Thursday, July 26, 2018

फाळके, सोनी आणि डिफरंट स्ट्रोक्स!

फाळके, सोनी आणि डिफरंट स्ट्रोक्स!


    अनेक वर्षांपूर्वी जेव्हा केबल नावाचं प्रकरण घरी आलं तेव्हा काय बघू आणि काही दिवसांनी काय काय बघू असं व्हायचं.... तेव्हाचं क्रिकेट आत्ता एवढं सारख सारख नसायचं... शिवाय फॅशन टीव्ही कितीही बघावासा वाटला तरी घरात ८-८ डोळे माझ्यावर असायचे त्यामुळे तोही ऑप्शन बंद होता.... अशा वेळेस सोनी टीव्ही नामक गोष्टीनी मोठा आधार दिला.... टीव्हीवर काय बघायचं हा प्रश्नच आपल्याला नंतर कधी पडला नाही बाबा...
       "आहट, फॅमिली नंबर १, हमसे बढकर गॉन्ग,  थोडा है थोडे के जरुरत है वगैरे विविध जॉनरच्या सिरियल्स घरचे बघायचे पण आपली आणि सोनीचं ची गट्टी जमली ती सकाळी ९-११ मध्ये पाठोपाठ येणाऱ्या आय ड्रीम ऑफ जीनी ,३ स्टुजेस, डेनिस द मेनीस आणि डिफरंन्ट स्ट्रोक्स ह्या  सीरिअल्समुळे.... सकाळी ९च्या आधी अभ्यास संपवायचं मोठं मोटिव्हेशन मिळायचं ह्यांच्यामुळे... खरं तर जुन्या इंग्लिश सिरियल्स ह्या , पण मजेदार टोन आणि परफेक्क्ट शब्द वापरून हिंदीमध्ये डब केल्यामुळे एकतर त्या सिरियल्स आणि त्यातले जोक्स कळायचे आणि तुफान हसू यायचं... त्यामुळे बाकी चॅनेल्सवर जे काही लहानमुलांसाठी तत्सम कार्यक्रम लागायचे ते अगदीच तुच्छ वाटायला लागले... ह्या ४ सिरियल्स आणि विशेषतः डिफरंट स्ट्रोक्स बघत बघत सोनी नी आपल्याला टीव्ही बघायची चांगली सवय लावली बघा...आपल्यासारख्या अभ्यासू आणि सिन्सिअर मुलाला अशा रंगीत दुनियेत प्रवेश दिल्याबद्दल आपण सदैवच सोनी टीव्हीला आभारी असणार....एक प्रकारचं अतूट नातंच बनलं आपलं आणि सोनीचं!! 




आता म्हणे पुढील महिन्यात सोनी मराठी नावाचा एक चॅनेल सुरु होतोय....परवाच अमित फाळकेच्या फेसबुक पेजवर  ही अनाउन्समेंट बघितली ... 
खरं तर वेब सिरीजच्या ह्या उगवत्या जमान्यात अजून एक टीव्ही चॅनेल सुरु करणं खरं तर खूप आव्हानात्मक आहे..

पण आपल्याला त्याचा लोड वाटत नाही...ह्याचं कारण म्हणजे अमितचा ह्या क्षेत्रातला असणारा तगडा अनुभव... ९४-९५ साली जेव्हा मम्मो रिलीज झाला तेव्हा आम्हा पुणेकरांना अमित फाळके नावाचा दांडगा मुलगा सेलिब्रिटी म्हणून मिळाला ... अशक्य दंगा असायचा ह्या मुलाचा..... आणि उत्साह तर विचारायलाच नको...  मला आठवतंय एकदा (95-96साली) आमच्या भरतकुंज सोसायटीची गणपती मिरवणूक सुरु होती... तेव्हा काही असं ढोल पथकं वगैरे सोसायटीच्या मिरवणुकीला आणण्याचं फॅड नव्हतं ... आम्हीच आपले ढोल बडवत मिरवणूक पुढे 'ढकलत' होतो .... कोणाचा तरी वर्गमित्र म्हणून अमित आला होता... त्याला ते 'बोर' वादन सहन नाही झालं बहुतेक, ओळख ना पाळख अचानक ताशा जातात घेतला आणि दे ठेऊन ...... पूर्ण मूडच बदलून टाकला कि हो साहेबानी!! दिसायला एवढंसं टिल्लू होतं ...म्हणजे खरं तर कॉलनीतल्या मोठ्या पोरांच्यामध्ये दिसत ही नव्हतं... पण त्याच्या नॉन स्टॉप वादनाने मिरवणुकीत जान आणली.... फाळक्यांनी ती मिरवणूक आमच्यासाठी मोस्ट मेमरेबल  करून टाकली! लै बाप!
            त्यानंतर तो बॉबी देओलच्या करीबमधे दिसला ...मग मात्र आमचा हा सेलिब्रिटी मुलगा ऑनस्क्रीन कधीच दिसला नाही ..... त्यानी ठरवलंच होतं ते !! जो मुलगा १५-१६ व्या वर्षी अभिनयात यश मिळालेलं असूनही ते ग्लॅमर - प्रसिद्धी नाकारून बिहाइंड द कॅमेरा जातो... स्टुडिओत काम करतो आणि टप्प्याटप्प्याने झी,स्टार अन मग सोनी असे डिफरंट स्ट्रोकस मारत हा माणूस मोठ्या झेप घेतो... त्याच्याकडे किती दूरदृष्टी असेल! वयाच्या 16व्या वर्षी यशाच्या शिखरावर असूनसुद्धा आपल्याला नक्की काय करायचंय हे ठरवून मार्गच बदलणाऱ्याकडे किती धाडस असेल!!! 
       त्याचं हेच 'धाडस आणि दूरदृष्टी' नवीन चॅनेलचं चॅलेंज स्वीकारायला आणि यशस्वीरित्या पार पाडायला महत्वाचं ठरेल.... अर्थातच हे शिवधनुष्य पेलायला तो काही एकटा नाही... एक हार्ड वर्किंग टीम त्याच्या बरोबर आहे...  मनोरंजन क्षेत्रातील प्रत्येक लहान मोठी गोष्ट जाणणाऱ्या अजय भालवणकर सरांनी पाहिलेलं हे (सोनी मराठीचं) स्वप्न पूर्ण करायला त्याच्या जोडीला आलेली सोहा, अमित भंडारी आणि अमित फाळके ही 3 गुणी पोरं!कलेच्या अंगणात बागडणारी सोहा आणि मराठीत प्रथमच सिनेरिव्ह्यू हा प्रकार हिट करणारा अमित भंडारी अशा गुणवान लोकांना मिळणारा दिशादर्शक अजय सरांचा गायडन्स...एकदम परफेक्ट टीम कॉम्बो!! 



  
डिफ्रंट स्ट्रोक्समध्ये जसं 3 पोरं 'अरनॉल्ड,विलीस,डाना' आणि त्यांचा बाप फिलिप असे चौघे एकत्र येऊन धमाल करतात एकदी सेम टू सेम कॉम्बिनेशन असलेली सोनी मराठीची ही जबरदस्त टीम....(टीम कसली, फॅमिलीच म्हणा ना) आता आपल्या भेटीला येतीये पुढच्या महिन्यापासून.नवीन चॅनेल आणि त्या बरोबर नवीन नाती, नवीन स्वप्न, नवीन संधी घेऊन येणाऱ्या ह्या अजय, सोहा, अमित आणि अमित ह्या सोनी मराठी फॅमिलीला लै मनापासून शुभेच्छा!!!

भिडा तुम्ही...(फक्त एकच विनंती....एकाच माणसावर 3-3 वेगळ्या अँगलनी कॅमेरा फिरवून ढिशधुशढिश म्युझिकचा मारा करणाऱ्या सिरियल्स फक्त कमी आणा.....मग यश तुमचंच आहे!)


                                                -स्वागत पाटणकर

Monday, July 16, 2018

पाळीव प्रेम

शेपटी हलवून ते आनंद साजरा करतात...
कधी कधी तर संपूर्ण देहबोलीतून ते व्यक्त होतात!
निरागस डोळ्यातून ते आपलं मन वाचतात..
खरं तर ते आपल्याशी नेहमीच बोलत असतात..
ज्यांना त्यांचे शब्द ऐकू येतात
तेच खरे भाग्यवान असतात!
दुष्ट, कपटी, लोभीपणातून कायमचे भिन्न झालेले असतात...
खऱ्याखुऱ्या प्रेमाचा झरा उडवत, कुटुंबाचा अविभाज्य घटक झालेले असतात!!!
तुम्ही बाहेर गावी जाताना व्याकुळ झालेले असतात
आणि रोज संध्याकाळी तुमची ते कासावीस होऊन वाट बघतात
मालक म्हणणाऱ्यांची मला कीव येते
तुम्ही तर त्यांचे पालक बनलेले असता...
आणि मुलगी- मुलगा, भाऊ- बहीण मित्र- मैत्रीण
अशी अनेक नाती 'ते' एकटे... निर्मळ मनानी बजावत रहातात!!
- स्वागत पाटणकर!!!!

'अरे लवकर या रे तुम्ही आता'

'अरे लवकर या रे तुम्ही आता'

चार्जिंग संपत आलेल्या
मोबाईलच्या कोरड्या स्क्रीनवर
शब्द धडकतात
'अरे लवकर या रे तुम्ही आता'

पोटात गोळा
अंगावर शहारे
मनातल्या मनात
घालमेल करून जातात

बघायला गेलं तर असतात शब्द चार
पण लपलेल्या असतात असंख्य भावना...
थेंबाथेंबानी साठलेल्या प्रेमाचा
मुरलेला गोडसर ओलावा...

मायेची ऊब, निरागस अपेक्षा
इवळूस्याची उत्सुकता किंवा बहिणाबाईंची साद
कुत्रीम झालेल्या जगात
अंतकरणाला भिडणारं
असं हे हक्काचं प्रेम
करून देतं जाणिवा
उंच उंच उड रे...पण विसरू नकोस
घर नक्की कुठे आहे...
कोणीतरी आपलंच
तिकडे वाट बघणारं आहे!

कोरडी स्क्रिन
आता ओली आलेली असते
चार्जिंग संपलेला फोन...
आपल्याला डिस्चार्ज करून जातो
- स्वागत पाटणकर 

टाईप्स ऑफ सूख!

टाईप्स ऑफ सूख!

बाळ घरी येतं 
पाळणा हलायला लागतो 
घरातलं सगळं वातावरणच बदलून जातं 
९ महिने चातक झालेलं मन 
क्षणार्धात पालक बनतं...  
वाढती जबाबदारी पेलवण्यासाठी 
अनेक हात जवळ येतात... 
आपल्यांच्या ह्या आपुलकीने 
आपले खांदे मात्र सल्लूसारखे 'ब्रॉड' होतात
आत्ता का रडतोय , डोळे लाल का वाटत आहेत 
सर्दी झालीये का?थंडी वाजतीये का? 
असंख्य वेगळ्याच काळज्या सारखं दार ठोठाववात
हे असं वाटणं म्हणजे आपण बदललोय का ?
असे हे विचार काळज्या असूनसुद्धा एक प्रकारचं सुख देत असतात 
तेव्हढ्यात ते पिल्लू वेड्या बापासमोर खुद्कन हसतं 
बाप निरागस मनानी पुन्हा पाळणा हलवायला लागतो! 

'बाटनेसे बढती है खुशिया' हे कधीतरी ऐकलेलं वाक्य  
आई बाप रोज अनुभवायला लागतात
मिठाई आणली जाते ... विडिओ चॅट केले जातात 
सातासमुद्रापार असून मनाच्या जवळ असणाऱ्यांच्या 
डोळ्यातलं पाणी जेव्हा मोबाईल ओला करून जातं 
बाळासाठी मात्र एक हवंहवंसं लिक्विड डाएट बनलेलं असतं. 
फालतू इगो बाजूला होतात
जुने वाद आता संवादात बदलतात 
हे सोनेरी क्षण साजरी करायला 
अनेक वर्षांची शांतता एका क्षणात माघार घेते 
इगो वगैरे सगळं खोटं असतं म्हणत बापाला ४ धडे शिकवते 
१५ दिवसाचं तो बाहुला बराच काही शिकवून जातो 
बापासाठी मात्र तो एक सुखदायक एक 'क्लास' असतो

बाळाचं पाहिलं रडणं , हसणं 
सगळं काही रेकॉर्ड केलं जातं..
अरे हां... त्याचे फोटो तर प्रत्येक दिवशी
इकडे तिकडे पाठवले जातात ...
एकदम आईची कॉपी आहे, 
एकदम आईवर गेलाय, 
१०० टक्के आईची झेरॉक्स ...
ही सगळी खरी असणारी 
मनाला पटणारी वाक्य 
आता बाप दुसऱ्यांकडून ऐकत असतो 
पराभूत होण्यासारखं काही नसतं 
पण तरी आई म्हणजेच बायकोबद्दलचा 
हेवा आता मनात साठायला लागतो 
काय करणार आता...  
देवाची करणी आणि नारळात पाणी 
वगैरे काहीही सांगून स्वतःला समजावलं 
तरी मन काही हसत नसतं 
असं का असं का म्हणत बसतं 
पण दुखी वाटणारा हेवा मात्र विरघळत नसतो 
जाऊदे पुढे बदलेल रूप 
अशा खोट्या समजुतींचा खोटा प्रयत्न सुरु असतो 
ह्या एका वेगळ्याच अडचणीत सापडलेला बाप 
एक दिवस दाढी करताना आरशात बघतो 
आणि कळत- नकळत ... ध्यानीमनी नसताना 
त्याला त्याच्या प्रतिमेत अचानक बाळाचा भास होतो 
आपल्या चेहऱ्यात बाळाचा चेहरा दिसायला लागतो
हा चमत्कार पोटात गोळा आणतो हातापायावर शहारे 
बायकोचा वाटणारा  हेवा आता सुखदायक बनलेला असतो 
बाप मात्र डोळ्यात पाणी आणून 
पुन्हा पाळणा हलवायला लागतो ...
-
स्वागत पाटणकर

Friday, July 13, 2018

जोशीली जादू - जितेंद्र जोशी

 जोशीली जादू - जितेंद्र जोशी 

  अनेक वर्षांपूर्वी अल्फा मराठीवर हाउसफुल, कॅम्पस वॉर अशा काही सिरियल्समधून एक गोंडस चेहऱ्याचा मुलगा सारखासारखा दिसायचा... सारखा सारखा दिसायचा कारण त्या दोन्ही सिरियल्स न चुकता बघायचो आपण ....  ते अँकरिंग तो इतकं वेगळ्याच ढंगात करायचा ... वाटायचं त्याच्याशी गप्पाच मारतोय आपण... बोलायची एक वेगळीच स्टाईल, स्पष्ट उच्चार, कुरळे केस, चष्मा, 'मुली/ मुलींच्या आया / मावश्या/ काकवा' अशा अनेक जणी प्रेमात पडतील असे चेहऱ्यावर अतिशय निरागस भाव असलेला तो... म्हणजेच  जितेंद्र जोशी... !! त्याचा टोटल अपिअरन्सच असा होता की शाळेत नेहमी पहिल्या बेंच वर बसून पहिला नंबर येणाऱ्या मुलासारखा तो 'वाटायचा' ... असो अभ्यासाबद्दल जास्त नको बोलायला ... पण त्याची ती अँकरिंग करण्याची एक वेगळी स्टाईल बघून हे काहीतरी  वेगळंच रसायन आहे हे सारखं वाटून जायचं.



          अर्थात, माझ्यासारख्या सामान्य प्रेक्षकाला जे जितुमधे दिसलं ते इंडस्ट्रीमधल्या जाणकार लोकांनी नक्कीच ओळखलं असणार आणि त्याशिवाय त्याच्या करियरमधला मोठा माईलस्टोन ठरलं कॅम्पसवॉरसाठी मिळालेलं त्याला अल्फा अवॉर्ड .... जितूची एक मोठी उडी होती ती. अभिनयाच्या क्षेत्रात ठसा उमटवण्यासाठी घेतलेली मोठी उडी. घडलय बिघडलय, हाऊसफुल, कॅम्पस वॉर झी मराठीच्या ह्या सिरियल्स म्हणजे मेजर बूस्ट होता जितू साठी... त्यानंतर मात्र जितूभाई सुटलेच.... 'मग त्याने मागे वळून बघितले नाही' वगैरे काहीतरी म्हणतात ना तेच जितूच झालं.  पक पक पकाक सारखा सिनेमा, ३ चिअर्स , मुक्कामपोस्ट बोंबीलवाडी, हम तो तेरे आशिक है सारखी नाटकं असं इकडे तिकडे सगळीकडे हा गोंडस चेहरा दिसायला लागला. हे सर्व बघताना, अँकरिंगमधलं अभिनय कौशल्य हे फक्त ट्रेलर होतं हे जाणवायला लागलं...  हा जोश्या आता मनसोक्तपणे बेभान होऊन गुण उधळायला लागला होता ... त्याचं सर्वात ज्वलंत आणि माझ्या मनात खोलवर रुजलेलं उदाहरण म्हणजे 'मुक्कामपोस्ट  बोंबीलवाडी'!! टोटल रिस्पेकट हो....एकदम टोटल रिस्पेकट वाटू लागला आपल्याला जोशीबद्दल!. समोरच्या माणसाला २ तास सलग हसवायचं अतिशय अवघड काम हा पोरगा एकदम इझ मध्ये करत होता. जितूच्या अवलिया टोनमधला "अरे नारी, तुम इस घने जंगल में ....." डायलॉग बाहेर पडल्यावर प्रेक्षकांना हसता हसता खुर्चीवर ऍक्च्युअली लोळताना बघितल्याचं मला आठवतंय. पण शहाणी माणसं एकच गोष्ट सारखीसारखी न करता वेगळ्या प्रयत्नांवर भर देतात. ह्या पठ्याने सुद्धा  स्वतःला कधीच विनोदी भूमिकेपुरता मर्यादित ठेवलं नाही. विनोदी भूमिकांमध्ये यश मिळत असताना तो 'नकळत सारे घडले' मध्ये एका वेगळ्या विषयातून आपल्यासमोर आला. एकदम आउट ऑफ कम्फर्ट झोन! विक्रम गोखले आणि  स्वाती चिटणीसारख्या दिग्गजांबरोबर त्यांनी तेवढ्या ताकदीने आजचा तरुण सादर केला होता. जितेंद्र जोशी अजब आहे ह्यावर मी ठाम झालो होतो.

         त्यानंतर वेगळ्या स्तरावर सुरु झालेला जोशीचा प्रवास टप्प्याटप्प्यावर आपल्या सर्वाना मनापासून मनोरंजनरुपी आनंद देतच आलाय ... तुकाराम, दुनियादारीमधला साई, बाजीमधला मार्तंड, शासन, सुम्बरान इथपासून ते दोन स्पेशलमधला मिलिंद भागवत हे सर्व जण 'जितू जोशी आणि अष्टपैलू' ह्या विशेषणाची गाठ अजून घट्ट करत गेले. ह्या अनेक साऱ्या भूमिकांमधून तो वैविध्य राखून तो आपली समोर आला...ह्या सर्व पात्रांना अक्षरशः जिवंत केलं जितुनी .... पण मला त्याची आवडणारी गोष्ट म्हणजे त्याला लोकांच्या मनात ठसा उमटवण्यासाठी भूमिकेची लांबी गरजेची नसते .... छोट्या रोल्स मध्ये सुद्धा तो येतो आणि आपलं मन जिंकून जातो... शाळा पिक्चरमधला नरूमामा हा अगदी तसाच... "Life is what happens to you when you are busy in making other plans” हे खरं वाक्य फार फेमस.. पण जेव्हा जेव्हा हे वाचतो तेव्हा ते जितू जोशींच्याच आवाजात माझ्या कानात पडतं.... छोट्या भूमिकेतसुद्धा आपल्या अभिनयाची ताकद तो दाखवून जातो.. नुकतेच आलेले पोश्टर गर्ल, बघतोस काय मुजरा कर, व्हेंटिलेटर अशातून जोश्याची ताकद वाढलेलीच दिसते. 

   खरं तर  जितूच्या प्रवासाबद्दल लिहायला खूप काही आहे...परंतु चतुरस्त्र, अष्टपैलू, ऑलराऊंडर, व्हर्सटाईल... वगैरे वगैरे सर्व शब्दांमध्ये पीएच डी केली आहे.   जोश्या पडद्यावर कधी हिरो असतो, कधी राजकीय नेता असतो, कधी वडील तर कधी मुलगा , कधी अँकर असतो तर कधी ७०-८० दशकातला गुंड देखील असतो ..बरं, हे झालं अभिनयाचं .... बाकी नीट बघितलं तर तो मराठीत तर असतोच.......मग जरा हिंदीमध्ये जाऊन येतो ....अगदी गुजराथीमध्ये पण काम करून येतो ....अर्रे माणूस आहे का भुईचक्र!   कधी टीव्ही सिरीयलमधून सिनेमात जातो, मधेच रंगभूमीवर काय येतो, गाणी लिहितो , हे सगळं सुरु असताना कविता म्हणतो ..कविता वाचताना त्याच्यातला एक वेगळाच माणूस बाहेर येतो... एखादा गुंता सोडवावा तसे तो कवितेतले लपलेले भाव अलगद आपल्यासमोर सोडतो.... त्याचं ते शब्दांवरचं प्रेम बघून आपल्याला सुद्धा कवितावगैरे लिहायची ऊर्जा मिळते .... असो तर ह्या सगळ्या गोष्टी सुरु असतानाच ह्या सगळ्यातून वेळ काढून नाटकाचा निर्माता होतो....बाबो...!!!! २४च तास ना ह्याच्याकडे!! माझ्या ओळखीतले फक्त  कॉम्प्युटर्स ही अशी एवढी वेगवेगळी कामं करू शकतात ! जितू हे असंच वैविध्यपूर्ण करियर कसं काय मॅनेज करतो देव जाणे....सेलिब्रिटी झाल्यावर तो ते यश नुसतं एन्जॉय करत नसत नाही ...पण सामाजिक भान ठेवून पाणी फाउंडेशनसाठी सुद्धा काम करत राहतो ....समाजासाठी आणि स्वतःला मिळणाऱ्या निर्मळ सुखासाठी ! आयुष्यात एवढ्या अनेक गोष्टी करत असताना चेहऱ्यावरचं ते १८ एक वर्षांपूर्वीच निरागस हास्य मात्र तसंच असतं किंबहुना तेव्हापेक्षा अनेक जास्त लोकांना घायाळ करणारं असतं...ही अशी जितू जोशी नावाची जोशीली जादू आहे आपल्या इंडस्ट्रीची.....

       ह्या सर्व गोष्टी काय कमी पडत होत्या म्हणून आता आपली ही जोशीली जादू नवीन गोष्टीत दिसली.... तीसुद्धा डायरेकट नेटफ्लिक्सवर ! ह्या मालिकेबद्दल खूप लोकं बरंच काही बोलत आहेत ....अनेक जण कौतुक करतात ..काही जण वेगळेपण जपण्यासाठी टीका देखील करत आहेत... पण सर्वांचं मत एकच आहे 'काटेकर छा गया'! देअर इज नो सेकंड थॉट! जितू जोशीला नेटफ्लिक्स ओरोजिनल सीरियलमध्ये बघणं हे अक्षरशः वेड लावणारं होतं... माझ्यासाठी स्वीट सरप्राईज होतं... सुखावह अनुभव !!  सैफ एवढाच झकास आणि नवाजपेक्षा भारी अभिनय जोशींच्या डोळ्यातून अक्ख्या सीरियलमध्ये वाहतोय. एकदम रियल वाटावा असा अभिनय ! बायकोच्या अपेक्षा आणि सैफला करायची असलेली मदत ह्यामध्ये झालेली मनाची घालमेल कुठल्याही संवादाशिवाय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो....आपण तर घरात स्टँडिंग ओव्हेशन दिलं आपल्या जोशीला! एका दिवसात सलग एपिसोड्स पाहिल्यावर जितूच्या ह्या प्रवासाविषयीच विचार करत झोपी गेलो ... डोळे मिटल्यावर तो 'छोटा, चष्मेवाला, इलेकट्रोनिकच्या दुकानात काम करणारा जितू' डोळ्यसमोर आला.... एक वेगळंच समाधान त्या डोळ्यात होतं. कदाचित ... स्वतःशीच असलेलं कॅंपस वॉर जिंकल्याचं... एकदम हाउसफुल समाधान!
    ते बघून माझ्या तोंडून आपसूक निघून गेलं  "जोश्या मानलं रे बाबा....टप्प्या टप्प्यानी मोठठा होतोय्स...  आदर वाटतोय, प्रेम वाटतंय .... झी मराठी, सिटी प्राईड, बालगंधर्व रंगमंदिरातुन आता नेटफ्लिक्सवर पोहोचल्यास  मित्रा! लै बाप!  जसे आम्ही  नार्कोज, हाऊस ऑफ कार्ड्स वगैरे बघत तिकडच्या कलाकारांच्या प्रेमात पडलो तसेच आता कोणी अमेरिकन, ऑस्ट्रेलियन प्रेक्षक आमच्या ह्या काटेकरच्या प्रेमात पडतील... हा जोश्या त्यांना अजून अजून बघायला आवडेल... अजून मोठा हो... तुझी जोशिली जादू घेऊन मराठी इंडस्ट्रीला मात्र भेट देत जा अधून मधून ..."

         चष्मेवाला जोशी पुन्हा एकदा हसला .... आणि बोलला "नकळत सारे घडले मित्रा...... शेवटी ,Life is what happens to you when you are making other plans”!!

- स्वागत पाटणकर