गुलाबजाम - एक वजनदार ट्रेलर!
रविवार सकाळची वेळ असते , बिल्डिंग खाली बॉक्स क्रिकेट जोरदार सुरु असतं... ऍज युज्वल पहिली मॅच हरलेलो असतो... २री हरलो तरी चालेल पण आपण बाप बॅटिंग करायची असं स्वप्न उराशी वगैरे बाळगून पीच वर उतरतो आणि साध्या बॉलवर आउट होतो... भयंकर फ्रस्ट्रेशन आलेलं असतं , चिडचिड होत असते , दुःखाचा डोंगर कोसळलाय कि काय वगैरे वाटतं .... निराश, हतबल मनानी घराची बेल वाजवतो... बाबा दार उघडतात , आपण चिडक्या मूडमध्ये बॅट फेकायला जातो तेवढ्यात तेवढ्यात आईनी संडे स्पेशल केलेल्या 'वरणफळांचा' वास आपल्या नाकात पोहोचतो.... एखाद्या वॉटर पार्क च्या स्लाईड सारखा नाकातून झपझप घसरत पोटात जातो... त्या वासाची ती जादू वेगळीच असते... ती १५ मिनिटापूर्वीची निराश अवस्था एका शॉटमध्ये निघून गेलेली असते... शूज वगैरे काढण्याच्या फंदात आपण पडत नाही , घामट कपडे काढायचे कष्ट आपण घेत नाही... डायरेक्ट टेबलवर बसतो आणि बाऊलमध्ये वरणफळं घेतो त्यावर तूप सोडतो..ते हळूच वितळलेल तूप त्यात समरस होऊन जातो... तो वास अतिशय निर्दयीपणाचे आपल्या नाकापासून मनावर हल्ला करतो.... हावरटपणा म्हणजे काय हे तेव्हा कळतं... पहिला घास पोटात जायच्या आधी दुसरा घास जिभेवर असतो... साधारण १० एक मिनिटं असंच सुरु असतं.. पण मग जरा निर्लज्ज मन इकडे तिकडे बघायला लागतं... बाबा ओरडत असतात "अर्रे मठ्ठा ,आईला सांग तरी कशी झालीयेत वरणफळं " ........ आई शांत आणि समाधानाने उत्तर देते "तो घरातआल्यावर, पहिल्या वासाला त्यानी दिलेली रिऍक्शनच खूप काही सांगून गेली मला.... चांगल्या पदार्थाची पहिली खूण असते .... त्याचा वास!" मनाला खूप पटतं हे वाक्य... आणि फक्त स्पेशल मेनूसाठी अँप्लिकेबल नसतं ... रोजचं जेवण अगदी बटाटयाच्या काचऱ्यांपासून ते पिठल्या पर्यंत, वरण भातापासून ते चिकन रस्स्यापर्यंत ... पदार्थ कुठलाही असो, तो कसा झालाय हे ओळखण्याची पहिली साइन असते ती म्हणजे त्याचा वास! आणि हे वाक्य मनोमन पटलं इकडे शिकागोमध्ये... युट्युब बघत बघत चिकन रस्सा केला आणि गोऱ्या कलीग नी केवळ वासावरून मी केलेला रस्सा मागून घेतला होता.... ती जी एक रिऍक्शन असते ना ती स्वैपाक करणाऱ्याला खरंखुरं समाधान देऊन सुखावणारी असते.
हे सगळं आठवायचं निम्मित म्हणजे आज बघितलेलं सचिन कुंडलकर दिग्दर्शित 'गुलाबजाम' सिनेमाचं ट्रेलर! साधारण ट्रेलर बघितल्यावर त्याची स्टोरी काय आहे, गाणी कशी आहेत वगैरे ह्याचा विचार आपल्या मनात येतो... पण गुलाबजाम!!! ह्याची गम्मतच वेगळी आहे.... टीझरच्या ३० सेकंदापासून ते ट्रेलरच्या २ मिनटापर्यंत आपण एक-एक फ्रेम फक्त बघत रहातो , त्याचा वास घेत रहातो त्याची चव घेत बसतो पण पोट काही भरत नाही किंबहुना हा सिनेमा बघायची भूक वाढवते! बेसिकली ह्या विषयावर सिनेमा येतोय ते सुद्धा मराठीत हीच एक प्रचंड सुखावणारी गोष्ट आहे.... सचिन कुंडलकरला फुल्टू मानलं आपण.. साष्टांग!
ट्रेलर बघायला इथे क्लिक करा
काय जबरदस्त माणूस आहे हा सचिन कुंडलकर.... यश - अपयश काहीही आलं तरी सदैव वेगळं करत रहातो... आणि त्याचं वेगळं म्हणजे हे खरोखरचच वेगळं असतं नावापुरतं नाही.... त्याचे गेल्या काही वर्षातले सिनेमे पहिले तर वेगळेपण म्हणजे नक्की काय असतं ह्याची जाणीव होईल.... अय्या वरून हैप्पी जर्नी करतो , राजवाडे & सन्स कडे जाऊन वजनदार होतो.... आणि अशा नंतर डायरेकट गुलाबजाम घेऊन तो आपल्याला भेटायला येतोय...मराठी पदार्थांचा हा विषय आणि हे नाव निवडल्याबद्दल त्याचे पोटापासून आभार!
खरं म्हणजे नाव बघूनच पिक्चर बघायचा हे ठरलंय... पण ट्रेलरमध्ये अजून वेडं करणारी गोष्ट म्हणजे सचिन आणि तेजस मोडकनी लिहिलेले ह्यातले संवाद....कानांना एकदम गोड वाटणारे आणि मनाला एकदम पटणारे संवाद. बेसिकली हे संवाद म्हणजे सिनेमासाठी वगैरे लिहिलेले आर्टिफिशियल संवाद वाटत नाहीत... आपण आई-आजीकडून ऐकलंय तेच सगळं आपण सिनेमात ऐकतो... आणि त्यामुळेच ते मनाला पटून जातं. "स्वैपाक म्हणजे आपल्यातलं काहीतरी काढून त्या पदार्थाला देणं" , "मनातलं सगळं सांगते मी पदार्थाना, ते समजून घेतात आपल्याला आणि मग चव येतेत्यांना " वाह ! क्या बात है... काय जबरा डायलॉगस! माझ्या आजीला ला मी कित्येक वेळा गुळाच्या पोळ्या करताना बोलताना पाहिलंय ... "अरे,गुळा बाहेर येऊ नकोस हां" हे असं ठणकावून सांगून ती गुळाच्या पोळीला प्रेमळ धाकात ठेवायची...आणि अर्थातच एक चविष्ट आणि आकर्षक गूळ पोळी तव्यावरून ताटात पडायची... तेजस सारख्या तरुण लेखकाकडून असे संवाद लिहिलं जाणं हे मराठी इंडस्ट्रीसाठी खूप सुखावह गोष्ट आहे!
टिझर बघायला इथे क्लिक करा
अशा वेगळ्या विषयासाठी, ग्रेट सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकर ही 'ऑड' पेअर ऑनस्क्रीन दाखवून कास्टिंग मध्ये ही गुलाबजाम टीम नी बाजी मारलीये. स्वैपाकाबद्दल च्या भावना सोनालीच्या आवाजात ऐकताना मला एकदम भारतात जाऊन आईच्या किचनमध्ये बसावस वाटलं...स्वैपाकासारख्या गोष्टीत लागणारा 'मॅच्युअर्ड'नेस सोनाली कुलकर्णीच्या आवाज , देहबोली सगळीकडून वाहत राहताना दिसतो. त्याच बरोबर सिद्धार्थ चांदेकर.. त्याच्या उच्चारात एक नाजूकता आहेत, चेहऱ्यावर गोड इनोसन्स आहे... त्यामुळेच त्यानी सोनालीला केलेल्या विनवण्या ह्या अजून भिडतात. सिद्धार्थला झेंडापासून बघत आलोय, त्याला आता असं लीड रोल मध्ये बघून खूप भारी वाटतंय. अशा संधीच त्यांनी नक्कीच सोनं केलं असणार...
संवाद, विषय, कलाकार अशा अनेक आघाड्यांवर इंटरेस्टिंग वाटणाऱ्या ह्या सिनेमाबद्दल बोलताना आवर्जून उल्लेख करायला हवा सायली राजाध्यक्ष आणि श्वेता बापट ह्यांचा - 'फूड डिझाईन' हा या सिनेमाचा महत्वाचा पिलर ह्या दोघीनी मनापासून पेललाय. अन्न हे पूर्णब्रह्म हा फेमस ब्लॉग चालवणाऱ्या सायलीताई ह्यांनी सिनेमाच्या गरजेनुसार पदार्थांची मांडणी केलीये.... अर्थातच हे करताना गोष्टी फक्त "पॉश" दिसणार नाहीत ह्याची खबरदारी त्यांनी घेतलीये.. त्यामुळेच कुठलीही कुत्रीमता न दिसता त्या पदार्थातून एक मराठमोळा गोडवा आपल्याला दिसतो आणि एकदम इफेकटिव्ह आउटपुट तयार होतं...स्क्रिनवर येणारे तळलेले मासे, वरण भातापासून - श्रीखंडापर्यंत साग्रसंगीत सजलेलं ताट, तयार होणार पुरण , मळली जाणारी कणिक, कोथिंबीर वडी, तयार होणारं पूर्ण , तळली जाणारीकांदा भजी आणि डब्यातले गुलाबजाम असे अनेक मराठी पदार्थ त्यांच्या मांडणीमुळे हे अजून लक्षवेधी होतात... छोट्याश्या टीव्ही वर हे ट्रेलर बघून अशी हालत झालीये तर मोठ्या स्क्रिनवर असे आपले पदार्थ बघून तर प्रेक्षकांच्या पोटातले कावळे नक्कीच ओरडायला लागणारेत... मल्टिप्लेक्समधले सामोसे कितीपण महाग असले तरी त्यांचा खप गुलाबजाममुळे १६ फेबपासून खूप वाढणार आहे. .
खवय्ये, फुडी वगैरे लोकांची ह्या जगात कमी नाही... आपण अगदी वेडयासारखं सर्व गोष्टी खातो पण 'ग्लॅमर' फक्त इटालियन, मेक्सिकन पासून पंजाबी पदार्थाना मिळतं. अशा वेळेस मराठी पदार्थांचं मार्केटिंग करणारा हा एकदम महत्वाचा सिनेमा ...गुलाबजामचा बूस्ट मिळून थालीपीठ, पिठलं वगैरे गोष्टी जगाच्या कानाकोपऱ्यात पोचतील हीच अपेक्षा! मराठी खवय्येगिरी ला प्रमोट करणाऱ्या ह्या झी स्टुडिओजच्या फिल्मला आपण प्रमोट करायला काय हरकत आहे? चला तर मग 16 फेब ला थिएटरमध्ये गुलाबजाम बघा... आता मी बास करतो...बायकोने केलेली साबुदाण्याची खिचडी माझी वाट बघतीये!
ता.की. - शिवाजीनगर रेल्वे स्टेशन बाहेर कधी कुणी शूटिंग करेल असं आयुष्यात वाटलं नव्हतं, पण ट्रेलरमध्ये १ सेकंदाकरीता का होईना शिवाजीनगर दिसलं आणि माझ्यातल्या पुणेकराला आश्चर्याचा सुखद धक्का दिल्याबद्दल गुलाबजामचे आभार :)