बकेट लिस्ट - नॉट जस्ट अ टिझर रिव्यू!
आम्हा आयटी कामगारांना दिवाळीपेक्षा जास्त महत्वाचा असणाऱ्या विकेंडला मी ऑफिसच काम करत बसलो होतो. लॅपटॉप वर चिडचिड, 'भ'ची बाराखडीवगैरे सगळ्या गोष्टींचा जप करून मी शेवटी काम करतच होतो... ते आता इतकं वाढलं होतं कि रात्री सुद्धा मी लॅपटॉपसमोर डोळे लुकलुकत बसलो होतो... घरात एकदम दुष्काळात तेरावा महिना वगैरे टाईप्स वातावरण होतं .... बायकोनी अतिशय प्रेमानी शेपूच्या भाजीनी भरलेलं ताट समोर ढकललं आणी खेकसली "हां , गिळा"...
मी चुपचापपणे घास घेतला.. उजव्या हातातला तो कडवट शेपू नीट पोटात जाण्यासाठी डाव्या हातानी मोबाईलवर फेसबुक उघडलं... बघतो तर काय रात्री १२ वाजतावगैरे आमचे मित्र सुमीत राघवननी विडिओ टाकलेला दिसला... (मित्र म्हणजे फेसबुक फ्रेंड... पण आपला मित्र वगैरे बोललं कि हवा होते आपली...असो) तर सुमीत राघवननी टाकलेला तो विडिओ आपण प्ले केला... हार्डली ३० एक सेकंदाचा असावा ... लगेच डाउनलोड झाला...
विडिओ डाउनलोड झाला आणि पहिल्या सेकंदातच "विविध रंगानी नटलेलं , विविध प्रकारचा नृत्याविष्कार दाखवणारं असं एक उंच , मोठं ..थंडगार पाण्याचं आनंदानी भरलेलं कारंज" हे माझ्या सुकलेल्या जीवात अपलोड व्हायला लागलं.... असं मला लगेच वेडंवगैरे बोलू नका हो.. पण खरंच वेडच लागलं त्या एका क्षणात... कारण समोर होती गेली ३० एक वर्ष हिंदीतून आपल्याला वेडंपिसं करणारी ... माधुरी दीक्षित... पर्पल साडीमध्ये साध्या आणि खऱ्या सोन्दार्याची डेफिनेशनच घेऊन ती स्क्रीनवर आली आणि माझ्या तोंडाजवळ गेलेला तो शेपूचा घास तिथेच थांबला.... तोंडाचा आ मोठाच होतं गेला... माधुरी मराठीत बोलत होती ... "मी मधुरा साने" माधुरीच्या तोंडून आलेलं हे वाक्य केवढं कमाल मधुर वाटलं !
पुढची ३० सेकंद ते टिझर हातातला शेपूला हातातच ठेऊन अतिशय मन लावून बघत होतो.... पिक्चरच नाव "बकेट लिस्ट"! माधुरीच्या सौन्दर्याबद्दल अनेकांनी अनेक गोष्टी लिहिल्या - बोलल्या आहेत आणि तरीही ते वर्णन कमीच आहे... त्यावर अजून मी किती ही लिहिलं तरी ते कमीच पडेल ... पण तिच्या दिसण्या एवढंच भारी वाटत होता तो तिचा आवाज आणि त्यातून बाहेर पडणारी मराठी वाक्य... असं वाटलं कि तिनी बोलतच राहावं... जनरली हे असे हिंदी प्रस्थपित मराठी लोक्स मराठी बोलायला लागले कि ऐकायला खूप विचित्र वाटतं पण आपल्या माधुरीचं तसं नाही... काय गोडवा तो आवाजात... आणि जेवढा गोडवा आवाजात तेवढाच तिच्या स्माईलमध्ये! काय कमाल आहे तिची...३५ एक वर्ष चेहऱ्यावरचा गोडवा अगदी तसाच आहे ...किंचितही कमी झाला नाही इन फॅक्ट वाढतच चाललंय... आपल्या घरात केलेला गुलाबजामसुद्धा (पिक्चर नाही, खराखुरा गुलाबजाम) २-३ दिवसांनी बोर वाटायला लागतो ...त्याच्यातला फ्रेशनेस पूर्णपणे संपतो... म्हणजे अगदी हिशोबच करायला गेलं तर साधारण एक लाख वीस हजार सातशे तेवीस वगैरे गुलाबजामांचा गोडवा तिच्यात आहे हे मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो!
गेल्या ३० वर्षात तिनी किती सोनेरी क्षण दिले ह्याबद्दल लिहायची खूप इच्छा आहे पण एवढं लिहिलं तर फेसबुक डाऊन होऊ शकेल ही भीती वाटते! ह्या सिनेमाच्या निमित्ताने माधुरीनी दिलेल्या आठवणी बाहेर येतीलच पण आज एवढंच सांगावंसं वाटतं कि टीझरमधल्या "शिट्टी वाजवण्याच्या" सीन पाहिल्यावर पोटात शहारे येतात आणि डायरेकट हम आपके है कौनमधली निशा डोळ्यासमोर येते ...अगदी चॉकलेट लाईम ज्यूस घेऊन!!
बकेट लिस्ट - तसा नावावरून सिनेमाच्या कथानकाचा अंदाज येतोच.. आई , सून , बायको, गृहिणी वगैरे वगैरे अनेक रोल्स प्ले करणारी माधुरी म्हणजेच मधुरा साने आणि तिच्या (अपूर्ण) इच्छा पूर्ण होतानाची गोष्ट!...कम-बॅक आणि मराठी सिनेमामधील डेब्यू ह्यासाठी असा नॉन ग्लॅमरस रोल निवडला ह्यातूनच माधुरी अजूनही चॅलेंजेस बिनधास्त फेस करते हे समजतं ... माधुरीसारखंच दिग्दर्शक तेजस देऊस्करचासुद्धा हा एक प्रकारचा कम-बॅक.... निवडलेला विषय आणि माधुरी,सुमीत, दिलीप प्रभावळकर, वंदना गुप्ते , शुभ खोटे हे असं तगडं कास्टिंग ह्यावरून तरी माधुरी अँड तेजस आर बॅक विथ बॅंग असंच म्हणावं लागणार...
माधुरीबरोबर ह्या सिनेमात आहे सुमीत राघवन... लोकांना 'कर्मण्येवाधिकारस्ते....' वगैरे थिअरी पाठ असते पण सुमीत राघवनने ह्या गोष्टीचं पूर्ण पालन केलंय ... गेली कित्येक वर्ष तो प्रामाणिकपणे काम करतोय... फळांची अपेक्षा न करता... आणि २०१८ हे त्याला कष्टाचं फळ घेऊनच आलंय... एका वर्षात हा सलग दुसरा मोठा पिक्चर... त्यात एकामध्ये साक्षात माधुरीबरोबर! झटकन यश हवं असणाऱ्यांना, लवकर डिप्रेस वगैरे होणार्यांना सुमीत राघवन हे उदाहरण मोठं औषध आहे! त्याला मिळालेल्या ह्या संधीच त्यानं नक्कीच सोनं केलं असणार...
३० सेकंदाच हे टिझर साधारण ५० एक वेळा पाहिलं... नजरेत फक्त माधुरी भरली होती...तिच्या आठवणींचा एवढा इफेक्ट झाला होता कि दिल तो पागल हैच्या मायासारखं शेपूची भाजी मला म्हणाली "जब तुम मुझे देखते हो,लगता है जैसे मै सबसे खूबसूरत हूं" हे ऐकल्या ऐकल्या मी फायनली त्या शेपूचा घास घेतला.....
आज आयुष्यात पहिल्यांदा शेपू मला गोड लागला! थँक्स टू बकेट लिस्ट -
आमच्या माधुरी आणि मधुरा सानेला घेऊन या लवकर आता!
- स्वागत पाटणकर