Thursday, December 31, 2020

काळजी करू नका, घ्या!

"तुमचं कसं होतंय सांगू का? आपले डायलॉग झाले की काम संपलं! हे असं नसतं...सीनमधले बाकीचे काय बोलत आहेत ते ऐकत राहणं आणि रिअक्शन देणं तेव्हढंच महत्वाचं आहे..."

आफळे काका आमच्या नाटकाची रंगीत तालीम बघायला आले होते. तेव्हा त्यांनी मला हक्काने हे सांगितलं. हे असं न विचारता कुणी काही सजेशन्स दिल्या की नुसतं ओके म्हणून वेळ मारून नेतो मी.  आफळे काकांची गोष्ट वेगळी. त्यांनी काही सांगितलं आणि आपण मी सिरियसली ऐकलं नाही असं होऊच शकत नाही.

खरंतर ओळख जेमतेम दोन वर्षांची. डेन्वरमधल्या मैत्रिणीचे ते वडील. तिच्याकडे दोन वर्षांपूर्वी आले राहायला तेव्हा पहिल्यांदा भेटले. सहा फूटच्या आसपास उंची, पांढऱ्या केसांचा टापटीप भांग पाडलेला, टीशर्ट, जॅकेट आणि ट्रॅक पॅन्ट, अतिशय बोलका चेहरा.  त्यांच्या पहिल्या इम्प्रेशनवरून हा इसम नक्कीच बँक मॅनेजर किंवा प्राध्यापकवगैरे असावा वाटलं. होतेच ते बँक मॅनेजर! 

     "प्रवास कसा झाला हे आपल्या हातात असतं .. खायचं प्यायचं आणि झोपायचं... विमान बदलायचं, पुन्हा खायचं प्यायचं आणि झोपायचं... हिच्यासाठी व्हील चेअर सांगितली, मी मात्र चालत गेलो. चाललो नाही तर पुढच्या विमानात झोप कशी लागणार" पहिल्याच भेटीत मी विचारलेल्या एका टिपिकल प्रश्नाला त्यांनी हे उत्तर दिलं , स्वतःच जोरात हसले आणि तिसऱ्याला वाक्याला विनोद करायचा हे पुलंनी सांगितलेलं त्यांनी काटेकोर पाळलं. हा माणूस टिपिकल मॅनेजर आहेच पण त्यापेक्षा पुणेकर आहे हे माझ्यातल्या चाणाक्ष पुणेकरानी चटकन ओळखलं. 

         जनरली भारतातून अमेरिकेत आलेले हे सगळे 'पालक लोकं' दोन प्रकारची असतात. एकतर अति उत्साह असतो, अमेरिका बघायची, फिरायची , इकडच्या प्रत्येक गोष्टीचं कौतुक करायची खूप हौस असते किंवा काही जणं एकदमच बुजल्यासारखे वागतात. ते होमसिक झालेले असतात. "अमेरिकेत सगळं आहे पण माणसं नाहीत!" असं म्हणत महिन्याभरात प्रचंड वैतागलेले असतात.  पण आफळे काका म्हणजे या दोन्ही गोष्टींचा कमालीचा संगम. एकदम बॅलन्सड. अमेरीकासाठी उत्साहपण आणि पुण्यातल्या गोष्टींमध्ये, ग्रुप्समध्ये  इन्व्हॉल्वमेंटपण. कॉस्टको सारख्या दुकानापासून पासून ऑलिव्ह गार्डन सारखं रेस्टोरंट एन्जॉय करून ते सहा महिने थांबून पुण्याला गेले. 

      पण लांब गेले तरी कॉन्टॅक्ट कधीच तोडला नाही. आणि कॉन्टॅक्टमधे राहणं म्हणजे रोज उठून गुड मॉर्निंग मेसेज पाठवणं नसतं. आयपीएलमध्ये मॅच भारी झाली, राजकारणात काही तरी इंटरेस्टिंग घडलं किंवा पुण्यात नवीन नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग झाला हे अशा गोष्टीनवरून ते व्हाट्सअँपचर्चा करणार! माझ्याकडून मेसेज उशिरा गेला तरी ते थांबायचे नाहीत. मुळात माणसं जोडणं आणि जोडलेली माणसं टिकवणं ह्यात ते एक्स्पर्ट. त्यामुळे एखाद्याने रिप्लाय केला नाही म्हणून यांचा इगो नात्यामधे यायचा नाही. त्यांची ही नवीन ओळख मला ते पुण्याला गेल्यावर झाली. 

पण त्यांची खरी ओळख ते वर्षभराने पुन्हा डेन्वरला आले तेव्हा झाली.          

ते पुन्हा डेन्वरला यायचं कारण आणि वेळ ह्यात काहीच पॉझिटिव्ह नव्हतं.  प्रेमानी पाहिलेली क्युट स्वप्न तुटली होती, सगळं उदास होतं , मनात निराशा होती आणि इकडची डिप्रेसिंग थंडी सुरु झाली होती. त्यात ते इकडे आले. त्यांच्याबद्दल काळजीच वाटत होती. पण वकार युनूसच्या योर्करवर जडेजाने सिक्स मारावी तशी काकांनी सिच्युएशन हॅण्डल केली. जेटलॅग, वेदरमधला कमालीचा बदल ह्या सगळ्याला सामोरं जाताना त्यांनी दाखवलेली ऍडजस्टमेन्ट एखाद्या एमच्यारख्या यंग लोकांना लाजवेल अशी होती. आणि हे सगळं करताना, लेकीची काळजी घेताना चेहऱ्यावर कधीच दुःख दिसलं नाही. दिसलं ते फक्त एक निर्मळ हास्य. समोरच्याला उत्साही करणारं. 

थंडी, घरची सिच्युएशन या सगळ्यात ते सेट होतायेत तेवढ्यात हे करोना प्रकरण सुरु झालं.पुण्याला जायच्या निघणार आणि लोकडाऊनमुळे त्यांचं विमान कॅन्सल झालं. सगळीच अनसर्टन्टी वाढली. त्यांच्या बॅगज पॅक होत्या. पण सगळं प्लॅन फिस्कटला. त्यांचा पुण्याला गेलेला जावई पुण्यात अडकला होता आणि हे अमेरिकेत. लोकडाऊनमुळे डिप्रेशन वाढलं होतं. आमच्यासारखे सुद्धा कधी हे सगळं संपेल अशी वाट बघत होतो. नुसती काळजी करत होतो. आणि त्याउलट हा आफळेकाकांचा हा ६५ वर्षाचा तरुण आम्हाला धीर देत होता. ६ महिन्यांचा त्यांचा स्टे दहा एक महिने वाढला तरी डगमगले नाहीत. चॅलेंजेसला हसऱ्या चेहऱ्याने सामोरे जात होते.  इकडे बसून तिकडच्या गोष्टींची काळजी करायची नाही. इन फॅक्ट "काळजी करू नका, घ्या " हे ते आम्हाला सतत सांगत होते. त्या लोकडाऊनच्या काळात म्हणजे मार्च पासून जून पर्यंत अमेरिका आणि भारत दोन्हीकडची सिच्युएशन गंडली होती. आम्हाला आमच्या घरच्यांची काळजी वाटत होती. सगळं निगेटिव्ह वातावरण झालं होतं. अशा वेळेस माणसं प्रत्यक्ष भेटणं हे एक सुखकारक गोष्ट झाली होती. आणि त्यात आफळेकाकांसारखा माणूस भेटून तो पॉझिटिव्ह एनर्जी देणारा एकमेव सोर्स बनला होता. अजिबात अतिशयोक्ती नाही पण केवळ ते इकडे होते म्हणून आम्ही आमच्या आईबाबांना कमी मिस केलं. आमच्या छोट्या कान्हाला आबांशी खेळायचं म्हणजे काय असतं हे समजलं.  कान्हाशी खेळताना ते लहान व्हायचे!

       माझ्याशी बोलताना फडणवीस, कोहली पासून ते प्रशांत दामले पर्यंत सगळे विषय काढायचे. प्रवीण तरडे त्यांचा विशेष लाडका.  प्रवीणने तेव्हा असं नाटक बसवलं, तो तेव्हा असं बोलला, मुळशी पॅटर्न करताना अमुक तमुक झालं. ते भरभरून बोलायचे. नाटकाचा कुठलाही किस्सा सांगताना त्यांचा आल्रेडी हसरा असणारा चेहरा अजून फुलून जायचा. आणि हे सगळं त्यांच्या तोंडून ऐकताना कोविड,लोकडाऊन, विमान कॅन्सल हे सगळे पॅनिक आणणारे विषय कुठच्या कुठं पळून जायचे. एकांकिका बसवताना आफळेकाकांना आलेले अनुभव ऐकताना मला भरत नाट्य च्या बाहेर बसून मित्रांबरोबर चहा पितोय असंच वाटायचं.

     फायनली ते पुण्याला गेले. तिकडे गेल्यावर सुद्धा मास्कवगैरे सगळं लावून सहकारनगरमधून अप्पा बळवंत चौकात जाऊन माझं पुस्तक आणलं. त्यांचा हा उत्साह वाखाणण्यासारखा होता. पुस्तक वाचून नुसतंच कौतुक नाही केलं पण चार चांगल्या गोष्टी सजेस्ट केल्या. पुढच्या वेळेस हे लक्षात ठेव असं हक्कानी सांगितलं. शिवाय ज्यांना ज्यांना माझं पुस्तक आवडेल अशा लोकांना ते गिफ्ट दिलं. ते माझे  मित्र झाले होते. पण त्यांच्याबद्दल असलेला आदर दुप्पट तिप्पट झाला होता. आता त्याचा मेसेज यायची मी वाट बघायचो नाही. कधी कधी मीसुद्धा स्वतःहून मेसेज करायचो. माणसं जोडली पाहिजेत आणि  जोडलेली नाती टिकवली पाहिजेत हे त्यांनी उदाहरण देऊन शिकवलं होतं.  

        सगळं छान सुरु होतं, त्यांचं अमेरिकेतलं 'क्युट पिंक' स्वप्न पूर्ण व्हायला आलं होतं...पण...अचानक... 

 ते गेले. 

हे किती वाईट, निर्दयी घडलं याबद्दल खूप रडून, वाईट वाटून राग येऊन बोलता येईल, लिहिता येईल. पण आफळेकाकांनाच ते आवडणार नाही. हॉस्पिटल बेडवर बसूनसुद्धा जो माणूस "कालची मॅच किती भारी झाली, बघितलास का" असा मेसेज करतो त्या माणसाला दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी कधीच आवडणार नाही.

     खरंतर, काका नाहीत ह्यावर अजूनही विश्वास बसत नाही. आजही त्यांच्या मुलीच्या घरी गेल्यावर वाटतं ते त्या  जिन्यात कान्हाशी खेळत आहेत. पायरीवरून पडलेल्या कान्हाला ६५ वर्षाचा तरुण कॅच करत आहेत.  

त्यांच्या उत्साहाच्या दहा टक्के उत्साह आपल्यात असावा हे असं आता मला वाटतंय. २०२० नी बरंच काही शिकवलं. पण २०२०मध्ये आफळे काकांच्या सहवासात खरं शिकायला मिळालं. ते फॉलो करू शकलो तर तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. 

"काहीही घडलं तरी चेहऱ्यावर हास्य आणि मनात पॉझिटिव्हिटी ठेवा. आणि काळजी करू नका...घ्या!"   

       

   

1 comment:

  1. आफळेकाकांची भेट होण्याचा योग आता नाही. पण तू शब्दातून त्यांचं व्यक्तिमत्व छान उभं केलं आहेस.

    ReplyDelete