Tuesday, January 23, 2018

आपल्या माणसांचा आपला मानूस!

आपल्या माणसांचा आपला मानूस!

लेखक विवेक बेळे ह्यांची नाटकं म्हणजे गुंतवून ठेवणारी कथा, एक विशिष्ट शैली, अचूक शब्द निवड अशा अनेक हत्यारांनी प्रेक्षकाला एकदम घायाळ करून सोडतात.. सोपी भाषा पण त्यात लपलेला मोठा अर्थ. माकडाच्या हाती शॅम्पेन, अलीबाबा आणि चाळिशीतले चोर अशी अनेक नाटकं येतात आणि प्रेक्षकाला जिंकून जातात. बेळे काकांनी त्यांच्या लेखनात एक मूड सेट केलेला असतो, प्रत्येक व्यक्तिरिखा पूर्णपणे अभ्यास करून मांडलेली असते, विनोद निर्मिती ही आपोआप घडत असते, सस्पेन्स रहात असतो आणि त्यातूनच एक विचार प्रेक्षांसमोर मांडला जातो.... लादला जात नाही...आणि त्यामुळेच त्यांच्या नाटकाचं सिनेमामध्ये रूपांतर करणं हे फार जोखमीचं म्हणजे आजकालच्या भाषेत लै टेन्शनच काम...पण आपल्या मराठी प्रेक्षकांचं नशीब तसं चांगलंच, आपल्याकडे अशी अवघड चॅलेंजेस, डोक्याला शॉट लागू शकणारे प्रोजेक्ट्स हाती घेणारे धाडसी कलाकार आहेत. सतीश राजवाडे हे त्यातलेच एक. बेळे काकांच्या माकडाच्या हाती शॅम्पेनवर आधारित बदाम राणी गुलाम चोर नावाचा सिनेमा राजवाडेंनी काढला होता. त्याच अनुभवातून शिकून, प्रोत्साहित होऊन आता ते घेऊन येत आहेत सुपरहिट नाटक 'काटकोन त्रिकोण'वर उभा राहिलेला 'आपला मानूस...'आपल्या माणसांचा आपला मानूस!




सतीश राजवाडे... एक गुणी आणि ऑल राउंडर दिग्दर्शक. सिनेमा आणि टीव्ही क्षेत्रावर राज्य करणारा हा माणूस. मालिका संपल्यावर "का संपली एवढ्यात" असं ज्याच्या मालिकांबद्दल विचारलं जातं असा हा सतीश राजवाडे... रोमॅंटिक, कौटुंबिक,सस्पेन्स ,ऍक्शन ,थ्रिलर, विनोदी वगैरे वगैरे जॉनरमध्ये एक्स्पर्टीज असलेल्या राजवाड्यानी गेल्या दशकात अतिशय कंसिस्टन्टली परफॉर्मन्स देऊन प्रेक्षकांचा विश्वास संपादन केलाय... त्यामुळेच राजवाडेंचा सिनेमाचं ट्रेलर बघितल्या बघितल्या  काहीतरी चांगलं बघायलामिळणार ह्याची खात्री सामान्य प्रेक्षकाला असते! 
आणि एगझॅक्टली तसंच होतं 'आपला मानूस'च ट्रेलर बघून... ट्रेलरच्या सुरवातीलाच काटकोन त्रिकोणचा संदर्भ येतो आणि  प्रेक्षकांना 'बेस्ड ऑन मराठी प्ले' असं डायरेक्ट न सांगता फक्त हिंट दिली जाते... आणि बाकी पूर्ण ट्रेलरमध्ये गुंतागुंत असलेला प्लॉट समोर येऊन जातो.. २ मिनिट, ३ व्यक्तिरेखा आणि संवादातून उलगडत जाणारे त्यांचे विक्षिप्त स्वभाव आणि ४थ्या व्यक्तिरेखेबद्दलची त्यांची मतं हे सगळं आपल्यासमोर उभं राहतं. अतिशय उत्कंठावर्धक असं हे ट्रेलर प्रेक्षकाला नक्कीच थिएटरपर्यंत ओढत नेणारं आहे. 

ट्रेलर बघण्यासाठी इथे क्लिक करा

ज्यांनी काटकोन त्रिकोण बघितलं नाही त्यांच्यासाठी अख्खा प्लॉटच नवीन आहे इतकंच काय ज्यांनी नाटक बघितलंय त्यांना नाटकाची सिनेआवृत्ती पाहायची उत्सुकता तेवढीच असणार कारण ह्यातले कलाकार....खरं तर काय बोलायचं त्यांच्याबद्दल. नाना पाटेकरांबद्दल बोलायची माझी लायकी नाही... पण पहिल्याच शॉटमध्ये एन्फिल्डवरून येताना अब तक ५६ ची आठवण होते.. आणि आपला हा सेहवाग धुवाधार फलंदाजी करायला तयार आहे हे जाणवतं. अतिशय चालाखपणे लिहिलेल्या संवादांना नाना आपल्या विशेष आणि युनिक स्टाईलनी अजून आकर्षक बनवतो. नाटकामध्ये मोहन आगाशांनी केलेल्या भूमिकेला सिनेमासाठी एक परफेक्ट पर्याय एकच होता ..तो म्हणजे नाना. सतीश आणि टीमनी हा एक परफेक्ट डिसिजन घेतलाय. नटसम्राट नंतर दगडी मन ते एक भावनिक किनारा असलेला नाना आपल्याला बघायला मिळणार ... ही अशी  विविधरंगी पैलू असणारी व्यक्तिरिखा नाना लीलया पार पडणार ह्यात शंका नाही... आपला मानूसमधला नाना म्हणजे तिखट, गोड , मसालेदार वगैरे पदार्थ असणारी राईस प्लेट असणार ह्याची गॅरंटी हे ट्रेलर देतं !!

नाना व्यतिरिक्त ट्रेलरमध्ये दिसतात त्या इरावती हर्षे... मोहन आगाशेंच्याच टीमच्या ह्या एक सदस्य... अस्तु, कासव वगैरेमध्ये इरावतीना बघितल्यानंतर अशा तद्दन कमर्शियल सिनेमात त्यांना बघून खूप भारी वाटतंय... त्यांचा स्क्रीन प्रेझेन्स फारच जबरा असतो.. अर्थात त्यांनी साकारलेली व्यक्तिरेखा निगेटिव्ह वाटणारी आहे. पण त्यांच्यात एक जादू आहे ... विशेषतः त्यांचा आवाज....  एक वेगळाच दर्दी आहे . म्हणजे त्यांनी अगदी बाराखडी किंवा ABCD म्हणलं तरी त्यात भावनांची उधळण होईल. ऐकणाऱ्याला त्यातसुद्धा काहीतरी गहिरा अर्थ सापडेल. इरावती हर्षे ह्या कमर्शियल प्रेक्षकांसाठी गोड सरप्राईझ असणार आहे. 

ह्या त्रिकोणातली तिसरी बाजू म्हणजे सुमीत राघवन.. एकदम आपला माणूस.. कुटुंब मराठी असो वा हिंदी... त्यातल्या आई , बाबा,काकू, मामी, मामा, आजी पासून चिंटू पप्पू मिनी ह्या सगळ्यांना आवडणारा असा हा सुमीत राघवन .. एकदम लाडका. 
नाना जर सेहवाग असेल तर सुमीत म्हणजे एकदम राहुल द्रविड कॅटेगरी. नाटक, सिनेमा असो वा टीव्ही... हा आपला प्रामाणिकपणे काम करत राहतो. मला तर नेहमी वाटतं, अजून पर्यंत त्याच्यातल्या अभिनेत्याला न्याय मिळेल अशी भूमिका त्याला मिळाली नाहीये. आपला मानूसमध्ये सुमीत, नानासमोर एकदम भक्कमपणे उभा आहे. द्रविडसारखंच त्याचं काम म्हणजे नानाच्या टोलवाटोलवीला तेवढीच भक्कम रिअक्शन देणे...एक तगडी पार्टनरशिप करणं आणि ते त्यानी एकदम परफेक्ट केलंय हे तो ट्रेलरमध्ये "अर्थ नसतो ?" ह्या छोट्याश्या संवादातसुद्धा दाखवून देतो.  

थोडक्यात काय ३ अवलिया कलाकारांचा एकदम 'राईट' अँगल ट्रँगल सतीशनी आखलेला आहे... विवेक बेळेंच्या कथा आणि संवादातून तो प्रेक्षकांना त्रिकोणाच्या आत खिळवून ठेवेल हे २ मिनिटाच्या ट्रेलरमध्ये अगदीच स्पष्टपणे दिसतंय. ३ भिन्न प्रवृत्तीच्या व्यक्तिरेखा साकारणारे ३ भिन्न प्रवृत्तीचे कलाकार... फार कमी वेळा असा छान योगायोग येतो ... का मिस करावा तो आपण?? वर्षानुवर्षे लोकांच्या मनावर राज्य केलेल्या ह्या 'आपल्या माणसांचा' 'आपला मानूस' ९ फेब्रुवारीला येतोय... आपण तर नक्की बघणार... तुम्ही पण बघा!

जाता जाता -

नाना,सुमीत,इरावती आणि सतीश अशा ह्या सगळ्या आपल्या लाडक्या माणसांना एकत्र आणून ह्या कलाकृती निर्मिती करणाऱ्या अजय देवगणबद्दल न लिहून कसं चालेल... मराठीमध्ये पदार्पण केल्याबद्दल अजयचे आभार आणि त्यांनी अजून अजून मराठी चित्रपट बनवावेत ही काजोलकडे प्रार्थना (अजय बायकोच ऐकतो असं म्हणतात). जोक्स अपार्ट, सिंघमनंतर मराठी प्रेक्षकांसाठी अजय हा सुद्धा एक 'आपला मानूस' बनलाय.. मराठी प्रेक्षकांचं बाजीराव सिंघमवार अतोनात प्रेम आहे ...त्यांच्यासाठी तरी अजयनी २ मिनिटं का होईना पण आपला मानूस मध्ये आपल्या माणसांना दर्शन द्यावं हीच इच्छा!                                                                                                                                                
- स्वागत पाटणकर 

No comments:

Post a Comment