Friday, August 18, 2017

कोथरूडचा गोड आघात - पट्या!

साधारण ७-८ वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. बापटांची प्रिया आणि कामतांचा उमेश हे दोघंही तसे नेहमीच आवडीचे.. त्या दोघांचं एक नाटक येतंय असा कुठेतरी वाचायला मिळालं होतं... भयंकर उत्सुकता होतीच पण त्यानंतर साधारण ६-७ महिन्यानंतर पुण्याला जाणं झालं. तोपर्यंत 'नवा गाडी नवं राज्य'नी  फुल्ल धुमाकूळ घातलेलाय असं कळलं! पुण्यात गेल्या गेल्या प्रयोग पहिला... ते दोघं आवडलेच... पण त्याएवढेच आवडले ते नाटकातले डायलॉग्स! माझा नुकतंच लग्न झालं होतं त्यामुळे नाटकातले सीन्स,  त्या दोघांमधले वाद - संवाद अगदी आमच्या घरातलंच प्रतिबिंब वाटत होतं.  नाटकाचा लेखक आपल्याच घरात लपून बसला होता कि काय अशी शंका आली.. दुसऱ्या अंकाआधी अनाउंसमेंट झाली तेव्हा लक्ष देऊन लेखक कोण आहे ऐकलं... क्षितिज पटवर्धन! 

आयला! हे नाव कुठेतरी ऐकलंय असं वाटत होतं ... पण काही केल्या आठवत नव्हतं... तो विचार बाजूला ठेवून पुन्हा नाटकात गुंतून गेलो. प्रयोग संपल्यावर प्रियाला भेटायला जायलाच हवं, नाही तर फाऊल होतो.  स्टेजच्या मागे  जाता जाता एक जुना मित्र भेटला... तसा १० एक वर्षानंतर वगैरे दिसला... आपसूक हाक मारली गेली 'ए पट्या, ओळखला का भाई' ..... लगेच उत्तर आलं "बोला पाटणकर".. वा ! पाटणकर लगेच खुश झाले... १०-१५ मिनिट गप्पा झाल्या असतील... त्यातला अर्धा वेळ पाटणकर अमेरिकेचं कौतुक आणि थोडासा माज करण्यातच बिझी होते.. पट्या मात्र दिलखुलास पणे गप्पा मारत होता... निघता निघता मी विचारलं आवडलं का नाटक....??  पट्यानी फक्त स्मितहास्य दिलं.. आणि निघून गेला. दोन मिनिट मी तसाच उभा होतो. ट्यूब पेटली...च्यायला पट्या म्हणजेच क्षितिज पटवर्धन! क्षणर्धात, मी माती खाल्लीये ह्याची जाणीव झाली आणि पण आश्चर्य देखील वाटलं ... पट्या! हा किती डाऊन टू अर्थ आहे! किती मोकळेपणाने गप्पा मारत होता... नाटक हिट झाल्याचा, स्वतः स्टार वगैरे झाल्याचा लवशेष ही  चेहऱ्यावर नव्हता...आणि बोलण्यात तर अजिबात नाही! 

कॉलेजमध्ये असताना पुरुषोत्तमच्या वेळेस भरतवर 'हाय-हॅलो' व्हायचं... आम्ही डहाणूकरच्या कट्ट्यावर शिट्ट्या मारत बसायचो, तेव्हा पट्या त्याच्या एम ८० वरून जाताना मस्त स्माईल देऊन हात करून जायचा.. दिवसभरात ३-४ वेळा व्हायचं असं... खरं तर ओळख म्हणावी तशी एवढीच पण तीसुद्धा तो विसरला नाही... थोडक्यात, त्याच्याशी ती छोटीशी भेटीनी मी खुश झालो होतो. मला खूप भारी वाटलं होतं! त्याच्यासाठी,माझ्यासाठी आणि कोथरूडसाठी ...! नेहमीच सेलिब्रिटींना ते सेलिब्रिटी झाल्यावर बघत आलोय ... पण त्यात आपल्या कोथरूडचा , आपल्यासारखाच मध्यमवर्गीय घरातला, एकदम साधा सरळ मुलगा आज मोठा होतोय.... मोठा स्टार सेलिब्रिटी होणार हेच भारी वाटत होतं! 


आज अचानक हे सगळं आठवायचं कारण म्हणजे सकाळीच रिलीज झालेलं 'बापजन्म' मधलं नवीन गाणं! 'बापजन्म - मन शेवंतीचे फुल! ' अर्थातच पट्यानी लिहिलेलं... मेंदीच्या गंधात भारले, भेटीचे सोहळे! वाह! काय शब्द ते...मनाला भिडूनच जातात डायरेक्ट! हेच काय, कुठलंही गाणं असो...पट्याचे शब्द म्हणजे जादूच...सहजता म्हणजे काय हे शिकावं...ते ह्याच्या कडून!  एखाद्या आजीनी नववारी मध्ये फुलं वेचून ठेवावीत तसा पट्या शब्द वेचतो आणि अलगदपणे ओळींवर वाहतो...! डबल सीट वगैरे सारख्या सिनेमात एकदम सरळ साधी वाटणारी गोष्ट मनात खोलवर ठेवून जातो!
आणि असं पण नाही हां किती फक्त भावनांना साद वगैरे घालणारच मी लिहिणार..असं कुठल्याही चौकटीमध्ये बांधून घेतलं नाही..साहेब एकदम ऑल राउंडर...  'किती सांगायचय' पासून डीजेला आईची शपथ वगैरे गाणी लिहितात! ...नवा गडी पासून डायरेक्ट दोन स्पेशल .... आणि वायझेड पासून ते क्लासमेट्स पर्यंत...परत नाटक सिनेमासाठी लिमिटेड न राहता इतर ही गोष्टी करतच असतो ... परवा तर कब्बड्डी टीम साठी पण गाणं लिहिलं ह्यानी.. 
हा  माणूस म्हणजे आता गाणी, संवाद, लेखक + दिग्दर्शन असं एक दर्जा पॅकेज झालाय! 

विक्रम गोखलेंच्या आघातचे संवाद लिहिण्यापासून सुरुवात केलेला पट्या... वेगवेगळे पैलू बाहेर काढत आता खूप मोठा झालाय... आता  तर त्याला पट्या म्हणणं थोडं ऑडच वाटतं, पण अजूनही तो तेवढाच जमिनीवर आहे. आजही त्याला भेटल्यावर ... तो इतक्या अदबीने तुमच्याशी बोलतो कि तुम्हीच सेलिब्रिटी वगैरे आहात कि काय असं तुम्हाला वाटून जातं! हा आमचा प्रतिभावान कोथरुडकर, आता महाराष्ट्र काय जगभरातल्या मराठी प्रेक्षकांचं  मनोरंजन करतोय... वर्षानुवर्षे करत राहील! मराठी सिनेमासाठी कथा ह्या हिरो असते , पण कथेला हिरो बनवणाऱ्या ह्या लेखक मंडळी मात्र कुठेतरी हरवून जातात... सगळ्या झगमगाटात ते बाजूला राहतात, लपले जातात... हे असं काही होऊ नये हीच इच्छा आणि दिवाळीमध्ये येणाऱ्या दर्यासाठी शुभेच्छा!

जोइ त्रिबीआनी, फ्रेंड्स आणि फ्रेंडशिप डे!

आपला पिझ्झा दुसर्याबरोबर शेअर करायचा नाही!
ही अतिशय मोलाची शिकवण देणाऱ्या 'जोइ त्रिबीआनी' , तुला आपल्याकडून फ्रेंडशिप डे च्या शुभेच्छा! तू भेटेपर्यंत आपण आवडीने लोकांशी खाणं शेअर करायचो...पण त्या एका सल्ल्यानी आपलं आयुष्य एकदम चेंज करून टाकलं बघ.. माझ्या 'फ्रेण्डस' बरोबर असताना अगदी चिकन बिर्याणीमधले पिसेस पण मी भातात लपवून ठेवायला लागलो!!!
तसं बघितलं तर, तू आणि तुझे फ्रेंड्स लै उशिरा आलात रे माझ्या आयुष्यात... आमचं आयुष्य दामिनी आणि अवंतिका मध्येच अडकलेलं असताना अचानक स्टार वर्ल्ड वर तुम्ही भेटायला लागलात ते सुदधा सब टायटल्स घेऊन!! टू बी व्हेरी फ्रॅंक, सुरवातीचे काही दिवस क्युट रीचेल आणि गोंडस फिबीकडे बघण्यातच गेले...पण नकळत तू मनात मुरायला लागलास... तुम्ही सहाही जण तेवढ्याच आवडीची..... पण डेट वर असताना समोरच्या पोरींपेक्षा डिशमधलं खाणं जास्त महत्वाचं वाटणं, आयुषयभर फालतुगिरी - वेडेपणा करायचा आणि मित्रांनी ती समजूतदारपणे वागून सावरून घ्यायचं असा काहीसा तुझा आणि माझा स्वभाव जरा जवळपास किंवा अगदीच सारखा ....अर्थातच त्यामुळे तुझ्याबद्दल सॉफ्टकॉर्नर वाटायला लागला.. सेंट्रल पर्क मध्ये मी स्वतःच बसलोय कि काय असा वाटायला लागलं !
लंडनमध्ये फिरताना तुझा वेडेपणा, टीव्ही मध्ये दिसण्यासाठी तुझी धडपड, लोकांच्या इंटेलेक्च्युअल गप्पांमध्ये स्वतःला काँट्रीब्युट करता येत नाहोये कळल्यावर झालेली तुझी चिडचिड, चॅन्डलर-मोनिकाचं कळल्यावर ते सगळ्यांपासून लपवून ठेवायचे तू केलेले प्रयत्न ... 'बाहेरच्या पोरी आणि आपल्या मैत्रिणी ह्यांच्या समोर असणारी तुझी 'वेगवेगळी रूपं', सगळ्या प्रॉब्लेम्सवर आईस्क्रीम,बर्गर, सँडविच हेच सोल्युशन, आपल्या आजीला खुश बघण्यासाठी वाट्टेल ते करायची तयारी, रॉस -रिचेल बाहेर भांडताना तु चॅन्डलर बरोबर केलेली आतमध्ये मस्ती.... अशा किती तरी बाप आठवणी तुझ्याबद्दलच्या आहेत.. ह्या प्रत्येक गोष्टीत तुझी रिअक्शन बघायला 'जॅम' मजा यायची ...अजूनही येते! तसं म्हणलं तर तुझ्या कॅरॅक्टरला अनेक पैलू .... चॅन्डलरची रूम सोडून गेल्यावर पडलेला तुझा चेहरा, रिचेल आवडायला लागलीये कळल्यावर तुझ्या मनातली घालमेल, त्यामुळे रॉस समोर वाटणारी तुला गिल्ट.... अशा अनेक गोष्टीतून तू हसवता हसवता पटकन रडवायचास देखील... आणि त्यामुळेच तू एकदम 'रिअल' झालास....आपला रिअल फ्रेंड! तुझ्या किस्यांनी मनात एक मोठं कपाट भरून ठेवलंय, आजसुद्धा जेव्हा मन फ्रेश करायची गरज असते तेव्हा मी पटकन त्या कपाटातला एखादा 20 मिनिटांचा कप्पा उघडून बघतो. तडीक छान वाटायला लागतं!
तुझ्याबरोबर भेटीच्या त्या 10 सिझन्स मध्ये कितीतरी भारी आठवणी तू मला दिल्यास! न्यूयॉर्क डाउनटाऊन बघायची इच्छा तुमच्यामुळे झाली , स्वतःच घर आल्यावर पहिली गोष्ट मी घेतली असेल ती म्हणजे रिक्लायनर चेअर...तुझ्यासारखंच दिवसभर त्या खुर्चीत बसून टीव्ही बघायचा माझा हट्ट मी लगेच पुरवला ....तू मला माझं कॉलेज संपल्यावर भेटलास ते एका कारणानी जरा बरं झालं नाहीतर माझ्या BMCC मधल्या पोरी माझ्या 'हाऊ यु डुईंग' हल्ल्यानं घायाळ झाल्या असत्या! रूम शेअर करताना रूममेट बरोबर प्रॉब्लेम शेअर करायला आणि टेन्स वातावरण लाईट करायला पण तूच मला शिकवलंस...तुझ्यामुळेच मी एक चांगला रूममेट होऊ शकलो!
१९९६ पासून दहा वर्ष तुम्ही अमेरिकन्सना वेड लावलत आणि नंतर अक्ख्या जगाला.. "९९ विल बी इयर ऑफ जोई" असं तू म्हणालास पण खरं तर अक्खी १० वर्ष तुझी होती ...कायमचं वेडी करणारी! एक गोष्ट बरी झाली बाबा, तुम्ही भारतात 'जन्माच्या नाही आलात... नाही तर प्रॉफिट होतोय म्हणल्यावर तुम्हाला 'वीकली'च्या ऐवजी 'डेली' करून टाकलं असतं ...तुझ्याच डेज ऑफ आवर लाईफ सारखं मधेच आटोपतं ही घेतलं असतं आणि सगळा पोपट करून टाकला असता..आमच्या दोस्त्या-दुनियादाऱ्या अशाच संपतात !
लोकं वॉल्टर व्हाईट, जॉन स्नो च्या वगैरे प्रेमात असतात ... पण आपण नेहमीच तुझ्या प्रेमात राहणार ... जोई भाई, तू म्हणजे एकदम आपण ए आपण! तू म्हणाला होतास "those are just feelings, they will go away" ... पण तू आणि तुझ्या फ्रेंड्स बाबतीत असं कधीच होणार नाही!!
फ्रेंड्समध्ये भेटून माझा फ्रेंड झालेल्या जोई तुला फ्रेंडशिप डे च्या पुन्हा शुभेच्छा! - स्वागत पाटणकर

कणीस आणि फंडे!


कणीस आणि फंडे! 

आपल्याला आयुष्यात दोन प्रकारचे लोकं भेटतात!!
एक म्हणजे कणीस खातानासुद्धा एकदम शिस्तप्रिय असणारे, सरळ लाईन फॉलो करत कणसाचा प्रत्येक दाणा आयआयटी एंट्रन्सचं प्रिपरेशन असल्यागत प्लॅनिंग करून खाणारे आणि
दुसरे - कसेही... रँडम ...काहीही दिशा वगैरे फॉलो न करता जो दाणासमोर दिसेल तो खाणारे...स्वच्छंदी!!!
पहिल्या कॅटेगरीत मोडणारे लोकं...कणीस घेतल्यावर तिखट मीठ सगळीकडे नीट लागलंय ना, कुठल्या दाण्यावर अन्याय तर नाही ना झालाय ह्याचा अनालिसिस करून मगच एक साईडने कणीस खायला सुरवात करतात..आणि एका हातानी कणीस गोल गोल फिरवत एकदम सरळ रेषेत दुसऱ्या टोकाला पोचतात... त्यांच्या कणसाकडे बघितल्यावर कणीस किती संपलय किती उरलय हे स्टेटस लगेच कळतं! ही लोकं एकदम भारी असतात.... कलाप्रेमी...प्रत्येक गोष्टीत डिझाइन बघणारे.. आर्टिस्ट लेकाचे!!!आयुष्यात सरळ चालणारे, आईबाबांचं ऐकणारे, शेपूची भाजी आवडीने खाणारेवगैरे असतात! त्यांची खोली पण नेहमी एकदम साफ, सगळया वस्तू जागेवर ...थोडक्यात सरळ आणि शहाणी मंडळी असतात ही...
आणि दुसऱ्या प्रकारातली लोकं म्हणजे कणीस हातात आल्यावर डोकं बाजूला ठेवून कणसावर ताव मारणारी.. ! एक घास वरच्या भागाचा तर नंतरचा डायरेक्ट खालच्या भागाचा...एकदम रँडम!
मनात येईल तस वागणारी...कधी काय बोलतील सांगता येणार नाही...! पसारा आणि धसमुसळेपणा हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग! घरात आल्यावर शर्ट वगैरे कुठेही भिरकावून द्यायचा... खिशातल्या पैश्यांसकट पॅन्ट धुवायला टाकायची ह्या अशा ह्यांच्या सवयी! थोडक्यात काय तर कुठलीही नियमावली पाळायची नाही असा एकच नियम पाळणारे ..स्वच्छंदी!
आपण तर बाबा ह्या दुसऱ्या कॅटेगरीत मोडतो...लै आवडतं आपल्याला असं कणीस खायला...सगळं कणीस संपलय अशा दुःखात आपण जात असतानाच अचानक दाताखाली तिखट लागलेला एखादा दाणा येतो आणि मन गोड करून जातो!!
हॅपिनेस इज रँडमनेस हा आपला फंडा आणि तुमचा?

बालक - पालक: भूमिकेची अदला बदल!!

डेन्वरमधला जानेवारी महिना म्हणजे जरा विचित्रच.. भयंकर थंडी, भरपूर स्नो फॉल आणि दुपारी पडणारं कडकडीत ऊन! थंडीच्या ह्या 'पीक' पिरियड मध्ये आमचे आईबाबा इकडे आले! टेन्शनच होतं... ४ टाळकी... थंडीमध्ये घरात एकमेकांचे चेहरे बघत बसणार कि काय!
आई बाबा आल्यावर पहिल्याच दिवशी 'रोल्स' स्विच झाले आहेत हा अंदाज आला! एअरपोर्टवर उतरल्या उतरल्या जणूं काही डोंबिवली स्टेशनवर गरमीत उभं असल्यासारखं "श्या, काहीच थंडी नाहीये कि इकडे, उगाच हवा करत असतोस" असा एक डायलॉग मला ऐकू आला.. मी पण काही कमी नाही.. त्यांच्यासाठी आणलेले स्वेटर, कानटोपी अशा तत्सम 'ढाली' लपवून ठेवल्या आणि म्हणलं आता खेळा थंडीबरोबर युद्ध! एअरपोर्ट ते पार्किंग असं तब्बल ३ मिनिटांचं अंतर चालायला १० मिनिट लागली तेव्हा माझ्या बॅगेतले स्वेटर त्यांना दिले गेले.. पण तरीसुद्धा 'आपल्याला काहीच वाटत नव्हती थंडी.. थोडं गार आहे पण मस्त वाटतंय वगैरे म्हणत 'पराभव' मान्य न करत ते गाडीत बसले! एका फटक्यात समजून चुकलं .... ह्या ट्रिपमध्ये आमच्या भूमिकांची अदलाबदल झाली आहे... आता आपल्याला त्यांचं आई बाबा बनून त्यांची काळजी, त्यांचं मनोरंजन , त्यांचं खाणं वगैरे ची व्यवस्था नीट बघावी लागणार आहे.. जी गोष्ट ती आपल्याबरोबर गेली ३०-३५ वर्ष करत आले आहेत ती आपण ६ महिने करून तर बघू!! गाडीला स्टार्टर मारला आणि मी-रश्मी च्या 'प्रोजेक्ट आई-बाबा चा किक ऑफ झाला!
आत्त्ता ऊन पडलं असलं तरी स्वेटर घाला, बाहेर थंडी असणार आहे.... रस्त्यावरचा बर्फ वितळला असला तरी जरा जपून चाला घसरायला होतं.. वगैरे सल्ले मी देत राहिलो... एकदम 'बाबा' ह्या भूमिकेला शोभेल अशा आवाजात! पण आईबाबासुद्धा लहान मुलांच्या भूमिकेत एकदम घुसले होते... त्यामुळे जे चांगल्यासाठी सांगितलंय जातंय ते ऐकायचं नाही हा लहानमुलांचा पहिला नियम त्यांनी नेहमीच पाळला!! मी सांगायचं त्यांनी वेगळंच करायचं .... पुढचे काही महिने हे अशीच लपाछपी सुरु राहिली... नेहमीच! ह्या थंडीनी आपल्याला काय होतंय असाच तोरा...एकदम बाळासारखा हट्ट!!
नंतर नंतर त्यांनी थंडीला फुल आपलंसं करून घेतलं होतं आणि घराबाहेर पडायचं नाव नाही! कधी कधी छान हवा पडल्यावर आमच्या बाळांना मी "जा जरा खाली चक्कर मारून या , फ्रेश वाटेल" वगैरे उपदेशाचे डोस पाजायला सुरवात केली... पण बाळं मोठी झाली होती , शिंग फुटली होती.. वायफाय शिवाय पाऊल हलत नव्हतं.. व्हाट्सअप आणि यु ट्यूब म्हणजे जीवाभावाचे मित्र बनले होते!! त्यांच्याशिवाय पान हालत नव्हतं त्यांचं!! मग पुन्हा माझ्यातला बाबा चिडायचा... "बाहेर गेल्यावर तो मोबाईल बाजूला ठेवा आधी आजूबाजूचं निसर्ग बघा!!" वगैरे वाक्य माझ्या तोंडून आपसूक पडत होती ...पण आमची बाळं डोंगरांमध्ये सुद्धा वायफाय शोधत मग्न होती !! मुलं मोठी होत असताना आपण चिडचिड न शांत राहायचं असतं.. हे कळून गेलं...
मग आली वेगास ट्रिप!! इथे मात्र आमची बाळ एकदम तरुण असल्यासाखी वागत होती! ते बघून मस्त वाटलं... कमी कपड्यात फिरणाऱ्या बायकांपासून, ते कॉकटेल पित पीत रस्त्यावर चालणं... आणि मग बेफाट होऊन कॅसिनो खेळणं! आमची ६५ वर्षाची ही पोरं ..सगळं एन्जॉय करत होती... एकदम यंग ऍट हार्ट!!
अगदी परवा फ्रेंड्स सिरीयल बघताना "अरे तुझी ती रिचेल प्रेग्नन्ट झालीये ८व्य सिझनमध्ये" वगैरे माहिती मला देऊन... आता आम्ही 'adult' झालो आहेत हे ही जाणवून दिलं.... माझ्यातल्या बापाला आता निश्चिन्त वाटत होत!!
आणि तेवढ्यात पुण्याला निघता निघता , ४ जुलै ची डील्स स्वतः शोधून, चल टार्गेट मध्ये अमुक गोष्टीवर ४०% ऑफ कूपन डाउनलोड केलंय आणि तमुक गोष्टीवर कॅश बॅक आहे हे मला सांगून तुझी म्हातारी पोरं 'स्मार्ट' आहेत आणि... डेन्वरमध्ये ६ महिन्यात माझ्यापेक्षा जास्त मोठा मित्र परिवार करून त्यांनी आम्ही तुझे बाप आहोत हे ही दाखवून दिल!!
आपली स्पेशल मुलं खुश होऊन आणि समाधानाने परदेशतला 'स्टे' एन्जॉय करून गेली... हेच माझ्यातल्या मोठ्या झालेल्या पालक मनाला सुखावणारं झालं!!!!!!!