Friday, October 27, 2017

गच्ची! - नॉट जस्ट अ टिझर रिव्यू!

गच्ची! - नॉट जस्ट अ टिझर रिव्यू!

काल  एक मूवी टिझर पाहिलं...सिनेमाचं नाव गच्ची! गच्ची?? कोणी कधी ह्या नावानं सिनेमावगैरे काढेल असं वाटलं नव्हतं....  पण हा तरुण-नवा कोरा दिग्दर्शक नचिकेत सामंत, 'गच्ची' हे असं वेगळं....पण आपल्या जवळचं असणारं नाव देऊन  पहिली राउंड आलरेडी जिंकलाय! पिक्चरची उत्सुकता मेजर वाढते हो आशा टायटल नी!

टिझर बघायला इथे क्लिक करा

साधारण ६० सेकंदाचं हे टिझर.... पण त्या ६० सेकंदात चाळ लाईफ, मध्यमवर्गीय प्रॉब्लेम्स  म्हणजेच कर्ज  आणि ते फेडायचं टेन्शन... इथपासून ते... डायरेक्ट गच्चीवरून उडी मारायला निघालेली 'उच्च' वर्गातली (वाटणारी) मुलगी ...आपल्या निर्णयावर ठाम न रहाणारी ... एक अर्क मुलगी... अशा काही गोष्टींचा अंदाज हे टिझर आपल्याला देतं. नायक नायिकेची पहिलीच भेट झालेली जागा म्हणजे गच्ची आणि सम्पूर्ण स्टोरी ह्या गच्ची भोवती राहणार असं वाटून जातं. तरुण मुलांना टेन्शनमुळे होणारा डायबेटीस आणि त्या गोष्टीचा सतत विचार करणारे ते .. अगदी सकाळच्या 'महत्वाच्या कामात' सुद्धा मध्यमवर्गीय मुलं कर्जाचाच टेन्शन घेणारे... अशा सीन्समधून आजच्या तरुणाच्या ,आजच्या प्रॉब्लेम बद्दल बोलणारा हा पिक्चर इंटरेस्टिंग असेल असं वाटतंच पण हे सगळं गमतीदारपणे आपल्यासमोर मांडलं जाईल लगेच समजतं ते - हिशोबाच्या कागदावर कर्ज देणाऱ्या  जगतापची काढलेली स्मायली, चहावाल्याचा कावळा आणि गच्चीवर झालेले अभय - प्रिया मध्ये खुसखुशीत संवाद.ह्या मधून ! नवाकोरा नचिकेत सामंत  वेगळी गोष्ट खास त्याच्या वेगळ्या स्टाईलने सादर करणार असं एकूणच दिसतंय.त्याबद्दल त्याच अभिनंदन!




आता जरा वळूयात कलाकारांकडे. सध्या इंडियन क्रिकेट टीम आणि मराठी फिल्म इंडस्ट्री हे एकदम सेम फेज मधून जात आहेत... इंडियन टीमला कसं एका मागोमाग एक से एक म्हणजे पांड्या, कुलदीप, राहुल असे  यंग आणि  टॅलेंटेड हिरोज मिळत आहेत.... अगदी तसंच आपल्या मराठी इंडस्ट्रीच... अलोक , अमेय , निपुण आणि आता हा त्यांच्याच लाईनमधला , एकदम ऑलराऊंडर आणि गुणी कलाकार अभय महाजन! अभय आपल्या पुण्याचा आणि माझ्याच बीएमसीसी कॉलेजचा.. त्यामुळे अर्थातच त्याच्याबद्दल एकदम सॉफ्ट कॉर्नर. पण हे सगळं कौतुक हे त्या सॉफ्ट कॉर्नरमुळे नाही पण त्यांनी प्रूव्ह केलेल्या टॅलेन्टमुळे. ' रंग पतंगा ,सीआरडी ' हे पिक्चर आणि 'दळण , बिनकामाचे संवाद ' सारखी तगडी नाटकं ... अशा उच्च दर्जाच्या  नेट प्रॅक्टिस मधून तयार झालेला धडाकेबाज बॅट्समन म्हणजे अभय महाजन ..आणि आता त्याला वेल डिझर्व्हड लीड रोल मिळालाय..  आनंदाची गोष्ट म्हणजे साहेब एकदम तंतोतंत शोभलेत त्या रोलमध्ये! 'तो गोंधळलेला, टेन्शन घेतलेला , डायबेटीस आणि डायबेटिसचाच विचार करणारा.... ' असा तो नायक आणि त्या रोलमध्ये एकदम समरस होऊन गेलेला  महाजन बघून खूप भारी वाटत! महाजनच्या आवाजात प्रेक्षकांना लगेच आपलंस करून घ्यायची एक शक्ती आहे. त्याचाच तो खुबीने वापर करत त्याच भोळेपण तो ६० सेकंदात टीझरमधून दर्शवतो...  "अशी कोणाची ..... हॉबी असते का" "डायबेटीस आहे, जखमा बऱ्या होत नाहीत' एकदम भोळा पण निर्मल विनोद निर्माण करणारा असा हे 'हिरो' त्यानी रेखाटलंय... एकदम भरत नाट्य मंदिरवर तो ज्या प्रकारे फटकेबाजी करायचा अगदी त्याच पद्धतीत तो बिग स्क्रीनवर वावरतोय हे बघून खूप भारी वाटून गेलं.. त्याचं भोळेपण पोरींना वेडं करणार हे नक्की!

ह्या अशा भोळ्या माणसासमोर आहे  प्रिया बापट ... गच्चीवरून उडी मारायला निघालेली प्रिया बापट! मला प्रियाबद्दल लिहायला फारसं आवडतच नाही .... लिहायला घेतलं कि किती आणि काय काय लिहू असं होतं ... शाई संपेपर्यंत लिहिलं जातं ..\आज तर ती वझनदारमधल्या गोलूपोलु नंतर आज खूप दिवसांनी दिसली .. तेसुद्धा डायरेक्ट गच्चीच्या कठड्यावर उभी! पिंक ड्रेसमध्ये पुन्हा एकदा फ्रेश स्माईल आणि 'हॉबी आहे माझी' ह्या एकाच डायलॉगमधून अशक्य साठवलेला क्युटनेस घेऊन ती आपल्यासमोर वाहते!  आपण फक्त तिच्याकडे बघतच राहायचं! एक्सप्रेशन एवढे गोड ....  डायबेटिक नायकाची शुगर लेव्हल वाढत असेल ती हिच्यामुळेच .. एवढी आमची बापट गोड़! ह्या टीझरमध्ये ती  हार्डली १० सेकंड दर्शन देते...पिंकड्रेसमध्ये आपल्याला वेडं करते .... तुरुतुरु पळते  आणि २२डिसेंबरची वाट बघायला लावते!!!

गच्ची! रोजच्या जगण्यात आपण गच्चीच्या जवळ असतो... चपाछपी खेळणाऱ्या लहान मुलांपासून ते कॉलेजमध्ये लफडी करणाऱ्यांपर्यंत.... गाण्यांपासून शिव्यांमध्ये  गच्ची असते .... मन लावून अभ्यास करणाऱ्यापासून ते टवाळक्या करत पतंग उडवणाऱ्यांपर्यंत, सिगरेट ओढणार्यांपासून ते उडी मारणाऱ्यांपर्यंत.....  सकाळ सकाळ योगासनं  करणाऱ्या आजोबांपासून ते पापड वाळत घालणाऱ्या आजींपर्यंत अशा किती तरी वेगवेगळ्या प्रकारे गच्ची आपल्या जवळची झालेली असते आणि आपण तिच्या...अगदी कळत-नकळतपणे!  युवा दिग्दर्शक नचिकेत, अभिनेता अभय आणि प्रिया ह्या सर्वांचं युथफूल , नवीन एक मस्त असं  फ्रेश कॉम्बिनेशन घेऊन आलेली लँडमार्क फिल्मस् ची गच्ची अजून अजून उंच बांधली जाणार आणि त्यात अवॉर्डरूपी अनेक बाहुल्या येणार ह्याची खात्रीच वाटून गेलीये!

आपण यंदा ख्रिसमसला सॅन्टाला घेऊन जाणार गच्चीवर!! कारण आपली हॉबी अशीच असते! ---     स्वागत पाटणकर

Tuesday, October 24, 2017

त्या दोघी... ट्रीट फॉर फॅन्स!

त्या दोघी... ट्रीट फॉर फॅन्स!
     

      एका टेबलवर दोघीजणी समोरासमोर बसल्यात... त्यातली एक भारीतलं घड्याळ घातलेली, इंग्लिश पुस्तक वाचत 'मग' मधून कॉफी पिणारी ... तर दुसरी हिरव्या बांगड्या घालून, टिपिकल कप-बशीतून चहा पीत पीत लोकरीचा गोळा घेऊन वीणकाम करणारी.... दोन व्यक्ती पण एकदम भिन्न प्रवूत्ती... सचिन गुरवनी नेहमीप्रमाणेच कल्पकतेने तयार केलेलं .... कमीत कमी वेळात जास्तीत जास्त उत्कंठा वाढवणारं हे पोस्टर आज  इंस्टाग्राम वर पाहिल...चित्रपटाचं नाव - आम्ही दोघी! इंटरेस्टिंग पिक्चर वाटतोय असं मनात म्हणेपर्यंत ...स्क्रोल डाऊन करता करता नजर पुन्हा त्याच पोस्टरवर गेली  आणि ती तिकडेच थांबली.... डोळे मोठे झाले आणि जोरात कंठ फुटला...  त्या दोघी मधल्या दोघी म्हणजे -मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट! आर यु किडींग मी??? मुक्ता आणि प्रिया एकत्र... कसला बाप प्रकार आहे हा आयुष्यातला...जेवढा आनंद आमीर आणि शाहरुखला एकत्र बघायला झाला असता त्यापेक्षा जास्त खुश झालो आपण ... आम्ही दोघीचं पोस्टर बघून!दिग्दर्शक,कास्टिंग हेड, प्रोड्युसर जे कोणी हे 'कास्टिंग' केलंय त्यांना शंभर पैकी शंभर मार्क्स मी देऊन टाकले!


        "मला ही खूप आवडते" किंवा "ती कसली क्युट आहे" वगैरे असं बायकोसमोरसुद्धा आत्मविश्वासानी कोणाबद्दल बोलता येत असेल तर त्या म्हणजे मुक्ता आणि प्रिया... 
तसं बघायला गेलं तर ह्या दोघी एकत्रच माझ्या आयुष्यात आल्या... म्हणजे त्या माझ्या आयुष्यात आल्या पण मी काही त्यांच्यापर्यंत पोचलो नाही.. असो मुद्दा असा की साधारण १२-१३ वर्षांपूर्वी, जेव्हा मी बीकॉम ह्या गोंडस नावाखाली आयुष्यात काहीही करत नव्हतो तेव्हाच मुक्ता आणि प्रिया दोघी इंडस्ट्रीमध्ये सेट होत होत्या. आभाळमाया,फायनल ड्राफ्ट, देहभान वगैरे क्वालिटी प्रॉडक्टसमधून मुक्ता समोर येत होती , तिची छाप पाडून जात होती .... तर २००३च्या आसपास डायरेक्ट राजू हिरानींच्या मुन्नाभाई सिरीजमध्ये प्रिया थोडी का होईना पण दिसली होती, आवडून गेली होती. आणि तेव्हाच वाटून गेलं होतं ही मुलगी पुढे जाणार...  

त्या दोन-तीन वर्षात आमच्यात हे 'इंट्रो' सेशन झाल्यावर खरी मैत्री झाली ती मात्र २००८-०९ च्या दरम्यान... स्त्री कलाकार सुद्धा प्रेक्षकांना खदखदून हसायला लावू शकतो ते ही काहीही पाचकळ चाळे न करता... हे ताकदीने दाखवून दिलं मुक्ताने - एक डाव धोबीपछाडमधून. तोपर्यंत बऱ्यापैकी सिरीयस किंवा मॅच्युअर्ड व्यक्तिरेखा साकारणाऱ्या मुक्ताकडून ती 'सुलक्षणा' बघायला मिळणं म्हणजे एकचेहऱ्यावर खूप मोठं स्माईल आणणारं सरप्राईज होतं. सशक्त अभिनय म्हणजे फक्त प्रेक्षकांना सिरीयस करून त्याच्या डोळ्यात पाणी आणणं नव्हे... पण आपला तोच चेहरा घेऊन अभिनयाचं कौशल्य दाखवत लोकांना हसवणं देखील फार अवघड काम. मुक्ताने ते लीलया पेललं होतं ते सुद्धा विनोदाचे बादशाह अशोक सराफ समोर असताना! तेव्हाच आपली आणि तिची घट्ट मैत्री झाली... ! त्यानंतर मात्र तिनी पिक्चरला बोलवायचं आणि आम्ही पहिल्याच दिवशी जायचं हा अलिखित नियम होऊन गेला... 
नंतर नंतर तर ही इंडस्ट्रीची विराट कोहलीच होऊन गेलीय... टेस्ट, वन डे किंवा टी २० कुठल्या फॉरमॅटमध्ये कोहली फॉर्मात असतो अगदी तसच आमच्या मुक्ताचं ... भलतीच ऑलराऊंडर... टीव्ही , नाटक आणि सिनेमा सगळीकडे हिची जोरदार बॅटिंग आणि चौफेर फटकेबाजी!  जोगवा , आघात , मुंबई पुणे मुंबई, लग्न पाहावे करून , बदाम राणी गुलाम चोर ,डबल सीट , अलीकडेच आलेला गणवेश आणि हृदयांतर हे असे विविध प्लॅटफॉर्मवरचे सिनेमे, महाराष्ट्राच्या तरुण मुलांनासुद्धा डेली सोप बघायला लावणारी एका लग्नाची दुसरी गोष्ट आणि कब्बडी -कब्बडी , छापा काटा , कोडमंत्र अशी तगडी नाटकं घेऊन ती नेहमीच भेटायला येते आणि सवयीप्रमाणे निशब्द करून जाते! 
मुक्ताची घरी ओळख करून द्यायची गरजच नाही लागली.... बघतो तर काय घरात आई,बायको अशा सगळ्यांची लाडकी अशी ही मुक्ता. एकदा, कोथरूडमध्ये पी एन जी दुकानाबाहेर आई आणि बायकोला मुक्ता बर्वे दिसल्यावर त्यांनी बिनधास्त हाक मारली; मुक्तापण ग्रेटच लगेच थांबून ५ मिनटं बोलूनच पुढे गेली.. काय खुश झाल्या होत्या तेव्हा माझ्या घरातल्या बायका... घरी येता येता त्यांनी समोरच्या जोशी स्वीट्समधून आंबा बर्फी वगैरे आणली! ही अशी आमची मैत्रीण... एकदम हुशार,अष्टपैलू अशी घरातल्या सगळ्यांची लाडकी!



         एकीकडे बर्वे आणि दुसरीकडे त्याच काळात मैत्री (अर्थातच एकतर्फी) केलेली प्रिया  बापट! 'मी शिवाजीराजे...' मध्ये तिला फुल्ल रोल मध्ये बघितल्यावर मुन्नाभाई बघितल्या नंतरची प्रतिक्रिया खरी होणार ही खात्री पटली. ही मुलगी नक्कीच पुढे जाणार. क्युट, ग्लॅमरस ,सुंदर,अल्लड ,बाप डान्स  आणि एव्हढ्या सगळ्या गोष्टी असून अंगात भिनलेला अभिनय... काय अजब कॉम्बिनेशन... तेव्हा आवडलेली प्रिया एकदम जवळची मैत्रीण झाली ती अर्थातच नवा गडी नवं राज्य मध्ये! साधारण ४ वेळा वगैरे ते नाटक बघितलं. मस्तपैकी कॉलेजच्या कट्ट्यावर बसून तिच्याबरोबर 'कल्ला' करतोय कि काय असाच फील नाटक बघताना यायचा... कितीही वेळा बघितलं तरी समाधान होईना.. एकदा प्रयोग संपल्यावर भेटायला म्हणून मागे गेलो तर ही मुलगी प्रेक्षकांमधून तिला भेटायला आलेल्या आजींना वाकून नमस्कार करत होती.. विषय कट.. मनात भरून गेली राव ही! सेलिब्रिटी भाव खातात, माज करतात वगैरे वाक्यांना जोरदार फुली मारली होती प्रियानी! इतके दिवस ती फक्त आवडायची आता आपण तिला फुल्ल रिस्पेकट द्यायला लागलो होतो! काकस्पर्श,टाइम प्लिज, वजनदार वगैरेमध्ये ती भेटून गेलीच पण निवडक कलाकृतीच करायच्या ह्या तिच्या सवयीचा लै त्रास होतो बाबा...तिची वर्षानुवर्षे वाट बघावी लागते... आणि त्यामुळेच हिची साधी जाहिरात जरी टीव्ही वर लागली तर सगळं सोडून मी ते पूर्ण ३० सेकंद टीव्हीत गुंग होऊन जातो...  समोर असलेलं जेवण, बायकोनी सांगितलेलं काम हे सगळं आपण तेव्हा विसरून जातो.. शेवटी हा रिश्ताच एवढा पक्का आहे काय करणार! एवढं कॉन्सन्ट्रेशन अभ्यासात दाखवलं असतं  तर तुमचा पोरगा डॉक्टरवगैरे झाला असता असे डायलॉगसुद्धा आमच्या घरात ऐकू येतात!  
महाराष्ट्रा मधल्या कित्येक कपल्स मध्ये एक क्रॉस कनेक्शन बघायला मिळतं असं मला वाटतं.. ते म्हणजेच नवरे प्रियासाठी  वेडे आणि बायका उमेशच्या फॅन्स.. आमच्या घरात पण तसंच आहे!त्यामुळेच मला माहितीये , बायको किती ही राग दाखवायचा प्रयत्न करत असली तरी तिची देखील प्रिया तेवढीच लाडकी आहे...
मागच्या वर्षी आलेला वजनदार तर तिनी मला बघूनच केला कि काय असं वाटलं... गुबगुबीत माणूस सुद्धा  किती गोड आणि क्युट असतो हेच तिनी दाखवलं आणि माझ्यासारख्यांच्या बाजूनी कोणीतरी उभं राहिलं असंच वाटलं.. पण हीच प्रिया तिच्या सोशल मीडिया अकाउंट वरून फिटनेस अवेअरनेस करत असते... आय एम शुअर कि ते बघून माझ्यासारखेच अनेक जण व्यायामाकडे वळत असणार! मैत्रीण असावी तर अशी!

तर अशा ह्या दोघी.. मुळातच भिन्न प्रवृत्तीच्या ह्या आता स्क्रिनवर पण भिन्न भूमिकेत. एक भन्नाट जुगलबंदी बघायला मिळेल असं एकूणच वाटतंय... म्हणजे पूर्वी स्टीव्ह वॉ आणि अँब्रोज ...किंवा स्टेफी ग्राफ आणि मोनिका सेलेसची  मॅच सुरु असताना प्रेक्षक गुंग होऊन जायचे ... हा गेम असाच सुरु राहावा, संपूच नये  असं काहीसं प्रेक्षकांचं व्हायचं. इतका क्वालिटी - उच्च दर्जाचा खेळ बघायला मिळायचा की तो संपून जाऊच नये असं वाटायचं ... असंच काहीसं इंडस्ट्री मधल्या टॉप अशा ह्या 'दोघी' बघताना प्रेक्षकांचं होईल असं मला फार वाटतंय... दोघींचा स्क्रीन प्रेसेन्सच इतका जब्राट असेल कि ते बघतच राहावंसं वाटेल... संपूच नये असं वाटेल , पुन्हा पुन्हा बघावंसं वाटेल पण त्यासाठी अजून ४ महिने वाट बघायला लागणार... प्रतिमा जोशी ह्यांचं हे पाहिलंच दिग्दर्शन...  बर्वे आणि बापट अशा पॉवरफुल शस्त्र घेऊन पहिल्याच बॉलवर सिक्सर मारतील हीच प्रार्थना!

अशा ह्या दोघी... एकतर्फी का होईना पण माझ्या मैत्रिणीच त्या... नेहमीच भेटून निखळ आनंद देणाऱ्या ,रडवणाऱ्या,हसवणाऱ्या, खूप गप्पा मारणाऱ्या अशा ह्या दोघी... आता पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन वर दिसणार आहेत ... 23 फेब्रुवारीला बायकोबरोबर जाणार आपण ..चक्क मैत्रिणींना भेटायला! एक विशेष वॅलेंटाईन्स वीक (थोडासा लेट पण ग्रेट)असणार ए हा!  -
स्वागत पाटणकर 





       

Sunday, October 15, 2017

साखरेपेक्षा जास्त गोड़ ...अशी ही साखर खाल्लेली माणसं!!

साधारण ९४-९५ ची गोष्ट असेल... संगीतकार राहुल रानडेचे सासरे श्री गानू आणि आम्ही एकाच बिल्डिंग मध्ये राहायचो... एकदा असंच तो मोहन गोखलेना घेऊन त्यांच्याकडे आला होता. आमच्या मोठ्या बंधूना ही खबर लगेच लागली आणि अख्ख्या बिल्डिंगभर  "योगी आलाय - योगी आलाय" करत ओरडत सुटला ... मी सुद्धा लगेच हातातल्या सगळ्या गोष्टी टाकून खाली गेलो...मिस्टर योगी कुठे दिसले नाहीत, मग डायरेक्ट गानूंच्या घरात आम्ही शिरलो... (हो हो तेव्हा असं शेजारांकडे वगैरे लोकं जायची)!  गानूंच्या घरात घुसल्यावर, आमच्या एवढाश्या चेहऱ्याचा एवढा मोठा 'आ' झाला पण तरी त्यातून काहीही शब्द बाहेर पडत नव्हते...नुसतेच बघत बसलो.... समोर उभे होते मिस्टर योगी ! एकदम मोहन गोखल्यांसारखे...  नाही नाही समोर उभे होते मोहन गोखले... डिट्टो मिस्टर योगी!! अवाक झालो होतो, टीव्ही वर बघून ज्यांचा फॅन झालोय असं कोणाला तरी आयुष्यात पहिल्यांदाच  प्रत्यक्षात बघत होतो... गोखले माझ्या वडलांच्या वयाचे असतील तेव्हा पण कसले यंग आणि डॅशिंग दिसत होते ..त्यांचे ते चकाकदार डोळे माझ्याकडे फिरवून म्हणाले - काय रे, पकडू का तुला?? हाहा !! २ मिनटात भारी सुद्धा वाटलं आणि फाटलीसुद्धा! त्यांना लक्षात आलं ते ...लगेच केसांवरून हात फिरवून  एक मस्त स्माईल दिली मला आणि मग त्यांनी मोठ्या माणसांशी गप्पा सुरु ठेवल्या. काय काय कडक वाटत होतं त्या गप्पा ऐकायला.. कळत काहीच नव्हतं , पण ऐकायला भारी वाटत होत... स्पष्ट  उच्चार आणि एखाद्याने आजारी आईची काळजी घ्यावी अगदीच तशाच काळजीने, जबाब्दारीनी प्रत्येक शब्द उच्चारला जात होता! मुग्ध होणे म्हणजे काय ह्याच्या अनुभव १० मिनिटाच्या त्या भेटीत गोखले सरानी दिला! मिस्टर योगी, माफीचा साक्षीदार अशांमुळे मी त्यांचा फॅन होतोच, पण १० मिनिटाच्या भेटीमुळे अजून जास्त फॅन झालो....

तसंच अगदी त्यांची बायको, शुभांगी गोखलेंबद्दल....डेली सोप्स किंवा बाकीच्या सुद्धा मालिका बघायला कधीच इंटरेस्ट नसायचा... पण जेवायच्या वेळेला आई त्या सासू सुनेच्या अति कंटाळवाण्या सिरियल्स लावून ठेवायची ....नकोसं व्हायचं तेव्हा पण त्याला एक अपवाद होता ... अशी एक सिरीयल जी आठवणीनी मी स्वतःहून लावायचो... श्रीयुत गंगाधर टिपरे....  आणि त्यातल्या शुभांगी गोखले- कमाल.... केवळ कमाल!!! आपल्या मराठी आया कशा असतात, कशा वागतात, कशी काळजी करतात, धावपळ करतात, कसा घरातल्या सगळ्यांनाचा सारखा विचार करतात , सगळ्यांचं ऐकतात कोणालाही न दुखावता .... ते एगझॅक्ट टीव्हीवर आणलं शुभांगी गोखले ह्यांनी ... गोड चेहरा, बोलण्याची एक विशिष्ट स्टाईल आणि स्क्रिन्वरचा फ्रेश वावर ह्यामुळे त्या मनाला पटून गेल्या होत्या ... अक्खी टीमच चांगली होती पण समहाऊ शुभांगीताईंच जरा जास्तच आवडल्या ..आणि त्यामुळेच त्यांचं 'हीच तर प्रेमाची गम्मत आहे' ह्या नाटकाचा पहिला प्रयोग काय मी सोडला नाही....ह्या बाईचं विनोदाचं टायमिग सुद्धा अफलातून आहे हे लाईव्ह अनुभवायला मिळालं... .. आणि आता अगदी आईबाबांच्या पावलावर पाऊल ठेवणारी सखी.. अतिशय सुंदर अशी फोटोग्राफर असलेली, दिल दोस्ती मधून अगदी घराघरात पोचलेली , लोकांच्या मनात बसलेली सखी म्हणजे  कमालीची ऑल राउंडर ... स्वतः एका नाटकाची निर्मिती करून , त्यात दिल दोस्ती पेक्षा वेगळा रोल करून ..मराठी माणूस रिस्क घेत नाही असा कोणी म्हणलं तर त्याला सखी च उदाहरण द्यायला काहीच हरकत नाही. तिला इंस्टाग्राम फेसबुक वगैरे वर फॉलो करतोच आहे.. आणि आता माझं लग्न वगैरे झालाय नाहीतर मुंबईपर्यंत सुद्धा फॉलो करायला मागे पुढं पाहिलं नसतं.. सखी, शुभांगी आणि मोहन अशी ही मराठी इंडस्ट्रीमधली एक परिपूर्ण , गुणवान फॅमिली सदैव क्वांटिटीपेक्षा क्वालिटी कडे बघणारी ... माझ्यासारख्या प्रेक्षकांसाठी ही फॅमिली मनात कायमच घर करून राहिलीये......

एकीकडे अशी एक फॅमिली जिचा मी वेड्यासारखा फॅन आहे ....आणि दुसरीकडे साक्षात दामले सर ... ज्यांच्यासाठी माझी अक्खी फॅमिली ही ऍक्च्युली वेडी आहे! 


प्रशांत दामले.. काय बोलायचं ह्या माणसाबद्दल....  ह्या माणसामुळे किती गोड क्षण आम्हाला आठवणींच्या कप्प्यात साठवता आले आहेत.
जनरली शाळकरी मुलांना थोडी अक्कल यायला लागली कि त्यांना शिंग फुटायला लागतात. आमच्या घरीपण तसंच होतं..आम्ही दोन भाऊ शिंग फुटलेले... त्यामुळेच हॉटेल, लग्न ,मुंजीवगैरे अशा कुठल्याही कौटुंबिक ठिकाणी आईबाबांबरोबर जायचं म्हणलं कि आमची तोंडं वाकडी व्हायची...वाट्टेल ती कारणं देऊन आम्ही त्यांच्याबरोबर जायचं टाळायचो. पण अशा ह्या आमच्या घरातल्या ४ लोकांना एकत्र कोणी आणत असेल तर ते म्हणजे फक्त प्रशांत दामलेच नाटक... त्यांच्या नाटकाच्या रिपीट ऑडियन्समध्ये आम्ही ४घे नेहमीच असायचो...   आय थिंक 'लेकुरे उदंड झाली' ह्या नाटकापासून आमची सुरुवात झाली होती, मी अगदीच ८-९ वर्षाचा असल्यामुळे मला नाटकाबद्दल फ़ारस काही आठवत नाही पण दामलेंचा तो हसरा चेहरा लक्षात राहिला....  आणि हा हसरा चेहरा आपल्या चेहऱ्यावर हास्य अनु शकतो ह्याचा अनुभव आला तो 'बे दुणे पाच' ह्या नाटकात! दामले आणि परचुरे अशी एक विशेष जोडी आणि त्यात दामल्यांची अनलिमिटेड एनर्जी... माझ्या अंदाजे साधारण १००च्या आसपास 'एन्ट्रीज' असतील त्यांच्या त्या नाटकात ... कसं काय लक्षात ठेवून ते सगळं मॅनेज करायचे देव जाणे! असो, सांगायचं मुद्दा असा कि तिथपासून सुरु झाली त्यांच्या नाटकाची वाट बघायला सुरवात... मग "गेला माधव कुणीकडे', 'एका लग्नाची गोष्ट', ' ४ दिवस प्रेमाचे'वगैरे नाटकांची पारायणं केली आम्ही चौघांनी एकत्र.... 

दामल्यांमुळेच खूप सोनेरी क्षण एक फॅमिली म्हणून आम्हाला एन्जॉय करता आले. तो  आईबाबांबरोबर एकत्रितपणे घालवलेला वेळ हा किती सुखकारक आणि महत्वाचा होता हे आता मला फॅमिलीपासून लांब राहून कळतंय! 

दामलेंची नाटकं म्हणजे कधी नाटक वाटलीच नाहीत.. हा माणूस स्टेजवर उभा राहून आपल्याशी गप्पा मारतोय कि काय असाच वाटायचं... आणि ते तसं प्रुव्ह पण करायचे त्यांचा प्रेझेन्स ऑफ माईंड दाखवून ... एका लग्नाची गोष्टचा प्रयोग सुरु होता.  प्रशांत सर बायकोवर भांडण होतं म्हणून १ -२ -३ आकडे म्हणत विंगेत निघून जातात असा सीन होता.. ते ६ म्हणून विंगेत जाणार तेवढ्यात माझा भाऊ प्रेक्षागृहातून जोरात ७ असं ओरडला... आमच्या पुढे बसलेली लोकं जरा चिडली.. पण दामले...त्यांचं असं नाही ..प्रेक्षक म्हणजे मित्रच त्यांचा... विंगेत घुसत घुसत ते थांबले... अतिशय मार्मिक अशी एक्सप्रेसशन्स देऊन प्रेक्षकांडे बघून क्षणाचाही विलंब "तुमच्याकडे पण हे असंच घडतं का" ही एडिशन टाकली... स्टेजवर असलेल्या कविता लाड सकट अक्खा प्रेक्षागृह तुफान हसत होतं .. नंतर मग आम्हाला हा इंटरऍक्टिव्ह प्रयोग करायचा छंदच लागला... असंच एकदा गेला माधव कोणीकडे नाटकात प्रशांत सर "हो -हो - हो" असं म्हणायची ऍक्टिंग करत असतात पण तोंडातून शब्द न फुटता नुसती हवा बाहेर येत असते ..तेव्हा आम्ही बाहेरून जोरात 'हो' ओरडलो होतो.... त्यांनी लगेच ... "कोणीतरी २-२ बायकावालं आलंय  वाटतं असं उत्तर दिलं.. त्यांच्या ह्या अचूक टायमिंगचा  डाय-हार्ट फॅन झालो होतो कि जिथे तिथे तशी नक्कल करायला जायचो... मी बऱ्याच वेळा गमतीत म्हणतो माझं अभिनयातील करियर सुरु व्हायच्या आधीच बंद होण्यामागे प्रशांत दामले हेच आहेत! कॉलेजमध्ये एका सस्पेन्स नाटकाची प्रॅक्टिस सुरु असताना मी एका लग्नाची गोष्टींमधल्या स्टाईलने काही काही डायलॉग्स म्हणले होते! माझे ते 'प्रयोग' बघून त्यानंतर आजपर्यत मला कधी कोणीही ऑनस्टेज बोलावलं नाही!

शु कुठं बोलायचं नाही , जादू 'तेरी नजर अशी नाटकं आणि आमच्यासारखे आम्हीच सारख्या सिरियल्स ने नेहमीच आपल्याला हसवत राहिले.... मायबोली चॅनल वर शु कुठं बोलायचं नाही जितका वेळा दाखवलं जायचं ते तितक्याच वेळा बघितलं जायचं.... आमच्यासारख्या आम्हीच सीरियलमध्ये तर दामले आणि विजय चव्हाण ह्यांना स्क्रिप्ट देतच नसावेत , फक्त सीन चा आढावा देऊन कॅमेरा सुरु करत असावेत असं वाटायचं. ह्या सगळ्या हास्यगोष्टी असताना आम्ही दोघे राजाराणी , सुंदर मी होणार वगैरे नाटकांमधून त्यांनी आपल्या डोळ्यात पाणी सुद्धा आणलय... कपिल देव सारखेच आलराउंडर हे! ह्याच ऑलराऊंडरनी एकाच दिवसात ५ प्रयोगांची टेस्ट मॅच खेळली! एका दिवसात पाच प्रयोग!!!! आणि त्यासाठी सुद्धा त्यांनी बालगंधर्व निवडून आम्हा पुण्याच्या प्रेक्षकांचाच गौरव केला अशी भावना आमच्या मनात निर्माण झाली.. काय-काय नाही केलं त्या दिवशीची तिकिट्स मिळवण्यासाठी ... पहिला प्रयोग मिस झालाच पण शेवटी ज्या मित्राशी वाद आहेत त्याच्याकडे तिकिट्स आहेत समजल्यावर त्याला सॉरी वगैरे गोडगोड बोलून उरलेले ४ प्रयोग बघितले! अविस्मरणीय अनुभव होता तो ...विश्वविक्रमाचा साक्षीदार होता आलं!! त्यादिवशी त्यांनी गंधर्व चा प्रेक्षक हा खरा रसिक असतो, त्यांच्या रिअक्शन ह्या अभिनेत्याला शिकवून जातात वगैरे बोलल्यावर तर मी सगळ्यांना दामले माझं कौतुक करत होते वगैरे सांगत सुटलो होतो ... आई बाबानी कपाळावर हात मारून घेतला!     

बाप्पा आणि आमच्या कॉलेज च्या कृपेने त्यांना भेटायचा योग आला... सतरा अठरा वर्षांपूर्वी आमच्या बीएमसीसीच्या  ऍन्युअल फंक्शनला पाहुणे म्हणून प्रशांत दामलेंना बोलवायचं ठरलं आणि माझ्या ३-४ मित्रांबरोबर आम्ही सगळे भरत नाट्य मंदिरामध्ये गेलो.. प्रशांत सर मेक-अप रूम मध्ये बसले होते ....हिरवा रंगाचा कुर्ता आणि  लख्ख गोरापान चेहरा.... हे मेकअप रूम मध्ये केवळ जायचं म्हणून जात असतील असं तेव्हा वाटलं ... त्या फ्रेश चेहऱ्याला गरजच नाही हो मेकअप वगैरेची...  आम्हाला मेक अप  रूम बाहेर बघून लगेच आत बोलावलं , टेन्शनमय आमचे चेहरे बघून आमच्या पोटातला गोळा त्यांनी ओळखलाच  ..लगेच स्वतःच वय कमी करून एकदम कॉलेज मित्रासारखं बोलायला लागले.... फंक्शनची तारीख विचारली,  डायरी काढली आणि लगेच 'मी येतो, अव्हेलेबल आहे' सांगून टाकलं ...उगाच आढेवेढे नाहीत, नंतर सांगतो वगैरे फालतुगिरी नाही ... ते लगेच हो म्हणल्यावर त्यांना घेऊन यायची जबाबदारी घेण्यावरून आम्ही सगळे त्यांच्यासमोरच प्रेमळ संवाद घालायला लागलो... हो ना , प्रशांत दामले ना आपल्या गाडीतून कॉलेजमध्ये आणायचं म्हणजे फुल्ल हवा होणार हे माहित होतं ... पण दामले सर ते..त्यांना अशी आणणं सोडणं वगैरे स्पेशल ट्रीटमेंट नको होती..."मी माझा माझा येतो, त्या दिवशी वेळेवर पोचतो..." एवढंच सांगून माणूस मोठा झालाय तरी पाय जमिनीवर कसे ठेवावेत ह्याचाच उदाहरण दाखवलं.  

पुण्यात, आम्हा पुरुषोत्तम करंडक वाल्यांसाठी भरत नाट्य मंदिर म्हणजे खरोकरचंच एक मंदिर ...आणि त्यामुळेच एखाद्या वारकऱ्याला पंढरपूरमध्ये विठोबाचं दर्शन गेहटल्यावर जसा आनंद होईल , अगदी सेम तसंच मला भरत मध्ये प्रशांतसरांना भेटून झालं!!

आणि आता इतक्या वर्षांनी .. एक दिवस अचानक कोलोरॅडो मराठी मंडळानी दिवाळीमध्ये "साखर खाल्लेला माणूस" चा  डेनवरमध्ये प्रयोग होणार हे लास्ट वीक अनाऊन्स केलं... आणि शुभांगी गोखले जिच्या अख्ख्या फॅमिलीचा मी वेड्यासारखा फॅन आहे आणि दुसरीकडे प्रशांत दामलेंसारखा अवलिया ज्यांच्यासाठी माझी अक्खी फॅमिली ही ऍक्च्युली वेडी आहे अशा दोघांना प्रत्यक्ष बघायला मिळणार ह्या सध्या विचारानीच मला दिवाळी लै हॅपी होणार ह्याची प्रचिती आली....आणि लेखणीतून सगळी एकसाइटमेन्ट लिहून काढली... 

आमच्यासारख्या पुणेकरांना कोथरूडवरून आलेले बेसन लाडू आणि चितळ्यांची आंबा बर्फी खाल्ल्याशिवाय कुठलाही सण सेलिब्रेट होत नाही पण ह्यावर्षी ती चिंता नाही .. ही दिवाळी ह्या गोड सेलिब्रिटींनी आणलेल्या साखरेनी अजून गोड होणार हे मात्र नक्की!!