Saturday, June 3, 2017

भारत * पाकिस्तान + वर्ल्ड कप + मित्र = राडा

४ जून ला भारत पाकिस्तान मॅच साठी काय प्लॅन करावा अशा महत्वाच्या प्रश्नामध्ये मी गुंतलो असताना ,काही सेकंदात मी १५ वर्ष मागे गेलो... अगदी "झापझापझाप" वगैरे टिपिकल फ्लॅशबॅकच म्युजिक ऐकत ऐकतच!!
२००३ वर्ल्ड कप , कॉलेज मधला शेवटचाच वर्ल्ड कप.. दादा,सचिन,द्रविड खऱ्या खुऱ्या 'फॉर्म' मध्ये असतानाचा वर्ल्ड कप. शेड्युल बघितलं , १ मार्चला भारत पाकिस्तान!! बस्स... हे बघून सगळ्यांचे डोळे चकाकले... मॅचला काहीतरी करू, एकत्र बघू धिंगाणा घालू राडा करू अशा एक एक फुलबाज्या फुटायला लागल्या.वर्ल्ड कप मध्ये भारत पाकिस्तान म्हणजे त्यांचा पराभव आणि आपला विजय हा एक नियमच आहे , त्यामुळे मॅच हरलो तर काय वगैरे फालतू प्रश्न पडलेच नाहीत. मॅच एकत्र बघू ह्या गोष्टीवर मात्र शिक्कामोर्तब झालं.नंतर साधारण १०-१२ दिवस झाले, मॅचचा दिवस उगवला..आणि अतिशय बोलबच्चन करून बडबड करणाऱ्या सगळ्यांनी शेवटपर्यंत मॅच साठी प्लॅन केलाच नव्हता, नुसते हवेत गोळीबार. तेव्हा पुण्यात स्पोर्ट्स बार एवढे सुरु झाले नव्हते आणि झाले असतील तरी तिकडे ८-८ तास बसायला खिशात पैशेही नसायचे.. त्यामुळे आता आपापल्या घरी बसा आणि जिंकल्यावर एफ सी रोड ला या असा साधा सोप्पा प्लॅन फायनल केला.. थोडासा निराश होऊनच घरी आलो. पण चीज कॊ दिल से चाहो तो पुरी कायनाथ उसे मिळणेकि कोशिश में लग जाती है असं म्हणतात आणि त्याचा मला याची देही अनुभव आला..घरी आल्यावर बघितलं , आई बाबा घाईघाईत निघाले होते मला म्हणले रात्री उशीर होईल यायला किंवा उद्याच येऊ वगैरे..मी अतिशय निर्लज्ज मुलासारखा त्यांच्यासमोर ओरडलो "बेस्ट, उद्याच या". त्यांनी डोक्यावर हात मारून घेऊन काढता पाय घेतला!
घरात जाऊन रप्पारप पोरांना फोन लावले... तेव्हा मोबाईल वगैरे काही नव्हते , लॅण्डलाइनवरच सगळं. "घरी कोणी नाहीये , दुपारी २.३० ला माझ्या घरी , तारा वर या"! अर्ध्या लोकांना मी फोन केले, बाकीच्यांना अमेयनी . बेस्ट वाटत होतं.. ठरल्याप्रमाणे अमेय आला आणि आम्ही झेंडा,माउंटन ड्यू वगैरे तयारी केली..फुल्ल excitement. रस्त्यावरुन जाताना लोकांमध्ये पण घरी पोचायची घाई दिसत होती..खिशाला परवडेल एवढं खाण्याच्या वगैरे गोष्टी घेऊन घरी आलो. तेवढ्यात टॉस झाला , सेन्च्युरियनच्या आलिशान अशा स्टेडियममध्ये मॅच ! आपले दादासाहेब टॉस हारले, पहिली बॉलिंग आली! , १० ओव्हर झाल्या तरी पाकड्यांची एकही विकेट पडली नव्हती आणि फोनवर हो हो म्हणलेल्यांपैकी कोणीही आलं नव्हतं, जरा बोर झालं होतं ... आम्ही दोघे शांतपणे सकाळवगैरे वाचत बसलो...
तेवढ्यात झहीरनी तौफिक उमर चा एक जोरदार त्रिफळा उडवला आम्ही दोघांनी, घरात खूप गर्दी आहे...आम्ही लै एन्जॉय करतोय असं भासवून स्वतःलाच खुश करण्यासाठी खूप आरडाओरडी केली...आणि एक 'टेम्पो' सेट करायचा प्रयत्न केला..आणि तेवढ्यात घराची बेल वाजली. आमच्या ग्रुपमधील एक से एक वल्ली लोकं - अमोल , अप्प्या ओंकार , सागर dungule , अजिंक्य चुटके दारात उभे होते!! मी हुश्श केलं , जणू काही अक्ख BMCC घरी आल्यासारखं मला वाटलं.. माझ्यासाठी हे ६-७ जण म्हणजे अख्ख BMCC च होतं!! आता पहिली विकेट आणि पोरांची एन्ट्री ह्यांनी जान आणली होती.
"माझे इंजिनीरिंग करणारे काही शाळेतले मित्र आहेत त्यांना बोलावलेलं चालेल का " अमोलनी उगाचच मी किती शहाणा मुलगा वगैरे आहे असं दाखवत परवानगी घ्यायचा प्रयन्त केला ,पोरांनी लगेच अमोलला कोपऱ्यात घेऊन त्याचा क्लास घेतला. कुल्कर्ण्यांनी इंजिनीरिंगच्या मित्रांना बोलावलं,फोन ठेवल्यावर - त्यांना अभ्यास वगैरे असतो येणार नाहीत वगैरे म्हणत बी कॉम वाले पडीक असतात हे दाखवून दिल्याबद्दल पोरांनी अमोलचा पुन्हा एकदा क्लास घेतला...
पण जणू काही "बी कॉम वाले पडीक असतात" हे वाक्य पटवण्यासाठीच दारावर उभे राहिले आमचे BMCC - डहाणूकर अशा २ कॉम्बो कट्ट्यावरची मंडळी..
 सुमीत , आनंद ,परीक्षित ,मिनत्या ,जितू राणे आणि मयुरेश बहिरट .. ते लोकं आत येत नाहीत तो पर्यंत स्वागत पाटणकर इथेच राहतो का वगैरे म्हणणारे ४-५ टाळकी आली..
२-३ मिन बोलल्यावर लक्षात आलं.. अमोलची इंजिनीरिंगची अभ्यास करणारी हीच ती पोरं ... योगेश , पराग , बागड , भुक्या आणि पप्प्या  ह्यांची एंट्री झाली.. योग्या भुकीला आधी बघितलं तरी होतं पण पण पप्प्या, बागड्या आणि पराग चे चेहरे एकदम अनोळखी होते..मनात म्हणलं हरकत नाही ...आपल्याला गर्दी करून राडाच घालायचं.. BMCC , डहाणूकर , इंजिनीरिंग असे वेगवेगळे दिशांचे लोक तारा मध्ये बसून आफ्रिकामधली मॅच बघत होते तरी काहीतरी मिसिंग वाटत होतं... तेवढ्यात आमच्या ग्रुप मधल्या २ मनोरंजक जोड्या आल्या .. एका गाडीवर मितेश  --Rohan बोरावके आणि दुसरीवर अभिषेक -अमित.... अभिषेकने आल्या आल्या खेमराजमुळे उशीर झाला वगैरे काहीतरी बोलून उशीर का झाला ह्या न विचारलेल्या प्रश्नाचा उत्तर द्यायचा निरर्थक प्रयत्न केला... अमित मगरनी मात्र मात्र शांतपणे जिथे रिकामी जागा दिसेल तिकडे जागा घेतली! मागून मितेश आणि बोरावके आले, दारातून आत घुसल्या घुसल्या जमलेली गर्दी बघून - 'आयवोय' एवढिच त्याच्या स्टाईल मधली रिअक्शन दिली' आणि गर्दी कडे बघत बघत आत गेला..बोरावकेनी कोपऱ्यात ठेवलेला झेंडा बरोबर शोधला आणि घेऊन बसला.. अशा प्रकारे गेल्या ३० मिनटात घरातल सगळं चित्रच बदलून गेलं होता , अब्दुल रझाक येऊन आउटपण झाला होता कोणाच ही लक्ष नव्हता .. थोडं नीट बघितल्यावर इंझमाम बॅटिंग ला येताना दिसला , अमेयनी अतिशय आत्मविश्वास दर्शवत, हा भा$%$ जाडा इंझमाम पळणार नाही आणि रन आउट होणार बघा वगैरे बोलून दाखवला.. जमलेल्या २०-२२ लोकांनी त्याला अजिबात प्रतिक्रिया दिली नाही. आणि साधारण पुढच्या ५ मिनटात वगैरे इंझमाम आऊट झाला... ते सुद्धा रन आउट .. अमेय 'मला विचारात जा क्रिकेटबद्दल' ...वगैरे डायलॉग मारून हवा करायचा प्रयन्त करत होता... पोरांनी ह्यावेळेस मात्र त्याला प्रतिसाद दिला आणि इंझी ला भा ची बाराखडी ऐकवली..
नंतर यसुफ योहान आला, ५-६ ओव्हर झाल्या विकेटच पडत नव्हती.. दुसरीकडे सईद अन्वर खूपच भारी खेळात होता. मॅच जरा बोर व्हायला लागली आणि लोकही अजून ओपन अप झाली नव्हती.. अप्पू च्या ते लक्षात आलं... "मी माउंटन ड्यू" आणायला गेलो आणि त्या दुकानातल्या बाई ला "डू द ड्यू" द्या असं बोललो " हे असे अतिशय तयार केलेले विनोद ऐकवून खेळीमेळीच वातावरण करायचा प्रयत्न केला. योगेश जोशींनी दिलेली "हा काय 'वाय झेड' आहे का?" रिअक्शन ऐकून अप्पू ..हा हा वगैरे हसून गार पडला ...मग अमोलनी डी मोंगिया हा किती महान खेळाडू आहे वगैरे फालतू बडबड करून वातावरण पुन्हा हलकं आणि बोलकं करायचा प्रयत्न केला.. BMCC च्या पोरांनी अमोल कसा सध्या उमा उमा करत असतो अशी एक महत्वाची बातमी इंजिनीरिंग च्या पोरांना पुरवली! बस्स झाला तर मग अशा ह्या 'क्रॉस ट्रेनिंग' मुळे सर्व मुलं एकत्रपणे नंदू लागली आणि स्वागतआजोबाना एक समाधान मिळालं. भुक्या ने त्याच्या बोलण्याच्या घाण स्पीडमध्ये उमा हा सोप्पा शब्द सुद्धा घाणप्रकारे कसा उच्चरत येतो ह्याच एक प्रात्यक्षिक दाखवलं...
मिन व्हाईल, योहाना - अन्वर पार्टनरशिप १५ एक ओव्हर्सची झाली, मॅच जाते कि काय भीती वाटायला लागली होती. लोकांचं लक्ष लागत नव्हतं , चलबिचल होत होती.. आमचचा कॅप्टन ओंकार थोरात कंटाळा येऊन बाल्कनी मध्ये गेले ...आणि जादू झाल्यासारखा युसूफ योहान 'सॊफ़्ट आउट झाला. आणि थोरात नी जागा सोडल्याचा परिणाम चाणाक्ष लोकांच्या च्या नजरेतून सुटला नाही..थोरात ला पुढची सगळी मॅच बाल्कनीमधूनच बघण्याचा आदेश देण्यात आला. आफ्रिदी आला ,आल्या आल्या त्यांनी २ चौकार मारले पण काय आश्चर्य! चक्क डी मोंगिया ने त्याला आउट केलं.. घरात डी मोंगिया वरून अमोल आणि अमोलवरून उमा चा जयघोष सुरु झाला ..साधारण पुढची १० मिन उमाच्या नामस्मरणानी तारा दणदनून गेली..
फायनली पाकिस्तानची बॅटिंग संपली .. २७४ टू विन!!!
आपणच ५० ओव्हर्स फिल्डिंग केलीये ह्लअशा आवेशात अख्खी गॅंग स्वीकार वर खायला गेली.. खाऊन घरी पोचलो ते हि परफेक्ट टाइम ला ... सेहवाग नी वकार ला जोरदार ६ मारला थोड्या वेळात तेंडल्या नी अख्तर ला जोरदार ठोकलं , खरा दंगा सुरु झाला. भयंकर आरडाओरडी.छोट्याश्या हॉल मध्ये २५ एक लोक भयांकर आवाज करत होते. तारा हलली होती, ते ऐकून वरचा क्रिकेट पंडित अक्षय  पण आम्हाला जॉईन झाला! दंगा सुरूच!! आणि अचानक सेहवाग आणि गांगुली आउट झाले.. लोकांनी ओंकार ला पुन्हा बाल्कनीमध्ये पाठवले. बहिरट अचानकपणे खालती गेला आणि ५ मिनटात धावत धावत वर आला.. शेजारच्या रिकाम्या प्लॉटवर एक आंब्याचं झाड होतं , त्याच्या कैऱ्या काढून आणल्या होत्या ह्या पट्ठ्यानी!!
थोडं टेन्शन होतं पण सचिन असल्यामुळे निश्चिन्त होतं, सचिन फुल्ल फॉर्मात खेळत आणि अचानक सुमित आणि अंड्या ह्यांना सूर गवसला आणि अतिशय भावनिक कविता त्यांनी केली..
"हा बघ हा , तो बघ हा ... हा बघ तो , तो बघ तो. "असे अतिशय अर्थपूर्ण शब्दांनी कविता सजवली होती.सचिन आणि कैफ सेट झालेत असं वाटत असतानाच आफ्रिदीने कैफ ला बोल्ड केलं आणि त्या क्षणी आफ्रिदीच्या आईचा जयघोष झाला. हे सुरु असताना अचानक बेल वाजली , वॉचमन कंप्लेंट करायला आला होता पण एवढी लोक बघून प्लिज हळू अशी वगैरे रिक्वेस्ट करून गेला. हे अर्थातच हे बघून लोकांनी आवाज डबल केला ... पुन्हा बेल वाजली..आता मात्र ह्या वॉचमनच्या &&&&& वगैरे करत दार उघडला आणि सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. साक्षात सुरजित मॅच बघायला आले होते...आल्या आल्या कोणाची मॅच आहे रे असे अवघड प्रश्न विचारून मेहेंदळे चा क्लास घ्यायचा प्रयत्न केला.. पण हरतील ते मेहेंदळे कसले. ते अख्ख प्रिपरेशन करून आले होते.. आल्या आल्या "अन्वर किती छान खेळला " वगैरे पाठांतर केलेलं वाक्य बोलून दाखवून सर्वाना गप्प केलं.
कैफ आउट झाल्यावर द्रविड आला..आणि पूर्ण मॅचमधलं सगळ्यात जास्त टेन्शन मला तेव्हा आलं... काहीही कर पण आउट नको होऊस एवढीच पार्थना मी करत होतो...जर द्रविड आउट झाला असता तर माझ्याच घरातून मला हाकलूनही देण्यात आलं असतं ..सुदैवानी द्रविडशेवट पर्यंत नॉट आउट राहिला...मॅच जिंकली, ओंकारला बाल्कनी मधून हॉलमध्ये यायला मिळाला, एकच दंगा सुरु झाला.. फटाक्यांपेक्षा जास्त आवाज होता!!!
रोहन बोरवक्यानी इतका वेळ हातात पकडलेला झेंडा शेवटी उंच धरला आणि नाचायला लागला....आणि खळळळ....आवाज झाला. भारताच्या उंचावलेल्या झेंड्यानी आमच्या हॉल मधलं झुंबर फुटलं होतं.... आई बाबा दारात उभे होते!!
पुढच्या १० मिनटात माझ्यासकट सर्वानी एफ सी रोड गाठला ....

No comments:

Post a Comment