व्हा - ट्रेलर रिव्ह्यू

कासव बघा. कासव व्हा.

खरं तर नॅशनल अवॉर्ड - सुवर्ण कमळ विजेत्या चित्रपटाचा ट्रेलर-रिव्यू वगैरे लिहिणं म्हणजे पीएचडी मिळालेला मुलगा "हा खूप हुशार आहे हां" वगैरे लोकांना सांगणं.... पण काय करू, आज सकाळपासून ते अतिशय सुंदर असं ट्रेलर बघितल्यावर काहीतरी लिहायला हात फारच शिवशिवत होते, खूप लोकांना ट्रेलर लिंक पाठवली पण समाधान होतं नव्हतं शेवटी लिहायचं ठरवलंच...३ मिनिटांचं ट्रेलर ...सिनेमाचं नाव कासव.... पण अजिबात वेळ न दडवता, चित्त्याच्या वेगात ते मनात घुसलं आणि खोलवर रुजलं... 
 देवगडच्या रम्य समुद्रकिनाऱ्यावर सूर्यास्ताच्या वेळेस पाण्याच्या दिशेनी जाणारी २ कासवं ... त्यांच्यावर आदळणारी लाट आणि दुसऱ्याच सीनमध्ये सकाळच्या साडेसहाच्या स्वप्नात आलेल्या लाटेच्या आवाजांनी दचकून उठणाऱ्या इरावती हर्षे....! वाह! अक्षरशः तीन सेकंदाच्या ह्या २ सीन्समध्ये हे ट्रेलर आपल्या मनावर गारुड करतं... समोर काहीतरी उच्च दर्जाचं सुरु आहे ह्याची प्रचिती देतं...आणि आपण त्या कासवांमध्ये गुंतून जातो...

सुमित्राताई भावे आणि सुनील सुकथनकर ... ह्या दिग्गज दिग्दर्शक जोडगोळीचा हा सिनेमा... आणि ट्रेलरमधल्या प्रत्यके फ्रेममध्ये ते वेगळेपण- तो ग्रेटनेस जाणवत राहतो. अस्तूनंतर पुन्हा एकदा ह्या दोघांचा चित्रपट बघायला मिळणं म्हणजे पर्वणीच. 'इरावतीच्या खोलीत ठेवलेली २ मूर्तीरुपी कासवं ', 'आलोक किनाऱ्यावर चालत असताना मागे फिरणाऱ्या पवनचक्क्या' अशा फ्रेम्समधून ही दिग्दर्शक जोडी का दिग्गज आहे ह्याचा प्रत्यय आपल्याला येतो! प्रत्येक गोष्टीचा डिटेल अभ्यास करणाऱ्या सुमित्रा ताईंनी लिहिलेली ही कथा, अक्षरशः ३ मिनिटाच्या ट्रेलरमध्ये मनाची पकड घेते... पॅनिक, डिप्रेशनसारख्या मानसिक 'आजारातुन' जात असलेल्या एखाद्याला अशा स्थितीतून बाहेर काढण्यासाठी दगड बनून प्रॅक्टिकल अप्रोच ठेवून मदत करण्यापेक्षा, त्या माणसाला आधी नीट समजून घायची गरज असते... सामान्य माणसाला हे मानसिक विकार पटकन समजत नाही...पण बाहेरहून सुखासुखी दिसणाऱ्या गोष्टींना आतून तडा गेलेला असू शकतो.... त्यामुळे त्यात डोकावून बघायची गरज असते...ओल्या मनानी! कुठल्यातरी मानसिक गुंत्यामध्ये त्रस्त झालेला अलोक राजवाडे..आणि असाच काहीशा आजार पूर्वी अनुभवलेल्या इरावती हर्षे अशा दोन कासवांची गोष्ट म्हणजे हा सिनेमा.... असं म्हणतात -'Try to be like a turtle - at ease in your own shell' तुम्ही जसे आहात ...तसंच रहा ..त्याच स्वतः वर प्रेम करा . जाणूनबुजून पर्सनॅलिटी बदलायचा प्रयत्न करू नका... कासवाकडून शिका.... कदाचित ह्या सिनेमातून तेच सांगायचं असेल असा काहीसा अंदाज आपल्याला ट्रेलरमधून येतो..... 


    संपूर्ण ट्रेलरच खरं तर जबरदस्त आहे पण त्यातसुद्धा सर्वात जास्त भावलेली गोष्ट म्हणजे ह्यातले डायलॉग्स!!! मानसिक आजार, सायकॉलॉजिकल इश्यूवर कलाकृती करणं म्हणजे तारेवरची कसरत असते. त्यातले संवाद हे चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोचवायला सर्वात महत्वाचे असतात. शब्द निवड ही चोख असावी लागते. नाहीतर चित्रपट खूप जड किंवा बालिश होण्याचा धोका असतो. पण सवांद लिहीणाऱ्या सुमित्रा ताईच त्या... सगळ्यांच्या गुरूच ...त्यांनी अत्यंत चपखल शब्द वापरून संवाद लिहिलेले आहेत . सामान्य प्रेक्षकाला समजतील... गोष्टीचं गांभीर्य कमी न होता आणि तरीसुद्धा मानसिक आजारसारखा नाजूक विषय लोकांच्या मनात अलगदपाने उतरेल ह्याची खात्री घेणारे असे संवाद.
   "सुखासुखी एकांत वाटतं?" "सुखाच्या व्याख्या वेगळ्या असतात ना", "मला मी आवडत नाही" "कुटुंबा हवंच  आधाराला ..पण मनाच्या नात्यांचं" असे एकसे एक डायलॉग्स ट्रेलरमध्ये ऐकायला मिळतात... आणि त्यात क्युट सरप्राईज देऊन जातो तो छोट्या ओंकारच्या तोंडून असलेला कोकणी भाषेतला चहा भजी वरचा डायलॉग... हे संवाद गोष्ट फार सोप्पी करून आपल्याला सांगतात आणि त्या व्यतिरिक्त "शेकडो कॉन्टॅक्ट आहेत एका बोटाच्या वर पण तरी एकटं वाटतं " अशा सवांदातून हा प्रॉब्लेम आजचा आहे हे सुद्धा दर्शवतं....अगदी सामान्य प्रेक्षक रिलेट करू शकेल अशा भाषेत! त्याबद्दल सुमित्रा ताईंना खरंच एक साष्टांग नमस्कार करावासा वाटतो....आता बोलू कलाकारांबद्दल ...अभिनयातली देव माणसं सगळी ! काय बोलणार त्यांच्याबद्दल.... नवशिक्या अभिनेत्यांनी खरंतर हे असे चित्रपट अभ्यास म्हणून बघावेत.... काय टीम निवडलीये सुमित्राताई आणि सुनील सरानी!! शेन वॉर्नची ओव्हर कशी लेग स्पिन,गुगली असे ६ विविध पण ताकदवान शस्त्रांनी भरलेली असते ....एक्साक्टली तसंच आहे कासवमध्ये! मोहन सर , इरावती , देविका , किशोर सर ,छोटा ओंकार आणि आलोक! प्रत्येकाची स्टाईल वेगळीपण तेवढीच ताकदवान! 
इरावती हर्षे!!! नेहमी दर्शन देत नाहीत त्या पण जेव्हा स्क्रीनवर असतात त्यांचा प्रेझेन्स खूप प्रसन्न करणारा वाटतो ...वाक्य बोलताना विशिष्ट शब्दावर जोर द्यायची स्टाईल, त्यांचा तो भरीव आवाज नाजूक विषयाला फारच वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतो...आलोकचा गुंता सोडवाताना होणारी त्यांची घालमेल ही त्यांनी बरोबर दाखवली आहे. किशोर सर म्हणजे मानसिक आजाराकडे कोरड्या नजरेनी बघणाऱ्या लोकांचं प्रतिनिधित्व करणारे ...त्याच्या स्पेशल स्टाईलनी त्यांची बाजू मांडतात आणि आलोक...तो तर आपला एकदम फेव्हरेट... मराठी शब्दांचे उच्चार कोणाकडून शिकावे तर ते आलोककडून ह्या ठाम मताचा मी आहे... त्याच्या रिऍक्शन्स सुद्धा खूप बोलक्या असतात ...उदाहरण द्यायचं झालं तर ओंकारकडून चहा भजी ची गोष्ट ऐकल्यावर ...आलोकनी दिलेली रिअक्शन निशःब्दपणे बरंच काही बोलून जाते...आणि तो आता ह्या गुंत्यातून कसा बाहेर येणार ह्याची उत्सुकता वाढवते! 

ह्या सर्व गोष्टींमुळेच कधी एकदा हे कासव बघतोय असं झालाय...फार महत्वाचा सिनेमा असणार आहे हा... 


नेहमीचा मसाला, धांगडधिंगा ह्या व्यतिरिक्त कासवसारख्या नाजूक विषयांवरच्या उत्तम कलाकृती निघणं हे समाजाच्या सुधृढ प्रकृतीसाठी फार गरजेचं आहे ...त्यामुळेच कासव फक्त भारतात नाही तर जगभरात प्रदर्शित व्हावा , खूप लोकांनी तो बघावा .... हीच इच्छा!!!                                                                                        
--स्वागत पाटणकर 

Friday, September 29, 2017

रामरक्षा आली धावून!

रामरक्षा आली धावून!

-- स्वागत पाटणकर 

  मागच्या आठवड्यात असंच मस्त जॉगिंगला गेलो होतो (हो हो मी आणि जॉगिंग)... पण आमच्या शरीरातल्या फॅट्स मोठे नशीबवान... पळायला लागल्या लागल्या १० मिनटात मोबाईलवर 'स्टॉर्म वॉर्निंग' आली... आणि  आकाशाकडे नजर टाकली, निळ्या आकाशावर काळ्याकुट्ट ढगांनी पांघरून घातलं होतं. डेन्वरची हवा म्हणजे फारच रोहित शर्माच्या बॅटिंग सारखी असते ... कधी लक्ख ऊन आणि दुसऱ्या क्षणाला धो धो पाऊस... त्यामुळे अचानक आलेल्या स्टॉर्म वॉर्निंगला मी सीरिअसली घेतलं, गाडी सुरु केली  आणि घरी जायला निघालो.. मस्त पावसाळी हवा होती... रहमानची गाणी लावून निघालो! वाह, सुख एकदम! पावसाची भुरभुर सुरु झाली होती ..काच खाली करून ..हात मस्त बाहेर काढलेला होता ... पावसाच्या संथ थेम्बाना मिठी मारायला एकदम तयार असा ..पण काही क्षणातच पावसानी रूप बदलायला सुरवात केली... भुरभुर, संततधार ,मुसळधार वगैरे टप्पे फॉलो न करता डायरेक्ट धो धो कोसळायला लागला .. जोरात.. सगळ्यात मॅक्सिमम स्पीड वर असलेले वायपर्स आणि तेवढ्याच जोरात कोसळणाऱ्या सरी ह्यांच्यात एक स्पर्धाच सुरु झाली. गाण्याचा आवाज वाढवला पण कोसळत्या मेघराजानी माझी आणि निसर्गाची डेट 'पॉज' केली होती... ती सुंदर गाणी ऐकावीशी वाटत नव्हती... खरं तर २०-२५ मिनीटावरच घर होतं पण तरी ते अंतर खूप मोठं वाटायला लागलं होतं.. जोरात कोसळणाऱ्या सरींनी आता वायपर्सवर आघाडी घेतली होती त्यामुळे समोरचं अगदीच दिसेनासं झालं होतं...ह्या अमेरिकेत रस्त्यात कुठेही थांबता येत नाई राव, त्यामुळे हळू हळू का होईना पण पुढे सरकत होतो....दिवाळीत पण घरी कमी पणत्या असतील,तेवढे गाडीतले पुढचे,मागचे, पार्किंग लाईट असे सगळ्या प्रकारचे दिवे लावून गाडी पुढे रेटत  होतो. पाऊस! रोमॅंटिक वाटणाऱ्या पावसाने क्षणात भयभयीत करून टाकलं होतं...गाडीच्या टपावर कोसळणाऱ्या पावसाचा आवाज मला कसली तरी आठवण करून देत होता ...खरं तर एवढ्या पावसात गाडी कधीच चालवली नव्हती ... पण अशा पावसातला प्रवासाचा अनुभव होता! ७-८ वर्षांपूर्वी भाऊ,वाहिनी,आई,बाबा आणि मी अशी एक (चक्क) कौटुंबिक कोकण सहलवगैरे आम्ही केली होती... पण ऑक्टोबर असूनसुद्धा कोकणात फारच विचित्र हवा पडली होती...अतिशय ढगाळ अशी... आणि  पण ढग सुद्धा रुसलेले  असावेत ... अजिबात पाऊस नव्हता ... दमट हवेनी वाऱ्याला यायला पूर्ण मज्जाव केला होता. पंखा लावूनसुद्धा उकडत होतं आणि दोन पावल चालून लगेच घामाच्या धारा वाहत होत्या... एकूणच सगळ्यांचा मूड बघता साधारण ३ वाजता आम्ही पुण्याला परत जायचं ठरवलं... 'बोअर' होऊन सगळे परत निघाले ... भाऊ गाडी चालवत होता. शिवाय गाडीत आई बाबा असल्यामुळे नव्या गाण्यांना गाडीत फारशी संधी नव्हती .. मग अशा वेळेस आपला एक छंद म्हणजे मस्तपैकी मागच्या खिडकीत बसून बाहेर पळणाऱ्या झाडांकडे बघत राहायचं...नारळाच्या उंच झाडांकडे बघत बघत मी बसलो होतो!  १-२ तास पुढे गेल्यावर पाऊस लागला..कोकणातला पाऊस तो ...डायरेक्ट कोसळतच होता...  पुण्याला न जात कुठेतरी थांबावं कि काय असं सगळ्यांना वाटलं.. थोडी विचारपूस केल्यावर कळलं ताम्हिणी घाटात पाऊस नाहीये...त्यामुळे थोडं पुढे गेल्यावर पाऊस थांबेल अशी अपेक्षा ठेऊन पुण्याला जायला निघालो.

पण जसं जसं आम्ही ताम्हिणी घाट चढायला सुरुवात केली....तर रियालिटी दिसायला लागली .. खरं तर अंधार पडल्यामुळे दिसत नव्हतीच... पण समजत होती. कधीही न बघितलेला असा तो पाऊस ऐकू येत होता ... त्यात तो ताम्हिणी घाट... घनदाट जंगल , विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट ...आणि ह्याशिवाय घाटातली स्मशान शांतता भंग करणारा तो कोसळता पाऊस...रस्त्यावर फक्त आमचीच गाडी! आई बाबांची  थोडी टरकली होती पण मी एन्जॉय करत होतो. थ्रिलिंग वगैरे वाटत होतं..सगळे जणं पुढे जावं कि नको अशी फक्त चर्चा करत होते ...गाडी पुढे पुढे जातंच होती, एकटी!  काही वेळानंतर मात्र समोर एक गाडी दिसली... थांबलेली होती... पुढे गेल्यावर कळलं कि तो ट्रक होता... एक माणूस आम्हाला पण थांबायचे इशारे करत होता. पावसामुळे त्याचा चेहरा काही दिसत नव्हता. अशा रात्रीच्या वेळेस , त्या घाटात ,निर्मनुष्य रस्त्यावर , भर पावसात .. कोणीतरी थांब म्हणतंय म्हणून थांबायलाही जीवावर येतं... आता माझी पण फाटायला लागली होती! पण फायनली आम्ही, बघू तर काय म्हणतोय तो, आपण पाच जण आहोत , काही नाही होणार वगैरे म्हणत एकमेकांना धीर देत थांबलो. त्यानी आम्हाला हेडलाईट सुरु ठेवून थांबायला सांगितलं... त्याचा पार्टनर एक मोठी काठी घेऊन पुढे चालत गेला... त्यांचा अनुभव त्याना असं करायला भाग पडत होता.. तो थांबलेला ती जागा म्हणजे एका पुलाची सुरवात होती .... काठी आपटत आपटत नेल्यामुळे ...त्याला पाण्याची खोली समजली.. गुडघा भर पाणी वाहत होतं त्या छोट्या पुलावरून! त्यांनी आम्हाला उलटं फिरायचा सल्ला दिला... आम्हीपण लगेच ते ऐकलं ...ज्याच्यावर संशय घेतला होता तोच देवासारखा मदतीला आला होता..

आम्ही यू टर्न घेतला....रात्रीचे ८ वगैरे वाजले असतील...अर्धा चढलेला घाट उतरून मग पनवेल मार्गे पुण्याला जावं लागणार होतं...म्हणजे अजून ५ तासाचा प्रवास! त्यात ह्या पावसाचा जोर काही कमी होत नव्हता ... रात्र गडद होत चालली होती... वीजा तर भिशी असल्यासारख्या एकत्र येऊन कडाडत होत्या . ताम्हिणीसारख्या घाटात तर रात्री विजा चमकल्या तर त्यापेक्षा हॉरर काहीही नसतं हि नवी माहिती मला कळली....अर्थातच माझी फाटली होती ! आता कधी एकदा मुंबई गोवा हायवे लागतो असं झालं होतं ...तिकडचं ट्रॅफिक जॅम चालेल पण हा भयभयीत करणारा एकाकीपणा नकोसा झाला होता... गाडीतली ५ माणसं मौनावस्थेत गेली होती ..सगळे फक्त काळजी करत होते ... बाहेरच्या शांततेबरोबर गाडीतली शांतता जास्त त्रासदायक होत होती...

अचानक आई गाणं म्हणायला लागली... अर्रे संस्कृत गाणं?? नाही... ती तर रामरक्षा म्हणत होती... खरं तर मी पण घाबरलोच होतो पण आईचं असं स्तोत्र वगैरे ऐकून मला हसू येत होतं.. तिला लक्षात आलं ते , पण तिनं जाणूनबुजून दुर्लक्ष केलं.. ती स्तोत्र म्हणतच राहिली.. आता बाहेरच्या पावसाची सवय झाली होती.. आईची रामरक्षा म्हणून संपली होती, मी गाणी लावणार तेवढ्यात आईनी पुन्हा सुरु केलं .. रामरक्षा राउंड २,३,४..एका मागे एक  सुरूच राहिला ... तिला आता माझी वाहिनी पण जॉईन झाली होती... मी मात्र कपाळावर हात ठेवून घेतला होता .. बाहेर त्याच वीजा , तोच पाऊस , तेच ढग तेवढाच गोंधळ घालत होते पण गाडीतले काळजीचे विचार आता लांब गेले होते, थोडा धीर वाटत होता ... पण माझ्या तरुण मनाला ते लक्षात येत नव्हतं! मग मी डोळे मिटून शांत बसलो ... आई आणि वाहिनीच्या रामरक्षेसमोर मला आता पाऊस ऐकू येत नव्हता...

राम रामेति रामेति,
रमे रामे मनोरमे ।
सहस्रनाम तत्तुल्यं,
रामनाम वरानने ॥

हे शब्द कानात पडत होते,सकारात्मक लहरी मनात घुसवत होते .. पण आपण काही देवबीव मनात नाही त्यामुळे "हे ऐकायला छान वाटतंय , म्हणत रहा" एवढं सांगायलासुद्धा कमीपणा वाटला! गाडीतल्या त्या बदलेल्या वातावरणाची भावाला गाडी चालवताना मात्र खूप मदत झाली असावी ...सलग ४ तास तो गाडी चालवत होता आम्ही पेण मार्गे खंडाळा घाट ओलांडेपर्यंत पाऊस आमच्याबरोबरच होता.. लोणावळ्याला आम्ही थांबलो .. तिथे पाऊस होताच पण गाडीत १०० वेळा म्हणाल्या गेलेल्या रामरक्षे नी धीर दिला होता कदाचित त्यामुळेच तो पाऊस आता ओळखीचा वाटायला लागला होता . वडा पाव घेऊन आणि गाडी पुन्हा सुरु केली... गाणी न लावता, आईला इशारा केला ..तुझं सुरु ठेव.. आई एक स्मित हास्य देऊन पुन्हा 'अथ ध्यानम्‌' म्हणायला सुरु केलं... ते साधारण तासभरानी रात्री १ च्या सुमारास घरी पोचल्यावर थांबलं... डेंजर असा अनुभव घेऊन घरी पोचल्यावर मी जय श्रीराम बोललो...पण मनातल्या मनात!

          काल अशाच पावसात गाडी चालवताना , वायपर्स आणि पावसाच्या स्पर्धेमुळे धूसर झालेल्या काचेतून बघताना ती आक्खी कोकण ट्रिप स्पष्ट दिसत होती...हातावर शहारे आलं होतं..नकळत मोबाईल घेतला आणि युट्युबवर रामरक्षा सर्च केलं. आपल्याच अनुराधा पौडवालचे रामरक्षा विडिओ सापडले... तडीक प्ले केले! रहमानला म्हणलं आज जरा तू पण ऐक हे.... रामरक्षा सुरु झाली, अनुराधाच्या स्वरात...एकटेपणा गेल्याचा फील आला..मस्त वाटायला लागलं...काही जादू-टोणा वगैरे नाही ..आस्तिक असो व नास्तिक पण ते संस्कृत शब्द ,ते स्वर आणि ते शांत संगीत ह्याचा उत्तम परिणाम झाला हे नक्की ... ते कॉम्बिनेशनच छान  होतं.. प्रसन्न वाटायला लागलं .. समोर फिरणारे ते वायपर्स सुद्धा रामरक्षेच्या तालावर फिरल्याचा भास झाला...पाऊस त्याच आवेशात असूनसुद्धा, उरलेला तो २०-२५ मिनिटाचा छोटा प्रवास मी मस्त एन्जॉय करत पूर्ण केला.... रामरक्षा 'लूप' वर लावून!! घरी पोचल्यावर जोरात बोललो .... जय श्रीराम!!!

दरवर्षी, 'मन से रावन जो निकाले , राम उसके मनमें है' अशी टिपिकल लाईन पोस्ट करून  दसरा 'सेलिब्रेट' करण्यापेक्षा, ह्या वर्षी ही रामरक्षेची गोष्ट आपल्या सोबत शेअर करावीशी वाटली म्हणून एवढा सगळा प्रपंच!

आपलं वय जसं जसं वाढत असतं, अनेक आजूबाजूच्या गोष्टींचे कळत - नकळत आपल्यावर संस्कार होत असतात..रामरक्षेसारखी स्तोत्रं हा त्यातलाच एक प्रकार... आजी- आईनी आपल्याला शिकवलेल्या काही गोष्टी, तेव्हा आपण कितीही दुर्लक्ष केलं तरी त्या मनात खोलवर रुतलेल्या असतात ... आपण मात्र सदैव 'कूल', 'सो कॉल्ड प्रॅक्टिकल' व्हायच्या प्रयत्नात त्या शिकवणींना बाजूला सारतो.... तुम्ही देवाला मानत असाल वा नसाल,  तुम्हाला स्तोत्र पाठ असतील वा नसतील.. जेव्हा जेव्हा आपण ती ऐकू , ती नेहमीच एक पॉझिटिव्ह ऊर्जा देऊन जातात...मी हे अनुभवलं ...आज तुम्हीसुद्धा आपट्याची पान वगैरे वाटण्यापेक्षा रामरक्षा ऐकून, मनात लपलेल्या रावणाला मारून  विजयादशमी च्या वेगळ्या सेलिब्रेशनचा अनुभव घेऊन तर बघा.......

-- स्वागत पाटणकर 

Saturday, September 23, 2017

फास्टर फेणे - डोन्ट अंडरएस्टीमेट द पॉवर ऑफ .....

फास्टर फेणे - डोन्ट अंडरएस्टीमेट द पॉवर ऑफ .......

फास्टर फेणेचं  काल आलेलं साधारण ९० सेकंदाच टिझर पाहिलं!!! ९० सेकंदात शाळेतले दिवस आठवायला भाग पाडणारं टिझर ! फास्टर फेणे - शालेय जीवनात मराठी मुलांना वाचनाची गोडी लावणारा, वाचनाची गोडी लागल्यावर कधी एकदा फेणेचा पुढचा भाग येतोय असं वाटायला लावणारा अवलिया  ...  भागवत सरांच्या कमालीच्या नजरेतून , ताकदवान शब्दांमधून तयार झालेला फेणे....

साधारण २५ वर्षांपूर्वी दूरदर्शननी फेणेवर सिरीयल केली होती पण त्यानंतर इंडस्ट्रीकडून फेणेकडे 'दुर्लक्ष' कसं काय झालं ह्याचंच आश्चर्य वाटतं... दुर्लक्ष नसावं ..पण कधी कधी आपल्याच मातीत वाढलेल्या गोष्टींवर , आपल्या घरातल्यांवरच आपला जास्त विश्वास नसतो, बऱ्याचदा आपल्याच 'व्यक्तिरेखांना' अंडरएस्टीमेट केलं जातं आणि त्यामुळेच त्यांच्यावर काही मोठी कलाकृती बनवायची 'रिस्क' वाटते मग अर्थातच आपण बाहेरच्या कॅरॅक्टर्सवर जीव लावून बसतो... पण ह्या ट्रॅडिशनल अँप्रोचला धुडकाडून लावून , आपल्या घरातल्या , मराठी मातीतल्या फेणेला मोठ्या पडद्यावर आणल्याबद्दल लेखक क्षितिज पटवर्धनचे अभिनंदन करायला हवं! ह्या विषयावर सिनेमा होऊ शकतो , लोकांना आवडू शकतो हा विश्वासच  मनात ठेवून त्यांनी हा सिनेमा लिहिला असणार . भागवत सरांच्या लेखनाला, त्यांच्या स्टाईलला धक्का ना लावता त्याच दर्जाचं लेखन करायचं म्हणजेअवघड चॅलेंजच... पण पटवर्धनांचा बायोडाटा बघता त्यांनी हे शिवधनुष्य लीलया पेललं असेल अशी खात्री वाटते... फेणेचे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार आणि पटवर्धन म्हणजे इंडस्ट्रीमधले एकदम गुणी क्लासमेट्सची जोडी...टिझर बघताना, सचिन - द्रविडसारखीच ह्यांची पार्टनरशिप शतकी असेल असं कुठेतरी वाटून जातं! ह्या दोघांच्या चतुराईचं उदाहरण म्हणजे 'टॉक्क'... मला आठवतंय, शालेय जीवनात जेव्हा हे 'टॉक' करायला शिकलो तेव्हापासून कोणालाही हाक मारायची गरज लागली नाही... नुसत्या 'टॉक्क'वर मित्रांना बोलावलं जायचं... आता ते फेणेकडून बघताना जाम धमाल येतीये.. दिग्दर्शकाला सलाम आहे!

पुस्तकातला फेणे , स्क्रिप्ट रूपात आल्यावर पुढचा महत्वाचा टप्पा म्हणजे कास्टिंग. मला स्वतःला वाटतं, ह्या अवघड  प्रोजेक्टमध्ये जी काही थोडी सोप्पी गोष्ट असेल ती म्हणजे फेणेचं कास्टिंग... ज्यांनी ज्यांनी फेणे वाचलेलं आहे त्यांना जर विचारलं तर ९९ टक्के लोकं एका सेकंदात 'अमेय वाघ' हे उत्तर देतील... अमेय अगदी तंतोतंत शोभतोय फेणेच्या रूपात ... त्याची हेअर स्टाईल, कपडे, उड्या, त्याची सायकल वगैरे अगदी पुस्तक वाचताना डोळ्यासमोर यायचं, तसंच सेम टू सेम पडद्यावर आलंय ..अमेय म्हणजेच फेणे हे शिक्कामोर्तब झालंय , एफ बी - युट्यूब वरती लोकांच्या कमेंट्स वाचल्यावर अगदीच ते लक्षात येतं ! 
अमेयला हा रोल सोप्पा नसावा... काही वर्षांपूर्वी आलेल्या सीरियलमध्ये सुमित राघवानसारख्या तगड्या कलाकाराने फेणे रंगवला होता. ज्यांनी ज्यांनी ती सिरीयल बघितली असेल त्यांच्या मनात फेणे म्हणजे राघवन हे फिट बसलं असणार... आय होप अमेयचा फेणेपण त्याच ताकदीने अवतरेल...आणि लोकांना आवडून जाईल. बाकी कास्टिंगबद्दल अजून गुपितच आहे पण सिनेमात पर्ण पेठे आहे असं कुठेतरी वाचायला मिळालं... वाह! वाघोबाच्या तीक्ष्ण नजर आणि फास्टर वेगाबरोबर पर्णरूपी गोडवा पण अनुभवायला मिळणार ... मुरंबा-रमा माधव अशा मधून आपला स्क्रिन प्रेझेन्स  किती  'कडक' आहे दाखवून देणाऱ्या ह्या दोघांना एकत्र स्क्रीनवर बघायला मजा येणार ए! ह्या व्यतिरिक्त मला  उत्सुकता लागून राहिलीये ती पोस्टर आणि टिझर ..दोन्हीमध्ये अमेयच्या मागेच दिसणारा हा चिमुकला शुभम मोरे आणि त्याच्या रोलबद्दल!


आता एवढ्या सगळ्या पुणेकरांबद्दल बोलल्यानंतर थोडंसं लातूर - मुंबईकडे वळावं. पार्श्वसंगीत!! ट्रॉय - अरिफ ह्यांना सलाम!! अतिशय साजेसं , उत्कंठा वाढवणारं असं पार्श्वसंगीत! अतिशय इम्प्रेसिव्ह! इवलास्या टीझरमध्येच अख्या पिक्चरचा फील कसा असेल हे म्युझिक उभं करतंय! काय कमाल एनर्जी त्या ट्युनमध्ये!
निर्मात्यांबद्दल काय बोलणार ... फेणेच्या मागे विश्वासाने,ताकदीने उभा राहून... त्याला मोठ्या पडद्यावर आणून, पहिल्या पोस्टरपासूनच बॉलिवूड दिग्गजांना आपल्या मराठमोळ्या फेणेकडे लक्ष देण्यास भाग पाडून, आत्तापासूनच फेणेची उत्सुकता देशभर पोचवल्याबद्दल झी आणि रितेश देशमुखला मनापासून धन्यवाद! रितेशसारखा मोठा स्टार आपल्या मागे आहे हे कळल्यावर आपसूकच त्या सिनेमाशी निगडित सर्वांचा आत्मविश्वास वाढतो आणि तसंच जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचायला मदतही होते. पण टिझरमध्ये रितेशचा आवाज ऐकताना, हा माणसाची इन्व्हॉल्वमेंट फक्त 'निर्माता' रोल पुरती लिमिटेड नसून त्याहून जास्त तो ह्या प्रोजेक्ट मध्ये इमोशनली इन्व्हॉल्व्हड आहे असं  जाणवलं ... त्याला स्वतःलाच फेणेचा लीड रोल करायची जाम इच्छा होती कि काय आणि फेणेच वय थोडं मोठं असतं तर कदाचित रितेशने ही संधी सोडली ही नसती असं काहीसं वाटून गेलं...पण त्यानी टीझरमध्ये मस्तपैकी व्हॉइस ओव्हर देऊन त्याच्या फॅन्सना मस्त सरप्राईज देऊन टाकलंच आहे! 
जेनेलियासारखच फेणेदेखील आजच्या प्रेक्षकांचा सर्वांचाच लाडका होईल....सर्वांचा आवडत्या पुस्तकरूपी फेणेचं  पडद्यावरचं रूप देखील सर्वाना आवडेल असंच ह्या पहिल्या ओव्हरनंतर वाटायला लागलंय... आणि इतक्यावर न थांबता विदेशी सिनेमासारखे फास्टर फेणेचे पण पुढचे भाग येतील , जेणेकरून आपल्याच मातीतल्या व्यक्तिरेखाना अंडरएस्टीमेट करायची चूक आपण पुन्हा करणार नाही.... हीच इच्छा!!!

Teaser - https://www.youtube.com/watch?v=4Bjv5nL-OK0

९० सेकंदच टिझर मधूनच एकसाईटमेन्टनी एवढं लिहायला भाग पाडलं.. पण सध्यातरी २७ ऑक्टोबरची वाट बघण्याशिवाय दुसरा पर्याय नाही !! फेणे, भेटूच पुढच्या महिन्यात...तोपर्यंत, टॉक्क!!

Friday, September 22, 2017

स्लो कूकर- हळूवारपणे शिजलेलं सुख!

स्लो कूकर- हळूवारपणे शिजलेलं सुख!
                                                                                                                                         

आजकाल ज्या गोष्टी बाहेर खातो त्याच घरी ट्राय करायचा नवीन छंद लागलाय... त्याच गडबडीत एक नवीन फॅड म्हणून परवा 'स्लो कुकर' आणला! वॉलमार्ट मध्ये गेलो आणि त्या किचन सेक्शनमध्ये सगळ्यात स्वस्त असा स्लो कुकर शोधला आणि लगेच घेऊन टाकला. आपलं नेहमी असंच असतं ..स्वस्त ते मस्त! हल्ली नवीन कपड्यांचं शॉपिंग झाला तरी  ते कधी एकदा घालतोय ह्याची फारशी उत्सुकता नसते (पोटाला वगैरे घट्ट होत असतात ना!)! पण स्लो कुकर मात्र घरी आल्या आल्या लगेच उत्साहात उघडला गेला , आतमध्ये पाहिलं तर रेसिपीजच पुस्तक होतं.... लगेच वाचायला घेतलं तर सगळ्याच इटालियन मेक्सिकन अशा इंग्लिश रेसिपीज! श्या! आपला भारतीय बाणा अपेक्षेप्रमाणे जागा झाला... बायकोला म्हणलं पाहिलं काही होणार तर बिर्याणीच होणार आज ह्याच्यात... साजूक तुपातली बिर्याणी!

ऑनलाईन  बघून, थोडा इकडे तिकडे वाचून बिर्याणी लावली ... एकदम टकाटक दिसत होती! स्लो कुकर मध्ये ३ तास शिजवायची असं तो यु ट्यूब वरचा शेफ म्हणाला... ती एवढी कडक दिसत होती...पण तीन तास वगैरे थांबायचं??
 "पाटणकर, 'स्लो कुकिंग'ची हौस आहे ना ....सो छान हवं असेल तर पेशन्स ठेवायला शिका ..".हे असं काहीतरी तो शेफ ओरडला बहुधा! कुकर सुरु केला ...3 एक तासांनी घरात वेलची,दालचिनी,केशर, पुदिनावगैरे गोष्टींचा एक अतिशय कडक वास अख्या घरात पसरला होता... मी तर 3 तासाचा गजर लावून ठेवला होता..वासामुळे भूक वाढली होतीच...गजर झाल्या झाल्या लगेच किचनकडे पळालो, कूकर उघडला...आयच्या गावात! काय जबरा दिसत होती ती ...तांदूळ पहिल्या पावसात भिजलेल्या झाडासारखे फ्रेश दिसत होते...पण मेन फोकस होता तो 'स्लो कुक्ड चिकनचा' ...चिकन कितपत आणि किती शिजलंय ह्यावर सगळं अवलंबून होतं ..टेस्ट करायला म्हणून एखादा पीस घेतला.....तोंडात ठेवल्या ठेवल्या माझं पुण्याच्या तिरंगामधून  एस पिज मग ब्लु नाईल हुन जॉर्ज वगैरे प्रवास करून आलं! इतक्या वर्षात जे फक्त बाहेरच खायला मिळालं होतं  एक्झॅक्ट सेम टेक्सचर चिकनला आलं होत ... परफेक्ट मॉइश्चर ठेऊन ते शिजलं होतं.. फुल्ल टेण्डर  ....कुकरमध्ये  निर्माण झालेल्या वाफेनीच बिर्याणीला शिजवलं होत. हळू हळू शिजल्यामुळे जेवढी बाहेरून सुंदर दिसत होती तेवढीच आतपर्यंत शिजली होती ... इतका वेळ इन्व्हेस्ट केल्यामुळे त्याचे रिटर्न्स सुद्धा 'इंटरेस्टिंग' होते ....तो मसाला, ती चव,ते रंग हे तांदूळ आणि चिकन ह्याच्या अगदी आत पर्यंत पोचलं होतं... 

हे असं काही खायचं असेल तेव्हा मला डिस्टर्बन्स अजिबात आवडत नाही...पटापटा डिशमध्ये बिर्याणी घेतली आणि एकटाच मस्त बाल्कनीत जाऊन बसलो ... 

खूप वेळ घेऊन... शांत... मनसोक्तपणे तयार झालेलं चिकन खात खात मी एकटाच हरवून गेलो होतो... एकदा पोट प्रसन्न झाल्यावर मग मात्र सुखावलेलं मन पुन्हा ऍक्टिवेट झालं...विचारांना किक बसायला लागली आणि अचानक वाटलं आपलं आयुष्यपण किती ह्या स्लो कुकरसारखंच असतं .... गोष्टी हळू हळू मिळत गेल्या कि त्याची गोडी वेगळीच लागते.. एकदम विरघळलेली! म्हणजे बोलायचंच झालं तर सक्सेस ...यश! झटपट मिळालेल्या यशापेक्षा खूप झटून कष्ट करून हळू हळू पायऱ्या चढत यशाच्या शिखरावर पोचलं कि त्याचं वेगळं सेलिब्रेशन करावंच लागत नाही... शिखरावर पोचण्याच्या त्या स्लो प्रोसेसमध्येच खरा आनंद मिळालेला असतो!
स्टॉक मार्केट मध्ये खरे 'पोचलेले' लोक डे -ट्रेडिंग करण्यापेक्षा लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट वर भर देत असतात ... बऱ्याचदा आपल्या मनाला वाटत असत काहीच गोष्टी घडत नाहीयेत ..तेव्हा आपल्या नकळत त्या बदलत असतात...गरज असते ती फक्त पेशन्स ठेवायची.
आणि  कदाचित पेशन्स ह्याच गोष्टीमुळे एखाद्या बॅट्समनला वन डे मधल्या सेन्चुरीपेक्षा टेस्ट क्रिकेटमधले १०० जास्त मोलाचे वाटत असावेत... इतकंच कशाला ...रिलेशनशिप मध्ये सुद्धा ..पहिल्या नजरेत प्रेम होऊन दुसऱ्या दिवशी प्रपोज करून नातं सुरु होण्यापेक्षा.. आधी नुसती नजरानजर, मग त्याच मैत्रीत झालेलं रूपांतर हे असं टप्या टप्प्याने पुढे गेल्यावर 'आय लव्ह यू' म्हणायची गरजच लागत नाही ..एकमेकांच्या डोळ्यात डोळ्यामधेच ते नातं दिसून येतं .... इतक्या वर्षाच्या स्लो प्रोसेस मध्ये ते एकदम मुरून गेलेलं असतं .... अरेंज मॅरेज ची सुद्धा तीच गम्मत असते... लग्नाच्या पहिल्या रात्री अवघडलेली दोन्ही मनं काही वर्षांनी मात्र एकमेकात बुडून गेलेली असतात ..दोघांच्याही  नकळत... नातं उलगडत जाण्याची प्रक्रिया फार हळू हळू होते .. सोप्या अवघड वाटांमधून प्रवास करत पुढे जाते ... मागे वळून बघितल्यावर मात्र चेहऱ्यावर वेगळंच हास्य ठेऊन जाणारी असते!

आयला, ही स्लो कुक्ड बिर्याणी जिभेबरोबर पोट आणि मन ह्यांनापण एक प्रकारची चालना आणि ख़ुशी देऊन गेली होती!  अनेक प्रकारच्या गोष्टी मनात हळू हळू येत होत्या...आणि माझे विचार एका फांदीवरून दुसरीकडे टुणकन उड्या मारत होते .... नकळत बिर्याणी मात्र मस्तपैकी फस्त झाली होती! 
"बीइंग स्लो' रॉक्स" असं काहीतरी पुटपुटत... पुढच्या वेळेस काहीतरी इटालियन करूया असा काहीसा निर्धार करत पडदे लावून वामकुक्षी घ्यायला प्रस्थान केलं!!!            
---स्वागत पाटणकर 

Wednesday, September 6, 2017

आठवणीतला सीगल... उबुंटूच्या निमित्ताने!

आपल्याला फार वाईट सवय असते , लोकांना पहिल्या भेटीतच 'जज' करायची. फार पूर्वी.. म्हणजे १५-१६ वर्षांपूर्वी, आमची सगळी बीएमसीसीची नाटक मंडळी पित्ती हॉलवर जमला होती. पुढच्या स्पर्धेसाठी काय करावं वगैरे चर्चा सुरु होत्या. तेवढ्यात एक मुलगा आला.. अकरावीत कॉलेजमध्ये आल्या आल्या लोकं नाटक, क्रिकेट असे आपल्या इंटरेस्टचे ग्रुप्स जॉईन करतात... हा ही तसाच असावा असं वाटलं!  ओळख परेड सुरु झाली .... नाव 'सारंग साठ्ये....  अकरावी नव्हे तर एफ वाय- एस वायमध्ये होता, सीएचं एक वर्ष 'ट्राय' करून मग त्याला चक्क अभिनयात इंटरेस्ट जाणवायला लागला होता!'
निळा चेक्सचा शर्ट, आतमध्ये पंधरा टीशर्ट, डोळ्यावर चष्मा, अख्या दुनियेची वेट लॉसची जबाबदारी एकट्याने उचलल्यासारखा बारीक आणि मनातले विचार जितक्या वेगवेगळ्या दिशेने जाऊ शकतात तितक्याच वेगवेगळ्या दिशांना भरकटलेले त्याचे ते केस! . एकूणच त्याला पाहता, 'ह्याला अजूनही आपला इंटरेस्ट नक्की कशात आहे हेच कळलं नाहीये...सीएसारखच ही पण चुकीचीच दिशा ह्यानी निवडलीये... आता करायला काही नाहीये तर उरलेलं कॉलेज लाईफ एन्जॉय करायला इकडे आलाय' वगैरे मतं त्याच्याबद्दल झाली होती! 

पण कधी कधी शितावरून भाताची परीक्षा केल्यावर आपण सपशेल फेल होतो!! साठ्ये हा त्यातलाच प्रकार... पित्ती हॉल जॉईन केल्यावर काहीच दिवसात त्याने अक्षरशः त्याच्याकडे असलेल्या अफाट ऊर्जेने मला भारावून टाकलं! किती एनर्जी असावी एवढाश्या जीवात ... केवढ्या कल्पना असाव्यात त्या डोक्यात! बीएम गेल्या काही वर्षांमध्ये पुरुषोत्तम मध्ये फारसं यशस्वी झालं नव्हतं... पण ह्या नवीन आलेल्या पाखराने पांढरा शुभ्र सीगल बनून आम्हा सगळ्यांना झेप घ्यायला शिकवलं! सगळं ग्रुप एक झाला ..खूप कष्ट, अपार मेहनत घेऊन जोनाथन सीगल एकांकिका उंच उंच उडाली आणि पारितोषिक घेऊनच पित्तीच्या फांदीवर खुशीत येऊन बसली. भरतमध्ये बीएम - बीएम च्या गजराची वाट बघत होतो तो शेवटी ऐकायला मिळाला! एक स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद झाला! आणी त्यात साठयांच्या सीगलचा सिंहाचा वाटा होता! सारंगची दिशा चुकलेली नव्हती ... त्याची घेतलेला तो टर्न हा राईटच होता.. आणि त्याच्या चेहऱ्यावरचं समाधान ते सांगून जात होतं! 

नटसम्राट!
पुढे, मी पोस्ट ग्रॅड्युएशन - नोकरी वगैरे असा ठराविक स्टॉप असलेला रस्ता निवडला आणि मग पित्ती हॉलवर जाणं बंद झालं... पण जेव्हा केव्हा सारंग भेटायचा तेव्हा तेव्हा त्याच्या डोक्यातला नवीन कल्पनांबद्दल भरभरून बोलायचा ... ह्या माणसाला खूप काही करायचं हे त्याच्या डोळ्यातच जाणवायचं... माझ्या पोटाचा साईझ आणि त्याची एनर्जी हे एकाच प्रमाणात वाढलं होतं!  नाटक, स्क्रिप्ट, तालीम,वाचन., संवाद ..अभिनयातले बारकावे ह्या सगळ्याबद्दल तो भरभरून बोलत होता! ऐकायला लै भारी वाटत होतं... पित्ती हॉलचा विषय निघाल्यावर  'अरे,दोन नवीन मुलं आली आहेत... भविष्य आहेत ती'  बोलला ... हा आता दुसऱ्यांची क्षमता ओळखायला लागला होता ... शिवाय आपल्या घरात बाळ जन्माला आलंय एगझॅक्ट तशाच आनंदात तो हे सांगत होता ! नाटक हा माझा श्वास आहे वगैरे बरेच लोकं मुलाखतीमध्ये वगैरे बोलताना ऐकलं होतं.. पण सारंगच्या बाबतीत मला ऍक्च्युअली ते दिसत होत ! हा माणूस फक्त अभिनयात बॅटिंग न करता ..तो मोठा ऑलराऊंडर होणार आहे असं काहीतरी मनात वाटून गेलं...

त्यानंतर मात्र भेट होणं फार कमी झालं... आम्ही ९-५ जॉब मध्ये बिझी झालो आणि सारंग 'स्ट्रगल' करायला पुण्याबाहेर गेला असं मित्रांकडून कळलं! कोणी गॉडफादर नसलेल्या साठ्येचा स्ट्रगल यशस्वी होवो एवढीच मनातल्या मनात प्रार्थना केली! मधेमधे गार्बो ,तू ,जंगलनामा अशा अनेक कलाकृतींमधून त्याच नाव वाचायला मिळायचं... स्वतःमधल्या एनर्जीला प्रायोगिक रंगभूमीकडे चॅनेलाईझ करून त्यांनी पुन्हा एकदा बरोबर निर्णय घेतला होता!  आमच्या हिऱ्याला पैलू पाडायचं काम प्रायोगिक रंगभूमी करत होती! ब्राईट डे, ब्रिन्ग ऑन द नाईट वगैरे मधून तर हा देशभर पोचला होता! नटसम्राट रिलीज झाल्यावर किंवा गुगल प्लेवर ब्राईट डे आल्यावर मी सगळीकडे आरडाओरडी करून अतिशय उत्साहात सगळ्यांना सांगत सुटलो होतो! आपला साठ्येच हे यश बघून खूपच मस्त वाटत होतं! मध्यंतरी एकदा कर्वे रोड वर दिसला...त्याचे पूर्वीचे ते भरकटलेले केस आता खूप मोठे झाले होते पण एकदम टापटीप.! आपसूक त्याला हाक मारली गेली ... मागे न बघता त्यांनी काय स्वागत कसा आहेस विचारलं! त्यानं इतक्या वर्षांनी सुद्धा फक्त आवाजावरून आपल्याला ओळखलंय! वाह! त्याच्याबद्दल प्रेम होतंच .. पण आदरही वाटायला लागला! 

सारंग मात्र एवढ्यावर थांबणाऱ्यातला नक्की नाही. त्याच्यातला दिग्दर्शक  त्याला स्वस्थ बसू देत नव्हता...,मनात असलेल्या अनेक कल्पनांना वाट करून देण्यासाठी भाडीपा - मराठी वेब चॅनेल सुरु केलं..आजकालच्या प्रेक्षकांना नक्की काय हवंय ह्याची उत्तम जाण असलेल्या साठ्येनी कास्टिंग काऊच लोकांसमोर आणलं तेसुद्धा अनेक वर्षांपूर्वी त्यानी पारखलेल्या 'त्या दोन' मुलांना घेऊन ... मराठीतील ह्या पहिल्या वेब सिरीजनी जगभरात अक्षरशः धुमाकूळ घातलाय ..  भाडीपाच्या सगळ्याच कलाकृतींवर लोकं मनापासून प्रेम करतायेत! पण मला मात्र ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये त्याच्यातला दिग्दर्शक त्याच्यातल्या अभिनेत्यावर अन्याय करतोय कि असं वाटायला लागलं ... पण परवाच पाहिलेल्या उबुंटूच्या ट्रेलरनी मात्र सुखद धक्का दिला! लीड रोलमध्ये आपला साठ्ये! ट्रेलर तर आवडूनच गेलं पण एकसाईटमेन्ट मध्ये भराभरा १५ वर्षांपूर्वीच्या आठवणी डोळ्यासमोरून गेल्या आणि लेखणीतून उतरल्या! 

उबुंटूमध्ये त्याच्या तोंडी एक डायलॉग आहे. "ह्या वयात फार रग असते मुलांच्या अंगात".... 

इतक्या वर्षांनीसुद्धा सारंगनी तीच रग त्याच्यात अजूनही जिवंत ठेवली आहे ह्यापेक्षा सुखावणारी दुसरी गोष्ट नाही... त्याच्या फॅन्ससाठी..माझ्यासारख्या!