Thursday, June 6, 2019

फॅशन आणि मुलं???

फॅशन आणि मुलं???


 "अजिबात जमलेलं नाहीये हे डिझाईन.. अजिबातच...कुर्ता असा असतो का???" मी पूर्णपणे जोशात येऊन म्हणालो.

"काही हरकत नाही, ज्यांनी तो कुर्ता घातलाय त्यांना तो आवडलाय... शिवाय प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला आवडतेच असं अजिबात नाही..... आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मिळणाऱ्या चांगल्या-वाईट रिऍक्शनचा आम्ही आमच्या कामावर परिणाम होऊ देत नाही ...मनापासून काम करत राहतो" तिनी एक संयमी आणि सर्वबाजूनी सडेतोड उत्तर मला दिलं.

        ती म्हणजे तेजस्विनी पंडित! तेजाज्ञा नी म्हणजेच तेजस्विनी पंडित आणि अभिज्ञा भावे ह्यानी डिझाईन केलेला कुर्ता इंस्टा वर पहिला आणि सरळ आपलं मत ठोकून दिलं. कसं असत ना, ह्या सोशल मीडियावर आपल्याला काय वाटतंय, आपल्याला काय कळतंय, समोरच्यानं किती कष्ट घेतलेत वगैरे कुठल्याही गोष्टींचा विचार न करता सरळ आपलं अज्ञानातलं मत ठोकून देणं म्हणजे धैर्य असं अनेकांना वाटत असतं. आपलं पण परवा तसंच झालं. कुणी मला विचारलं नव्हतं खरंतर पण आपल्याला सगळ्यातलं सगळं कळतं हा भ्रम होता. तेजस्विनीच्या त्या एका उत्तरानी सणकून जमिनीवर आणलं.

        तिच्या त्या एका उत्तरात, मला समहाऊ त्या दोघींचे फॅशन डिझाईन नावाच्या गोष्टीमागचे स्पष्ट विचार आणि कष्ट दिसले.  कुठेतरी त्यांचा क्लीअर फोकस जाणवला. खरंतर दोघी प्रसिद्ध अभिनेत्री पण त्यांचा हा छंद - ही पॅशन त्यांनी सुरु ठेवली ह्याचं कौतुक वाटलंच आणि त्याच बरोबर आता त्या मुलांच्या डिझाईनमध्ये काहीतरी इनोव्हेटिव्ह करू पाहतायेत ह्याबद्दल लै भारी वाटलं.

      परवाच तेजाज्ञानी लॉन्च केलेले डिझाइन्स ..मेन्स कलेक्शन्स... उमेश कामत -अभिजीत खांडकेकर सारखे लोकप्रिय अभिनेत्याना घेऊन केलेलं फोटोशूट बघितलं...आणि 'बदलत्या जगाचा' अचूक अंदाज एकदम वेळेत लक्षात घेऊन तेजाज्ञानी आल्रेडी त्यावर काम सुरु केल्याची जाणीव झाली. नवीन काहीतरी ट्राय करणं, ट्रेंड फॉलो करणं किंवा ट्रेंड सेट करणं हे सगळंच आता मुलांनासुद्धा हवं असतं आणि त्यामुळेच तेजाज्ञाची इनोव्हेटिव्ह स्टेप आपल्या मराठी फॅशनमध्ये फार महत्वाची ठरणारे ह्याबद्दल आपल्याला एकदम खात्री पटलेली आहे.
         शाहरुखनी चेकस शर्ट घातले की आपण ते घालणार किंवा मोहब्बतेमध्ये स्वेटर खांद्यावर टाकला तसा आपणपण टाकणार ... ह्यापलीकडे आपल्याला फॅशनमधलं काही फारसं कळत नाही. त्यामुळे तेजाज्ञा विषयी जास्त टेक्निकली आपल्याला बोलता येणार नाही पण पैठणी हा प्रकार फक्त बायकांसाठी आहे ह्या विचारापलीकडे जाऊन त्यांनी मुलांसाठी काही अतिशय कडक कुर्ते डिझाइन केलेले आहेत ...ज्यात बॉर्डर आणि खिसा हे दोन्ही पैठणीचं आहे. त्यांच्या ह्या अशा वेगळ्या प्रयत्नांमुळेच आपल्याला त्यांचं लै कौतुक वाटलं.  शिवाय अजून एक बेश्ट गोष्ट म्हणजे 'वेल-बिल्ड' लोकांसाठी त्यांचे डिझाइन्स आहेतच पण त्याच बरोबर आमच्यासारखी 'पोटाची गर्भश्रीमंती' लाभलेल्या लोकांसाठीसुद्धा तेजाज्ञा वेगळं डिझाइन्स घेऊन येतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळे वेगवेगळे ट्राय करताना हे सगळं सिम्पल कसेल दिसेल ह्याची काळजी त्या घेतात. फक्त रॅम्पवर चालतानाच घालता येतील असे ते कपडे नव्हेत.

तुम्ही हे फोटोच बघा ना मग कळेलच तुम्हाला.... आय एम शुअर हे बघून तुम्ही पण एखादी ऑर्डर द्याल त्यांना!

तेजाज्ञा- https://instagram.com/tejadnya?igshid=q0c0ny2ujfn1




    रोज एक तीच मळकी जीन्स आणि टीशर्ट, इंटरव्ह्यूला फॉर्मल शर्ट पॅन्ट आणि लग्नात अनेक महागाचा शेरवानी (जो नंतर आयुष्यभर पडून राहतो) साधारण ह्या पलीकडे मुलांची फॅशनबाबतीतली नजर जात नसे .. 'आमच्या काळी'वगैरे लिहिणार होतो, पण जरा उगाचच म्हातारं झाल्याचा फील आला असता. तेंव्हासारखी "फॅशन आणि मुलं??" असं विचारणारी आत्ताची जनरेशन नाही. फक्त मुलगी 'हो' म्हणेपर्यंतच छान दिसायचं असं आजच्या पिढीचं नाही..... आणि मुलांच्या अशा पिढीला जे हवं ते देणारी अशी ही तेजाज्ञाची दृष्टी अजून अजून ब्रॉड होत जावो... ह्याच त्यांना शुभेच्छा!


जाता जाता----
क्रिकेट, सिनेमा आणि खाणं ह्या पलीकडे जाऊन लिहायचा विचारदेखील करू न शकणाऱ्या आमच्यासारख्या दगड माणसाला देखील फॅशन बद्दल लिहायला भाग पाडलं... इथंच तेजाज्ञा टीम जिंकलेली आहे 😊

 - स्वागत पाटणकर

Wednesday, January 30, 2019

अंकुश चौधरी - आपला ट्रेस लेचेस!

      अंकुश चौधरी - आपला ट्रेस लेचेस!

    3-4 महिन्यांपूर्वी मेक्सिकन रेस्टोरंटमध्ये बसून ट्रेस लेचेस नावाचा केक खात होतो... तीन प्रकारच्या दुधातून बनवलेला ,एकदम साधी रेसिपी असलेला पण तरी एकदम रीच आणि चविष्ट असा हा केक... आमची ढेरी आणि मन तृप्त झालं होतं... तेवढ्यात फोन वाजला... पलीकडून आमचे मित्र अमित फाळके बोलत होते...सोनी मराठीसाठी एक लेख लिहिलेला त्यांना खूप आवडला म्हणून फोन आला होता..
बोलणं झाल्यावर त्यांनी "स्वागत, एका मित्राला बोलायचंय तुझ्याशी...." अस म्हणून फोन कोणाला तरी दिला....30 एक सेकंद शांतता होती...मी फोन कट करणार तेवढ्यात "स्वागत, तुम्ही खूप छान लिहिलं आहे... आवडलं" हे कौतुक करणारं वाक्य अतिशय सॉफ्ट आवाजात माझ्या कानांवर पडलं...कौतुक होतंय म्हणून नाही... पण तो आवाज ऐकून आपण मेजर खुश झालो... तो आवाज फार पूर्वीपासून मनात घर करून बसला होता खूप ओळखीचा होता, लाडका होता....अतिशय एकसाईट झालो होतो... पलीकडून अंकुश चौधरी बोलत होता! तो सॉफ्ट आवाज खूप आठवणी जाग्या करून गेला.
    20-25 वर्षापूर्वी, आमच्या मोठ्या बंधूंबरोबर ऑल द बेस्ट बघायला गेलो होतो... गंधर्वसमोर एका हॉटेलबाहेर मी त्याची वाट बघत होतो.. शेजारीच एका कट्ट्यावर 3-4 पोरं लै कल्ला करत बसलेले... खूप गप्पा आणि जोरजोरात हसणं सुरू होतं त्यांचं... दुसऱ्याच्या गप्पा ऐकायची आम्हाला नेहमीच सवय... मी पण त्यांच्याजवळ जाऊन ते ऐकायला लागलो.. गप्पांमधला कंटेंट कळत नव्हता पण पोरांच्या बोलण्याची हसण्याचीवगैरे स्टाईल ऐकून लै हसू येत होत.. तेवढ्यात भाऊ आला ...अतिशय घाईत घाईत म्हणाला चल लवकर ... नाटकाची वेळ झालीये... मी त्या गप्पा अर्धवट सोडून निघालो... तेवढ्यात त्या ग्रुपमधला एक उंच, गोरा हँडसम मुलानी त्याच्या अतिशय सॉफ्ट आवाजात आम्हाला किती वाजलेत विचारलं....त्याला वेळ सांगून आम्ही निघालो....का कोणास ठाऊक, पण पुढे गेल्यावर मी पुन्हा वळून त्या कट्ट्यावर बघीतलं... ती पोरं सुद्धा गायब झाली होती... माझ्या आयुष्यातली ती 10 मिनिट मला खूप हसवल्याबद्दल त्यांचे मनातल्या मनात आभार मानून नाटकाला बसलो... पडदा वर गेला...आंधळ्यानी एन्ट्री घेतली.... 2 एक मिनिटं विश्वासच बसला नाही... तो बाहेर कट्ट्यावर बसून टाईमपास करणारा, वेळ विचारणारा मला स्टेजवर दिसत होता... हळू हळू ते तिघेही स्टेजवर दिसले... आपण संजय नार्वेकर, भरत जाधव आणि अंकुश बरोबर अतिशय फुकटात 10 मिनिट हँग आऊट केलाय हे मला समजलं...त्या 10 मिनिटात त्यांनी जेवढं मला हसवलं होतं त्याच्या कैकपटीने मी आणि सगळे प्रेक्षक पुढचे 2 तास हसत होतो खिदळत होतो...  हे तिघे फुल्ल आवडून गेले होते... विशेषतः अंकुश...कारण तो आपल्याशी बोलला होता!
    त्यानंतर आपण अंकुशवर नेहमीच लक्ष ठेवून असायचो..या माणसाचा करिश्मा गेल्या 20-25 वर्षापासून वाढतच चाललाय.. फार पूर्वीपासूनच मराठी पोरी याच्या प्रेमात आहेत...आमच्या अनेक मैत्रिणी त्याच्या वेड्यासारख्या फॅन होत्या...आम्ही अगदीच हे लाईव्ह बघितल होतं.
    पुण्याच्या कमिन्स कॉलेजमधल्या बेधुंद मनाची लहरचं शूटिंग बघायच्या निमित्तानं  वर्षभर कॉलेज बंक करणाऱ्या पोरी कॉलेजमध्ये दिसू लागल्या त्या केवळ अंकुशमुळे...इतकंच काय तर अंकुशचा एक अतिशय वेगळा रोल आणि लूक असलेल्या गोपाळा रे गोपाळा नाटकात तो त्याच्या ओरिजिनल हिरो लूकमध्ये अक्षरशः 30 सेकंदासाठी येतो, पण त्या 30 सेकंदात त्याच्यातल्या हिरोनी टिळक स्मरकमधल्या अनेक काकवा, मावश्या, मुली, तरुणी या सगळ्यांना घायाळ करून गेला...
आम्हीसुद्धा त्याच्या अभिनयाचे फॅन होत चाललेलो....त्याच्याबद्दल लिहून आलेलं वाचायचो..त्यातूनच केदार, भरत आणि अंकुशच्या मैत्रीबद्दल वाचलं होतं.. इंडस्ट्रीमध्ये असंही काही असत हे ऐकून कडक वाटलं होत... तू तू मी मी सारख नाटक असेल किंवा हसा च क ट फु , बेधुंद मनाची लहर सारखी टीव्ही सिरीयल... अंकुश सगळीकडे दिसत होता.. थोडे दिवसांनी सावरखेड वगैरे सारख्या सिनेमातसुद्धा तो दिसायला लागला होता...पण सोलो हिट म्हणतात ते तसं काही अंकुशच्या नावावर नव्हतं.. एकीकडे भरत सही रे सही मधून आणि संजय नार्वेकर अग बाई अरेच्चा मधून आता सुपरस्टार झाले होते... दोन्हीं केदार शिंदेच्याच कलाकृती... ते त्यांची मैत्री वगैरे सगळं झूठ आहे, केदारला अंकुशची काही पडली नाहीये असं आमच्या अनमच्युअर्ड मनाला वाटायचं...(सही रे सही च्या अनाऊंसमेंट मध्ये विशेष आभार - अंकुश चौधरी हे ऐकून मात्र खूप भारी वाटलं होतं, हां आहे आहे त्यांच्यात अजूनही मैत्री आहे अशी खात्री आमच्या लहान मनानी करून घेतली)
     पण काहीही असो, अंकुशचं नाव कधी एकट्याने घेतलं जायचं नाही... नेहमीच भरत , संजय, केदार किंवा  श्रेयस तळपदे त्याच्या जोडीला असायचेस... नाही हो, आपल्याला काही ह्या लोकांशी दुष्मनी नाही.. ते सगळे आवडतातच आपल्याला पण अंकुश थोडा जास्त आवडतो इतकाच काय तो फरक...कधी एकदा तो एकट्याच्या नावावर नाटक सिनेमा हिट करतो असं आम्हाला वाटत होतं ....मधे बरीच वर्ष गेली पण आमच्या मनासारखं घडतच नव्हतं आणि कदाचित त्याच्या मनासारखं देखील!  अनेक दिवस गेले, वर्षे गेली आणि मग दुनियादारी आला.... अंकुश नेहमीसारखा कलाकारांच्या गर्दीत होता पण या वेळेस एकदम स्पेशल होता...दुनियादारी वाचताना समोर उभा राहिलेला दिग्या एकदम परफेक्ट स्क्रीन वर आला होता तो अंकुशच्या रुपात... नंतर पुन्हा एकदा मल्टीस्टारर क्लासमेट्स गाजवला...  वेगळी इनिंग सुरू झाली होती अंकुशची आणि त्याचबरोबर आमच्यासारख्या फॅन्सची...  20 एक वर्ष साहेबांना फॉलो केल्यावर मनापासून आनंद आणि अभिमान वाटला तो मात्र 'दगडी चाळ', 'ती सध्या काय करते' आणि 'डबल सीट' च्या सक्सेस नंतर... चित्रपट गाजले आणि यावेळेस फक्त त्याचं नाव होतं... आमच्या अँकी चे सोलो हिट...आम्हाला हवे हवेसे असे!



    या सगळ्या आठवणीत तो केक आता संपला होता. यावेळेस चा ट्रेस लेचेस केक खूप वेगळा आणि जास्त गोड लागला होता..... " लिहीत राहा, स्वागत" असं म्हणून अंकुशनी फोन ठेवला...एवढा मोठा माणूस एवढा डाऊन टू अर्थ! आयुष्यातला एक बाप विकेंड होता तो माझ्यासाठी... अमितला लै वेळा धन्यवाद त्याबद्दल...
    हा अंकुश सुद्धा मला नाटक, सिनेमा आणि सिरियल्समध्ये मुरलेल्या ट्रेस लेचेस केक सारखाच वाटतो... सिम्पल, लाडका आणि अतिशय गोड! वाढत्या वयाबरोबर तरुण होणाऱ्या अंकुशला लै वेळा हॅपी बर्थ डे...
येत्या वर्षात आता प्लिज एक नाटक कर रे दादा.... बाकी काही नाही पण '.... आणि अंकुश चौधरी' हे ऐकायची आमची हौस लवकर पूर्ण व्हाव्ही हाच एक स्वार्थ आहे :)

हॅपी बर्थडे, अंकुश!

- स्वागत पाटणकर
    

Tuesday, January 8, 2019

आनंदी गोपाळ!

     आनंदी गोपाळ!

      तीन चार महिन्यांपूर्वी एका मोठ्या नेत्यानी पुणेरी पगडी घालायला नकार दिला त्यावरून वाद सुरु झाला होता... अक्षरशः वाद 'निर्माण' करण्यात आला होता.. त्यांचे समर्थक असो वा विरोधक ...सगळेच एक युध्य असल्यासारखं बोलायला लागले होते... खरं तर एक सामान्य नागरिक म्हणून या सगळ्याची लाज वाटू लागली होती... शिवाजी महाराज,गांधी,सावरकर,फुले या सगळ्या थोर लोकांना आपल्या राजकारण्यांनी 'वाटून' घेतलं आहेच पण आता त्यांनी पुढची पायरी गाठली होती... या थोर लोकांच्या 'टोप्या' सुद्धा आता विभागायला निघाले होते.  पुणेरी पगडी या जातीची ... अमुक एका पक्षाची , फुल्यांची अमुक जातीची  तर गांधी टोपी अमुक एका पक्षाची ..दुसऱ्या कोणाचा त्यावर अधिकार नाही हे असं काहीतरी बिंबवायला सुरुवात  झाली होती... सोशल मीडियावर सगळे पेटले होते.... टोप्यांवरून पोष्टी पडायला सुरुवात झाली होती. राजकारण हा आपला विषय नाही पण हे सगळं दूषित वातावरण बघून मन खिन्न झालं होतं ...
        पण..... सिनियर नेते, त्यांचे विरोधक आणि समर्थक अशा निरर्थक गोष्टीत .... टोप्यांच्या या राजकारणात बिझी असताना अचानक एक  'हॅट्स ऑफ' करायला लावणारी एक गोष्ट सोशल मीडियावर दिसली... गोष्ट तशी विचित्र पण अतिशय कौतुकास्पद ..प्रत्येक भारतीयाला आणि प्रत्येक मुलीला अभिमान वाटावा अशी गोष्ट... एक मराठी मुलगी... नाव अनुजा..  अमेरिकेत ग्रॅज्युएशन पूर्ण करते आणि कोनवकेशन म्हणजेच तिच्या विद्यापीठात होणाऱ्या पदवीदान समारंभाला ती जाते .... तेव्हा ती एकटी नसते... जणू काही महिला  सशक्तीकरणाचा इतिहासच तिच्या सोबतीला असतो... कॅलिफोर्नियाच्या विद्यापीठात ही मुलगी आपल्या पदवीचा स्वीकार करते ती टिकली , नथ घालून.... ती केवळ यावरच थांबत नाही ...तर ग्रॅज्युएशन हॅट वर ती तिच्या मनातल्या भावना लोकांसमोर मांडते... त्या हॅटवर मोठ्या अक्षरात लिहिलेलं असतं "Thank You Mahatma Phule, Savitribai Phule & Dr Anandi Joshi.... people who fought for woman empowerment"... १०० वर्षांपूर्वी असलेल्या प्रॉब्लेम आणि त्यावर सोल्युशन शोधणाऱ्या या थोर माणसांचे आठवण ठेवते... त्यांना पुन्हा एकदा जगासमोर आणते. या थोर माणसांचा ..त्यांनी केलेल्या कामाचा विसर पडलेल्या लोकांसमोर एक आदर्श उदाहरण ठेवते. आई-बापाचे उपकार देखील विसरणाऱ्या या फास्ट जगात ही मुलगी  १०० वर्षांपूर्वीची कृतज्ञता व्यक्त करते... सक्षम भारतीय स्त्रीची खूण असणारी टिकली आणि नथ ती सातासमुद्रापार पोचवते.

       या मुलीचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे ... तिची ही कृती बघून, अत्यंत खुश होऊन मी तिच्याबद्दल माझ्या मित्र.....  कलिग्सना सांगत होतो तेव्हा त्यांच्याकडून "वा कौतुक आहे तिचं" अशा जनरलाइझ्ड रिऍक्शन मला ऐकू येत होत्या.. काहीसं विचित्र वाटलं... क्षणभर वाटलं या अनुजाबद्दल फक्त मलाच (विनाकारण ) खूप कौतुक आहे तेवढं  बाकीच्यांना फारसं विशेष वाटलं नाहीये.... काहीसा नाराज चेहरा घेऊनच मीं चाललो होतो तेवढ्यात एकीच्या लॅपटॉप स्क्रीनवर "डॉक्टर आनंदी" बद्दल गुगल सर्च रिझल्ट्स दिसले... जेवढं कौतुक अनुजाबद्दल वाटलं तेवढंच वाईट मला ती स्क्रीन बघून वाटलं ... ती कृतज्ञता वगैरे सोडा बाजूला .. इथं लोकांना डॉक्टर आनंदीबाईंबद्दल गुगलला विचारवं लागतंय ..हेच किती लाजिरवाणं आहे.. पुढे जायच्या स्पर्धेत आपण इतिहास इतक्या सहजपणे विसरून जावा??  किती त्रासदायक होतं ते ..आनंदीबाईंना गुगल करणारी ती मैत्रीण त्यांचं कार्य आता पूर्ण मन लावून वाचत होती.. त्यांचे कष्ट,त्यांची जिद्द आता हिला समजायला लागले होते... ते वाचून तिचे डोळे चमकायला लागले होते   त्या वेळेला वाटून गेलं हे असंच खरं तर आजच्या पिढीला, नवीन पिढीला आनंदीबाई कळायला हव्यात , समजायला हव्यात... आजकालची तरुणाई, पुढची पिढी ह्या सगळ्यांना पूर्वीची लोकं, त्यांनी पाहिलेली कठीण परिस्थिती आणि त्यातून त्यांना असणारी शिक्षणाची ओढ, ते मिळवण्याची जिद्द हे सगळं समजणं खूप महत्वाचं आहे ...  पण हे कसं ?? कसं पुन्हा जगासमोर आणणार हा प्रश्न सारखा पडत होता पण त्याच उत्तर काही सापडत नव्हतं...
       गेल्या काही दिवसात खेळाडू, रंगकर्मी किंवा साहित्यिक ह्यावरचे बायोपिक येऊन गेले, प्रेक्षकांनी देखील सर्व सिनेमे डोक्यावर घेतले ... एकदम ट्यूब पेटली... असाच एखादा सिनेमा डॉ आनंदी बाईंवर निघाला तर??? पण कोण काढणार... मराठी सिनेमात अशी रिस्क घेणार तरी कोण? ..असं वाटलं.. इंडस्ट्रीमधल्या काही मित्रांसमोर हा विषय काढला ... तेव्हा मला " समीर विद्वांस " एवढंच उत्तर मिळालं... तेव्हा काही समजलं नाही. पण परवा समीरनी त्याच्या नवीन सिनेमाची अनाउन्समेंट केली.... "आनंदी गोपाळ".... लै भारी वाटलं बघून लै...मनापासून आनंद झाला.  डबल सीट असो वा नवा गडी नवा राज्य ..त्याची नायिका नेहमीच वेगळी असते, काहीतरी मेसेज देणारी असते...सक्षम असते... त्यामुळे 'आनंदी गोपाळ'बद्दल जास्तच उत्सुकता लागलीये. पूर्वी हिंदी सिरीयल येऊन गेलीये या विषयावर , पण आता मराठी सिनेमा काढण्याचं धाडस केल्याबद्दल झी आणि मंगेश कुलकर्णीचे लै धन्यवाद.
       

       समीरच्या प्रेमाखातर "आनंदी-गोपाळ" प्रमोट करण्यासाठी बऱ्याच नायिकांनी नथ घालून सोशल मीडियावर पोस्ट टाकल्या होत्या. पण त्यावर "काय टप्पा दिसतीयेस तू" , "नथ डाव्या नाकपुडीत घालतात एवढं पण कळत नाही का" वगैरे कमेंट्स पब्लिककडून केल्या गेल्या ...  ते मनात टोचलं ....  नथ आणि आनंदीबाईंचा मूळ उद्देश बाजूलाच राहिला कि काय असं वाटलं.

त्यामुळेच अनुजासारखं आदर्श उदाहरण सर्वांच्या ठेवून समीर आणि झी ला 'आनंदी-गोपाळ'साठी शुभेच्छा देण्यासाठी हा सगळा खटाटोप. टोप्या घालणाऱ्या राजकारण्यांपासून ते पाहिलीत शिकणारा चिंटूला देखील हा सिनेमा काहीतरी शिकवून जाईल हे नक्की.
     १५ फेब्रुवारी म्हणजेच परीक्षेच्या १-२ महिने आधी 'आनंदी-गोपाळ' रिलीज होतोय... मुलांना नक्क्की दाखवा...

         काय सांगा, 'शिक्षण-परीक्षा' ह्या सगळ्याकडे बघायचा त्यांचा दृष्टिकोन बदललेला असेल!

- स्वागत पाटणकर