Saturday, September 30, 2017

कासव बघा. कासव व्हा - ट्रेलर रिव्ह्यू

कासव बघा. कासव व्हा.

खरं तर नॅशनल अवॉर्ड - सुवर्ण कमळ विजेत्या चित्रपटाचा ट्रेलर-रिव्यू वगैरे लिहिणं म्हणजे पीएचडी मिळालेला मुलगा "हा खूप हुशार आहे हां" वगैरे लोकांना सांगणं.... पण काय करू, आज सकाळपासून ते अतिशय सुंदर असं ट्रेलर बघितल्यावर काहीतरी लिहायला हात फारच शिवशिवत होते, खूप लोकांना ट्रेलर लिंक पाठवली पण समाधान होतं नव्हतं शेवटी लिहायचं ठरवलंच...३ मिनिटांचं ट्रेलर ...सिनेमाचं नाव कासव.... पण अजिबात वेळ न दडवता, चित्त्याच्या वेगात ते मनात घुसलं आणि खोलवर रुजलं... 
 देवगडच्या रम्य समुद्रकिनाऱ्यावर सूर्यास्ताच्या वेळेस पाण्याच्या दिशेनी जाणारी २ कासवं ... त्यांच्यावर आदळणारी लाट आणि दुसऱ्याच सीनमध्ये सकाळच्या साडेसहाच्या स्वप्नात आलेल्या लाटेच्या आवाजांनी दचकून उठणाऱ्या इरावती हर्षे....! वाह! अक्षरशः तीन सेकंदाच्या ह्या २ सीन्समध्ये हे ट्रेलर आपल्या मनावर गारुड करतं... समोर काहीतरी उच्च दर्जाचं सुरु आहे ह्याची प्रचिती देतं...आणि आपण त्या कासवांमध्ये गुंतून जातो...

सुमित्राताई भावे आणि सुनील सुकथनकर ... ह्या दिग्गज दिग्दर्शक जोडगोळीचा हा सिनेमा... आणि ट्रेलरमधल्या प्रत्यके फ्रेममध्ये ते वेगळेपण- तो ग्रेटनेस जाणवत राहतो. अस्तूनंतर पुन्हा एकदा ह्या दोघांचा चित्रपट बघायला मिळणं म्हणजे पर्वणीच. 'इरावतीच्या खोलीत ठेवलेली २ मूर्तीरुपी कासवं ', 'आलोक किनाऱ्यावर चालत असताना मागे फिरणाऱ्या पवनचक्क्या' अशा फ्रेम्समधून ही दिग्दर्शक जोडी का दिग्गज आहे ह्याचा प्रत्यय आपल्याला येतो! प्रत्येक गोष्टीचा डिटेल अभ्यास करणाऱ्या सुमित्रा ताईंनी लिहिलेली ही कथा, अक्षरशः ३ मिनिटाच्या ट्रेलरमध्ये मनाची पकड घेते... पॅनिक, डिप्रेशनसारख्या मानसिक 'आजारातुन' जात असलेल्या एखाद्याला अशा स्थितीतून बाहेर काढण्यासाठी दगड बनून प्रॅक्टिकल अप्रोच ठेवून मदत करण्यापेक्षा, त्या माणसाला आधी नीट समजून घायची गरज असते... सामान्य माणसाला हे मानसिक विकार पटकन समजत नाही...पण बाहेरहून सुखासुखी दिसणाऱ्या गोष्टींना आतून तडा गेलेला असू शकतो.... त्यामुळे त्यात डोकावून बघायची गरज असते...ओल्या मनानी! कुठल्यातरी मानसिक गुंत्यामध्ये त्रस्त झालेला अलोक राजवाडे..आणि असाच काहीशा आजार पूर्वी अनुभवलेल्या इरावती हर्षे अशा दोन कासवांची गोष्ट म्हणजे हा सिनेमा.... असं म्हणतात -'Try to be like a turtle - at ease in your own shell' तुम्ही जसे आहात ...तसंच रहा ..त्याच स्वतः वर प्रेम करा . जाणूनबुजून पर्सनॅलिटी बदलायचा प्रयत्न करू नका... कासवाकडून शिका.... कदाचित ह्या सिनेमातून तेच सांगायचं असेल असा काहीसा अंदाज आपल्याला ट्रेलरमधून येतो..... 


    संपूर्ण ट्रेलरच खरं तर जबरदस्त आहे पण त्यातसुद्धा सर्वात जास्त भावलेली गोष्ट म्हणजे ह्यातले डायलॉग्स!!! मानसिक आजार, सायकॉलॉजिकल इश्यूवर कलाकृती करणं म्हणजे तारेवरची कसरत असते. त्यातले संवाद हे चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोचवायला सर्वात महत्वाचे असतात. शब्द निवड ही चोख असावी लागते. नाहीतर चित्रपट खूप जड किंवा बालिश होण्याचा धोका असतो. पण सवांद लिहीणाऱ्या सुमित्रा ताईच त्या... सगळ्यांच्या गुरूच ...त्यांनी अत्यंत चपखल शब्द वापरून संवाद लिहिलेले आहेत . सामान्य प्रेक्षकाला समजतील... गोष्टीचं गांभीर्य कमी न होता आणि तरीसुद्धा मानसिक आजारसारखा नाजूक विषय लोकांच्या मनात अलगदपाने उतरेल ह्याची खात्री घेणारे असे संवाद.
   "सुखासुखी एकांत वाटतं?" "सुखाच्या व्याख्या वेगळ्या असतात ना", "मला मी आवडत नाही" "कुटुंबा हवंच  आधाराला ..पण मनाच्या नात्यांचं" असे एकसे एक डायलॉग्स ट्रेलरमध्ये ऐकायला मिळतात... आणि त्यात क्युट सरप्राईज देऊन जातो तो छोट्या ओंकारच्या तोंडून असलेला कोकणी भाषेतला चहा भजी वरचा डायलॉग... हे संवाद गोष्ट फार सोप्पी करून आपल्याला सांगतात आणि त्या व्यतिरिक्त "शेकडो कॉन्टॅक्ट आहेत एका बोटाच्या वर पण तरी एकटं वाटतं " अशा सवांदातून हा प्रॉब्लेम आजचा आहे हे सुद्धा दर्शवतं....अगदी सामान्य प्रेक्षक रिलेट करू शकेल अशा भाषेत! त्याबद्दल सुमित्रा ताईंना खरंच एक साष्टांग नमस्कार करावासा वाटतो....



आता बोलू कलाकारांबद्दल ...अभिनयातली देव माणसं सगळी ! काय बोलणार त्यांच्याबद्दल.... नवशिक्या अभिनेत्यांनी खरंतर हे असे चित्रपट अभ्यास म्हणून बघावेत.... काय टीम निवडलीये सुमित्राताई आणि सुनील सरानी!! शेन वॉर्नची ओव्हर कशी लेग स्पिन,गुगली असे ६ विविध पण ताकदवान शस्त्रांनी भरलेली असते ....एक्साक्टली तसंच आहे कासवमध्ये! मोहन सर , इरावती , देविका , किशोर सर ,छोटा ओंकार आणि आलोक! प्रत्येकाची स्टाईल वेगळीपण तेवढीच ताकदवान! 
इरावती हर्षे!!! नेहमी दर्शन देत नाहीत त्या पण जेव्हा स्क्रीनवर असतात त्यांचा प्रेझेन्स खूप प्रसन्न करणारा वाटतो ...वाक्य बोलताना विशिष्ट शब्दावर जोर द्यायची स्टाईल, त्यांचा तो भरीव आवाज नाजूक विषयाला फारच वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतो...आलोकचा गुंता सोडवाताना होणारी त्यांची घालमेल ही त्यांनी बरोबर दाखवली आहे. किशोर सर म्हणजे मानसिक आजाराकडे कोरड्या नजरेनी बघणाऱ्या लोकांचं प्रतिनिधित्व करणारे ...त्याच्या स्पेशल स्टाईलनी त्यांची बाजू मांडतात आणि आलोक...तो तर आपला एकदम फेव्हरेट... मराठी शब्दांचे उच्चार कोणाकडून शिकावे तर ते आलोककडून ह्या ठाम मताचा मी आहे... त्याच्या रिऍक्शन्स सुद्धा खूप बोलक्या असतात ...उदाहरण द्यायचं झालं तर ओंकारकडून चहा भजी ची गोष्ट ऐकल्यावर ...आलोकनी दिलेली रिअक्शन निशःब्दपणे बरंच काही बोलून जाते...आणि तो आता ह्या गुंत्यातून कसा बाहेर येणार ह्याची उत्सुकता वाढवते! 

ह्या सर्व गोष्टींमुळेच कधी एकदा हे कासव बघतोय असं झालाय...फार महत्वाचा सिनेमा असणार आहे हा... 


नेहमीचा मसाला, धांगडधिंगा ह्या व्यतिरिक्त कासवसारख्या नाजूक विषयांवरच्या उत्तम कलाकृती निघणं हे समाजाच्या सुधृढ प्रकृतीसाठी फार गरजेचं आहे ...त्यामुळेच कासव फक्त भारतात नाही तर जगभरात प्रदर्शित व्हावा , खूप लोकांनी तो बघावा .... हीच इच्छा!!!                                                                                        
--स्वागत पाटणकर 

5 comments:

  1. वा. तू चुकून साॅफ्टवेअर क्षेत्रात दिवस फुकट घालवतो आहेस असं वाटतंय आता. keep it up. आणि लवकरच चेंजओव्हरला तयार हो

    ReplyDelete
  2. Trailor चा review इतका छान....तर समीक्षण वाचायला नक्कीच आवडेल

    ReplyDelete
  3. खूपच छान लिहिलंय. अजून ट्रेलर पाहिला नाही. आता पाहतो

    ReplyDelete
  4. दहावी फ पासून सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर यांची जबरदस्त फॅन आहे मी. त्यामुळे त्यांचा एकही पिक्चर सहसा सोडत नाही मी. कासवही नाही सोडला. फिल्म फेस्टिवल नसतानाही चक्क कोल्हापुरात शो मिळाला, हव्या त्या वेळेला मिळाला आणि एक निखळ आनंद देऊन बसला मला हा चित्रपट. काही गोष्टी देऊन परत जात नाहीत. त्या रुतून बसतात आपल्यामध्ये. या दोघांच्या चित्रपटांबद्दलही तसंच म्हणता येईल.
    सुंदर टीजर रिव्हयू. खरंच एक एक फ्रेम अर्थपूर्ण आहे. पार्श्वसंगीत सुरेख. प्रत्येकाला ' माझे' वाटतील असे संवाद. कुठेही नाटकीपणा नाही, असा हा कासव खरंच is a MUST WATCH!

    ReplyDelete
    Replies
    1. Mala bhetach nahi aahe online ha movie, mi tar sunil sukhthankar la Facebook war ping sudha kel

      Delete