साधारण ७-८ वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. बापटांची प्रिया आणि कामतांचा उमेश हे दोघंही तसे नेहमीच आवडीचे.. त्या दोघांचं एक नाटक येतंय असा कुठेतरी वाचायला मिळालं होतं... भयंकर उत्सुकता होतीच पण त्यानंतर साधारण ६-७ महिन्यानंतर पुण्याला जाणं झालं. तोपर्यंत 'नवा गाडी नवं राज्य'नी फुल्ल धुमाकूळ घातलेलाय असं कळलं! पुण्यात गेल्या गेल्या प्रयोग पहिला... ते दोघं आवडलेच... पण त्याएवढेच आवडले ते नाटकातले डायलॉग्स! माझा नुकतंच लग्न झालं होतं त्यामुळे नाटकातले सीन्स, त्या दोघांमधले वाद - संवाद अगदी आमच्या घरातलंच प्रतिबिंब वाटत होतं. नाटकाचा लेखक आपल्याच घरात लपून बसला होता कि काय अशी शंका आली.. दुसऱ्या अंकाआधी अनाउंसमेंट झाली तेव्हा लक्ष देऊन लेखक कोण आहे ऐकलं... क्षितिज पटवर्धन!
आयला! हे नाव कुठेतरी ऐकलंय असं वाटत होतं ... पण काही केल्या आठवत नव्हतं... तो विचार बाजूला ठेवून पुन्हा नाटकात गुंतून गेलो. प्रयोग संपल्यावर प्रियाला भेटायला जायलाच हवं, नाही तर फाऊल होतो. स्टेजच्या मागे जाता जाता एक जुना मित्र भेटला... तसा १० एक वर्षानंतर वगैरे दिसला... आपसूक हाक मारली गेली 'ए पट्या, ओळखला का भाई' ..... लगेच उत्तर आलं "बोला पाटणकर".. वा ! पाटणकर लगेच खुश झाले... १०-१५ मिनिट गप्पा झाल्या असतील... त्यातला अर्धा वेळ पाटणकर अमेरिकेचं कौतुक आणि थोडासा माज करण्यातच बिझी होते.. पट्या मात्र दिलखुलास पणे गप्पा मारत होता... निघता निघता मी विचारलं आवडलं का नाटक....?? पट्यानी फक्त स्मितहास्य दिलं.. आणि निघून गेला. दोन मिनिट मी तसाच उभा होतो. ट्यूब पेटली...च्यायला पट्या म्हणजेच क्षितिज पटवर्धन! क्षणर्धात, मी माती खाल्लीये ह्याची जाणीव झाली आणि पण आश्चर्य देखील वाटलं ... पट्या! हा किती डाऊन टू अर्थ आहे! किती मोकळेपणाने गप्पा मारत होता... नाटक हिट झाल्याचा, स्वतः स्टार वगैरे झाल्याचा लवशेष ही चेहऱ्यावर नव्हता...आणि बोलण्यात तर अजिबात नाही!
कॉलेजमध्ये असताना पुरुषोत्तमच्या वेळेस भरतवर 'हाय-हॅलो' व्हायचं... आम्ही डहाणूकरच्या कट्ट्यावर शिट्ट्या मारत बसायचो, तेव्हा पट्या त्याच्या एम ८० वरून जाताना मस्त स्माईल देऊन हात करून जायचा.. दिवसभरात ३-४ वेळा व्हायचं असं... खरं तर ओळख म्हणावी तशी एवढीच पण तीसुद्धा तो विसरला नाही... थोडक्यात, त्याच्याशी ती छोटीशी भेटीनी मी खुश झालो होतो. मला खूप भारी वाटलं होतं! त्याच्यासाठी,माझ्यासाठी आणि कोथरूडसाठी ...! नेहमीच सेलिब्रिटींना ते सेलिब्रिटी झाल्यावर बघत आलोय ... पण त्यात आपल्या कोथरूडचा , आपल्यासारखाच मध्यमवर्गीय घरातला, एकदम साधा सरळ मुलगा आज मोठा होतोय.... मोठा स्टार सेलिब्रिटी होणार हेच भारी वाटत होतं!
आज अचानक हे सगळं आठवायचं कारण म्हणजे सकाळीच रिलीज झालेलं 'बापजन्म' मधलं नवीन गाणं! 'बापजन्म - मन शेवंतीचे फुल! ' अर्थातच पट्यानी लिहिलेलं... मेंदीच्या गंधात भारले, भेटीचे सोहळे! वाह! काय शब्द ते...मनाला भिडूनच जातात डायरेक्ट! हेच काय, कुठलंही गाणं असो...पट्याचे शब्द म्हणजे जादूच...सहजता म्हणजे काय हे शिकावं...ते ह्याच्या कडून! एखाद्या आजीनी नववारी मध्ये फुलं वेचून ठेवावीत तसा पट्या शब्द वेचतो आणि अलगदपणे ओळींवर वाहतो...! डबल सीट वगैरे सारख्या सिनेमात एकदम सरळ साधी वाटणारी गोष्ट मनात खोलवर ठेवून जातो!
आणि असं पण नाही हां किती फक्त भावनांना साद वगैरे घालणारच मी लिहिणार..असं कुठल्याही चौकटीमध्ये बांधून घेतलं नाही..साहेब एकदम ऑल राउंडर... 'किती सांगायचय' पासून डीजेला आईची शपथ वगैरे गाणी लिहितात! ...नवा गडी पासून डायरेक्ट दोन स्पेशल .... आणि वायझेड पासून ते क्लासमेट्स पर्यंत...परत नाटक सिनेमासाठी लिमिटेड न राहता इतर ही गोष्टी करतच असतो ... परवा तर कब्बड्डी टीम साठी पण गाणं लिहिलं ह्यानी..
हा माणूस म्हणजे आता गाणी, संवाद, लेखक + दिग्दर्शन असं एक दर्जा पॅकेज झालाय!
विक्रम गोखलेंच्या आघातचे संवाद लिहिण्यापासून सुरुवात केलेला पट्या... वेगवेगळे पैलू बाहेर काढत आता खूप मोठा झालाय... आता तर त्याला पट्या म्हणणं थोडं ऑडच वाटतं, पण अजूनही तो तेवढाच जमिनीवर आहे. आजही त्याला भेटल्यावर ... तो इतक्या अदबीने तुमच्याशी बोलतो कि तुम्हीच सेलिब्रिटी वगैरे आहात कि काय असं तुम्हाला वाटून जातं! हा आमचा प्रतिभावान कोथरुडकर, आता महाराष्ट्र काय जगभरातल्या मराठी प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय... वर्षानुवर्षे करत राहील! मराठी सिनेमासाठी कथा ह्या हिरो असते , पण कथेला हिरो बनवणाऱ्या ह्या लेखक मंडळी मात्र कुठेतरी हरवून जातात... सगळ्या झगमगाटात ते बाजूला राहतात, लपले जातात... हे असं काही होऊ नये हीच इच्छा आणि दिवाळीमध्ये येणाऱ्या दर्यासाठी शुभेच्छा!
Mast lihilays swagat!! Ani ahe ka olakh?
ReplyDelete