Wednesday, December 19, 2018

डेट विथ ' डेट विथ सई'

डेट विथ ' डेट विथ सई' 

       नार्कोज बघून झालं, मिर्झापूर जस्ट संपवलं होतं... विकेंड आला होता , ऍज युज्वल "काय करायचा वीकेंडला"  प्रश्न पडला होता. एफ बी - इंस्टवर टाईमपास सुरु होता. सई ताम्हणकरच्या लाखो फालोअर्समध्ये आम्ही देखील त्यातले एक.... "वेब सिरीज - डेट विथ सई इज नाऊ अव्हेलेबल" असं काहीतरी लिहिलेल्या तिच्या इन्स्टा स्टोऱ्या सारख्या समोर येत होत्या. आधी वाटलं टॉक शो वगैरे आहे... आजकाल वेब सिरीज ते फॅड झालंय ना कि सेलिब्रिटीजना इंटरव्ह्यूला  बोलवायचं, त्यांची मजा घ्यायची आणि मग लोकांचे व्युज मिळवायचे. 'डेट विथ सई' असंच काहीतरी असं वाटलं .. थोडी माहिती काढल्यावर त्यात सई बरोबर अजून दोन इंटरेस्टींग नावं वाचली ... ज्ञानेश झोटिंग आणि विनोद लवेकर... झोटिंगच्या राक्षसबद्दल लै लै ऐकलं होतं आणि प्रोड्युसर विनोद लवेकर म्हणजे आपले फेव्हरेट... ज्या काही मराठी डेली सोप्स आवडीने बघितल्या आहेत त्या सगळ्यातला कॉमन फॅक्टर म्हणजे विनोद लवेकर...

              ठरलं तर मग ... शनिवार रात्र होती... हातात वाईनचा ग्लास घेतला ... सई , विनोद आणि ज्ञानेश ह्या तीन नावांवर विश्वास ठेवून  लावला कि "डेट विथ सई" वेब सिरींजचा पहिला एपिसोड. पहिल्याच सीनमध्ये मॅडम एकदम वेगळ्याच अवतारात एंट्री घेऊन आपल्यासमोर हजर होत्या.. सुपरवूमन इश्टाईल.. आपण प्रेक्षक एखादी गोष्ट लगेच जज करायला जातो. माझंसुद्धा तो सीन बघून तसंच झालं... श्या हे ग्राफिक्स कसले खोटे आहेत, फसली आहे सिरीयल वगैरे कमेंट्स पास झाल्या.. पण दोनच मिनिटात तो एकच्युली "शूटिंगचा शॉट" आहे हे कळलं. ह्या इंट्रोडक्टरी सीन नंतर मात्र अजिबात वेळ न दडवता दिग्दर्शक मालिकेच्या कथेत घुसला हे आपल्याला अतिशय आवडलं. एखाद्याकडे जेवायला जावं , त्याच्या घरात घुसल्या घुसल्या चिकन रस्स्याचा वास यावा आणि आपण किचनकडे ओढले जावं असं काही आपलं "डेट विथ सई" बघताना होतं. पहिल्या एपिसोडच्या १०व्य मिनिटात आपल्यालापुढे नक्की काय प्रकारचं वाढून ठेवलंय याचा अंदाज येतो. आपलंसुद्धा एक्सझॅक्ट तसंच झालं. एका मागून एक असे सगळेच्या सगळे एपिसोड एका फाईटीत संपवले आणि लास्ट एपिसोडनंतर 'च्यायला ,संपली सुद्धा..श्या" अशी रिअक्शन बाहेर पडली. 'डेट विथ सई'च हेच मोठं यश आहे असं आपल्याला वाटतं.
   अतिशय फास्ट अशी मांडणी , परफेक्ट ठिकाणी आलेले ट्विस्ट्स , शून्य ताणलेली आणि अतिशय महत्वाचं म्हणजे पूर्णपणे नवीन गोष्ट घेऊन ज्ञानेश आपल्यासमोर येतो. ही गोष्ट खरंच इतकी वेगळी आहे कि आपण फक्त "हे असं घडू शकतं ??" आणि "हे असंही घडू शकतं " हे एवढंच आपण पूर्ण सिरीयल भर बोलत राहतो. ज्ञानेश आणि असिस्टण्ट डिरेक्टर आशिष बेंडेची कमाल आहे. त्या आशिषला अनेक म्हणजे अनेक वर्षांपूर्वी एक होता अल्लादिन एकांकिकामध्ये बघितलं होतं...इतक्या भारी भारी सिनेमा-सिरियल्स मध्ये असिस्टंट डिरेक्टरचा अनुभव घेऊन आता  आशिष साहेबांचा अल्लादिन नक्कीच दिवा उघडणार आणि त्याची स्वतःची एखादी कलाकृती नक्की घेऊन येणार.... फुल्ल गॅरंटी आहे आपल्याला.
       ही सिरीयल फास्ट आहे आणि तोच वेग ती कायम राहतो याचं कारण म्हणजे कथेतील पात्र... मेन कॅरेक्टर्स फक्त दोन. त्यातली एक म्हणजे अर्थातच सई ताम्हणकर .... ही मुलगी सगळं करत असते सगळं.. सिनेमा करते, वर्क आउट करते, बारीक होते, टीव्हीवर जज म्हणून जाते आणि आता वेब सिरीज... ती सुद्धा अशा वेगळ्या विषयावरची. .  स्क्रीनवरची सई आणि प्रत्यक्षातली सई दोघीही धाडसी , चॅलेंजेस ऍक्सेप्ट करणारी..  बऱ्याच सीन्समध्ये फक्त रिअक्शन देऊन व्यक्त होते... डायलॉग्सची तिला गरजच नसते. आपल्याला असं नक्की वाटतंय  कि सई नी हा डिफरंट रोल नक्कीच एन्जॉय केला असणार...सईच अजून कौतुक वाटायचं कारण म्हणजे बऱ्याच सीन्समध्ये समोरच्या काहीशा नवख्या कलाकाराला तिच्यापेक्षा जास्त भाव खायला जागा आहे पण तरी सुद्धा ती तिच्या 'सेलेब्रिटी' इगो तिच्या कामापासून दूर ठेवते...
      आता जरा बोलूया त्या नवख्या कलाकाराबद्दल..रोहित कोकाटे.... अरररे मित्रा कोण आहेस तू? कुठं होतास इतके दिवस...? खरंतर केवढा अवघड रोल होता ..थोडं इकडे तिकडे झालं तर एकदम फिल्मी किंवा एकदम बालिश देखील वाटू शकला असता... मार्जिन ऑफ एरर अगदीच कमी पाहिजे अशी ही भूमिका ...आणि ती तेवढ्याच ताकदीने रोहित आपल्यासमोर उभी करतो... त्याच्यामुळे डेट मधली गम्मत,रोमांच आणि सस्पेन्स वाढतच रहातो .. लड़का लै आगे जायेगा... त्याला बघितल्यावर शाहरुखचा लाडका झीशान अयुब ची आठवण येते आणि त्याचं गावरान मराठी बोलण्याची स्टाईल एकदम नागराज सारखी वाटली राव... लै झकास...
         हे सर्व कमी का तर त्यात आपले लाडके अमेय, गिरीजा ओक, पूजा ठोंबरे गेस्ट म्हणून येतात ... त्यांना असं बघायला भारी वाटतं .. पूजा त्या ५-१० मिनिटाच्या सीनमध्येसुद्धा अतिशय क्युट दिसते राव 😍! ज्ञानेश, आशिष बेंडे, रोहित सारख्या नवीन लोकांना अशी संधी दिल्या बद्दल विनोद लवेकर, त्यांची प्रोडक्शन टीम आणि सर्वात महत्वाचे 'झी५' चे लै लै धन्यवाद ... हे सगळं टीम वर्क इतकं परफेक्ट जमून आलंय कि आम्ही आमची वाईन बाजूलाच ठेवून डेट विथ सई मध्ये गुंतून गेलो.... जणू काही आमचीच एक डेट सुरु झाली . 
       तसं बघायला गेलं तर थ्रिलर नावाची गोष्ट आपल्या मराठीत फारच कमी , त्यात वेब वर अगदीच पहिला प्रयोग. नाही म्हणायला ह्यात सुद्धा त्रुटी आहेत... कलायमॅक्सला एका सीनमध्ये पाऊस असतो आणि दुसऱ्या सीनमध्ये गायब होतो, सईच्या पकडलेल्या नोकराला इतक्या दिवसांनी बरोबर शेवटीच खिशातला लायटर सापडतो ...ह्या अशा काही गोष्टी टाळता आल्या असत्या. बट नेव्हर माईंड ... आता एक काम करा प्रवीण प्रभाकरच खरा रघु असतो, किंवा रघु मेलेलाच नसतो हे असं काहीही करा पण सेकंड सीझन लवकर आणा... . .
.
.
कारण आम्ही वाट बघतोय... 

- स्वागत पाटणकर. 

Tuesday, December 11, 2018

हॅपी बर्थडे, बंटी

हॅपी बर्थडे, बंटी! 

            फॅन मुव्हीमधला छोटा शाहरुख म्हणतो "ये कनेक्शन भी ना कमाल की चीज है .... बस हो गया तो हो गया!"..... जरा शांतपणे विचार केला तर समजतं हे किती खरं वाक्य आहे. अगदी आपल्या रोजच्या आयुष्यात आपण अनुभवलेलं असं वाक्य. शाळेतला एखादा मित्र ..खूप जवळचा असा ...अनेक वर्षांनी भेटतो पण तरीसुद्धा असं वाटतच नाही कि हा इतक्या दिवसांनी भेटतोय. जुनं कनेक्शन असतं ते ... एकदम खोलवर रुजलेलं असं. तर कधीही न भेटलेली व्यक्ती ऑनलाईन चॅटमुळे ओळखीची होते आणि ते नातं जन्मोजन्मीचं असल्यासारखं वाटायला लागतं. एवढं लांब कशाला जायचं आपलं रोजचंच उदाहरण घ्या .. अजिबात रन्स करत नसलेल्या अजिंक्य रहाणेच अपयश सलत असतं आणि तेवढ्यात तो एखादी मॅच विनिंग इनिंग खेळून जातो आणि जणू काही आपल्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम संपलेत अशा आवेशात आपण पोचतो... एकदम रिलॅक्स होतो.... कनेक्शनच असतं ते... एकदम विलक्षण!
         मराठी रंगभूमी आणि मराठी रसिक प्रेक्षक ह्यांचं कनेक्शन असंच काहीसं ..घट्ट एकदम! परवा आपल्या प्रिया बापटनी "गुड न्यूज"चा फोटो टाकला. रसिक प्रेक्षक खुश झाले... बाकीच्यांबद्दल कशाला बोला.... आम्ही आमच्या घरात बसून, समोर फेसबुकवर ती पोस्ट बघून एकदम एकसाईट झालो... आपल्याच घरी बाळ यावं अशा आनंदात ओरडलो ... काय सांगू, ह्या प्रिया-उमेश बद्दल वाटणारं प्रेमचं एवढं जास्त आहे कि अशी नॅचरल रिऍक्शन येणारच.  खरं तर पडद्यावरच्या अशा आमच्या मैत्रिणींची लग्न झाली कि त्यांच्या पतिदेवांबद्दल आम्ही जन्मभर राग ठेवतो मनात. एकदम अबोला ठेवतो त्यांच्याशी. अगदी माधुरीच्या श्रीराम नेन्यांना सुद्धा आम्ही सोडलं नाहीये ह्यातून. पण जेव्हा प्रियाचं लग्न उमेशबरोबर ठरल्याची बातमी आमच्या कानावर आली , काय चमत्कार झाला नाही माहित पण पहिली रिअक्शन होती "आयला एकदम परफेक्ट जोडी आहे ही... प्रिया-उमेश... वाह" ....हे असं कधी घडलं नव्हतं.
              थोडा ऍनालिसिस केल्यावर लक्षात आलं आमच्यावर जेवढी जादू प्रियाची होती तेवढाच उमेशसुद्धा आमच्या गुडबुक्स मध्ये होता. मला आठवतंय १४-१५ वर्षांपूर्वी , जेव्हा घरात आम्ही शहाण्या मुलासारखे वागायचो.... रात्रीचं जेवण घरच्यांबरोबर एकत्र बसून असायचं... मजा असायची...जेवण मस्त असायचं फक्त जेवता जेवता आईच्या डेली सोप्स बघायला लागायच्या. भावनांचा मारा व्हायचा. अशातच एक मुलगा लक्ष वेधून घेत होता. आभाळमाया आईची फेव्हरेट सिरीयल.... ती कंपलसरी बघता बघता आणि त्यातला बंटी आपला फेव्हरेट बनला. एकदम बिनधास्त असा बंटी आणि तेवढाच बिनधास्त उमेश. विनय आपटे सारख्या दिग्गज कलाकारांसमोर एकदम कॉन्फिडन्ट वावर असायचा उमेशचा. पुण्यात राहून फक्त पुरुषोत्तममध्ये दिसलेले लोकंच भारी अभिनेते बनतात अशी आमची अंधश्रद्धा होती ...त्यावर ह्या बंटीनी पूर्णपणे फुली मारली होती. बंटी आपल्याला पटून गेला होता ...आवडून गेला होता. पुढेमागे तो वादळवाट, गोजिरवाण्या घरात मध्ये दिसला.. असंभवमुळे अजून मोठा झाला. एका लग्नाची दुसरी-तिसरी गोष्ट त्याच्यामुळे लोकं बघायला लागली . प्रत्येक मराठी फॅमिलीमध्ये तो लाडका झाला. नवा गडी नवं राज्यामध्ये राज्यभर धुमाकूळ घातला. सिरीयल , नाटकाबरोबर तो सिनेमासुद्धा करत होता.


               पण काही केल्या आमच्या मनातून बंटी उतरत नव्हता.  सारखं सारखं वाटायचं..... किंवा अजूनही वाटतं ह्या मुलामध्ये प्रचंड कॅलिबर आहे पण त्या ताकदीची भूमिका त्याला अजून मिळालीच नाहीये. छोट्या छोट्या सीन्समध्ये सुद्धा त्याची क्षमता आपल्या दिसते. उदाहरणच द्यायचं म्हणलं तर नवा गडीमध्ये पार्टीहून आल्यावर त्याचा तो सीन... अभिनयाचा उच्चांक तो गाठतो.  ह्यावर्षी त्याला 'ये रे ये रे पैसा' साठी विनोदी अभिनेताच अवॉर्डसुद्धा मिळालं.. पण तरी सुद्धा मला असं वाटत राहतं 'बंटी जे करू शकतो ते उमेशला अजून करायला मिळालंच नाहीये". चुकीचं असेल कदाचित, फॅन म्हणून स्वार्थ देखील असेल... .
पण उमेशला अजून अजून भारी चॅलेंजिंग भूमिका करायला मिळाव्यात असंच सारखं वाटत राहतं. शेवटी हे कनेक्शनच असं आहे कि त्याच यश आपल्याला सुखावणारं असतं.
     आभाळमायामधला बंटी असाच आठवत असतानाच प्रिया पुन्हा फेसबुकवर पोस्ट टाकते... ती गुड न्यूज म्हणजे त्यांचं येणारं नवीन नाटकं आहे ... त्यांनीच प्रोड्युस केलेलं नवीन नाटक "दादा,एक गुड न्यूज आहे". टू बी फ्रॅंक आमच्यातला "प्रिया-उमेश फॅन" निराश होतो... "काय यार गंडवला आम्हाला" अशी एक फर्स्ट रिअक्शन बाहेर येते... पण त्याचबरोबर आमच्यात लपलेला रसिक प्रेक्षक खुश होतो... तिकडे कसे अमीर -शारुख प्रोड्युसर बनून नवीन सिनेमे बनवत असतात.. इंडस्ट्रीला फायदाच होतो घ्या गोष्टीचा. अगदी तसंच प्रिया-उमेश सारखे लीड ऍक्टर्स जर नाटकाची निर्मिती करणार असतील तर ती मराठी रंगभूमीसाठी खूपच चांगली गोष्ट आहे.
निर्माते प्रिया - उमेशला लै लै शुभेच्छा ....रंगभूमीवर नवनवीन प्रयोग तुम्ही सादर करालच पण आमचा बर्थडे बॉय - बंटीला अजून अजून चॅलेंजिंग भूमिका करायला मिळो ह्याच  उमेशला वाढदिवसाच्या  शुभेच्छा  .... असो जास्त लोड नको आता .... मनसोक्त सुरमई फ्राय खाऊन एन्जॉय बर्थडे!


-स्वागत पाटणकर
       
बाय द वे दादा, एक गुड न्यूज द्यायचीये :) काही वर्षांपूर्वी तुझे फोटो बघून अनेक मराठी पोरं फिटनेससाठी मोटिव्हेट झाली होती... त्यात आम्हीसुद्धा एक होतो. अगदीच सिक्स पॅकवगैरे बनवू नाही शकलो ... पण फॅमिली पॅक नक्कीच कमी झाला आहे :)

Sunday, November 25, 2018

पहिला ताप

पहिला ताप


बाळ घरी येतं... घरातलं सगळं वातावरण बदलून टाकतं... बाळाची आई तिच्या नवीन रोलमध्ये पूर्णपणे शिरलेली असते.. तिची तयारीच ९ महिने आधीपासून सुरु झालेली असते...तिच्या प्रत्येक कृतीतून मातृत्व बाहेर येत असतं... बाळाचं रडणं, उठणं,झोपणं, दूध पिणं हे सगळं आई आणि बाळाच्या आगळ्या वेगळ्या कम्युनिकेशनमध्ये सुरु असतं... बाबा हे सगळं लांबून बघत असतो.. बाळाला कडेवर घेऊन खेळणं हे (आणि एवढंच) त्याचं काम झालेलं असतं.. खेळता खेळता बाळ रडायला लागलं कि तो बायकोकडे म्हणजेच आईकडे बाळाला देऊन मोकळा होत असतो... बाळाला नक्की काय हवंय हे आईलाच जास्त समजत असतं... अर्थात बाप हे सगळं जाणून असतो...पण तरी सुद्धा मनाच्या कोपऱ्यात तू कुठेतरी सारखा विचार करत असतो ... 'चिमुकल्याशी बॉण्डिंग होईल ना आपलं.....आईंसारखं!' त्याच्याकडे उत्तर नसतं... विचार झटकण्यासाठी तो पुन्हा बाळाशी खेळायला लागतो...


आणि एक दिवस खूप पाऊस पडतो... गारवा वाढतो.. अचानक झालेल्या बदलामुळे बाळ कुरकुर करायला लागतं... रडरड सुरु होते...डोळे कोमेजून गेलेले असतात.... गुबगुबीत दिसणारे गाल आत खोल गेल्यासारखे वाटतात... 'मला थंडी वाजतीये, पोट दुखतंय , कणकण वाटतीये'  बाळाला खूप काही आपल्याला सांगायचं असतं... पण ते चिमुकलं फक्त रडण्याचीच भाषा बोलत असतं... आपल्याला काहीच सुधरत नसतं.... थर्मामीटर  १०१ ताप दाखवतं ... आपल्याच पोटात गोळा येतो.. बाळाला जवळ घेऊन त्याच्या कानात 'औषध दिलाय राजा आता होशील बरा' एवढंच आपण सांगू शकतो... त्याला ते कितपत कळलंय हे समजत नाही... रडत रडत दमून अखेरीस तो झोपून जातो... बाळाला त्याच्या पाळण्यात ठेवलं जातं .... पण नाही....बाळाला झोपायचं असतं ते बाबाच्या कडेवरच... !रडत रडत ते पुन्हा बाबाच्या कडेवर येतं ...  बाबाला आता बाकी कुठली गोष्ट दिसत नसते... मोबाईल-व्हाट्सएप्प सगळं दूर फेकून दिलेलं असतं.. शेजारच्यांनी दिलेला चिकन रस्सा तो खात नाही.... टीव्हीवर सुरु असलेली भारत-पाकिस्तान मॅच तो बघत नाही ... कशात लक्षच लागत नसतं ..तो थर्मामीटर घेऊन दर १० मिनिटाला बाळाचा ताप चेक करत बसतो...  कुठल्याही छोट्याश्या आवाजानीसुद्धा बाळाची ती शांत झोप मोडू नये म्हणून खोलीत स्वतःला बंद करून टाकतो...बाळाची शांत झोप हेच त्याच नवीन आणि एकमेव टार्गेट असतं...त्या शांत खोलीत आता फक्त बाळाच्या श्वासाचा आवाज येत असतो... बापाला त्यातसुद्धा एक रिदम दिसतो.. काळजी आणि प्रेमानी तो बाळाच्या डोक्यावर हात कुरवाळत बसतो.... पाय चेपत बसतो... आणि अचानक लक्षात येत बाळानी झोपेतसुद्धा बापाचं एक बोट आपल्या मुठीत घट्ट पकडून ठेवलंय... बापाचे डोळे ओले होतात ...डोळ्यातलं पाणी बाळावर पडू नये म्हणून तो थोडी हालचाल करतो... बाळाची झोप डिस्टरब होते ...  इवलेसे डोळे उघडतात... उघडल्या उघडल्या त्याला बाबाचा चेहरा दिसतो...ते बघून बाळ खुद्कन हसतं ... आय एम इन सेफ हॅन्ड्स अशा टाईप रिअक्शन देऊन ते पुन्हा निश्चिन्त झोपून जातं... बाळाची भाषा बाबाला समजते ... खुशीने वेडापिसा होतो ... काही वेळानी बाळाचा ताप उतरतो ... बाळ पुन्हा खिदळायला लागतं .. आता बाळाला भातसुद्धा बाबाच्या हातूनच खायचा असतो...'हुं,हुं,आक ,आइन्क' हे त्याच्या शब्दकोशातले शब्द वापरून तो बाबाशी बोलत असतो... 

ते शब्द, ती एक रिअक्शन, ते एक घट्ट पकडलेलं बोट आज त्या बापाला 'बाबा' ह्या लेबल पलीकडे घेऊन जातं... खरं तर बाळाच्या जन्माबरोबर तो 'ऑन पेपर' बाप झालेला असतो... पण बाळाला आलेला पहिला ताप मात्र त्या बापामधल्या 'काळजी,भीती आणि माया' भावनांना वाट मोकळी करून देतो....बाळाच्या पहिला तापात मायाळू बाबाचा खराखुरा जन्म होतो!

 

Friday, November 23, 2018

तो आणि ते दोघे

तो आणि ते दोघे

1992 वगैरे सुरू असेल...तो आला... दिवाना बनून...
ऐसी दिवानगीवर वेड्यासारखा नाचला... अतिशय उत्साहात...कमालीची ऊर्जा घेऊन... पब्लिकला जिंकून घेतलं त्यानी...  एकदम दिवाना झालं पब्लिक... आम्ही पण त्यातलेच एक झालो...अगदी तेव्हापासूनच तो, त्याचा डान्स, त्याची गाणीं हे कॉम्बिनेशनचे आम्ही वेडे झालो...

पहिली किक अशी जोरदार मिळाल्यानंतर तो मग सुटला... बाझींगर, डर, कभी हां कभी ना पासून ते कुछ कुछ होता है आणि देवदास पर्यंत... गाडी फुल्ल जोरात असायची त्याची... आमच्यासारख्या हजारो, लाखो लोकांना तो आपलासा वाटायचा...आम्ही त्याच्या प्रेमातच होतो , आहोत... त्याच्या सारखं वागायचं बोलायचं... पूर्णपणे कॉपी करायचं हाच आमचा धंदा...त्याचा अभिनय, त्याची स्टाईल, त्याचा डान्स ह्या सर्वामुळे त्याचे सिनेमे बघायचोच पण अजून एक महत्वाच कारण होतं ते म्हणजे त्याच्या सिनेममधली गाणी... तेवढ्याच महान लोकांनी, खूप मेहनत घेऊन बनवलेली ती कानात मुरून जाणारी गाणी... सिनेमा रिलीज होऊन काळ लोटला तरी गुणगुणत बसणारी अशी त्याची गाणी...तुझे देखा तो ये जाना सनम काय आणि कल हो ना हो काय... त्या सुंदर चालींवर, त्या शब्दांवर फक्त तोच शोभून दिसेल अशी ती गाणी...

बरं, तेव्हा आमच्या मराठी इंडस्ट्रीत सिनेमे यायचे, बघितले जायचे पण गाणी काही फारशी लक्षात राहायची नाहीत... 2003-04 साल सुरू झालं...त्याच्या रेड चिलीज एंटरटेनमेंचा जन्म झाला.... आणि इकडे आपल्या मराठीत अग बाई अरेच्चा आला...सुपरहिट हिट झाला... "अग बाई! काय सुंदर गाणं आहे हे" मन उधाण वाऱ्याचे ऐकून लोकालोकांची हीच प्रतिक्रिया ऐकू यायला लागली... सरप्राईझींगली मराठी पिक्चर मधली सगळी गाणी लोकांच्या तोंडपाठ झाली होती...इतिहास घडला होता... 'त्यांची' एन्ट्री झाली होती.... रोमॅंटिक म्हणा, आरती म्हणा अगदी आयटम सॉंग घ्या... त्यांनी सगळं केलं होतं...  संपूर्ण मराठी जगात त्यांचं नाव पोचलं होतं.. ते लाडके झाले होते...आता आमच्यासारखे अनेक जण मराठी गाणी ऐकू लागले होते...
 तिकडे त्याचे सिनेमे येत होतेच ओम शांती ओम, माय नेम इज खान डॉन...केवळ, तो सिनेमात असायचा म्हणून सिनेमा पहिला जायचा आणि त्यामुळे त्याची ती गाणी आमच्या ओठांवर असायची... अगदी उलटं असायचं इकडे मराठीत... केवळ आणि केवळ ह्या दोघांनी गाणी केलीयेत, म्युझिक दिलंय म्हणून ते गाणं पाहिलं जातं, ऐकलं जातं आपोपाप पाठ होतं , सिनेमा बघितला जातो, गणपतीत डान्स केले जातात, अंताक्षरीत कधी एकदा ते अक्षर येतंय आणि त्यांचं ते गाणं म्हणतोय असं होतं... उलाढाल, साडे माडे तीन,नटरंग, जोगवा... किती तरी घ्या... मनात घर करून बसले हे दोघे...

सैराट झाला, अग्निपथ, पिके सगळं झालं... ते ग्रेट आहेत हे जगाला सांगायची गरजच नाही... अख्ख्या महाराष्ट्राची मान अभिमानानं उंच करतात ते दोघं...


पण आज रेड चिलीज साठीं ह्यांनी केलेलं गाणं पाहिलं... सिनेमाचं नाव झिरो... ह्या दोघांनी केलेलं गाणं सुरेल आहेच... खरं तर सैराट वगैरे झाल्यानंतर.... 'शाहरुखचा पिक्चर मिळणं' हा काही कौतुकाचा क्रयटेरिया नाही पण
ज्याला बघून हिंदीतली गाणी आम्ही बघायला लागलो तो आज ह्या दोघांच्या गाण्यावर नाचतोय, स्टाईल मारतोय, त्याची ती आयकोनिक पोझ देतोय...सर्रकन अंगावर काटा आला... खुशीनी!
ते गाणं बघताना म्युझिक बाय 'अजय अतुल' हे असं समोर आलं... एक भारी सरप्राईज मिळालं... त्याचे सिनेमे बघणं हे घरचं कार्यचं असतं आमच्यासाठी.... आज आमच्या घरच्या कार्याला घरच्याच मोठ्या लोकांचा अजय अतुलचा आशीर्वाद मिळाल्या सारखं वाटलं... !

स्वागत पाटणकर

Saturday, November 17, 2018

अंतर्मुख करणारा व्हर्च्युअल हॅपिनेस - पिंपळ!

       अंतर्मुख करणारा व्हर्च्युअल हॅपिनेस - पिंपळ! 

       आजकाल कुठलाही चांगला मराठी सिनेमा बघितला कि त्याचं कौतुक करताना 'बऱ्याच दिवसांनी चांगला चित्रपट बघायला मिळाला' , 'बऱ्याच दिवसांनी एवढा भारी पिक्चर आलाय नक्की बघा'  ही अशी काही वाक्य आपल्याला ऐकू येतात. बऱ्याच दिवसांनी??? म्हणजे नक्की काय .... खरं तर ह्या 'बऱ्याच दिवसांमध्ये' अनेक  छोट्या मोठ्या सुंदर कलाकृती आलेल्या असतात, खूप गुणवान लोकांनी केलेल्या सुंदर कलाकृती.... पण समहाऊ प्रेक्षकांपर्यंत त्या पोचलेल्याच नसतात...आज नेटफ्लिक्समुळे अशीच एक सुंदर कलाकृती बघायला मिळाली... अनेक वर्ष वहीमध्ये ठेवून वाळलेल्या पिंपळाच्या पानाइतकीच देखणी, नाजूक , बघितल्या बघितल्या मनाला भिडणारी कलाकृती... 'पिंपळ'!
       

        गोष्ट तशी एकदम साधी सरळ सिम्पल... बायकोच्या निधनानंतर तिच्या विरहात असलेला नवरा, परदेशी गेलेल्या मुलांचा बाप, नातवंडांबरोबर विडिओ चॅट करण्यात आपलं आयुष्य मानणारा आजोबा, बायकोच्या आठवणीत बुडालेला तरुण मुलगा, आईची इच्छा पूर्ण न करू शकल्याने पश्चताप होणार एक दुखी मुलगा.... ह्या सगळ्यांची विणलेली ही गोष्ट म्हणजे 'पिंपळ'. गम्मत म्हणजे ह्या सगळ्या वेगळ्या व्यक्तिरेखा नसून तर अरविंद नावाच्या साधारण ऐंशी वयाच्या आजोबांच्या आयुष्यात आलेले विविध टप्प्यांची ही गोष्ट. फारसे काही ट्विस्ट नाहीत, त्यामुळे हा सिनेमा संथ वाटू शकतो... वाटू दे... काही काही गोष्टी हळुवार अलगदपणेच आपल्यासमोर आल्या कि त्यांचा इफेक्ट एकदम खोलवर होतो. पिंपळचं पण सेम तसंच होतं.  अमेरिकेत असलेल्या मुलं ,सुना आणि नातवंडांबरोबर विडिओ चॅटच्या माध्मयातून वाढदिवस साजरा करणारे अरविंद आजोबा त्यांच्या बालपणीच्या आठवणीत रमतात आणि त्यांचं संपूर्ण आयुष्य आपल्यासमोर येत राहतं. हिरो-हिरोईन,व्हिलन अशा चाकोरीबद्ध सिनेमांच्या पठडीतला हा सिनेमा नाही. अर्थात ह्या कथेमध्ये व्हिलन नक्की काय आहे हा ज्याचा त्याचा प्रश्न!
      'स्थलांतर' ह्या विषयावर हा सिनेमा  बोलतो. लेखक गजेंद्र अहिरे आणि चिंतामणी अहिरे ह्यांना नक्की काय प्रश्न मांडायचे आहेत, कशाची मेसेज द्यायचा आहे, कुठल्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांवर सोपवायची आहेत हे एकदम परफेक्ट माहित असल्यामुळे ती क्लॅरिटी कथेमध्ये उतरली आहे. बेसिकली, स्थलांतर आपल्या  (नैसर्गिक) जीवनचक्राचा एक भाग बनलेलं आहे. आपलं राहतं घर, जन्म झालेलं गाव सोडून दुसरीकडे स्थलांतरित होण्याचा निर्णय कधीच सोप्पा नसतो, कोणाची गरज असते तर कोणाची ध्येय असतात .. त्या निर्णयामागे प्रत्येकाची वेगवेगळी कारणं असतात.. शिवाय हा प्रश्न फक्त भारतातून-परदेशात शिफ्ट होणाऱ्या लोकांपुरता मर्यादित नाही. कोणी गावाकडून शहराकडे जातं , कोणी एकाच देशात पण दुसऱ्या शहरात मूव्ह होतात.. आयुष्याचा एका विशिष्ट टप्प्यावर असे (तेव्हा बरोबर वाटणारे) निर्णय घेतले जातात. अशा वेळेस प्रॅक्टिकल होऊन जगताना भावना मनाच्या कोपऱ्यात धक्क्ल्या जातात.... पण उतार वयात मन कमकुवत झाल्यावर 'आपलं घर', 'आपली जागा' नक्की कोणती?? हा अनपेक्षित प्रश्न पडतो... तो खुपतो...वेदना देऊन जातो.  आईपासून लांब जाऊन घरटं बांधलेले आपण आणि आपल्या घरट्यातून  दूर उंच उडालेले आपली पिल्लं ह्यात नक्की कोण बरोबर, कोण चूक का दोघेही सारखेच... हे असे अनेक प्रश्न गजेंद्र अहिरे आपल्यासमोर अलगदपणे ठेवतात. अतिशय नाजूक विषय समोर मांडताना कसलीही घाई करत नाहीत. छोट्या छोट्या प्रसंगातून ते आपल्याला अरविंदच्या भूतकाळात घेऊन जातात. आपणसुद्धा त्या प्रसंगात, त्या संवादात एवढे सहज बुडून जातो कि अरविंदच दुःख, त्याच्या आठवणी, त्याच्या भावना ह्या सर्व आपल्याला आपल्याच वाटू लागतात हेच ह्या सिनेमाचं मोठं यश आहे.
    अरविंद झालेले दिलीप प्रभावळकर... दिग्गज माणूस.. आपण काय बोलायचं त्यांच्याबद्दल....अशक्य भारी आहेत ते.. प्रत्येक सीन, प्रत्येक डायलॉग, प्रत्येक इमोशन ....सगळं म्हणजे सगळं परफेक्ट! आज हा पिक्चर बघून त्यांना तडीक त्यांना भेटून वाकून अगदी साष्टांग नमस्कार करायची इच्छा झाली. त्यांच्या बरोबर आहेत अरविंद आजोबांना फुलासारखे जपणारे तुक्या आणि डॉक्टर मेघना म्हणजेच किशोर कदम आणि प्रिया बापट.  किशोर कदम अगदीच ३-४ सीन्स मध्ये आहेत पण त्यांनी केलेला तो तुक्या आपल्याला मिश्कीलपणे चिमटे काढतो आणि सिनेमाच्या शेवटी हळूच रडवून जातो. आणि प्रिया बापट, आपली लाडकी... आपल्याला हिचं नेहमीच कौतुक वाटतं... 'लिडिंग एक्टरेस' असून ती कधी नायिकेपुरतं मर्यादित ठेवत नाही.. त्याच टिपिकल रोल्स च्या बाहेर जाऊन वेगळं शोधत असते. हीच मुलगी काकस्पर्श करते , हीच वजनदार करते आणि हीच पिंपळसुद्धा करते. भूमिकेची लांबी, भाव खाणारी भूमिका वगैरे गोष्टी तिला महत्वाच्या नसतात. पिंपळमध्ये सुद्धा दिलीप काका म्हणजेच अरविंदची डॉक्टर असणारी मेघना ती साकारते. अरविंदला बॉयफ्रेंड म्हणणारी, त्यांना पूर्णपणे ओळखणारी, त्यांची काळजी घेणारी डॉक्टर मेघना. भूमिकेची लांबी तशी छोटी पण त्यातसुद्धा ती इम्प्रेस करते. पत्र वाचायचा सीन असो वा अरविंदला घरी पीक-अप करायला आलेली असतानाच सीन असो , प्रिया का भारी आहे ऍक्टर आहे हे आपल्याला दिसून येतं.. चेहऱ्यावर काहीही फिल्मी भाव न आणता आश्चर्य, धक्के आणि अश्रू ती सहजपणे दाखवते. तिचा फ्रेश वावर सिनेमामधली गम्मत वाढवतो. वृंदा गजेंद्र, अलोक राजवाडे, सखी गोखले हे देखील सरप्राईज विझिट देऊन जातात. सखी तर एवढी गोड दिसते, शुभांगी ताईंचीच आठवण होते तिला बघून. 
       ह्या  सगळ्या भारी कलाकारांबरोबर सिनेमा परिणामकारक बनतो तो सिनेमॅटोग्राफी, संवाद आणि डिरेक्शनमुळे.  बघून अंगावर काटा येतो. अरविंदच्या आयुष्यातला सर्वात पहिला फ्लॅशबॅक म्हणजेच त्यांची आई त्यांना वाढदिवसाला उटणं लावून अंघोळ करायला सांगते तो सीन किंवा सिलिंग वरून अँगल दाखवून, गुडघे जवळ घेऊन झोपलेले अरविंद आजोबा बघून आपल्या अंगावर अक्षरशः काटा येतो. "सगळा व्हर्च्युअल हॅपिनेस! गंध नाही, चव नाही, स्पर्श नाही , सहवास नाही तरी जाणीव आहे" असे संवाद.सिनेमाचा हेतू आपल्यापर्यंत यशस्वीपणे पोचवतात.
     आज हा पिंपळ पाहत असताना .... अरविंद आजोबानी मनावर अक्षरशः गारुड केलं होतं... काही वर्षांपूर्वी, गावी असणारे आमचे आजोबा , आमच्याशी फोनवर बोलणारी आमची आजी..... किंवा आत्ता आमच्या मुलांशी विडिओ चॅट करणारे त्यांचे आजी-आजोबा ह्या सगळ्यात मला दिलीपकाकांचा अरविंद दिसायला लागला. इतकंच काय तर काही वर्षांनी 'अमेरिका आपली कि पुणं आपलं' असा प्रश्न पडलेल्या माझ्या पिढीमध्ये मला अरविंद आजोबा दिसायला लागला. आज जगात अनेक अरविंद आजोबा आहेत, ही संख्या दिवसेंदिवस वाढतच जाणार..... त्या प्रत्येक अरविंदला त्यांच्या आयुष्यात तुक्या आणि डॉ मेघना मिळो हीच इच्छा!

जाता जाता - टीपीकल कौतुक करायचं झाल्यास, आज खरंच बऱ्याच दिवसांनी अंतर्मुख करणारा मराठी सिनेमा पाहिला... थँक यु गजेंद्र अहिरे... थँक यु नेटफ्लिक्स!

-- स्वागत पाटणकर       

Monday, November 12, 2018

माऊली, काटेकर अँड रितेश -दे आर बॅक!

माऊली, काटेकर अँड रितेश -दे आर बॅक!

"काटेकर नंतर काय?" , "काटेकर नंतर काय"? असा प्रश्न आमच्या जोशीसाहेबांना विचारायचं हे गेल्या काही महिन्यांमधील रुटीन झालं होतं. प्रेमळ हवालदार, हळवा नवरा, वेब सिरीज वर प्रमुख भूमिका, डायलॉग डिलिव्हरी आणि स्क्रीनवरचा त्याचा वावर ह्या सगळ्यामुळे काटेकरनी सर्वाना आपलंसं करून घेतलं. पण म्हणतात ना एकदा एखादी भूमिका अभिनेत्याला चिटकली की तो त्याच त्याच प्रकारच्या भूमिका करायला बघतो. जितू जोशी बद्दल तीच भीती वाटतं होती आणि असं प्लिज नको व्हायला असं वाटत होतं. आमच्या धाडसी जोशींनी ते ऐकलं....पोलिसांच्या भूमिकेच्या अनेक ऑफर्स येऊनसुद्धा साहेबानी नेहमीप्रमाणे वेगळा रस्ता निवडलाय... आपला हळवा पोलीस आता येतोय पूर्णपणे वेगळ्या रुपात....डायरेक्ट निगेटिव्ह रोल मध्ये.... रितेश देशमुख च्या 'माऊली' चा लोंढे बनून... सिनेमात भक्ती ऐवजी भीती पसरवणारा हा धर्मराज मात्र आम्ही जोशींच्या भक्तीखातर बघणार.... अगदी पहिल्याच दिवशी पहिल्याच शो ला....

     आज आमचे मित्र क्षितिज पटवर्धननी शेअर केलेलं, त्यांनी लिहिलेल्या नवीन पिक्चरचं ट्रेलर पाहिलं. आदित्य सरपोतदार दिग्दर्शित  'माउली '!!  पट्या आणि सरपोतदार... आपल्याला ही जोडी लै आवडते. लेखकाला काय सांगायचंय हे समजलेला दिग्दर्शक आणि प्रेक्षकांना काय हवंय हे समजणारा लेखक.  एकदम हुशार क्लासमेट्सची जोडी. अगदी फर्स्ट बेंचर्सपासून लास्ट बेंचर्सपर्यंत सगळ्यांची आवड कळलेली आणि त्यामुळे सगळ्यांची लाडकी अशी ही जोडी... . प्रेक्षकांबरोबरच कलाकारांनासुद्धा  हवीहवीशी... अगदी रितेश देशमुखदेखील ह्यात मागे नाही. पटवर्धन-सरपोतदार ह्यांच्या फास्टर फेणेच्या वेळेस रितेश देशमुखला ह्या जोडीबरोबर फेणे करायला आवडला असतं असं वाटत होतं ..पण फेणेचं वय आडवं आलं असावं! .तरीसुद्धा फेणेच्या शेवटी एक गाणं ऍड करून त्यानी त्याची हौस पूर्ण केली होतीच.
      माऊलीच्या वेळेस मात्र रितेशने ही संधी सोडायची नाही असं ठरवलेलं दिसतंय. माऊलीच्या लीड रोलमध्ये दिसतोय रितेश देशमुख, त्याच लै भारी आवेशात!  स्टायलिस्ट एंट्री आणि शिट्ट्या पडतील असे डायलॉगज्... अमलेंदू चौधरींच्या नजरेतून दिसणारी वारी - पंढरपूरचं सौन्दर्य , शहरी असो वा ग्रामीण... मराठी जनतेला भुरळ पडणारा असा माउली-माउलीचा जयघोष ... जादुई अजय-अतुलचं जादुई संगीत  अशा ह्या सिनेमॅटिक गोष्टींनी सजलेलं असं हे माऊलीचं दमदार टीझर... खरंतर दोनच मिनिटांचं ट्रेलर पण कीबोर्ड घेऊन लिहायला भाग पाडलं ते रितेश देशमुखनी!


     गेल्यावर्षी एका अवॉर्ड सोहळ्यात, फास्टर फेणेला बेस्ट फिल्मचा पुरस्कार मिळाल्यावर रितेशने आवर्जून क्षितिज पटवर्धनला स्टेजवर बोलावलं होतं.फार रेअर दृश्य होतं ते.  राइटर्सना विसरण्याऱ्या ह्या जमान्यात लेखकाचा असा सन्मान होताना बघून खूप भारी वाटलं होतं... रितेशबद्दल खूप कौतुक वाटलं होतं तेव्हा ... एकदम आवडूनच गेला रितेश!
       खरं तर ह्या मोठ्या सेलिब्रेटी लोकांच्या मुलांचं वाटतं तेवढं सोप्प आयुष्य नसतं... वाटतं त्यापेक्षा जरा जास्तच अवघड असतं. आयुष्यात काही चांगलं केलं तर ते 'लोकांना' अपेक्षितच असतं आणि त्यामुळे त्यात काही कौतूकास्पद वाटत नाही... आणि जर काही चुकीचं केलं तर त्या सेलिब्रिटींच्या पोराला चहुबाजीनी टार्गेट केलं जातं... तेच 'लोकं' अगदी जोशात येऊन टीका करत असतात.... आणि जर तो मुलगा जर मुख्यमंत्र्यांचा असेल तर मग काय विचारायलाच नको....
    आपला रितेश देशमुख...  त्याचं तसंच! साधारण २००३ साली रितेशनी डेब्यू केला होता पण टू बी व्हेरी फ्रॅंक तो एकाच गोष्टीसाठी लक्षात राहिला होता... ती म्हणजे विलासरावांचा मुलगा! मग नंतर मस्ती असो व आयफा अवॉर्ड्सच अँकरिंग असो ..रितेश हसवायचा आणि तेवढ्या पुरता इम्प्रेस करून जायचा. क्या कूल है हम, हाऊसफुल्ल वगैरे टाईप्स सिनेमा मध्ये दिसायचा, डबल-मिनिंग जोक्सचा तुफान मारा करायचा ...हा मुलगा एवढंच करणार कि काय अशी भीती वाटतानाच 'रण' , 'एक विल्हन' सारख्या सिनेमातून वेगळ्याच रूपात प्रेक्षकांसमोर यायचा ... डिस्नीलँडमध्येसुद्धा नसेल अशी ही वेगळीच (आणि माझ्यासाठी निराशावादी, त्रास देणारी अशी) रोलर कोस्टर राईड होती ती ...!  गमतीदार गोष्ट म्हणजे त्याच्या करियरच्या पहिल्या दहा वर्षात रितेश सर्वात जास्त आवडला तो एका वेगळ्याच गोष्टीसाठी... सिनेमा नव्हे तर क्रिकेट! काही वर्षांपूर्वी पुण्यात सेलिब्रिटी क्रिकेटची मॅच बघायला गेलो होतो... वीर मराठा टीमची ओपनिंग करायला रितेश उतरला होता. माझ्याच डोळ्यांवर माझा विश्वास बसेनासा झाला होता. तंत्रशुद्ध म्हणतात ते काय एकदम तशीच बॅटिंग देखमुख करत होता... लै कल्ला आला होता त्याची बॅटिंग बघून..  "रितेश शुल्ड रिप्लेस शिखर धवन' हे असं काही तरी गमती-गमतीत आपण बोलून गेलो होतो ..थोडक्यात काय तर एवढा तो आपल्याला अतिशय आवडून गेला होता... खरं सांगायचं तर बॅटिंग स्किल्स पेक्षा तो ज्या सिरियसनेस नी खेळत होता, गेममधली इन्व्हॉल्वमेंट ,त्याचा तो ऍटिट्यूड आपल्याला भावला होता.
      समहाऊ रितेशची तीच क्लॅरिटी, तोच फोकस आणि इन्व्हॉल्वमेंट मला दिसतीये गेल्या ४-५ वर्षपासून ... मुंबई सिनेमा कंपनीची स्थापना झाल्यावर!  बालक -पालक आणि यलो सारखे सिनेमे प्रोड्युस केल्यावर असं वाटलं रितेशला त्याचा रस्ता सापडलाय. तो जे काही करतोय, प्रेक्षकांसमोर आणतोय त्यात त्याच्या मनातली क्लॅरिटी पूर्णपणे उतरलीये.  त्यानंतर 'विनोदी किंवा सामाजिक प्रबोधन' देणाऱ्या विषयात मराठी सिनेमा अडकून राहिला असताना रितेशने 'लै भारी'सारखा मसाला फॅमिली इंटरटेनर सिनेमा यशस्वी करून दाखवला. आणि मग आणला आपला सगळ्यांचा फेव्हरेट फेणे. एकदम सुपरहिट.  आता त्याच लेखक-दिग्दर्शक जोडीबरोबर साहेब येतायेत माउली बनून. रितेशचं व्हिजन, त्याचे कष्ट त्याच्या प्रत्येक कलाकृतींमधून दिसतंय. अधूनमधून तो हिंदी हाऊसफुल्ल वगैरे करत असतोच... करू दे... आपल्याला लोड वाटत नाही आता त्या गोष्टीचा. मराठी सिनेमासाठी त्याचं काँट्रीब्युशन असंच सुरु ठेवलं म्हणजे झालं!

  आज माऊलीचं ट्रेलर पाहिलं... रितेशला 'नक्की काय करायचंय, काय दाखवायचं हे त्याला समजल्याचं स्पष्ट दिसतंय. सिनेमा हे सर्वात प्रथम मनोरंजनाचं साधन आहे आणि रितेशला तेच करायचंय... प्रेक्षकांचं मनोरंजन! आशयघन सिनेमे येतच राहतील पण डिसेंबरच्या सुट्टीच्या वातावरणात, सामोसे वगैरे खात, मुल्टिप्लेक्सच्या एसी मध्ये बसून पट्याचे फिल्मी डायलॉग, आदित्यच व्हिजन आणि जितू-रितू ची ऑन स्क्रीन टशन बघून मनोरंजन करून घ्यायला काय हरकत आहे!

 मुंबई फिल्म कंपनीच्या लै भारीमधला 'माउली' हिट झाला होता... आता १४ डिसेंबरला येणारा हा 'माउली vs नाना लोंढे काटेकर' सामनासुद्धा एकदम लै भारी असेल हीच अपेक्षा आणि ह्याच शुभेच्छा!

स्वागत

- स्वागत पाटणकर

Sunday, September 16, 2018

गोड माणसांचा होम स्वीट होम


गोड माणसांचा होम स्वीट होम


आपल्यासारख्या सर्वसामान्य प्रेक्षकांसाठी (आपल्यासारख्या म्हणजे माझ्यासारख्या, दुसरं कोणी आदर देत नाही म्हणून आपण नेहमी आपल्याला आदर देत असतो...असो)...तर आपल्यासारख्या सर्वसामान्य प्रेक्षकांसाठी एखादा सिनेमा म्हणलं कि त्यातले कलाकार , म्युझिक डिरेक्टर किंवा फार फार तर दिग्दर्शक अशा काही स्पेफिसिफ 'रोल्स' पलीकडे आपण बघत नाही. पिक्चर रिलीज होताना त्यामागे  प्रोड्युसर, एक्सएक्युटीव्ह प्रोड्युसर, प्रेझेंटर, डिस्ट्रिब्युटर अशी वेगवेगळी लोकं असतात.... आज आमचे जुने मित्र विनोद सातव प्रेझेंटरच्या रूपात प्रदार्पण करत आहेत...तमाम मराठी रसिक प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत नवीन मराठी सिनेमा 'होम स्वीट होम' ! पूर्वी फक्त 'भरत शाह प्रेझेंट्स' असं वगैरे वाचायची सवय होती, आज विनोद सातवचं  नाव त्याच कॅटेगरीमध्ये वाचलं...... खरं सांगायचं तर अतिशय कडक वाटलं बघा....
           साधारण १५ एक वर्षांपूर्वीची गोष्ट असेल , आपण तेव्हा बी कॉमच्या नावाखाली बीएमसीसीमध्ये अतिशय शिट्ट्या मारण्याचा जोरदार उपक्रम हाती घेतला होता... स्वागत@दिवसभरउनाडक्या.कॉम! आमच्या बहिणाबाई मीनाताईनी ते बघितलं ...आणि खरं सांगायचं तर तिला ते माझा असा वेळ वाया घालवणं बघवलं नाही... मला विनोद सातवचा कॉन्टॅक्ट दिला... नारायण पेठेत त्याच ऑफिस आहे भेट जरा जाऊन..एवढंच सांगितलं. आम्हा कोथरूडकरांना तिरंगा / एसपीज बिर्याणी खायची असेल तरच नदीपलीकडे जायची सवय... त्यामुळे असं कामासाठी अनोळखी माणसाकडे जायचं जीवावरच आलं होतं. पण गेलो, म्हणलं बघुतरी कोण आहेत हे सातव.
झेड ब्रिज च्या नारायण  पेठेकडच्या तोंडापाशी एक छोटंसं ऑफिस, आत गेलो... बाहेरून जेवढं छोटं वाटत होतं आतमध्ये सुद्धा तसंच छोटं पण एकदम क्युट असं ऑफिस. भिंतीवर कॉर्पोरेट गिफ्ट्स ठेवून ते ऑफिस एकदम सजलं होतं... पुणेरी जुन्या घरातला तो प्रसन्न करणारा गारवा ऑफिसभर पसरला होता.... तिकडचं वातावरण आपल्याला एकदम इम्प्रेस करून गेलं. विनोदनी आत बोलावलं...  एक प्लेन व्हाईट शर्ट आणि ब्लु जीन्स, हेअरस्टाईल साधी, क्लीन शेविंग .... म्हणजे थोडक्यात माणूस कसा एकदम सरळ साधा वाटावा असा ह्यांचा पहिला लूक माझ्या नजरेत पडला. "तू सध्या काय करतो, तुला काय काय येतं" असे प्रश्न त्यांनी माझ्यावर टाकले. कॉलेजमध्ये मध्ये असताना आपण सगळ्यात भारी अशा आवेशातच आपण असतो , मी सुद्धा तशाच जोशात त्यांना उडवाउडवीची उत्तरं द्यायला सुरवात केली. साधारण माझा ऍटिटयूड बघून सातव मधेच बोलले "मी पण बीएमसीसीलाच होतो, आम्ही पण तेच केलंय जे तू आत्ता करतोय ... त्यामुळे बापाला ........शिकवू नकोस " बस मला त्यांनी कमीत कमी शब्दात जास्तीस्त जास्त 'मेसेज' पोहोचवला.. मनापासून काम करायचं असेल तर कर आणि त्यात तुझाच फायदा आहे हे एकदम करारी भाषेत मला समजावलं. त्या साध्या वेशामागे हा असा सुद्धा माणूस आहे हे मला एक १० मिनिटात कळलं.
      मला काम काय करायचंय हे समजावलं.... " मी २ दिवसात कळवतो" असं मी म्हणल्यावर , "तुम्ही पोरं काही जबाबदारीने ऍक्शन घ्याल वाटत नाही..मीच तुला २ दिवसांनी कॉल करतो तेव्हा मला सांग" हे सातवांचं ऐकून , आपली त्यांच्या समोर काय इमेज तयार झालीये ह्याचा अंदाज मला आला. देन देअर आफ्टर आय जस्ट वॉन्टेड टू वर्क टू प्रुव्ह हिम रॉंग! कदाचित त्यांना हेच हवं होतं आणि माझ्यातून माझं 'बेस्ट' बाहेर काढण्यासाठी त्यांनी बरोबर शब्द वापरले. ओळखीतून आलोय म्हणून फालतू लाड न करता रिऍलिटी मध्ये जगायला शिकवलं.
      ते नेहमीच विविध गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व असायचे,  मल्टी टास्किंग का काय म्हणतात ते तसं .. मला दिलेलं काम काय तर मोबाईल कंपनीजना टॉवर बांधण्यासाठी पुण्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये फिरायचं, बिल्डिंग आयडेंटिफाय करायच्या आणि त्यांच्या सेक्रेटरीजची मीटिंग शेड्युल करायची. पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन सुरु व्हायच्या आधी मी विनोद सातवकडे ६ एक महिने काम केलं... पण टू बी व्हेरी फ्रॅंक त्या सहा महिन्यात सातवांकडून मला आयुष्यभरासाठी अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे 'जगात कसे वेगवेगळ्या टाईप्सचे  लोक्स असतात आणि त्यांना फेस कसं करायचं'... अगदी जेव्हा पोस्ट ग्रॅज्युएशनला कॉलेजमध्ये भारताच्या विविध भागातले हुशार किंवा ओव्हरस्मार्ट पोरं माझ्या बरोबर होते त्यांच्याशी स्पर्धा करताना मला सातवांनी मला कळत नकळत शिकवलेल्या अनेक गोष्टी कामाला आल्या! पुढे पुढे आमच्या भेटी कमी झाल्या पण कॉन्टॅक्ट कधीच कमी झाला नाही.... कॉर्पोरेट ट्रेनिंग असो वा त्यांनी सुरु केलेली लीड मीडिया असो,  वेगवेगळ्या संधी निर्माण करून त्यात ते नेहमीच बेस्ट देत राहिले.
मराठी माणूस  ९-५ जॉबमधेच खुश असतो, बिझिनेस - धंदा वगैरे मराठी माणूस सुरु करायची रिस्क घेत नाही असं कोणी माझ्यासमोर म्हणलं कि मी त्याला विनोद सातवच उदाहरण देतो. विषय कट! "आपण आपलं काम मनापासून करायचं , त्यात आपला फायदा असतो ...कामं काय आपोआप मिळत राहतात" इतका सोपा फंडा असणारा असा हा विनोद सातव आता होम स्वीट होमचा  'प्रस्तुतकर्ता' म्हणून आपल्यासमोर येतोय...अनेक अनेक शुभेच्छा!


आज विनोदनी शेअर केलेलं 'होम स्वीट होम' च ट्रेलर पाहिलं.... कसंय ना.... तुम्हाला ९८ची ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीम आठवतीये का ? हेडन , गिलख्रिस्ट, मार्क वा , स्टीव्ह वा, पॉन्टिंग आणि मग तिकडून मॅकग्रा, शेन वॉर्न वगैरे असे एक से एक भारी आणि सगळे क्लास प्लेयर्स.... म्हणजे स्टेडियममधल्या प्रत्येकानी ऑस्ट्रेलियायाला सपोर्ट करायचं आणि अतिशय खुश होऊन आनंदात घरी जायचं.... 'होम स्वीट होम'च पण एक्साक्टली तसंच आहे. आमची गोड स्पृहा जोशी , प्रसाद ओक (बीएमसीसी म्हणून अजून लाडका) , सुमीत सर , मृणाल देव , विभावरी.... वगैरे वगैरे अनेक बाप लोकं .... आणि ती सुद्धा अतिशय गॉड,एका वेगळ्याच क्लासची म्हणजे थोडक्यात काय तर प्रेक्षकांनी थेटर मध्ये जायचं आणि फक्त आणि फक्त मंत्रमुग्ध होऊन बाहेर पडायचं. ऑस्ट्रेलियन टीमसारखंच एकदम डिट्टो.तसं बघायला गेलं तर पिक्चरमध्ये ब्रॅडमनरुपी रीमाताई आणि मोहन जोशी सुद्धा आहेतच कि... एकूणच कल्ला असणार आहे स्क्रीनवर हे मात्र नक्की!
आत्ता ब्लॉग लिहितानाच नरेंद्र भिडयांनी म्युझिक दिलेलं अजय गोगावलेनी त्याची स्पेसिफिक स्टाईल सोडून गायलेलं गोड शब्दांचं गोड गाणं रिलीज झालं.म्हणजे ह्या फ्रंट वर सुद्धा हा सिनेमा निराश करणार नाही असं दिसतंय.
ही सगळी क्लास लोकं एकत्र आली आहेतच आणि त्या व्यतिरिक्त आजकाल लेखनाची आवड निर्माण झालेल्या माझ्यासारख्याला एक गोष्ट ह्या सिनेमाकडे आकर्षित करते ती म्हणजे ह्या सिनेमाचे लेखक..... वैभव जोशी , मुग्धा गोडबोले आणि ह्रिषीकेश जोशी...  हे एक फार वेगळं आणि इंटरेस्टिंग कॉम्बिनेशन आहे हे ..
फार पूर्वी आमच्या समोरच्या बिल्डिंगमध्ये कुलकर्णी आजी आजोबा राहायचे. घराची किंमत वाढल्यावर ते फ्लॅट विकून निघून गेले. त्यांनी घर का विकलं , मग ते नंतर कुठं गेले हे असे प्रश्न आम्हाला सारखे पडायचे . जोशी आणि  गोडबोले ह्यांच्या लेखनाची गम्मत अशी कि ट्रेलर पहिल्या पहिल्या असं वाटलं ते कुलकर्णी आजी-आजोबा आता आपल्याला इतक्या वर्षांनी परत भेटणारेत... डायरेक्ट डोळ्यात पाणी.... !
माझ्या अंदाजानुसार वैभव सरांचा लेखक म्हणून हा पहिलाच सिनेमा असावा. त्यांच्या 'हाय काय... ' कवितेचा बनलेला हा सिनेमा ... अशाच गोड आणि मनाला भिडणाऱ्या कविता असूदेत ह्या सिनेमातसुद्धा ही एक (अजून एक) अपेक्षा....
आणि ह्या सगळ्या दिग्गजांना एकत्र आणणारा म्हणजे ह्रिषीकेश जोशी..लेखक, ऍक्टर आणि दिग्दर्शक .... साधारण ५ वर्षांपासून म्हणजे जेव्हा पोश्टर बॉईज रिलीज झाला तेव्हापासून मी जगाला ओरडून सांगतोय ह्रिषीकेश जोशी म्हणजे ह्या पिढीचे अशोक सराफ आहेत...आणि त्यांच्या प्रत्येक कलाकृतींमधून ते तसंच\प्रूव्ह करतायेत. ह्या अशा अनेक गोड गोड विटांमधून उभारलेलं घर कधी एकदा बघतोय असं झालंय...

ट्रेलर बघण्यासाठी इथे क्लीक करा-
ट्रेलर लिंक

२८ला रिलीज झाल्या झाल्या तडीक पिक्चर बघणार... ह्या अशा सगळ्या गोड लोकांना एकत्र आणल्याबद्दल धन्यवाद. विनोद सर लै शुभेच्छा तुम्हाला.

जाता जाता ....... स्क्रीनवर रीमाताईंचा चेहरा बघून डोळे सुखावले पण त्यांचा आवाज ऐकण्यासाठी कान मात्र व्याकुळ झाले!!

स्वागत पाटणकर

Friday, August 31, 2018

ते दोघे, आपण आणि आपली पुढची पिढी!

ते दोघे, आपण आणि आपली पुढची पिढी!


"साधू संत येति घरा तोचि दिवाळी दसरा" हे असं काहीतरी आपल्याकडे म्हणतात.... ह्या वर्षी अमेरिकेत गणपतीबरोबर दसरा-दिवाळीसुद्धा साजरी होणार. 'चाय-सामोसा सिनेमा' ही संस्था अमेरिकेत घेऊन येतंय सुपरहिट आणि एक महत्वाचं नाटक 'आम्ही आणि आमचे बाप' ..... सप्टेंबर महिन्यात गणपती बाप्पा घेऊन येणार आपल्या लाडक्या आचार्य अत्रे आणि पु देशपांडे ह्यांना घेऊनअतिशय मोठा सण असणार आहे हा... तिकीट काढा...  ढोलवगैरे वाजतीलच ...तुम्ही मात्र तुफान हसायला तयार व्हा.

आम्ही आणि आमचे बाप यू एस टूर 
          "आम्ही आणि आमचे बाप".... शिवाजी पार्कवर गप्पागप्पांमध्ये सुचलेला हा विषय आणि त्यावर बसलेलं हे नाटक. ४ अवलिया कलाकार एकत्र येऊन झालेली ही जादू.  टीम पण कसली कडकसुरवातच होते अतुल परचुरेंपासूनखरं तर पुणेकर असून सुद्धा मला कधीच पुलंना भेटायला नाही मिळालं. पण शाळेत असताना 'व्यक्ती आणि वल्ली' पाहिलं ....मग तो कुरळ्या केसांचा तो गुटगुटीत अतुल परचुरेच हा आमच्यासाठी पुलं झाला....  कायमचा ! काय परफेक्ट बोलायचं हो तो ...जमून गेलं होतं त्याला एकदम ... साधारण त्याच काळात आलेल्या 'बे दुणे पाच' नाटकात अतिशय टवाळ्या  करणारा हा दुसरीकडे डायरेकट पुलं बनून समोर यायचा! ते बघून तर लैच आवडला होता परचुरे आपल्याला... नंतर नंतर शाहरुख बरोबर वगैरे बॉलिवूडमध्ये दिसल्यावर फार भारी वाटलं होतं.  एकीकडे परचुरे असताना समोर येतात आमचे आंड्या इंगळे.....पुणेकरांचे लाडके!
आनंद इंगळे हा का बाप माणूस आहे हे समजून घ्यायचं असेल त्यांनी तडीक 'माकडाच्या हाती शॅम्पेन आणि लग्नबंबाळ' ही नाटकं बघावीत. आपण पहिली ना भाई...! म्हणूनच आपल्याला हा माणूस किती याड काम करतो आणि धो धो हसवतो हे माहितीये... ह्या दोघांबरोबरअजून एक नमुना नाटकात आहे तो म्हणजे पुष्कर श्रोत्री. हा इसम किती वेगवेगळे रोल्स सहज करूशकतो हे आता सगळ्यांनाच माहित आहे.. पण पुष्करचा 'पुलं' ह्या विषयावर अभ्यास म्हणाइतका दांडगा आहे कि त्यावर तो बोलायला लागला कि ऐकत राहावंसं वाटतं. मध्यंतरी भाडीपाचा एक पॉडकास्ट आला पुलंवर त्यात पुष्करचे काही अनुभव ऐकताना खऱ्या पुलं फॅनच्या अंगावर काटे उभे राहतात. अशा ही  वल्ली कलारांबरोबर अजित परबपण आहेच.... हे नाटक बघितलेले लोकं त्याच्या म्युझिकबद्दल खूप कौतुक करत आहेत.  अशा या   मित्रांच्या कट्ट्यांवरच्या गप्पामधून निर्माण झालेलं हे नाटक भारत, सिंगापूर,इंग्लंड संमेलन सगळीकडे तुफान गाजलं, लोकांना आवडलं , पोट धरून प्रेक्षक हसले, 'त्या दोघांच्या' आठवणींनी प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी सुद्धा आलं. बेसिकली तुम्हाला एखादी गोष्ट/व्यक्ती  एवढी आवडलेली असते कि त्याबद्दल केलेली कलाकृती आपोआप सुंदर होऊन जाते. ह्या चौघांचं तसंच झालंय. पुलं आणि अत्रे दोघान्वरह्यांचं सच्च प्रेम आणि नितांत श्रद्धा. तीच या नाटकात पूर्णपणे उतरलीये . थोडक्यात एक अविस्मरणीय असा अनुभव द्यायला 'हेचौघे' 'त्या दोघांना' घेऊन आता अमेरिकेत येत आहेत... गणपती बरोबर दिवाळी दसरा साजरा करायची ही युनिक ऑपॉर्च्युनिटी आहे..... वाया घालवू नका... 
            खरं तर ह्या नाटकाचे जास्तीस्त जास्त प्रयोग अमेरिकेत (किंवा भारताबाहेर कुठेही) होणं ही मराठी भाषेची गरज आहे. त्याला कारण ही तसंच सिरीयस आहे. मला आठवतंय, २० एक वर्षांपूर्वी अमेरिकेतच वाढलेल्या माझ्या भावांसमोर मी 'ड्रायवर कोनने' हे जड आवाजात बोलून दाखवलं तर त्यांना त्याचा काहीही संदर्भ लागत नव्हता. माझी नक्कल वाईट असेल ही कदाचित पण त्यांना 'म्हैस, रावसाहेब वगैरे न समजण्याचं मेन कारण होतं 'वी डोन्ट नो एनिथिंग अबाउट इट'. माझ्यासाठी हा एक मोठा शॉक होता. काका-काकू दोघेही पुलंचे मेजर फॅन्स पण त्यांची पोरं त्यांना पुलं माहित देखील नाहीत!
                    काही वर्षांनी मी स्वतः अमेरिकेत आल्यावर  'तिकडून इकडे' आलेल्या बऱ्याचशा मराठी घरात सेम सीन आहे हा दुसरा शॉक मला बसला.तेंडुलकर शून्यावर क्लीन बोल्ड झाल्यावर जसं पोटात धस्स होतं तसंच तेबघून मला झालं. मराठी कुटुंबातली इकडे वाढणारी पुढची पिढी आणि हे दोन दिग्गज ह्यांची एकमेकांशी ओळख नाही!  पुलं आणि अत्रे म्हणजे खरं तर शिवाजी महाराजांनंतर जर कुठली दोन मोठी मराठी नावं येतील तर हीच... पण 'स्थलांतरित मराठी घरात' मात्र अत्रे-पुलं ना फारसं स्थान नाही.  युट्युबवर आजीआजोबा कधीतरी बघत असल्यामुळे घरात 'निवडक' का होईना पण पुलं माहित असतात पण आचार्य अत्रे? त्यांच्याबद्दल तर माहित असणारे इथे बोटावर मोजण्या इतपत लोक्स असतील. शॉट लागला ना डोक्याला ?? पण भयानक अशी वस्तुस्थिती आहे ही.

             माझ्या डोक्यातून काही हा किडा जाईना, त्यामुळेच एकदा ह्याच अमेरिकन काकाकडे त्याचे सगळे मित्र जमलेले असताना हा विषय जाणूनबुजून काढला ... पार्टीमध्ये कल्ला करणारी ती मोठी पिढी अचानक इमोशनल वगैरे झाली. मला म्हणले "खरं तर ह्याबद्दल जितका विचार करू तेवढा जास्त त्रास होतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ह्या गोष्टीसाठी दोष फक्त स्वतःलाच द्यावा लागतो. कधी वाटतं आपली माती सोडून आपण इकडे आलो, इकडे पोरं जन्माला घातली, वाढवली मग त्यांना आपल्या तिकडच्या 'देवांबद्दल' प्रेम वाटायचा हट्ट तरी आपण का करावा??  पण किती ही काहीही म्हणलं तरी वाईट वाटतंच ... आपण ज्यांना बघून-ऐकून-वाचून मोठे झालो , ज्यांची प्रत्यक्ष भेट कधीही होतासुद्धा त्यांच्याबद्दल प्रचंड प्रेम-आपुलकी आहे अशा माणसाबद्दल आपल्या पोटच्या (आणि मनानी अमेरिकी झालेल्या) पोरांना काहीच वाटू नये ही जाणीवच मनात खोलवर टोचणारी आहे. आणि आज असे दुःख टोचलेले ह्या अमेरिकेत अनेक मराठी मनं आहेत. आपली मुलं आणि पुलं -अत्रे  ह्यांची ओळख करायचा प्रयत्न अनेक बाप करत आहेत त्या सर्वाना 'आम्ही आणि आमचे बाप' नावाची एक सोनेरी संधी आपणहून चालत आलेली आहे. आपल्या पोरांना गटणे ,नारायण वगैरेंना भेटू द्या .....  एच वन असेल , ग्रीन कार्ड एक दिवस नक्की मिळेल हो, इथं मायबोली मराठी आता आपलीच 'डिपेंडेंट' आहे...  तिलासुद्धा आपल्या मुलांबरोबर वाढू द्या!
- स्वागत पाटणकर 

अधिक माहितीसाठी चाय सामोसा सिनेमा फेसबुक पेज लाईक करा  - Chai Samosa Cinema

Thursday, July 26, 2018

फाळके, सोनी आणि डिफरंट स्ट्रोक्स!

फाळके, सोनी आणि डिफरंट स्ट्रोक्स!


    अनेक वर्षांपूर्वी जेव्हा केबल नावाचं प्रकरण घरी आलं तेव्हा काय बघू आणि काही दिवसांनी काय काय बघू असं व्हायचं.... तेव्हाचं क्रिकेट आत्ता एवढं सारख सारख नसायचं... शिवाय फॅशन टीव्ही कितीही बघावासा वाटला तरी घरात ८-८ डोळे माझ्यावर असायचे त्यामुळे तोही ऑप्शन बंद होता.... अशा वेळेस सोनी टीव्ही नामक गोष्टीनी मोठा आधार दिला.... टीव्हीवर काय बघायचं हा प्रश्नच आपल्याला नंतर कधी पडला नाही बाबा...
       "आहट, फॅमिली नंबर १, हमसे बढकर गॉन्ग,  थोडा है थोडे के जरुरत है वगैरे विविध जॉनरच्या सिरियल्स घरचे बघायचे पण आपली आणि सोनीचं ची गट्टी जमली ती सकाळी ९-११ मध्ये पाठोपाठ येणाऱ्या आय ड्रीम ऑफ जीनी ,३ स्टुजेस, डेनिस द मेनीस आणि डिफरंन्ट स्ट्रोक्स ह्या  सीरिअल्समुळे.... सकाळी ९च्या आधी अभ्यास संपवायचं मोठं मोटिव्हेशन मिळायचं ह्यांच्यामुळे... खरं तर जुन्या इंग्लिश सिरियल्स ह्या , पण मजेदार टोन आणि परफेक्क्ट शब्द वापरून हिंदीमध्ये डब केल्यामुळे एकतर त्या सिरियल्स आणि त्यातले जोक्स कळायचे आणि तुफान हसू यायचं... त्यामुळे बाकी चॅनेल्सवर जे काही लहानमुलांसाठी तत्सम कार्यक्रम लागायचे ते अगदीच तुच्छ वाटायला लागले... ह्या ४ सिरियल्स आणि विशेषतः डिफरंट स्ट्रोक्स बघत बघत सोनी नी आपल्याला टीव्ही बघायची चांगली सवय लावली बघा...आपल्यासारख्या अभ्यासू आणि सिन्सिअर मुलाला अशा रंगीत दुनियेत प्रवेश दिल्याबद्दल आपण सदैवच सोनी टीव्हीला आभारी असणार....एक प्रकारचं अतूट नातंच बनलं आपलं आणि सोनीचं!! 
आता म्हणे पुढील महिन्यात सोनी मराठी नावाचा एक चॅनेल सुरु होतोय....परवाच अमित फाळकेच्या फेसबुक पेजवर  ही अनाउन्समेंट बघितली ... 
खरं तर वेब सिरीजच्या ह्या उगवत्या जमान्यात अजून एक टीव्ही चॅनेल सुरु करणं खरं तर खूप आव्हानात्मक आहे..

पण आपल्याला त्याचा लोड वाटत नाही...ह्याचं कारण म्हणजे अमितचा ह्या क्षेत्रातला असणारा तगडा अनुभव... ९४-९५ साली जेव्हा मम्मो रिलीज झाला तेव्हा आम्हा पुणेकरांना अमित फाळके नावाचा दांडगा मुलगा सेलिब्रिटी म्हणून मिळाला ... अशक्य दंगा असायचा ह्या मुलाचा..... आणि उत्साह तर विचारायलाच नको...  मला आठवतंय एकदा (95-96साली) आमच्या भरतकुंज सोसायटीची गणपती मिरवणूक सुरु होती... तेव्हा काही असं ढोल पथकं वगैरे सोसायटीच्या मिरवणुकीला आणण्याचं फॅड नव्हतं ... आम्हीच आपले ढोल बडवत मिरवणूक पुढे 'ढकलत' होतो .... कोणाचा तरी वर्गमित्र म्हणून अमित आला होता... त्याला ते 'बोर' वादन सहन नाही झालं बहुतेक, ओळख ना पाळख अचानक ताशा जातात घेतला आणि दे ठेऊन ...... पूर्ण मूडच बदलून टाकला कि हो साहेबानी!! दिसायला एवढंसं टिल्लू होतं ...म्हणजे खरं तर कॉलनीतल्या मोठ्या पोरांच्यामध्ये दिसत ही नव्हतं... पण त्याच्या नॉन स्टॉप वादनाने मिरवणुकीत जान आणली.... फाळक्यांनी ती मिरवणूक आमच्यासाठी मोस्ट मेमरेबल  करून टाकली! लै बाप!
            त्यानंतर तो बॉबी देओलच्या करीबमधे दिसला ...मग मात्र आमचा हा सेलिब्रिटी मुलगा ऑनस्क्रीन कधीच दिसला नाही ..... त्यानी ठरवलंच होतं ते !! जो मुलगा १५-१६ व्या वर्षी अभिनयात यश मिळालेलं असूनही ते ग्लॅमर - प्रसिद्धी नाकारून बिहाइंड द कॅमेरा जातो... स्टुडिओत काम करतो आणि टप्प्याटप्प्याने झी,स्टार अन मग सोनी असे डिफरंट स्ट्रोकस मारत हा माणूस मोठ्या झेप घेतो... त्याच्याकडे किती दूरदृष्टी असेल! वयाच्या 16व्या वर्षी यशाच्या शिखरावर असूनसुद्धा आपल्याला नक्की काय करायचंय हे ठरवून मार्गच बदलणाऱ्याकडे किती धाडस असेल!!! 
       त्याचं हेच 'धाडस आणि दूरदृष्टी' नवीन चॅनेलचं चॅलेंज स्वीकारायला आणि यशस्वीरित्या पार पाडायला महत्वाचं ठरेल.... अर्थातच हे शिवधनुष्य पेलायला तो काही एकटा नाही... एक हार्ड वर्किंग टीम त्याच्या बरोबर आहे...  मनोरंजन क्षेत्रातील प्रत्येक लहान मोठी गोष्ट जाणणाऱ्या अजय भालवणकर सरांनी पाहिलेलं हे (सोनी मराठीचं) स्वप्न पूर्ण करायला त्याच्या जोडीला आलेली सोहा, अमित भंडारी आणि अमित फाळके ही 3 गुणी पोरं!कलेच्या अंगणात बागडणारी सोहा आणि मराठीत प्रथमच सिनेरिव्ह्यू हा प्रकार हिट करणारा अमित भंडारी अशा गुणवान लोकांना मिळणारा दिशादर्शक अजय सरांचा गायडन्स...एकदम परफेक्ट टीम कॉम्बो!!   
डिफ्रंट स्ट्रोक्समध्ये जसं 3 पोरं 'अरनॉल्ड,विलीस,डाना' आणि त्यांचा बाप फिलिप असे चौघे एकत्र येऊन धमाल करतात एकदी सेम टू सेम कॉम्बिनेशन असलेली सोनी मराठीची ही जबरदस्त टीम....(टीम कसली, फॅमिलीच म्हणा ना) आता आपल्या भेटीला येतीये पुढच्या महिन्यापासून.नवीन चॅनेल आणि त्या बरोबर नवीन नाती, नवीन स्वप्न, नवीन संधी घेऊन येणाऱ्या ह्या अजय, सोहा, अमित आणि अमित ह्या सोनी मराठी फॅमिलीला लै मनापासून शुभेच्छा!!!

भिडा तुम्ही...(फक्त एकच विनंती....एकाच माणसावर 3-3 वेगळ्या अँगलनी कॅमेरा फिरवून ढिशधुशढिश म्युझिकचा मारा करणाऱ्या सिरियल्स फक्त कमी आणा.....मग यश तुमचंच आहे!)


                                                -स्वागत पाटणकर

Monday, July 16, 2018

पाळीव प्रेम

शेपटी हलवून ते आनंद साजरा करतात...
कधी कधी तर संपूर्ण देहबोलीतून ते व्यक्त होतात!
निरागस डोळ्यातून ते आपलं मन वाचतात..
खरं तर ते आपल्याशी नेहमीच बोलत असतात..
ज्यांना त्यांचे शब्द ऐकू येतात
तेच खरे भाग्यवान असतात!
दुष्ट, कपटी, लोभीपणातून कायमचे भिन्न झालेले असतात...
खऱ्याखुऱ्या प्रेमाचा झरा उडवत, कुटुंबाचा अविभाज्य घटक झालेले असतात!!!
तुम्ही बाहेर गावी जाताना व्याकुळ झालेले असतात
आणि रोज संध्याकाळी तुमची ते कासावीस होऊन वाट बघतात
मालक म्हणणाऱ्यांची मला कीव येते
तुम्ही तर त्यांचे पालक बनलेले असता...
आणि मुलगी- मुलगा, भाऊ- बहीण मित्र- मैत्रीण
अशी अनेक नाती 'ते' एकटे... निर्मळ मनानी बजावत रहातात!!
- स्वागत पाटणकर!!!!

'अरे लवकर या रे तुम्ही आता'

'अरे लवकर या रे तुम्ही आता'

चार्जिंग संपत आलेल्या
मोबाईलच्या कोरड्या स्क्रीनवर
शब्द धडकतात
'अरे लवकर या रे तुम्ही आता'

पोटात गोळा
अंगावर शहारे
मनातल्या मनात
घालमेल करून जातात

बघायला गेलं तर असतात शब्द चार
पण लपलेल्या असतात असंख्य भावना...
थेंबाथेंबानी साठलेल्या प्रेमाचा
मुरलेला गोडसर ओलावा...

मायेची ऊब, निरागस अपेक्षा
इवळूस्याची उत्सुकता किंवा बहिणाबाईंची साद
कुत्रीम झालेल्या जगात
अंतकरणाला भिडणारं
असं हे हक्काचं प्रेम
करून देतं जाणिवा
उंच उंच उड रे...पण विसरू नकोस
घर नक्की कुठे आहे...
कोणीतरी आपलंच
तिकडे वाट बघणारं आहे!

कोरडी स्क्रिन
आता ओली आलेली असते
चार्जिंग संपलेला फोन...
आपल्याला डिस्चार्ज करून जातो
- स्वागत पाटणकर 

टाईप्स ऑफ सूख!

टाईप्स ऑफ सूख!

बाळ घरी येतं 
पाळणा हलायला लागतो 
घरातलं सगळं वातावरणच बदलून जातं 
९ महिने चातक झालेलं मन 
क्षणार्धात पालक बनतं...  
वाढती जबाबदारी पेलवण्यासाठी 
अनेक हात जवळ येतात... 
आपल्यांच्या ह्या आपुलकीने 
आपले खांदे मात्र सल्लूसारखे 'ब्रॉड' होतात
आत्ता का रडतोय , डोळे लाल का वाटत आहेत 
सर्दी झालीये का?थंडी वाजतीये का? 
असंख्य वेगळ्याच काळज्या सारखं दार ठोठाववात
हे असं वाटणं म्हणजे आपण बदललोय का ?
असे हे विचार काळज्या असूनसुद्धा एक प्रकारचं सुख देत असतात 
तेव्हढ्यात ते पिल्लू वेड्या बापासमोर खुद्कन हसतं 
बाप निरागस मनानी पुन्हा पाळणा हलवायला लागतो! 

'बाटनेसे बढती है खुशिया' हे कधीतरी ऐकलेलं वाक्य  
आई बाप रोज अनुभवायला लागतात
मिठाई आणली जाते ... विडिओ चॅट केले जातात 
सातासमुद्रापार असून मनाच्या जवळ असणाऱ्यांच्या 
डोळ्यातलं पाणी जेव्हा मोबाईल ओला करून जातं 
बाळासाठी मात्र एक हवंहवंसं लिक्विड डाएट बनलेलं असतं. 
फालतू इगो बाजूला होतात
जुने वाद आता संवादात बदलतात 
हे सोनेरी क्षण साजरी करायला 
अनेक वर्षांची शांतता एका क्षणात माघार घेते 
इगो वगैरे सगळं खोटं असतं म्हणत बापाला ४ धडे शिकवते 
१५ दिवसाचं तो बाहुला बराच काही शिकवून जातो 
बापासाठी मात्र तो एक सुखदायक एक 'क्लास' असतो

बाळाचं पाहिलं रडणं , हसणं 
सगळं काही रेकॉर्ड केलं जातं..
अरे हां... त्याचे फोटो तर प्रत्येक दिवशी
इकडे तिकडे पाठवले जातात ...
एकदम आईची कॉपी आहे, 
एकदम आईवर गेलाय, 
१०० टक्के आईची झेरॉक्स ...
ही सगळी खरी असणारी 
मनाला पटणारी वाक्य 
आता बाप दुसऱ्यांकडून ऐकत असतो 
पराभूत होण्यासारखं काही नसतं 
पण तरी आई म्हणजेच बायकोबद्दलचा 
हेवा आता मनात साठायला लागतो 
काय करणार आता...  
देवाची करणी आणि नारळात पाणी 
वगैरे काहीही सांगून स्वतःला समजावलं 
तरी मन काही हसत नसतं 
असं का असं का म्हणत बसतं 
पण दुखी वाटणारा हेवा मात्र विरघळत नसतो 
जाऊदे पुढे बदलेल रूप 
अशा खोट्या समजुतींचा खोटा प्रयत्न सुरु असतो 
ह्या एका वेगळ्याच अडचणीत सापडलेला बाप 
एक दिवस दाढी करताना आरशात बघतो 
आणि कळत- नकळत ... ध्यानीमनी नसताना 
त्याला त्याच्या प्रतिमेत अचानक बाळाचा भास होतो 
आपल्या चेहऱ्यात बाळाचा चेहरा दिसायला लागतो
हा चमत्कार पोटात गोळा आणतो हातापायावर शहारे 
बायकोचा वाटणारा  हेवा आता सुखदायक बनलेला असतो 
बाप मात्र डोळ्यात पाणी आणून 
पुन्हा पाळणा हलवायला लागतो ...
-
स्वागत पाटणकर