आपला पिझ्झा दुसर्याबरोबर शेअर करायचा नाही!
ही अतिशय मोलाची शिकवण देणाऱ्या 'जोइ त्रिबीआनी' , तुला आपल्याकडून फ्रेंडशिप डे च्या शुभेच्छा! तू भेटेपर्यंत आपण आवडीने लोकांशी खाणं शेअर करायचो...पण त्या एका सल्ल्यानी आपलं आयुष्य एकदम चेंज करून टाकलं बघ.. माझ्या 'फ्रेण्डस' बरोबर असताना अगदी चिकन बिर्याणीमधले पिसेस पण मी भातात लपवून ठेवायला लागलो!!!
तसं बघितलं तर, तू आणि तुझे फ्रेंड्स लै उशिरा आलात रे माझ्या आयुष्यात... आमचं आयुष्य दामिनी आणि अवंतिका मध्येच अडकलेलं असताना अचानक स्टार वर्ल्ड वर तुम्ही भेटायला लागलात ते सुदधा सब टायटल्स घेऊन!! टू बी व्हेरी फ्रॅंक, सुरवातीचे काही दिवस क्युट रीचेल आणि गोंडस फिबीकडे बघण्यातच गेले...पण नकळत तू मनात मुरायला लागलास... तुम्ही सहाही जण तेवढ्याच आवडीची..... पण डेट वर असताना समोरच्या पोरींपेक्षा डिशमधलं खाणं जास्त महत्वाचं वाटणं, आयुषयभर फालतुगिरी - वेडेपणा करायचा आणि मित्रांनी ती समजूतदारपणे वागून सावरून घ्यायचं असा काहीसा तुझा आणि माझा स्वभाव जरा जवळपास किंवा अगदीच सारखा ....अर्थातच त्यामुळे तुझ्याबद्दल सॉफ्टकॉर्नर वाटायला लागला.. सेंट्रल पर्क मध्ये मी स्वतःच बसलोय कि काय असा वाटायला लागलं !
लंडनमध्ये फिरताना तुझा वेडेपणा, टीव्ही मध्ये दिसण्यासाठी तुझी धडपड, लोकांच्या इंटेलेक्च्युअल गप्पांमध्ये स्वतःला काँट्रीब्युट करता येत नाहोये कळल्यावर झालेली तुझी चिडचिड, चॅन्डलर-मोनिकाचं कळल्यावर ते सगळ्यांपासून लपवून ठेवायचे तू केलेले प्रयत्न ... 'बाहेरच्या पोरी आणि आपल्या मैत्रिणी ह्यांच्या समोर असणारी तुझी 'वेगवेगळी रूपं', सगळ्या प्रॉब्लेम्सवर आईस्क्रीम,बर्गर, सँडविच हेच सोल्युशन, आपल्या आजीला खुश बघण्यासाठी वाट्टेल ते करायची तयारी, रॉस -रिचेल बाहेर भांडताना तु चॅन्डलर बरोबर केलेली आतमध्ये मस्ती.... अशा किती तरी बाप आठवणी तुझ्याबद्दलच्या आहेत.. ह्या प्रत्येक गोष्टीत तुझी रिअक्शन बघायला 'जॅम' मजा यायची ...अजूनही येते! तसं म्हणलं तर तुझ्या कॅरॅक्टरला अनेक पैलू .... चॅन्डलरची रूम सोडून गेल्यावर पडलेला तुझा चेहरा, रिचेल आवडायला लागलीये कळल्यावर तुझ्या मनातली घालमेल, त्यामुळे रॉस समोर वाटणारी तुला गिल्ट.... अशा अनेक गोष्टीतून तू हसवता हसवता पटकन रडवायचास देखील... आणि त्यामुळेच तू एकदम 'रिअल' झालास....आपला रिअल फ्रेंड! तुझ्या किस्यांनी मनात एक मोठं कपाट भरून ठेवलंय, आजसुद्धा जेव्हा मन फ्रेश करायची गरज असते तेव्हा मी पटकन त्या कपाटातला एखादा 20 मिनिटांचा कप्पा उघडून बघतो. तडीक छान वाटायला लागतं!
तुझ्याबरोबर भेटीच्या त्या 10 सिझन्स मध्ये कितीतरी भारी आठवणी तू मला दिल्यास! न्यूयॉर्क डाउनटाऊन बघायची इच्छा तुमच्यामुळे झाली , स्वतःच घर आल्यावर पहिली गोष्ट मी घेतली असेल ती म्हणजे रिक्लायनर चेअर...तुझ्यासारखंच दिवसभर त्या खुर्चीत बसून टीव्ही बघायचा माझा हट्ट मी लगेच पुरवला ....तू मला माझं कॉलेज संपल्यावर भेटलास ते एका कारणानी जरा बरं झालं नाहीतर माझ्या BMCC मधल्या पोरी माझ्या 'हाऊ यु डुईंग' हल्ल्यानं घायाळ झाल्या असत्या! रूम शेअर करताना रूममेट बरोबर प्रॉब्लेम शेअर करायला आणि टेन्स वातावरण लाईट करायला पण तूच मला शिकवलंस...तुझ्यामुळेच मी एक चांगला रूममेट होऊ शकलो!
१९९६ पासून दहा वर्ष तुम्ही अमेरिकन्सना वेड लावलत आणि नंतर अक्ख्या जगाला.. "९९ विल बी इयर ऑफ जोई" असं तू म्हणालास पण खरं तर अक्खी १० वर्ष तुझी होती ...कायमचं वेडी करणारी! एक गोष्ट बरी झाली बाबा, तुम्ही भारतात 'जन्माच्या नाही आलात... नाही तर प्रॉफिट होतोय म्हणल्यावर तुम्हाला 'वीकली'च्या ऐवजी 'डेली' करून टाकलं असतं ...तुझ्याच डेज ऑफ आवर लाईफ सारखं मधेच आटोपतं ही घेतलं असतं आणि सगळा पोपट करून टाकला असता..आमच्या दोस्त्या-दुनियादाऱ्या अशाच संपतात !
लोकं वॉल्टर व्हाईट, जॉन स्नो च्या वगैरे प्रेमात असतात ... पण आपण नेहमीच तुझ्या प्रेमात राहणार ... जोई भाई, तू म्हणजे एकदम आपण ए आपण! तू म्हणाला होतास "those are just feelings, they will go away" ... पण तू आणि तुझ्या फ्रेंड्स बाबतीत असं कधीच होणार नाही!!
फ्रेंड्समध्ये भेटून माझा फ्रेंड झालेल्या जोई तुला फ्रेंडशिप डे च्या पुन्हा शुभेच्छा! - स्वागत पाटणकर
Aww...I love him too
ReplyDelete