Sunday, November 25, 2018

पहिला ताप

पहिला ताप


बाळ घरी येतं... घरातलं सगळं वातावरण बदलून टाकतं... बाळाची आई तिच्या नवीन रोलमध्ये पूर्णपणे शिरलेली असते.. तिची तयारीच ९ महिने आधीपासून सुरु झालेली असते...तिच्या प्रत्येक कृतीतून मातृत्व बाहेर येत असतं... बाळाचं रडणं, उठणं,झोपणं, दूध पिणं हे सगळं आई आणि बाळाच्या आगळ्या वेगळ्या कम्युनिकेशनमध्ये सुरु असतं... बाबा हे सगळं लांबून बघत असतो.. बाळाला कडेवर घेऊन खेळणं हे (आणि एवढंच) त्याचं काम झालेलं असतं.. खेळता खेळता बाळ रडायला लागलं कि तो बायकोकडे म्हणजेच आईकडे बाळाला देऊन मोकळा होत असतो... बाळाला नक्की काय हवंय हे आईलाच जास्त समजत असतं... अर्थात बाप हे सगळं जाणून असतो...पण तरी सुद्धा मनाच्या कोपऱ्यात तू कुठेतरी सारखा विचार करत असतो ... 'चिमुकल्याशी बॉण्डिंग होईल ना आपलं.....आईंसारखं!' त्याच्याकडे उत्तर नसतं... विचार झटकण्यासाठी तो पुन्हा बाळाशी खेळायला लागतो...


आणि एक दिवस खूप पाऊस पडतो... गारवा वाढतो.. अचानक झालेल्या बदलामुळे बाळ कुरकुर करायला लागतं... रडरड सुरु होते...डोळे कोमेजून गेलेले असतात.... गुबगुबीत दिसणारे गाल आत खोल गेल्यासारखे वाटतात... 'मला थंडी वाजतीये, पोट दुखतंय , कणकण वाटतीये'  बाळाला खूप काही आपल्याला सांगायचं असतं... पण ते चिमुकलं फक्त रडण्याचीच भाषा बोलत असतं... आपल्याला काहीच सुधरत नसतं.... थर्मामीटर  १०१ ताप दाखवतं ... आपल्याच पोटात गोळा येतो.. बाळाला जवळ घेऊन त्याच्या कानात 'औषध दिलाय राजा आता होशील बरा' एवढंच आपण सांगू शकतो... त्याला ते कितपत कळलंय हे समजत नाही... रडत रडत दमून अखेरीस तो झोपून जातो... बाळाला त्याच्या पाळण्यात ठेवलं जातं .... पण नाही....बाळाला झोपायचं असतं ते बाबाच्या कडेवरच... !रडत रडत ते पुन्हा बाबाच्या कडेवर येतं ...  बाबाला आता बाकी कुठली गोष्ट दिसत नसते... मोबाईल-व्हाट्सएप्प सगळं दूर फेकून दिलेलं असतं.. शेजारच्यांनी दिलेला चिकन रस्सा तो खात नाही.... टीव्हीवर सुरु असलेली भारत-पाकिस्तान मॅच तो बघत नाही ... कशात लक्षच लागत नसतं ..तो थर्मामीटर घेऊन दर १० मिनिटाला बाळाचा ताप चेक करत बसतो...  कुठल्याही छोट्याश्या आवाजानीसुद्धा बाळाची ती शांत झोप मोडू नये म्हणून खोलीत स्वतःला बंद करून टाकतो...बाळाची शांत झोप हेच त्याच नवीन आणि एकमेव टार्गेट असतं...त्या शांत खोलीत आता फक्त बाळाच्या श्वासाचा आवाज येत असतो... बापाला त्यातसुद्धा एक रिदम दिसतो.. काळजी आणि प्रेमानी तो बाळाच्या डोक्यावर हात कुरवाळत बसतो.... पाय चेपत बसतो... आणि अचानक लक्षात येत बाळानी झोपेतसुद्धा बापाचं एक बोट आपल्या मुठीत घट्ट पकडून ठेवलंय... बापाचे डोळे ओले होतात ...डोळ्यातलं पाणी बाळावर पडू नये म्हणून तो थोडी हालचाल करतो... बाळाची झोप डिस्टरब होते ...  इवलेसे डोळे उघडतात... उघडल्या उघडल्या त्याला बाबाचा चेहरा दिसतो...ते बघून बाळ खुद्कन हसतं ... आय एम इन सेफ हॅन्ड्स अशा टाईप रिअक्शन देऊन ते पुन्हा निश्चिन्त झोपून जातं... बाळाची भाषा बाबाला समजते ... खुशीने वेडापिसा होतो ... काही वेळानी बाळाचा ताप उतरतो ... बाळ पुन्हा खिदळायला लागतं .. आता बाळाला भातसुद्धा बाबाच्या हातूनच खायचा असतो...'हुं,हुं,आक ,आइन्क' हे त्याच्या शब्दकोशातले शब्द वापरून तो बाबाशी बोलत असतो... 

ते शब्द, ती एक रिअक्शन, ते एक घट्ट पकडलेलं बोट आज त्या बापाला 'बाबा' ह्या लेबल पलीकडे घेऊन जातं... खरं तर बाळाच्या जन्माबरोबर तो 'ऑन पेपर' बाप झालेला असतो... पण बाळाला आलेला पहिला ताप मात्र त्या बापामधल्या 'काळजी,भीती आणि माया' भावनांना वाट मोकळी करून देतो....बाळाच्या पहिला तापात मायाळू बाबाचा खराखुरा जन्म होतो!

 

Friday, November 23, 2018

तो आणि ते दोघे

तो आणि ते दोघे

1992 वगैरे सुरू असेल...तो आला... दिवाना बनून...
ऐसी दिवानगीवर वेड्यासारखा नाचला... अतिशय उत्साहात...कमालीची ऊर्जा घेऊन... पब्लिकला जिंकून घेतलं त्यानी...  एकदम दिवाना झालं पब्लिक... आम्ही पण त्यातलेच एक झालो...अगदी तेव्हापासूनच तो, त्याचा डान्स, त्याची गाणीं हे कॉम्बिनेशनचे आम्ही वेडे झालो...

पहिली किक अशी जोरदार मिळाल्यानंतर तो मग सुटला... बाझींगर, डर, कभी हां कभी ना पासून ते कुछ कुछ होता है आणि देवदास पर्यंत... गाडी फुल्ल जोरात असायची त्याची... आमच्यासारख्या हजारो, लाखो लोकांना तो आपलासा वाटायचा...आम्ही त्याच्या प्रेमातच होतो , आहोत... त्याच्या सारखं वागायचं बोलायचं... पूर्णपणे कॉपी करायचं हाच आमचा धंदा...त्याचा अभिनय, त्याची स्टाईल, त्याचा डान्स ह्या सर्वामुळे त्याचे सिनेमे बघायचोच पण अजून एक महत्वाच कारण होतं ते म्हणजे त्याच्या सिनेममधली गाणी... तेवढ्याच महान लोकांनी, खूप मेहनत घेऊन बनवलेली ती कानात मुरून जाणारी गाणी... सिनेमा रिलीज होऊन काळ लोटला तरी गुणगुणत बसणारी अशी त्याची गाणी...तुझे देखा तो ये जाना सनम काय आणि कल हो ना हो काय... त्या सुंदर चालींवर, त्या शब्दांवर फक्त तोच शोभून दिसेल अशी ती गाणी...

बरं, तेव्हा आमच्या मराठी इंडस्ट्रीत सिनेमे यायचे, बघितले जायचे पण गाणी काही फारशी लक्षात राहायची नाहीत... 2003-04 साल सुरू झालं...त्याच्या रेड चिलीज एंटरटेनमेंचा जन्म झाला.... आणि इकडे आपल्या मराठीत अग बाई अरेच्चा आला...सुपरहिट हिट झाला... "अग बाई! काय सुंदर गाणं आहे हे" मन उधाण वाऱ्याचे ऐकून लोकालोकांची हीच प्रतिक्रिया ऐकू यायला लागली... सरप्राईझींगली मराठी पिक्चर मधली सगळी गाणी लोकांच्या तोंडपाठ झाली होती...इतिहास घडला होता... 'त्यांची' एन्ट्री झाली होती.... रोमॅंटिक म्हणा, आरती म्हणा अगदी आयटम सॉंग घ्या... त्यांनी सगळं केलं होतं...  संपूर्ण मराठी जगात त्यांचं नाव पोचलं होतं.. ते लाडके झाले होते...आता आमच्यासारखे अनेक जण मराठी गाणी ऐकू लागले होते...
 तिकडे त्याचे सिनेमे येत होतेच ओम शांती ओम, माय नेम इज खान डॉन...केवळ, तो सिनेमात असायचा म्हणून सिनेमा पहिला जायचा आणि त्यामुळे त्याची ती गाणी आमच्या ओठांवर असायची... अगदी उलटं असायचं इकडे मराठीत... केवळ आणि केवळ ह्या दोघांनी गाणी केलीयेत, म्युझिक दिलंय म्हणून ते गाणं पाहिलं जातं, ऐकलं जातं आपोपाप पाठ होतं , सिनेमा बघितला जातो, गणपतीत डान्स केले जातात, अंताक्षरीत कधी एकदा ते अक्षर येतंय आणि त्यांचं ते गाणं म्हणतोय असं होतं... उलाढाल, साडे माडे तीन,नटरंग, जोगवा... किती तरी घ्या... मनात घर करून बसले हे दोघे...

सैराट झाला, अग्निपथ, पिके सगळं झालं... ते ग्रेट आहेत हे जगाला सांगायची गरजच नाही... अख्ख्या महाराष्ट्राची मान अभिमानानं उंच करतात ते दोघं...


पण आज रेड चिलीज साठीं ह्यांनी केलेलं गाणं पाहिलं... सिनेमाचं नाव झिरो... ह्या दोघांनी केलेलं गाणं सुरेल आहेच... खरं तर सैराट वगैरे झाल्यानंतर.... 'शाहरुखचा पिक्चर मिळणं' हा काही कौतुकाचा क्रयटेरिया नाही पण
ज्याला बघून हिंदीतली गाणी आम्ही बघायला लागलो तो आज ह्या दोघांच्या गाण्यावर नाचतोय, स्टाईल मारतोय, त्याची ती आयकोनिक पोझ देतोय...सर्रकन अंगावर काटा आला... खुशीनी!
ते गाणं बघताना म्युझिक बाय 'अजय अतुल' हे असं समोर आलं... एक भारी सरप्राईज मिळालं... त्याचे सिनेमे बघणं हे घरचं कार्यचं असतं आमच्यासाठी.... आज आमच्या घरच्या कार्याला घरच्याच मोठ्या लोकांचा अजय अतुलचा आशीर्वाद मिळाल्या सारखं वाटलं... !

स्वागत पाटणकर

Saturday, November 17, 2018

अंतर्मुख करणारा व्हर्च्युअल हॅपिनेस - पिंपळ!

       अंतर्मुख करणारा व्हर्च्युअल हॅपिनेस - पिंपळ! 

       आजकाल कुठलाही चांगला मराठी सिनेमा बघितला कि त्याचं कौतुक करताना 'बऱ्याच दिवसांनी चांगला चित्रपट बघायला मिळाला' , 'बऱ्याच दिवसांनी एवढा भारी पिक्चर आलाय नक्की बघा'  ही अशी काही वाक्य आपल्याला ऐकू येतात. बऱ्याच दिवसांनी??? म्हणजे नक्की काय .... खरं तर ह्या 'बऱ्याच दिवसांमध्ये' अनेक  छोट्या मोठ्या सुंदर कलाकृती आलेल्या असतात, खूप गुणवान लोकांनी केलेल्या सुंदर कलाकृती.... पण समहाऊ प्रेक्षकांपर्यंत त्या पोचलेल्याच नसतात...आज नेटफ्लिक्समुळे अशीच एक सुंदर कलाकृती बघायला मिळाली... अनेक वर्ष वहीमध्ये ठेवून वाळलेल्या पिंपळाच्या पानाइतकीच देखणी, नाजूक , बघितल्या बघितल्या मनाला भिडणारी कलाकृती... 'पिंपळ'!
       

        गोष्ट तशी एकदम साधी सरळ सिम्पल... बायकोच्या निधनानंतर तिच्या विरहात असलेला नवरा, परदेशी गेलेल्या मुलांचा बाप, नातवंडांबरोबर विडिओ चॅट करण्यात आपलं आयुष्य मानणारा आजोबा, बायकोच्या आठवणीत बुडालेला तरुण मुलगा, आईची इच्छा पूर्ण न करू शकल्याने पश्चताप होणार एक दुखी मुलगा.... ह्या सगळ्यांची विणलेली ही गोष्ट म्हणजे 'पिंपळ'. गम्मत म्हणजे ह्या सगळ्या वेगळ्या व्यक्तिरेखा नसून तर अरविंद नावाच्या साधारण ऐंशी वयाच्या आजोबांच्या आयुष्यात आलेले विविध टप्प्यांची ही गोष्ट. फारसे काही ट्विस्ट नाहीत, त्यामुळे हा सिनेमा संथ वाटू शकतो... वाटू दे... काही काही गोष्टी हळुवार अलगदपणेच आपल्यासमोर आल्या कि त्यांचा इफेक्ट एकदम खोलवर होतो. पिंपळचं पण सेम तसंच होतं.  अमेरिकेत असलेल्या मुलं ,सुना आणि नातवंडांबरोबर विडिओ चॅटच्या माध्मयातून वाढदिवस साजरा करणारे अरविंद आजोबा त्यांच्या बालपणीच्या आठवणीत रमतात आणि त्यांचं संपूर्ण आयुष्य आपल्यासमोर येत राहतं. हिरो-हिरोईन,व्हिलन अशा चाकोरीबद्ध सिनेमांच्या पठडीतला हा सिनेमा नाही. अर्थात ह्या कथेमध्ये व्हिलन नक्की काय आहे हा ज्याचा त्याचा प्रश्न!
      'स्थलांतर' ह्या विषयावर हा सिनेमा  बोलतो. लेखक गजेंद्र अहिरे आणि चिंतामणी अहिरे ह्यांना नक्की काय प्रश्न मांडायचे आहेत, कशाची मेसेज द्यायचा आहे, कुठल्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांवर सोपवायची आहेत हे एकदम परफेक्ट माहित असल्यामुळे ती क्लॅरिटी कथेमध्ये उतरली आहे. बेसिकली, स्थलांतर आपल्या  (नैसर्गिक) जीवनचक्राचा एक भाग बनलेलं आहे. आपलं राहतं घर, जन्म झालेलं गाव सोडून दुसरीकडे स्थलांतरित होण्याचा निर्णय कधीच सोप्पा नसतो, कोणाची गरज असते तर कोणाची ध्येय असतात .. त्या निर्णयामागे प्रत्येकाची वेगवेगळी कारणं असतात.. शिवाय हा प्रश्न फक्त भारतातून-परदेशात शिफ्ट होणाऱ्या लोकांपुरता मर्यादित नाही. कोणी गावाकडून शहराकडे जातं , कोणी एकाच देशात पण दुसऱ्या शहरात मूव्ह होतात.. आयुष्याचा एका विशिष्ट टप्प्यावर असे (तेव्हा बरोबर वाटणारे) निर्णय घेतले जातात. अशा वेळेस प्रॅक्टिकल होऊन जगताना भावना मनाच्या कोपऱ्यात धक्क्ल्या जातात.... पण उतार वयात मन कमकुवत झाल्यावर 'आपलं घर', 'आपली जागा' नक्की कोणती?? हा अनपेक्षित प्रश्न पडतो... तो खुपतो...वेदना देऊन जातो.  आईपासून लांब जाऊन घरटं बांधलेले आपण आणि आपल्या घरट्यातून  दूर उंच उडालेले आपली पिल्लं ह्यात नक्की कोण बरोबर, कोण चूक का दोघेही सारखेच... हे असे अनेक प्रश्न गजेंद्र अहिरे आपल्यासमोर अलगदपणे ठेवतात. अतिशय नाजूक विषय समोर मांडताना कसलीही घाई करत नाहीत. छोट्या छोट्या प्रसंगातून ते आपल्याला अरविंदच्या भूतकाळात घेऊन जातात. आपणसुद्धा त्या प्रसंगात, त्या संवादात एवढे सहज बुडून जातो कि अरविंदच दुःख, त्याच्या आठवणी, त्याच्या भावना ह्या सर्व आपल्याला आपल्याच वाटू लागतात हेच ह्या सिनेमाचं मोठं यश आहे.
    अरविंद झालेले दिलीप प्रभावळकर... दिग्गज माणूस.. आपण काय बोलायचं त्यांच्याबद्दल....अशक्य भारी आहेत ते.. प्रत्येक सीन, प्रत्येक डायलॉग, प्रत्येक इमोशन ....सगळं म्हणजे सगळं परफेक्ट! आज हा पिक्चर बघून त्यांना तडीक त्यांना भेटून वाकून अगदी साष्टांग नमस्कार करायची इच्छा झाली. त्यांच्या बरोबर आहेत अरविंद आजोबांना फुलासारखे जपणारे तुक्या आणि डॉक्टर मेघना म्हणजेच किशोर कदम आणि प्रिया बापट.  किशोर कदम अगदीच ३-४ सीन्स मध्ये आहेत पण त्यांनी केलेला तो तुक्या आपल्याला मिश्कीलपणे चिमटे काढतो आणि सिनेमाच्या शेवटी हळूच रडवून जातो. आणि प्रिया बापट, आपली लाडकी... आपल्याला हिचं नेहमीच कौतुक वाटतं... 'लिडिंग एक्टरेस' असून ती कधी नायिकेपुरतं मर्यादित ठेवत नाही.. त्याच टिपिकल रोल्स च्या बाहेर जाऊन वेगळं शोधत असते. हीच मुलगी काकस्पर्श करते , हीच वजनदार करते आणि हीच पिंपळसुद्धा करते. भूमिकेची लांबी, भाव खाणारी भूमिका वगैरे गोष्टी तिला महत्वाच्या नसतात. पिंपळमध्ये सुद्धा दिलीप काका म्हणजेच अरविंदची डॉक्टर असणारी मेघना ती साकारते. अरविंदला बॉयफ्रेंड म्हणणारी, त्यांना पूर्णपणे ओळखणारी, त्यांची काळजी घेणारी डॉक्टर मेघना. भूमिकेची लांबी तशी छोटी पण त्यातसुद्धा ती इम्प्रेस करते. पत्र वाचायचा सीन असो वा अरविंदला घरी पीक-अप करायला आलेली असतानाच सीन असो , प्रिया का भारी आहे ऍक्टर आहे हे आपल्याला दिसून येतं.. चेहऱ्यावर काहीही फिल्मी भाव न आणता आश्चर्य, धक्के आणि अश्रू ती सहजपणे दाखवते. तिचा फ्रेश वावर सिनेमामधली गम्मत वाढवतो. वृंदा गजेंद्र, अलोक राजवाडे, सखी गोखले हे देखील सरप्राईज विझिट देऊन जातात. सखी तर एवढी गोड दिसते, शुभांगी ताईंचीच आठवण होते तिला बघून. 
       ह्या  सगळ्या भारी कलाकारांबरोबर सिनेमा परिणामकारक बनतो तो सिनेमॅटोग्राफी, संवाद आणि डिरेक्शनमुळे.  बघून अंगावर काटा येतो. अरविंदच्या आयुष्यातला सर्वात पहिला फ्लॅशबॅक म्हणजेच त्यांची आई त्यांना वाढदिवसाला उटणं लावून अंघोळ करायला सांगते तो सीन किंवा सिलिंग वरून अँगल दाखवून, गुडघे जवळ घेऊन झोपलेले अरविंद आजोबा बघून आपल्या अंगावर अक्षरशः काटा येतो. "सगळा व्हर्च्युअल हॅपिनेस! गंध नाही, चव नाही, स्पर्श नाही , सहवास नाही तरी जाणीव आहे" असे संवाद.सिनेमाचा हेतू आपल्यापर्यंत यशस्वीपणे पोचवतात.
     आज हा पिंपळ पाहत असताना .... अरविंद आजोबानी मनावर अक्षरशः गारुड केलं होतं... काही वर्षांपूर्वी, गावी असणारे आमचे आजोबा , आमच्याशी फोनवर बोलणारी आमची आजी..... किंवा आत्ता आमच्या मुलांशी विडिओ चॅट करणारे त्यांचे आजी-आजोबा ह्या सगळ्यात मला दिलीपकाकांचा अरविंद दिसायला लागला. इतकंच काय तर काही वर्षांनी 'अमेरिका आपली कि पुणं आपलं' असा प्रश्न पडलेल्या माझ्या पिढीमध्ये मला अरविंद आजोबा दिसायला लागला. आज जगात अनेक अरविंद आजोबा आहेत, ही संख्या दिवसेंदिवस वाढतच जाणार..... त्या प्रत्येक अरविंदला त्यांच्या आयुष्यात तुक्या आणि डॉ मेघना मिळो हीच इच्छा!

जाता जाता - टीपीकल कौतुक करायचं झाल्यास, आज खरंच बऱ्याच दिवसांनी अंतर्मुख करणारा मराठी सिनेमा पाहिला... थँक यु गजेंद्र अहिरे... थँक यु नेटफ्लिक्स!

-- स्वागत पाटणकर       

Monday, November 12, 2018

माऊली, काटेकर अँड रितेश -दे आर बॅक!

माऊली, काटेकर अँड रितेश -दे आर बॅक!

"काटेकर नंतर काय?" , "काटेकर नंतर काय"? असा प्रश्न आमच्या जोशीसाहेबांना विचारायचं हे गेल्या काही महिन्यांमधील रुटीन झालं होतं. प्रेमळ हवालदार, हळवा नवरा, वेब सिरीज वर प्रमुख भूमिका, डायलॉग डिलिव्हरी आणि स्क्रीनवरचा त्याचा वावर ह्या सगळ्यामुळे काटेकरनी सर्वाना आपलंसं करून घेतलं. पण म्हणतात ना एकदा एखादी भूमिका अभिनेत्याला चिटकली की तो त्याच त्याच प्रकारच्या भूमिका करायला बघतो. जितू जोशी बद्दल तीच भीती वाटतं होती आणि असं प्लिज नको व्हायला असं वाटत होतं. आमच्या धाडसी जोशींनी ते ऐकलं....पोलिसांच्या भूमिकेच्या अनेक ऑफर्स येऊनसुद्धा साहेबानी नेहमीप्रमाणे वेगळा रस्ता निवडलाय... आपला हळवा पोलीस आता येतोय पूर्णपणे वेगळ्या रुपात....डायरेक्ट निगेटिव्ह रोल मध्ये.... रितेश देशमुख च्या 'माऊली' चा लोंढे बनून... सिनेमात भक्ती ऐवजी भीती पसरवणारा हा धर्मराज मात्र आम्ही जोशींच्या भक्तीखातर बघणार.... अगदी पहिल्याच दिवशी पहिल्याच शो ला....

     आज आमचे मित्र क्षितिज पटवर्धननी शेअर केलेलं, त्यांनी लिहिलेल्या नवीन पिक्चरचं ट्रेलर पाहिलं. आदित्य सरपोतदार दिग्दर्शित  'माउली '!!  पट्या आणि सरपोतदार... आपल्याला ही जोडी लै आवडते. लेखकाला काय सांगायचंय हे समजलेला दिग्दर्शक आणि प्रेक्षकांना काय हवंय हे समजणारा लेखक.  एकदम हुशार क्लासमेट्सची जोडी. अगदी फर्स्ट बेंचर्सपासून लास्ट बेंचर्सपर्यंत सगळ्यांची आवड कळलेली आणि त्यामुळे सगळ्यांची लाडकी अशी ही जोडी... . प्रेक्षकांबरोबरच कलाकारांनासुद्धा  हवीहवीशी... अगदी रितेश देशमुखदेखील ह्यात मागे नाही. पटवर्धन-सरपोतदार ह्यांच्या फास्टर फेणेच्या वेळेस रितेश देशमुखला ह्या जोडीबरोबर फेणे करायला आवडला असतं असं वाटत होतं ..पण फेणेचं वय आडवं आलं असावं! .तरीसुद्धा फेणेच्या शेवटी एक गाणं ऍड करून त्यानी त्याची हौस पूर्ण केली होतीच.
      माऊलीच्या वेळेस मात्र रितेशने ही संधी सोडायची नाही असं ठरवलेलं दिसतंय. माऊलीच्या लीड रोलमध्ये दिसतोय रितेश देशमुख, त्याच लै भारी आवेशात!  स्टायलिस्ट एंट्री आणि शिट्ट्या पडतील असे डायलॉगज्... अमलेंदू चौधरींच्या नजरेतून दिसणारी वारी - पंढरपूरचं सौन्दर्य , शहरी असो वा ग्रामीण... मराठी जनतेला भुरळ पडणारा असा माउली-माउलीचा जयघोष ... जादुई अजय-अतुलचं जादुई संगीत  अशा ह्या सिनेमॅटिक गोष्टींनी सजलेलं असं हे माऊलीचं दमदार टीझर... खरंतर दोनच मिनिटांचं ट्रेलर पण कीबोर्ड घेऊन लिहायला भाग पाडलं ते रितेश देशमुखनी!


     गेल्यावर्षी एका अवॉर्ड सोहळ्यात, फास्टर फेणेला बेस्ट फिल्मचा पुरस्कार मिळाल्यावर रितेशने आवर्जून क्षितिज पटवर्धनला स्टेजवर बोलावलं होतं.फार रेअर दृश्य होतं ते.  राइटर्सना विसरण्याऱ्या ह्या जमान्यात लेखकाचा असा सन्मान होताना बघून खूप भारी वाटलं होतं... रितेशबद्दल खूप कौतुक वाटलं होतं तेव्हा ... एकदम आवडूनच गेला रितेश!
       खरं तर ह्या मोठ्या सेलिब्रेटी लोकांच्या मुलांचं वाटतं तेवढं सोप्प आयुष्य नसतं... वाटतं त्यापेक्षा जरा जास्तच अवघड असतं. आयुष्यात काही चांगलं केलं तर ते 'लोकांना' अपेक्षितच असतं आणि त्यामुळे त्यात काही कौतूकास्पद वाटत नाही... आणि जर काही चुकीचं केलं तर त्या सेलिब्रिटींच्या पोराला चहुबाजीनी टार्गेट केलं जातं... तेच 'लोकं' अगदी जोशात येऊन टीका करत असतात.... आणि जर तो मुलगा जर मुख्यमंत्र्यांचा असेल तर मग काय विचारायलाच नको....
    आपला रितेश देशमुख...  त्याचं तसंच! साधारण २००३ साली रितेशनी डेब्यू केला होता पण टू बी व्हेरी फ्रॅंक तो एकाच गोष्टीसाठी लक्षात राहिला होता... ती म्हणजे विलासरावांचा मुलगा! मग नंतर मस्ती असो व आयफा अवॉर्ड्सच अँकरिंग असो ..रितेश हसवायचा आणि तेवढ्या पुरता इम्प्रेस करून जायचा. क्या कूल है हम, हाऊसफुल्ल वगैरे टाईप्स सिनेमा मध्ये दिसायचा, डबल-मिनिंग जोक्सचा तुफान मारा करायचा ...हा मुलगा एवढंच करणार कि काय अशी भीती वाटतानाच 'रण' , 'एक विल्हन' सारख्या सिनेमातून वेगळ्याच रूपात प्रेक्षकांसमोर यायचा ... डिस्नीलँडमध्येसुद्धा नसेल अशी ही वेगळीच (आणि माझ्यासाठी निराशावादी, त्रास देणारी अशी) रोलर कोस्टर राईड होती ती ...!  गमतीदार गोष्ट म्हणजे त्याच्या करियरच्या पहिल्या दहा वर्षात रितेश सर्वात जास्त आवडला तो एका वेगळ्याच गोष्टीसाठी... सिनेमा नव्हे तर क्रिकेट! काही वर्षांपूर्वी पुण्यात सेलिब्रिटी क्रिकेटची मॅच बघायला गेलो होतो... वीर मराठा टीमची ओपनिंग करायला रितेश उतरला होता. माझ्याच डोळ्यांवर माझा विश्वास बसेनासा झाला होता. तंत्रशुद्ध म्हणतात ते काय एकदम तशीच बॅटिंग देखमुख करत होता... लै कल्ला आला होता त्याची बॅटिंग बघून..  "रितेश शुल्ड रिप्लेस शिखर धवन' हे असं काही तरी गमती-गमतीत आपण बोलून गेलो होतो ..थोडक्यात काय तर एवढा तो आपल्याला अतिशय आवडून गेला होता... खरं सांगायचं तर बॅटिंग स्किल्स पेक्षा तो ज्या सिरियसनेस नी खेळत होता, गेममधली इन्व्हॉल्वमेंट ,त्याचा तो ऍटिट्यूड आपल्याला भावला होता.
      समहाऊ रितेशची तीच क्लॅरिटी, तोच फोकस आणि इन्व्हॉल्वमेंट मला दिसतीये गेल्या ४-५ वर्षपासून ... मुंबई सिनेमा कंपनीची स्थापना झाल्यावर!  बालक -पालक आणि यलो सारखे सिनेमे प्रोड्युस केल्यावर असं वाटलं रितेशला त्याचा रस्ता सापडलाय. तो जे काही करतोय, प्रेक्षकांसमोर आणतोय त्यात त्याच्या मनातली क्लॅरिटी पूर्णपणे उतरलीये.  त्यानंतर 'विनोदी किंवा सामाजिक प्रबोधन' देणाऱ्या विषयात मराठी सिनेमा अडकून राहिला असताना रितेशने 'लै भारी'सारखा मसाला फॅमिली इंटरटेनर सिनेमा यशस्वी करून दाखवला. आणि मग आणला आपला सगळ्यांचा फेव्हरेट फेणे. एकदम सुपरहिट.  आता त्याच लेखक-दिग्दर्शक जोडीबरोबर साहेब येतायेत माउली बनून. रितेशचं व्हिजन, त्याचे कष्ट त्याच्या प्रत्येक कलाकृतींमधून दिसतंय. अधूनमधून तो हिंदी हाऊसफुल्ल वगैरे करत असतोच... करू दे... आपल्याला लोड वाटत नाही आता त्या गोष्टीचा. मराठी सिनेमासाठी त्याचं काँट्रीब्युशन असंच सुरु ठेवलं म्हणजे झालं!

  आज माऊलीचं ट्रेलर पाहिलं... रितेशला 'नक्की काय करायचंय, काय दाखवायचं हे त्याला समजल्याचं स्पष्ट दिसतंय. सिनेमा हे सर्वात प्रथम मनोरंजनाचं साधन आहे आणि रितेशला तेच करायचंय... प्रेक्षकांचं मनोरंजन! आशयघन सिनेमे येतच राहतील पण डिसेंबरच्या सुट्टीच्या वातावरणात, सामोसे वगैरे खात, मुल्टिप्लेक्सच्या एसी मध्ये बसून पट्याचे फिल्मी डायलॉग, आदित्यच व्हिजन आणि जितू-रितू ची ऑन स्क्रीन टशन बघून मनोरंजन करून घ्यायला काय हरकत आहे!

 मुंबई फिल्म कंपनीच्या लै भारीमधला 'माउली' हिट झाला होता... आता १४ डिसेंबरला येणारा हा 'माउली vs नाना लोंढे काटेकर' सामनासुद्धा एकदम लै भारी असेल हीच अपेक्षा आणि ह्याच शुभेच्छा!

स्वागत

- स्वागत पाटणकर