Wednesday, December 19, 2018

डेट विथ ' डेट विथ सई'

डेट विथ ' डेट विथ सई' 

       नार्कोज बघून झालं, मिर्झापूर जस्ट संपवलं होतं... विकेंड आला होता , ऍज युज्वल "काय करायचा वीकेंडला"  प्रश्न पडला होता. एफ बी - इंस्टवर टाईमपास सुरु होता. सई ताम्हणकरच्या लाखो फालोअर्समध्ये आम्ही देखील त्यातले एक.... "वेब सिरीज - डेट विथ सई इज नाऊ अव्हेलेबल" असं काहीतरी लिहिलेल्या तिच्या इन्स्टा स्टोऱ्या सारख्या समोर येत होत्या. आधी वाटलं टॉक शो वगैरे आहे... आजकाल वेब सिरीज ते फॅड झालंय ना कि सेलिब्रिटीजना इंटरव्ह्यूला  बोलवायचं, त्यांची मजा घ्यायची आणि मग लोकांचे व्युज मिळवायचे. 'डेट विथ सई' असंच काहीतरी असं वाटलं .. थोडी माहिती काढल्यावर त्यात सई बरोबर अजून दोन इंटरेस्टींग नावं वाचली ... ज्ञानेश झोटिंग आणि विनोद लवेकर... झोटिंगच्या राक्षसबद्दल लै लै ऐकलं होतं आणि प्रोड्युसर विनोद लवेकर म्हणजे आपले फेव्हरेट... ज्या काही मराठी डेली सोप्स आवडीने बघितल्या आहेत त्या सगळ्यातला कॉमन फॅक्टर म्हणजे विनोद लवेकर...

              ठरलं तर मग ... शनिवार रात्र होती... हातात वाईनचा ग्लास घेतला ... सई , विनोद आणि ज्ञानेश ह्या तीन नावांवर विश्वास ठेवून  लावला कि "डेट विथ सई" वेब सिरींजचा पहिला एपिसोड. पहिल्याच सीनमध्ये मॅडम एकदम वेगळ्याच अवतारात एंट्री घेऊन आपल्यासमोर हजर होत्या.. सुपरवूमन इश्टाईल.. आपण प्रेक्षक एखादी गोष्ट लगेच जज करायला जातो. माझंसुद्धा तो सीन बघून तसंच झालं... श्या हे ग्राफिक्स कसले खोटे आहेत, फसली आहे सिरीयल वगैरे कमेंट्स पास झाल्या.. पण दोनच मिनिटात तो एकच्युली "शूटिंगचा शॉट" आहे हे कळलं. ह्या इंट्रोडक्टरी सीन नंतर मात्र अजिबात वेळ न दडवता दिग्दर्शक मालिकेच्या कथेत घुसला हे आपल्याला अतिशय आवडलं. एखाद्याकडे जेवायला जावं , त्याच्या घरात घुसल्या घुसल्या चिकन रस्स्याचा वास यावा आणि आपण किचनकडे ओढले जावं असं काही आपलं "डेट विथ सई" बघताना होतं. पहिल्या एपिसोडच्या १०व्य मिनिटात आपल्यालापुढे नक्की काय प्रकारचं वाढून ठेवलंय याचा अंदाज येतो. आपलंसुद्धा एक्सझॅक्ट तसंच झालं. एका मागून एक असे सगळेच्या सगळे एपिसोड एका फाईटीत संपवले आणि लास्ट एपिसोडनंतर 'च्यायला ,संपली सुद्धा..श्या" अशी रिअक्शन बाहेर पडली. 'डेट विथ सई'च हेच मोठं यश आहे असं आपल्याला वाटतं.
   अतिशय फास्ट अशी मांडणी , परफेक्ट ठिकाणी आलेले ट्विस्ट्स , शून्य ताणलेली आणि अतिशय महत्वाचं म्हणजे पूर्णपणे नवीन गोष्ट घेऊन ज्ञानेश आपल्यासमोर येतो. ही गोष्ट खरंच इतकी वेगळी आहे कि आपण फक्त "हे असं घडू शकतं ??" आणि "हे असंही घडू शकतं " हे एवढंच आपण पूर्ण सिरीयल भर बोलत राहतो. ज्ञानेश आणि असिस्टण्ट डिरेक्टर आशिष बेंडेची कमाल आहे. त्या आशिषला अनेक म्हणजे अनेक वर्षांपूर्वी एक होता अल्लादिन एकांकिकामध्ये बघितलं होतं...इतक्या भारी भारी सिनेमा-सिरियल्स मध्ये असिस्टंट डिरेक्टरचा अनुभव घेऊन आता  आशिष साहेबांचा अल्लादिन नक्कीच दिवा उघडणार आणि त्याची स्वतःची एखादी कलाकृती नक्की घेऊन येणार.... फुल्ल गॅरंटी आहे आपल्याला.
       ही सिरीयल फास्ट आहे आणि तोच वेग ती कायम राहतो याचं कारण म्हणजे कथेतील पात्र... मेन कॅरेक्टर्स फक्त दोन. त्यातली एक म्हणजे अर्थातच सई ताम्हणकर .... ही मुलगी सगळं करत असते सगळं.. सिनेमा करते, वर्क आउट करते, बारीक होते, टीव्हीवर जज म्हणून जाते आणि आता वेब सिरीज... ती सुद्धा अशा वेगळ्या विषयावरची. .  स्क्रीनवरची सई आणि प्रत्यक्षातली सई दोघीही धाडसी , चॅलेंजेस ऍक्सेप्ट करणारी..  बऱ्याच सीन्समध्ये फक्त रिअक्शन देऊन व्यक्त होते... डायलॉग्सची तिला गरजच नसते. आपल्याला असं नक्की वाटतंय  कि सई नी हा डिफरंट रोल नक्कीच एन्जॉय केला असणार...सईच अजून कौतुक वाटायचं कारण म्हणजे बऱ्याच सीन्समध्ये समोरच्या काहीशा नवख्या कलाकाराला तिच्यापेक्षा जास्त भाव खायला जागा आहे पण तरी सुद्धा ती तिच्या 'सेलेब्रिटी' इगो तिच्या कामापासून दूर ठेवते...
      आता जरा बोलूया त्या नवख्या कलाकाराबद्दल..रोहित कोकाटे.... अरररे मित्रा कोण आहेस तू? कुठं होतास इतके दिवस...? खरंतर केवढा अवघड रोल होता ..थोडं इकडे तिकडे झालं तर एकदम फिल्मी किंवा एकदम बालिश देखील वाटू शकला असता... मार्जिन ऑफ एरर अगदीच कमी पाहिजे अशी ही भूमिका ...आणि ती तेवढ्याच ताकदीने रोहित आपल्यासमोर उभी करतो... त्याच्यामुळे डेट मधली गम्मत,रोमांच आणि सस्पेन्स वाढतच रहातो .. लड़का लै आगे जायेगा... त्याला बघितल्यावर शाहरुखचा लाडका झीशान अयुब ची आठवण येते आणि त्याचं गावरान मराठी बोलण्याची स्टाईल एकदम नागराज सारखी वाटली राव... लै झकास...
         हे सर्व कमी का तर त्यात आपले लाडके अमेय, गिरीजा ओक, पूजा ठोंबरे गेस्ट म्हणून येतात ... त्यांना असं बघायला भारी वाटतं .. पूजा त्या ५-१० मिनिटाच्या सीनमध्येसुद्धा अतिशय क्युट दिसते राव 😍! ज्ञानेश, आशिष बेंडे, रोहित सारख्या नवीन लोकांना अशी संधी दिल्या बद्दल विनोद लवेकर, त्यांची प्रोडक्शन टीम आणि सर्वात महत्वाचे 'झी५' चे लै लै धन्यवाद ... हे सगळं टीम वर्क इतकं परफेक्ट जमून आलंय कि आम्ही आमची वाईन बाजूलाच ठेवून डेट विथ सई मध्ये गुंतून गेलो.... जणू काही आमचीच एक डेट सुरु झाली . 
       तसं बघायला गेलं तर थ्रिलर नावाची गोष्ट आपल्या मराठीत फारच कमी , त्यात वेब वर अगदीच पहिला प्रयोग. नाही म्हणायला ह्यात सुद्धा त्रुटी आहेत... कलायमॅक्सला एका सीनमध्ये पाऊस असतो आणि दुसऱ्या सीनमध्ये गायब होतो, सईच्या पकडलेल्या नोकराला इतक्या दिवसांनी बरोबर शेवटीच खिशातला लायटर सापडतो ...ह्या अशा काही गोष्टी टाळता आल्या असत्या. बट नेव्हर माईंड ... आता एक काम करा प्रवीण प्रभाकरच खरा रघु असतो, किंवा रघु मेलेलाच नसतो हे असं काहीही करा पण सेकंड सीझन लवकर आणा... . .
.
.
कारण आम्ही वाट बघतोय... 

- स्वागत पाटणकर. 

Tuesday, December 11, 2018

हॅपी बर्थडे, बंटी

हॅपी बर्थडे, बंटी! 

            फॅन मुव्हीमधला छोटा शाहरुख म्हणतो "ये कनेक्शन भी ना कमाल की चीज है .... बस हो गया तो हो गया!"..... जरा शांतपणे विचार केला तर समजतं हे किती खरं वाक्य आहे. अगदी आपल्या रोजच्या आयुष्यात आपण अनुभवलेलं असं वाक्य. शाळेतला एखादा मित्र ..खूप जवळचा असा ...अनेक वर्षांनी भेटतो पण तरीसुद्धा असं वाटतच नाही कि हा इतक्या दिवसांनी भेटतोय. जुनं कनेक्शन असतं ते ... एकदम खोलवर रुजलेलं असं. तर कधीही न भेटलेली व्यक्ती ऑनलाईन चॅटमुळे ओळखीची होते आणि ते नातं जन्मोजन्मीचं असल्यासारखं वाटायला लागतं. एवढं लांब कशाला जायचं आपलं रोजचंच उदाहरण घ्या .. अजिबात रन्स करत नसलेल्या अजिंक्य रहाणेच अपयश सलत असतं आणि तेवढ्यात तो एखादी मॅच विनिंग इनिंग खेळून जातो आणि जणू काही आपल्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम संपलेत अशा आवेशात आपण पोचतो... एकदम रिलॅक्स होतो.... कनेक्शनच असतं ते... एकदम विलक्षण!
         मराठी रंगभूमी आणि मराठी रसिक प्रेक्षक ह्यांचं कनेक्शन असंच काहीसं ..घट्ट एकदम! परवा आपल्या प्रिया बापटनी "गुड न्यूज"चा फोटो टाकला. रसिक प्रेक्षक खुश झाले... बाकीच्यांबद्दल कशाला बोला.... आम्ही आमच्या घरात बसून, समोर फेसबुकवर ती पोस्ट बघून एकदम एकसाईट झालो... आपल्याच घरी बाळ यावं अशा आनंदात ओरडलो ... काय सांगू, ह्या प्रिया-उमेश बद्दल वाटणारं प्रेमचं एवढं जास्त आहे कि अशी नॅचरल रिऍक्शन येणारच.  खरं तर पडद्यावरच्या अशा आमच्या मैत्रिणींची लग्न झाली कि त्यांच्या पतिदेवांबद्दल आम्ही जन्मभर राग ठेवतो मनात. एकदम अबोला ठेवतो त्यांच्याशी. अगदी माधुरीच्या श्रीराम नेन्यांना सुद्धा आम्ही सोडलं नाहीये ह्यातून. पण जेव्हा प्रियाचं लग्न उमेशबरोबर ठरल्याची बातमी आमच्या कानावर आली , काय चमत्कार झाला नाही माहित पण पहिली रिअक्शन होती "आयला एकदम परफेक्ट जोडी आहे ही... प्रिया-उमेश... वाह" ....हे असं कधी घडलं नव्हतं.
              थोडा ऍनालिसिस केल्यावर लक्षात आलं आमच्यावर जेवढी जादू प्रियाची होती तेवढाच उमेशसुद्धा आमच्या गुडबुक्स मध्ये होता. मला आठवतंय १४-१५ वर्षांपूर्वी , जेव्हा घरात आम्ही शहाण्या मुलासारखे वागायचो.... रात्रीचं जेवण घरच्यांबरोबर एकत्र बसून असायचं... मजा असायची...जेवण मस्त असायचं फक्त जेवता जेवता आईच्या डेली सोप्स बघायला लागायच्या. भावनांचा मारा व्हायचा. अशातच एक मुलगा लक्ष वेधून घेत होता. आभाळमाया आईची फेव्हरेट सिरीयल.... ती कंपलसरी बघता बघता आणि त्यातला बंटी आपला फेव्हरेट बनला. एकदम बिनधास्त असा बंटी आणि तेवढाच बिनधास्त उमेश. विनय आपटे सारख्या दिग्गज कलाकारांसमोर एकदम कॉन्फिडन्ट वावर असायचा उमेशचा. पुण्यात राहून फक्त पुरुषोत्तममध्ये दिसलेले लोकंच भारी अभिनेते बनतात अशी आमची अंधश्रद्धा होती ...त्यावर ह्या बंटीनी पूर्णपणे फुली मारली होती. बंटी आपल्याला पटून गेला होता ...आवडून गेला होता. पुढेमागे तो वादळवाट, गोजिरवाण्या घरात मध्ये दिसला.. असंभवमुळे अजून मोठा झाला. एका लग्नाची दुसरी-तिसरी गोष्ट त्याच्यामुळे लोकं बघायला लागली . प्रत्येक मराठी फॅमिलीमध्ये तो लाडका झाला. नवा गडी नवं राज्यामध्ये राज्यभर धुमाकूळ घातला. सिरीयल , नाटकाबरोबर तो सिनेमासुद्धा करत होता.


               पण काही केल्या आमच्या मनातून बंटी उतरत नव्हता.  सारखं सारखं वाटायचं..... किंवा अजूनही वाटतं ह्या मुलामध्ये प्रचंड कॅलिबर आहे पण त्या ताकदीची भूमिका त्याला अजून मिळालीच नाहीये. छोट्या छोट्या सीन्समध्ये सुद्धा त्याची क्षमता आपल्या दिसते. उदाहरणच द्यायचं म्हणलं तर नवा गडीमध्ये पार्टीहून आल्यावर त्याचा तो सीन... अभिनयाचा उच्चांक तो गाठतो.  ह्यावर्षी त्याला 'ये रे ये रे पैसा' साठी विनोदी अभिनेताच अवॉर्डसुद्धा मिळालं.. पण तरी सुद्धा मला असं वाटत राहतं 'बंटी जे करू शकतो ते उमेशला अजून करायला मिळालंच नाहीये". चुकीचं असेल कदाचित, फॅन म्हणून स्वार्थ देखील असेल... .
पण उमेशला अजून अजून भारी चॅलेंजिंग भूमिका करायला मिळाव्यात असंच सारखं वाटत राहतं. शेवटी हे कनेक्शनच असं आहे कि त्याच यश आपल्याला सुखावणारं असतं.
     आभाळमायामधला बंटी असाच आठवत असतानाच प्रिया पुन्हा फेसबुकवर पोस्ट टाकते... ती गुड न्यूज म्हणजे त्यांचं येणारं नवीन नाटकं आहे ... त्यांनीच प्रोड्युस केलेलं नवीन नाटक "दादा,एक गुड न्यूज आहे". टू बी फ्रॅंक आमच्यातला "प्रिया-उमेश फॅन" निराश होतो... "काय यार गंडवला आम्हाला" अशी एक फर्स्ट रिअक्शन बाहेर येते... पण त्याचबरोबर आमच्यात लपलेला रसिक प्रेक्षक खुश होतो... तिकडे कसे अमीर -शारुख प्रोड्युसर बनून नवीन सिनेमे बनवत असतात.. इंडस्ट्रीला फायदाच होतो घ्या गोष्टीचा. अगदी तसंच प्रिया-उमेश सारखे लीड ऍक्टर्स जर नाटकाची निर्मिती करणार असतील तर ती मराठी रंगभूमीसाठी खूपच चांगली गोष्ट आहे.
निर्माते प्रिया - उमेशला लै लै शुभेच्छा ....रंगभूमीवर नवनवीन प्रयोग तुम्ही सादर करालच पण आमचा बर्थडे बॉय - बंटीला अजून अजून चॅलेंजिंग भूमिका करायला मिळो ह्याच  उमेशला वाढदिवसाच्या  शुभेच्छा  .... असो जास्त लोड नको आता .... मनसोक्त सुरमई फ्राय खाऊन एन्जॉय बर्थडे!


-स्वागत पाटणकर
       
बाय द वे दादा, एक गुड न्यूज द्यायचीये :) काही वर्षांपूर्वी तुझे फोटो बघून अनेक मराठी पोरं फिटनेससाठी मोटिव्हेट झाली होती... त्यात आम्हीसुद्धा एक होतो. अगदीच सिक्स पॅकवगैरे बनवू नाही शकलो ... पण फॅमिली पॅक नक्कीच कमी झाला आहे :)