तो आणि ते दोघे
ऐसी दिवानगीवर वेड्यासारखा नाचला... अतिशय उत्साहात...कमालीची ऊर्जा घेऊन... पब्लिकला जिंकून घेतलं त्यानी... एकदम दिवाना झालं पब्लिक... आम्ही पण त्यातलेच एक झालो...अगदी तेव्हापासूनच तो, त्याचा डान्स, त्याची गाणीं हे कॉम्बिनेशनचे आम्ही वेडे झालो...
पहिली किक अशी जोरदार मिळाल्यानंतर तो मग सुटला... बाझींगर, डर, कभी हां कभी ना पासून ते कुछ कुछ होता है आणि देवदास पर्यंत... गाडी फुल्ल जोरात असायची त्याची... आमच्यासारख्या हजारो, लाखो लोकांना तो आपलासा वाटायचा...आम्ही त्याच्या प्रेमातच होतो , आहोत... त्याच्या सारखं वागायचं बोलायचं... पूर्णपणे कॉपी करायचं हाच आमचा धंदा...त्याचा अभिनय, त्याची स्टाईल, त्याचा डान्स ह्या सर्वामुळे त्याचे सिनेमे बघायचोच पण अजून एक महत्वाच कारण होतं ते म्हणजे त्याच्या सिनेममधली गाणी... तेवढ्याच महान लोकांनी, खूप मेहनत घेऊन बनवलेली ती कानात मुरून जाणारी गाणी... सिनेमा रिलीज होऊन काळ लोटला तरी गुणगुणत बसणारी अशी त्याची गाणी...तुझे देखा तो ये जाना सनम काय आणि कल हो ना हो काय... त्या सुंदर चालींवर, त्या शब्दांवर फक्त तोच शोभून दिसेल अशी ती गाणी...
बरं, तेव्हा आमच्या मराठी इंडस्ट्रीत सिनेमे यायचे, बघितले जायचे पण गाणी काही फारशी लक्षात राहायची नाहीत... 2003-04 साल सुरू झालं...त्याच्या रेड चिलीज एंटरटेनमेंचा जन्म झाला.... आणि इकडे आपल्या मराठीत अग बाई अरेच्चा आला...सुपरहिट हिट झाला... "अग बाई! काय सुंदर गाणं आहे हे" मन उधाण वाऱ्याचे ऐकून लोकालोकांची हीच प्रतिक्रिया ऐकू यायला लागली... सरप्राईझींगली मराठी पिक्चर मधली सगळी गाणी लोकांच्या तोंडपाठ झाली होती...इतिहास घडला होता... 'त्यांची' एन्ट्री झाली होती.... रोमॅंटिक म्हणा, आरती म्हणा अगदी आयटम सॉंग घ्या... त्यांनी सगळं केलं होतं... संपूर्ण मराठी जगात त्यांचं नाव पोचलं होतं.. ते लाडके झाले होते...आता आमच्यासारखे अनेक जण मराठी गाणी ऐकू लागले होते...
तिकडे त्याचे सिनेमे येत होतेच ओम शांती ओम, माय नेम इज खान डॉन...केवळ, तो सिनेमात असायचा म्हणून सिनेमा पहिला जायचा आणि त्यामुळे त्याची ती गाणी आमच्या ओठांवर असायची... अगदी उलटं असायचं इकडे मराठीत... केवळ आणि केवळ ह्या दोघांनी गाणी केलीयेत, म्युझिक दिलंय म्हणून ते गाणं पाहिलं जातं, ऐकलं जातं आपोपाप पाठ होतं , सिनेमा बघितला जातो, गणपतीत डान्स केले जातात, अंताक्षरीत कधी एकदा ते अक्षर येतंय आणि त्यांचं ते गाणं म्हणतोय असं होतं... उलाढाल, साडे माडे तीन,नटरंग, जोगवा... किती तरी घ्या... मनात घर करून बसले हे दोघे...
सैराट झाला, अग्निपथ, पिके सगळं झालं... ते ग्रेट आहेत हे जगाला सांगायची गरजच नाही... अख्ख्या महाराष्ट्राची मान अभिमानानं उंच करतात ते दोघं...
पण आज रेड चिलीज साठीं ह्यांनी केलेलं गाणं पाहिलं... सिनेमाचं नाव झिरो... ह्या दोघांनी केलेलं गाणं सुरेल आहेच... खरं तर सैराट वगैरे झाल्यानंतर.... 'शाहरुखचा पिक्चर मिळणं' हा काही कौतुकाचा क्रयटेरिया नाही पण
ज्याला बघून हिंदीतली गाणी आम्ही बघायला लागलो तो आज ह्या दोघांच्या गाण्यावर नाचतोय, स्टाईल मारतोय, त्याची ती आयकोनिक पोझ देतोय...सर्रकन अंगावर काटा आला... खुशीनी!
ते गाणं बघताना म्युझिक बाय 'अजय अतुल' हे असं समोर आलं... एक भारी सरप्राईज मिळालं... त्याचे सिनेमे बघणं हे घरचं कार्यचं असतं आमच्यासाठी.... आज आमच्या घरच्या कार्याला घरच्याच मोठ्या लोकांचा अजय अतुलचा आशीर्वाद मिळाल्या सारखं वाटलं... !
स्वागत पाटणकर
This comment has been removed by the author.
ReplyDelete