चितळ्यांचा स्ट्रेट ड्राइव्ह... अगदी मनापासून!
आयुष्यात आपल्या अवतीभवती असणाऱ्या अनेक गोष्टी...अगदी लहानसहान असल्या तरी आपल्या कळत-नकळत मनाच्या कोपऱ्यातवगैरे जाऊन बसलेल्या असतात.. त्यांचा तो प्रेझेन्स आपल्याला बऱ्याचदा लक्षात ही येत नाही..... पण असं होतं कधी कधी कि अचानक त्यांच्यापासून लांब गेल्यावर काहीतरी कारणानी त्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात... कुठलीतरी गोड आठवण घेऊन चेहऱ्यावर हास्य आणतात... "अर्रे!" एवढेच काहीसे शब्द आपल्या तोंडात आलेले असतात.... नाही नाही उगाच लोड घेऊन फंडे देत नाहीये .... पण इथे अमेरिकेतबसून आज युट्युबवर 'अगदी मनातलं' हा विडिओ बघितल्यावर मात्र माझ्या नजरेसमोरून अजिबात जात नाहीये तो म्हणजे आम्हा पुणेकरांचं दैवत .... चितळ्यांचा गुलाबजांचा तो विशिष्ट रंगाचा खोका म्हणजेच मिठाईचा तो लालसर बॉक्स!!
चितळ्यांचे साखरी गुलाबजाम...... हे एवढंच बोललं कि विषय संपतो... खरं तर बाकरवडी, आंबा बर्फीवगैरे अनेक गोष्टींमध्ये त्यांची पी एच डी आहे..एकदम मास्टरच आहेत ते ..... पण सचिनच्या बॅटमधून किती ही बाप शॉट्स बाहेर पडले तरी त्याचा स्ट्रेट ड्राइव्ह मनाला विशेष समाधान देऊन जातो..... साखरी गुलाबजाम म्हणजे चितळ्यांचा स्ट्रेट ड्राईव्ह आहे... जिभेवरून खणखणीत ऊर्जेने पोटाच्या बॉण्डरीलाईनवर आदळून डायरेक्ट मनात घुसणारा असा हा गुलाबजाम!
लहानपणी आईनी (आणि आता बायकोनी) गुलाबजाम आणले कि तिला त्या खोक्यामधले गुलाबजाम काढून थोडे साईडला सेविंग्स अकाउंटला ठेवायला लागत असे... सध्या कसं पब्लिक येता जाता काहीही कारण नसताना मोदींना शिव्या घालतं, त्याच प्रमाणात आम्ही काहीही कारण नसताना फ्रीझ उघडून खोक्यातले २-३ गुलाबजाम येत जाता तोंडात टाकत असू... हो-हो २-३ गुलाबजाम... कारण केवळ एक गुलाबजाम खाणं हे म्हणजे पहिल्या पावसात रेनकोट घालून नाचण्यासारखं आहे.. एकदम फेल!
मला आठवतंय मी जेव्हा जेव्हा पुण्यावरून हैदराबादला कामानिमित्त जायचो तेव्हा २ खोके गुलाबजाम घेऊन जाणं हे ठरलेलं असायचं.... डेस्कवर गुलाबजाम ठेवून जेव्हा लोकांना मेल पाठवायचो तेव्हा एकीकडे मनात आज कमी लोकं येऊ देत रे बाबा वगैरे प्रार्थना सुरु असायची... हावरट पण हा फार वाईट असतो ..असे संस्कार केले खरं तर आई बाबानी.... पण चितळ्यांच्या ह्या गुलाबजामला आम्ही एक्सेप्शन दिलंय. काय करणार हो.... ते आवडतातच इतके कि कंट्रोलच होत नाहहहहहही ... बेसिकली 'काळा जामून, पाकातले गुलाबजाम' ह्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत हेच आम्ही मानतो... गणपतीलासुद्धा मोदक सोडून साखरी गुलाबजामचा नवस बोलतो...मला परीक्षेत पास केलंस तर तुला चितळ्यांचे गुलाबजाम वगैरे!
खरं तर त्या कोरड्या गुलाबजामांनी प्रेमाचा ओलावा वगैरे दिलाय... पण त्याच गुलाबजामांचा चितळ्यांच्या तो विशिष्ट रंगाचा खोका आज दिसला आणि लै इमोशनल करून टाकलं हो... घरी तो खोका दिसला कि बाहेरच्या सगळ्या कटकटी विसरायला व्हायचं ... आज सकाळ सकाळ, आमच्या शर्वरीनी पोस्ट केलेली "अगदी मनातलं" ह्या नवीन वेब सिरीज मधली एक छोटी गोष्ट पाहिली... आणि आठवड्याचा शीण पूर्णपणे निघून गेला!
युट्युब लिंक बघण्यासाठी- इथे क्लिक करा
मुळातच गोड असलेल्या गोष्टीवर काही कलाकृती करणं किती अवघड आहे खरं तर....पण आमचे पुणेकर मित्र आशुतोष कुलकर्णी आणि शर्वरी लोहोकरे ह्यांच्या अतिशय गोड स्क्रीन ऍपिअरन्सनी ती गोष्ट बघायला खूपच मस्त वाटतीये... ऍक्च्युअली पुरुषोत्तम करंडकमध्येवगैरे ह्या दोघांच्या 'बीएमसीसी' आणि 'फर्ग्युसन'मध्ये जेवढी खुन्नस बघायला मिळायची त्याच्या दुप्पट गोडवा त्यांच्या अभिनयात आहे....! इतकं नॅचरल कि असं वाटतं कि लगेच स्क्रीनमधून आत जावं आणि त्यांच्याबरोबर गुलाबजाम शेअर करावा....'४ खळ्या पडणारं' हे जोडपं म्हणजे गुलाबजामवरची साखरच! अर्थात हे दोघेही पुणेकर त्यामुळेच चितळे हे त्यांच्या नसानसात शिरलेले असतील! ह्या दोन पुणेकरांना एकत्र आणणारा म्हणजे तिसरा पुणेकर वरूण नार्वेकर.. ह्या गोष्टीचा दिग्दर्शक... ह्या वरुणचा साखर कारखाना वगैरे असावा अशी मला दाट शंका यायला लागलीये... मुरांबा काय किंवा हा विडिओ काय...किती गोडवा पसरावा एखाद्याने... आमच्या मोबाईललासुद्धा डायबेटीस होतो कि काय वाटायलय आता मला ... पण त्याच्या कल्पक दिग्दर्शनाची जादू पुन्हा दिसली जेव्हा चितळ्यांच्या त्या "खोक्यावर" क्लोज अप घेतला गेला...एका क्षणात मला गुजबम्पसवगैरे काहीतरी म्हणतात ते झालं.... पुण्याबाहेरचा खरा पुणेकर फक्त तो खोका बघूनसुद्धा खुश काय तर वेडापिसा होईल ..पार इमोशनल करून जाईल.. एक्साक्टली तसंच माझ्याबाबतीत झालं...!!
असो..... एकदंरीत काय... आवडीच्या शर्वरी,आशुतोष आणि वरूण ह्या लोकांनी आवडीच्या गोष्टीबद्दल तयार केलेली ही कलाकृती गुलाबजामसारखीच डायरेकट मनात घुसली... मन कासावीस झालं... गुलाबजाम तर काही मिळेना मग लेखणीच्या आधारानी भावना बाहेर आल्या!
अगदी मनापासून अगदी मनातलं मांडल्याबद्दल 'अगदी मनापासून' ह्या वेब सीरिजला अगदी मनापासून शुभेच्छा!
--स्वागत
Kilo bhar sunder ani goad shabdancha box pathavlya baddal dhanyawaad Swagat
ReplyDeleteKhup chan swa
ReplyDelete