कन्फेशन
आपल्याला सगळं कळतं किंबहुना आपल्यालाच सगळं कळतं ... आयुष्याच्या ह्या फेजमध्ये अर्थातच कॉलेजमध्ये असतानाची गोष्ट असेल. मी नुकताच पुरुषोत्तम करंदकमध्ये भाग घ्यायला लागलो होतो; त्यामुळेच अभिनयातलं आपल्याला जरा कळायला लागलंय ह्या भावनेत पूर्णपणे बुडून गेलो होतो. त्यातच सुदर्शनला जाऊन प्रायोगिक नाटकं बघायची सवय लागली (किंवा लावून घेतली... किंवा सवय लागलीये असं इम्प्रेशन तयार केलं) आणि त्यामुळेच अभिनय, नाटक, सिनेमा, अभिनेता, अभिनेत्री वगैरे वर आपण काहीही बोलू शकतो हा (फाजील) आत्मविश्वास तयार झाला. एकतर मी जन्माचा पुणेकर त्यामुळे कुठल्याही गोष्टीवर मत ठोकून द्यायचं ही आमची जन्मापासूनची सवय.... पण ह्या फाजील आत्मविश्वासाने ठोकलेली मतं ही अचूक आहेत असा एक गोड गैरसमज मी करून घेतला होता... अर्थातच तो 'गैर'समज आहे हे समजायला ८एक वर्ष गेली...
सन २०१०.. जानेवारी महिना.. त्या महिन्यात नटरंग, शिक्षणाच्या आईचा घो, हरिश्चंद्राची फॅक्टरी वगैरे एक से एक मराठी सिनेमा रिलीज झाले होते. बाप महिना होता तो आपल्या इंडस्ट्रीसाठी.... नटरंग फर्स्ट डे फर्स्ट शो टाकला होता... सिनेमा सुरु झाल्या झाल्या पहिल्या अर्ध्यातासात लोकांनी शिट्या , आवाज, दंगा करत थिएटर डोक्यावर घेतलं होतं... वाजले कि बारा गाणं सुरु होतं.. सिनेमा संपला... आम्ही सिनेमा ग्रुप सिनेमानंतर नेहमीप्रमाणे चर्चा (रिव्यू) करायला बसलो... लोकं सिनेमा , रवीजाधव, अतुल ह्याबरोबर एक नाव सारखा सारखं घेत होते... अमृता खानवेलकर! खूप कौतुक चाललं होतं तिचं... काय झालं मला काही कळलं नाही पण मी मेजर विरोध दर्शवला... "फक्त १ आयटम सॉंग तर करून गेलीये.. डान्स बरा करते पण अभिनयाचं काय... साधं मराठी पण नीट बोलता येत नाही तिला... इंग्लिश मीडियममधली असेल .. " मी रपारप - एका मागोमाग कमेंट्स करत होतो.. खरं तर 'का' असं बोलतोय हे माहित नव्हतं.. समोरच्याशी मतभेद करायचा हे एकमेव कारण असावं... पण मी सगळं बोलून गेलं होतो... लोकांना ते पटलं नव्हतं पण माझ्या बोलण्याला जास्त कोणी विरोधही केला नव्हता... अमृतानी डेब्यू करून २-३ वर्ष झाली असतील पण अवॉर्ड्स प्रोग्रॅममध्ये वगैरे तिच्या मराठी उच्चारांबद्दल विनोद करत असत समहाऊ त्यामुळे तिची इमेज तशी झाली होती आणि म्हणूनच लोकांनी मला फारसं विरोध केला नाही... ती रिव्यू चर्चा जिंकल्याचा मला आनंद होत होता पण तो वरवरचा होता.... उगाचच एखाद्याबद्दल टीकात्मक बोलून गेलोय हे आतून टोचत होतं...
आणि मग नकळत मी अमृताचे करियर फॉलो करायला लागलो होतो.... फॅनवगैरे नाही अजिबातच नव्हतो... कारण माहित नाही पण ती कुठलं प्रोजेक्ट करतीये, कसं करतीये ह्यावर लक्ष ठेवून बसणं ही एक सवयच होऊन गेली होती! गैर,फुंक, अर्जुन, सतरंगी रे वगैरेंमधून ती वर्षातून २-३ सिनेमा ह्या हिशोबानी आपल्यासमोर येतच होती... हिंदीमध्येही दिसत होती ... पण माझ्यातल्या तिच्या टीकाकार मनाला ती भावून गेली शाळामधल्या छोट्याश्या भूमिकेत... अतिशय छोटा होता तो रोल पण तो तिचा स्क्रीन प्रेझेन्स मला सपकन आवडून गेला होता... का कोणास ठाऊक पण ही मुलगी एक ऑल राउंडर आहे असं वाटलं... मग आलेल्या बाजीमुळे ही मुलगी अभिनयाचं पूर्ण पॅकेज आहे हे पटून गेलं... पण आपल्याच पूर्वीच्या मताचा विरोधाभास कशाला म्हणून कधी ४-चोघात तिचं कौतुक केलं नाही.
आणि माझ्या मनातलं कन्फ्युजन खोडून टाकलं ते २०१५नी.... नच बलिये ७ तर जिंकलंच तिने पण कट्यारमध्ल्या झरीनाने माझं मन जिंकून टाकलं... अभिनय होताच सुंदर ... पण तिच्या अस्खलित अशा हिंदी आणि मराठी शब्द उच्चारांनी माझ्यातल्या टीकाकाराला खणखणीत वाजवली होती... उचारांमागची तिची मेहनत दिसत होतीच.... तिचे कष्ट, तिच्या मेहनतीला महत्वपूर्ण जोड होती तिच्या चिकाटीची.... अशी चिकाटी - अशी जिद्द जी २००४ साली इंडियाज बेस्ट सिनेस्टार कि खोज मध्ये पार्टिसिपेट केल्यानंतर तब्बल ११ वर्षांनीसुद्धा त्याच जिद्दीने ती नच बलियेमध्ये उतरली! अंडर-डॉग्स म्हणून तिच्याकडे बघितलं जात होतं ....आणि ती डायरेकट विजेती होऊनच बाहेर आली.. तिचे कष्ट तिची गुणवत्ता तिची मेहनत पूर्णपणे रिझल्ट दाखवत होती... मराठी अभिनेत्री देशभर आवडती झाली होती... आणि अर्थातच माझीसुद्धा! इंडस्ट्री ला मिळालेला हा ग्लॅमरस चेहरा!! यशाची पायरी चढताना शिडी लागल्यासारखी ती आता अजून उंच उंच पोचायला लागलीये... २ मॅड सारख्या कार्यक्रमात ती जज म्हणूनसमोर आली आणि ती भूमिका सुद्धा तिनी परफेक्ट निभावली.. अनिल कपूरच्या २४ मध्ये दिसली... आपली पुण्याची मराठी मुलगी खूप पुढे जातीये हे बघताना लै कौतुक वाटत होतं... त्यातच करण जोहरचा सिनेमा ती करतीये ही बातमी मिळाली... क्युट,हॉट, कडक डान्स आणि अप्रतिम अभिनय हे सगळं पॅकेज असणारी ही मेहनती गुणी मुलगी ...तिच्या नशिबात तिनी हे सगळं मिळवलं.. स्व-कष्टानी मिळवलं! तिचं हे यश असंच वाढत राहो ही इच्छा!
कट्यार,नच बलिये, २४ वगैरे मधूनअमृता सारखी भेटत होतीच... पण कदाचित ते कमी पडत होतं....तुमच्या मनात किती ही इगो असला तरी दुसऱ्याच्या आयुष्यात डुंकून बघायला लै आवडतं.. आणि म्हणूनच तिला सोशल मीडियावर फॉलो करायला लागलो होतो...
गेल्या २-३ वर्षात तिच्या पोस्टची आवर्जून वाट बघता बघता मला तिच्यातल्या वेगळ्याच बाजूची ओळख झाली... ती एक उत्तम , मेहनती कलाकार आहेच पण त्याबरोबरच एक गोड मैत्रीण, गुणी मुलगी आणि निर्मळ मनाची माणूस आहे! सोशल मीडियाच्या जमान्यात ..प्रत्यक्ष भेट न होता माणसाची एक ओळख होऊन जाते... लहान मुलांबरोबर वाढदिवस साजरा करणारी मॅच्युअर्ड अमृता किंवा ऑस्ट्रेलियामधल्या व्हिडिओत बागडणारी तिच्यातली लहान अमृता ... नवरात्रीमध्ये घरातल्या देवीला मिस करणारी अशी ही इमोशनल भावून मनाची अमृता ....अशा अनेक गोष्टींमधून ती आपलीच एक मैत्रीण बनून गेली.... आपल्याला अभिमान वाटावा अशी एक आपली गोड मैत्रीण!! अमृताच्या गुणवत्तेला ओळखायला मला उशीरच झाला.... पण ही गुणी मराठी मुलगी अभिनय क्षेत्रात पुढची अनेक वर्ष असंच राज्य करेल हे मला तिच्या वाढदिवसानिमित्त जगाला ओरडून सांगावंसं वाटलं .... तिला ओळखायला मी चुकलो हे कन्फेस करावंसं वाटलं.... म्हणून हा सगळा खटाटोप!
अमृता .... हॅपी बर्थडे .......यू रॉक!!!!!
-स्वागत पाटणकर
No comments:
Post a Comment