Saturday, January 27, 2018

तुम्ही-आम्ही अजिंक्य रहाणे....

तुम्ही-आम्ही अजिंक्य रहाणे.... 

साधारण वर्षभरापूर्वी म्हणजेच गेल्या मार्चमध्ये प्रमोशन मिळालेलं असतं  .... एका मॅचसाठी का होईना पण ऑस्ट्रेलियाविरुद्ध अवघड सिरीज आणि त्यात महत्वाच्या टेस्टमॅचमध्ये इंडियन टीमला लीड केलेलं असतं...  अवघड निर्णय आणि धडाकेबाज खेळी करून टीमला मॅच - सिरीजमध्ये जिंकून दिलेलं असतं... एक प्रकारे ती करियरमधली सर्वोच्च मुमेंट असते... सगळं कसं एकदम छान सुरु असतं...
पण कुठेतरी माशी शिंकते... नंतर आलेल्या आयपीएल आणि मग भारतामधल्या टेस्ट सिरीजमध्ये अपेक्षेप्रमाणे बॅटिंग होतं नाही... काहीतरी चुकत असतं.. अख्खी टीम बहारदार परफॉर्मन्स करत असते... पण स्वतःच अपयश सलत असतं... रिलेटिव्हली सोप्पा अपोनंन्ट आणि सोप्या कंडिशन्समध्ये आपल्याकडून धावा होत नाहीयेत हे जास्त त्रासदायक असतं.. साहजिकच अपयशातून बाहेर यायला आपण खूप प्रयत्न करत असतो... एक प्रकारचा  मानसिक त्राण असतो... त्यामुळेच ग्राऊंडबाहेरची मेहनत मैदानात फळ देत नसते ... पुन्हा अपयशच हाती येत असतं...
प्रवीण अमरेकडून टिप्स घेताना 

एकदाच्या त्या मॅचेस वाईट स्वप्नांसारख्या संपतात... पुढची टूर असते भारताबाहेरची अवघड प्रतिस्पर्धी आणि अवघड परिस्थितित... तिकडे पूर्वी चांगला परफॉर्मन्स झालेला असतो पण त्या गोष्टीला आता ४ एक वर्षं झालेली असतात... तिथे गेल्यावर पुन्हा आपला फॉर्म परत आणून गेले ६-७ महिने चिकटलेलं अपयश धुवायचा निर्धार केलेला असतो... टूर आधी असलेला प्रत्येक दिवस मानसिक आणि शारीरिक प्रॅक्टिसमध्ये गुंतला जातो... प्रवीण अमरेसारख्या आवडत्या कोच बरोबर खेळातल्या प्रत्येक बारकाव्यांचा अभ्यास केला जातो.. टूरला निघण्यापूर्वी "कम ऑन , २०१८ माझंच आहे" वगैरे स्वतःला सांगून आत्मविश्वास जागवण्याचा एक प्रयत्न होतो.. उपकर्णधार म्हणून आफ्रिकेत पोचतो ...
पण गेल्या गेल्या शॉक बसतो... पहिल्या दोन मॅचेसमध्ये संघात जागा मिळत नाही... केलेल्या निर्धाराचा चक्काचूर होतोय कि काय ... घेतलेली सगळी मेहनत वाया जाते कि काय भीती वाटायला लागते... 'का असं' हा प्रश्न स्वतःलाच विचारला जातो.. संस्कारच असे असतात कि मन स्वतःलाच दोषी मानतं... बॉण्ड्रीलाईनवर बसून मॅच बघत बघत खिन्न झालेलं मन पुन्हा स्वतःच्या टार्गेटकडे रिडाइरेक्ट करायची अवघड गोष्टसमोर असते... खचायचं नसतं...आपले कष्ट सुरु ठेवायचे असतात... आणि संधीची वाट बघत बसायचं असतं....कुठल्याही बॉलरपेक्षा स्वतःच नकारत्मक मन हे 'फेस' करायला जास्त अवघड असतं...
२ऱ्या टेस्ट नंतर ७ दिवस जातात ... आणि ती वेळ येते... ३ऱ्या मॅच मध्ये खेळायची संधी मिळते ...सिरीज गेलेली असते पण मॅच जिंकणं संघासाठी खूप महत्वाचं असतं... तीक्ष्ण- धक्कादायक भूतकाळ आणि ते खोडायला घेतलेले कष्ट हे एका गोड भविष्य असलेल्या स्वप्नांच्या किटबॅग मध्ये बांधून बॅटिंग साठी उतरतो... आणि तेवढेच निराश होऊन पुन्हा पॅव्हिलिअन मध्ये परततो... टीकाकारांच्या टीका आणि फॅन्सच्या डोळ्यातली डिसपोइन्टमेन्ट स्पष्ट दिसायला लागते... मन अजून खच्ची होतं... सगळं अवघड वाटायला लागतं... अपयश बोचत असतं... ८ महिन्यापूर्वी लीड केलेल्या टीममधून आता आपण कायमचे बाहेर पडतो कि काय अशी भीती वाटायला लागते....
दुसऱ्या इनिंगची वेळ येते .. टीम पुन्हा अडचणीत असते... ह्या वेळेस पिचवर उतरल्यावर आत्मविश्वास देणारी व्यक्ती समोर असते... आपल्याच कॅप्टनच्या तोंडून अग्रेसिव खेळायचा ग्रीन सिग्नल मिळतो... जणू काही तो "जा जिले अपनी जिंदगी" सांगतोय ह्या आवेशात ऑन ड्राइव्ह आणि स्क्वेअर कट आपल्या बॅटमधून मारला जातो... बॅटमधून आलेला तो मंजुळ आवाज निराशावादी डोळ्यांना खाडकन उघडतो... जुने दिवस डोळ्यासमोर येतात आणि वर्तमानाला स्कोअरबोर्डवर झळकवतात....
टीमला स्ट्रॉंग पोझिशनमध्ये नेऊन ठेवणारी एक महत्वपूर्ण इनिंग खेळली जाते... असतात ४८ धावा, ज्या काही वर्षानंतर स्टॅट्समध्ये फारशा गणल्या जात नाहीत... पण ह्या इनिंगचं महत्व टीमला आणि त्यापेक्षा स्वतःला जास्त असतं ...स्वतःच्या त्रुटी दूर करण्यासाठी घेतलेले कष्ट कामास आले ह्याचा आनंद असतो.. मिळालेल्या संधीचं सोनं करता आलं हे समाधान देणारं असतं... निगेटिव्ह थॉट्स बाजूला होतात...आणि प्रसन्न झालेलं आपलं मन हे मॅच जिंकल्यावर तिथेच न थांबता पुढच्या चॅलेंजसच्या तयारीला मन लागतं...

भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या करियरमधलं हे एक खूप टफ वर्ष आपण सर्वानीच पाहिलं असेल.. कधी त्याच्यावर टीका आणि कधी कौतुकही केलं असेल... त्यानी काल केलेल्या ४८ धावा ह्या एक आकडा म्हणून  मॅच विनिंगवगैरे नव्हत्या किंवा खूप ग्रेट नव्हत्या... पण गेलं वर्षभरातलं अपयश आणि भविष्यकाळातली गोष्टींची भीती, त्यात मॅच हरण्याची चिंता ह्या सगळ्या विचारांना त्यानी बाजूला ठेवलं आणि अवघड कंडिशन्समध्ये प्रतिस्पर्ध्यावर राज्य करायचं धाडस त्यांनी पेलून दाखवलं...

मी त्याचा फॅन आहे म्हणून एवढं कौतुक नाही किंवा मॅचमध्ये तो काही एकटाच हिरो नाही... छोटे आकडे असलेल्या अशा खेळी भविष्यात विसरून जातात .. पण आपण मात्र खेळ नुसताच न बघता त्यातून बरंच काही आत्मसात करायचं असतं ..खरंतर गेल्या वर्षातल्या चढ उतारामधल्या प्रवासात त्याची ही कालची इंनिंग  तुम्हा-आम्हासारख्या मध्यमवर्गीग नोकरदार वर्गाला खुप काही शिकवून जाणारी आहे... एखादं स्वप्न बघून ते पूर्ण करायला आपण जीवापाड मेहनत घेतो... पण ते स्वप्न पूर्ण करायची संधीच आपल्याकडून हिरावली जाते...'सगळं संपल्याचं फीलिंग येतं' किंवा आपण बऱ्याच वेळा आपल्या करियर मध्ये काही चांगले परफॉर्मन्स देतो.... मग दुसऱ्यांच्याच काय तर स्वतःच्याच स्वतःकडून अपेक्षा वाढतात ... हाय टार्गेट - अवघड अपेक्षा पूर्ण करायला म्हणून प्रामाणिक प्रयत्न करतो पण सॊप्या चॅलेंजेसमध्ये अपयशी होतो .. आणि ते दुःख जास्त बोचरं असतं ...कधी कधी करियर संपायची भीती दाखवणारं असतं  ...

त्यामुळेच, जसं कम्फर्ट झोनमध्ये गुरफटून बसायचं नसतं तसंच अशा अवघड सिचुएशन्समध्ये डगमगायचं नसतं ... ह्या कालच्या छोट्या  इंनिंगसारखा छोटा आनंदसुद्धा आपल्या टीमला म्हणजेच कुटुंबाला सुखी ठेवत असतो , मोटिवेट करत असतो... हे नेहमी लक्षात ठेवायचं असतं.... आणि अशाच छोट्या छोट्या प्रसंगात मोठं सुख शोधायचं असतं ... कारण स्वतःच्या आयुष्यात स्वतः अजिंक्य राहायचं  हे फक्त आपल्याच हातात असतं...

-- स्वागत पाटणकर

3 comments:

  1. स्वत:" अजिंक्य रहाणे " हे महत्वाचे

    ReplyDelete
  2. Swagat अप्रतिम लिखाण.......

    ReplyDelete
  3. Very nicely and perfectly worded the feelings of Ajinkya. I have also enjoyed his dedication and performance in this match.

    ReplyDelete