Monday, July 16, 2018

'अरे लवकर या रे तुम्ही आता'

'अरे लवकर या रे तुम्ही आता'

चार्जिंग संपत आलेल्या
मोबाईलच्या कोरड्या स्क्रीनवर
शब्द धडकतात
'अरे लवकर या रे तुम्ही आता'

पोटात गोळा
अंगावर शहारे
मनातल्या मनात
घालमेल करून जातात

बघायला गेलं तर असतात शब्द चार
पण लपलेल्या असतात असंख्य भावना...
थेंबाथेंबानी साठलेल्या प्रेमाचा
मुरलेला गोडसर ओलावा...

मायेची ऊब, निरागस अपेक्षा
इवळूस्याची उत्सुकता किंवा बहिणाबाईंची साद
कुत्रीम झालेल्या जगात
अंतकरणाला भिडणारं
असं हे हक्काचं प्रेम
करून देतं जाणिवा
उंच उंच उड रे...पण विसरू नकोस
घर नक्की कुठे आहे...
कोणीतरी आपलंच
तिकडे वाट बघणारं आहे!

कोरडी स्क्रिन
आता ओली आलेली असते
चार्जिंग संपलेला फोन...
आपल्याला डिस्चार्ज करून जातो
- स्वागत पाटणकर 

No comments:

Post a Comment