Thursday, May 24, 2018

१० वर्षाचा हेवा - नाटक कंपनी!

१० वर्षाचा हेवा - नाटक कंपनी           
 
          कॉलेजचे दिवस आणि तेव्हाची स्वप्न ही काहीतरी वेगळीच असतात. तेव्हा एखादी गोष्ट आपल्याला एकदम आवडून जाते.... एकदम मनात भिडतेच म्हणा ना! असं वाटतं हेच आपल्या आयुष्याचं ध्येय ,हेच फायनल टार्गेट.. म्हणजे बघा... एखादी मुलगी दिसते , दिल में विजावगैरे कडकडायला लागतात आणि वाटतं बास हीच आपल्या आयुष्यभराची साथीदार. असो.... पुढे काय होतं माहित नाही पण सांगायचा मुद्दा हाच कि ते दिवस विलक्षण वेगळे असतात , वेगवेगळे, गोड अनुभव देणारे असतात. आमच्या आयुष्यात पण असंच काहीसं घडलं..... मुलीचं माहित नाही (किंवा इथे सांगत नाही) पण एक अशी गोष्ट आयुष्यात आली कि आम्ही बाकीच्या गोष्टी पूर्णपणे विसरून गेलो... दिवस रात्र त्याच एका गोष्टीचा विचार... वेडंपिसं करून टाकलं .... ती गोष्ट म्हणजे 'नाटक'! बीएमसीसीमध्ये शिकता शिकता पित्ती हॉल मधून नाटक आमच्या हृदयात कधी घुसलं समजलंच नाही... अभ्यास तर तीन ताड बाजूला गेला होता , नाटक श्वास वगैरे बनलं होतं.. नाटक एके नाटक!! आणि मगाशी म्हणल्याप्रमाणे ते दिवसच तसे वेगळे ..झोपाळ्यावाचून झुलायचे .....आपल्या इमोशनल मनाशी एकदम ठरवून टाकलं, रंगभूमी हेच आपल्या आयुष्याचं ध्येय.... आयुष्यात करायचं तर फक्त नाटकच..एकदम दृढ निश्चय वगैरे झाला... ! पुढे काही दिवसांनी कसा बसा ग्रॅज्युएट झालो, मग पोस्ट ग्रॅज्युएट  झाल्यावर मात्र प्रॅक्टिकल विचारांनी इमोशनल मनाचा ताबा घेतला आणि त्यातच मध्यमवर्गीय प्रॅक्टिकल डिसिजन झाला.... नोकरी करायची ....नाटक काय कधी पण करता येईल असं म्हणत नाटकानी एक्सिट घेतली आणि नोकरी नावाच्या रटाळ प्रयोगात आमची एंट्री झाली. आपल्या ह्या टिपिकल विचारांच्या कळपात अनेक जण ह्याच 'सेफ' आणि 'डिफेन्सिव्ह' अँप्रोचमध्ये आयुष्य पुढे ढकलत असतात....
          पण... (हो हो चक्क इथं 'पण' आहे) सगळेच असे नसतात...आपल्या मनाला जे भिडतंय , जे वाटतंय ते करण्याची हिम्मत दाखवणारे , खऱ्या धाडसी वृत्तीचेसुद्धा काही कॅरेक्टर्स असतात. आयुष्याचा गंभीर विचार करण्यात वेळ व्यर्थ घालवण्यापेक्षा खुल्या मानाने शिट्या वाजवत बागडणारे.... आमच्या बीएमसीसीचे  निपुण अमेय अलोक अभय आणि त्याचा ग्रुप हे असेच दुसऱ्या कॅटेगरीत मोडणारे. त्यांच्या 'सायकल' नी जेव्हा बीएमला करंडक मिळवून दिला होता तेव्हा मी जे काही ख़ुश झालो होतो .... आनंद गगनात मावत नाही म्हणतात ना तसं झालं होतं (तेवढाच आनंद धोनीने वर्ल्ड कप जिंकल्यावर झाला होता) ही पोरं.. एकदम पटूनच गेली होती. तेव्हा एकीकडे माझी नोकरी सुरु झाली  त्यामुळे थोडी इकडे तिकडे माहिती काढल्यावर समजलं पोरं  खूप गुणवान आणि हुशार आहेत .. निपुण तर सी ए वगैरे होईल... हे ऐकल्या ऐकल्या पुन्हा आमच्या मनातली भीती जागी झाली. वाटलं ह्यांचं सुद्धा तसंच होईल .. नाटक मनात राहील पण प्रत्यक्षात नाही .. पण (थँक गॉड) ह्या पोरांच्या डोळ्यातली स्वप्न ही भक्कम गाठींनी बांधलेली होती... त्याच्याशी बोलताना इवलुश्या डोळ्यात फार स्वप्न दिसायची.. (अमेय ची तर बहुधा तेव्हापासूनच स्वप्न मोठी असावीत... डोळेच मोठे झाले कि  हो त्याचे)..
 मनातल्या ध्येयासाठी झपाटलेला असा त्यांचा ग्रुप आणि पर्ण,सायली,ओम, धर्मकीर्ती, सिद्धार्थ  असेल पुण्यातले असेच गुणवान मंडळी  ह्यांच्या सायकलला जोडले गेले  ...  ह्या सर्व वेड्या मित्रांनी कॉलेजनंतरसुद्धा नाटक घट्ट पकडून ठेवलं . इन फॅक्ट ते वाढवलं... नाटक नावाच्या प्रोसेसमधून एकसे एक कलाकृती आणि कलाकारांचे फायनल प्रॉडक्ट तयार करायचा त्यांनी जणू विडाच उचलला आणि त्यातूनच सुरु झाली 'नाटक कंपनी'!!!


आपलं फेव्हरेट - टीम दळण 

निरागस गोंडस चेहऱ्याचे शूर लोक्स - 'दोन शूर'


           नाटक कंपनी... पुण्यातल्या ह्या नाटक वेड्या तरुण  उत्साही समूहाची एक आगळी वेगळी कंपनी... आई बाबा नेहमी सांगतात ना चांगल्या लोकांची 'कंपनी' असली कि आपल्या हातून चांगल्याच गोष्टी घडतात... नाटक कंपनी हे त्याचंच एक उदाहरण. कुठलंही नाटक हे त्यांच्यासाठी फक्त नाटक न राहाता तो एक खरंखुरचा 'प्रयोग' असतो. प्रयोग काहीतरी वेगळं करायचा , काही तरी वेगळं प्रेक्षकांना द्यायचा ... प्रेक्षकांना एक अविस्मरणीय अनुभव द्यायचा मनापासून केलेला प्रयोग असतो. त्यांच्या ह्या प्रामाणिक प्रयत्नांमुळेच सायकलवर सुरु झालेल्या ह्या प्रवासात त्यांनी प्रेक्षकांसमोर वेगवेगळ्या कलाकृती आणल्या. खरं तर मला नाटक कंपनीचं  'सायकल' इमोशनली जवळचं आहे पण माझं (आणि अनेक जणांचं) फेव्हरेट नाटक म्हणजे अतिशय फेमस असं 'दळण'... अमेय - निपुण - अभय ह्यांच्या अफलातून टीम वर्क आणि अमेयच्या अतिशय सहज अभिनयातून प्रेक्षकांच्या गालांवर पूर येईल एवढा हास्य फुलवणारे असे हे नाटक... माझ्या माहितीनुसार दळणमुळे नाटक कंपनी पुण्यात घराघरात आणि गिरण्यांमध्ये पण पोचली असावी. इथेच माझ्यासारख्या माणसाला नाटक कंपनीचा एक आपुलकीयुक्त हेवा वाटायला लागला... आपण ज्याचा फक्त विचार केला तीच गोष्ट ही ह्या पोरांनी खरी करून दाखवली.. करियर वगैरे गोष्टींमधून नाटकाला सोडलं नाही!! मनापासून कौतुकसुद्धा वाटत होतं आणि 'हा त्यांचा प्रवास मध्येच थांबणार नाही ना अशी मनोमन भीतीसुद्धा वाटायची. पण दळण सारखी नाटक सुपरहिट होत असताना त्यांनी महानिर्वाण, मी गालिब,आयटम अशा वेगवेगळ्या विषयांवरची वेगवेगळ्या प्रवृत्तीची नाटकं लोकांसमोर आणली. त्यांची हि धाडसी वृत्ती बघूनच त्यांचा हा प्रवास थांबणार नाही ह्याची खात्री पटली!

  मोठ्या स्वप्नांनी भरलेले डोळे- मिस्टर वाघ
                                                   
                                                                     चांगल्या कामातून चांगलंच घडत असतं... नाटक कंपनीमुळे ह्याचा सुद्धा प्रत्यय आला... नाटक कंपनीच्या कंसिस्टंट  क्वालिटी परफॉर्मन्समुळे प्रेक्षकांचा फायदा  झालाच पण त्याहून जास्त फायदा झाला तो म्हणजे मराठी चित्रसृष्टी,रंगभूमी आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीचा.... काय एकाहून एक कडक कलाकार दिलेत हो ह्यांनी....  हे माझं आंधळं प्रेम असेल पण तरी मला फार वाटतं  कि साध्या तर इंडस्ट्रीमध्ये  कुठलीही यशस्वी कलाकृती आली कि त्यात कुठल्याना कुठल्या प्रकारे नाटक कंपनीचं काँट्रीब्युशन असतंच .  गच्चीवरचा अभय महाजन घ्या , अमर फोटोचा सिद्धेश पुरकर काय... सिड मेनन असो वा सध्याचा सुपरस्टार अमेय वाघ असो..बरं नुसतेच अक्टर्स नाही बरं का तर खुद्द निपुण किंवा अलोक राजवाडेंसारखे प्रतिभावान दिग्दर्शकसुद्धा  तयार करून खतरनाक असे फाईन प्रॉडक्टस नाटक कंपनीने मराठी इंडस्ट्रीला प्रोव्हाइड केलेत...आणि हे असंच सुरु राहील!
         अतिशय अभिमान वाटावी अशी,  मनापासून नाटकावर प्रेम करणाऱ्या ह्या लोकांची ही विविध रंगानी नटलेली नाटक कंपनी आता दहा वर्षांची झाली.... बॉक्स ऑफिसवर साठणाऱ्या रकमेपेक्षा प्रेक्षकांच्या आनंदाला प्रॉफिट समजणारी ही नाटक कंपनी आपल्याला अजून अजून सुखावह अनुभव घेऊन येईल ह्यात वाद नाही... दहा वर्ष झाली आणि माझ्या मनातला त्यांच्याबद्दलचा हेवा सुद्धा १० वर्षाचा झाला.... चकचकीत दिसणाऱ्या आयटी कंपनीपेक्षा नाटककंपनी जॉईन केली असती तर अजून आयटीत जगता आलं असतं असं वाटून जातं... असो...  नाटक कंपनीच्या १०व्य वाढदिवसांला माझ्या सॅडनेसचं कॉकटेल नको. निपुण आणि ग्रुप - असेच अजून भारी गोष्टी आम्हाला दाखवा ..तुम्हाला (विवेक ओबेरॉयच्या आवाजात) एकच सांगतो तुम और तुम्हारी ये कंपनी ....झकास!

लोकहो, ह्या नाटक कंपनीला १० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल जूनच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी नाट्यमहोत्सव आयोजित केला आहे... तुम्ही नक्की नाटकं बघा... दळण बघा, सिंधू बघा ..सायकल तर बघाच..... जाऊदे.... किती लिहायचं .... एक काम करा ना... सगळीच नाटकं  बघा!!

-स्वागत पाटणकर 

6 comments:

  1. Waaah Swaagyaa .. . Ek Number .... Manlaa bhidnara lihilays ....amche ILS madhle Purushottam che diwas athawale .....

    ReplyDelete
  2. जबराट रे, कम्पनी हवी तर अशीच

    ReplyDelete
  3. लई भारी।।।बाप,आपल्यालाआवडलं

    ReplyDelete