Thursday, June 6, 2019

फॅशन आणि मुलं???

फॅशन आणि मुलं???


 "अजिबात जमलेलं नाहीये हे डिझाईन.. अजिबातच...कुर्ता असा असतो का???" मी पूर्णपणे जोशात येऊन म्हणालो.

"काही हरकत नाही, ज्यांनी तो कुर्ता घातलाय त्यांना तो आवडलाय... शिवाय प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला आवडतेच असं अजिबात नाही..... आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मिळणाऱ्या चांगल्या-वाईट रिऍक्शनचा आम्ही आमच्या कामावर परिणाम होऊ देत नाही ...मनापासून काम करत राहतो" तिनी एक संयमी आणि सर्वबाजूनी सडेतोड उत्तर मला दिलं.

        ती म्हणजे तेजस्विनी पंडित! तेजाज्ञा नी म्हणजेच तेजस्विनी पंडित आणि अभिज्ञा भावे ह्यानी डिझाईन केलेला कुर्ता इंस्टा वर पहिला आणि सरळ आपलं मत ठोकून दिलं. कसं असत ना, ह्या सोशल मीडियावर आपल्याला काय वाटतंय, आपल्याला काय कळतंय, समोरच्यानं किती कष्ट घेतलेत वगैरे कुठल्याही गोष्टींचा विचार न करता सरळ आपलं अज्ञानातलं मत ठोकून देणं म्हणजे धैर्य असं अनेकांना वाटत असतं. आपलं पण परवा तसंच झालं. कुणी मला विचारलं नव्हतं खरंतर पण आपल्याला सगळ्यातलं सगळं कळतं हा भ्रम होता. तेजस्विनीच्या त्या एका उत्तरानी सणकून जमिनीवर आणलं.

        तिच्या त्या एका उत्तरात, मला समहाऊ त्या दोघींचे फॅशन डिझाईन नावाच्या गोष्टीमागचे स्पष्ट विचार आणि कष्ट दिसले.  कुठेतरी त्यांचा क्लीअर फोकस जाणवला. खरंतर दोघी प्रसिद्ध अभिनेत्री पण त्यांचा हा छंद - ही पॅशन त्यांनी सुरु ठेवली ह्याचं कौतुक वाटलंच आणि त्याच बरोबर आता त्या मुलांच्या डिझाईनमध्ये काहीतरी इनोव्हेटिव्ह करू पाहतायेत ह्याबद्दल लै भारी वाटलं.

      परवाच तेजाज्ञानी लॉन्च केलेले डिझाइन्स ..मेन्स कलेक्शन्स... उमेश कामत -अभिजीत खांडकेकर सारखे लोकप्रिय अभिनेत्याना घेऊन केलेलं फोटोशूट बघितलं...आणि 'बदलत्या जगाचा' अचूक अंदाज एकदम वेळेत लक्षात घेऊन तेजाज्ञानी आल्रेडी त्यावर काम सुरु केल्याची जाणीव झाली. नवीन काहीतरी ट्राय करणं, ट्रेंड फॉलो करणं किंवा ट्रेंड सेट करणं हे सगळंच आता मुलांनासुद्धा हवं असतं आणि त्यामुळेच तेजाज्ञाची इनोव्हेटिव्ह स्टेप आपल्या मराठी फॅशनमध्ये फार महत्वाची ठरणारे ह्याबद्दल आपल्याला एकदम खात्री पटलेली आहे.
         शाहरुखनी चेकस शर्ट घातले की आपण ते घालणार किंवा मोहब्बतेमध्ये स्वेटर खांद्यावर टाकला तसा आपणपण टाकणार ... ह्यापलीकडे आपल्याला फॅशनमधलं काही फारसं कळत नाही. त्यामुळे तेजाज्ञा विषयी जास्त टेक्निकली आपल्याला बोलता येणार नाही पण पैठणी हा प्रकार फक्त बायकांसाठी आहे ह्या विचारापलीकडे जाऊन त्यांनी मुलांसाठी काही अतिशय कडक कुर्ते डिझाइन केलेले आहेत ...ज्यात बॉर्डर आणि खिसा हे दोन्ही पैठणीचं आहे. त्यांच्या ह्या अशा वेगळ्या प्रयत्नांमुळेच आपल्याला त्यांचं लै कौतुक वाटलं.  शिवाय अजून एक बेश्ट गोष्ट म्हणजे 'वेल-बिल्ड' लोकांसाठी त्यांचे डिझाइन्स आहेतच पण त्याच बरोबर आमच्यासारखी 'पोटाची गर्भश्रीमंती' लाभलेल्या लोकांसाठीसुद्धा तेजाज्ञा वेगळं डिझाइन्स घेऊन येतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळे वेगवेगळे ट्राय करताना हे सगळं सिम्पल कसेल दिसेल ह्याची काळजी त्या घेतात. फक्त रॅम्पवर चालतानाच घालता येतील असे ते कपडे नव्हेत.

तुम्ही हे फोटोच बघा ना मग कळेलच तुम्हाला.... आय एम शुअर हे बघून तुम्ही पण एखादी ऑर्डर द्याल त्यांना!

तेजाज्ञा- https://instagram.com/tejadnya?igshid=q0c0ny2ujfn1




    रोज एक तीच मळकी जीन्स आणि टीशर्ट, इंटरव्ह्यूला फॉर्मल शर्ट पॅन्ट आणि लग्नात अनेक महागाचा शेरवानी (जो नंतर आयुष्यभर पडून राहतो) साधारण ह्या पलीकडे मुलांची फॅशनबाबतीतली नजर जात नसे .. 'आमच्या काळी'वगैरे लिहिणार होतो, पण जरा उगाचच म्हातारं झाल्याचा फील आला असता. तेंव्हासारखी "फॅशन आणि मुलं??" असं विचारणारी आत्ताची जनरेशन नाही. फक्त मुलगी 'हो' म्हणेपर्यंतच छान दिसायचं असं आजच्या पिढीचं नाही..... आणि मुलांच्या अशा पिढीला जे हवं ते देणारी अशी ही तेजाज्ञाची दृष्टी अजून अजून ब्रॉड होत जावो... ह्याच त्यांना शुभेच्छा!


जाता जाता----
क्रिकेट, सिनेमा आणि खाणं ह्या पलीकडे जाऊन लिहायचा विचारदेखील करू न शकणाऱ्या आमच्यासारख्या दगड माणसाला देखील फॅशन बद्दल लिहायला भाग पाडलं... इथंच तेजाज्ञा टीम जिंकलेली आहे 😊

 - स्वागत पाटणकर

No comments:

Post a Comment