Showing posts with label खवय्येगिरी. Show all posts
Showing posts with label खवय्येगिरी. Show all posts

Friday, April 20, 2018

चितळ्यांचा स्ट्रेट ड्राइव्ह... अगदी मनापासून!

चितळ्यांचा स्ट्रेट ड्राइव्ह... अगदी मनापासून!

आयुष्यात आपल्या अवतीभवती असणाऱ्या अनेक गोष्टी...अगदी लहानसहान असल्या तरी आपल्या कळत-नकळत मनाच्या कोपऱ्यातवगैरे जाऊन बसलेल्या असतात.. त्यांचा तो प्रेझेन्स आपल्याला बऱ्याचदा लक्षात ही येत नाही..... पण असं होतं कधी कधी कि अचानक त्यांच्यापासून लांब गेल्यावर काहीतरी कारणानी त्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात... कुठलीतरी गोड आठवण घेऊन चेहऱ्यावर हास्य आणतात... "अर्रे!" एवढेच काहीसे शब्द आपल्या तोंडात आलेले असतात....    नाही नाही उगाच लोड घेऊन फंडे देत नाहीये .... पण इथे अमेरिकेतबसून आज युट्युबवर 'अगदी मनातलं' हा विडिओ बघितल्यावर मात्र  माझ्या नजरेसमोरून अजिबात जात नाहीये तो म्हणजे आम्हा पुणेकरांचं दैवत ....  चितळ्यांचा गुलाबजांचा तो विशिष्ट रंगाचा खोका म्हणजेच मिठाईचा तो लालसर बॉक्स!!

             चितळ्यांचे साखरी गुलाबजाम...... हे एवढंच बोललं कि विषय संपतो... खरं तर बाकरवडी, आंबा बर्फीवगैरे अनेक गोष्टींमध्ये त्यांची पी एच डी आहे..एकदम मास्टरच आहेत ते ..... पण सचिनच्या बॅटमधून किती ही बाप शॉट्स बाहेर पडले तरी त्याचा स्ट्रेट ड्राइव्ह मनाला विशेष समाधान देऊन जातो..... साखरी गुलाबजाम म्हणजे चितळ्यांचा स्ट्रेट ड्राईव्ह आहे... जिभेवरून खणखणीत ऊर्जेने पोटाच्या बॉण्डरीलाईनवर आदळून डायरेक्ट मनात घुसणारा असा हा गुलाबजाम!

लहानपणी आईनी (आणि आता बायकोनी) गुलाबजाम आणले कि तिला त्या खोक्यामधले गुलाबजाम काढून थोडे साईडला सेविंग्स अकाउंटला ठेवायला लागत असे... सध्या कसं पब्लिक येता जाता काहीही कारण नसताना मोदींना शिव्या घालतं, त्याच प्रमाणात आम्ही काहीही कारण नसताना फ्रीझ उघडून खोक्यातले २-३ गुलाबजाम येत जाता तोंडात टाकत असू... हो-हो २-३ गुलाबजाम... कारण केवळ एक गुलाबजाम खाणं हे म्हणजे पहिल्या पावसात रेनकोट घालून नाचण्यासारखं आहे.. एकदम फेल!

मला आठवतंय मी जेव्हा जेव्हा पुण्यावरून हैदराबादला कामानिमित्त जायचो तेव्हा २ खोके गुलाबजाम घेऊन जाणं हे ठरलेलं असायचं.... डेस्कवर गुलाबजाम ठेवून जेव्हा लोकांना मेल पाठवायचो तेव्हा एकीकडे मनात आज कमी लोकं येऊ देत रे बाबा वगैरे प्रार्थना सुरु असायची... हावरट पण हा फार वाईट असतो ..असे संस्कार केले खरं तर आई बाबानी.... पण चितळ्यांच्या ह्या गुलाबजामला आम्ही एक्सेप्शन दिलंय. काय करणार हो....  ते आवडतातच इतके कि कंट्रोलच होत नाहहहहहही ... बेसिकली 'काळा जामून, पाकातले गुलाबजाम' ह्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत हेच आम्ही मानतो... गणपतीलासुद्धा मोदक सोडून साखरी  गुलाबजामचा नवस बोलतो...मला परीक्षेत पास केलंस तर तुला चितळ्यांचे गुलाबजाम वगैरे!

खरं तर त्या कोरड्या गुलाबजामांनी प्रेमाचा ओलावा वगैरे दिलाय... पण त्याच गुलाबजामांचा चितळ्यांच्या तो विशिष्ट रंगाचा खोका आज दिसला आणि लै इमोशनल करून टाकलं हो... घरी तो खोका दिसला कि बाहेरच्या सगळ्या कटकटी विसरायला व्हायचं ... आज सकाळ सकाळ, आमच्या शर्वरीनी पोस्ट केलेली "अगदी मनातलं" ह्या नवीन वेब सिरीज मधली एक छोटी गोष्ट पाहिली... आणि आठवड्याचा शीण पूर्णपणे निघून गेला!


युट्युब लिंक बघण्यासाठी-  इथे क्लिक करा

मुळातच गोड असलेल्या गोष्टीवर काही कलाकृती करणं किती अवघड आहे खरं  तर....पण आमचे पुणेकर मित्र आशुतोष कुलकर्णी आणि शर्वरी लोहोकरे ह्यांच्या अतिशय गोड स्क्रीन ऍपिअरन्सनी ती गोष्ट बघायला खूपच मस्त वाटतीये... ऍक्च्युअली पुरुषोत्तम करंडकमध्येवगैरे ह्या दोघांच्या 'बीएमसीसी' आणि 'फर्ग्युसन'मध्ये जेवढी खुन्नस बघायला मिळायची त्याच्या दुप्पट गोडवा त्यांच्या अभिनयात आहे....!  इतकं नॅचरल कि असं वाटतं कि लगेच स्क्रीनमधून आत जावं आणि त्यांच्याबरोबर गुलाबजाम शेअर करावा....'४ खळ्या पडणारं' हे जोडपं म्हणजे गुलाबजामवरची साखरच! अर्थात हे दोघेही पुणेकर त्यामुळेच चितळे हे त्यांच्या नसानसात शिरलेले असतील! ह्या दोन पुणेकरांना एकत्र आणणारा म्हणजे तिसरा पुणेकर वरूण नार्वेकर.. ह्या गोष्टीचा दिग्दर्शक... ह्या वरुणचा साखर कारखाना वगैरे असावा अशी मला दाट शंका यायला लागलीये... मुरांबा काय किंवा हा विडिओ काय...किती गोडवा पसरावा एखाद्याने... आमच्या मोबाईललासुद्धा डायबेटीस होतो कि काय वाटायलय आता मला ... पण त्याच्या कल्पक दिग्दर्शनाची जादू पुन्हा दिसली जेव्हा चितळ्यांच्या त्या "खोक्यावर" क्लोज अप घेतला गेला...एका क्षणात मला गुजबम्पसवगैरे काहीतरी म्हणतात ते झालं....  पुण्याबाहेरचा खरा पुणेकर फक्त तो खोका बघूनसुद्धा खुश काय तर वेडापिसा होईल ..पार इमोशनल करून जाईल.. एक्साक्टली तसंच माझ्याबाबतीत झालं...!!

असो.....  एकदंरीत काय... आवडीच्या शर्वरी,आशुतोष आणि वरूण ह्या लोकांनी आवडीच्या गोष्टीबद्दल तयार केलेली ही कलाकृती गुलाबजामसारखीच डायरेकट मनात घुसली... मन कासावीस झालं... गुलाबजाम तर काही मिळेना मग लेखणीच्या आधारानी भावना बाहेर आल्या!

अगदी मनापासून अगदी मनातलं मांडल्याबद्दल 'अगदी मनापासून' ह्या वेब सीरिजला अगदी मनापासून शुभेच्छा!

जाऊदे ...आता डोकं चालत नाहीए ... कोणीतरी (प्लिज) पाठवा रे गुलाबजाम!!

--स्वागत

Thursday, December 21, 2017

रे कपिला...!

रे कपिला...!

पोळीचा रोल! लहानपणापासून घरात बघितलेली एक कामचलाऊ गोष्ट .. एकदम सोप्पी आणि पटकन बनणारी. आमच्या घरात तर मी, भाऊ आणि वडील अशा ३-३ सदैव भुकेले असणाऱ्या पोटांसाठी आई सारखं सारखं करणार तरी काय? मग उत्तर एकच  असायचं ......पोळीचा रोल! एकदम डायनॅमिक प्रकार.. काहीही घ्यायचं आणि पोळीमध्ये कोंबायच आणि मस्त रोल करून खायचा.. उरलेली भाजी, तूप-गूळ आणि कधीकधी तर नुसता टोमॅटो सॉस लावून रोल करून खाल्ला आहे आम्ही! शाळेत नववी-दहावीमध्ये  शिंग फुटल्यावर वडा पाव, मिसळ वगैरे चाखायला लागल्यावर मात्र पोळीचा रोल बाजूला सारला गेला... 

बट इट केम बॅक इन स्टाईल ..कॉलेजमध्ये गेल्यावर बऱ्याच गोष्टी नवीन कळतात आणि काही काही गोष्टी 'नव्याने' कळतात ...पोळीच्या रोलचं तसंच झालं ... मला तो दिसला पण एका वेगळ्याच स्वरूपात.. एका २५ डिसेंबरला...तो  माझ्या समोर आला ... अनेक वर्षांनी ...... आणि ते सुद्धा एकदम नव्या स्वरूपात...गंध आणि सौन्दर्यामध्ये कमालीचा फरक करून! 
त्याकाळी ख्रिसमसला कॅम्प एरियामध्ये जाऊन कुठल्याहि वयाचे, रंगाचे किंवा आकाराचे सॅनटा क्लोज  बघायला जायची लै फॅशन असायची... फॅशन कसली बोडक्याची .... खा* असायची! अमेय, सुभेदार, मित्या असे आम्ही पोरंपण कॅम्प मध्ये जायला निघालो ... पण रुबी हॉलजवळ अतिशय ट्राफिक लागलं. रस्ते गर्दीने फुलले वगैरे नव्हते, ट्रॅफिकनी 'लागली' होती रस्त्यांची. आम्हा तरुणाईचा पेशन्स तसा कमीच, लगेच संपला.. सॅन्टा बिनटा जाऊ दे ...आपण आपल्या वैशालीत जाऊ म्हणत परत फिरण्यासाठी गाडी एका ठिकाणी वळवली... थोडं पुढे गेल्यावर एका चौकात डावीकडे फुटपाथवर भयंकर गर्दी दिसली ...खूप! रस्त्यापर्यंत एक प्रकारचा चविष्ट वास यायला लागला... आम्ही एकमेकांकडे बघितलं , एकमेकांच्या नजराच इतक्या बोलक्या होत्या कि एकही शब्द न बोलता गाडी साईडला पार्क केली... अनेक मोठ्या गर्दीतून पुढे जायचा प्रयत्न केला....एक पांढऱ्या रंगाची टपरी आणि त्यावरचा बोर्ड दिसला ... कपिला काठी कबाब!!! एवढे सारे 'क'?? एकता कपूरच्या भाच्याची वगैरे टपरी आहे कि काय, असे फालतू विनोदसुद्धा करून झाले....

    खूप मोठ्या लाईनमधून पुढे सरकता सरकता मी फायनली कपिलाच्या काउंटरवर पोचलो. वास तर कडक येत होता पण काठी कबाब म्हणजे काय हे घंटा काही माहित नव्हतं ...पण असं नवखं असल्याचं आपल्याला दाखवायला आवडत नाही.... सो एक्सपर्ट असल्यासारख  "डबल - चिकन द्या" अशी ऑर्डर दिली ....काउंटर उभा राहून माझी नजर त्या आतल्या कढईपर्यंत काही पोहोचत नव्ह्ती पण तिचं झाकण उघडल्यावर त्यातून डोकावणाऱ्या खमंग आणि मसालेदार वासामुळे नाक मात्र कढई भावतीच रेंगाळत होतं... डोळे समोरच्या तव्यावर आणि नाक शेजारच्या कढई मध्ये गुंतत ठेवून मी त्या कारागिरांची कलाकृती बघत बसलो... 

कारागीरच ते...  एका मोठ्या तव्यावर भरपूर बटर, तेलवगैरे लावून  मैद्याची रोटी ठेवली, ती अर्धी भाजली गेल्यावर त्यावर २ अंडी फोडून टाकली '....२ मिनिटात एग फ्राय रोटी दिसायला लागली , एकदम खरपूस अशी....  मग कढई उघडून त्यातलं चिकन बाहेर काढलं. लालसर रंगाचे कबाब , एकदम परफेक्ट साईझचे ..छोटे छोटे पिसेस...ग्रेव्ही नावापुरती चिकनला प्रेमाच्या ओलाव्यात ठेवणारी...  ते चिकन घेऊन त्यानी एगरोटीवर अलगदपणे सोडलं...  डोळे बघतच राहिले, पोटातली भूक सपकन वाढली. मला वाटलं झालं आता ते आपल्याला लगेच मिळणार, एखाद्या गोष्टीची हाव सुटावी पण किती! मी पाय उंच करून बघत होतो... पण कारागीर लोक्स सुरूच होते... गोल आकारात कापलेला पंधरा शुभ्र कांदा रोलवर टाकला.. लिंबु  पिळलं आणि हिरव्या रंगाची पुदिन्याची  चटणी मस्त पैकी त्यावरवाहली! पिवळसर रोटी , त्यावर एग फ्राय , लालसर चिकन आणि हिरवी चटणी....झकास... कैतरीनापेक्षा जास्त हॉट दिसत होतं ते....  ह्या सगळ्या टीमचा त्यांनी रोल केला.. जणू काही 'जा जिले अपनी जिंदगी' म्हणत पेपर नॅपकिनमधून डोकावणारा तो काठी कबाब माझ्या पुढ्यात ठेवला...


लहानपणी आपल्या शेजारी  राहणारी कुलकर्ण्यांची पोरगी, जिला आपण गोड फ्रॉक आणि दोन वेण्यांमध्ये बघितलेलं असतं ती कॉलेजमध्ये अचानक शॉर्ट स्कर्ट आणि मस्त मेकअपमध्ये 'हॉट बनून आपल्या समोर येते.. आपण फक्त 'ऑ' करून तिला बघत राहतो.. आणि एक्साक्टली सेम तसं मला झालं... पूर्वीचा पोळीचा तो रोल , काठी कबाबच्या रूपात माझ्या हातामध्ये होता...!!!! कितीही वास घेऊन मन तृप्तच होत नव्हतं पण आता जिभेची टूर्न होती... हे सगळं कॉम्बिनेशनच खतरनाक लागत होत... आणि पहिला घास घेतल्या घेतल्याच दुसऱ्या रोलची ऑर्डर दिली गेली.  



कपिला आपलं एकदम फेव्हरेटच झालं तेव्हापासून... आता तर १५ एक वर्षाची लॉन्ग टर्म रिलेशनशिप झालीये... नंतर नंतर महिन्यातून एक डेट कपिलाबरोबर नक्कीच असायची ... २ काटी कबाब खायचे आणि मन प्रसन्न करून जायचं हे एक समीकरण बनलं होतं... आमचे मित्र मितेश आणि मैत्रीण शिबानी हे कपिलाचे रोल न घेता  फक्त चिकन कबाब घेऊन कोपऱ्यात बसत आणि एखाद्या झाडाखाली बसून जांभळं खाण्यासारखे ते चिकन कबाब खात, पण आपल्याला मात्र रोटी, अंडी आणि चिकन ह्यांची साग्रसंगीत महायुती एन्जॉय करायला नेहमी आवडायची.... ही नंतर एवढी आवडायला लागली कि कपिला समोरच माझ्या ऑफिसची दुसरी ब्रँच होती.... केवळ लंच ब्रेक मध्ये कपिलाला भेटता यावं  म्हणून मी त्या ब्रँचला ट्रान्स्फर मागितली होती... बॉसनी "जरा मोठा माणसासारखा वाग आता" एवढाच सल्ला दिला... मग मी खूप सेंटी होऊन त्याला "तुम क्या जानो प्यार क्या होता है" हे सणसणीत उत्तर दिलं ....पण मनातल्या मनात...!
पण हे माझं कपिला प्रेम बायकोनी मात्र एकदम लगेच ओळखलं. लग्न झाल्यावर..विशेषतः अरेंज मॅरेज झाल्यावर आपण 'आपल्या' लोकांची ओळख करून देताना भरभरून बोलत असतो. रश्मी तसंच तिच्या नातेवाइकांबद्दल खूप खूप बोलत होती. माझी टर्न आल्यावर मी मात्र कपिला काठी काबाबबद्दल  खूप काही बोलत होतो ... माझं हे पाहिलं प्रेम तिच्या पोटापर्यंत पोचलं होतं .... आणि हे मला कळलं जेव्हा मी पहिल्यांदाच सासरी चाललो होतो.. पुणे स्टेशनला गेल्यावर 'सासरी' जायचंय ह्या कल्पनेनीच पोटात गोळा आला होता....रश्मीने ते बरोबर ओळखलं होतं.... आणि ट्रेन मध्ये बसल्यावर पार्सल करून आणलेला 'एक चिकन डबल' माझ्यासमोर ठेवला... पोटातल्या गोळ्याचं भुकेमध्ये परिवर्तन झालं .... कपिलाच्या त्या वासाने स्ट्रेस बस्टरचा 'रोल' एकदम परफेक्ट प्ले केला ...कपिला आणि माझ्या प्रेमाच्या प्रवासातला हा नवीन टप्पा सुरु झाला होता ....आणि मी एका हातात बायकोचा हात , दुसऱ्या हातात चिकन रोल आणि चेहऱ्यावर स्माईल घेऊन सासरी निघालो....

- स्वागत पाटणकर 

Tuesday, May 2, 2017

फिश करी अँड राईस निर्मित - बिन पायांची शर्यत!

फिश करी अँड राईस निर्मित - बिन पायांची शर्यत!

शाळा कॉलेज ची पुस्तकं म्हणजे अप्पा बळवंत चौक- पुण्यात हा एक अलिखित नियम आहे.त्यामुळे आमच्यासारख्या नदीपलीकडच्यांना कॉलेजनंतर अप्पा बळवंत चौकात, सारखं-सारखं हे कधी स्वप्नात ही वाटलं नव्हतं! पण ती किमया साधली ती संदेश सुधीर भट ह्यांच्या फिश करी राईसनी!!! 

तसे आम्ही कधीच पट्टीचे मासे खाणारे नव्हतो,आमचं प्रेम हे कोंबडीवरच. लहानपणी आई आणि मोठेपणी पुष्कर काळे नावाचे स्नेही आम्हाला काटे काढून फिश खायला देत असे, तेवढंच आम्ही मासे खाणारे. कधी पापलेट सुरमई च्या पलीकडे ढुंकून ही पाहिलं नाही.
पण साधारण ८ वर्षांपूर्वी सुधीर भटांनी सुरु केलेल्या ह्या 'फिश करी राईस' नी मात्र वेगळी वाट दाखवली.जन्माचे नाटक वेडे आणि सुयोगचे फॅन असे आम्ही ,साहजिकच त्यांनी सुरु केलेल्या हॉटेलच्या टेस्टची टेस्ट करायला आम्ही पोहोचलोच. 

अप्पा बळवंत चौकाजवळ कन्या शाळेशेजारी एक नॉर्मल साईझ 'गाळा' होता , त्यात सुरु झालं होतं फिश करी राईस. आम्हा पुणेकरांना कॅम्प आणि नळ स्टॉपची फेमस सी फूड रेस्टोरंट बघायची सवय, त्यामुळे मासे खायचे म्हणजे महाग,भारी,मोठं आणि ए सी वगैरेच हॉटेल मध्ये जावं  लागतं  असा वाटायचं. असो, पण सांगायचं मुद्दा असा कि त्यामुळे फिश करी राईसचं पाहिलं दर्शन खूप निराशाजनक होतं, असं छोटंसं हॉटेल बघून हिरमोडच झाला. पण वास खूप भारी येत होता सो आत गेलो. १०-१५ मिनीटांनी बसायला जागा मिळाली.
पापलेट पेदावण 

ह्या अशा हॉटेल मध्ये उगाच 'रिस्क नको'  म्हणून एक 'छोटा ' पापलेट फ्राय आणि बॅक-अप प्लॅन म्हणून चिकन करी मागितली. वेटरनी पापलेट फ्राय टेबलवर आणून ठेवलं. आपल्याला जो साईझ मोठा वाटतो तो ह्यांना छोटा वाटतो!!! छोट्याच्या किमतीत मोठा मासा दिला कि काय अशा विचारानी माझं कोकणस्थी मन खुश झालं आणि मी पापलेटची डिश माझ्याकडे ओढली किंबहुना त्याच्या सुटलेल्या वासानी मला तसं करायला लावलं. पापलेटवर बरोबर ४ काप केले होते, ४ कापांमध्ये एखाद्या कारागिराने कराव्यात अशा सेम साईझ भेगा पाडल्या होत्या. त्यातून लालसर असा ओला मसाला माझ्याकडे डोकावून बघत होता बोलवत होता...शेपटीच्या साईडला  लिंबाची फोड आणि तिखट वास येणारी हिरवी चटणीपण आली होती. हे सगळं डोळे भरून पाहिल्यानंतर बरोबरमधला काप घेतला आणि जिभेवर ठेवला!! एका क्षणात कोकणस्थी मन कोकणात पोचलं! पुण्यामध्ये समुद्रवगैरे तयार झाला आहे कि काय असं वाटलं! कारणही तसच होतं... प्रिया बापटची स्माईल जेवढी फ्रेश तेवढाच 'फिश करी राईसचा' पापलेट फ्रेश होता... जिभेवर ठेवल्या ठेवल्या मस्त विरघळून गेला. पण चवीमध्ये तिखट आणि झणझणीत अशा चा सुवर्णमध्य साधलेलं मॅरिनेशन जिभेवर रेंगाळत राहिलं...एकदम परफेक्ट चव!! आणि सोबतीला हिरवी चटणी आणि लिंबाची सर!! आह!! मजा आला!

ते पापलेट फ्राय' एका 'फाईट'मध्ये संपवलं... आणि पोट आतून ओरडलं 'हा ट्रायल बॉल होता... अजून मॅच सुरु व्हायचीये' ..तेवढ्यात वेटर काका आलेच... मी जरा कन्फ्यूजड आहे हे कळल्यावर त्यांनी शांतपणे सांगितलं- दादा, पापलेट पेदावण ट्राय कर .. मी जोरात काय ??? वगैरे ओरडलो...अहो घ्या , लेस ऑइल आणि फॅट फ्री आहे.. मी तडीक ऑर्डर दिली...थोड्याच वेळात हिरव्या रंगाची डिश आमच्या टेबलच्या दिशेनी येताना दिसली. इंटरेस्टिंग होतं! केळीच्या पानामध्ये, लालसर अशा मसाल्यामध्ये वाफवलेला पापलेट माझ्यासमोर आला होता! जणू काही हिरव्या शालूमध्ये बसलेली नववधूच ती! पापलेटचा वास इतका भारी होता कि डोळे भरून वगैरे  बघायला वेळ नव्ह्ता! शून्य तेल, कमी तिखट आणि चवीला भारी! कसलं अशक्य कॉम्बिनेशन!!वाफवलेला मासा चुटकीसरशी संपवला..

एकदम बाप वाटत होता... २ मासे संपल्यावर लॉन्ग इनिंग साठी एकदम सेट  झालो होतो... आम्ही  रपारप सुरमई फ्राय, कोळंबी करी,रावस तवा ऑर्डर देऊन सुटकेचा निश्वास सोडला आणि तिथेच सुरु झाली  - बिन पायाची शर्यत!!! सुरमई, रावस ह्यांची पोटात जाण्याची एक शर्यत!! ताटात आलेल्या ह्यासर्वा खाद्य अप्सरा पैकी कोणाला आधी भेटायचं , भयंकर मोठा प्रश्न!! एक-एक करत सगळं खाल्लं ... तेंडुलकरच करिअर जेवढं 'स्वछ' तसाच आपला ताटपण चाटुनपासून एकदम  स्वछ झालं होता!! पोटानी एकदम छान ढेकर देऊन,आपण खुश आहे हे ओरडून सांगितलं... निघताना अचानक लक्षात आलं टेबलच्या कोपऱ्यातून कोणीतरी चिडक्या नजरेनी आपल्याकडे बघतय ... इकडे तिकडे नजर टाकल्यावर लक्षात आलं, बॅक-अप म्हणून घेतलेली कोंबडी तशीच होती.. साईडला पडलेली. एकदम दुर्लक्षित! पोटातल्या सुरमईकडे ती 'माझ्या नवऱ्याची बायको' टाईप रागानी  बघतीये कि काय असा भास झाला!! आमच्या ह्या मासे प्रेमप्रकरणाला 'फिश करी राईस' नि एक वेगळीच कलाटणी दिली होती!!

त्यानंतर मात्र 'फिश करी राईस' फारच फ्रीक्वेंटली व्हायला लागलं. एकीकडे पापलेट पेदावण घायचं आणि दुसरीकडे नवीन डिश ट्राय करायची, अशी स्ट्रॅटिजिकल चाल आम्ही तेव्हा खेळत असे! भट कुटुंबाला चव जेवढी चांगली कळते तेवढीच माणसंही छान कळतात! ह्याचा पुरावा म्हणजे इथे काम करणारे लोकं! सर्व जण तुमची आपुलकीनं चौकशी करतील, हसून ऑर्डर घेतील आणि प्रेमानी वाढतील! त्यामुळे आपण 'हॉटेल नावाच्या घरीच' जेवायला गेल्याचा फील येतो! अशाच गप्पांमध्ये वेटरकाकांनी सांगितलं रावस ग्रीन करी घ्या, नक्की आवडेल!!
ऑर्डर दिली,ग्रीन करी आली!! पेदावन सारखीच ह्यावेळेस एकदम 'फॅन मुमेंट'झाली ती ग्रीन करी बरोबर! अशक्य वेगळी चव आणि महाबळेश्वरपेक्षा ही जास्त हिरवी! अजब रावस कि गजब कहाणी!!! आपण एकदम फिदा!!   

थोडया वर्षानी 'फिश करी राईस'नी कर्वे रोडला SNDT जवळ २री ब्रॅन्च सुरु केली. म्हणजे आपल्या एरियात!! जाता येता शॉर्ट विझिट सुरु झाल्या!! कर्वे रोडवर पेट्रोल भरायला गेला कि स्वागत १ तासानी घरी येतो... आणि १ लिटर पेट्रोल भरायला साधारण ४००-५०० रुपये लागतात! असा हिशोब घरच्यांनी समजून घेतला होता!! 
तिथेच ह्यांनी 'स्पेशल थाळी' सुरु केली .. साधारण ६०० रुपये आणि बोल्ड मध्ये लिमिटेड लिहिलं होतं!!  एवढे पैसे द्यायचे आणि लिमिटेड खायचं?? अशी शंका पोटाच्या डाव्या कोपर्यातून उपस्थित करण्यात आली! पण थाळी आल्यावर थक्क झालं!!आपण अनलिमिटेड थाळी मध्ये ही  जेवढा खाणार नाही तेवढा ह्यांनी लिमिटेड थाळी मध्ये आणून दिलं होता!! माशाच्या ४ टाईपच्या  होत्या!! विषय कट !!! थाळी संपवल्यावर पोटाचा एकदम सैराट झाला!!! हाऊसफुल्ल!!! बाहेर येऊन SNDT कॅनलवर शत पावली मारणं मात्र जरुरी होतं!


नुकतीच  'फिश करी राईस' नी ८ वर्ष पूर्ण केली, इतक्या दिवसात लाखो ग्राम प्रोटीन्स,कॅलरीज आणि अनलिमिटेड सॅटिसफाईड ढेकरा आम्हाला पुरवल्याबद्दल आपण त्यांचा ऋणी राहणार!! 

बर्थडे त्यानिमित्त त्यांना आपल्या कि-बोर्डद्वारे शुभेच्छा देण्याचा विचार पोटात आला...म्हणून हा सारा प्रपंच!!!  हैप्पी बर्थडे ,'फिश करी राईस!!

मुंबईचं फेमस सी फूड रेस्टोरंट पुण्यात सुरु होतंय असं ऐकलं ...पण माझ्यासारख्या खवय्यांसाठी  'फिश करी राईस' हे नेहमीच या  बिन पायाच्या शर्यतीमध्ये आघाडीवर राहील!! 

-- स्वागत पाटणकर!

Tuesday, April 18, 2017

एक मँगो,वन बाय टू!!

आजकाल सोशल मीडियामुळे कधी , कुठं , काय पोस्ट बघून आपला मूड चेंज होईल सांगता येत नाही.. आजचीच गोष्ट बघा, सोमवार सकाळ.. म्हणजे आयटी कामगारांचा अगदी कष्टी आणि सर्वात दुखी दिवस.. त्यामुळे सकाळ सकाळ त्याच त्रासातून जात असताना साईड बाय साईड ,सवयीप्रमाणे इंस्टाग्राम उघडलं आणि ध्यानीमनी काही नसताना समोर आला- आमची खव्वयी मैत्रीण Gauri Deshpande नी पोस्ट केलेला 'सुजाता मँगो मस्तानी चा फोटो'
आणि काय चमत्कार, मंडे मॉर्निंगच्या लो वातावरणात अचानक चैतन्य सळसळू लागलं, सुरु असलेल्या मिटींग्स मध्ये मी जरा उत्साहात येऊन बोलायला लागलो.. मिटिंग मध्ये ब्रेक झाला आणि मी पुन्हा तो फोटो पाहिला.. सुजाता मस्तानीचा...!! त्यानंतर मीटिंग सुरु झाली, बराच वेळ चालली आणि संपली.. पण मी सुजाताच्या आठवणीतच पूर्णपणे रमलो होतो!
सुजाता आणि आपली ओळख तशी जुनी. साधारण ४-५ वर्षाचा असताना आई-बाबा आणि Dilip Madhukar Belekar काका ह्यांच्याबरोबर मी पेठेत गेलो होतो आणि तेव्हा सुजाताशी आपली ओळख झाली, पण ती तेवढ्यापुरतीच... सुजाताची खरी 'सवय' जी लागली ती कॉलेज मधेच... आमचे एक स्नेही ज्यांना कोंबडी, दारू अशा कशाचीच सवय नाही, असे - रोहन बोरावके , ह्यांना सुजाताचं मात्र फार मोठं व्यसन ..अगदी शाळेपासून!!! लहान बाळाला जसं लॉलीपॉप दिसल्यावर होतं एक्साक्टली तसंच इंनोसन्ट आनंद बोरवक्याच्या चेहऱ्यावर दिसत असे. ११-१२वि मध्ये असताना आम्ही वैशालीमध्ये ब्रेकफास्टला गेलो,तेव्हा आत शिरता शिरता समजलं वैशालीच्या गल्लीत सुजाता ची नवीन ब्रँच सुरु झालीये, आमचा बोरावके एकदम वेडापिसा झाला आणि साहजिकच पावलं वैशालीला डिच देऊन सुजाताकडे वळली..दोघांनी सकाळी १० वाजता १-१ मस्तानी मारली... पण समाधान झालं नव्हतं. खिसा तपासला तर दोघांकडची सुट्टी नाणी मोजून अवघे २० रुपये होते.. आम्ही त्यामाणसाला हात पाय जोडून खूप विनंती करून हाल्फ मस्तानीचं वन बाय टू द्यायला लावली .. तेव्हाच कळलं सुजाताला भेटायला वेळ काळ बघावं लागत नाही... काही कारण हि असावं लागत नाही... इथूनच आमच्यात एक नातं सुरु झालं.
नंतर सुजाता आमच्या कोथरूड मध्ये पोचली.. अगदी घराशेजारी... फारच फ्रीक्वेन्टली भेटायला लागलो. हळू हळू हे व्यसन घरी पोहोचवL. आमचे बंधू Swanand आणि वाहिनी Janhavi ह्यांना पण सवय लावली. पण ते पुणेरी स्वभावाचे.. उगाचच आपलं वेगळं आहे असं म्हणत चॉकलेट, ड्राय फ्रुट मस्तानी वगैरे प्यायचे. पण आपलं तसं नाही. सुजाता म्हणजे मँगो मस्तानी हे आपलं समीकरण आपण कधी बदललं नाही. अगदीच क्वचित सिझन असला कि मँगोला दगा देऊन आपण सीताफळ मस्तानी घेत असे... पण ते तेवढ्यापुरतेच!! शेवटी मँगो ती मँगो!!
नंतर थोडा अजून वय वाढलं! शिंगं फुटली.. उगाच डाएट , कॅलरीचा वगैरे विचार करून फुल्ल मस्तानी घेणं बंद केलं. काही वर्षांनी लग्न करायचं ठरवलं. पण आयुष्यात फक्त सुरमई ,वैशाली,रुपाली ,सुजाता ह्यांच्यावरच प्रेम केल्यामुळे लग्न मात्रं अरेंजच करावं लागणार होतं. Rashmi
 भेटली, गांगलांच्या ह्या 'स्थळाला' गुडलक आणि सुजाता दोघंही खूप आवडतात हे ऐकल्यावर आपण होकार देऊन टाकला होता...आणि आता पाटणकरांची पुढची पिढी म्हणजे आमचे पुतणेसाहेब 'जय' वयाच्या ४ थ्या वर्षी मँगो मस्तानी मागून मागून खातो तेव्हा मात्र मनात कुठंतरी सार्थक वाटतं!!
हीच ती पोस्ट!!
हे सगळे असेच संपवलेले मस्तानीचे ग्लासेस, मनाच्या एका कोपऱ्यातून की-बोर्डवर येत असताना, पुन्हा एकदा मँगो मस्तानीनी काठोकाठ भरलेला ग्लास डोळ्यासमोर आला, सोबत चमचा आणि स्ट्रॉ पण घेऊन आला. त्याला हातात घेतल्यावर झालेला तो वेगळाच आनंद, अतिशय वेड्यागत खुश होऊन 'आधी चमच्यानी खाऊ का स्ट्रॉनी पिऊ' ह्यात झालेला भाबडा गोंधळ. मग सरळ एक घास चमच्यातून घ्यायचा, ज्या मध्ये कापसापेक्षाही अतिशय सॉफ्ट असं आईसक्रिम असतं आणि ते जिभेवर पडल्या क्षणीच विरघळून जातं आणि दुसरा सिप स्ट्रॉ मधून घ्यायचा. आणि हि अशा पद्धतींनी आपली सुजाताबरोबरची डेट सुरु ठेवायची!!! ग्लासमधला तो चविष्ट थिक शेक स्ट्रॉपर्यंत येता येता आईसक्रीमचा स्पर्श होऊन मस्त थंड होऊन जातो आणि मग थेट आपल्या गळ्यामध्ये विसावून जातो.. हे आईस्क्रिम आणि शेकची पार्टनरशिप आपला जीभ,गळा,पोट आणि साहजिकच आपल्या मनाला सुखावून जाते. मोदीजी जितक्या वेळा 'मित्रो' म्हणतात त्याहून जास्त वेळा आपण 'वाह, वाह' म्हणत मस्तानी संपवतो.
ग्लास मधली सुजाता ९९% संपलेली असते, पण तिच्या प्रेमात पडलेलं आपलं मन काही तिला सोडत नाही. आणि ग्लासमध्ये उरलेली ती १% एवढी मस्तानी संपवण्याचा हट्ट आपण करू लागतो. स्ट्रॉ घेतो आणि आईस्क्रीम विरघळून मधुर झालेला आणि ग्लास च्या तळाला गेलेला तो शेक , आपण अतिशय निरागस मनानी 'फुर्रर फुर्रर' आवाज करत संपवतो.. शेजारच्यांना किती घाण वाटलं तरी एक लक्षात ठेवायचं असतं.. 
मस्तानी पिताना मॅनर्स वगैरे कधीच पाळायचे नसतात!! बाकीचे गेले उडत... सुजाता आणि आपण एकमेकात गुंतायचं असतं, आपलं सुख आपणच एन्जॉय करायचं असतं!
पुढची मीटिंग सुरु व्हायच्या आधी एकच सांगतो , मिस यु सुजाता!!!!!!!
ता.क.- टेकनॉलॉजी खूप पुढं गेलीये, पण पुण्याबाहेर राहून पण सुजाता ची मँगो मस्तानी जेव्हा डेटा ट्रान्स्फर सारखी आपल्या कडे येईल तीच खरी प्रगती!!

LikeShow more reactions
Comment

Monday, April 10, 2017

जेव्हा जेव्हा पोटाबरोबर जिभेला पण खूष करायचं असेल तेव्हा 'Le Plaisir' नक्की!!


आजकाल फेसबूक, इन्स्टा मुळे लोक कोणाबरोबर आणि कुठे खातायत हे जगात कुठेही बसून आपल्याला कळत असत. आता लग्न झाल्यामुळे लोक कोणाबरोबर खातायत ह्यात फारसा इंटरेस्ट नसतो …. पण जन्माचा खव्वया असल्यामुळे लोक कुठे खातायत हे मला चेक करायला खूप आवडतं. गेल्या २ वर्षापासून मी 'feeling awesome @ Le Plaisir' असं बऱ्याच जणांना लिहिताना पाहिलंय … पहिले काही दिवस मला हॉटेलचा नाव 'ला' , ''ले' का 'लि ' आहे तेच कळत नव्हतं… पण नंतर तिकडच्या गोष्टींचे फोटो आणि reviews वाचून …एकदा जायला पाहिजे असा विचार मनात आला ….
परवा पुण्यात आगमन झाल्यावर साहजिकच कॉलेज च्या मित्रांचा भेटण्याचा प्लान झाला … जनरली असा भेटायचं ठरलं कि । "कुठे" ह्या मुद्द्यावर खूप चर्चा होते… पण ह्या वेळेस सगळ्यांनी Le Plaisir असा ५ मिनटात वगैरे final करून टाकलं… नेहमी ‘एस पिज’ मध्ये बिर्याणी ओढू किंवा रंगला पंजाब मध्ये बसू असा बोलणारं पब्लिक 'Le Plaisir' वगैरे कसं काय ठरवतायेत … प्रश्न पडलं मला !

थोडासा disappoint च होऊन मी Le Plaisir ला गेलो… गेल्या गेल्या बघितली ती waiting साठी असलेली भली मोठी line…. (ही line काहीच नाही…. आमच्या वैशालीत आणि गुडलक मध्ये ह्यापेक्षा जास्त line असते - असा पुणेरी विचार माझ्या मनात चाटून गेला). मी वरती number लावायला म्हणून restaurant मध्ये शिरलो… आणि आत गेल्या गेल्या मी तिकडे सुटलेल्या सुगंधा मध्ये actually डुबून गेलो… 'love at first smell' वगैरे काहीतरी झालं मला…मी mozzarella cheese च्या नदीत पोहोतोय , पास्त्याच्या बोगद्यातून चालत चाललोय , चीजकेक च्या गादीवर झोपलोय …असे काहीतरी animated दृश्य माझ्या डोळ्यासमोरून गेली… तेवढ्यात ती आतली cute शी मुलगी म्हणली ४५ min waiting… तो आत मध्ये येणारा वास control होत नव्हता… पण त्या वासानीच तासभर वाट बघायची शक्ती दिली… waiting area मधून आतली लोकं काय काय खात आहेत हे स्पष्ट दिसत होता… आणि ते बघण्यात १ तास कसा गेला कळला पण नाही! match सुरु व्हायच्या आधीच Plaisir नी six मारली होती!

finally आम्हाला आत बोलावल. इथे ऑर्डर द्यायची पद्धत वेगळीच. मेनू कार्ड वगैरे येत नाही. आतमध्ये एक blackboard वर सगळा मेनू लिहिलेला असतो तो वाचून तिकडेच ऑर्डर देऊन मग आपण बसायचं। मला आवडला हे …. वेगळं! अतिशय भूक लागलेल्या लोकांना आता आत आल्यावर वासानी सेम माझ्यासारखा अनुभव येत होता … लोकांनी रप्प्पाराप ऑर्डर द्यायला सुरवात केली… पास्ता (पिंक सॉस , नापोलीताना सॉस ) , माफिंस , चिकन क्रिस्पी वगैरे गोष्टी लिस्ट वर आल्या …. एकानी तर 'वरून तिसरा item द्या' अशी ऑर्डर केली… तो ऑर्डर घेणार्याला चक्कर येणं बाकी होता!

टेबल वर बसलो… पिंक सॉस पास्ता विथ चिकन… टोमाटो आणि क्रीम च्या सॉस मध्ये सुंदर केलेला पास्ता आणि त्यामध्ये अकंठ बुडलेल चिकन!! वा वा! जिभेवर ठेवल्या ठेवल्या रम्य वाटायला लागलं! २घास खाल्ल्यावर बायकोनी हळूच सांगितलं कि ती ऑर्डर तिची आहे!!! ते ऐकून मी माझा मोर्चा नापोलीताना सॉस कडे वळवला !! पिंक सारखाच दिसणारा सॉस । पण सुरवातीला आंबट लागणारा अचानक देसी मासाल्यासारखा लागायला लागतो आणि वेगळीच मजा आणतो. मग आले muffins! म्हणजे just sandwich! एक बन पावसारखा गोल ब्रेड! मधून कापलेला पण अतिशय perfect roast केलेला… butter मध्ये विरघळून जेवढा हवा तेवढा soft झालेला! त्याचा softness baghun आमच्या एका मित्रांनी 'अर्रे हि तर आंबोळी आहे ' अशी complement दिली ! काय बोलायचा आता!

व्हाईट सॉस चिकन , Veggies आणि Cheddar Omelet अशी अनेक muffins आम्ही खाल्ली Cheddar Omelet Muffin चा खास उल्लेख करावा लागेल.
म्हणलं तर साध omelet sandwich! soft गादीवर पिवळा ड्रेस घालून बाहुली बसल्यासारखी ते omelet muffin आपल्या टेबल वर येत! जिभेवर ठेवल्यावर विरघळणार फ्रेंच style omelet आणि ब्रेड मधून उतरणारी बटर ची टेस्ट!! व!अफलातून कॉम्बो!

हे सगळं खाताना जोश्यांनी मागवलेलं क्रिस्पी चिकन आलं ! कोंबडी ला ह्या रूपात कधीच पाहिला नव्हता! तिला अतिशय नाजूक हाताच्या कारागिरांनी सजवला होता… जेवढी दिसत होती मस्त तेवढीच मनाला आनंद देत देत पोटापर्यंत पोचत होति… हहि एक नक्कीच स्पेशल डिश आहे … highly recommended !
चव तर बाप आहेच…. पण presentation च्या पेपरमध्ये Plaisir नी Top केलंय! तुम्हाला भूक नसेल तरी त्यांच्या दिशेस नुसत्या बघून पोटात कावळे ओरडायला लागतील
ह्या restaurant चा प्रॉब्लेम हा आहे कि इकडचं सगळंच आवडतं, छान वाटत! आपली डिश खाल्ली दुसर्याची पण खावीशी वाटते… असा करत करत आपण खूप खातो…. पण dessert!!! Dessert शिवाय तुम्ही बाहेर गेलात तर Plaisir चा अपमान असेल.

Macaroons… क्रीम बिस्कीट सारखी दिसणारी ही क्युटशी गोष्ट…. प्रत्येकांनी खायलाच हवी अशी! देसी भाषेत नानकटाई च्या आसपास जाणारी पण खूप वेगळीच चव असणारी! हा प्रकार लोकांचा खूप लाडका आहे हे लक्षात आलं… कारण Macaroons संपले! so लवकर जा. Macaroons च्या जोडीला चीजकेक तर by default होतेच! सुरवातीला दोघात एक खाऊ म्हणणारे लोक…आता २-२ चीजकेक खात होते! ईथेच सर्व आलं!!

finallly! एवढं सगळं खाऊन… तृप्त होऊन आम्ही निघालो… पुन्हा visit नक्की! प्रभात रोड वर restaurant काढून त्यांनी एक number काम केलं आहे!!
तुम्ही पण भेट द्या…. जेव्हा जेव्हा पोटाबरोबर जिभेला पण खूष करायचं असेल तेव्हा 'Le Plaisir' नक्की!