Thursday, November 23, 2017

फसवं ऊन



फसवं ऊन

बाहेर साधारण मायनस ४ वगैरे टेम्परेचर असतं... थंडी हवेत एकदम मिसळून गेलेली असते... दुपारी ४ वाजताच अंधार पडायला पडतो त्यामुळे अंधारासारखाच गारवासुद्धा एकदम गडद होऊन जातो... आपण कुडकुडत घरात बसतो.. हीटर लावतो...हातात वाईन असते तर दुसऱ्या हातात एखादं पुस्तक... खिडकीजवळच्या आराम खुर्चीत बसतो ... ती गार खिडकी आपल्याला काही स्वस्थ बसवून देत देत नाही.. मग एक ब्लॅन्केट अंगावर ओढून पुन्हा वाईन आणि पुस्तकाकडे मोर्चा वळवतो.... ब्लॅन्केटमुळे बाहेरून आणि वाईनमुळे आतपर्यंत पोचलेली ती आर्टिफिशियल ऊब डोळ्यांना झोपायला सांगते....सोबतीला असतात त्या गार भिंती.... गार गाद्या... गार आपण... गुलाबी टू बोचरी हा थंडीचा प्रवास सुरु होतो ... कुडकुडत आपण झोपी जातो...  
सकाळ सकाळ पडद्याच्या गॅपमधून भिंतीवर पडलेली एक ऑरेंज लाईन दिसते... किलकिल्या डोळ्यांना समजतच नाही.... अंगावरून ब्लॅन्केट आणि डोळ्यांवरून झोप काढल्यावर साक्षात्कार होतो.... अर्रे सूर्यदेवता आज  चक्क भेटायला आल्या आहेत...मन प्रसन्न होतं ... मनातल्यामनात बागडायला लागतं... आपण उठून जोरात पडदे बाजूला करतो....सकाळच्या त्या फ्रेश किरणांचे घरात स्वागत करतो... हातात कॉफी घेऊन पुन्हा त्याच खिडकीजवळच्या त्याच आराम खुर्चीत बसतो... कालच्या रात्रीची खिन्नता त्या सन बाथ मध्ये एकदम धुतल्यासारखी होते.. समोरच्या झाडावरचे पक्षीसुद्धा खुश दिसतात..त्यांचा किलबिलाट सुरु असतो... सूर्यदेवताची तो विझिट सगळ्यांनाच आवडलेली असते... आज तो अतिशय लांबचा डोंगरसुद्धा स्पष्टपणे दिसत असतो ....सनी डे अँड क्लीयर स्काय ....
बॉइल्ड एग्ज खाऊन तावातावानी जॅकेट कानटोप्या शूज वगैरे घालून बाहेर जायला तयार होतो... दार उघडून बाहेर गेल्यावर पहिले २ सेकंद खूप छान वाटतं .... त्या नंतर मात्र लगेच अतिउत्साह संचारलेल्या शरीरातली हवा एका शॉट मध्ये फुस्स होऊन जाते.... सकाळच्या १०च्या उन्हात उभं राहून सुद्धा आपल्याला हवेतल्या गारव्यानी पूर्णपणे वेढलेलं असतं.... आपल्या नजरेला दिसणाऱ्या त्या उन्हानं आपल्याला फसवलेलं असतं... दिसतं तसं नसतं ह्या प्रिन्सिपलला फॉलो करणारं ते 'फसवं ऊन'...कानटोप्या , जॅकेट वगैरे सगळी शस्त्र असून सुद्धा आपण त्या अनपेक्षित थंड हल्ल्यासमोर पराभूत होऊन जातो.. सपशेल पराभूत....एवढं ऊन असून थंडी मात्र जिवघेणी बोचरी .... मनाला पटतच नाही...पराभव पचवण्याचा प्रयत्न करत घरी परतण्याचा निर्णय घेतो... घरात घुसल्या घुसल्या उबदार वाटतं... पण मन दुखावलेलं असतं ते पराभवामुळे नाही .... तर समोर दिसणाऱ्या त्या पिवळ्या धमक 'फसव्या उन्हामुळे'.... कोणाकडून तरी फसवलं गेलंय ही भावना टोचत असते.... पुन्हा त्याच खिडकीत बसतो... हातात कॉफी आणि लांबचा डोंगर बघत बघत.... इकडचा हा सूर्य मग परका होतो... नजरेसमोर येत असते आपल्या घरच्या उन्हाची मजा.. शिवाजी पार्क वरच्या दवबिंदूंनी ओलसर झालेल्या क्रिकेटच्या पीचला मायेची ऊब देऊन पांघरून घालणारं दादरचं ते कोवळं ऊन हवंहवंसं वाटतं.... हे काहीच नाही.. पुण्याच्या कर्वे रोड वर दुपारी १२ वाजता ट्राफिक जॅम असताना अंगावर चटके देऊन हल्ले करणाऱ्या कडक उन्हाची सुद्धा खूप आठवण येते....समोरचा तो डोंगर बघत ... दुःखाचा डोंगर कोसळल्याचा आवेशात आपण त्याच खिडकीत बसून राहतो.... आपल्या उन्हाची आठवण काढत काढत.... आणि नकळत समोरचा डोंगर पुन्हा नाहीसा व्हायला लागतो.. अस्पष्ट दिसायला लागतो... वाटतं डोळ्यातल्या पाण्यामुळे असं होतंय पण ते तसं नसतं... पुन्हा ४ वाजलेले असतात... सूर्य देवता ऑफिस लवकर संपवून निघून जाते... अंधार पडतो... डोंगर काय.... समोरचं ते झाड पण दिसेनासं होतं.. पक्ष्यांची किलबिल बंद होते.... खिडक्या गार पडायला लागतात .. हातात वाईनचा ग्लास येतो.... पुन्हा निपचित पडलेल्या त्या अंधाराकडे बघत बघत  पहिला घोट घेतो... आणि थोडा जास्त विचार केल्यावर ते फसवं का असेना पण मन प्रसन्न करायला आलेल्या त्या उन्हाचा प्रेझेन्स एन्जॉय न करता त्या 'ऍबसेन्ट' असलेल्या कडक उन्हाच्या दुःखात दिवस वाया घालवतो...   आपलीच चूक आपल्याला उमगते ....जे मिळालंय त्याचा आनंद न घेता जे नाहीये त्या गोष्टीचं दुःख .- तक्रार करण्याची प्रवूत्ती दिसून येते .... आणि हे बदलायची गरज सूचित करते.... फसव्या उन्हाचा असा एक दिवस येतो आणि कोवळ्या मनावर कडक शिकवून देऊन जातो!
-- स्वागत पाटणकर 


3 comments:

  1. वा. सुंदर. इकडे उलटं होतंय. थोडं मळभ आहे म्हणून टोपी न घालता बाहेर पडलं की सूर्यदेव रागाने लाल होतात.

    ReplyDelete
  2. Wah kiti sundar lihitos re...Asa watala apan pan tithech ahot... Punyala miss kartos na khup... Perfectly written ... Asach mast lihit ja. :)

    ReplyDelete
  3. अप्रतिम लेखन भौ!

    ReplyDelete