त्या दोघी... ट्रीट फॉर फॅन्स!
"मला ही खूप आवडते" किंवा "ती कसली क्युट आहे" वगैरे असं बायकोसमोरसुद्धा आत्मविश्वासानी कोणाबद्दल बोलता येत असेल तर त्या म्हणजे मुक्ता आणि प्रिया...
तसं बघायला गेलं तर ह्या दोघी एकत्रच माझ्या आयुष्यात आल्या... म्हणजे त्या माझ्या आयुष्यात आल्या पण मी काही त्यांच्यापर्यंत पोचलो नाही.. असो मुद्दा असा की साधारण १२-१३ वर्षांपूर्वी, जेव्हा मी बीकॉम ह्या गोंडस नावाखाली आयुष्यात काहीही करत नव्हतो तेव्हाच मुक्ता आणि प्रिया दोघी इंडस्ट्रीमध्ये सेट होत होत्या. आभाळमाया,फायनल ड्राफ्ट, देहभान वगैरे क्वालिटी प्रॉडक्टसमधून मुक्ता समोर येत होती , तिची छाप पाडून जात होती .... तर २००३च्या आसपास डायरेक्ट राजू हिरानींच्या मुन्नाभाई सिरीजमध्ये प्रिया थोडी का होईना पण दिसली होती, आवडून गेली होती. आणि तेव्हाच वाटून गेलं होतं ही मुलगी पुढे जाणार...
त्या दोन-तीन वर्षात आमच्यात हे 'इंट्रो' सेशन झाल्यावर खरी मैत्री झाली ती मात्र २००८-०९ च्या दरम्यान... स्त्री कलाकार सुद्धा प्रेक्षकांना खदखदून हसायला लावू शकतो ते ही काहीही पाचकळ चाळे न करता... हे ताकदीने दाखवून दिलं मुक्ताने - एक डाव धोबीपछाडमधून. तोपर्यंत बऱ्यापैकी सिरीयस किंवा मॅच्युअर्ड व्यक्तिरेखा साकारणाऱ्या मुक्ताकडून ती 'सुलक्षणा' बघायला मिळणं म्हणजे एकचेहऱ्यावर खूप मोठं स्माईल आणणारं सरप्राईज होतं. सशक्त अभिनय म्हणजे फक्त प्रेक्षकांना सिरीयस करून त्याच्या डोळ्यात पाणी आणणं नव्हे... पण आपला तोच चेहरा घेऊन अभिनयाचं कौशल्य दाखवत लोकांना हसवणं देखील फार अवघड काम. मुक्ताने ते लीलया पेललं होतं ते सुद्धा विनोदाचे बादशाह अशोक सराफ समोर असताना! तेव्हाच आपली आणि तिची घट्ट मैत्री झाली... ! त्यानंतर मात्र तिनी पिक्चरला बोलवायचं आणि आम्ही पहिल्याच दिवशी जायचं हा अलिखित नियम होऊन गेला...
नंतर नंतर तर ही इंडस्ट्रीची विराट कोहलीच होऊन गेलीय... टेस्ट, वन डे किंवा टी २० कुठल्या फॉरमॅटमध्ये कोहली फॉर्मात असतो अगदी तसच आमच्या मुक्ताचं ... भलतीच ऑलराऊंडर... टीव्ही , नाटक आणि सिनेमा सगळीकडे हिची जोरदार बॅटिंग आणि चौफेर फटकेबाजी! जोगवा , आघात , मुंबई पुणे मुंबई, लग्न पाहावे करून , बदाम राणी गुलाम चोर ,डबल सीट , अलीकडेच आलेला गणवेश आणि हृदयांतर हे असे विविध प्लॅटफॉर्मवरचे सिनेमे, महाराष्ट्राच्या तरुण मुलांनासुद्धा डेली सोप बघायला लावणारी एका लग्नाची दुसरी गोष्ट आणि कब्बडी -कब्बडी , छापा काटा , कोडमंत्र अशी तगडी नाटकं घेऊन ती नेहमीच भेटायला येते आणि सवयीप्रमाणे निशब्द करून जाते!
मुक्ताची घरी ओळख करून द्यायची गरजच नाही लागली.... बघतो तर काय घरात आई,बायको अशा सगळ्यांची लाडकी अशी ही मुक्ता. एकदा, कोथरूडमध्ये पी एन जी दुकानाबाहेर आई आणि बायकोला मुक्ता बर्वे दिसल्यावर त्यांनी बिनधास्त हाक मारली; मुक्तापण ग्रेटच लगेच थांबून ५ मिनटं बोलूनच पुढे गेली.. काय खुश झाल्या होत्या तेव्हा माझ्या घरातल्या बायका... घरी येता येता त्यांनी समोरच्या जोशी स्वीट्समधून आंबा बर्फी वगैरे आणली! ही अशी आमची मैत्रीण... एकदम हुशार,अष्टपैलू अशी घरातल्या सगळ्यांची लाडकी!
एकीकडे बर्वे आणि दुसरीकडे त्याच काळात मैत्री (अर्थातच एकतर्फी) केलेली प्रिया बापट! 'मी शिवाजीराजे...' मध्ये तिला फुल्ल रोल मध्ये बघितल्यावर मुन्नाभाई बघितल्या नंतरची प्रतिक्रिया खरी होणार ही खात्री पटली. ही मुलगी नक्कीच पुढे जाणार. क्युट, ग्लॅमरस ,सुंदर,अल्लड ,बाप डान्स आणि एव्हढ्या सगळ्या गोष्टी असून अंगात भिनलेला अभिनय... काय अजब कॉम्बिनेशन... तेव्हा आवडलेली प्रिया एकदम जवळची मैत्रीण झाली ती अर्थातच नवा गडी नवं राज्य मध्ये! साधारण ४ वेळा वगैरे ते नाटक बघितलं. मस्तपैकी कॉलेजच्या कट्ट्यावर बसून तिच्याबरोबर 'कल्ला' करतोय कि काय असाच फील नाटक बघताना यायचा... कितीही वेळा बघितलं तरी समाधान होईना.. एकदा प्रयोग संपल्यावर भेटायला म्हणून मागे गेलो तर ही मुलगी प्रेक्षकांमधून तिला भेटायला आलेल्या आजींना वाकून नमस्कार करत होती.. विषय कट.. मनात भरून गेली राव ही! सेलिब्रिटी भाव खातात, माज करतात वगैरे वाक्यांना जोरदार फुली मारली होती प्रियानी! इतके दिवस ती फक्त आवडायची आता आपण तिला फुल्ल रिस्पेकट द्यायला लागलो होतो! काकस्पर्श,टाइम प्लिज, वजनदार वगैरेमध्ये ती भेटून गेलीच पण निवडक कलाकृतीच करायच्या ह्या तिच्या सवयीचा लै त्रास होतो बाबा...तिची वर्षानुवर्षे वाट बघावी लागते... आणि त्यामुळेच हिची साधी जाहिरात जरी टीव्ही वर लागली तर सगळं सोडून मी ते पूर्ण ३० सेकंद टीव्हीत गुंग होऊन जातो... समोर असलेलं जेवण, बायकोनी सांगितलेलं काम हे सगळं आपण तेव्हा विसरून जातो.. शेवटी हा रिश्ताच एवढा पक्का आहे काय करणार! एवढं कॉन्सन्ट्रेशन अभ्यासात दाखवलं असतं तर तुमचा पोरगा डॉक्टरवगैरे झाला असता असे डायलॉगसुद्धा आमच्या घरात ऐकू येतात!
महाराष्ट्रा मधल्या कित्येक कपल्स मध्ये एक क्रॉस कनेक्शन बघायला मिळतं असं मला वाटतं.. ते म्हणजेच नवरे प्रियासाठी वेडे आणि बायका उमेशच्या फॅन्स.. आमच्या घरात पण तसंच आहे!त्यामुळेच मला माहितीये , बायको किती ही राग दाखवायचा प्रयत्न करत असली तरी तिची देखील प्रिया तेवढीच लाडकी आहे...
मागच्या वर्षी आलेला वजनदार तर तिनी मला बघूनच केला कि काय असं वाटलं... गुबगुबीत माणूस सुद्धा किती गोड आणि क्युट असतो हेच तिनी दाखवलं आणि माझ्यासारख्यांच्या बाजूनी कोणीतरी उभं राहिलं असंच वाटलं.. पण हीच प्रिया तिच्या सोशल मीडिया अकाउंट वरून फिटनेस अवेअरनेस करत असते... आय एम शुअर कि ते बघून माझ्यासारखेच अनेक जण व्यायामाकडे वळत असणार! मैत्रीण असावी तर अशी!
तर अशा ह्या दोघी.. मुळातच भिन्न प्रवृत्तीच्या ह्या आता स्क्रिनवर पण भिन्न भूमिकेत. एक भन्नाट जुगलबंदी बघायला मिळेल असं एकूणच वाटतंय... म्हणजे पूर्वी स्टीव्ह वॉ आणि अँब्रोज ...किंवा स्टेफी ग्राफ आणि मोनिका सेलेसची मॅच सुरु असताना प्रेक्षक गुंग होऊन जायचे ... हा गेम असाच सुरु राहावा, संपूच नये असं काहीसं प्रेक्षकांचं व्हायचं. इतका क्वालिटी - उच्च दर्जाचा खेळ बघायला मिळायचा की तो संपून जाऊच नये असं वाटायचं ... असंच काहीसं इंडस्ट्री मधल्या टॉप अशा ह्या 'दोघी' बघताना प्रेक्षकांचं होईल असं मला फार वाटतंय... दोघींचा स्क्रीन प्रेसेन्सच इतका जब्राट असेल कि ते बघतच राहावंसं वाटेल... संपूच नये असं वाटेल , पुन्हा पुन्हा बघावंसं वाटेल पण त्यासाठी अजून ४ महिने वाट बघायला लागणार... प्रतिमा जोशी ह्यांचं हे पाहिलंच दिग्दर्शन... बर्वे आणि बापट अशा पॉवरफुल शस्त्र घेऊन पहिल्याच बॉलवर सिक्सर मारतील हीच प्रार्थना!
अशा ह्या दोघी... एकतर्फी का होईना पण माझ्या मैत्रिणीच त्या... नेहमीच भेटून निखळ आनंद देणाऱ्या ,रडवणाऱ्या,हसवणाऱ्या, खूप गप्पा मारणाऱ्या अशा ह्या दोघी... आता पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन वर दिसणार आहेत ... 23 फेब्रुवारीला बायकोबरोबर जाणार आपण ..चक्क मैत्रिणींना भेटायला! एक विशेष वॅलेंटाईन्स वीक (थोडासा लेट पण ग्रेट)असणार ए हा! -
स्वागत पाटणकर
Bhari re...
ReplyDeleteLihit Raha
Uttam..
ReplyDeleteAs usual very well written swa
ReplyDelete