Saturday, January 27, 2018

तुम्ही-आम्ही अजिंक्य रहाणे....

तुम्ही-आम्ही अजिंक्य रहाणे.... 

साधारण वर्षभरापूर्वी म्हणजेच गेल्या मार्चमध्ये प्रमोशन मिळालेलं असतं  .... एका मॅचसाठी का होईना पण ऑस्ट्रेलियाविरुद्ध अवघड सिरीज आणि त्यात महत्वाच्या टेस्टमॅचमध्ये इंडियन टीमला लीड केलेलं असतं...  अवघड निर्णय आणि धडाकेबाज खेळी करून टीमला मॅच - सिरीजमध्ये जिंकून दिलेलं असतं... एक प्रकारे ती करियरमधली सर्वोच्च मुमेंट असते... सगळं कसं एकदम छान सुरु असतं...
पण कुठेतरी माशी शिंकते... नंतर आलेल्या आयपीएल आणि मग भारतामधल्या टेस्ट सिरीजमध्ये अपेक्षेप्रमाणे बॅटिंग होतं नाही... काहीतरी चुकत असतं.. अख्खी टीम बहारदार परफॉर्मन्स करत असते... पण स्वतःच अपयश सलत असतं... रिलेटिव्हली सोप्पा अपोनंन्ट आणि सोप्या कंडिशन्समध्ये आपल्याकडून धावा होत नाहीयेत हे जास्त त्रासदायक असतं.. साहजिकच अपयशातून बाहेर यायला आपण खूप प्रयत्न करत असतो... एक प्रकारचा  मानसिक त्राण असतो... त्यामुळेच ग्राऊंडबाहेरची मेहनत मैदानात फळ देत नसते ... पुन्हा अपयशच हाती येत असतं...
प्रवीण अमरेकडून टिप्स घेताना 

एकदाच्या त्या मॅचेस वाईट स्वप्नांसारख्या संपतात... पुढची टूर असते भारताबाहेरची अवघड प्रतिस्पर्धी आणि अवघड परिस्थितित... तिकडे पूर्वी चांगला परफॉर्मन्स झालेला असतो पण त्या गोष्टीला आता ४ एक वर्षं झालेली असतात... तिथे गेल्यावर पुन्हा आपला फॉर्म परत आणून गेले ६-७ महिने चिकटलेलं अपयश धुवायचा निर्धार केलेला असतो... टूर आधी असलेला प्रत्येक दिवस मानसिक आणि शारीरिक प्रॅक्टिसमध्ये गुंतला जातो... प्रवीण अमरेसारख्या आवडत्या कोच बरोबर खेळातल्या प्रत्येक बारकाव्यांचा अभ्यास केला जातो.. टूरला निघण्यापूर्वी "कम ऑन , २०१८ माझंच आहे" वगैरे स्वतःला सांगून आत्मविश्वास जागवण्याचा एक प्रयत्न होतो.. उपकर्णधार म्हणून आफ्रिकेत पोचतो ...
पण गेल्या गेल्या शॉक बसतो... पहिल्या दोन मॅचेसमध्ये संघात जागा मिळत नाही... केलेल्या निर्धाराचा चक्काचूर होतोय कि काय ... घेतलेली सगळी मेहनत वाया जाते कि काय भीती वाटायला लागते... 'का असं' हा प्रश्न स्वतःलाच विचारला जातो.. संस्कारच असे असतात कि मन स्वतःलाच दोषी मानतं... बॉण्ड्रीलाईनवर बसून मॅच बघत बघत खिन्न झालेलं मन पुन्हा स्वतःच्या टार्गेटकडे रिडाइरेक्ट करायची अवघड गोष्टसमोर असते... खचायचं नसतं...आपले कष्ट सुरु ठेवायचे असतात... आणि संधीची वाट बघत बसायचं असतं....कुठल्याही बॉलरपेक्षा स्वतःच नकारत्मक मन हे 'फेस' करायला जास्त अवघड असतं...
२ऱ्या टेस्ट नंतर ७ दिवस जातात ... आणि ती वेळ येते... ३ऱ्या मॅच मध्ये खेळायची संधी मिळते ...सिरीज गेलेली असते पण मॅच जिंकणं संघासाठी खूप महत्वाचं असतं... तीक्ष्ण- धक्कादायक भूतकाळ आणि ते खोडायला घेतलेले कष्ट हे एका गोड भविष्य असलेल्या स्वप्नांच्या किटबॅग मध्ये बांधून बॅटिंग साठी उतरतो... आणि तेवढेच निराश होऊन पुन्हा पॅव्हिलिअन मध्ये परततो... टीकाकारांच्या टीका आणि फॅन्सच्या डोळ्यातली डिसपोइन्टमेन्ट स्पष्ट दिसायला लागते... मन अजून खच्ची होतं... सगळं अवघड वाटायला लागतं... अपयश बोचत असतं... ८ महिन्यापूर्वी लीड केलेल्या टीममधून आता आपण कायमचे बाहेर पडतो कि काय अशी भीती वाटायला लागते....
दुसऱ्या इनिंगची वेळ येते .. टीम पुन्हा अडचणीत असते... ह्या वेळेस पिचवर उतरल्यावर आत्मविश्वास देणारी व्यक्ती समोर असते... आपल्याच कॅप्टनच्या तोंडून अग्रेसिव खेळायचा ग्रीन सिग्नल मिळतो... जणू काही तो "जा जिले अपनी जिंदगी" सांगतोय ह्या आवेशात ऑन ड्राइव्ह आणि स्क्वेअर कट आपल्या बॅटमधून मारला जातो... बॅटमधून आलेला तो मंजुळ आवाज निराशावादी डोळ्यांना खाडकन उघडतो... जुने दिवस डोळ्यासमोर येतात आणि वर्तमानाला स्कोअरबोर्डवर झळकवतात....
टीमला स्ट्रॉंग पोझिशनमध्ये नेऊन ठेवणारी एक महत्वपूर्ण इनिंग खेळली जाते... असतात ४८ धावा, ज्या काही वर्षानंतर स्टॅट्समध्ये फारशा गणल्या जात नाहीत... पण ह्या इनिंगचं महत्व टीमला आणि त्यापेक्षा स्वतःला जास्त असतं ...स्वतःच्या त्रुटी दूर करण्यासाठी घेतलेले कष्ट कामास आले ह्याचा आनंद असतो.. मिळालेल्या संधीचं सोनं करता आलं हे समाधान देणारं असतं... निगेटिव्ह थॉट्स बाजूला होतात...आणि प्रसन्न झालेलं आपलं मन हे मॅच जिंकल्यावर तिथेच न थांबता पुढच्या चॅलेंजसच्या तयारीला मन लागतं...

भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या करियरमधलं हे एक खूप टफ वर्ष आपण सर्वानीच पाहिलं असेल.. कधी त्याच्यावर टीका आणि कधी कौतुकही केलं असेल... त्यानी काल केलेल्या ४८ धावा ह्या एक आकडा म्हणून  मॅच विनिंगवगैरे नव्हत्या किंवा खूप ग्रेट नव्हत्या... पण गेलं वर्षभरातलं अपयश आणि भविष्यकाळातली गोष्टींची भीती, त्यात मॅच हरण्याची चिंता ह्या सगळ्या विचारांना त्यानी बाजूला ठेवलं आणि अवघड कंडिशन्समध्ये प्रतिस्पर्ध्यावर राज्य करायचं धाडस त्यांनी पेलून दाखवलं...

मी त्याचा फॅन आहे म्हणून एवढं कौतुक नाही किंवा मॅचमध्ये तो काही एकटाच हिरो नाही... छोटे आकडे असलेल्या अशा खेळी भविष्यात विसरून जातात .. पण आपण मात्र खेळ नुसताच न बघता त्यातून बरंच काही आत्मसात करायचं असतं ..खरंतर गेल्या वर्षातल्या चढ उतारामधल्या प्रवासात त्याची ही कालची इंनिंग  तुम्हा-आम्हासारख्या मध्यमवर्गीग नोकरदार वर्गाला खुप काही शिकवून जाणारी आहे... एखादं स्वप्न बघून ते पूर्ण करायला आपण जीवापाड मेहनत घेतो... पण ते स्वप्न पूर्ण करायची संधीच आपल्याकडून हिरावली जाते...'सगळं संपल्याचं फीलिंग येतं' किंवा आपण बऱ्याच वेळा आपल्या करियर मध्ये काही चांगले परफॉर्मन्स देतो.... मग दुसऱ्यांच्याच काय तर स्वतःच्याच स्वतःकडून अपेक्षा वाढतात ... हाय टार्गेट - अवघड अपेक्षा पूर्ण करायला म्हणून प्रामाणिक प्रयत्न करतो पण सॊप्या चॅलेंजेसमध्ये अपयशी होतो .. आणि ते दुःख जास्त बोचरं असतं ...कधी कधी करियर संपायची भीती दाखवणारं असतं  ...

त्यामुळेच, जसं कम्फर्ट झोनमध्ये गुरफटून बसायचं नसतं तसंच अशा अवघड सिचुएशन्समध्ये डगमगायचं नसतं ... ह्या कालच्या छोट्या  इंनिंगसारखा छोटा आनंदसुद्धा आपल्या टीमला म्हणजेच कुटुंबाला सुखी ठेवत असतो , मोटिवेट करत असतो... हे नेहमी लक्षात ठेवायचं असतं.... आणि अशाच छोट्या छोट्या प्रसंगात मोठं सुख शोधायचं असतं ... कारण स्वतःच्या आयुष्यात स्वतः अजिंक्य राहायचं  हे फक्त आपल्याच हातात असतं...

-- स्वागत पाटणकर

Tuesday, January 23, 2018

आपल्या माणसांचा आपला मानूस!

आपल्या माणसांचा आपला मानूस!

लेखक विवेक बेळे ह्यांची नाटकं म्हणजे गुंतवून ठेवणारी कथा, एक विशिष्ट शैली, अचूक शब्द निवड अशा अनेक हत्यारांनी प्रेक्षकाला एकदम घायाळ करून सोडतात.. सोपी भाषा पण त्यात लपलेला मोठा अर्थ. माकडाच्या हाती शॅम्पेन, अलीबाबा आणि चाळिशीतले चोर अशी अनेक नाटकं येतात आणि प्रेक्षकाला जिंकून जातात. बेळे काकांनी त्यांच्या लेखनात एक मूड सेट केलेला असतो, प्रत्येक व्यक्तिरिखा पूर्णपणे अभ्यास करून मांडलेली असते, विनोद निर्मिती ही आपोआप घडत असते, सस्पेन्स रहात असतो आणि त्यातूनच एक विचार प्रेक्षांसमोर मांडला जातो.... लादला जात नाही...आणि त्यामुळेच त्यांच्या नाटकाचं सिनेमामध्ये रूपांतर करणं हे फार जोखमीचं म्हणजे आजकालच्या भाषेत लै टेन्शनच काम...पण आपल्या मराठी प्रेक्षकांचं नशीब तसं चांगलंच, आपल्याकडे अशी अवघड चॅलेंजेस, डोक्याला शॉट लागू शकणारे प्रोजेक्ट्स हाती घेणारे धाडसी कलाकार आहेत. सतीश राजवाडे हे त्यातलेच एक. बेळे काकांच्या माकडाच्या हाती शॅम्पेनवर आधारित बदाम राणी गुलाम चोर नावाचा सिनेमा राजवाडेंनी काढला होता. त्याच अनुभवातून शिकून, प्रोत्साहित होऊन आता ते घेऊन येत आहेत सुपरहिट नाटक 'काटकोन त्रिकोण'वर उभा राहिलेला 'आपला मानूस...'आपल्या माणसांचा आपला मानूस!
सतीश राजवाडे... एक गुणी आणि ऑल राउंडर दिग्दर्शक. सिनेमा आणि टीव्ही क्षेत्रावर राज्य करणारा हा माणूस. मालिका संपल्यावर "का संपली एवढ्यात" असं ज्याच्या मालिकांबद्दल विचारलं जातं असा हा सतीश राजवाडे... रोमॅंटिक, कौटुंबिक,सस्पेन्स ,ऍक्शन ,थ्रिलर, विनोदी वगैरे वगैरे जॉनरमध्ये एक्स्पर्टीज असलेल्या राजवाड्यानी गेल्या दशकात अतिशय कंसिस्टन्टली परफॉर्मन्स देऊन प्रेक्षकांचा विश्वास संपादन केलाय... त्यामुळेच राजवाडेंचा सिनेमाचं ट्रेलर बघितल्या बघितल्या  काहीतरी चांगलं बघायलामिळणार ह्याची खात्री सामान्य प्रेक्षकाला असते! 
आणि एगझॅक्टली तसंच होतं 'आपला मानूस'च ट्रेलर बघून... ट्रेलरच्या सुरवातीलाच काटकोन त्रिकोणचा संदर्भ येतो आणि  प्रेक्षकांना 'बेस्ड ऑन मराठी प्ले' असं डायरेक्ट न सांगता फक्त हिंट दिली जाते... आणि बाकी पूर्ण ट्रेलरमध्ये गुंतागुंत असलेला प्लॉट समोर येऊन जातो.. २ मिनिट, ३ व्यक्तिरेखा आणि संवादातून उलगडत जाणारे त्यांचे विक्षिप्त स्वभाव आणि ४थ्या व्यक्तिरेखेबद्दलची त्यांची मतं हे सगळं आपल्यासमोर उभं राहतं. अतिशय उत्कंठावर्धक असं हे ट्रेलर प्रेक्षकाला नक्कीच थिएटरपर्यंत ओढत नेणारं आहे. 

ट्रेलर बघण्यासाठी इथे क्लिक करा

ज्यांनी काटकोन त्रिकोण बघितलं नाही त्यांच्यासाठी अख्खा प्लॉटच नवीन आहे इतकंच काय ज्यांनी नाटक बघितलंय त्यांना नाटकाची सिनेआवृत्ती पाहायची उत्सुकता तेवढीच असणार कारण ह्यातले कलाकार....खरं तर काय बोलायचं त्यांच्याबद्दल. नाना पाटेकरांबद्दल बोलायची माझी लायकी नाही... पण पहिल्याच शॉटमध्ये एन्फिल्डवरून येताना अब तक ५६ ची आठवण होते.. आणि आपला हा सेहवाग धुवाधार फलंदाजी करायला तयार आहे हे जाणवतं. अतिशय चालाखपणे लिहिलेल्या संवादांना नाना आपल्या विशेष आणि युनिक स्टाईलनी अजून आकर्षक बनवतो. नाटकामध्ये मोहन आगाशांनी केलेल्या भूमिकेला सिनेमासाठी एक परफेक्ट पर्याय एकच होता ..तो म्हणजे नाना. सतीश आणि टीमनी हा एक परफेक्ट डिसिजन घेतलाय. नटसम्राट नंतर दगडी मन ते एक भावनिक किनारा असलेला नाना आपल्याला बघायला मिळणार ... ही अशी  विविधरंगी पैलू असणारी व्यक्तिरिखा नाना लीलया पार पडणार ह्यात शंका नाही... आपला मानूसमधला नाना म्हणजे तिखट, गोड , मसालेदार वगैरे पदार्थ असणारी राईस प्लेट असणार ह्याची गॅरंटी हे ट्रेलर देतं !!

नाना व्यतिरिक्त ट्रेलरमध्ये दिसतात त्या इरावती हर्षे... मोहन आगाशेंच्याच टीमच्या ह्या एक सदस्य... अस्तु, कासव वगैरेमध्ये इरावतीना बघितल्यानंतर अशा तद्दन कमर्शियल सिनेमात त्यांना बघून खूप भारी वाटतंय... त्यांचा स्क्रीन प्रेझेन्स फारच जबरा असतो.. अर्थात त्यांनी साकारलेली व्यक्तिरेखा निगेटिव्ह वाटणारी आहे. पण त्यांच्यात एक जादू आहे ... विशेषतः त्यांचा आवाज....  एक वेगळाच दर्दी आहे . म्हणजे त्यांनी अगदी बाराखडी किंवा ABCD म्हणलं तरी त्यात भावनांची उधळण होईल. ऐकणाऱ्याला त्यातसुद्धा काहीतरी गहिरा अर्थ सापडेल. इरावती हर्षे ह्या कमर्शियल प्रेक्षकांसाठी गोड सरप्राईझ असणार आहे. 

ह्या त्रिकोणातली तिसरी बाजू म्हणजे सुमीत राघवन.. एकदम आपला माणूस.. कुटुंब मराठी असो वा हिंदी... त्यातल्या आई , बाबा,काकू, मामी, मामा, आजी पासून चिंटू पप्पू मिनी ह्या सगळ्यांना आवडणारा असा हा सुमीत राघवन .. एकदम लाडका. 
नाना जर सेहवाग असेल तर सुमीत म्हणजे एकदम राहुल द्रविड कॅटेगरी. नाटक, सिनेमा असो वा टीव्ही... हा आपला प्रामाणिकपणे काम करत राहतो. मला तर नेहमी वाटतं, अजून पर्यंत त्याच्यातल्या अभिनेत्याला न्याय मिळेल अशी भूमिका त्याला मिळाली नाहीये. आपला मानूसमध्ये सुमीत, नानासमोर एकदम भक्कमपणे उभा आहे. द्रविडसारखंच त्याचं काम म्हणजे नानाच्या टोलवाटोलवीला तेवढीच भक्कम रिअक्शन देणे...एक तगडी पार्टनरशिप करणं आणि ते त्यानी एकदम परफेक्ट केलंय हे तो ट्रेलरमध्ये "अर्थ नसतो ?" ह्या छोट्याश्या संवादातसुद्धा दाखवून देतो.  

थोडक्यात काय ३ अवलिया कलाकारांचा एकदम 'राईट' अँगल ट्रँगल सतीशनी आखलेला आहे... विवेक बेळेंच्या कथा आणि संवादातून तो प्रेक्षकांना त्रिकोणाच्या आत खिळवून ठेवेल हे २ मिनिटाच्या ट्रेलरमध्ये अगदीच स्पष्टपणे दिसतंय. ३ भिन्न प्रवृत्तीच्या व्यक्तिरेखा साकारणारे ३ भिन्न प्रवृत्तीचे कलाकार... फार कमी वेळा असा छान योगायोग येतो ... का मिस करावा तो आपण?? वर्षानुवर्षे लोकांच्या मनावर राज्य केलेल्या ह्या 'आपल्या माणसांचा' 'आपला मानूस' ९ फेब्रुवारीला येतोय... आपण तर नक्की बघणार... तुम्ही पण बघा!

जाता जाता -

नाना,सुमीत,इरावती आणि सतीश अशा ह्या सगळ्या आपल्या लाडक्या माणसांना एकत्र आणून ह्या कलाकृती निर्मिती करणाऱ्या अजय देवगणबद्दल न लिहून कसं चालेल... मराठीमध्ये पदार्पण केल्याबद्दल अजयचे आभार आणि त्यांनी अजून अजून मराठी चित्रपट बनवावेत ही काजोलकडे प्रार्थना (अजय बायकोच ऐकतो असं म्हणतात). जोक्स अपार्ट, सिंघमनंतर मराठी प्रेक्षकांसाठी अजय हा सुद्धा एक 'आपला मानूस' बनलाय.. मराठी प्रेक्षकांचं बाजीराव सिंघमवार अतोनात प्रेम आहे ...त्यांच्यासाठी तरी अजयनी २ मिनिटं का होईना पण आपला मानूस मध्ये आपल्या माणसांना दर्शन द्यावं हीच इच्छा!                                                                                                                                                
- स्वागत पाटणकर 

Monday, January 8, 2018

आम्ही दोघी - नॉट जस्ट अ टिझर रिव्यू!

आम्ही दोघी - नॉट जस्ट अ टिझर रिव्यू!बर्फाचा गोळा खाणारी, शाळेत जाणारी, लहानगी, गोंडस पण बिनधास्त अशी सावित्री म्हणजेच प्रिया बापट  आणि तिच्या समोर ... गुलाबाच्या पाकळ्याचं ग्रीटिंग कार्ड बनवणारी , थोडी बुजरी , खूप काही बोलायचंय पण लाजणारी असे असंख्य भाव डोळ्यांमधून आपल्यासमोर अलगद सोडणारी आमला म्हणजे मुक्ता द ग्रेट....  साधारण १ मिनिटाच्या टीझरमध्ये ह्या दोघी आपल्याला बरंच काही सांगून जातात...
'आम्ही दोघी' नावाच्या भावनांच्या पोत्यात.... 'गुंफलेल्या नात्यांच्या बऱ्याच गोष्टी' दडलेल्या आहेत ह्याची प्रचिती नक्की देतात...

*टिझर बघायला इथे क्लिक करा 

मुळात , पिक्चरचं टिझर असो वा ट्रेलर, ते अरेंज मॅरेज सारखं असावं. एखाद्या अरेंज मॅरेजमध्ये कसं छान सरप्राइझेस देऊन नातं अगदी अलगदपणे उलगडत जातं ...  एक्साक्टली तसंच आहे आम्ही दोघीच टिझर!
 गेल्या महिनाभरात पोस्टर्स रिलीझ करून मुक्ता आणि प्रिया ह्यांचा इंटरेस्टिंग लूक रिव्हिल केला होता.... त्यातच आज टिझरमध्ये  शाळेत जाणारी प्रिया दाखवून माझ्यासारख्याना अनेकांना गोड सरप्राईज दिलंय... छोट्या गोष्टी अशा अचानक उलगडत गेल्या कि नात्याची मजा वाढते ...तसंच प्रेक्षकांना सिनेमाबद्दलची ओढ अजून वाढवते.. तोच अपेक्षित परिणाम साधला जातो ह्या १ मिनिटाच्या प्रोमोमध्ये!

पोस्टरमध्ये दाखवलेली मॅच्युअर्ड  प्रिया आणि टीझरमध्ये दिसणारी बारीक केस ठेवलेली , विचारात गुंग असलेली आणि  दोन वेण्या घातलेली, शाळेच्या युनिफॉर्ममध्ये अक्षरशः बागडणारी प्रिया ... किती सहजपणे ती व्यक्तिरेखेमधला फरक दाखवून देते... कष्ट घेऊन खास असा प्रयत्न करतीये असं वाटतच नाही.
"एकदा वाटलं ना कि करून टाकायचं.. म्हणजे हळहळ वाटत नाही" अशी एकदम बिनधास्त वागणारी ही प्रियाने साकारलेली सावित्री... मनात येईल तसं वागणारी  एकदम बिनधास्त...! तिच्या अशा बिनधास्तपणाकडे कुतुहुलाने बघणारी, आपण कष्टानी शिवलेल्या स्वेटरच्या बाह्या प्रियाने कापल्यावर चेहऱ्यावर कसलाही राग न ठेवणारी.... मनातल्या मनात खूप कौतुकानी ... खरं तर प्रेमानी सावित्रीकडे बघणारी ही अमला.... अख्या टिझर मध्ये एकही डायलॉग नसून सुद्धा मुक्ता तिचे डोळे , बॉडी लँगवेज मधून प्रेक्षकांशी बरंच काही बोलून जाते.. इथेच (पुन्हा) दिसून येतो तिचा ग्रेटनेस..

सहजता आणि दिग्गज अशा दोघीना एकत्र आणणाऱ्या, दिग्दर्शनात पदार्पण करणाऱ्या प्रतिमा ताईंच्या आतला कॉस्च्युम डिरेक्टर मात्र काही स्वस्थ बसत नाहीये असं वाटतंय... दोघींचे कॉस्च्युम दोन्ही भिन्न कॅरेक्टर्स एकदम ठामपणे दर्शवतात... अगदी त्या फाडलेल्या स्वेटर सकट!  बाकी ह्या दोघींशिवाय अजून कलाकार कोण हे पण गुलदस्त्यातच आहे ... अर्थात ह्या दोघी बॅटिंग करत असताना बाकी प्लेयर्स कोण हे विचारणं म्हणजे मूर्खपणाच ठरावा...

भाग्यश्री जाधव ह्यांच्या संवाद लेखनाने कमाल केली आहे असं एकंदर जाणवतंय ...  पिक्चरचा टोन पकडून,कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त अर्थपूर्ण असे डायलॉग्स ते सुद्धा अतिशय साध्या भाषेत... सामान्य प्रेक्षकाला कळणारे आणि त्यामुळेच एकदम भिडणारे असे संवाद...!!

अतिशय कल्पकतेने बनवलेल्या ह्या टीझरमध्ये आपल्याला खूप काही दिसतं...छान लोकेशन्स, सुंदर डायलॉग्स , बोलक्या डोळ्यांची मुक्ता, लहानपणीची आणि मोठी झालेली प्रिया .... आपल्याला अनेक गोष्टी दिसतात....  पण तरीसुद्धा सिनेमा नक्की कशावर बेतलाय हे गुपित एकदम सरंक्षितपणे गुपितच राहतं ... टिझर संपल्यावर असं नक्की कुठलं नातं ह्या दोघींमध्ये गुंफलं गेलंय ह्याचाच विचार प्रेक्षक करत राहतो.. आणि इथेच हे १ मिनिटांचं टिझर जिंकून जातं आणि १६ फेबची वाट बघायला भाग पाडतं!

ता . क. -
बऱ्याचवेळा लग्नाच्या पत्रिकांमध्ये "आमच्या दादाच्या लग्नाला यायचं हां - चिंटू , पप्पू, मिनी" वगैरे लिहिलेलं असतं... त्या चिंटू पप्पूला आपली वाहिनी कोण ए, तिचं नाव काय , लग्न कसं ठरलं  वगैरे काहीच माहित नसतं ...त्यांना काही घेणंदेणं नसतं. पण त्यांना तो दादा लै आवडीचा असतो... त्यांचा एकदम वीक पॉईंट .. आणि म्हणूनच ते आरडाओरडी करत आमच्या दादाच्या लग्नाला यायचं हां म्हणत असतात....
माझं पण काहीसं तसंच झालंय ... पिक्चर नक्की काय आहे , स्टोरी काय आहे वगैरे काहीही माहित नाही पण तरी सुद्धा (अनेकांसारखा) प्रिया आणि मुक्ता म्हणजे आपला वीक पॉईंट ... म्हणूनच आपण जगाला ओरडून सांगतोय २३ फेबला ह्या 'फॅब दोघी' थिएटर मध्ये जाऊन बघाच!!

ह्याच सिनेमाचं पाहिलं पोस्टर रिलीज झाल्यावर लिहिलेलं मनोगत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

- स्वागत पाटणकर!