Sunday, November 25, 2018

पहिला ताप

पहिला ताप


बाळ घरी येतं... घरातलं सगळं वातावरण बदलून टाकतं... बाळाची आई तिच्या नवीन रोलमध्ये पूर्णपणे शिरलेली असते.. तिची तयारीच ९ महिने आधीपासून सुरु झालेली असते...तिच्या प्रत्येक कृतीतून मातृत्व बाहेर येत असतं... बाळाचं रडणं, उठणं,झोपणं, दूध पिणं हे सगळं आई आणि बाळाच्या आगळ्या वेगळ्या कम्युनिकेशनमध्ये सुरु असतं... बाबा हे सगळं लांबून बघत असतो.. बाळाला कडेवर घेऊन खेळणं हे (आणि एवढंच) त्याचं काम झालेलं असतं.. खेळता खेळता बाळ रडायला लागलं कि तो बायकोकडे म्हणजेच आईकडे बाळाला देऊन मोकळा होत असतो... बाळाला नक्की काय हवंय हे आईलाच जास्त समजत असतं... अर्थात बाप हे सगळं जाणून असतो...पण तरी सुद्धा मनाच्या कोपऱ्यात तू कुठेतरी सारखा विचार करत असतो ... 'चिमुकल्याशी बॉण्डिंग होईल ना आपलं.....आईंसारखं!' त्याच्याकडे उत्तर नसतं... विचार झटकण्यासाठी तो पुन्हा बाळाशी खेळायला लागतो...


आणि एक दिवस खूप पाऊस पडतो... गारवा वाढतो.. अचानक झालेल्या बदलामुळे बाळ कुरकुर करायला लागतं... रडरड सुरु होते...डोळे कोमेजून गेलेले असतात.... गुबगुबीत दिसणारे गाल आत खोल गेल्यासारखे वाटतात... 'मला थंडी वाजतीये, पोट दुखतंय , कणकण वाटतीये'  बाळाला खूप काही आपल्याला सांगायचं असतं... पण ते चिमुकलं फक्त रडण्याचीच भाषा बोलत असतं... आपल्याला काहीच सुधरत नसतं.... थर्मामीटर  १०१ ताप दाखवतं ... आपल्याच पोटात गोळा येतो.. बाळाला जवळ घेऊन त्याच्या कानात 'औषध दिलाय राजा आता होशील बरा' एवढंच आपण सांगू शकतो... त्याला ते कितपत कळलंय हे समजत नाही... रडत रडत दमून अखेरीस तो झोपून जातो... बाळाला त्याच्या पाळण्यात ठेवलं जातं .... पण नाही....बाळाला झोपायचं असतं ते बाबाच्या कडेवरच... !रडत रडत ते पुन्हा बाबाच्या कडेवर येतं ...  बाबाला आता बाकी कुठली गोष्ट दिसत नसते... मोबाईल-व्हाट्सएप्प सगळं दूर फेकून दिलेलं असतं.. शेजारच्यांनी दिलेला चिकन रस्सा तो खात नाही.... टीव्हीवर सुरु असलेली भारत-पाकिस्तान मॅच तो बघत नाही ... कशात लक्षच लागत नसतं ..तो थर्मामीटर घेऊन दर १० मिनिटाला बाळाचा ताप चेक करत बसतो...  कुठल्याही छोट्याश्या आवाजानीसुद्धा बाळाची ती शांत झोप मोडू नये म्हणून खोलीत स्वतःला बंद करून टाकतो...बाळाची शांत झोप हेच त्याच नवीन आणि एकमेव टार्गेट असतं...त्या शांत खोलीत आता फक्त बाळाच्या श्वासाचा आवाज येत असतो... बापाला त्यातसुद्धा एक रिदम दिसतो.. काळजी आणि प्रेमानी तो बाळाच्या डोक्यावर हात कुरवाळत बसतो.... पाय चेपत बसतो... आणि अचानक लक्षात येत बाळानी झोपेतसुद्धा बापाचं एक बोट आपल्या मुठीत घट्ट पकडून ठेवलंय... बापाचे डोळे ओले होतात ...डोळ्यातलं पाणी बाळावर पडू नये म्हणून तो थोडी हालचाल करतो... बाळाची झोप डिस्टरब होते ...  इवलेसे डोळे उघडतात... उघडल्या उघडल्या त्याला बाबाचा चेहरा दिसतो...ते बघून बाळ खुद्कन हसतं ... आय एम इन सेफ हॅन्ड्स अशा टाईप रिअक्शन देऊन ते पुन्हा निश्चिन्त झोपून जातं... बाळाची भाषा बाबाला समजते ... खुशीने वेडापिसा होतो ... काही वेळानी बाळाचा ताप उतरतो ... बाळ पुन्हा खिदळायला लागतं .. आता बाळाला भातसुद्धा बाबाच्या हातूनच खायचा असतो...'हुं,हुं,आक ,आइन्क' हे त्याच्या शब्दकोशातले शब्द वापरून तो बाबाशी बोलत असतो... 

ते शब्द, ती एक रिअक्शन, ते एक घट्ट पकडलेलं बोट आज त्या बापाला 'बाबा' ह्या लेबल पलीकडे घेऊन जातं... खरं तर बाळाच्या जन्माबरोबर तो 'ऑन पेपर' बाप झालेला असतो... पण बाळाला आलेला पहिला ताप मात्र त्या बापामधल्या 'काळजी,भीती आणि माया' भावनांना वाट मोकळी करून देतो....बाळाच्या पहिला तापात मायाळू बाबाचा खराखुरा जन्म होतो!

 

No comments:

Post a Comment