Wednesday, November 2, 2022

एक लव्ह स्टोरी.... दहा वर्षाची!

एक लव्ह स्टोरी.... दहा वर्षाची!

प्लेटमधून येणाऱ्या वाफेआडून ऑफव्हाईट रंगाच्या सॉसची आणि माझी नजरानजर झाली. उजव्या हातात असलेला काटा चमचा पेने पास्त्यावर विसावला, स्पर्श झाल्या झाल्या पास्त्यामध्ये अलगदपणे घुसला. पास्ता परफेक्टली कुक्ड झाल्याच्या टेस्टमध्ये 'ल प्लसीर' पास झालं होतं. हो, आमच्या प्रभात रोडवर हे नुकतंच उघडलं होतं प्लासिर आणि नव्याचं रॅगिंग करायला आम्ही तिथे हजर. पण साला या महाडिक च्या प्लासिर ने प्रेमात पाडलं राव.

    नजरेत सामावू का हा वेडंपिसं करणारा वास घेत बसू असं मन कन्फ्युज्ड स्टेटमध्ये असताना, "अरे नुसता बघतो काय, आत पाठव त्या पास्त्याला" पोटातला कावळा ओरडला. मी काटा चमचाला मिठी मारून बसलेल्या पेने पास्त्याला ओठांजवळ आणलं. हळूच फुंकर मारली. पास्त्यावर पसरलेला थ्री चीज सॉस गुदगुल्या झाल्यागत हलला. मला हसू आलं. मी पुन्हा फुंकर मारली, माझ्या चेहऱ्यावर हास्य होतं आणि डोळ्याच्या कोपऱ्यातून कुणीतरी आपला वेडेपणा बघतंय असा मला भास झाला. उजव्या हातातला काटा चमचा असाच ओठांसमोर ठेऊन मी डाव्या बाजूला नजर फिरवली. ल प्लासीर च्या काचेबाहेर, उभी असलेली गर्दी होती. प्रभात रोडवर झालेल्या जोरदार पावसामुळे भिजलेली गर्द हिरवी झाडे पाऊस सम्पल्यावरसुद्धा थोडं थोडं पाणी शिंपडत बसलेली. त्यातूनच वाट काढत पुणेकर ल प्लासिरच्या जिन्याकडे येत होते. काचेबाहेर असलेले लोकं आपल्याला आत कधी जायला मिळेल वाट बघत होते तर आतले मात्र फ्रेंच इटालियन चवींबरोबर मनसोक्त हँगआऊट करत होते. मी पुन्हा एकदा मोर्चा माझ्या पास्त्याकडे वळवला पण तरीसुद्धा कोणीतरी बाहेरून आपल्याला बोलावतंय असा भास झाला. एखाद्या सीआयडीसारखी मी मान झपकन डावीकडे वळवली. आणि काचे पलीकडे उभी , मैत्रीच्या घोळक्यात गप्पा मारत मारत उभी असलेली ती मला दिसली. काळ्या रंगाचा स्लिव्हलेस टॉप, ब्लु जीन्स, ओलसर केस, दिल चाहता है मधल्या प्रीती झिंटा स्टाईल कुरळे केस, गोऱ्या हातांवर विसावलेले , कदाचित तिच्या प्रेमात पडलेले पावसाचे थेंब. गोरा चेहरा, गुटगुटीत गाल आणि हिरवे डोळे. मैत्रिणीशी बोलत होती पण नजर काचेपलीकडेच होती तिची. जागा कधी मिळेल या विचारात सुरु झालेली नजर माझ्या पास्त्यावर लाईन मारण्यापर्यंत पोचली होती. मी बघतोय तिच्याकडे हे कळूनसुद्धा तिने माझ्याकडे बघतच राहिली. शेवटी मलाच ऑकवर्ड होऊन मी थोडा उजवीकडे सरकलो, तिच्याकडे पाठ करून. चार पाच घास नॉन स्टॉप खाल्ले. चळलेली जीभ आणि कवलेलं पोट याना थोडं शांत केलं. "थ्री चीज सॉस नी एकदम थ्री डी इफेक्ट केलाय रे माझ्यावर". "हे तर काहीच न्हाई माझ्या जवळ आल्या आल्या हा पास्ता विरघळतोय रे". माझे ओठ आणि जिभेच्या गप्पा सुरु झाल्या होत्या. 
     अर्धी प्लेट रिकामी झाल्यावर मी पुन्हा एकदा काचेपलीकडे बघितलं. तिचं लक्ष नव्हतं. जणू काही प्लेटमधला पास्ता तिला ' पलट' म्हणाला, आणि तिने मैत्रिणींबरोबर सेल्फी काढता काढता अचानक माझ्याकडे बघितलं. मी काटा चमच्यावर असलेला पास्ता तिला दाखवला, हा प्रकार जन्नत आहे जन्नत आहे असं खूणेनीच सांगितलं. डोळे मिटून चमचा साफ केला. तोंडातला घास संपल्यावर तिच्याकडे बघितलं तर ती ओठ डावीकडच्या कोपऱ्यात वेडावाकडा करून मी चिडलीये असं सांगत होती. मी हसलो. आमची नजरानजर मात्र काही थांबत नव्हती. माझ्यासमोर असलेल्या दुसऱ्या प्लेटकडे बघून तिने काहीतरी इशारा केला. मी त्या पास्त्या मध्ये इतका हरवलो होतो कि त्याबरोबर आलेला गार्लिक ब्रेड विसरलोच होतो. माझ्या चेहऱ्यावर चे भाव बघून तिने डोक्याला हात लावला. मी सूरी घेऊन तो ब्रेड कापू लागलो. डोळ्याच्या कोपऱ्यातून नजर तिच्याकडेच होती. तिनी "सूरी कशाला? हातानेच खायचा" अशी खूण... ऑर्डरच केली. मी लगेच माझ्या हातानी तो गार्लिक ब्रेड उचलून त्याचा घास घेतला, बोटाला लागलेलं सॉल्टेड बटर चाटूनपुसून खाल्लं. जसं काही तिनेच स्वैपाक केलाय अशा कुतूहलाने तिने मला कसा आहे ब्रेड विचारलं. मी एक बोट उंच धरून एक नंबर आहे तिला सांगितलं. टेबलावरचे, काचेअलीकडचे, पलीकडचे काय म्हणतील असले फालतू विचार मला येत नव्हते. ल प्लासीर ची चव, वास आणि तिची नजर ह्यात मी खुश होतो. 
इतक्यात तिच्या ग्रुपचा नंबर लागला. त्या सगळ्या आत आल्या आणि त्यांना माझ्यापासून लांबचं टेबल मिळालं.
त्या टेबल कडे त्या सगळ्या जाऊ लागल्या, तिने पुन्हा एकदा माझ्याकडे वळून बघितलं. आणि काय चमत्कार "उपरवाले ने इशारा किया" माझ्या शेजारचं टेबल रिकामं झालं. मी तिला शेजारच्या टेबलाकडे बोट दाखवून छुपं इन्व्हाईट दिलं. तिने तिच्या मैत्रिणींना पटवून माझं इन्व्हाईट एक्सेप्ट केलं. ती माझ्या शेजारच्या टेबलवर माझ्या अपोझिट साईडला येऊन बसली. आमच्यात अचानकपणे dumb charades चा खेळ सुरु झाला.
 तू काय खातोय?
 थ्री चीज पास्ता..
पण मला वेगळं ट्राय करायचंय पण सुचत नाहीये.
पेस्ट स्पगेटी घे
नको , खूप कार्ब्स असतात, मी जाड होईन.  
मग ग्रिल्ड चिकन?

हे सगळं खाणाखुणांमधूनच आम्ही डिस्कस करत होतो. मी सांगितलेला प्रत्येक चॉईस तिला आवडत होता पण केवळ मला छळण्यासाठी ती नाक मुरडून नको म्हणत होती. स्वतःचेच गाल पकडुन जाड होते दाखवत होती. आणि हे सगळं बघताना, माझ्या चेहऱ्यावरचं स्माईल मला चिकटू बसलं होतं.
फायनली तिने ग्रिल्ड चिकन ऑर्डर केलं. ते मनापासून खाताना, तिला ते आवडलंय हे माझ्या लक्षात आलं. आपला चॉईस तिला आवडला ह्यातच मीच खूप खुश झालो.
पोरीने सगळं चिकन एकदम तब्येतीत खाल्लं. आमच्या टेबलवर असलेले रंगीत मक्रून्स बघून त्यांनी पण तीच ऑर्डर केली. समोर ठेवलेल्या स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, मँगो,कॉफी अशा अनेक फ्लेवरच्या मक्रून्समधून तिने कॉफी वालं उचललं. माझ्या हातात स्ट्रॉबेरी होतं. मी माझ्या हातातलं मक्रून् नी तिला चिअर्स केलं. असं नाही, तू पण कॉफी फ्लेवरच घेऊन चिअर्स कर. तिने हट्ट केला. मी माझ्यासमोर बसलेल्या मित्राच्या हातातून त्याचा कॉफी मक्रून् माझ्या स्ट्रॉबेरी ने रिप्लेस केला. ती खुद्कन हसली. मला चिअर्स केलं. मक्रून्स संपेपर्यंत आमच्यात कुणीही काही बोललं नाहीं. एवढं परफेक्ट गोड आणि वेगवेगळे फ्लेवर्स फक्त रंगात न राहता, चवीमध्ये सुद्धा वेगळेपण असणारे मक्रून्स हे अनकंट्रोलबल होते. मी ते खातच राहिलो. थोड्या वेळानी मान वर केल्यावर बघितलं तर ती गायब झाली होती. यांचं सगळं टेबल रिकामं होतं. च्यायला गेली कि काय. मी सैरभैर झालो. शांतपणे नजर टाकली तर कोपऱ्यातल्या भिंतीवर ल प्लसीर नी बोर्ड ठेवला होता. आपल्याला वाटेल ते लोकं त्यांचा मेसेज तिथे लिहित होते. काळ्या टॉपमधली ती, तिथेच होती. स्टिकी नोटवर काहीतरी लिहून चिकटवत होती. 

मला हायसं वाटलं. पहिली भेट अजून स्पेशल करण्यासाठी मी तिच्यासाठी चॉकलेट केक ऑर्डर करायला गेलो. केकवर 'हॅलो, अननोन, उद्या ओळख करायला ५pm ला इथेच भेटायचं'? असा मेसेज लिहिला. आणि खुश होऊन केक हातात घेऊन त्या बोर्ड कडे निघालो.

आणि बघतो तर... ती पुन्हा गायब.

रेस्टॉरंट मध्ये ती कुठच दिसली नाही पळत पळत जाऊन प्रभात रोडवर नजर घातली. ती गायबच. च्यायला हे काय, नाव पण नाही कळलं. 
नर्व्हस होऊन माझ्या टेबलवर आलो. उदास होऊन बसलो होतो. कशाला केक घेण्यात वेळ वाया घालवला असं म्हणत रागानेच हातातल्या केककडे लक्ष गेलं. पण तोसुद्धा तिच्याचसारखा होता. देखणा. माझी चिडचिड  फटक्यात शांत झाली. जाऊ दे आपण तरी खाऊ असं म्हणत मी केकचं कव्हर काढलं. सूरी मागण्यासाठी म्हणून मी उभा राहिलो आणि माझी नजर समोरच्या बोर्डवर गेली. पिवळ्यारंगाच्या स्टिकी नोट्स मध्ये एक गुलाबी नोट मला बोलवत होती.
"grilled chicken was winner, कॉफी मक्रून्स were टू गुड... अँड थ्री चीज पास्ता अँड स्ट्राबेरी मक्रून्स मेड मी स्माईल. यु गाईज अरे स्प्रेडींग लव्ह. लॉन्ग लिव्ह ल प्लसीर... "
@candidpriya 

मी वल्र्ड कप जिंकल्यागत उडी मारली. दुसऱ्या क्षणाला हातात इंस्टाग्राममध्ये candidpriya ला सर्च केलं आणि चॉकलेट केक चा विथ मेसेज फोटो तिला पाठवला.
काही क्षणातच तो 'मेसेज सीन' झाला. आणि मग पंधरा एक मिनिटांनी रिप्लाय आला.  Busy at 5pm.... See you at 8  Coffee macroons at LP.

प्लसीर आणि प्रिया या दोन्ही गुलाबी गोष्टींना भेटून आज दहा वर्ष झाली.

And Priya Was right. Plaisir spreads love! Happy Birthday LP and Sidhartha Mahadik. many many more to come 

-स्वागत पाटणकर.