Saturday, June 3, 2017

अमेय - हॅपी बर्थडे ......रिटर्न गिफ्ट पाहिजे!!!


"द्रविड आजकाल प्रेशर घेऊन लै स्लो आणि त्यामुळे अतिशय फालतू खेळतोय" .. हॉटेल शुभा मधल्या स्वस्त आणि मस्त चिकनचा घास घेता घेता अमेय हे चक्क 'माझ्यासमोर' बोलला... अमेय जोशीबरोबरची ती आपली पहिलीच भेट. केवळ पहिलीच भेट आहे म्हणून समोरच्याला खुश वगैरे करण्यासाठी मनात एक आणि शब्द वेगळेच असं काही झालं नाही! आपल्याला आवडलच हे.. जे वाटतं ते तो बोलला....! त्या २ तासात खूप गप्पा झाल्या...अनेक विषयांवर चर्चा झाल्या... अगदी वाजपेयींपासून ते शेजारच्या पोरींबद्दल! आपल्याला पटून एकदम गेलं हा...!

तसं म्हणलं तर, अमेय आणि माझं शाळा- कॉलेज सगळं वेगळं होतं...पण  ११वीच्या सुट्टीत अभिषेक सुभेदार आणि जोशी हे एका नेट कॅफेमध्ये 'सो कॉल्ड' जॉब करायचे! AC, फुकट इंटरनेट आणि ह्या व्यतिरिक्त पगारसुद्धा मिळायचा त्यांना.  ह्या अशा ३ गोष्टींमुळे हा एक नंबर जॉब होता!! तिथेच अभिषेकनी अमेयशी ओळख करून दिली! त्यांनी ती नोकरी फार फार तर १ महिना वगैरे केली असेल पण ओळख मात्र जन्मभराची झाली!!

टापटीप कपडे... शक्यतो लेटेस्ट फॅशनचे, विविध स्टाईलचे काळे चष्मे घालण्याची सवय, भांग न पाडता वाऱ्याच्या दिशेनुसार बदलणारी हेअर स्टाईल  (DDLJ मधल्या राज टाईप  स्टाईल वगैरे), जबड्याचा खालचा भाग वरच्या भागाच्या पुढे आणि  ११ वीपासूनच ढु खाली २ व्हिलर, तब्येतीने ना आमच्यासारखा लठठ ना अमितसारखा बारक्या.साधारण असा काहीसा असणारा अमेय भेटला. भेटल्या भेटल्या त्यानी बटर चिकन खायला जायचा प्रस्ताव मांडला.. मी बाहेर कितीही भाई बनायचा प्रयत्न करत असलो तरी घरी एकदम साधासुधा असायचो. त्यामुळे हे असं घरी न सांगता बाहेर जेवायला जायची पद्धत नव्हती. पण त्या एका बटर चिकननी... 'बाहेर हादडायचं आणि घरी येऊन जेवायचा सेकण्ड राउंड करायचा' ही नवीन प्रथा सुरु झाली!

३६ गूण जुळल्यासारखे झाल्यामुळे आता आमचा २४ तास एकत्रच शिट्ट्या मारणे हा कार्यक्रम सुरु झाला होता. सुभेदार, मगर, जोशी आणि पाटणकर..असे आम्ही चौघे यतेच्छ बागडायला लागलो. चौघंही कर्क राशीचे त्यामुळे चौघांचे ही ग्रहसुद्धासारखेच फिरायचे! इतके सेम फिरले कि चौघांनीही जोशात 'सीएस' करायला घेतलं, १ वर्षभर अतिशय दंगा करून सोडून सुद्धा दिलं!!

असं म्हणतात ना लग्नाच्या गाठी स्वर्गात वगैरे बांधल्या जातात .. पण खऱ्या मित्रांच्या गाठी ह्या नक्कीच कॉलेज दिवसात बांधल्या जातात ह्या मतावर आपण एकदम ठाम आहे .. त्या ११ वी मधल्या सुट्टीत अमेयबरोबर अशीच गाठ बांधली गेली ...जी उत्तरोउत्तर घट्ट होत गेली! अमेय जोशी! म्हणजे तेव्हाच अम्या आत्ताचा नाना , २ लार्ज झाले कि होणारा नानूटली!!

मग 'काहीही करणं, किस्से करणं ' हे आमच्या दैनंदिनीचा एक भागच होऊन गेलं. घरी आई सोळा सोमवारचं व्रत करत असतानाच अमेय आणि मी , शंकराच्या  मृत्युंजयेश्वर मंदिरासमोरच्या हॉटेल शुभामध्ये पडीक असायचो सोमवारीसुद्धा! शंकराच्या चेहऱ्यावरचा राग मला स्पष्ट दिसायचा तेव्हा!!!

शुभाच्या मालकांनीपण त्याच्या कोंबड्या जेवढ्या बघितल्या नसतील तेवढ्या आम्ही त्या खाल्ल्या होत्या. हे रात्रीचं एक्सट्रा जेवण कमी पडायला लागलं  म्हणून काय तर दुपारचं 'तिरंगा' सुरु झालं होत.. आणि हा पठ्ठ्या घरी सांगायचा काकाकडे जेवलोय आणि काकाकडे 'घरी जेवायला चाललोय' सांगितलेलं असायचं... माझी मात्र लागायची. दिवसात साधारण ४-४ वेळा जेवण करून माझ्या पोटाचा साईझ मात्र वाढायला लागला होता! नंतर नंतर जेव्हा हॉटेल सुचणं हे बंद व्हायला लागल्यावर तर रस्त्यात डावीकडून ५ व हॉटेल दिसेल तिथे खाऊ वगैरे ठरवून ऍक्च्युली तिकडे खायला जायचो!! कधी कधी तर फारच नवीन शोध लागले आणि कधी कधी अमृततुल्य मध्ये जेवण भागवावं लागलं!!

एफवाय ची परीक्षा संपल्यावर तिरंगामध्ये जेवायला गेलो.. दोघेच होतो.. अति उत्साहात होतो .. वेटरला ऑर्डर दिली चिकन हंडी- गावरान! वेटरनं शांतपणे विचारलं "अजून कोणी येतंय का...?? दोघांना खूप होईल वगैरे"... आमचा इगो हर्ट झाला. म्हणलं "आता आणच" आम्ही दोघांनी ती अख्खी हंडी संपवली ,शेवटी तर पाण्यासारखी प्यायली पण संपवली.. पुढचया वेळेस पासून तो वेटर कधीही आमची ऑर्डर घ्यायला आला नाही. ह्यातुन एक स्वतःची वेगळीच कॅपॅसिटी लक्षात आल्यावर अमेयनी तिरंगाच्या २ बिर्याण्या संपवल्या होत्या. नॉर्मल मनुष्य प्राण्याला एक बिर्याणीसुद्धा खूप होते पण अमेयनी थम्बस अपचा घोट घेत घेत २ बिर्याण्या संपवल्या होत्या. ही अचिव्हमेंट जेव्हा आमचे मित्र पप्प्या ढमढेरेला सांगितली तेव्हा त्यांनी "अब कुछ व्हेज हो जाये.. वो भी अनलिमिटेड " वगैरे म्हणून आम्हाला पुन्हा चावी दिली..आम्ही तयारच .. लगेच दुर्वांकुरचा प्लॅन केला. त्यांच्या थाळीतले १५ एक पदार्थ आम्ही साधारण ४-५ वेळा खाल्ले! पण दहीवड्यांची सेन्चुरी केली होती!! अमेय आणि पप्प्यानी दहीवडे वाढणाऱ्या इसमाला एवढा त्रास दिला होता नंतर तो एखाद्या ब्रेक अप केलेल्या गर्लफ्रेंडसारखं आम्हाला टाळायला लागला होता!.. साधारण ३ तास वगैरे हादडून झाल्यावर गाडीवर बसता ही येत नव्हता मग हत्ती गणपती चौकात तासभर आजोबा टाईप शतपावली वगैरे केली आणि व्हेज नशा उतरला!!

एकदा ३१ डिसेंबर च्या रात्री १२-१ नंतर बिनधास्तपणे बाईकवर  फिरत होतो.. दारू वगैरे प्यायली नसल्यामुळे पोलिसांचा लोड नव्हता... दिल चाहता है च्या विषयावरून 'दिल शेप' फुगा कुठल्या तरी मुलीला देऊया असं खूळ डोक्यात आलं... जे एम रोड वरून लाल रंगाचा दिल शेपवाला फुगा घेतला आणि अख्ख पुणे फिरल्यावर शेवटी पौड फाट्यावर एक गोड मुलगी दिसली तिला फुगा देऊन "happy new year" बोललो.. ती पण स्माईल देऊन थँक्स म्हणून गेली.. आमची मजा पण तेवढीच, नंतर ती अनेक वेळा कर्वे रोडवर दिसली... कधी तिचं नाव ही विचारायला गेलो नाही... फक्त दिसल्यावर "अर्रे आज  ३१ डिसेंबर दिसली " हे मात्र एकेमेकाना अजूनही सांगतो!!

२००१ ला पुण्यामध्ये मॅच होती तर कुठून तरी  बजाज स्कुटर ची सोय करून भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही टीमचं स्वागत करायला एयरपोर्टवर साधारण ५ तास वगैरे थांबलो, मॅच नंतर 'लकी' मध्ये जेवता यावा म्हणून नेहरू स्टेडियम ते डेक्कन चालत गेलो, अलका चौकात प्लेयर्स ची बस जाताना श्रीनाथ ला केलेला "हाय", सचिन चे १०० झाले कि मी त्याला किंवा द्रविड बाप खेळला कि त्यानी मला केलेले फोन... Natwest  फायनलला तर ५ आऊट १४७ असताना अमेय चा फोन आला आणि दोघांच्याही घरात आज मॅच गेली अशा चर्चा सुरु असताना आम्ही मात्र युवराज लै जिद्दी आहे असा एकमेकांना समजावत तब्बल १ तास वगैरे फोन सुरु ठेवला ...तो बंद केला तो डायरेक्ट ३२६ रन भारताने काढल्यावरच! मागच्या आठवड्यात एक लेख लिहिताना अमेय बरोबरचे हे क्रिकेट किस्से सपासप समोर येत होते! लै कडक वाटत होतं!!

एस वाय ची गोष्ट असेल, अमेयला भोंडे सरानी अटेन्डन्स वरून पकडला ते ही डायरेक्ट फायनल परीक्षेत! सगळ्यांचीच फाटली, अशा गोष्टी घडतात हे फक्त ऐकलं होतं पण असं बघितलं नव्हतं.. अतिशय फिल्मी पद्धतींनी, भोंडे सरांना आमच्या एका मित्राची परिथिती हलाखीची आहे, म्हणून अमेय मदत म्हणून नोकरी करतो आणि म्हणून अटेन्डन्स नाहीये वगैरे सांगून पटवण्याचा प्रयत्न केला! भोंडे सर पण आमच्यापेक्षा १० पटींनी हुशार.. त्यांनी आम्हाला त्या मित्राला घेऊन या मग बघू वगैरे सांगितलं!! हे अगदीच फिल्मी आणि अवघड होत चाललं होतं... पण मग अमेयनी आमचा एक मित्र, प्रसादला 'हलाखीच्या परिस्थितीतला' बनवून भोंड्यांसमोर आणून ठेवला! भोंडे सरानी स्वतःच्या कपाळावर हात मारून आमच्या कपाळात गेलेल्या घालवल्या आणि अमेयला पास केलं!

परीक्षेच्या आदल्या दिवशी अभ्यासाला भेटल्यावर जनरली लोकं अभ्यासाबद्दल बोलतात पण आमचं मात्र रात्री ४-४ वाजेपर्यंत "भारतातले पिचेस हे फास्ट बॉलिंग साठी हवेत का स्पिनर्स साठी" किंवा आयुष्यात पैसा पाहिजे सत्ता अशा महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यातच आमचा अभ्यास होत पूर्ण होत! अमेय,अमोल आणि अप्प्या जमले कि नुसत कॉफी प्यायला बाहेर पडून डायरेक्ट खंडाळा घाटात अपूर्व मास्तर आमची इकॉनॉमिक्स ट्युशन घेत असे!!

आमची ही गाठ अशा अनके किस्स्यांनी रंगली आहे ते सगळे सांगत बसलो तर फेसबुकचा सर्व्हरवगैरे डाऊन होईल..  पण किस्से करताना अमेयकडून शिकायला ही बरंचस मिळाला! सगळ्यात गोड गोष्ट शिकलो ती म्हणजे  .... अमेयनी 'पु.ल" वाचायला ऐकायला आणि बघायला शिकवले... प्रवाहाविरुद्ध जायला शिकवलं!

जयंत जोशी हे तसे नशिबवानच! अनुप आणि अमेय दोन्ही मुलं टीपीकल प्रोसेस फॉलो न करता स्वतःला जे पटेल तस करतात, जे आवडतं ते करतात. बऱ्याच लोकांची तशी इच्छा असते पण सगळ्यांना नाही जमत हे.  नोकरीवगैरे मध्ये सेट झाल्यावर खूप लोकांकडून "समाजासाठी" काहीतरी केलं पाहिजे, आयुष्यात वेगळं काहीतरी केलं पाहिजे वगैरे डायलॉग ऐकू येतात पण हे शब्द हवेतच विरून जातात..

पण अमेय ह्या सगळ्याच्या एकदम विरुद्ध... स्वतःच्या मेहनतीवर दीपस्तंभ सारखी मोठी टीम त्यानी उभी केली आणि आज त्याच्याकडून अनेक चांगले उपक्रम तो करत असतो! which  is simply great!! ते बघताना खूपच भारी वाटतं!!

गेल्या काही वर्षात ऑफिसमुळे पुण्याबाहेरच राहावं लागलं त्यामुळे नानाबरोबर फारसे 'किस्से करायला' मिळाले नाहीत.. कधी कधी तर त्याच्याबरोबर असणाऱ्यांचा हेवादेखील वाटतो पण होम लोन समोर झुकावं लागत ना! आता तर वर्ष - वर्ष बोलणं होत नाही पण काही हॅपनिंग घडलं कि आपोआप ९८.....२० नंबर फिरवला जातो! मध्ये एकदा मी शिकागोवरून नानासाठी माझ्या आईबरोबर "J D" पाठवली होती (अतिशय निर्लज्ज होऊन).. आणि मित्राच्या आईकडून खंबा कलेक्ट करायला अमेय सुद्धा तेवढ्याच निर्लज्ज मनानी गेला ... कर्क राशीचे ग्रह अजूनही सारखेच निर्लज्ज आहेत!!!  असा आमचा हा अमेय...  त्याच्या घरी त्याला नाना म्हणतात अशी नवीन माहिती मिळाल्यावर मितेश - अमोल च्या कृपेने अमेयचा आमच्यातपण नाना, नुन्नी , नानू वगैरे झाला! परवा 'फ्रेंड्स' बघताना मला शंका आली, जोई आणि चॅन्डलर ह्यांचं नातं आमच्यावरूनच उचललं आहे कि काय... आम्ही खूप खायचं, नानानी पैसे द्यायचे.. आम्ही दिवसभर फालतुगिरी करत राहायचं आणि नाना उगाच मोठ्यामाणसारखा सांभाळून घ्यायचं वगैरे अगदी सेम Joey  - Chandler सारखं!

नानाच अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इव्हेंट प्लॅनिंग ... पिक्चरला जाण्यापासून  ते अगदी गोव्याला वगैरे जायचा एकदम एन्ड टू  एन्ड प्लॅन करणारा नाना मित्रांच्या लग्नात तर वेडापिसा होऊन काम करतो.. त्याच्या उत्साहाला एक वेगळंच रूप येतं, द्रविडचा सेहवाग वगैरे झाल्यासारखा तो लग्नाची कामं करायला झपाटतो.. अगदी बॅचलर पार्टीपासून वरातवगैरे... नाना... सगळं, सगळं मॅनेज करतो, exactly पुलंच्या नारायणासारखं!!

अशा आमच्या ह्या नानाचा आज, ४ जूनला  बर्थ डे ...वर्षातले ३६५ दिवस जेव्हा एकत्र शिट्ट्या मारायचो तेव्हा कधी एकमेकांचे वाढदिवस सेलिब्रेटपण केले नसतील! एवढच काय असं लक्षात ठेवून बर्थडे विशेस पण दिल्या नसतील! काही काही वेळा तर सांगावं लागायचं 'केळ्या, आज बडे आहे आपलयाला विश कर'

पण आज आपण फुल्ल लक्षात ठेवून , एवढ लिहायचे कष्ट घेतले आहेत.. अधूनमधून कौतुक करायचासुद्धा प्रयत्न केला आहे!!! त्याबद्दल थँक्स न म्हणता..

रिटर्न गिफ्ट म्हणून  'जिच्याशी तू लग्न करावं' असं मला ... किंवा अनेकांना वाटतं ... ते पटकन ठरवून तारीख कळवून टाक!!

No comments:

Post a Comment