Friday, September 29, 2017

रामरक्षा आली धावून!

रामरक्षा आली धावून!

-- स्वागत पाटणकर 

  मागच्या आठवड्यात असंच मस्त जॉगिंगला गेलो होतो (हो हो मी आणि जॉगिंग)... पण आमच्या शरीरातल्या फॅट्स मोठे नशीबवान... पळायला लागल्या लागल्या १० मिनटात मोबाईलवर 'स्टॉर्म वॉर्निंग' आली... आणि  आकाशाकडे नजर टाकली, निळ्या आकाशावर काळ्याकुट्ट ढगांनी पांघरून घातलं होतं. डेन्वरची हवा म्हणजे फारच रोहित शर्माच्या बॅटिंग सारखी असते ... कधी लक्ख ऊन आणि दुसऱ्या क्षणाला धो धो पाऊस... त्यामुळे अचानक आलेल्या स्टॉर्म वॉर्निंगला मी सीरिअसली घेतलं, गाडी सुरु केली  आणि घरी जायला निघालो.. मस्त पावसाळी हवा होती... रहमानची गाणी लावून निघालो! वाह, सुख एकदम! पावसाची भुरभुर सुरु झाली होती ..काच खाली करून ..हात मस्त बाहेर काढलेला होता ... पावसाच्या संथ थेम्बाना मिठी मारायला एकदम तयार असा ..पण काही क्षणातच पावसानी रूप बदलायला सुरवात केली... भुरभुर, संततधार ,मुसळधार वगैरे टप्पे फॉलो न करता डायरेक्ट धो धो कोसळायला लागला .. जोरात.. सगळ्यात मॅक्सिमम स्पीड वर असलेले वायपर्स आणि तेवढ्याच जोरात कोसळणाऱ्या सरी ह्यांच्यात एक स्पर्धाच सुरु झाली. गाण्याचा आवाज वाढवला पण कोसळत्या मेघराजानी माझी आणि निसर्गाची डेट 'पॉज' केली होती... ती सुंदर गाणी ऐकावीशी वाटत नव्हती... खरं तर २०-२५ मिनीटावरच घर होतं पण तरी ते अंतर खूप मोठं वाटायला लागलं होतं.. जोरात कोसळणाऱ्या सरींनी आता वायपर्सवर आघाडी घेतली होती त्यामुळे समोरचं अगदीच दिसेनासं झालं होतं...ह्या अमेरिकेत रस्त्यात कुठेही थांबता येत नाई राव, त्यामुळे हळू हळू का होईना पण पुढे सरकत होतो....दिवाळीत पण घरी कमी पणत्या असतील,तेवढे गाडीतले पुढचे,मागचे, पार्किंग लाईट असे सगळ्या प्रकारचे दिवे लावून गाडी पुढे रेटत  होतो. पाऊस! रोमॅंटिक वाटणाऱ्या पावसाने क्षणात भयभयीत करून टाकलं होतं...गाडीच्या टपावर कोसळणाऱ्या पावसाचा आवाज मला कसली तरी आठवण करून देत होता ...खरं तर एवढ्या पावसात गाडी कधीच चालवली नव्हती ... पण अशा पावसातला प्रवासाचा अनुभव होता! ७-८ वर्षांपूर्वी भाऊ,वाहिनी,आई,बाबा आणि मी अशी एक (चक्क) कौटुंबिक कोकण सहलवगैरे आम्ही केली होती... पण ऑक्टोबर असूनसुद्धा कोकणात फारच विचित्र हवा पडली होती...अतिशय ढगाळ अशी... आणि  पण ढग सुद्धा रुसलेले  असावेत ... अजिबात पाऊस नव्हता ... दमट हवेनी वाऱ्याला यायला पूर्ण मज्जाव केला होता. पंखा लावूनसुद्धा उकडत होतं आणि दोन पावल चालून लगेच घामाच्या धारा वाहत होत्या... एकूणच सगळ्यांचा मूड बघता साधारण ३ वाजता आम्ही पुण्याला परत जायचं ठरवलं... 'बोअर' होऊन सगळे परत निघाले ... भाऊ गाडी चालवत होता. शिवाय गाडीत आई बाबा असल्यामुळे नव्या गाण्यांना गाडीत फारशी संधी नव्हती .. मग अशा वेळेस आपला एक छंद म्हणजे मस्तपैकी मागच्या खिडकीत बसून बाहेर पळणाऱ्या झाडांकडे बघत राहायचं...नारळाच्या उंच झाडांकडे बघत बघत मी बसलो होतो!  १-२ तास पुढे गेल्यावर पाऊस लागला..कोकणातला पाऊस तो ...डायरेक्ट कोसळतच होता...  पुण्याला न जात कुठेतरी थांबावं कि काय असं सगळ्यांना वाटलं.. थोडी विचारपूस केल्यावर कळलं ताम्हिणी घाटात पाऊस नाहीये...त्यामुळे थोडं पुढे गेल्यावर पाऊस थांबेल अशी अपेक्षा ठेऊन पुण्याला जायला निघालो.

पण जसं जसं आम्ही ताम्हिणी घाट चढायला सुरुवात केली....तर रियालिटी दिसायला लागली .. खरं तर अंधार पडल्यामुळे दिसत नव्हतीच... पण समजत होती. कधीही न बघितलेला असा तो पाऊस ऐकू येत होता ... त्यात तो ताम्हिणी घाट... घनदाट जंगल , विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट ...आणि ह्याशिवाय घाटातली स्मशान शांतता भंग करणारा तो कोसळता पाऊस...रस्त्यावर फक्त आमचीच गाडी! आई बाबांची  थोडी टरकली होती पण मी एन्जॉय करत होतो. थ्रिलिंग वगैरे वाटत होतं..सगळे जणं पुढे जावं कि नको अशी फक्त चर्चा करत होते ...गाडी पुढे पुढे जातंच होती, एकटी!  काही वेळानंतर मात्र समोर एक गाडी दिसली... थांबलेली होती... पुढे गेल्यावर कळलं कि तो ट्रक होता... एक माणूस आम्हाला पण थांबायचे इशारे करत होता. पावसामुळे त्याचा चेहरा काही दिसत नव्हता. अशा रात्रीच्या वेळेस , त्या घाटात ,निर्मनुष्य रस्त्यावर , भर पावसात .. कोणीतरी थांब म्हणतंय म्हणून थांबायलाही जीवावर येतं... आता माझी पण फाटायला लागली होती! पण फायनली आम्ही, बघू तर काय म्हणतोय तो, आपण पाच जण आहोत , काही नाही होणार वगैरे म्हणत एकमेकांना धीर देत थांबलो. त्यानी आम्हाला हेडलाईट सुरु ठेवून थांबायला सांगितलं... त्याचा पार्टनर एक मोठी काठी घेऊन पुढे चालत गेला... त्यांचा अनुभव त्याना असं करायला भाग पडत होता.. तो थांबलेला ती जागा म्हणजे एका पुलाची सुरवात होती .... काठी आपटत आपटत नेल्यामुळे ...त्याला पाण्याची खोली समजली.. गुडघा भर पाणी वाहत होतं त्या छोट्या पुलावरून! त्यांनी आम्हाला उलटं फिरायचा सल्ला दिला... आम्हीपण लगेच ते ऐकलं ...ज्याच्यावर संशय घेतला होता तोच देवासारखा मदतीला आला होता..

आम्ही यू टर्न घेतला....रात्रीचे ८ वगैरे वाजले असतील...अर्धा चढलेला घाट उतरून मग पनवेल मार्गे पुण्याला जावं लागणार होतं...म्हणजे अजून ५ तासाचा प्रवास! त्यात ह्या पावसाचा जोर काही कमी होत नव्हता ... रात्र गडद होत चालली होती... वीजा तर भिशी असल्यासारख्या एकत्र येऊन कडाडत होत्या . ताम्हिणीसारख्या घाटात तर रात्री विजा चमकल्या तर त्यापेक्षा हॉरर काहीही नसतं हि नवी माहिती मला कळली....अर्थातच माझी फाटली होती ! आता कधी एकदा मुंबई गोवा हायवे लागतो असं झालं होतं ...तिकडचं ट्रॅफिक जॅम चालेल पण हा भयभयीत करणारा एकाकीपणा नकोसा झाला होता... गाडीतली ५ माणसं मौनावस्थेत गेली होती ..सगळे फक्त काळजी करत होते ... बाहेरच्या शांततेबरोबर गाडीतली शांतता जास्त त्रासदायक होत होती...

अचानक आई गाणं म्हणायला लागली... अर्रे संस्कृत गाणं?? नाही... ती तर रामरक्षा म्हणत होती... खरं तर मी पण घाबरलोच होतो पण आईचं असं स्तोत्र वगैरे ऐकून मला हसू येत होतं.. तिला लक्षात आलं ते , पण तिनं जाणूनबुजून दुर्लक्ष केलं.. ती स्तोत्र म्हणतच राहिली.. आता बाहेरच्या पावसाची सवय झाली होती.. आईची रामरक्षा म्हणून संपली होती, मी गाणी लावणार तेवढ्यात आईनी पुन्हा सुरु केलं .. रामरक्षा राउंड २,३,४..एका मागे एक  सुरूच राहिला ... तिला आता माझी वाहिनी पण जॉईन झाली होती... मी मात्र कपाळावर हात ठेवून घेतला होता .. बाहेर त्याच वीजा , तोच पाऊस , तेच ढग तेवढाच गोंधळ घालत होते पण गाडीतले काळजीचे विचार आता लांब गेले होते, थोडा धीर वाटत होता ... पण माझ्या तरुण मनाला ते लक्षात येत नव्हतं! मग मी डोळे मिटून शांत बसलो ... आई आणि वाहिनीच्या रामरक्षेसमोर मला आता पाऊस ऐकू येत नव्हता...

राम रामेति रामेति,
रमे रामे मनोरमे ।
सहस्रनाम तत्तुल्यं,
रामनाम वरानने ॥

हे शब्द कानात पडत होते,सकारात्मक लहरी मनात घुसवत होते .. पण आपण काही देवबीव मनात नाही त्यामुळे "हे ऐकायला छान वाटतंय , म्हणत रहा" एवढं सांगायलासुद्धा कमीपणा वाटला! गाडीतल्या त्या बदलेल्या वातावरणाची भावाला गाडी चालवताना मात्र खूप मदत झाली असावी ...सलग ४ तास तो गाडी चालवत होता आम्ही पेण मार्गे खंडाळा घाट ओलांडेपर्यंत पाऊस आमच्याबरोबरच होता.. लोणावळ्याला आम्ही थांबलो .. तिथे पाऊस होताच पण गाडीत १०० वेळा म्हणाल्या गेलेल्या रामरक्षे नी धीर दिला होता कदाचित त्यामुळेच तो पाऊस आता ओळखीचा वाटायला लागला होता . वडा पाव घेऊन आणि गाडी पुन्हा सुरु केली... गाणी न लावता, आईला इशारा केला ..तुझं सुरु ठेव.. आई एक स्मित हास्य देऊन पुन्हा 'अथ ध्यानम्‌' म्हणायला सुरु केलं... ते साधारण तासभरानी रात्री १ च्या सुमारास घरी पोचल्यावर थांबलं... डेंजर असा अनुभव घेऊन घरी पोचल्यावर मी जय श्रीराम बोललो...पण मनातल्या मनात!

          काल अशाच पावसात गाडी चालवताना , वायपर्स आणि पावसाच्या स्पर्धेमुळे धूसर झालेल्या काचेतून बघताना ती आक्खी कोकण ट्रिप स्पष्ट दिसत होती...हातावर शहारे आलं होतं..नकळत मोबाईल घेतला आणि युट्युबवर रामरक्षा सर्च केलं. आपल्याच अनुराधा पौडवालचे रामरक्षा विडिओ सापडले... तडीक प्ले केले! रहमानला म्हणलं आज जरा तू पण ऐक हे.... रामरक्षा सुरु झाली, अनुराधाच्या स्वरात...एकटेपणा गेल्याचा फील आला..मस्त वाटायला लागलं...काही जादू-टोणा वगैरे नाही ..आस्तिक असो व नास्तिक पण ते संस्कृत शब्द ,ते स्वर आणि ते शांत संगीत ह्याचा उत्तम परिणाम झाला हे नक्की ... ते कॉम्बिनेशनच छान  होतं.. प्रसन्न वाटायला लागलं .. समोर फिरणारे ते वायपर्स सुद्धा रामरक्षेच्या तालावर फिरल्याचा भास झाला...पाऊस त्याच आवेशात असूनसुद्धा, उरलेला तो २०-२५ मिनिटाचा छोटा प्रवास मी मस्त एन्जॉय करत पूर्ण केला.... रामरक्षा 'लूप' वर लावून!! घरी पोचल्यावर जोरात बोललो .... जय श्रीराम!!!

दरवर्षी, 'मन से रावन जो निकाले , राम उसके मनमें है' अशी टिपिकल लाईन पोस्ट करून  दसरा 'सेलिब्रेट' करण्यापेक्षा, ह्या वर्षी ही रामरक्षेची गोष्ट आपल्या सोबत शेअर करावीशी वाटली म्हणून एवढा सगळा प्रपंच!

आपलं वय जसं जसं वाढत असतं, अनेक आजूबाजूच्या गोष्टींचे कळत - नकळत आपल्यावर संस्कार होत असतात..रामरक्षेसारखी स्तोत्रं हा त्यातलाच एक प्रकार... आजी- आईनी आपल्याला शिकवलेल्या काही गोष्टी, तेव्हा आपण कितीही दुर्लक्ष केलं तरी त्या मनात खोलवर रुतलेल्या असतात ... आपण मात्र सदैव 'कूल', 'सो कॉल्ड प्रॅक्टिकल' व्हायच्या प्रयत्नात त्या शिकवणींना बाजूला सारतो.... तुम्ही देवाला मानत असाल वा नसाल,  तुम्हाला स्तोत्र पाठ असतील वा नसतील.. जेव्हा जेव्हा आपण ती ऐकू , ती नेहमीच एक पॉझिटिव्ह ऊर्जा देऊन जातात...मी हे अनुभवलं ...आज तुम्हीसुद्धा आपट्याची पान वगैरे वाटण्यापेक्षा रामरक्षा ऐकून, मनात लपलेल्या रावणाला मारून  विजयादशमी च्या वेगळ्या सेलिब्रेशनचा अनुभव घेऊन तर बघा.......

-- स्वागत पाटणकर 

4 comments:

  1. वा. खूपच छान अनुभव. खरं तर लहानपणी भुतांना घालवायला मी याचा खूप उपयोग केला आहे. अजून सुद्धा मनातल्या भुतांवर याचा प्रयोग करत असतो

    ReplyDelete
  2. वा पाटणकर खूपच छान

    ReplyDelete
  3. waah waah /// asa vatla meech lihilay 😂😂😂 <3

    ReplyDelete