Monday, July 16, 2018

टाईप्स ऑफ सूख!

टाईप्स ऑफ सूख!

बाळ घरी येतं 
पाळणा हलायला लागतो 
घरातलं सगळं वातावरणच बदलून जातं 
९ महिने चातक झालेलं मन 
क्षणार्धात पालक बनतं...  
वाढती जबाबदारी पेलवण्यासाठी 
अनेक हात जवळ येतात... 
आपल्यांच्या ह्या आपुलकीने 
आपले खांदे मात्र सल्लूसारखे 'ब्रॉड' होतात
आत्ता का रडतोय , डोळे लाल का वाटत आहेत 
सर्दी झालीये का?थंडी वाजतीये का? 
असंख्य वेगळ्याच काळज्या सारखं दार ठोठाववात
हे असं वाटणं म्हणजे आपण बदललोय का ?
असे हे विचार काळज्या असूनसुद्धा एक प्रकारचं सुख देत असतात 
तेव्हढ्यात ते पिल्लू वेड्या बापासमोर खुद्कन हसतं 
बाप निरागस मनानी पुन्हा पाळणा हलवायला लागतो! 

'बाटनेसे बढती है खुशिया' हे कधीतरी ऐकलेलं वाक्य  
आई बाप रोज अनुभवायला लागतात
मिठाई आणली जाते ... विडिओ चॅट केले जातात 
सातासमुद्रापार असून मनाच्या जवळ असणाऱ्यांच्या 
डोळ्यातलं पाणी जेव्हा मोबाईल ओला करून जातं 
बाळासाठी मात्र एक हवंहवंसं लिक्विड डाएट बनलेलं असतं. 
फालतू इगो बाजूला होतात
जुने वाद आता संवादात बदलतात 
हे सोनेरी क्षण साजरी करायला 
अनेक वर्षांची शांतता एका क्षणात माघार घेते 
इगो वगैरे सगळं खोटं असतं म्हणत बापाला ४ धडे शिकवते 
१५ दिवसाचं तो बाहुला बराच काही शिकवून जातो 
बापासाठी मात्र तो एक सुखदायक एक 'क्लास' असतो

बाळाचं पाहिलं रडणं , हसणं 
सगळं काही रेकॉर्ड केलं जातं..
अरे हां... त्याचे फोटो तर प्रत्येक दिवशी
इकडे तिकडे पाठवले जातात ...
एकदम आईची कॉपी आहे, 
एकदम आईवर गेलाय, 
१०० टक्के आईची झेरॉक्स ...
ही सगळी खरी असणारी 
मनाला पटणारी वाक्य 
आता बाप दुसऱ्यांकडून ऐकत असतो 
पराभूत होण्यासारखं काही नसतं 
पण तरी आई म्हणजेच बायकोबद्दलचा 
हेवा आता मनात साठायला लागतो 
काय करणार आता...  
देवाची करणी आणि नारळात पाणी 
वगैरे काहीही सांगून स्वतःला समजावलं 
तरी मन काही हसत नसतं 
असं का असं का म्हणत बसतं 
पण दुखी वाटणारा हेवा मात्र विरघळत नसतो 
जाऊदे पुढे बदलेल रूप 
अशा खोट्या समजुतींचा खोटा प्रयत्न सुरु असतो 
ह्या एका वेगळ्याच अडचणीत सापडलेला बाप 
एक दिवस दाढी करताना आरशात बघतो 
आणि कळत- नकळत ... ध्यानीमनी नसताना 
त्याला त्याच्या प्रतिमेत अचानक बाळाचा भास होतो 
आपल्या चेहऱ्यात बाळाचा चेहरा दिसायला लागतो
हा चमत्कार पोटात गोळा आणतो हातापायावर शहारे 
बायकोचा वाटणारा  हेवा आता सुखदायक बनलेला असतो 
बाप मात्र डोळ्यात पाणी आणून 
पुन्हा पाळणा हलवायला लागतो ...
-
स्वागत पाटणकर

No comments:

Post a Comment