टीम इंडियाचा शहाणा मुलगा!
मनानी कितीही पुणेकर असलो तरी नेहमीच मुंबई क्रिकेटसाठी वेडा होतो...कांबळी,तेंडुलकर,मांजरेक र इथपासून अगदी वासिम जाफर, अमोल मुझुमदार अशा अनेक लोकांमुळे पहिल्यापासूनच रणजी म्हणजे मुंबई क्रिकेट असंच ठरलं होतं. मुंबई - महाराष्ट्र रणजी बघायला तर कमालीची मजा यायची.
असंच एकदा ... साधारण १० वर्षांपूर्वी पुण्याच्या डेक्कन जिमखानावर मुंबई- महाराष्ट्र मॅच होती ! डेक्कन म्हणजे आपलं होम ग्राउंड , सो साहजिकच सिक्युरिटीचा वगैरे लोड नव्हता. मी सकाळी ९ वाजता डायरेक्ट पॅव्हिलियन मध्ये जाऊन बसलो. टॉसची वेळ झाली, 'अवे' टीमच्या रूममधून मुंबईचे प्लेयर्स बाहेर यायला लागले. अजित आगरकर,वासिम जाफर,रमेश पोवार असे 'स्टार' लोकं बाहेर दिसले! मन खुश झालं. मुंबईची बॅटिंग आली, जाफर ओपनिंगला उतरला. मी आपला उगाचच व्ही आय पी पास मिळाल्यासारखा तोऱ्यात बसून सगळीकडे नजर फिरवत होतो.सुरवातीच्या ३-४ ओव्हर्स झाल्यावर पॅव्हिलिअन, प्लेयर्स आणि माझी excitement...सगळंच सेटल झालं.
आगरकर आणि पोवार माझ्याच मागे 'टवाळक्या' करत बसले होते. हे असे प्लेयर्स ड्रेसिंग रूममध्ये असणं टीमसाठी फायदाचं असतं हे तेव्हा कळलं. मला काहीही करून आगरकर बरोबर फोटो हवा होता, मी खूण करूनच अजितकडे फोटोची परमिशन घेतली. जग जिंकल्यासारखं पुढे गेलो आणि त्यांच्या शेजारी धवल कुलकर्णीसारखा दिसणारा बारीक, भयंकर टेन्शन घेतलेला मुलगा दारात उभा होता. त्याच्या चेहऱ्यावरचा नवखेपणा स्पष्ट दिसत होताआणि ते बघून माझ्यातला पुणेरी स्वभावानी माझा ताबाघेऊन आणि त्या मुलाला काहीही रिस्पेक्ट न दाखवता त्याला डायरेक्ट कॅमेरा दिला. त्यानीसुद्धा अजिबात रिऍक्ट न होता माझे आगरकरबरोबर फोटो काढले.. मी 'थँक्स धवल' बोलल्यावर, त्यानी एक स्मित हास्य माझ्यावर टाकलं आणि म्हणाला "मी धवल नाही". त्या आवाजात मला एक प्रकारची निराशा जाणवली. ती निराशा नाव चुकल्याबद्दलची नव्हती, पण मी त्याला मॅच बघताना डिस्टर्ब् केलं ह्याची असावी. पुढच्याच क्षणाला तो ड्रेसिंग रूमच्या दुसऱ्या टोकाला जाऊन एकांतात मॅच बघायला लागला!
मनात चुकचुकल्यासारखं झालं, मी लगेच माझा स्कोरर मित्र, कपिल खरेला त्याबद्दल विचारल्यावर उत्तर आलं - 'नवीन प्लेयर आहे. अजिंक्य रहाणे.. आज खेळत नाहीये' . मी मान डोलावली आणि पुन्हा मॅच बघायला लागलो....पण मनात एकच विचार पुन्हा पुन्हा येत होता,
हा मुलगा टीम मध्ये नाहीये.. बाहेर आहे... पण तरी एवढ्या एकाग्रतेने मॅच बघतोय! फार वेगळं होतं हे. पुढचे १-२ तास तो त्याच जागेवर, तशीच हाताची घडी घालून जाफरची बॅटिंग फॉलो करत होता. एकदम गुंतून! आजूबाजूला काहीही लक्ष नव्हतं. जर बॅट्समन बीट झाला,चुकला तर हा इथे कोपऱ्यात बसून नर्वस होत होता. बॅटशिवाय नुसतंच डाव्या हाताने बॉल कसा मारला असता हे दाखवत होता- स्वतःलाच.. आणि मला फारच गम्मत वाटत होती हे सगळं बघताना. माझीं नजर आता त्याला फॉलो करत होती.
आयुष्यात बऱ्याच वेळा काही काही गोष्टी, माणसं आपल्याला पहिल्याच भेटीत क्लिक होतात.. पहिली नजरमें प्रेम वगैरे होतं .. हे अगदीच राज-सिमरनवालं प्रेम नसतं पण मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी ती व्यक्ती पटून जाते. हे असंच काहीसं झालं. हा मुलगा पुढे जाणार असं चटकन वाटून गेलं!
मी त्याला observe करतच होतो तेवढ्यात जाफर आऊट झाला.थोड्यावेळानी बघितलं तर अजिंक्यनी जाफर शेजारची खुर्ची पकडली होती आणि ते दोघ चर्चा करायला लागले होते. मी व्योमकेश बक्षीसारखा हळूच त्यांच्या मागे जाऊन बसलो.. का असा करावंसं वाटलं हे कळलंच नाही.. पण मी गेलो. ते दोघे महाराष्ट्राची बॉलिंग,डेक्कनचं पीच आणि जाफर आऊट झालेला बॉल ह्यावर चर्चा करत होते. मला काहीच सुधरत नव्हतं.हा मुलगा आज काही खेळत नाहीये,बॅटिंग करणार नाहीये पण का एवढा विचार करतोय. टॉस आधी सकाळी त्यांनी पीचचा अंदाज बांधला होता तो कितपत बरोबर आहे हे तो चेक करत होता आणि त्याला समजावून सांगणारा जाफरपण तसाच शांत आणि अभ्यासू. पुढच्या २०-३० ओव्हर्स जाफर आणि अजिंक्य प्रत्येक बॉल वर कंमेंट आणि पुढच्या बॉलचं प्रेडिक्शन करत होते! मी मनातल्या मनात कोपऱ्यापासून नमस्कार घातला होता. आजोबाना आपल्या नातवाची बडबड ऐकून आनंद होईल तसं वाटत होतं मला. हा मुलगा मोठा खेळाडू होणार एवढंच सारखं सारखं मन सांगत होतं!
मॅच संपली,अजित आगरकरबरोबरच्या फोटोमुळे मेमोरेबल दिवस होईल असं वाटत असतानाच अजिंक्यनी सरप्राइज एंट्री घेतली होती...त्याच्याशी झालेली ही पहिली पण ..एकतर्फी भेट मला खूप आवडून गेली होती!
नंतर साधारण ४-५ वर्षांनी अजिंक्यला भेटायचं पुन्हा योग आला .... ती भेट अशीच, पूर्वीसारखी एकतर्फी! वानखेडेवर टेस्ट मॅच होती... माझ्या वयाबरोबर माझं वजन आणि क्रिकेटवेड पण तेवढंच वाढलं होतं.आमचे स्नेही- यश रानडेंमुळे पॅव्हेलियनच्या शेजारची टिकेट्स मिळाली होती. टेस्ट मॅच पडद्यामागून बघायची ही उत्तम संधीच! गेल्या काही वर्षात सातत्याने रणजीमध्ये परफॉर्म केल्यामुळे अजिंक्यचं इंडियन टीममध्ये सिलेक्शन झालं होतं.अर्थातच सचिन, द्रविड, कोहली, लक्ष्मण असे एक से एक जण असताना त्याला ११ मध्ये खेळण्याची संधी अजिबातच नव्हती. पण त्याला समोर बघून मस्त वाटलं. मनात म्हणलं 'I KNEW"
पुढचे ५ दिवस मी त्याला बघत होतो. जी चिकाटी,खेळाबद्दलची ओढ,सिन्सीयरनेस त्याचा मी काही वर्षांपूर्वी पहिला होता, तो कैक पटीनी वाढलेला मला दिसला. तेव्हाच्या रोपट्याचं झाड झालेलं दिसत होतं मला. ५ दिवस हा मुलगा बॉण्ड्रीलाईनवर उभा होता. आपली बॅटिंग असो किंवा बॉलिंग, ह्याचा लक्ष सतत फिल्डवर असायचं. खेळणाऱ्या लोकांकडून काही इशारा आल्यास उत्तर द्यायला हा सदैव पहिला असायचा.. आता ह्यावर बरेच जण आक्षेप घेतील - हे प्रत्येक खेळाडू करतो वगैरे. पण अजिंक्यामध्ये टीमला कुठल्याही प्रकारची मदत करण्यात, काँट्रीब्युट करण्यात समाधान मानण्याची वृत्ती बघितली. त्याच्याबरोबर राहुल शर्मा वगैरे सारखी मंडळी बेंचवर होती पण त्यांची गेम मधली इन्व्हॉल्वमेंट आणि अजिंक्यची ..ह्यात जमीन अस्मानचा फरक होता. तोच फरक आत्ता त्यांच्या करियर मध्येपण रिफ्लेक्ट होतोय.
लंच सुरु व्हायच्या आधी ५ मिन हा पॅडअप होऊन तयार असायचा, लंचब्रेक झाल्या झाल्या ४० मिनीटस प्रॅक्टिस-विकेट्सवर बॅटिंग करत होता... टी टाइम आणि दिवसाचा खेळ संपल्यावर २० मिन फिल्डिंग प्रॅक्टिस..आणि हे असं ५ दिवस!! खेळावरची ही कमिटमेंट बघून मी कमालीचा भारावून गेलो होतो सिन्सीयरनेसचा उच्चांक! आय टी मध्ये काम करत असल्यामुळे लोक 'बेंच' वर असताना किती टाईमपास करतात हे फारच जवळून बघितलं हॉट, लोकं AC रूम मधलं ट्रेनिंग अटेंड करायला पण टाळाटाळ करतात! पण अजिंक्यचं असं नव्हतं, हा 'रिकामा' वेळ तो जास्तीत जास्त शिकायला वापरत होता.
शाळेमध्ये वगैरे काही काही मुलं ही नैसर्गिक टँलेन्टेड नसतात, पहिला नंबर मिळवणारी पण नसतात, हिरो नसतात ... पण तरी सुद्धा हार्ड वर्कींग असतात ,अपयशातून शिकणारी असतात, शिस्तप्रिय असतात...आणि त्यामुळेच शिक्षकांची, आई- वडिलांची अतिशय लाडकी असतात.. ..ती त्यांची 'शहाणी मुलं' असतात! अजिंक्यपण ह्याच कॅटेगरी मधला आहे. संध्याकाळी घरी आल्यावर हात पाय धुवून शुभमकरोति म्हणणारा आई बाबांचा शहाणा मुलगा!
हा शहाणा मुलगा तब्बल १६ टेस्ट मॅच बेंचवर होता. शेवटी चिकाटीच्या जोरावर भारतासाठी खेळलाच, बऱ्याचस्या मॅचेस गाजवल्यासुद्धा .. पण हा लेख त्याच्या करियरवर बोलण्यासाठी नाही .. त्याला अजून खूप मोठा पल्ला गाठायचंय, त्याची मेहनत आणि एकाग्रता त्याला खूप पुढंपर्यंत नेईलच ...ह्याबद्दल मला स्वतःला खूप आत्मविश्वास आहे आणि तसं वाटायला कारणीभूत झाली ती त्याच्याशी झालेली माझी ३री भेट !!
२०१५ ला ब्रेबॉर्न स्टेडियमवर आय पी एल ची प्रॅक्टिस सुरु असताना आमचे बंधू स्वानंद ह्यांनी ग्राउंडवर जाण्याची संधी दिली. साधारण २ तास थांबून प्लेयर्सची वाट बघत होतो. ग्राउंडवरच उभे असल्यामुळे अजिंक्यची नजर आमच्यावर पडली होतीच. प्रॅक्टिस झाल्यावर तो स्वतः आमच्या दिशेने आला, आम्हाला भेटायला....गेल्या १० वर्षातली ३री ,पण ह्या वेळेस एकतर्फी नसलेली ही आमची भेट. नेहमीसारखा शांत हसला. त्याचा डाऊन टू अर्थ अटीट्युड बघून हा सेलिब्रिटी वगैरे नसून हा आपला मावस भाऊ आहे कि काय असं फील मला आला! आणि त्या गडबडीत मी पटकन मराठीत बोलून गेलो- "लॉर्ड्स चे १०० ही खूप महान इनिंग होती!!"
तो क्षणभर थांबला आणि बोलला 'थँक्स, पण आता पूढच्या मॅचेसवर फोकस करणं जास्त महत्वाचं आहे"
बास !! त्या एका वाक्यात मला समजलं १० वर्षांपूर्वी बघितलेला हा मुलगा किती परिपक्व आणि मॅच्युअर्ड आहे, तो मोठा खेळाडू होण्यासाठीच जन्मला आहे!! मुंबई क्रिकेटच्या संस्कारात वाढलेला.... सचिन, द्रविड,कुंबळे सारख्यानी पैलू पाडलेल्या अशा शहाण्या मुलांच्या हाती टीम इंडियाचं भवितव्य एकदम सुरक्षित आहे ह्याची खात्री पटली!!
No comments:
Post a Comment