Friday, August 18, 2017

कणीस आणि फंडे!


कणीस आणि फंडे! 

आपल्याला आयुष्यात दोन प्रकारचे लोकं भेटतात!!
एक म्हणजे कणीस खातानासुद्धा एकदम शिस्तप्रिय असणारे, सरळ लाईन फॉलो करत कणसाचा प्रत्येक दाणा आयआयटी एंट्रन्सचं प्रिपरेशन असल्यागत प्लॅनिंग करून खाणारे आणि
दुसरे - कसेही... रँडम ...काहीही दिशा वगैरे फॉलो न करता जो दाणासमोर दिसेल तो खाणारे...स्वच्छंदी!!!
पहिल्या कॅटेगरीत मोडणारे लोकं...कणीस घेतल्यावर तिखट मीठ सगळीकडे नीट लागलंय ना, कुठल्या दाण्यावर अन्याय तर नाही ना झालाय ह्याचा अनालिसिस करून मगच एक साईडने कणीस खायला सुरवात करतात..आणि एका हातानी कणीस गोल गोल फिरवत एकदम सरळ रेषेत दुसऱ्या टोकाला पोचतात... त्यांच्या कणसाकडे बघितल्यावर कणीस किती संपलय किती उरलय हे स्टेटस लगेच कळतं! ही लोकं एकदम भारी असतात.... कलाप्रेमी...प्रत्येक गोष्टीत डिझाइन बघणारे.. आर्टिस्ट लेकाचे!!!आयुष्यात सरळ चालणारे, आईबाबांचं ऐकणारे, शेपूची भाजी आवडीने खाणारेवगैरे असतात! त्यांची खोली पण नेहमी एकदम साफ, सगळया वस्तू जागेवर ...थोडक्यात सरळ आणि शहाणी मंडळी असतात ही...
आणि दुसऱ्या प्रकारातली लोकं म्हणजे कणीस हातात आल्यावर डोकं बाजूला ठेवून कणसावर ताव मारणारी.. ! एक घास वरच्या भागाचा तर नंतरचा डायरेक्ट खालच्या भागाचा...एकदम रँडम!
मनात येईल तस वागणारी...कधी काय बोलतील सांगता येणार नाही...! पसारा आणि धसमुसळेपणा हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग! घरात आल्यावर शर्ट वगैरे कुठेही भिरकावून द्यायचा... खिशातल्या पैश्यांसकट पॅन्ट धुवायला टाकायची ह्या अशा ह्यांच्या सवयी! थोडक्यात काय तर कुठलीही नियमावली पाळायची नाही असा एकच नियम पाळणारे ..स्वच्छंदी!
आपण तर बाबा ह्या दुसऱ्या कॅटेगरीत मोडतो...लै आवडतं आपल्याला असं कणीस खायला...सगळं कणीस संपलय अशा दुःखात आपण जात असतानाच अचानक दाताखाली तिखट लागलेला एखादा दाणा येतो आणि मन गोड करून जातो!!
हॅपिनेस इज रँडमनेस हा आपला फंडा आणि तुमचा?

No comments:

Post a Comment