Saturday, June 24, 2017

कभी हां कभी ना!

कभी हां कभी ना! 

इ अरे तुला शाहरुख वगैरे काय आवडतो.. कसला फालतू आहे अरे तो, का..पण का आवडतो??... आपल्याला अशा अनेक प्रश्नांची उत्तर कधी देण्याची गरज वाटली नाही... फॅन आहे, आता काय करायचं ..त्यात एक्सप्लेन काय करायचं?  तो पिक्चर बनवत राहिला आपण ते बघत राहिलो. 
आज त्याच्या करियरला २५ वर्ष पूर्ण झाली असं माझ्यापेक्षा मोठी फॅन असलेली हिच्या पोस्ट वर वाचायला मिळालं. त्याची २५ वर्ष म्हणजे आपण हि पस्तिशी वगैरे च्या जवळ आली ये हा दुःखद भास सुद्धा  होऊन गेला! असो.. 
पण खरंच, हा अभिनेता का आवडायला लागला ह्या प्रश्नाचं (आणि लोकांच्या प्रोब्लेमचं) रूट कॉज ऍनालिसिस करायला घेतलं.. आणि साधारण २ सेकंदात उत्तर मिळालं ...  कभी हां कभी ना!

९४ मध्ये आलेला कभी हां कभी ना! हो.. हो इथूनच सुरवात झाली होती 'फॅन' चा जन्म व्हायला. कुंदन शाहचा अतिशय हलका फुलका कभी हां कभी ना! 

गोव्यामधल्या सुनीलची ती गोष्ट! हा सुनील माझ्यासारख्यांच्या अतिशय जवळचाच! मध्यमवर्गीय, अभ्यासात शून्य, आयुष्यात काय करायचं ह्याचा थांग पत्ता नसून हि मुलीवर मात्र जीवापाड प्रेम करणारा, आईबाबा , मित्र, गुंड  असा कोणाशीहीशी खोटं बोलून वेळ मारून नेणारा, मैत्रिणीसाठी मित्रांना गंडवणारा.. पण एवढं सगळं असूनही निरागस निर्मळ मनाचा , आपल्यामुळे फसवणूक झाल्याचं कळल्यावर स्वतःहून पुढे येऊन आपली चुक मानणारा!!   हे कसं सगळं आमच्याशी जुळतं मिळतं ... अभ्यासात लक्ष नाही , मित्रांमध्ये आपण एकदम दंगा करणार ए ,आमच्या आयुष्यात ज्या ज्या 'ऍना' आल्या त्यांचे आलरेडी 'ख्रिस' तयार असायचे!

शाहरुखनी ते सुनील चं कॅरॅक्टर अक्षरशः जिवंत केलं होतं..बाजा वाजवत इकडे तिकडे फिरणं, ऍनाबद्दल  स्टोऱ्या बनवून ख्रिसला (दीपक तिजोरी) गंडवणं, ऍनानी (सुचित्रा कृष्णमूर्ती)  त्याच्यासाठी काही गिफ्ट आणलं नाही म्हणल्यावर त्याचं ते रुसणं, आपल्यावर चिडलेल्या मित्रांचं चायना टाऊनमध्ये होत असलेली फजिती बघून आधी खुश होऊन पण मग वाईट वाटणं .. 'ख्रिसने केलेल्या विनोदावर ऍना च हसणं , तो रुसल्यावर ऍना नी त्याला समजावणं' आणि हे सगळं बघून सुनीलची झालेली 'जळजळ'  आणि खोट्या मार्कशीट वर दिलेली पार्टी बघून एका सेकंदात त्याचं अपराधीपणा डोळ्यात दाखवणं! शाहरुखनी प्रत्येक सिनमध्ये आपण अभिनेते आहोत हे सिद्ध केलं होतं! डोळ्यामधून अभिनय करताना त्यांनी मात्र त्याचा दर्जा दाखवला तो 'ए काश के हम' ह्या गाण्यात. 'ऍनाबरोबर क्रूजवर संध्याकाळी भेटायचं पूर्ण झालेलं स्वप्न ... त्याच बरोबर आपली चूक तिच्यासमोर उघडी पडण्याची भीती... ती उत्सुकता, तो आनंद, ते आश्चर्य ..' हे सगळे भाव त्यांनी डोळ्यात लीलया पेलले होते.. शेवटी आपल्याला किती ही ती आवडत असली तरी त्या दोघांचं लग्न लावून देणारा सुनील...  त्याच्याबद्दल वाईट वाटलंच पण शेवटी जुही चावला त्याला मिळाल्यावर चेहऱ्यावर गोड स्माईल आलं होतं .. त्याचा हा सुनील इतका भावला होता कि ९४ पासून हार्मोनिका वाजवत, हिरव्या रंगाचं जॅकेट घालून गोव्यातल्या छोट्या रस्त्यांवर बाईक फिरवायच स्वप्न मी मात्र  ९४ पासून बघितलंय!! 

आणि आयुष्यभर फोटो काढण्यासाठी ही 'पोज' आम्हाला दिल्याबद्दल धन्यवाद!!!
आणि अशी, ९४ला  सुरु झाली होती फॅन मुमेंट! ह्या पिक्चर मध्ये शेवटचा एक डायलॉग आहे, लाईफ मै कभी हान कभी ना  तो होता रहता है!! त्याच्या पिक्चर च्या बाबतीत पण आपलं असंच असायचं कभी (बऱ्याचदा) हा आणि कभी  ना असायचं .. कारण जोहर आणि फराह खान बरोबर केलेले टुकार सिनेमे मात्र  आपण कधी बघायचे प्रयत्न केले नाहीत. पण तरी फॅनपणा कमी नाहीच झाला. डियर जिंदगी, रईस आणि जब हॅरी मेट सेजल च्या ट्रेलर मधून शाहरुख मधला अभिनेता पुन्हा जागा झाला आहे विश्वास आपल्याला वाटायला लागलाय..देव कृपेने ते तसंच असो!

राज,राहुल,मोहन भार्गव,जहांगीर खान,कबीर खान, विकी मल्होत्रा ,राजू अशा अनेक जणाना जिवंत करण्याराला आपला सलाम!  आणि करियरची २५ वर्ष पूर्ण केल्याबद्दल फ़ुल्ल्ल अभिनंदन! 

आता नेटफ्लिक्स वर कभी हा कभी ना एचडी आला आहे... तो तडीक लावतो  :)  
Thursday, June 15, 2017

मुंबई किनाऱ्याचा लहरी समुद्र

मुंबई किनाऱ्याचा लहरी समुद्र
       ------ स्वागत पाटणकर 

"गांगुली , सचिन आणि मी असे आम्ही पुढच्या महिन्यात होणाऱ्या T २० वर्ल्ड कपमध्ये खेळणार नाही... नवीन खेळाडूंना संधी उपलब्ध करून द्या" अशा काहीतरी आशयाचा इ मेल तेव्हाचा कॅप्टन द्रविडनी BCCIला पाठवल्याची बातमी सकाळ सकाळ वाचली होती.... ह्या तिघांशिवाय टीम बनूच शकत नाही वगैरे इमोशनल विचार मनात येत होते आणि  गेल्या  १०-१२ वर्षाच्या क्रिकेटच्या आठवणी मनावर 'फॉलोऑन' लादत होत्या पण त्याचबरोबर 'इंडियन क्रिकेट नीड्स तू मूव्ह ऑन' वगैरे मॅच्युअर विचार ही मनात येत होते (मॅच्युअर विचार इंग्लिशमध्येच कसे काय येतात देव जाणे)... पण अशा विचार येण्यामागे, पहिल्यांदाच होणारा २०-२० ओव्हर्सचा वर्ल्ड कप आणि टीम इंडियाचा नवीन लूक ह्याबद्दल असणारी उत्सुकता कारणीभूत असावी... टीम अनाऊन्स झाली! युवी, धोनीवगैरे ओळखीचे होतेच. पण एक नाव वाचलं ...... रोहित शर्मा फ्रॉम मुंबई!! "मुंबई क्रिकेट? अर्रे एक नंबर? आपल्याला पहिल्यापासूनच मुंबई क्रिकेटसाठी सॉफ्ट कॉर्नर.. शितावरून भाताची परीक्षा करण्यात आपली पीएचडी.. 
एका फटक्यात ... 'रोहित म्हणजे पुढचा सचिन वगैरे.. शेवटी आपली मुंबई बॅट्समन आहे बॉस' वगैरे बोलून मी हवेत गोळीबार करून टाकला होता!  

टी २० वर्ल्ड कप सुरु झाला...  माझी अनाउन्समेंट त्याच्यापर्यंत पोचली कि काय असं वाटण्याइतकं तो एकदम जबाबदारीने आफ्रिकाविरुद्ध मॅचमध्ये खेळला! पहिल्या काही मॅचेस मध्ये त्याला चान्स मिळाला नव्हता.. पण सेमी फायनलला जाण्यासाठी अशा 'मस्ट विन' गेम मध्ये तो खेळला आणि  ते सुद्धा एक मॅच्युअर प्लेयरसारखा. टीमला गरज असताना आणि परिस्थितीला अनुरूप असा. ४ आउट  ६० अवस्था असताना हा नवखा आला आणि काहीही प्रेशर जाणवू न देता धोनी बरोबर एक अतिशय महत्वाची पार्टनरशिप केली. करियरच्या सुरवातीलाच आपले खांदे मोठठी जबाबदारी उचलण्यासाठीच आहेत हे दाखवून दिलं! आणि सर्वात महत्वाचं होतं - t२० आहे म्हणून उगाचच हाणामारी न करता शांतपणे पीचचा आदर करून ४० बॉल ५० रन्स केले! ह्या सामन्यानंतर पुढे फायनलसुद्धा खेळला..पहिल्या मॅच मध्ये शांतपणे खेळणारा, पाकिस्तान विरुद्ध मात्र आपल्या भात्यामधले विविध फटके मारत होता आणि पुन्हा एकदा टीमला उपयोगी अशा १५ बॉल ३० रन्स काढून आपण एक परिपक्व खेळाडू आहे हे दाखवून दिलं!  ह्या २-२ छोटया पण महत्वपूर्ण इनिंगमुळे धोनीचा काय ... माझाही रोहितवरचा विश्वास वाढला! त्याची बॅटिंग म्हणजे स्वछ नैसार्गिक गुणवत्तेनी वाहणारी, बघितल्या बघितल्या  मन प्रसन्न करणारी नदी आहे ... असं काहीसं मला वाटून गेलं! 

रोहित... तसा जन्मानी बनसोडचा म्हणजे नागपूरकर. पण बालपणापासून मुंबईकरच...आणि तसं ही 'मुंबई क्रिकेटचे' गूण अंगात भिनण्यासाठी मुंबईत जन्म घेणं महत्वाचं नसत.. पण आयुष्यातली पहिली रन किंवा पहिली विकेट ही मुंबईत काढलेली असावी लागते ! मग ती गल्लीमधली असो वा  शिवाजी पार्कवर...!! घरची परिस्थिती अत्यंत साधारण असलेल्या  रोहितच बालपण मात्र गेलं बोरिवलीला, काकाकडे.  तिकडेच लागलेली क्रिकेटची गोडी आणि  शाळेत कोच म्हणून मिळालेले 'लाड' सर अशा २ खांबांच्या आधाराने रोहित नामक खेळाडू घडत गेला... मुंबई क्रिकेटचे संस्कार, साहजिकच आलेला मुंबई क्रिकेट स्पेशल खडूसपणा ,अंडर १९ मधली जोरदार कामगिरी ह्या अशा अनेक गोष्टींमुळे नैसर्गिक गुणवत्तेच्या नदीचा आता समुद्र झाला होता आणि त्याच्या उसळणाऱ्या लाटांचा पहिला अनुभव घेतला तो २००५ साली,  सेंट्रल झोननी! रोहितच्या बॅटमधून १४२ रन्स निघाल्या होत्या!! अर्थातच अससोसिएशन मध्ये त्यांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.. पुढच्याच वर्षी म्हणजे २००६ ला इंडिया ए आणि रणजी अशा दोन्ही महत्वाच्या स्पर्धांमध्ये (हो,तेव्हा आयपीएल नसल्यामुळे रणजी ला महत्वाचं मानलं जायचं ) त्याला संधी मिळाली आणि डेब्यू केला. रणजीच्या पहिल्या काही मॅचेस फेल गेल्यानंतर मात्र त्यानी अचानक चंद्रकलेप्रमाणे गिअर वाढवला आणि  गुजरातच्या टीमला 'रोहित-वादळाचा' एक भयानक अनुभव दिला, चौफेर टोलेबाजी करत २०० रन्स मारल्या! समुद्राच्या पोटात कसं अफाट गोष्टी लपलेल्या असतात, अगदीच तसं रोहित कडे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे शॉट्स लपलेले असतात, कुठलाही शॉट खेळल्यावर अर्जुनाच्या धनुष्यातून बाण सुटल्यासारखं वाटत. काहीही असलं तरी रोहितकडे बघताना मात्र बॅटिंग मात्र एकदम सोप्पी गोष्ट आहे वाटून जातं... !

२००६ मध्ये वन डे आणि २००७मध्ये टी २० मध्ये पदर्पण केल्यानंतर हे टीम मध्ये चांगलाच स्थिरावला होता, पण CB सिरीज फायनलला सचिनबरोबर केलेली शतकी पार्टनरशिप त्याच्या करियरमधला माईलस्टोन आहे असा मला फार वाटतं! भारतानं ऑस्ट्रेलियामध्ये ट्राय सिरीज जिंकणं फार क्वचित! त्यात टीम अडचणीत असताना ६६ ची छोटी पण अतिशय महत्वपूर्ण अशी इनिंग खेळून त्यानी ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात हरवायचं हे  आपल्या सगळ्यांचं स्वप्न पूर्ण केलं! त्या पार्टनरशिपमध्ये रोहितची बॅटिंग समोरून बघताना 'पुढची पिढी तयार झाली आहे, आता बॅट सोडायला आपण मोकळे' असं सचिनला नक्कीच वाटलं असेल! 

करियर मध्ये एका मागोमाग भरती सुरु असताना अचानक ओहोटी लागल्यासारखं झालं.. मागून आलेले कोहली आणि रैना हे पुढे गेले. एवढच काय तर २०११ च्या वर्ल्ड कप टीमसाठी सिलेक्शन ही नाही झालं... पण ह्या सगळ्या अपयशानी डगमगेल तो समुद्र कसला... ओहोटीनंतर भरती तर येणारच... काही दिवसांनी इंडियन बॅटिंग लाईन-अप मध्ये 'ओपनर' ची जागा रिकामी होती,, रोहितने त्वरित ती जबाबदारी उचलली... मधल्या फळीचा आता तो ...'आघाडीचा' झाला!! गेल्या १-२ वर्षातला कोरडा दुष्काळ त्यांनी धुवाधार बॅटिंग नी संपवला.... शांत निपचित पडलेला समुद्र खवळला... हरवलेले सगळे शॉट्स बाहेर आले आणि वन डे मध्ये २ डबल सेंच्युरी, ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियात १७१ मग टी २० मध्ये १०० अशा अनेक मोठमोठ्या लाटांनी  समोरच्या बॉलरला चोफेर भिजवलं.. लाटा कसल्या एक प्रकारची सुनामीचं होती ती! आणि आता तो खरोखरचाच आपला 'आघाडीचा' बॅट्समन बनलाय!

मग काही ह्या पठठ्यानी मागं वळून पाहिलं नाही... वन डे असो किंवा टी २० किंवा अगदी आयपीएल असो... रोहित शर्मा हा आपला एक महत्वाचा एक्का बनला... रोहित पाहिजेच!! अर्थातच त्याचा फॅन क्लब वाढला, त्याच्यावर जीवापाड प्रेम करणारे फॉलोअर्स वाढले... 
समुद्रासारखाच लहरी असलेला हा रोहित आपल्या चाहत्यांना कधीकधी मात्र भयंकर निराश करतो. अपयश हे प्रत्येक खेळाडूच्या नशिबात असतं पण ज्या प्रकारे कधी कधी हा विकेट फेकतो ते फार आश्चर्यजनक असतं...तिथूनच तो 'ट्रोलर्स'च टार्गेट' बनतो..  मित्राच्या ग्रुपमध्ये कसं एखादा जो जास्त जवळचा वाटतो त्याची जास्त फिरकी घेतली जाते , रोहितचा पण तसंच...  कुठल्याही खेळाडू जेवढा ट्रोल होत नसेल तेवढा रोहितला टार्गेट केलं जातं , त्याची थट्टा उडवली जाते.. पण जे लोकं मस्करी करण्यात पुढे असतात तेच रोहितच्या एखाद्या मोठ्या इनिंग नंतर जास्त खुश असतात! हा लेख लिहिताना सुद्धा त्यानी लहरीपणाची झलक दाखवलीच.. एवढा इन फॉर्म असताना परवा आफ्रिकेबरोबर घाण शॉट मारून आउट झाला आणि आज सेमी फायनलला एकहाती मॅच संपवून दिली! पुण्यातला पाऊस कसा कधी कुठे आणि किती पडेल हे सांगता येत नाही तसंच रोहित कधी काय करेल ह्याचा नेम नाही, कधी कधी कुठले इनोव्हेटिव्ह शॉट्स बाहेर काढून बॉलरला चकित करेल किंवा कधी मिडल स्टंपवरचा बॉल लिव्ह करून स्वतःबरोबरच फॅन्सलापण आउट  करून टाकेल .... कसलाच भरवसा नाही!!

त्याच्या अशाच ह्या लहरीपणामुळे करियरच्या १० वर्षानंतरसुद्धा एवढी गुणवत्ता असलेला मुलगा टेस्ट टीम मध्ये जागा पक्की करू शकला नाही हे  खुपत राहतं .. कोहलीसारखा अग्ग्रेसिव्ह नाही आणि पुजारा एवढा शांत नाही..दोन्हीचं मिश्रण असलेल्या रोहितमध्ये टेस्टमध्ये सुद्धा सुनामी आणण्याची ताकद नक्कीच आहे.. किंबहुना तो असा एक प्लेयर आहे जो एका सेशन मध्ये मॅच सिच्युएशन बदलून टाकेल! 
पण आपल्याला हवी असलेली प्रत्येक गोष्ट मिळतेच असं नाही! कधी कधी उशिरा मिळते आणि त्या गोष्टीचं महत्व पटतं! रोहित च्या बाबतीत टेस्ट टीममध्ये असंच व्हावं, क्रिकेट नामक किनाऱ्यावर बसलेल्या सर्वाना रोहितनी गार वाऱ्यासारखं प्रसन्न करावं, उंच उंच लाटांनी ओलं करावं आणि आयुष्याच्या इंनिंगमध्ये कायमचा लक्षात राहणार आनंद द्यावा .... हीच सिद्धिविनायकाकडे प्राथर्ना...!!

Saturday, June 3, 2017

भारत * पाकिस्तान + वर्ल्ड कप + मित्र = राडा

४ जून ला भारत पाकिस्तान मॅच साठी काय प्लॅन करावा अशा महत्वाच्या प्रश्नामध्ये मी गुंतलो असताना ,काही सेकंदात मी १५ वर्ष मागे गेलो... अगदी "झापझापझाप" वगैरे टिपिकल फ्लॅशबॅकच म्युजिक ऐकत ऐकतच!!
२००३ वर्ल्ड कप , कॉलेज मधला शेवटचाच वर्ल्ड कप.. दादा,सचिन,द्रविड खऱ्या खुऱ्या 'फॉर्म' मध्ये असतानाचा वर्ल्ड कप. शेड्युल बघितलं , १ मार्चला भारत पाकिस्तान!! बस्स... हे बघून सगळ्यांचे डोळे चकाकले... मॅचला काहीतरी करू, एकत्र बघू धिंगाणा घालू राडा करू अशा एक एक फुलबाज्या फुटायला लागल्या.वर्ल्ड कप मध्ये भारत पाकिस्तान म्हणजे त्यांचा पराभव आणि आपला विजय हा एक नियमच आहे , त्यामुळे मॅच हरलो तर काय वगैरे फालतू प्रश्न पडलेच नाहीत. मॅच एकत्र बघू ह्या गोष्टीवर मात्र शिक्कामोर्तब झालं.नंतर साधारण १०-१२ दिवस झाले, मॅचचा दिवस उगवला..आणि अतिशय बोलबच्चन करून बडबड करणाऱ्या सगळ्यांनी शेवटपर्यंत मॅच साठी प्लॅन केलाच नव्हता, नुसते हवेत गोळीबार. तेव्हा पुण्यात स्पोर्ट्स बार एवढे सुरु झाले नव्हते आणि झाले असतील तरी तिकडे ८-८ तास बसायला खिशात पैशेही नसायचे.. त्यामुळे आता आपापल्या घरी बसा आणि जिंकल्यावर एफ सी रोड ला या असा साधा सोप्पा प्लॅन फायनल केला.. थोडासा निराश होऊनच घरी आलो. पण चीज कॊ दिल से चाहो तो पुरी कायनाथ उसे मिळणेकि कोशिश में लग जाती है असं म्हणतात आणि त्याचा मला याची देही अनुभव आला..घरी आल्यावर बघितलं , आई बाबा घाईघाईत निघाले होते मला म्हणले रात्री उशीर होईल यायला किंवा उद्याच येऊ वगैरे..मी अतिशय निर्लज्ज मुलासारखा त्यांच्यासमोर ओरडलो "बेस्ट, उद्याच या". त्यांनी डोक्यावर हात मारून घेऊन काढता पाय घेतला!
घरात जाऊन रप्पारप पोरांना फोन लावले... तेव्हा मोबाईल वगैरे काही नव्हते , लॅण्डलाइनवरच सगळं. "घरी कोणी नाहीये , दुपारी २.३० ला माझ्या घरी , तारा वर या"! अर्ध्या लोकांना मी फोन केले, बाकीच्यांना अमेयनी . बेस्ट वाटत होतं.. ठरल्याप्रमाणे अमेय आला आणि आम्ही झेंडा,माउंटन ड्यू वगैरे तयारी केली..फुल्ल excitement. रस्त्यावरुन जाताना लोकांमध्ये पण घरी पोचायची घाई दिसत होती..खिशाला परवडेल एवढं खाण्याच्या वगैरे गोष्टी घेऊन घरी आलो. तेवढ्यात टॉस झाला , सेन्च्युरियनच्या आलिशान अशा स्टेडियममध्ये मॅच ! आपले दादासाहेब टॉस हारले, पहिली बॉलिंग आली! , १० ओव्हर झाल्या तरी पाकड्यांची एकही विकेट पडली नव्हती आणि फोनवर हो हो म्हणलेल्यांपैकी कोणीही आलं नव्हतं, जरा बोर झालं होतं ... आम्ही दोघे शांतपणे सकाळवगैरे वाचत बसलो...
तेवढ्यात झहीरनी तौफिक उमर चा एक जोरदार त्रिफळा उडवला आम्ही दोघांनी, घरात खूप गर्दी आहे...आम्ही लै एन्जॉय करतोय असं भासवून स्वतःलाच खुश करण्यासाठी खूप आरडाओरडी केली...आणि एक 'टेम्पो' सेट करायचा प्रयत्न केला..आणि तेवढ्यात घराची बेल वाजली. आमच्या ग्रुपमधील एक से एक वल्ली लोकं - अमोल , अप्प्या ओंकार , सागर dungule , अजिंक्य चुटके दारात उभे होते!! मी हुश्श केलं , जणू काही अक्ख BMCC घरी आल्यासारखं मला वाटलं.. माझ्यासाठी हे ६-७ जण म्हणजे अख्ख BMCC च होतं!! आता पहिली विकेट आणि पोरांची एन्ट्री ह्यांनी जान आणली होती.
"माझे इंजिनीरिंग करणारे काही शाळेतले मित्र आहेत त्यांना बोलावलेलं चालेल का " अमोलनी उगाचच मी किती शहाणा मुलगा वगैरे आहे असं दाखवत परवानगी घ्यायचा प्रयन्त केला ,पोरांनी लगेच अमोलला कोपऱ्यात घेऊन त्याचा क्लास घेतला. कुल्कर्ण्यांनी इंजिनीरिंगच्या मित्रांना बोलावलं,फोन ठेवल्यावर - त्यांना अभ्यास वगैरे असतो येणार नाहीत वगैरे म्हणत बी कॉम वाले पडीक असतात हे दाखवून दिल्याबद्दल पोरांनी अमोलचा पुन्हा एकदा क्लास घेतला...
पण जणू काही "बी कॉम वाले पडीक असतात" हे वाक्य पटवण्यासाठीच दारावर उभे राहिले आमचे BMCC - डहाणूकर अशा २ कॉम्बो कट्ट्यावरची मंडळी..
 सुमीत , आनंद ,परीक्षित ,मिनत्या ,जितू राणे आणि मयुरेश बहिरट .. ते लोकं आत येत नाहीत तो पर्यंत स्वागत पाटणकर इथेच राहतो का वगैरे म्हणणारे ४-५ टाळकी आली..
२-३ मिन बोलल्यावर लक्षात आलं.. अमोलची इंजिनीरिंगची अभ्यास करणारी हीच ती पोरं ... योगेश , पराग , बागड , भुक्या आणि पप्प्या  ह्यांची एंट्री झाली.. योग्या भुकीला आधी बघितलं तरी होतं पण पण पप्प्या, बागड्या आणि पराग चे चेहरे एकदम अनोळखी होते..मनात म्हणलं हरकत नाही ...आपल्याला गर्दी करून राडाच घालायचं.. BMCC , डहाणूकर , इंजिनीरिंग असे वेगवेगळे दिशांचे लोक तारा मध्ये बसून आफ्रिकामधली मॅच बघत होते तरी काहीतरी मिसिंग वाटत होतं... तेवढ्यात आमच्या ग्रुप मधल्या २ मनोरंजक जोड्या आल्या .. एका गाडीवर मितेश  --Rohan बोरावके आणि दुसरीवर अभिषेक -अमित.... अभिषेकने आल्या आल्या खेमराजमुळे उशीर झाला वगैरे काहीतरी बोलून उशीर का झाला ह्या न विचारलेल्या प्रश्नाचा उत्तर द्यायचा निरर्थक प्रयत्न केला... अमित मगरनी मात्र मात्र शांतपणे जिथे रिकामी जागा दिसेल तिकडे जागा घेतली! मागून मितेश आणि बोरावके आले, दारातून आत घुसल्या घुसल्या जमलेली गर्दी बघून - 'आयवोय' एवढिच त्याच्या स्टाईल मधली रिअक्शन दिली' आणि गर्दी कडे बघत बघत आत गेला..बोरावकेनी कोपऱ्यात ठेवलेला झेंडा बरोबर शोधला आणि घेऊन बसला.. अशा प्रकारे गेल्या ३० मिनटात घरातल सगळं चित्रच बदलून गेलं होता , अब्दुल रझाक येऊन आउटपण झाला होता कोणाच ही लक्ष नव्हता .. थोडं नीट बघितल्यावर इंझमाम बॅटिंग ला येताना दिसला , अमेयनी अतिशय आत्मविश्वास दर्शवत, हा भा$%$ जाडा इंझमाम पळणार नाही आणि रन आउट होणार बघा वगैरे बोलून दाखवला.. जमलेल्या २०-२२ लोकांनी त्याला अजिबात प्रतिक्रिया दिली नाही. आणि साधारण पुढच्या ५ मिनटात वगैरे इंझमाम आऊट झाला... ते सुद्धा रन आउट .. अमेय 'मला विचारात जा क्रिकेटबद्दल' ...वगैरे डायलॉग मारून हवा करायचा प्रयन्त करत होता... पोरांनी ह्यावेळेस मात्र त्याला प्रतिसाद दिला आणि इंझी ला भा ची बाराखडी ऐकवली..
नंतर यसुफ योहान आला, ५-६ ओव्हर झाल्या विकेटच पडत नव्हती.. दुसरीकडे सईद अन्वर खूपच भारी खेळात होता. मॅच जरा बोर व्हायला लागली आणि लोकही अजून ओपन अप झाली नव्हती.. अप्पू च्या ते लक्षात आलं... "मी माउंटन ड्यू" आणायला गेलो आणि त्या दुकानातल्या बाई ला "डू द ड्यू" द्या असं बोललो " हे असे अतिशय तयार केलेले विनोद ऐकवून खेळीमेळीच वातावरण करायचा प्रयत्न केला. योगेश जोशींनी दिलेली "हा काय 'वाय झेड' आहे का?" रिअक्शन ऐकून अप्पू ..हा हा वगैरे हसून गार पडला ...मग अमोलनी डी मोंगिया हा किती महान खेळाडू आहे वगैरे फालतू बडबड करून वातावरण पुन्हा हलकं आणि बोलकं करायचा प्रयत्न केला.. BMCC च्या पोरांनी अमोल कसा सध्या उमा उमा करत असतो अशी एक महत्वाची बातमी इंजिनीरिंग च्या पोरांना पुरवली! बस्स झाला तर मग अशा ह्या 'क्रॉस ट्रेनिंग' मुळे सर्व मुलं एकत्रपणे नंदू लागली आणि स्वागतआजोबाना एक समाधान मिळालं. भुक्या ने त्याच्या बोलण्याच्या घाण स्पीडमध्ये उमा हा सोप्पा शब्द सुद्धा घाणप्रकारे कसा उच्चरत येतो ह्याच एक प्रात्यक्षिक दाखवलं...
मिन व्हाईल, योहाना - अन्वर पार्टनरशिप १५ एक ओव्हर्सची झाली, मॅच जाते कि काय भीती वाटायला लागली होती. लोकांचं लक्ष लागत नव्हतं , चलबिचल होत होती.. आमचचा कॅप्टन ओंकार थोरात कंटाळा येऊन बाल्कनी मध्ये गेले ...आणि जादू झाल्यासारखा युसूफ योहान 'सॊफ़्ट आउट झाला. आणि थोरात नी जागा सोडल्याचा परिणाम चाणाक्ष लोकांच्या च्या नजरेतून सुटला नाही..थोरात ला पुढची सगळी मॅच बाल्कनीमधूनच बघण्याचा आदेश देण्यात आला. आफ्रिदी आला ,आल्या आल्या त्यांनी २ चौकार मारले पण काय आश्चर्य! चक्क डी मोंगिया ने त्याला आउट केलं.. घरात डी मोंगिया वरून अमोल आणि अमोलवरून उमा चा जयघोष सुरु झाला ..साधारण पुढची १० मिन उमाच्या नामस्मरणानी तारा दणदनून गेली..
फायनली पाकिस्तानची बॅटिंग संपली .. २७४ टू विन!!!
आपणच ५० ओव्हर्स फिल्डिंग केलीये ह्लअशा आवेशात अख्खी गॅंग स्वीकार वर खायला गेली.. खाऊन घरी पोचलो ते हि परफेक्ट टाइम ला ... सेहवाग नी वकार ला जोरदार ६ मारला थोड्या वेळात तेंडल्या नी अख्तर ला जोरदार ठोकलं , खरा दंगा सुरु झाला. भयंकर आरडाओरडी.छोट्याश्या हॉल मध्ये २५ एक लोक भयांकर आवाज करत होते. तारा हलली होती, ते ऐकून वरचा क्रिकेट पंडित अक्षय  पण आम्हाला जॉईन झाला! दंगा सुरूच!! आणि अचानक सेहवाग आणि गांगुली आउट झाले.. लोकांनी ओंकार ला पुन्हा बाल्कनीमध्ये पाठवले. बहिरट अचानकपणे खालती गेला आणि ५ मिनटात धावत धावत वर आला.. शेजारच्या रिकाम्या प्लॉटवर एक आंब्याचं झाड होतं , त्याच्या कैऱ्या काढून आणल्या होत्या ह्या पट्ठ्यानी!!
थोडं टेन्शन होतं पण सचिन असल्यामुळे निश्चिन्त होतं, सचिन फुल्ल फॉर्मात खेळत आणि अचानक सुमित आणि अंड्या ह्यांना सूर गवसला आणि अतिशय भावनिक कविता त्यांनी केली..
"हा बघ हा , तो बघ हा ... हा बघ तो , तो बघ तो. "असे अतिशय अर्थपूर्ण शब्दांनी कविता सजवली होती.सचिन आणि कैफ सेट झालेत असं वाटत असतानाच आफ्रिदीने कैफ ला बोल्ड केलं आणि त्या क्षणी आफ्रिदीच्या आईचा जयघोष झाला. हे सुरु असताना अचानक बेल वाजली , वॉचमन कंप्लेंट करायला आला होता पण एवढी लोक बघून प्लिज हळू अशी वगैरे रिक्वेस्ट करून गेला. हे अर्थातच हे बघून लोकांनी आवाज डबल केला ... पुन्हा बेल वाजली..आता मात्र ह्या वॉचमनच्या &&&&& वगैरे करत दार उघडला आणि सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. साक्षात सुरजित मॅच बघायला आले होते...आल्या आल्या कोणाची मॅच आहे रे असे अवघड प्रश्न विचारून मेहेंदळे चा क्लास घ्यायचा प्रयत्न केला.. पण हरतील ते मेहेंदळे कसले. ते अख्ख प्रिपरेशन करून आले होते.. आल्या आल्या "अन्वर किती छान खेळला " वगैरे पाठांतर केलेलं वाक्य बोलून दाखवून सर्वाना गप्प केलं.
कैफ आउट झाल्यावर द्रविड आला..आणि पूर्ण मॅचमधलं सगळ्यात जास्त टेन्शन मला तेव्हा आलं... काहीही कर पण आउट नको होऊस एवढीच पार्थना मी करत होतो...जर द्रविड आउट झाला असता तर माझ्याच घरातून मला हाकलूनही देण्यात आलं असतं ..सुदैवानी द्रविडशेवट पर्यंत नॉट आउट राहिला...मॅच जिंकली, ओंकारला बाल्कनी मधून हॉलमध्ये यायला मिळाला, एकच दंगा सुरु झाला.. फटाक्यांपेक्षा जास्त आवाज होता!!!
रोहन बोरवक्यानी इतका वेळ हातात पकडलेला झेंडा शेवटी उंच धरला आणि नाचायला लागला....आणि खळळळ....आवाज झाला. भारताच्या उंचावलेल्या झेंड्यानी आमच्या हॉल मधलं झुंबर फुटलं होतं.... आई बाबा दारात उभे होते!!
पुढच्या १० मिनटात माझ्यासकट सर्वानी एफ सी रोड गाठला ....

अमेय - हॅपी बर्थडे ......रिटर्न गिफ्ट पाहिजे!!!


"द्रविड आजकाल प्रेशर घेऊन लै स्लो आणि त्यामुळे अतिशय फालतू खेळतोय" .. हॉटेल शुभा मधल्या स्वस्त आणि मस्त चिकनचा घास घेता घेता अमेय हे चक्क 'माझ्यासमोर' बोलला... अमेय जोशीबरोबरची ती आपली पहिलीच भेट. केवळ पहिलीच भेट आहे म्हणून समोरच्याला खुश वगैरे करण्यासाठी मनात एक आणि शब्द वेगळेच असं काही झालं नाही! आपल्याला आवडलच हे.. जे वाटतं ते तो बोलला....! त्या २ तासात खूप गप्पा झाल्या...अनेक विषयांवर चर्चा झाल्या... अगदी वाजपेयींपासून ते शेजारच्या पोरींबद्दल! आपल्याला पटून एकदम गेलं हा...!

तसं म्हणलं तर, अमेय आणि माझं शाळा- कॉलेज सगळं वेगळं होतं...पण  ११वीच्या सुट्टीत अभिषेक सुभेदार आणि जोशी हे एका नेट कॅफेमध्ये 'सो कॉल्ड' जॉब करायचे! AC, फुकट इंटरनेट आणि ह्या व्यतिरिक्त पगारसुद्धा मिळायचा त्यांना.  ह्या अशा ३ गोष्टींमुळे हा एक नंबर जॉब होता!! तिथेच अभिषेकनी अमेयशी ओळख करून दिली! त्यांनी ती नोकरी फार फार तर १ महिना वगैरे केली असेल पण ओळख मात्र जन्मभराची झाली!!

टापटीप कपडे... शक्यतो लेटेस्ट फॅशनचे, विविध स्टाईलचे काळे चष्मे घालण्याची सवय, भांग न पाडता वाऱ्याच्या दिशेनुसार बदलणारी हेअर स्टाईल  (DDLJ मधल्या राज टाईप  स्टाईल वगैरे), जबड्याचा खालचा भाग वरच्या भागाच्या पुढे आणि  ११ वीपासूनच ढु खाली २ व्हिलर, तब्येतीने ना आमच्यासारखा लठठ ना अमितसारखा बारक्या.साधारण असा काहीसा असणारा अमेय भेटला. भेटल्या भेटल्या त्यानी बटर चिकन खायला जायचा प्रस्ताव मांडला.. मी बाहेर कितीही भाई बनायचा प्रयत्न करत असलो तरी घरी एकदम साधासुधा असायचो. त्यामुळे हे असं घरी न सांगता बाहेर जेवायला जायची पद्धत नव्हती. पण त्या एका बटर चिकननी... 'बाहेर हादडायचं आणि घरी येऊन जेवायचा सेकण्ड राउंड करायचा' ही नवीन प्रथा सुरु झाली!

३६ गूण जुळल्यासारखे झाल्यामुळे आता आमचा २४ तास एकत्रच शिट्ट्या मारणे हा कार्यक्रम सुरु झाला होता. सुभेदार, मगर, जोशी आणि पाटणकर..असे आम्ही चौघे यतेच्छ बागडायला लागलो. चौघंही कर्क राशीचे त्यामुळे चौघांचे ही ग्रहसुद्धासारखेच फिरायचे! इतके सेम फिरले कि चौघांनीही जोशात 'सीएस' करायला घेतलं, १ वर्षभर अतिशय दंगा करून सोडून सुद्धा दिलं!!

असं म्हणतात ना लग्नाच्या गाठी स्वर्गात वगैरे बांधल्या जातात .. पण खऱ्या मित्रांच्या गाठी ह्या नक्कीच कॉलेज दिवसात बांधल्या जातात ह्या मतावर आपण एकदम ठाम आहे .. त्या ११ वी मधल्या सुट्टीत अमेयबरोबर अशीच गाठ बांधली गेली ...जी उत्तरोउत्तर घट्ट होत गेली! अमेय जोशी! म्हणजे तेव्हाच अम्या आत्ताचा नाना , २ लार्ज झाले कि होणारा नानूटली!!

मग 'काहीही करणं, किस्से करणं ' हे आमच्या दैनंदिनीचा एक भागच होऊन गेलं. घरी आई सोळा सोमवारचं व्रत करत असतानाच अमेय आणि मी , शंकराच्या  मृत्युंजयेश्वर मंदिरासमोरच्या हॉटेल शुभामध्ये पडीक असायचो सोमवारीसुद्धा! शंकराच्या चेहऱ्यावरचा राग मला स्पष्ट दिसायचा तेव्हा!!!

शुभाच्या मालकांनीपण त्याच्या कोंबड्या जेवढ्या बघितल्या नसतील तेवढ्या आम्ही त्या खाल्ल्या होत्या. हे रात्रीचं एक्सट्रा जेवण कमी पडायला लागलं  म्हणून काय तर दुपारचं 'तिरंगा' सुरु झालं होत.. आणि हा पठ्ठ्या घरी सांगायचा काकाकडे जेवलोय आणि काकाकडे 'घरी जेवायला चाललोय' सांगितलेलं असायचं... माझी मात्र लागायची. दिवसात साधारण ४-४ वेळा जेवण करून माझ्या पोटाचा साईझ मात्र वाढायला लागला होता! नंतर नंतर जेव्हा हॉटेल सुचणं हे बंद व्हायला लागल्यावर तर रस्त्यात डावीकडून ५ व हॉटेल दिसेल तिथे खाऊ वगैरे ठरवून ऍक्च्युली तिकडे खायला जायचो!! कधी कधी तर फारच नवीन शोध लागले आणि कधी कधी अमृततुल्य मध्ये जेवण भागवावं लागलं!!

एफवाय ची परीक्षा संपल्यावर तिरंगामध्ये जेवायला गेलो.. दोघेच होतो.. अति उत्साहात होतो .. वेटरला ऑर्डर दिली चिकन हंडी- गावरान! वेटरनं शांतपणे विचारलं "अजून कोणी येतंय का...?? दोघांना खूप होईल वगैरे"... आमचा इगो हर्ट झाला. म्हणलं "आता आणच" आम्ही दोघांनी ती अख्खी हंडी संपवली ,शेवटी तर पाण्यासारखी प्यायली पण संपवली.. पुढचया वेळेस पासून तो वेटर कधीही आमची ऑर्डर घ्यायला आला नाही. ह्यातुन एक स्वतःची वेगळीच कॅपॅसिटी लक्षात आल्यावर अमेयनी तिरंगाच्या २ बिर्याण्या संपवल्या होत्या. नॉर्मल मनुष्य प्राण्याला एक बिर्याणीसुद्धा खूप होते पण अमेयनी थम्बस अपचा घोट घेत घेत २ बिर्याण्या संपवल्या होत्या. ही अचिव्हमेंट जेव्हा आमचे मित्र पप्प्या ढमढेरेला सांगितली तेव्हा त्यांनी "अब कुछ व्हेज हो जाये.. वो भी अनलिमिटेड " वगैरे म्हणून आम्हाला पुन्हा चावी दिली..आम्ही तयारच .. लगेच दुर्वांकुरचा प्लॅन केला. त्यांच्या थाळीतले १५ एक पदार्थ आम्ही साधारण ४-५ वेळा खाल्ले! पण दहीवड्यांची सेन्चुरी केली होती!! अमेय आणि पप्प्यानी दहीवडे वाढणाऱ्या इसमाला एवढा त्रास दिला होता नंतर तो एखाद्या ब्रेक अप केलेल्या गर्लफ्रेंडसारखं आम्हाला टाळायला लागला होता!.. साधारण ३ तास वगैरे हादडून झाल्यावर गाडीवर बसता ही येत नव्हता मग हत्ती गणपती चौकात तासभर आजोबा टाईप शतपावली वगैरे केली आणि व्हेज नशा उतरला!!

एकदा ३१ डिसेंबर च्या रात्री १२-१ नंतर बिनधास्तपणे बाईकवर  फिरत होतो.. दारू वगैरे प्यायली नसल्यामुळे पोलिसांचा लोड नव्हता... दिल चाहता है च्या विषयावरून 'दिल शेप' फुगा कुठल्या तरी मुलीला देऊया असं खूळ डोक्यात आलं... जे एम रोड वरून लाल रंगाचा दिल शेपवाला फुगा घेतला आणि अख्ख पुणे फिरल्यावर शेवटी पौड फाट्यावर एक गोड मुलगी दिसली तिला फुगा देऊन "happy new year" बोललो.. ती पण स्माईल देऊन थँक्स म्हणून गेली.. आमची मजा पण तेवढीच, नंतर ती अनेक वेळा कर्वे रोडवर दिसली... कधी तिचं नाव ही विचारायला गेलो नाही... फक्त दिसल्यावर "अर्रे आज  ३१ डिसेंबर दिसली " हे मात्र एकेमेकाना अजूनही सांगतो!!

२००१ ला पुण्यामध्ये मॅच होती तर कुठून तरी  बजाज स्कुटर ची सोय करून भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही टीमचं स्वागत करायला एयरपोर्टवर साधारण ५ तास वगैरे थांबलो, मॅच नंतर 'लकी' मध्ये जेवता यावा म्हणून नेहरू स्टेडियम ते डेक्कन चालत गेलो, अलका चौकात प्लेयर्स ची बस जाताना श्रीनाथ ला केलेला "हाय", सचिन चे १०० झाले कि मी त्याला किंवा द्रविड बाप खेळला कि त्यानी मला केलेले फोन... Natwest  फायनलला तर ५ आऊट १४७ असताना अमेय चा फोन आला आणि दोघांच्याही घरात आज मॅच गेली अशा चर्चा सुरु असताना आम्ही मात्र युवराज लै जिद्दी आहे असा एकमेकांना समजावत तब्बल १ तास वगैरे फोन सुरु ठेवला ...तो बंद केला तो डायरेक्ट ३२६ रन भारताने काढल्यावरच! मागच्या आठवड्यात एक लेख लिहिताना अमेय बरोबरचे हे क्रिकेट किस्से सपासप समोर येत होते! लै कडक वाटत होतं!!

एस वाय ची गोष्ट असेल, अमेयला भोंडे सरानी अटेन्डन्स वरून पकडला ते ही डायरेक्ट फायनल परीक्षेत! सगळ्यांचीच फाटली, अशा गोष्टी घडतात हे फक्त ऐकलं होतं पण असं बघितलं नव्हतं.. अतिशय फिल्मी पद्धतींनी, भोंडे सरांना आमच्या एका मित्राची परिथिती हलाखीची आहे, म्हणून अमेय मदत म्हणून नोकरी करतो आणि म्हणून अटेन्डन्स नाहीये वगैरे सांगून पटवण्याचा प्रयत्न केला! भोंडे सर पण आमच्यापेक्षा १० पटींनी हुशार.. त्यांनी आम्हाला त्या मित्राला घेऊन या मग बघू वगैरे सांगितलं!! हे अगदीच फिल्मी आणि अवघड होत चाललं होतं... पण मग अमेयनी आमचा एक मित्र, प्रसादला 'हलाखीच्या परिस्थितीतला' बनवून भोंड्यांसमोर आणून ठेवला! भोंडे सरानी स्वतःच्या कपाळावर हात मारून आमच्या कपाळात गेलेल्या घालवल्या आणि अमेयला पास केलं!

परीक्षेच्या आदल्या दिवशी अभ्यासाला भेटल्यावर जनरली लोकं अभ्यासाबद्दल बोलतात पण आमचं मात्र रात्री ४-४ वाजेपर्यंत "भारतातले पिचेस हे फास्ट बॉलिंग साठी हवेत का स्पिनर्स साठी" किंवा आयुष्यात पैसा पाहिजे सत्ता अशा महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यातच आमचा अभ्यास होत पूर्ण होत! अमेय,अमोल आणि अप्प्या जमले कि नुसत कॉफी प्यायला बाहेर पडून डायरेक्ट खंडाळा घाटात अपूर्व मास्तर आमची इकॉनॉमिक्स ट्युशन घेत असे!!

आमची ही गाठ अशा अनके किस्स्यांनी रंगली आहे ते सगळे सांगत बसलो तर फेसबुकचा सर्व्हरवगैरे डाऊन होईल..  पण किस्से करताना अमेयकडून शिकायला ही बरंचस मिळाला! सगळ्यात गोड गोष्ट शिकलो ती म्हणजे  .... अमेयनी 'पु.ल" वाचायला ऐकायला आणि बघायला शिकवले... प्रवाहाविरुद्ध जायला शिकवलं!

जयंत जोशी हे तसे नशिबवानच! अनुप आणि अमेय दोन्ही मुलं टीपीकल प्रोसेस फॉलो न करता स्वतःला जे पटेल तस करतात, जे आवडतं ते करतात. बऱ्याच लोकांची तशी इच्छा असते पण सगळ्यांना नाही जमत हे.  नोकरीवगैरे मध्ये सेट झाल्यावर खूप लोकांकडून "समाजासाठी" काहीतरी केलं पाहिजे, आयुष्यात वेगळं काहीतरी केलं पाहिजे वगैरे डायलॉग ऐकू येतात पण हे शब्द हवेतच विरून जातात..

पण अमेय ह्या सगळ्याच्या एकदम विरुद्ध... स्वतःच्या मेहनतीवर दीपस्तंभ सारखी मोठी टीम त्यानी उभी केली आणि आज त्याच्याकडून अनेक चांगले उपक्रम तो करत असतो! which  is simply great!! ते बघताना खूपच भारी वाटतं!!

गेल्या काही वर्षात ऑफिसमुळे पुण्याबाहेरच राहावं लागलं त्यामुळे नानाबरोबर फारसे 'किस्से करायला' मिळाले नाहीत.. कधी कधी तर त्याच्याबरोबर असणाऱ्यांचा हेवादेखील वाटतो पण होम लोन समोर झुकावं लागत ना! आता तर वर्ष - वर्ष बोलणं होत नाही पण काही हॅपनिंग घडलं कि आपोआप ९८.....२० नंबर फिरवला जातो! मध्ये एकदा मी शिकागोवरून नानासाठी माझ्या आईबरोबर "J D" पाठवली होती (अतिशय निर्लज्ज होऊन).. आणि मित्राच्या आईकडून खंबा कलेक्ट करायला अमेय सुद्धा तेवढ्याच निर्लज्ज मनानी गेला ... कर्क राशीचे ग्रह अजूनही सारखेच निर्लज्ज आहेत!!!  असा आमचा हा अमेय...  त्याच्या घरी त्याला नाना म्हणतात अशी नवीन माहिती मिळाल्यावर मितेश - अमोल च्या कृपेने अमेयचा आमच्यातपण नाना, नुन्नी , नानू वगैरे झाला! परवा 'फ्रेंड्स' बघताना मला शंका आली, जोई आणि चॅन्डलर ह्यांचं नातं आमच्यावरूनच उचललं आहे कि काय... आम्ही खूप खायचं, नानानी पैसे द्यायचे.. आम्ही दिवसभर फालतुगिरी करत राहायचं आणि नाना उगाच मोठ्यामाणसारखा सांभाळून घ्यायचं वगैरे अगदी सेम Joey  - Chandler सारखं!

नानाच अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इव्हेंट प्लॅनिंग ... पिक्चरला जाण्यापासून  ते अगदी गोव्याला वगैरे जायचा एकदम एन्ड टू  एन्ड प्लॅन करणारा नाना मित्रांच्या लग्नात तर वेडापिसा होऊन काम करतो.. त्याच्या उत्साहाला एक वेगळंच रूप येतं, द्रविडचा सेहवाग वगैरे झाल्यासारखा तो लग्नाची कामं करायला झपाटतो.. अगदी बॅचलर पार्टीपासून वरातवगैरे... नाना... सगळं, सगळं मॅनेज करतो, exactly पुलंच्या नारायणासारखं!!

अशा आमच्या ह्या नानाचा आज, ४ जूनला  बर्थ डे ...वर्षातले ३६५ दिवस जेव्हा एकत्र शिट्ट्या मारायचो तेव्हा कधी एकमेकांचे वाढदिवस सेलिब्रेटपण केले नसतील! एवढच काय असं लक्षात ठेवून बर्थडे विशेस पण दिल्या नसतील! काही काही वेळा तर सांगावं लागायचं 'केळ्या, आज बडे आहे आपलयाला विश कर'

पण आज आपण फुल्ल लक्षात ठेवून , एवढ लिहायचे कष्ट घेतले आहेत.. अधूनमधून कौतुक करायचासुद्धा प्रयत्न केला आहे!!! त्याबद्दल थँक्स न म्हणता..

रिटर्न गिफ्ट म्हणून  'जिच्याशी तू लग्न करावं' असं मला ... किंवा अनेकांना वाटतं ... ते पटकन ठरवून तारीख कळवून टाक!!

Friday, June 2, 2017

परेश मोकाशी- मराठी इंडस्ट्रीचा फेडरर!!

"हे नाटक बघताना प्रेक्षक हसून लोळायला लागतो" साधारण १५ वर्षांपूर्वी अशी जाहिरात असलेलं एक नाटक रंगभूमीवर आलं होतं. जितू जोशी होता त्यात बाकी सगळे अनोखळी. जितूचपण पहिल वगैरे व्यावसायिक नाटक असेल कदाचित. आपण तेव्हा भारत नाट्य मंदिर बाहेर पडिकच असायचो, म्हणलं चला तसाही वेळ आहेच आपल्याकडे, तर जरा नवीन लोकांना प्रोत्साहन देऊ, अशा पुणेरी तोऱ्यात तिकिट्स काढली आणि गेलो.. नाटक सुरु होताच एक ५-१० मिनिटात हास्याचे फवारे उडायला लागले. पुण्यात जसं हॉटेलचे रेट्स वाढत जातात तसाच प्रेक्षागृहात हसण्याचा आवाज वाढतच जात होता. कमरेखालचे विनोद,द्विअर्थी डायलॉग्स, आचरटपणा हे असलं काहीही न करता हे नाटक आम्हाला सलग २-३ तास हसवत होतं. मनातल्या मनात गुदगुल्या, मार्मिक विनोद, निखळ हास्य स्मित हास्य , जोरतजोरात हसणं ह्याचा स्लो कुकिंगसारखा इफेक्ट होऊन शेवटच्या अर्धा तासात दुखलेल्या गालांसकट एका सीनमध्ये ऍक्च्युली लोळायला लागलो. हसण्याला इंग्लिशमध्ये लोळ (lol) का म्हणतात हे आय गेस तेव्हा मला कळलं. नाटक होतं, परेश मोकाशी दिग्दर्शित "मुक्कामपोस्ट बोंबीलवाडी"    

परेश मोकाशी!!! माणसानी किती गुणी असावं, कितीकष्टाळू, किती 'बाप' असूनही किती साधं असावं ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे परेश मोकाशी! मला तर अनेक वेळा परेश म्हणजे आपल्या मराठी इंडस्ट्री मधला "रॉजर फेडररच" आहे कि काय असं वाटतं. 

रॉजर फेडररला कोणी 2001च्या आसपास बघितलं असतं तर तेव्हा अंदाज ही आला नसता हा माणूस हा टॅलेंटचा खजिना आहे पुढे जाऊन राजा होणार आहे...तसंच आतासुद्धा त्याला टेनिस कोर्ट बाहेर भेटलं तर जाणवणार नाही आपण एका राजाशी बोलतोय.. आणि एक्साक्टली असंच काहीसं आहे आपल्या परेश मोकाशीचं . इतका सरळ, जमिनीवरच पाय असणारा माणूस कि जर तुम्हाला तो हॉटेलमध्ये...किंवा.....लिफ्टमध्येवगैरे इन शॉर्ट कुठंही भेटला तरी ह्या माणसाला नॅशनल अवॉर्ड मिळालाय , ह्याचा सिनेमा ऑस्कर पर्यंत पोहोचलाय असं काहीही जाणवून देणार नाही!! इथेच परेशबद्दल आदर वाटायला लागतो!

परेश इतका प्रतिभावान आणि गुणी कलाकार आहे कि त्याची प्रत्येक कलाकृती प्रेक्षकांच्या मनाला भुरळ पाडणारी आणि सुखाचे असंख्य क्षण पेरणारी असते. गोष्टींकडे बघण्याची दृष्टी आणि सांगण्याची स्टाईल सुद्धा वेगळीच असते. त्यामुळेच हॉरर, सस्पेन्स, भावनिक,लव्हस्टोरी अशा प्रकारचे सिनेमे बघायची सवय असलेल्या आपल्यासारख्याना त्यानी 'क्युट' हरिशचंद्र दाखवला आणि तो महाराष्ट्र,भारत असं राज्य करत करत ऑस्कर पर्यंत पोचला. तसं बघायला गेलं तर ही हरिश्चंद्राची गोष्ट खूप फिल्मी, ड्रामेबाज पध्दतीनीपण सांगता आली असती! पण परेश! परेशच तसं नाही... दादासाहेबांची धडपड, जुनं लंडन,थेटर अशा अनेक गोष्टी त्यांनी 'क्युट'च दाखवून अख्खी गोष्ट सहज उलगडली .

लहानपणी एखादी गोष्ट बाबा, काकावगैरेनी  सांगितली तर आवडत नाही पण तीच गोष्ट आजीच्या तोंडून ऐकायला गोड वाटते, एक विशेष मजा येते , पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटते! परेश त्या आजीसारखच कुठलीही गोष्ट गोड करून आपल्यासमोर ठेवतो!! 

परेशचं एक वैशिष्ट्य म्हणजे प्रेक्षकांची 'नस' ओळखणं, अगदी फेडरर समोरच्या खेळाडूला ओळखतो तसाच! आपला प्रेक्षकाला काय हवंय हे परेशला माहित असतं आणि त्यामुळेच विनोदनिर्मिती साठी त्याला फारसे वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत. गोष्टीच अशा बांधली जाते कि निखळ विनोद घडत जातो ..तो घडवावा लागत नाही. 

सध्या काही दिग्दर्शकांची एक टीम असते, ते शक्यतो त्याच त्याच लीड ऍक्टर ला घेऊन सिनेमा बनवतात पण परेश, परेशचं तसं नाही. क्ले कोर्ट , ग्रास कोर्ट प्रमाणे गेम जसा बदलावा तसा परेश  गोष्ट,परिस्थितीनुसार कलाकार बदलतो... किंबहुना त्याचे 'पत्ते'च तो वेगळे खेळतो. आणि त्यामुळेच नंदू माधव, नंदिता धुरी अशा 'स्टार पॉवर' नसलेल्या पण 'पावरफुल' परफॉर्मन्स  देणाऱ्यांची लीड रोल साठी निवड होते ..आपलं  प्लॅनिंग, लिखांण ह्या सगळ्यावर अतिशय आत्मविश्वास असल्यामुळेच परेश ही 'स्टार' नसण्याची रिस्क घेऊ शकतो. 

फेडरर काय आणि मोकाशी काय , दोघांचं नेचर हे तसंच सारखंच. शो करायची, हवाबाजीची सवयच नाही ... किंबहुना ती आवडच नाही! दोघांचाही सक्सेसफुल होण्यासाठीचा मंत्र एकच- थोडा वेळ लागला तरी चालेल पण execution पेक्षा जास्त वेळ planning वर इन्व्हेस्ट करायचा... परवाच रॉजर एका इंटरव्हियूमध्ये बोलला- करिअर मोठं आणि हेल्दी होण्यासाठी फ्रेंच ओपन खेळणार नाही, डायरेक्ट विम्बल्डन खेळीन... परेशचं पण तसंच .. भले ३-४ वर्ष कलाकृती केली नाही तरी चालेल पण जेव्हा प्रेक्षकांसमोर काही आणीन ते चांगल्या तयारीनिशी पूर्ण  झालेलं एक 'फाईन प्रोडक्ट' असेल! अशाच प्रकारे अभ्यास करून, व्यक्तिरेखा - छोट्या छोट्या डिटेल्स च निरीक्षण करून हरिश्चंद्रानंतर ३-४ वर्षांनी एलिझाबेथ आला. परेशच्या गोड नजरेतून करमणुकीबरोबर ४ गोष्टी शिकवून गेला आणि खूप सारं  प्रेम मिळवून गेला ... त्याच्या ह्या अपार मेहनतीचं फळ त्याला मिळालं, जेव्हा त्याची ही  गोड कविता एलिझाबेथ ,नॅशनल अवॉर्ड पर्यंत पोचली!!!

एकादशी नंतर अनेक  वर्षानंतर ह्या गुणी दिग्दर्शकाचा नवीन सिनेमा आलाय . ची व चि सौ कां. च्या ३ मिनिटाच्या ट्रेलर मध्ये साधारण ८ वेळा वगैरे जोरदार हसलो... तेव्हाच लक्षात आलं आपला फेडरर ही  ग्रँडस्लॅम मारणारच...आणि झालं हि तसंच!! मुव्ही रिलीज झाल्यानंतर माझ्या भरतनाट्य कट्ट्यावरच्या मित्रांनी फोन करून सांगितलं ...परेशचा नवीन सिनेमा बघ रे.... कडक आहे...... मी त्याला रिप्लाय दिला ----- 'याह, रॉजर दॅट"!!!