Friday, September 22, 2017

स्लो कूकर- हळूवारपणे शिजलेलं सुख!

स्लो कूकर- हळूवारपणे शिजलेलं सुख!
                                                                                                                                         

आजकाल ज्या गोष्टी बाहेर खातो त्याच घरी ट्राय करायचा नवीन छंद लागलाय... त्याच गडबडीत एक नवीन फॅड म्हणून परवा 'स्लो कुकर' आणला! वॉलमार्ट मध्ये गेलो आणि त्या किचन सेक्शनमध्ये सगळ्यात स्वस्त असा स्लो कुकर शोधला आणि लगेच घेऊन टाकला. आपलं नेहमी असंच असतं ..स्वस्त ते मस्त! हल्ली नवीन कपड्यांचं शॉपिंग झाला तरी  ते कधी एकदा घालतोय ह्याची फारशी उत्सुकता नसते (पोटाला वगैरे घट्ट होत असतात ना!)! पण स्लो कुकर मात्र घरी आल्या आल्या लगेच उत्साहात उघडला गेला , आतमध्ये पाहिलं तर रेसिपीजच पुस्तक होतं.... लगेच वाचायला घेतलं तर सगळ्याच इटालियन मेक्सिकन अशा इंग्लिश रेसिपीज! श्या! आपला भारतीय बाणा अपेक्षेप्रमाणे जागा झाला... बायकोला म्हणलं पाहिलं काही होणार तर बिर्याणीच होणार आज ह्याच्यात... साजूक तुपातली बिर्याणी!

ऑनलाईन  बघून, थोडा इकडे तिकडे वाचून बिर्याणी लावली ... एकदम टकाटक दिसत होती! स्लो कुकर मध्ये ३ तास शिजवायची असं तो यु ट्यूब वरचा शेफ म्हणाला... ती एवढी कडक दिसत होती...पण तीन तास वगैरे थांबायचं??
 "पाटणकर, 'स्लो कुकिंग'ची हौस आहे ना ....सो छान हवं असेल तर पेशन्स ठेवायला शिका ..".हे असं काहीतरी तो शेफ ओरडला बहुधा! कुकर सुरु केला ...3 एक तासांनी घरात वेलची,दालचिनी,केशर, पुदिनावगैरे गोष्टींचा एक अतिशय कडक वास अख्या घरात पसरला होता... मी तर 3 तासाचा गजर लावून ठेवला होता..वासामुळे भूक वाढली होतीच...गजर झाल्या झाल्या लगेच किचनकडे पळालो, कूकर उघडला...आयच्या गावात! काय जबरा दिसत होती ती ...तांदूळ पहिल्या पावसात भिजलेल्या झाडासारखे फ्रेश दिसत होते...पण मेन फोकस होता तो 'स्लो कुक्ड चिकनचा' ...चिकन कितपत आणि किती शिजलंय ह्यावर सगळं अवलंबून होतं ..टेस्ट करायला म्हणून एखादा पीस घेतला.....तोंडात ठेवल्या ठेवल्या माझं पुण्याच्या तिरंगामधून  एस पिज मग ब्लु नाईल हुन जॉर्ज वगैरे प्रवास करून आलं! इतक्या वर्षात जे फक्त बाहेरच खायला मिळालं होतं  एक्झॅक्ट सेम टेक्सचर चिकनला आलं होत ... परफेक्ट मॉइश्चर ठेऊन ते शिजलं होतं.. फुल्ल टेण्डर  ....कुकरमध्ये  निर्माण झालेल्या वाफेनीच बिर्याणीला शिजवलं होत. हळू हळू शिजल्यामुळे जेवढी बाहेरून सुंदर दिसत होती तेवढीच आतपर्यंत शिजली होती ... इतका वेळ इन्व्हेस्ट केल्यामुळे त्याचे रिटर्न्स सुद्धा 'इंटरेस्टिंग' होते ....तो मसाला, ती चव,ते रंग हे तांदूळ आणि चिकन ह्याच्या अगदी आत पर्यंत पोचलं होतं... 

हे असं काही खायचं असेल तेव्हा मला डिस्टर्बन्स अजिबात आवडत नाही...पटापटा डिशमध्ये बिर्याणी घेतली आणि एकटाच मस्त बाल्कनीत जाऊन बसलो ... 

खूप वेळ घेऊन... शांत... मनसोक्तपणे तयार झालेलं चिकन खात खात मी एकटाच हरवून गेलो होतो... एकदा पोट प्रसन्न झाल्यावर मग मात्र सुखावलेलं मन पुन्हा ऍक्टिवेट झालं...विचारांना किक बसायला लागली आणि अचानक वाटलं आपलं आयुष्यपण किती ह्या स्लो कुकरसारखंच असतं .... गोष्टी हळू हळू मिळत गेल्या कि त्याची गोडी वेगळीच लागते.. एकदम विरघळलेली! म्हणजे बोलायचंच झालं तर सक्सेस ...यश! झटपट मिळालेल्या यशापेक्षा खूप झटून कष्ट करून हळू हळू पायऱ्या चढत यशाच्या शिखरावर पोचलं कि त्याचं वेगळं सेलिब्रेशन करावंच लागत नाही... शिखरावर पोचण्याच्या त्या स्लो प्रोसेसमध्येच खरा आनंद मिळालेला असतो!
स्टॉक मार्केट मध्ये खरे 'पोचलेले' लोक डे -ट्रेडिंग करण्यापेक्षा लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट वर भर देत असतात ... बऱ्याचदा आपल्या मनाला वाटत असत काहीच गोष्टी घडत नाहीयेत ..तेव्हा आपल्या नकळत त्या बदलत असतात...गरज असते ती फक्त पेशन्स ठेवायची.
आणि  कदाचित पेशन्स ह्याच गोष्टीमुळे एखाद्या बॅट्समनला वन डे मधल्या सेन्चुरीपेक्षा टेस्ट क्रिकेटमधले १०० जास्त मोलाचे वाटत असावेत... इतकंच कशाला ...रिलेशनशिप मध्ये सुद्धा ..पहिल्या नजरेत प्रेम होऊन दुसऱ्या दिवशी प्रपोज करून नातं सुरु होण्यापेक्षा.. आधी नुसती नजरानजर, मग त्याच मैत्रीत झालेलं रूपांतर हे असं टप्या टप्प्याने पुढे गेल्यावर 'आय लव्ह यू' म्हणायची गरजच लागत नाही ..एकमेकांच्या डोळ्यात डोळ्यामधेच ते नातं दिसून येतं .... इतक्या वर्षाच्या स्लो प्रोसेस मध्ये ते एकदम मुरून गेलेलं असतं .... अरेंज मॅरेज ची सुद्धा तीच गम्मत असते... लग्नाच्या पहिल्या रात्री अवघडलेली दोन्ही मनं काही वर्षांनी मात्र एकमेकात बुडून गेलेली असतात ..दोघांच्याही  नकळत... नातं उलगडत जाण्याची प्रक्रिया फार हळू हळू होते .. सोप्या अवघड वाटांमधून प्रवास करत पुढे जाते ... मागे वळून बघितल्यावर मात्र चेहऱ्यावर वेगळंच हास्य ठेऊन जाणारी असते!

आयला, ही स्लो कुक्ड बिर्याणी जिभेबरोबर पोट आणि मन ह्यांनापण एक प्रकारची चालना आणि ख़ुशी देऊन गेली होती!  अनेक प्रकारच्या गोष्टी मनात हळू हळू येत होत्या...आणि माझे विचार एका फांदीवरून दुसरीकडे टुणकन उड्या मारत होते .... नकळत बिर्याणी मात्र मस्तपैकी फस्त झाली होती! 
"बीइंग स्लो' रॉक्स" असं काहीतरी पुटपुटत... पुढच्या वेळेस काहीतरी इटालियन करूया असा काहीसा निर्धार करत पडदे लावून वामकुक्षी घ्यायला प्रस्थान केलं!!!            
---स्वागत पाटणकर 

3 comments:

  1. वा. प्रत्यक्षात बिर्याणीपेक्षा जास्त चांगलं वर्णन केलं आहेस.

    ReplyDelete
  2. Mouth watering. Punyatun alo ki lagech Denver cha ticket book kartoy. Ata car sathi ek inverter gheun taak, mhanje biryani on the mountain suddha karta yeil!

    ReplyDelete
  3. Navratrit sudha biryani khaychi echa zali re.. ek slow cooker pathun de.. nahiter yetana gheun ye

    ReplyDelete