Saturday, May 12, 2018

द्रविडीयन मातृत्व (मदर्स डे स्पेशल)

द्रविडीयन मातृत्व (मदर्स डे स्पेशल)



'टीम'रुपी आपल्या कुटुंबाला नेहमीच स्वतःपेक्षा जास्त प्राधान्य देणारी... कधी ओपनिंग कधी वन डाऊन असं टीमच्या भल्यासाठी स्वतःचे हट्ट नेहमीच बाजूला सरणारी...स्लिप मध्ये सेटल असताना केवळ टीमची गरज म्हणून विकेट कीपिंग करणारी.. थोडक्यात काय तर टीमसाठी वाट्टेल ते करायची तयारी असणारी... आपल्या कुटुंबासाठी कुठल्याही गोष्टीचा त्याग करायला तयार असणारी....आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कधीच रिटायर न होणारी.... वेगवेगळ्या रोल्स मधून आपल्या कुटुंबाचं भलं करत राहणाऱ्या भिंतरूपी आईला आजच्या मदर्स डे निमित्त  शुभेच्छा!!
देवरूपी (सगळ्यांचा) बाप आणि संकटांशी सामना करण्याची शक्ती देणारा दादा आपल्या कुटुंबात असताना ही आई हळू हळू जन्म घेत होती... नेहमीच दुय्यम भूमिकेत, दुसऱ्यांच्या सावलीत राहून ती दिवस रात्र काम करायची ... तिचं महत्व आपल्याला जणू माहितच नव्हतं पण तरी गरज पडली कि तिचीच आठवण यायची... पडेल ते काम करणं ही तिची सवयच...गरजेप्रमाणे भूमिका पार पाडायची तिची तयारी असायची.... टीमची आईच ती ... टीमची  काळजी घेता घेता , कधी कधी बाबा अपयशी झाल्यावर मात्र ती पटकन बाबाच्या भूमिकेत शिरायची आणि कुटुंबासाठी देवासारखी धावून यायची ... आपण मोठं होत गेलो तशी तिची व्हॅल्यू आपल्याला जाणवायला लागली... 
कुटुंबासाठी प्रतिष्ठेचा असणाऱ्या  वर्ल्डकपमधलं आत्तापर्यंतचं सर्वात मोठं अपयश तिच्या नेतृत्वाखाली आलं... ती खचली पण डगमगली नाही ..पुन्हा भरारी घ्यायच्या दृष्टींनी तयारी केली.... पण तिला अलगद बाजूला केलं गेलं... नवीन पिढीसाठी तिनी हा बदलसुद्धा हसत हसत स्वीकारला.... पण आई संपली असं वाटत असतानाच तिनी इंग्लंडसारख्या अवघड जागी  पुन्हा तिची उपयुक्तता सिद्ध केली... आईला 'वन डे' पुन्हा बोलावणं आलं पण आता मात्र तिनी पुढच्या पिढीसाठी स्वतःहून रस्ता मोकळा केला आणि स्वतःच्याच स्वयंपाकघरातून बाजूला सारून नवीन सुनांना ओटा रिकामा करून दिला... 
पण आई संपली? नाही ...  शेवटी ती आईच ...ती कधीच रिटायर होत नसते ...  संस्कार करणं हे तिच्या रक्तातच असतं...  ही आई पण तशीच... आपलं कुटुंब अजून समृद्ध करणं हाच तिचा ध्यास हाच तिचा हट्ट.... ह्या हट्टापायीच ही भिंतरूपी आई आता  'इंडिया ए असो किंवा u १९' ..... पुढची पिढी  घडवण्यामध्येच गुंतलेली असते... किटी पार्टी, छंद जोपासणे , भटकणे वगैरे  बाकीचे हजार ऑप्शन्स सहज ओपन असताना मात्र नवीन पिढी घडवण्यासाठी संस्कार वर्ग उघडणाऱ्या ह्या भिंतरूपी आईला मनापासून नमस्कार....  आईची महानता नेहमीच आपल्याला उशिरा समजते , ह्या आईचं पण कदाचित तसंच झालं असावं ...आणि  म्हणूनच पुढच्या पिढीतून माही रूपी बाबा आला , विराट नावाचा दादा पण मिळाला पण अजूनही आपलं कुटुंब आईची रिप्लेसमेंट शोधतंय....  

धन्य तो द्रविड ..धन्य त्याचं मातृत्व!  

--स्वागत पाटणकर

5 comments:

  1. वा. मदर्स डे स्पेशल आई छानच

    ReplyDelete
  2. आत्ता पर्यंतचा माझा सर्वात आवडता लेख especially concept चांगली आहे....आणि हो प्रगल्भ विचार

    ReplyDelete
  3. Are Dravid Cha asu shakto asa...
    Noone other...

    Mast lihilaes

    ReplyDelete