Friday, July 13, 2018

जोशीली जादू - जितेंद्र जोशी

 जोशीली जादू - जितेंद्र जोशी 

  अनेक वर्षांपूर्वी अल्फा मराठीवर हाउसफुल, कॅम्पस वॉर अशा काही सिरियल्समधून एक गोंडस चेहऱ्याचा मुलगा सारखासारखा दिसायचा... सारखा सारखा दिसायचा कारण त्या दोन्ही सिरियल्स न चुकता बघायचो आपण ....  ते अँकरिंग तो इतकं वेगळ्याच ढंगात करायचा ... वाटायचं त्याच्याशी गप्पाच मारतोय आपण... बोलायची एक वेगळीच स्टाईल, स्पष्ट उच्चार, कुरळे केस, चष्मा, 'मुली/ मुलींच्या आया / मावश्या/ काकवा' अशा अनेक जणी प्रेमात पडतील असे चेहऱ्यावर अतिशय निरागस भाव असलेला तो... म्हणजेच  जितेंद्र जोशी... !! त्याचा टोटल अपिअरन्सच असा होता की शाळेत नेहमी पहिल्या बेंच वर बसून पहिला नंबर येणाऱ्या मुलासारखा तो 'वाटायचा' ... असो अभ्यासाबद्दल जास्त नको बोलायला ... पण त्याची ती अँकरिंग करण्याची एक वेगळी स्टाईल बघून हे काहीतरी  वेगळंच रसायन आहे हे सारखं वाटून जायचं.          अर्थात, माझ्यासारख्या सामान्य प्रेक्षकाला जे जितुमधे दिसलं ते इंडस्ट्रीमधल्या जाणकार लोकांनी नक्कीच ओळखलं असणार आणि त्याशिवाय त्याच्या करियरमधला मोठा माईलस्टोन ठरलं कॅम्पसवॉरसाठी मिळालेलं त्याला अल्फा अवॉर्ड .... जितूची एक मोठी उडी होती ती. अभिनयाच्या क्षेत्रात ठसा उमटवण्यासाठी घेतलेली मोठी उडी. घडलय बिघडलय, हाऊसफुल, कॅम्पस वॉर झी मराठीच्या ह्या सिरियल्स म्हणजे मेजर बूस्ट होता जितू साठी... त्यानंतर मात्र जितूभाई सुटलेच.... 'मग त्याने मागे वळून बघितले नाही' वगैरे काहीतरी म्हणतात ना तेच जितूच झालं.  पक पक पकाक सारखा सिनेमा, ३ चिअर्स , मुक्कामपोस्ट बोंबीलवाडी, हम तो तेरे आशिक है सारखी नाटकं असं इकडे तिकडे सगळीकडे हा गोंडस चेहरा दिसायला लागला. हे सर्व बघताना, अँकरिंगमधलं अभिनय कौशल्य हे फक्त ट्रेलर होतं हे जाणवायला लागलं...  हा जोश्या आता मनसोक्तपणे बेभान होऊन गुण उधळायला लागला होता ... त्याचं सर्वात ज्वलंत आणि माझ्या मनात खोलवर रुजलेलं उदाहरण म्हणजे 'मुक्कामपोस्ट  बोंबीलवाडी'!! टोटल रिस्पेकट हो....एकदम टोटल रिस्पेकट वाटू लागला आपल्याला जोशीबद्दल!. समोरच्या माणसाला २ तास सलग हसवायचं अतिशय अवघड काम हा पोरगा एकदम इझ मध्ये करत होता. जितूच्या अवलिया टोनमधला "अरे नारी, तुम इस घने जंगल में ....." डायलॉग बाहेर पडल्यावर प्रेक्षकांना हसता हसता खुर्चीवर ऍक्च्युअली लोळताना बघितल्याचं मला आठवतंय. पण शहाणी माणसं एकच गोष्ट सारखीसारखी न करता वेगळ्या प्रयत्नांवर भर देतात. ह्या पठ्याने सुद्धा  स्वतःला कधीच विनोदी भूमिकेपुरता मर्यादित ठेवलं नाही. विनोदी भूमिकांमध्ये यश मिळत असताना तो 'नकळत सारे घडले' मध्ये एका वेगळ्या विषयातून आपल्यासमोर आला. एकदम आउट ऑफ कम्फर्ट झोन! विक्रम गोखले आणि  स्वाती चिटणीसारख्या दिग्गजांबरोबर त्यांनी तेवढ्या ताकदीने आजचा तरुण सादर केला होता. जितेंद्र जोशी अजब आहे ह्यावर मी ठाम झालो होतो.

         त्यानंतर वेगळ्या स्तरावर सुरु झालेला जोशीचा प्रवास टप्प्याटप्प्यावर आपल्या सर्वाना मनापासून मनोरंजनरुपी आनंद देतच आलाय ... तुकाराम, दुनियादारीमधला साई, बाजीमधला मार्तंड, शासन, सुम्बरान इथपासून ते दोन स्पेशलमधला मिलिंद भागवत हे सर्व जण 'जितू जोशी आणि अष्टपैलू' ह्या विशेषणाची गाठ अजून घट्ट करत गेले. ह्या अनेक साऱ्या भूमिकांमधून तो वैविध्य राखून तो आपली समोर आला...ह्या सर्व पात्रांना अक्षरशः जिवंत केलं जितुनी .... पण मला त्याची आवडणारी गोष्ट म्हणजे त्याला लोकांच्या मनात ठसा उमटवण्यासाठी भूमिकेची लांबी गरजेची नसते .... छोट्या रोल्स मध्ये सुद्धा तो येतो आणि आपलं मन जिंकून जातो... शाळा पिक्चरमधला नरूमामा हा अगदी तसाच... "Life is what happens to you when you are busy in making other plans” हे खरं वाक्य फार फेमस.. पण जेव्हा जेव्हा हे वाचतो तेव्हा ते जितू जोशींच्याच आवाजात माझ्या कानात पडतं.... छोट्या भूमिकेतसुद्धा आपल्या अभिनयाची ताकद तो दाखवून जातो.. नुकतेच आलेले पोश्टर गर्ल, बघतोस काय मुजरा कर, व्हेंटिलेटर अशातून जोश्याची ताकद वाढलेलीच दिसते. 

   खरं तर  जितूच्या प्रवासाबद्दल लिहायला खूप काही आहे...परंतु चतुरस्त्र, अष्टपैलू, ऑलराऊंडर, व्हर्सटाईल... वगैरे वगैरे सर्व शब्दांमध्ये पीएच डी केली आहे.   जोश्या पडद्यावर कधी हिरो असतो, कधी राजकीय नेता असतो, कधी वडील तर कधी मुलगा , कधी अँकर असतो तर कधी ७०-८० दशकातला गुंड देखील असतो ..बरं, हे झालं अभिनयाचं .... बाकी नीट बघितलं तर तो मराठीत तर असतोच.......मग जरा हिंदीमध्ये जाऊन येतो ....अगदी गुजराथीमध्ये पण काम करून येतो ....अर्रे माणूस आहे का भुईचक्र!   कधी टीव्ही सिरीयलमधून सिनेमात जातो, मधेच रंगभूमीवर काय येतो, गाणी लिहितो , हे सगळं सुरु असताना कविता म्हणतो ..कविता वाचताना त्याच्यातला एक वेगळाच माणूस बाहेर येतो... एखादा गुंता सोडवावा तसे तो कवितेतले लपलेले भाव अलगद आपल्यासमोर सोडतो.... त्याचं ते शब्दांवरचं प्रेम बघून आपल्याला सुद्धा कवितावगैरे लिहायची ऊर्जा मिळते .... असो तर ह्या सगळ्या गोष्टी सुरु असतानाच ह्या सगळ्यातून वेळ काढून नाटकाचा निर्माता होतो....बाबो...!!!! २४च तास ना ह्याच्याकडे!! माझ्या ओळखीतले फक्त  कॉम्प्युटर्स ही अशी एवढी वेगवेगळी कामं करू शकतात ! जितू हे असंच वैविध्यपूर्ण करियर कसं काय मॅनेज करतो देव जाणे....सेलिब्रिटी झाल्यावर तो ते यश नुसतं एन्जॉय करत नसत नाही ...पण सामाजिक भान ठेवून पाणी फाउंडेशनसाठी सुद्धा काम करत राहतो ....समाजासाठी आणि स्वतःला मिळणाऱ्या निर्मळ सुखासाठी ! आयुष्यात एवढ्या अनेक गोष्टी करत असताना चेहऱ्यावरचं ते १८ एक वर्षांपूर्वीच निरागस हास्य मात्र तसंच असतं किंबहुना तेव्हापेक्षा अनेक जास्त लोकांना घायाळ करणारं असतं...ही अशी जितू जोशी नावाची जोशीली जादू आहे आपल्या इंडस्ट्रीची.....

       ह्या सर्व गोष्टी काय कमी पडत होत्या म्हणून आता आपली ही जोशीली जादू नवीन गोष्टीत दिसली.... तीसुद्धा डायरेकट नेटफ्लिक्सवर ! ह्या मालिकेबद्दल खूप लोकं बरंच काही बोलत आहेत ....अनेक जण कौतुक करतात ..काही जण वेगळेपण जपण्यासाठी टीका देखील करत आहेत... पण सर्वांचं मत एकच आहे 'काटेकर छा गया'! देअर इज नो सेकंड थॉट! जितू जोशीला नेटफ्लिक्स ओरोजिनल सीरियलमध्ये बघणं हे अक्षरशः वेड लावणारं होतं... माझ्यासाठी स्वीट सरप्राईज होतं... सुखावह अनुभव !!  सैफ एवढाच झकास आणि नवाजपेक्षा भारी अभिनय जोशींच्या डोळ्यातून अक्ख्या सीरियलमध्ये वाहतोय. एकदम रियल वाटावा असा अभिनय ! बायकोच्या अपेक्षा आणि सैफला करायची असलेली मदत ह्यामध्ये झालेली मनाची घालमेल कुठल्याही संवादाशिवाय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो....आपण तर घरात स्टँडिंग ओव्हेशन दिलं आपल्या जोशीला! एका दिवसात सलग एपिसोड्स पाहिल्यावर जितूच्या ह्या प्रवासाविषयीच विचार करत झोपी गेलो ... डोळे मिटल्यावर तो 'छोटा, चष्मेवाला, इलेकट्रोनिकच्या दुकानात काम करणारा जितू' डोळ्यसमोर आला.... एक वेगळंच समाधान त्या डोळ्यात होतं. कदाचित ... स्वतःशीच असलेलं कॅंपस वॉर जिंकल्याचं... एकदम हाउसफुल समाधान!
    ते बघून माझ्या तोंडून आपसूक निघून गेलं  "जोश्या मानलं रे बाबा....टप्प्या टप्प्यानी मोठठा होतोय्स...  आदर वाटतोय, प्रेम वाटतंय .... झी मराठी, सिटी प्राईड, बालगंधर्व रंगमंदिरातुन आता नेटफ्लिक्सवर पोहोचल्यास  मित्रा! लै बाप!  जसे आम्ही  नार्कोज, हाऊस ऑफ कार्ड्स वगैरे बघत तिकडच्या कलाकारांच्या प्रेमात पडलो तसेच आता कोणी अमेरिकन, ऑस्ट्रेलियन प्रेक्षक आमच्या ह्या काटेकरच्या प्रेमात पडतील... हा जोश्या त्यांना अजून अजून बघायला आवडेल... अजून मोठा हो... तुझी जोशिली जादू घेऊन मराठी इंडस्ट्रीला मात्र भेट देत जा अधून मधून ..."

         चष्मेवाला जोशी पुन्हा एकदा हसला .... आणि बोलला "नकळत सारे घडले मित्रा...... शेवटी ,Life is what happens to you when you are making other plans”!!

- स्वागत पाटणकर


7 comments:

  1. Uttam.....Tuzya lihinyamule jitendra baddal prem wala...Masta.....

    ReplyDelete
  2. बापरे. तुझ्या निरीक्षण शक्तीची आणि सर्व तपशील लक्षात ठेवून लिहिण्याची कमालच आहे

    ReplyDelete
  3. Swagat... Arey Kay lihlays.. 1 no... Really proud of u... Tuza likhan dar weli tewdhach kaitari nawin angle gheun yeta,khup Bhari.. asach lihit ja..

    ReplyDelete