Thursday, December 21, 2017

रे कपिला...!

रे कपिला...!

पोळीचा रोल! लहानपणापासून घरात बघितलेली एक कामचलाऊ गोष्ट .. एकदम सोप्पी आणि पटकन बनणारी. आमच्या घरात तर मी, भाऊ आणि वडील अशा ३-३ सदैव भुकेले असणाऱ्या पोटांसाठी आई सारखं सारखं करणार तरी काय? मग उत्तर एकच  असायचं ......पोळीचा रोल! एकदम डायनॅमिक प्रकार.. काहीही घ्यायचं आणि पोळीमध्ये कोंबायच आणि मस्त रोल करून खायचा.. उरलेली भाजी, तूप-गूळ आणि कधीकधी तर नुसता टोमॅटो सॉस लावून रोल करून खाल्ला आहे आम्ही! शाळेत नववी-दहावीमध्ये  शिंग फुटल्यावर वडा पाव, मिसळ वगैरे चाखायला लागल्यावर मात्र पोळीचा रोल बाजूला सारला गेला... 

बट इट केम बॅक इन स्टाईल ..कॉलेजमध्ये गेल्यावर बऱ्याच गोष्टी नवीन कळतात आणि काही काही गोष्टी 'नव्याने' कळतात ...पोळीच्या रोलचं तसंच झालं ... मला तो दिसला पण एका वेगळ्याच स्वरूपात.. एका २५ डिसेंबरला...तो  माझ्या समोर आला ... अनेक वर्षांनी ...... आणि ते सुद्धा एकदम नव्या स्वरूपात...गंध आणि सौन्दर्यामध्ये कमालीचा फरक करून! 
त्याकाळी ख्रिसमसला कॅम्प एरियामध्ये जाऊन कुठल्याहि वयाचे, रंगाचे किंवा आकाराचे सॅनटा क्लोज  बघायला जायची लै फॅशन असायची... फॅशन कसली बोडक्याची .... खा* असायची! अमेय, सुभेदार, मित्या असे आम्ही पोरंपण कॅम्प मध्ये जायला निघालो ... पण रुबी हॉलजवळ अतिशय ट्राफिक लागलं. रस्ते गर्दीने फुलले वगैरे नव्हते, ट्रॅफिकनी 'लागली' होती रस्त्यांची. आम्हा तरुणाईचा पेशन्स तसा कमीच, लगेच संपला.. सॅन्टा बिनटा जाऊ दे ...आपण आपल्या वैशालीत जाऊ म्हणत परत फिरण्यासाठी गाडी एका ठिकाणी वळवली... थोडं पुढे गेल्यावर एका चौकात डावीकडे फुटपाथवर भयंकर गर्दी दिसली ...खूप! रस्त्यापर्यंत एक प्रकारचा चविष्ट वास यायला लागला... आम्ही एकमेकांकडे बघितलं , एकमेकांच्या नजराच इतक्या बोलक्या होत्या कि एकही शब्द न बोलता गाडी साईडला पार्क केली... अनेक मोठ्या गर्दीतून पुढे जायचा प्रयत्न केला....एक पांढऱ्या रंगाची टपरी आणि त्यावरचा बोर्ड दिसला ... कपिला काठी कबाब!!! एवढे सारे 'क'?? एकता कपूरच्या भाच्याची वगैरे टपरी आहे कि काय, असे फालतू विनोदसुद्धा करून झाले....

    खूप मोठ्या लाईनमधून पुढे सरकता सरकता मी फायनली कपिलाच्या काउंटरवर पोचलो. वास तर कडक येत होता पण काठी कबाब म्हणजे काय हे घंटा काही माहित नव्हतं ...पण असं नवखं असल्याचं आपल्याला दाखवायला आवडत नाही.... सो एक्सपर्ट असल्यासारख  "डबल - चिकन द्या" अशी ऑर्डर दिली ....काउंटर उभा राहून माझी नजर त्या आतल्या कढईपर्यंत काही पोहोचत नव्ह्ती पण तिचं झाकण उघडल्यावर त्यातून डोकावणाऱ्या खमंग आणि मसालेदार वासामुळे नाक मात्र कढई भावतीच रेंगाळत होतं... डोळे समोरच्या तव्यावर आणि नाक शेजारच्या कढई मध्ये गुंतत ठेवून मी त्या कारागिरांची कलाकृती बघत बसलो... 

कारागीरच ते...  एका मोठ्या तव्यावर भरपूर बटर, तेलवगैरे लावून  मैद्याची रोटी ठेवली, ती अर्धी भाजली गेल्यावर त्यावर २ अंडी फोडून टाकली '....२ मिनिटात एग फ्राय रोटी दिसायला लागली , एकदम खरपूस अशी....  मग कढई उघडून त्यातलं चिकन बाहेर काढलं. लालसर रंगाचे कबाब , एकदम परफेक्ट साईझचे ..छोटे छोटे पिसेस...ग्रेव्ही नावापुरती चिकनला प्रेमाच्या ओलाव्यात ठेवणारी...  ते चिकन घेऊन त्यानी एगरोटीवर अलगदपणे सोडलं...  डोळे बघतच राहिले, पोटातली भूक सपकन वाढली. मला वाटलं झालं आता ते आपल्याला लगेच मिळणार, एखाद्या गोष्टीची हाव सुटावी पण किती! मी पाय उंच करून बघत होतो... पण कारागीर लोक्स सुरूच होते... गोल आकारात कापलेला पंधरा शुभ्र कांदा रोलवर टाकला.. लिंबु  पिळलं आणि हिरव्या रंगाची पुदिन्याची  चटणी मस्त पैकी त्यावरवाहली! पिवळसर रोटी , त्यावर एग फ्राय , लालसर चिकन आणि हिरवी चटणी....झकास... कैतरीनापेक्षा जास्त हॉट दिसत होतं ते....  ह्या सगळ्या टीमचा त्यांनी रोल केला.. जणू काही 'जा जिले अपनी जिंदगी' म्हणत पेपर नॅपकिनमधून डोकावणारा तो काठी कबाब माझ्या पुढ्यात ठेवला...


लहानपणी आपल्या शेजारी  राहणारी कुलकर्ण्यांची पोरगी, जिला आपण गोड फ्रॉक आणि दोन वेण्यांमध्ये बघितलेलं असतं ती कॉलेजमध्ये अचानक शॉर्ट स्कर्ट आणि मस्त मेकअपमध्ये 'हॉट बनून आपल्या समोर येते.. आपण फक्त 'ऑ' करून तिला बघत राहतो.. आणि एक्साक्टली सेम तसं मला झालं... पूर्वीचा पोळीचा तो रोल , काठी कबाबच्या रूपात माझ्या हातामध्ये होता...!!!! कितीही वास घेऊन मन तृप्तच होत नव्हतं पण आता जिभेची टूर्न होती... हे सगळं कॉम्बिनेशनच खतरनाक लागत होत... आणि पहिला घास घेतल्या घेतल्याच दुसऱ्या रोलची ऑर्डर दिली गेली.  



कपिला आपलं एकदम फेव्हरेटच झालं तेव्हापासून... आता तर १५ एक वर्षाची लॉन्ग टर्म रिलेशनशिप झालीये... नंतर नंतर महिन्यातून एक डेट कपिलाबरोबर नक्कीच असायची ... २ काटी कबाब खायचे आणि मन प्रसन्न करून जायचं हे एक समीकरण बनलं होतं... आमचे मित्र मितेश आणि मैत्रीण शिबानी हे कपिलाचे रोल न घेता  फक्त चिकन कबाब घेऊन कोपऱ्यात बसत आणि एखाद्या झाडाखाली बसून जांभळं खाण्यासारखे ते चिकन कबाब खात, पण आपल्याला मात्र रोटी, अंडी आणि चिकन ह्यांची साग्रसंगीत महायुती एन्जॉय करायला नेहमी आवडायची.... ही नंतर एवढी आवडायला लागली कि कपिला समोरच माझ्या ऑफिसची दुसरी ब्रँच होती.... केवळ लंच ब्रेक मध्ये कपिलाला भेटता यावं  म्हणून मी त्या ब्रँचला ट्रान्स्फर मागितली होती... बॉसनी "जरा मोठा माणसासारखा वाग आता" एवढाच सल्ला दिला... मग मी खूप सेंटी होऊन त्याला "तुम क्या जानो प्यार क्या होता है" हे सणसणीत उत्तर दिलं ....पण मनातल्या मनात...!
पण हे माझं कपिला प्रेम बायकोनी मात्र एकदम लगेच ओळखलं. लग्न झाल्यावर..विशेषतः अरेंज मॅरेज झाल्यावर आपण 'आपल्या' लोकांची ओळख करून देताना भरभरून बोलत असतो. रश्मी तसंच तिच्या नातेवाइकांबद्दल खूप खूप बोलत होती. माझी टर्न आल्यावर मी मात्र कपिला काठी काबाबबद्दल  खूप काही बोलत होतो ... माझं हे पाहिलं प्रेम तिच्या पोटापर्यंत पोचलं होतं .... आणि हे मला कळलं जेव्हा मी पहिल्यांदाच सासरी चाललो होतो.. पुणे स्टेशनला गेल्यावर 'सासरी' जायचंय ह्या कल्पनेनीच पोटात गोळा आला होता....रश्मीने ते बरोबर ओळखलं होतं.... आणि ट्रेन मध्ये बसल्यावर पार्सल करून आणलेला 'एक चिकन डबल' माझ्यासमोर ठेवला... पोटातल्या गोळ्याचं भुकेमध्ये परिवर्तन झालं .... कपिलाच्या त्या वासाने स्ट्रेस बस्टरचा 'रोल' एकदम परफेक्ट प्ले केला ...कपिला आणि माझ्या प्रेमाच्या प्रवासातला हा नवीन टप्पा सुरु झाला होता ....आणि मी एका हातात बायकोचा हात , दुसऱ्या हातात चिकन रोल आणि चेहऱ्यावर स्माईल घेऊन सासरी निघालो....

- स्वागत पाटणकर 

1 comment:

  1. अरे व्वा. स्वागत तुझी एक नवीन ओळख. छानच लिहिले आहे.

    ReplyDelete