आपल्याला फार वाईट सवय असते , लोकांना पहिल्या भेटीतच 'जज' करायची. फार पूर्वी.. म्हणजे १५-१६ वर्षांपूर्वी, आमची सगळी बीएमसीसीची नाटक मंडळी पित्ती हॉलवर जमला होती. पुढच्या स्पर्धेसाठी काय करावं वगैरे चर्चा सुरु होत्या. तेवढ्यात एक मुलगा आला.. अकरावीत कॉलेजमध्ये आल्या आल्या लोकं नाटक, क्रिकेट असे आपल्या इंटरेस्टचे ग्रुप्स जॉईन करतात... हा ही तसाच असावा असं वाटलं! ओळख परेड सुरु झाली .... नाव 'सारंग साठ्ये.... अकरावी नव्हे तर एफ वाय- एस वायमध्ये होता, सीएचं एक वर्ष 'ट्राय' करून मग त्याला चक्क अभिनयात इंटरेस्ट जाणवायला लागला होता!'
निळा चेक्सचा शर्ट, आतमध्ये पंधरा टीशर्ट, डोळ्यावर चष्मा, अख्या दुनियेची वेट लॉसची जबाबदारी एकट्याने उचलल्यासारखा बारीक आणि मनातले विचार जितक्या वेगवेगळ्या दिशेने जाऊ शकतात तितक्याच वेगवेगळ्या दिशांना भरकटलेले त्याचे ते केस! . एकूणच त्याला पाहता, 'ह्याला अजूनही आपला इंटरेस्ट नक्की कशात आहे हेच कळलं नाहीये...सीएसारखच ही पण चुकीचीच दिशा ह्यानी निवडलीये... आता करायला काही नाहीये तर उरलेलं कॉलेज लाईफ एन्जॉय करायला इकडे आलाय' वगैरे मतं त्याच्याबद्दल झाली होती!
पण कधी कधी शितावरून भाताची परीक्षा केल्यावर आपण सपशेल फेल होतो!! साठ्ये हा त्यातलाच प्रकार... पित्ती हॉल जॉईन केल्यावर काहीच दिवसात त्याने अक्षरशः त्याच्याकडे असलेल्या अफाट ऊर्जेने मला भारावून टाकलं! किती एनर्जी असावी एवढाश्या जीवात ... केवढ्या कल्पना असाव्यात त्या डोक्यात! बीएम गेल्या काही वर्षांमध्ये पुरुषोत्तम मध्ये फारसं यशस्वी झालं नव्हतं... पण ह्या नवीन आलेल्या पाखराने पांढरा शुभ्र सीगल बनून आम्हा सगळ्यांना झेप घ्यायला शिकवलं! सगळं ग्रुप एक झाला ..खूप कष्ट, अपार मेहनत घेऊन जोनाथन सीगल एकांकिका उंच उंच उडाली आणि पारितोषिक घेऊनच पित्तीच्या फांदीवर खुशीत येऊन बसली. भरतमध्ये बीएम - बीएम च्या गजराची वाट बघत होतो तो शेवटी ऐकायला मिळाला! एक स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद झाला! आणी त्यात साठयांच्या सीगलचा सिंहाचा वाटा होता! सारंगची दिशा चुकलेली नव्हती ... त्याची घेतलेला तो टर्न हा राईटच होता.. आणि त्याच्या चेहऱ्यावरचं समाधान ते सांगून जात होतं!
नटसम्राट! |
त्यानंतर मात्र भेट होणं फार कमी झालं... आम्ही ९-५ जॉब मध्ये बिझी झालो आणि सारंग 'स्ट्रगल' करायला पुण्याबाहेर गेला असं मित्रांकडून कळलं! कोणी गॉडफादर नसलेल्या साठ्येचा स्ट्रगल यशस्वी होवो एवढीच मनातल्या मनात प्रार्थना केली! मधेमधे गार्बो ,तू ,जंगलनामा अशा अनेक कलाकृतींमधून त्याच नाव वाचायला मिळायचं... स्वतःमधल्या एनर्जीला प्रायोगिक रंगभूमीकडे चॅनेलाईझ करून त्यांनी पुन्हा एकदा बरोबर निर्णय घेतला होता! आमच्या हिऱ्याला पैलू पाडायचं काम प्रायोगिक रंगभूमी करत होती! ब्राईट डे, ब्रिन्ग ऑन द नाईट वगैरे मधून तर हा देशभर पोचला होता! नटसम्राट रिलीज झाल्यावर किंवा गुगल प्लेवर ब्राईट डे आल्यावर मी सगळीकडे आरडाओरडी करून अतिशय उत्साहात सगळ्यांना सांगत सुटलो होतो! आपला साठ्येच हे यश बघून खूपच मस्त वाटत होतं! मध्यंतरी एकदा कर्वे रोड वर दिसला...त्याचे पूर्वीचे ते भरकटलेले केस आता खूप मोठे झाले होते पण एकदम टापटीप.! आपसूक त्याला हाक मारली गेली ... मागे न बघता त्यांनी काय स्वागत कसा आहेस विचारलं! त्यानं इतक्या वर्षांनी सुद्धा फक्त आवाजावरून आपल्याला ओळखलंय! वाह! त्याच्याबद्दल प्रेम होतंच .. पण आदरही वाटायला लागला!
सारंग मात्र एवढ्यावर थांबणाऱ्यातला नक्की नाही. त्याच्यातला दिग्दर्शक त्याला स्वस्थ बसू देत नव्हता...,मनात असलेल्या अनेक कल्पनांना वाट करून देण्यासाठी भाडीपा - मराठी वेब चॅनेल सुरु केलं..आजकालच्या प्रेक्षकांना नक्की काय हवंय ह्याची उत्तम जाण असलेल्या साठ्येनी कास्टिंग काऊच लोकांसमोर आणलं तेसुद्धा अनेक वर्षांपूर्वी त्यानी पारखलेल्या 'त्या दोन' मुलांना घेऊन ... मराठीतील ह्या पहिल्या वेब सिरीजनी जगभरात अक्षरशः धुमाकूळ घातलाय .. भाडीपाच्या सगळ्याच कलाकृतींवर लोकं मनापासून प्रेम करतायेत! पण मला मात्र ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये त्याच्यातला दिग्दर्शक त्याच्यातल्या अभिनेत्यावर अन्याय करतोय कि असं वाटायला लागलं ... पण परवाच पाहिलेल्या उबुंटूच्या ट्रेलरनी मात्र सुखद धक्का दिला! लीड रोलमध्ये आपला साठ्ये! ट्रेलर तर आवडूनच गेलं पण एकसाईटमेन्ट मध्ये भराभरा १५ वर्षांपूर्वीच्या आठवणी डोळ्यासमोरून गेल्या आणि लेखणीतून उतरल्या!
उबुंटूमध्ये त्याच्या तोंडी एक डायलॉग आहे. "ह्या वयात फार रग असते मुलांच्या अंगात"....
इतक्या वर्षांनीसुद्धा सारंगनी तीच रग त्याच्यात अजूनही जिवंत ठेवली आहे ह्यापेक्षा सुखावणारी दुसरी गोष्ट नाही... त्याच्या फॅन्ससाठी..माझ्यासारख्या!
सारंग साठेचं व्यक्तिमत्व आम्ही त्याला न पाहताही आमच्या मनात ठसलं
ReplyDelete