Tuesday, December 11, 2018

हॅपी बर्थडे, बंटी

हॅपी बर्थडे, बंटी! 

            फॅन मुव्हीमधला छोटा शाहरुख म्हणतो "ये कनेक्शन भी ना कमाल की चीज है .... बस हो गया तो हो गया!"..... जरा शांतपणे विचार केला तर समजतं हे किती खरं वाक्य आहे. अगदी आपल्या रोजच्या आयुष्यात आपण अनुभवलेलं असं वाक्य. शाळेतला एखादा मित्र ..खूप जवळचा असा ...अनेक वर्षांनी भेटतो पण तरीसुद्धा असं वाटतच नाही कि हा इतक्या दिवसांनी भेटतोय. जुनं कनेक्शन असतं ते ... एकदम खोलवर रुजलेलं असं. तर कधीही न भेटलेली व्यक्ती ऑनलाईन चॅटमुळे ओळखीची होते आणि ते नातं जन्मोजन्मीचं असल्यासारखं वाटायला लागतं. एवढं लांब कशाला जायचं आपलं रोजचंच उदाहरण घ्या .. अजिबात रन्स करत नसलेल्या अजिंक्य रहाणेच अपयश सलत असतं आणि तेवढ्यात तो एखादी मॅच विनिंग इनिंग खेळून जातो आणि जणू काही आपल्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम संपलेत अशा आवेशात आपण पोचतो... एकदम रिलॅक्स होतो.... कनेक्शनच असतं ते... एकदम विलक्षण!
         मराठी रंगभूमी आणि मराठी रसिक प्रेक्षक ह्यांचं कनेक्शन असंच काहीसं ..घट्ट एकदम! परवा आपल्या प्रिया बापटनी "गुड न्यूज"चा फोटो टाकला. रसिक प्रेक्षक खुश झाले... बाकीच्यांबद्दल कशाला बोला.... आम्ही आमच्या घरात बसून, समोर फेसबुकवर ती पोस्ट बघून एकदम एकसाईट झालो... आपल्याच घरी बाळ यावं अशा आनंदात ओरडलो ... काय सांगू, ह्या प्रिया-उमेश बद्दल वाटणारं प्रेमचं एवढं जास्त आहे कि अशी नॅचरल रिऍक्शन येणारच.  खरं तर पडद्यावरच्या अशा आमच्या मैत्रिणींची लग्न झाली कि त्यांच्या पतिदेवांबद्दल आम्ही जन्मभर राग ठेवतो मनात. एकदम अबोला ठेवतो त्यांच्याशी. अगदी माधुरीच्या श्रीराम नेन्यांना सुद्धा आम्ही सोडलं नाहीये ह्यातून. पण जेव्हा प्रियाचं लग्न उमेशबरोबर ठरल्याची बातमी आमच्या कानावर आली , काय चमत्कार झाला नाही माहित पण पहिली रिअक्शन होती "आयला एकदम परफेक्ट जोडी आहे ही... प्रिया-उमेश... वाह" ....हे असं कधी घडलं नव्हतं.
              थोडा ऍनालिसिस केल्यावर लक्षात आलं आमच्यावर जेवढी जादू प्रियाची होती तेवढाच उमेशसुद्धा आमच्या गुडबुक्स मध्ये होता. मला आठवतंय १४-१५ वर्षांपूर्वी , जेव्हा घरात आम्ही शहाण्या मुलासारखे वागायचो.... रात्रीचं जेवण घरच्यांबरोबर एकत्र बसून असायचं... मजा असायची...जेवण मस्त असायचं फक्त जेवता जेवता आईच्या डेली सोप्स बघायला लागायच्या. भावनांचा मारा व्हायचा. अशातच एक मुलगा लक्ष वेधून घेत होता. आभाळमाया आईची फेव्हरेट सिरीयल.... ती कंपलसरी बघता बघता आणि त्यातला बंटी आपला फेव्हरेट बनला. एकदम बिनधास्त असा बंटी आणि तेवढाच बिनधास्त उमेश. विनय आपटे सारख्या दिग्गज कलाकारांसमोर एकदम कॉन्फिडन्ट वावर असायचा उमेशचा. पुण्यात राहून फक्त पुरुषोत्तममध्ये दिसलेले लोकंच भारी अभिनेते बनतात अशी आमची अंधश्रद्धा होती ...त्यावर ह्या बंटीनी पूर्णपणे फुली मारली होती. बंटी आपल्याला पटून गेला होता ...आवडून गेला होता. पुढेमागे तो वादळवाट, गोजिरवाण्या घरात मध्ये दिसला.. असंभवमुळे अजून मोठा झाला. एका लग्नाची दुसरी-तिसरी गोष्ट त्याच्यामुळे लोकं बघायला लागली . प्रत्येक मराठी फॅमिलीमध्ये तो लाडका झाला. नवा गडी नवं राज्यामध्ये राज्यभर धुमाकूळ घातला. सिरीयल , नाटकाबरोबर तो सिनेमासुद्धा करत होता.


               पण काही केल्या आमच्या मनातून बंटी उतरत नव्हता.  सारखं सारखं वाटायचं..... किंवा अजूनही वाटतं ह्या मुलामध्ये प्रचंड कॅलिबर आहे पण त्या ताकदीची भूमिका त्याला अजून मिळालीच नाहीये. छोट्या छोट्या सीन्समध्ये सुद्धा त्याची क्षमता आपल्या दिसते. उदाहरणच द्यायचं म्हणलं तर नवा गडीमध्ये पार्टीहून आल्यावर त्याचा तो सीन... अभिनयाचा उच्चांक तो गाठतो.  ह्यावर्षी त्याला 'ये रे ये रे पैसा' साठी विनोदी अभिनेताच अवॉर्डसुद्धा मिळालं.. पण तरी सुद्धा मला असं वाटत राहतं 'बंटी जे करू शकतो ते उमेशला अजून करायला मिळालंच नाहीये". चुकीचं असेल कदाचित, फॅन म्हणून स्वार्थ देखील असेल... .
पण उमेशला अजून अजून भारी चॅलेंजिंग भूमिका करायला मिळाव्यात असंच सारखं वाटत राहतं. शेवटी हे कनेक्शनच असं आहे कि त्याच यश आपल्याला सुखावणारं असतं.
     आभाळमायामधला बंटी असाच आठवत असतानाच प्रिया पुन्हा फेसबुकवर पोस्ट टाकते... ती गुड न्यूज म्हणजे त्यांचं येणारं नवीन नाटकं आहे ... त्यांनीच प्रोड्युस केलेलं नवीन नाटक "दादा,एक गुड न्यूज आहे". टू बी फ्रॅंक आमच्यातला "प्रिया-उमेश फॅन" निराश होतो... "काय यार गंडवला आम्हाला" अशी एक फर्स्ट रिअक्शन बाहेर येते... पण त्याचबरोबर आमच्यात लपलेला रसिक प्रेक्षक खुश होतो... तिकडे कसे अमीर -शारुख प्रोड्युसर बनून नवीन सिनेमे बनवत असतात.. इंडस्ट्रीला फायदाच होतो घ्या गोष्टीचा. अगदी तसंच प्रिया-उमेश सारखे लीड ऍक्टर्स जर नाटकाची निर्मिती करणार असतील तर ती मराठी रंगभूमीसाठी खूपच चांगली गोष्ट आहे.
निर्माते प्रिया - उमेशला लै लै शुभेच्छा ....रंगभूमीवर नवनवीन प्रयोग तुम्ही सादर करालच पण आमचा बर्थडे बॉय - बंटीला अजून अजून चॅलेंजिंग भूमिका करायला मिळो ह्याच  उमेशला वाढदिवसाच्या  शुभेच्छा  .... असो जास्त लोड नको आता .... मनसोक्त सुरमई फ्राय खाऊन एन्जॉय बर्थडे!


-स्वागत पाटणकर
       
बाय द वे दादा, एक गुड न्यूज द्यायचीये :) काही वर्षांपूर्वी तुझे फोटो बघून अनेक मराठी पोरं फिटनेससाठी मोटिव्हेट झाली होती... त्यात आम्हीसुद्धा एक होतो. अगदीच सिक्स पॅकवगैरे बनवू नाही शकलो ... पण फॅमिली पॅक नक्कीच कमी झाला आहे :)

No comments:

Post a Comment