Sunday, September 16, 2018

गोड माणसांचा होम स्वीट होम


गोड माणसांचा होम स्वीट होम


आपल्यासारख्या सर्वसामान्य प्रेक्षकांसाठी (आपल्यासारख्या म्हणजे माझ्यासारख्या, दुसरं कोणी आदर देत नाही म्हणून आपण नेहमी आपल्याला आदर देत असतो...असो)...तर आपल्यासारख्या सर्वसामान्य प्रेक्षकांसाठी एखादा सिनेमा म्हणलं कि त्यातले कलाकार , म्युझिक डिरेक्टर किंवा फार फार तर दिग्दर्शक अशा काही स्पेफिसिफ 'रोल्स' पलीकडे आपण बघत नाही. पिक्चर रिलीज होताना त्यामागे  प्रोड्युसर, एक्सएक्युटीव्ह प्रोड्युसर, प्रेझेंटर, डिस्ट्रिब्युटर अशी वेगवेगळी लोकं असतात.... आज आमचे जुने मित्र विनोद सातव प्रेझेंटरच्या रूपात प्रदार्पण करत आहेत...तमाम मराठी रसिक प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत नवीन मराठी सिनेमा 'होम स्वीट होम' ! पूर्वी फक्त 'भरत शाह प्रेझेंट्स' असं वगैरे वाचायची सवय होती, आज विनोद सातवचं  नाव त्याच कॅटेगरीमध्ये वाचलं...... खरं सांगायचं तर अतिशय कडक वाटलं बघा....
           साधारण १५ एक वर्षांपूर्वीची गोष्ट असेल , आपण तेव्हा बी कॉमच्या नावाखाली बीएमसीसीमध्ये अतिशय शिट्ट्या मारण्याचा जोरदार उपक्रम हाती घेतला होता... स्वागत@दिवसभरउनाडक्या.कॉम! आमच्या बहिणाबाई मीनाताईनी ते बघितलं ...आणि खरं सांगायचं तर तिला ते माझा असा वेळ वाया घालवणं बघवलं नाही... मला विनोद सातवचा कॉन्टॅक्ट दिला... नारायण पेठेत त्याच ऑफिस आहे भेट जरा जाऊन..एवढंच सांगितलं. आम्हा कोथरूडकरांना तिरंगा / एसपीज बिर्याणी खायची असेल तरच नदीपलीकडे जायची सवय... त्यामुळे असं कामासाठी अनोळखी माणसाकडे जायचं जीवावरच आलं होतं. पण गेलो, म्हणलं बघुतरी कोण आहेत हे सातव.
झेड ब्रिज च्या नारायण  पेठेकडच्या तोंडापाशी एक छोटंसं ऑफिस, आत गेलो... बाहेरून जेवढं छोटं वाटत होतं आतमध्ये सुद्धा तसंच छोटं पण एकदम क्युट असं ऑफिस. भिंतीवर कॉर्पोरेट गिफ्ट्स ठेवून ते ऑफिस एकदम सजलं होतं... पुणेरी जुन्या घरातला तो प्रसन्न करणारा गारवा ऑफिसभर पसरला होता.... तिकडचं वातावरण आपल्याला एकदम इम्प्रेस करून गेलं. विनोदनी आत बोलावलं...  एक प्लेन व्हाईट शर्ट आणि ब्लु जीन्स, हेअरस्टाईल साधी, क्लीन शेविंग .... म्हणजे थोडक्यात माणूस कसा एकदम सरळ साधा वाटावा असा ह्यांचा पहिला लूक माझ्या नजरेत पडला. "तू सध्या काय करतो, तुला काय काय येतं" असे प्रश्न त्यांनी माझ्यावर टाकले. कॉलेजमध्ये मध्ये असताना आपण सगळ्यात भारी अशा आवेशातच आपण असतो , मी सुद्धा तशाच जोशात त्यांना उडवाउडवीची उत्तरं द्यायला सुरवात केली. साधारण माझा ऍटिटयूड बघून सातव मधेच बोलले "मी पण बीएमसीसीलाच होतो, आम्ही पण तेच केलंय जे तू आत्ता करतोय ... त्यामुळे बापाला ........शिकवू नकोस " बस मला त्यांनी कमीत कमी शब्दात जास्तीस्त जास्त 'मेसेज' पोहोचवला.. मनापासून काम करायचं असेल तर कर आणि त्यात तुझाच फायदा आहे हे एकदम करारी भाषेत मला समजावलं. त्या साध्या वेशामागे हा असा सुद्धा माणूस आहे हे मला एक १० मिनिटात कळलं.
      मला काम काय करायचंय हे समजावलं.... " मी २ दिवसात कळवतो" असं मी म्हणल्यावर , "तुम्ही पोरं काही जबाबदारीने ऍक्शन घ्याल वाटत नाही..मीच तुला २ दिवसांनी कॉल करतो तेव्हा मला सांग" हे सातवांचं ऐकून , आपली त्यांच्या समोर काय इमेज तयार झालीये ह्याचा अंदाज मला आला. देन देअर आफ्टर आय जस्ट वॉन्टेड टू वर्क टू प्रुव्ह हिम रॉंग! कदाचित त्यांना हेच हवं होतं आणि माझ्यातून माझं 'बेस्ट' बाहेर काढण्यासाठी त्यांनी बरोबर शब्द वापरले. ओळखीतून आलोय म्हणून फालतू लाड न करता रिऍलिटी मध्ये जगायला शिकवलं.
      ते नेहमीच विविध गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व असायचे,  मल्टी टास्किंग का काय म्हणतात ते तसं .. मला दिलेलं काम काय तर मोबाईल कंपनीजना टॉवर बांधण्यासाठी पुण्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये फिरायचं, बिल्डिंग आयडेंटिफाय करायच्या आणि त्यांच्या सेक्रेटरीजची मीटिंग शेड्युल करायची. पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन सुरु व्हायच्या आधी मी विनोद सातवकडे ६ एक महिने काम केलं... पण टू बी व्हेरी फ्रॅंक त्या सहा महिन्यात सातवांकडून मला आयुष्यभरासाठी अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे 'जगात कसे वेगवेगळ्या टाईप्सचे  लोक्स असतात आणि त्यांना फेस कसं करायचं'... अगदी जेव्हा पोस्ट ग्रॅज्युएशनला कॉलेजमध्ये भारताच्या विविध भागातले हुशार किंवा ओव्हरस्मार्ट पोरं माझ्या बरोबर होते त्यांच्याशी स्पर्धा करताना मला सातवांनी मला कळत नकळत शिकवलेल्या अनेक गोष्टी कामाला आल्या! पुढे पुढे आमच्या भेटी कमी झाल्या पण कॉन्टॅक्ट कधीच कमी झाला नाही.... कॉर्पोरेट ट्रेनिंग असो वा त्यांनी सुरु केलेली लीड मीडिया असो,  वेगवेगळ्या संधी निर्माण करून त्यात ते नेहमीच बेस्ट देत राहिले.
मराठी माणूस  ९-५ जॉबमधेच खुश असतो, बिझिनेस - धंदा वगैरे मराठी माणूस सुरु करायची रिस्क घेत नाही असं कोणी माझ्यासमोर म्हणलं कि मी त्याला विनोद सातवच उदाहरण देतो. विषय कट! "आपण आपलं काम मनापासून करायचं , त्यात आपला फायदा असतो ...कामं काय आपोआप मिळत राहतात" इतका सोपा फंडा असणारा असा हा विनोद सातव आता होम स्वीट होमचा  'प्रस्तुतकर्ता' म्हणून आपल्यासमोर येतोय...अनेक अनेक शुभेच्छा!


आज विनोदनी शेअर केलेलं 'होम स्वीट होम' च ट्रेलर पाहिलं.... कसंय ना.... तुम्हाला ९८ची ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीम आठवतीये का ? हेडन , गिलख्रिस्ट, मार्क वा , स्टीव्ह वा, पॉन्टिंग आणि मग तिकडून मॅकग्रा, शेन वॉर्न वगैरे असे एक से एक भारी आणि सगळे क्लास प्लेयर्स.... म्हणजे स्टेडियममधल्या प्रत्येकानी ऑस्ट्रेलियायाला सपोर्ट करायचं आणि अतिशय खुश होऊन आनंदात घरी जायचं.... 'होम स्वीट होम'च पण एक्साक्टली तसंच आहे. आमची गोड स्पृहा जोशी , प्रसाद ओक (बीएमसीसी म्हणून अजून लाडका) , सुमीत सर , मृणाल देव , विभावरी.... वगैरे वगैरे अनेक बाप लोकं .... आणि ती सुद्धा अतिशय गॉड,एका वेगळ्याच क्लासची म्हणजे थोडक्यात काय तर प्रेक्षकांनी थेटर मध्ये जायचं आणि फक्त आणि फक्त मंत्रमुग्ध होऊन बाहेर पडायचं. ऑस्ट्रेलियन टीमसारखंच एकदम डिट्टो.तसं बघायला गेलं तर पिक्चरमध्ये ब्रॅडमनरुपी रीमाताई आणि मोहन जोशी सुद्धा आहेतच कि... एकूणच कल्ला असणार आहे स्क्रीनवर हे मात्र नक्की!
आत्ता ब्लॉग लिहितानाच नरेंद्र भिडयांनी म्युझिक दिलेलं अजय गोगावलेनी त्याची स्पेसिफिक स्टाईल सोडून गायलेलं गोड शब्दांचं गोड गाणं रिलीज झालं.म्हणजे ह्या फ्रंट वर सुद्धा हा सिनेमा निराश करणार नाही असं दिसतंय.
ही सगळी क्लास लोकं एकत्र आली आहेतच आणि त्या व्यतिरिक्त आजकाल लेखनाची आवड निर्माण झालेल्या माझ्यासारख्याला एक गोष्ट ह्या सिनेमाकडे आकर्षित करते ती म्हणजे ह्या सिनेमाचे लेखक..... वैभव जोशी , मुग्धा गोडबोले आणि ह्रिषीकेश जोशी...  हे एक फार वेगळं आणि इंटरेस्टिंग कॉम्बिनेशन आहे हे ..
फार पूर्वी आमच्या समोरच्या बिल्डिंगमध्ये कुलकर्णी आजी आजोबा राहायचे. घराची किंमत वाढल्यावर ते फ्लॅट विकून निघून गेले. त्यांनी घर का विकलं , मग ते नंतर कुठं गेले हे असे प्रश्न आम्हाला सारखे पडायचे . जोशी आणि  गोडबोले ह्यांच्या लेखनाची गम्मत अशी कि ट्रेलर पहिल्या पहिल्या असं वाटलं ते कुलकर्णी आजी-आजोबा आता आपल्याला इतक्या वर्षांनी परत भेटणारेत... डायरेक्ट डोळ्यात पाणी.... !
माझ्या अंदाजानुसार वैभव सरांचा लेखक म्हणून हा पहिलाच सिनेमा असावा. त्यांच्या 'हाय काय... ' कवितेचा बनलेला हा सिनेमा ... अशाच गोड आणि मनाला भिडणाऱ्या कविता असूदेत ह्या सिनेमातसुद्धा ही एक (अजून एक) अपेक्षा....
आणि ह्या सगळ्या दिग्गजांना एकत्र आणणारा म्हणजे ह्रिषीकेश जोशी..लेखक, ऍक्टर आणि दिग्दर्शक .... साधारण ५ वर्षांपासून म्हणजे जेव्हा पोश्टर बॉईज रिलीज झाला तेव्हापासून मी जगाला ओरडून सांगतोय ह्रिषीकेश जोशी म्हणजे ह्या पिढीचे अशोक सराफ आहेत...आणि त्यांच्या प्रत्येक कलाकृतींमधून ते तसंच\प्रूव्ह करतायेत. ह्या अशा अनेक गोड गोड विटांमधून उभारलेलं घर कधी एकदा बघतोय असं झालंय...

ट्रेलर बघण्यासाठी इथे क्लीक करा-
ट्रेलर लिंक

२८ला रिलीज झाल्या झाल्या तडीक पिक्चर बघणार... ह्या अशा सगळ्या गोड लोकांना एकत्र आणल्याबद्दल धन्यवाद. विनोद सर लै शुभेच्छा तुम्हाला.

जाता जाता ....... स्क्रीनवर रीमाताईंचा चेहरा बघून डोळे सुखावले पण त्यांचा आवाज ऐकण्यासाठी कान मात्र व्याकुळ झाले!!

स्वागत पाटणकर